Now Reading
आटलेले अश्रू

आटलेले अश्रू

Menaka Prakashan

देवकीनं ताटात थोडा भात वाढून घेतला. वरण घ्यावं की पोराला ठेवावं, या विचारानं तिनं चमचाभर वरण वाढून घेतलं. कडेला फ्लॉवरची भाजी घेतली. तिथूनच तिनं बाजेकडे नजर टाकली. नवर्‍याची छाती खाली-वर होतेय, पोट हलतंय, याचा अर्थ तो जिवंत आहे. तिनं भात कालवायला हात घातला, तर तोंडातून कचकन शिवी बाहेर पडली. तिला ओकारी झाल्यासारखं झालं. ती उठली. न्हाणीत जाऊन पुन्हा हात धुतले. नवर्‍याच्या बाजेकडे पाठ करून बसली. मागच्या दारातल्या छपरावर गेलेल्या भोवरीच्या वेलीकडे बघत भात कालवू लागली. भाताचे मुटके करून ती अंदाजानं तोंडात टाकायला लागली. दोनच घास पोटात गेले असतील, नवर्‍याच्या मुताचा वास तिच्या नाकात घुसला. तिनं मांडीजवळचा पाण्याचा ग्लास उचलला. डोळे इकडे तिकडे फिरवून मन रमवू लागली. डबे, मांडणी, सूप, दोरी, पाटा, बंद स्टोव्ह बघत ती भाताचे मुटके खाऊ लागली. हाताला रिकामं ताट जाणवलं, तसं ती उठली. भांड्याच्या ढिगात खरकटं ताट ठेवलं. हात धुवायला ती न्हाणीत जाताना नवर्‍याला धाप लागल्याचा तिला आवाज येऊ लागला.

‘‘अरं बाबा, दोन घास नीट जेवू देशील का नाय? का मुळावं उठलायेस माझ्या!’’
तिला वाटलं, आपण जोरात तर नाही ना बोललो. तिनं मागे पाहिलंच नाही. ती विचार करू लागली, ‘हे आत्ताच मेलं, तर किमान चारजण इथे जमा होतील. इथे चारजणांना उभं राहायला जागा तर हवी. आधी भांडी घासून घ्यावी, मग बघता येईल.’ तिनं पदर खोचला. ओल्या हातानंच तिनं दारातली भांडी पायरीवर काढली. टबात पाणी घेऊन भांडी घासत राहिली. सकाळपासून ती मोकळ्या हवेत पहिल्यांदाच आलीये, असं तिला वाटू लागलं. दुपारचं ऊन तापलं होतं. दोन्ही पोरं मांडवातल्या गणपतीजवळ जाऊन खेळत असतील. रस्त्याच्या कडेला चाळ. चाळीतल्या शेवटच्या खोलीत देवकीचा संसार होता.
भोवरीची पानं उन्हात अधिकच हिरवी दिसत होती. भादव्यातलं ऊन सोन्यासारखं चमकत होतं. पावसात कुजलेल्या घाणीचा कुबट वास येत होता. देवकीनं पाहिलं, एकही माणूस रस्त्यावरून जाताना दिसत नाही. ‘सगळी माणसं गेली कुठे? तोंडाला मास्क, नाहीतर रुमाल लावून माणसं रस्त्यातून जाताना दिसायची. कुणी हटकायचं. ‘बरी आहेस का?’ विचारायचं. ‘पाव्हणा कधी येणारंय,’ अशी चौकशी करायचं. अन् पाव्हणा आजारी पडल्याची बातमी पसरली, तसं कुणीच फिरकेना इकडे. गणपतीच्या मांडवात तर म्हणे हीच चर्चा सुरू, पाव्हण्याला कोरोना झालाय. पोरांनी येऊन सांगितलं. तेव्हा आपल्याला माहीत. तसं चार-पाच दिवसांपासून सर्दी-खोकला होता. म्हटलं, ‘गोळ्या-औषध आणा, नाहीतर डॉक्टरकडे जा.’ दवाखान्यात जायची भीती. या माणसानं म्हातारीच्या आजारपणातल्या गोळ्या घेतल्या, पण सर्दी काही बरी झाली नाही. मग दोन दिवसांनी अंगही तापलं. कोरोनामुळे माणसं बाहेर पडत नव्हती. कुणी कुणाकडे जाऊन उठत-बसत नव्हतं. घरात टीव्ही नव्हता, त्यामुळे कोरोनाचा उच्छाद ध्यानात येत नव्हता. तरी आजूबाजूला पाच-सहा माणसं कोरोनामुळे गेलीच होती. चौथ्या दिवशी लयीच अंग दुखतंय म्हणून हे झोपलं ते झोपूनच राहिलं. बाहेर कुणीतरी बोंब उठवली, पाव्हण्याला कोरोना झालाय. पहिले चार-पाच दिवस तर कुणीच फिरकलं नाही. कॉलनीतल्या पुढल्या अंगाला भावाचं घर होतं. ना भाऊ आला की भावजय आली. भावाची पोरंसुद्धा फिरकली नाहीत. देवकीचं मन तळतळाटानं भरून गेलं होतं.

हातातली भांडी राग आल्यागत खसखसा धुऊन बाजूला ठेवली. एवढा वेळ झाला, तरी आपण नवर्‍याकडे बघितलं नाही, याची तिला जाणीव झाली. तरी तिनं मागे वळून पाहिलं नाही. नाहीतर आपण गेले वीस-बावीस दिवस त्याचाच विचार करतोय. समोरची दोन पातेली फारच जळाली होती. बुडाचा पार कोळसा झाला होता. घासताना हात दुखत होते. मघापासून ती बिनआधाराची बसलीये. गुडघ्याला कळ लागलीये. तिच्या मनात आलं, ‘बाई! आपल्याला तर कोरोना झाला नाय ना?’ ती पातेलं घासायचं सोडून मनगट, कोपर दुसर्‍या हातानं दाबून पाहू लागली. पायांचे सांधे दुखतात का, म्हणून ती जाग्यावरच उभी राहिली. तिनं ऐकलं होतं, सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, सांधेदुखी ही कोरोनाची लक्षणं आहेत. तिच्या मनात पुन्हा शिव्याच आल्या. ‘मेल्याला सांगत होते, तरी जवळ यायचा. कसंनुसं व्हायचं. एवढ्याश्या खोलीत पोरांच्या पुढे गडबड नको म्हणून गपगुमान राहावं लागायचं. ‘नाही’ म्हटलं, तर याचा मेल्याचा तमाशा सुरू. आता याला कोरोना झाला, तर आपण काही सुटत नाही याच्यातून.’ ती घासणीनं पातेलं जोरजोरानं घासत राहिली. पातेल्याचं बूड चांगल पांढरशुभ्र दिसू लागलं. तिनं डाव्या हाताच्या ओंजळीनं बुडावर पाणी सोडलं. पातेलं नवंकोरं असल्यागत चमकू लागलं.

तिला आठवू लागलं, ‘पातेल्यासारखंच आपलं आयुष्य चकचकीत, नवकोरं होतं. दहावी पास झाले, तेव्हा केवढा आनंद झाला होता. मैत्रिणी कॉलेजला जाणार होत्या. आपणही कॉलेजला जावं, पुढे शिकावं, असं वाटत होतं. त्याच वर्षी ताईचं लग्न ठरलं होतं. लोक म्हणायचे, एकात दोन कार्यं होऊन जातील. नाहीतरी दोन वर्षांत लग्नाचा मांडव घालावाच लागणार आहे. वडलांनीही व्यवहाराचा विचार केला. आपलं लग्न जमत नाही, म्हणून ताईच्या लग्नाची तारीख बदलली. तिच्या सासरकडचे लोक तगादा लावू लागले, म्हणून आपल्यालाच दोष देऊ लागले. सावळा रंग काय आपण मागून घेतला होता? लहानपणी तर सगळेजण ‘काळी’च म्हणून हाक मारत. शाळेत जाऊ लागल्यावर आपल्याला वाईट वाटू लागलं. राग येऊ लागला, कुणी ‘काळी’ म्हणून हाक मारल्यावर. तरी आजी मरेपर्यंत त्याच नावानं हाक मारत राहिली. तिला आपलं खरं नाव माहीतच नसल्यागत. अस्सा राग यायचा, पण या वर्णामुळेच आपलं लग्न जमत नाही, हे पक्कं मनात बसलं. क्षणभर वाटायचं, आपल्या काळ्या वर्णामुळे कधीच लग्न जमणार नाही. आपण इथेच, अशाच गरिबीत राहू.

त्याच दरम्यान कुणीतरी भजन गाणारा गायक आपल्याला बघायला आला, तेव्हा मेल्याचं तोंडसुद्धा पाहिलं नाही धड. दुसर्‍यांदा त्याच्यासमोर गेलो ते मुंडावळ्या बांधून त्याच्या गळ्यात हार घालायलाच. वर्गातल्या मैत्रिणी लग्नाला आलेल्या. त्या आपसात काहीतरी कुजबुजत नि फिदीफिदी हसत. त्यांच्या हसण्याचा अर्थ आपल्याला लवकरच कळला, पण इलाज नव्हता. ताई नांदत होती म्हटल्यावर आपल्याला नांदावंच लागणार, हे समजलं होतं. ते बेणं रात्रभर भजन करायला जायचं गावोगाव हिंडत. मग पहाटे येऊन कडमडायचं. आपण साखरझोपेत असायचो. ते गारठलेल्या अंगानं येऊन गोधडीत शिरायचं. शरीरासोबत झटायचं, झोपेत फक्त त्यानं खाल्लेल्या खोबर्‍याच्या प्रसादाचा वास तेवढा लक्षात यायचा. त्या वासानं झोपेचं खोबरं व्हायचं. तो बैल डाराडूर झोपायचा. आपण टक्क जागे राहायचो. मळवटावरच्या फळ्यातून येणारा उजेड बघत. कोंबडा आरवला, दिवस उजाडला, की उठून रानात जायचं. फाट्यांचा भारा आणेपर्यंत दहा-अकरा वाजलेले असत. तोवर बैल झोपलेलाच. सासू-सासरे चहापानासाठी थांबलेले. जणू त्यांना चहा कसा करतात हे माहितीच नव्हतं. घरात फाट्या असूनही रोज फाट्यांचा भारा रानातून आणलाच पाहिजे, असा इथला नियम होता. कोवळ्या हातात काटे घुसत. रक्त येई. त्यापेक्षा मन अधिक विव्हळ होई. सहा महिने नसतील झाले, तर बैलोबा लागला नाटक करायला. कशावरूनही निमित्त काढायचा. जनावरासारखा मारायचा. म्हणे, ही मला आवडतच नाही. आता काय करावं या कर्माला? आपण तर अचंबित झालो. माहेरी सांगितलं, तर आई-बाबा म्हणायला लागले, ‘तुलाच संसार करता येत नाही, एकतर तुझं जमतच नव्हतं. आता कुठे झालंय लग्न, तर तू अशी नाटकं करतेस. घे जुळवून नवर्‍याशी.’ गेल्या पावली आलो सासरी, तर नवरोबा घरातच घेईना. सगळं सामान दिलं बाहेर फेकून. अख्खा गाव जमा झालेला, पण कुणीच आपल्या बाजूनं आलं नाही. तिथे थांबण्यात अर्थ नव्हता. बसस्टँडवर आले. बसमध्ये बसून घरी आले. माहेरी कुणाचा तरी मृत्यू झालाय, असं वातावरण. दोन रात्री जेवले नाही. कुणी विचारलंच नाही जेवायला. आई जवळ आल्यावर मात्र हमसून रडलो. बर्‍याच भानगडी केल्या, पण बाप्या जुमेना. कुणाचंच ऐकेना. आपण घरातला शेणगोठा करत राहिलो. दहावीचं ‘कुमारभारती’ पुस्तक हाती पडल्यावर वाचत राहायचो. मैत्रिणींची आठवण यायची. आई-वडील होते तोवर भीती वाटली नाही, पण ती दोघं गेल्यावर पार पोरकं वाटलं. पण भावजयीनं भावाकडे जोर लावला, ‘हिला बघा एखादा बिजवर. लावून द्या पाट. पण इथे नका ठेवू माझ्या उरावर. हिनं हिचा संसार नाही केला धड, आपलाही संसार होऊ देणार नाही.’ घालूनपाडून बोलणं सुरूच होतं. भाऊ पहिल्यासारखा वागत नव्हता. नीटनेटकं राहावं, तरी बोलणं ऐकावं लागायचं. वेंधळ्यासारखं राहावं, तरी टोमणे ऐकायला लागत. साडी नेसलो, तरी म्हणायचे स्वत:ला पतिव्रता समजतेय. गाऊन घातला, तर म्हणायचे स्वत:ला काय परी समजतेय. ऐकायला येईल इतक्या जोरानं बोलायचे. भाऊ कुणाच्या मजुरीत जाऊ देत नव्हता. नातेवाईक आले, तरी आपल्याबद्दल कुणी साधी चौकशी करत नव्हतं. आपला नेमका दोष काय, हेच कळत नव्हतं. विचारानं डोकं फुटतंय की काय, असं व्हायचं.’

देवकीनं दुसरं पातेलं घेतलं हातात. घासणी राखेत बुडवली. मागून घरघर लागल्याचा आवाज येतोय. आता थोडा आवाज वाढलाय का, याचा तिनं अंदाज घेतला. ‘आवाज क्षीण झालाय, पण घरघर वाढलीये. आपण मागे बघूच नये, असं तिला वाटू लागलंय. का बरं आपल्या मनात इतका तिरस्कार निर्माण झालाय? का हा माणूस नकोसा झालाय?कसा केला तरी नवराय आपला. कुंकवाचा धनीये तो. काय सांगावं तो कमी दिवसांचा सोबती आहे, तरी आपल्याला त्याच्याविषयी जिव्हाळा का वाटत नाही? कसा संसार केला आपण या माणसासोबत? का इतके कठोर झालोत आपण? का बरं माफ करत नाही याला?’
‘‘आपण कोण यांना माफ करणारे?’’ असं ती जोरातच बोलली. घासणीनं पातेल्याचं बूड घासू लागली. खसखस असा आवाज येऊ लागला.
खसखस… घुर्रर्रऽऽघुर्रर्रऽऽ खसखस… घुर्रर्रऽ घुर्रर्रऽऽ
‘आपल्या इच्छेचा प्रश्नच नव्हता. एका रात्री आपला पाट लावण्यात आला. सगळ्यात जास्त आनंद वहिनीला झाला होता. पाठवणी करताना होत्या नव्हत्या सगळ्या वस्तू पिशवीत कोंबत होती. तिला आपली इथे एकही आठवण ठेवायची नव्हती. हे एक नवंच बेणं होतं. भावाची रिक्षा भाड्यानं चालवायचा. पहिली बायको सोडून गेलेली. तिच्यापासून त्याला एक मुलगी होती. भावाची एक खोली मुलुंडला होती. तिथेच संसार मांडला. दारात पाऊल टाकतानाच एखाद्या हिरोप्रमाणे सांगत सुटला. ‘आपण सिगारेट ओढतो.’ म्हटलं, ‘ओढ!’ अर्थात मनातच. त्याला त्याच्या सेवेसाठी बाई हवी होती. आपल्याला काय हवं होतं, असं कुणीच विचारलं नाही.’ आता जर कुणी हा प्रश्न विचारला, तर आपल्याला उत्तरही देता येणार नाही, असं तिला वाटतंय.

पातेलं कसं पांढरंशुभ्र दिसू लागलंय. भांडी उरकल्याचा एक आनंद तिच्या मनात पसरला आहे, पण तिच्या लक्षात आलंय, घरघर तर वाढलीये. छातीचा भाता जास्तच वरखाली होतोय वाटतं. तिनं वळून बघितलं, तर डोळे वटारलेले. तोंड उघडंच. तोंडातूनच घरघर आवाज येतोय, सोबत लाळेचे शिंतोडे छातीवर उडतायेत. काही लाळ ओठांच्या कोपर्‍यातून सांडतेय. ती घाबरली. काय करावं, असं तिच्या मनात प्रश्न आला. तिनं पटापट काम आटोपायची, पसारा कमी करायचा म्हणून पहिल्यांदा भांडी उचलून वर ठेवली. खरकटं सांडलं होतं. त्यावर पाणी टाकून फडका मारला. सकाळपासून घराला झाडू मारला नव्हता. तिच्या मनात विचित्र विचार येऊ लागले. काही वाईट घडलंच, तर सगळे येतील. इथला पसारा बघून आपल्यालाच नावं ठेवतील. ती पटापट हालचाल करू लागली. मागच्या दारातून तिनं डोकावून पाहिलं. रस्त्यात चिटपाखरूही नव्हतं. ‘पोरं कधीपासून घरात नाहीत. पोरं कुठे गेली असतील? मामाच्या घरी टीव्ही बघत असतील तर बरं.’ ती बाजेखालून, कोपर्‍यातून झाडू मारू लागली. त्याची घरघर खोलीभर घुमत होती. तिनं त्याच्याकडे निरखून पाहिलं.

ती विचार करू लागली, ‘अरं माणसा, नीट साथ दिली असतीस, तर नेटका संसार करून दाखवला असता. आपल्याला शहर आवडू लागलं होतं. गावाकडच्या आठवणी तिथे नव्हत्या. जगण्याची नवी उमेद तिथे दिसत होती. या भाड्याला म्हटलं, ‘तू रिक्षा चालव, मी चार घरची धुणी-भांडी करते. चार हातांनी कमवू. चार पैसे गाठीशी ठेवू.’ बैल तर फणकारलाच. म्हणे, ‘उपाशी राहू, पण कुणाची धुणी-भांडी करायची नाही.’ झालं आपण राहिलो घरकोंबडीसारखे. दहा वाजेपर्यंत जेवढा रिक्षाचा धंदा व्हायचा तेवढ्याचा वडा-भजी, पावाचा नाश्ता आणी. पोटभर गिळायचा नि झोपायचा. पुन्हा चार वाजता रिक्षा काढे. लांबचं भाडं मारायचं नाही. मग मोजकेच पैसे मोजून दाखवायचा. खरंतर तो सिगारेटवरच पैसे उडवायचा खूपसे. आपण राहायला छप्पर आहे नि दोन वेळचं जेवण मिळतंय, यावरच समाधान मानत राहिलो. आजूबाजूच्या बायांची धावपळ, मेहनत बघून वाटायचं, आपणही काहीतरी करून दाखवावं. दोन वर्षांतच दोन वेळा गरोदर राहिलो. कस्तुरी वर्षाची नव्हती, तर प्रमोद पोटात राहिला. रिक्षाचा धंदा खाण्यावरीच जात होता. भाऊ असला तरी व्यवहार होताच, भाऊ रिक्षाचं भाडं मागायचा. हा टाळाटाळ करायचा. शेवटी घडायचं ते घडलंच. भावानं रिक्षा एका बिहारी व्यक्तीला चालवायला दिली. हे बसलं घरीच, भावाला शिव्या देत. शेवटच्या दिवशी डब्यातले पोहे कच्चेच खाल्ले. पिशव्यांमध्ये सामान भरलं. पोरांना उचललं नि गावाकडे जायचं म्हणून याच्यामागे रेल्वे स्टेशनवर आलो. मोठ्या दिमाखात प्रवास करतोय, असा आब होता याचा. साठवलेल्या पैशांचं पाकीट फुगलेल्या खिशातून दिसत होतं. याचा अर्थ हा पैसा बैलानं सुरुवातीपासूनच बाजूला करून ठेवला होता. स्टेशनवरचा पाव-वडा खाल्ला. पोरांना खाऊ घातलं. रेल्वेचा प्रवास संपून बसमध्ये बसलो, तर या बाबानं आपल्या माहेरची तिकिटं काढली. आपल्या पोटात खड्डाच पडला. घरी आलो, तर सगळे जेवून झोपले होते. पोरं पेंगतच होती. एका संतरजीवर त्यांना झोपवलं. चार दिवस झाले, तरी बाबाची हालचाल दिसेना. भावाबरोबर दिवसभर हिंडायचा. काय काय मोठेपणा सांगायचा. भाऊही सारख्याला वारखा होता. तो म्हणत होता, ‘इथे राहू नको कायमचा. सोयर्‍यासारखा चार दिवस राहा. तुझा मान राखू.’ पण हा भाडखाऊ मानलाच नाही. ‘इथेच खोली घेऊ’ म्हणाला. भावाच्या खिशात पाचशेच्या नोटा कोंबल्या. भावानं ही चाळीतली खोली मिळवून दिली. पाचव्या दिवशी सगळ्या पिशव्या नि पोरं आणून चूल पेटवली. जिथे जन्मलो तिथेच फाटका संसार करायची इच्छा नव्हती. पीठ असलं, तर मीठ नसायचं. हा भाडखाऊ नाक्यावर जाऊन हादडून यायचा. आपल्याला भावजयीपुढे, शेजार्‍यांकडे हात पसरायला लाज वाटायची. पोरांची सुकलेली तोंडं पाहून जीव तळमळायचा. कशाचा कशाला ताळमेळ बसेना. मग भावाचं एक शेत वाट्यानं करायचं ठरवलं. भाड्या आधी ‘हो’ म्हणाला. हंगाम सुरू व्हायच्या दोन दिवस आधी कामाला जातो म्हणून पळाला तो पेरणी, लावणी, बेणणी झाल्यावरच आला. आपण चुलीवर चपात्या भाजत होतो. दुरडीत सात-आठ चपात्या साचल्या होत्या. हे बेणं आल्या आल्या म्हणालं, ‘चहा ठेव जरासंक.’ आपण विचार केला, जाऊदे, राग तरी किती धरायचा! कपभरून चहा दिला करून, तर ते येऊन बसलं चुलीजवळ. शेजारीच चपात्यांचं टोपलं. भाड्यानं एक-एक करत सगळ्याच चपात्या संपवल्या. मेला किती दिवसांचा उपाशी होता कोण जाणे! पोरांना नुसताच चहा ओतून दिला बशीत. पोरं फुर्र करत पीत होती. त्यांना वाटलं, बापानं काहीतरी खाऊ आणला असंल. आज भात, चपाती नसेल, नुसता खाऊच खायचा. बिचार्‍या पोरांसाठी तीन वाटीभर भात घातला.’

तिनं पोरांनी पांगवलेले कपडे गोळा केले. त्यांच्या घड्या घातल्या. तिनं दारातून बाहेर पाहिलं, तर अंधारल्यासारखं दिसलं. तिला शंका आली म्हणून ती दारात आली. तिनं आभाळाकडे पाहिलं. आभाळ एकदम भरून आलंय. काळे ढग पश्चिमेला जमा झालेत. कधीही पाऊस पडेल असं वातावरण तयार झालंय. तिनं तिथूनच पोरांना आवाज दिला.
‘‘कस्तुरी… अगं, ये कस्तुरी… तो कुठेय प्रमोद? घरात या लवकर.’’ तिला वाटलं, आपला आवाज पोरांनी ऐकला असावा. ती लगेच धावत घरात येतील. ती पाठमोरी होत घरात आली. तेवढ्यात विजेची तार पायरीपर्यंत चमकून गेली. थोड्याच वेळात आकाशात जोराचा गडगडाट ऐकू आला. तिची छाती धडधड करू लागली. श्वास कोंडल्यागत झाला. तिनं पाहिल,ं तर नवर्‍याच्या तोंडातून फेस येत होता. फेसातून बुडबुड्यांचा डोंगर उभा राहायचा. मग एखादा बुडबुडा फुटायचा. डोंगर सपाट व्हायचा, मग पुन्हा डोंगर व्हायचा फेसांचा. तिला बाजेजवळ जावंसं वाटेना. तिनं लांबूनच पाहिलं. काल कलिंगडाचा रस पाजला होता, तोच आता फेसाबरोबर बाहेर येतोय. तिला किळस आली.

‘लॉकडाऊन सुरू झाला नि जगण्याची दैना उडाली. वाणसामान, भाजी मिळवताना जीव मेटाकुटीला यायचा. जगण्यासाठी काहीतरी खायला हवंच. एकदा भाजीसोबत या बाबानं कलिंगड आणलं. पोरं खेळायला म्हणून मामाकडे गेलेली. यानं कलिंगड आत लाल आहे का हे बघण्यासाठी सुरी घेऊन कापायला घेतलं. कलिंगड खाऊन संपल्यावरच जागेवरचा उठला. आपण कपाळाला हात लावल्याशिवाय काय करणार होतो. पोरांच्या तोंडाला पाणी सुटू नये म्हणून कलिंगडाच्या साली, बिया ताबडतोब टाकून दिल्या. आपल्याच नशिबी असा खेळ का? कुणाला विचारावं असं जवळपास कुणी राहिलंच नाही. मैत्रिणी त्यांच्या संसारात रमल्या. नातेवाइकांना वाटतं, ही आता मदतीसाठी गळ्यात पडेल. पोरं बिचारी लाचारासारखी मामाच्या ओटीवर बसतात. भाऊ देतो त्यांच्या हातावर खाऊ. तेवढंच समाधान!’

पुन्हा वीज कडाडली. ढग गडगडले. पावसाचे टपोरे थेंब छताच्या पत्र्यांवर पडू लागले. लाईट गेली तशी गरगरणारा पंखा थांबला. खोलीत अंधार दाटला. ती बाजेजवळ आली. अंधारात निरखून पाहिलं, तर त्याचं तोंड उघडं पडलं होतं. घरघर बंद झाली होती. फेसाचा डोंगर तसाच खाली पडला होता. डोळे उघडेच होते. तिनं ओळखलं, तो मेलाय. तिला वाटलं, आपण जोरानं रडावं, ओरडावं, म्हणजे लोक धावत येतील. पण तिला रडूच येईना. ती त्याच्या प्रेताकडे बघत राहिली. प्रेताचं निरीक्षण करत राहिली, तरी तिला रडू येईना. गेले पंधरा दिवस त्याची घाणघूण काढल्याचं, सेवा केल्याचं आठवलं, तरी तिला रडू येईना. छतावरच्या पत्र्यांवर पावसाच्या थेंबांनी ताल धरलाय. पागोळ्या उतरू लागल्यात.

तिला आश्चर्य वाटतंय, ‘आपण घाबरत कसे नाही. अंधारात एका प्रेतासोबत बसलोय तरी. या वेळेस पटकन कुणी आलं, तर काय म्हणेल? काय ही बाई आहे! नवरा मेलाय, तरी हिच्या डोळ्यांत पाण्याचा थेंब नाही.’ तिला वाटलं, ओरडावं म्हणून तिनं तोंड वासलं. लपकन विजेचा लोळ दारापर्यंत चमकला. पुन्हा गडगडाट झाला. तिचा आवाज क्षीण झाला. ती ओरडत राहिली. पुन्हा पुन्हा ओरडली. डोळे बंद करून ओरडत राहिली. हंबरडा फोडू लागली. ती कानोसा घेत राहिली, कुुणी येतंय का याचा. मग काही पावलं पटापट पडत असल्याचा आवाज आला. मग कुणीतरी पुटपुटण्याचा आवाज आला. मग एकदम चार-पाचजण घरात घुसल्याचा आवाज आला. तरी तिला रडू येईना. तिला काही वाटण्याची ही वेळ नव्हती. तिनं बेशुद्ध होण्याचा निर्णय घेतला. अंधारात चार-पाच आकृत्या बाजेकडे येताना पाहताच ती निपचीत पसरून राहिली.

‘‘अरे, आधी तिला उचला. तिला शुद्धीवर आणा. इकडे हवेत घ्या. बिचारीच्या मनाला धक्का सहन झाला नसेल.’’
तिला मोकळ्या हवेत आणलं. चार बाया आपल्या पदरानं तिला वारा घालत राहिल्या. कुणीतरी कांदा फोडला. अर्धा तिच्या नाकाजवळ धरला. ती थरथरली. बाजूच्या बायांनी निःश्वास सोडला. इतर सगळेजण त्याच्याकडे वळले. ती आता डोळे मिटून त्याचे गोडवे ऐकत होती. त्यांचे मरणानंतरचे गोडवे ऐकून तरी आपल्याला रडू येईल का, याची ती वाट पाहत निपचीत पडून राहिली.
बाहेर पावसानं जोर धरला होता.

– यशवंत सुरोशे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.