Now Reading
आजमची बायको

आजमची बायको

Menaka Prakashan

गुन्हा, गुन्हेगार आणि हाणामारीच्या बातम्या वाचनात आल्या, की आधी विचार येतो, ते त्या गुन्हेगाराच्या घरी कसं वातावरण असेल याचा; विशेषत: त्या गुन्हेगाराच्या घरच्या स्त्रीचा आणि मुलांचा. कोणत्या परिस्थितीत ते घर असेल, कसं वातावरण असेल ते, या विचारानं अस्वस्थ होतो. केवळ रात्री ऑफिसमधून यायला, किंवा दौर्‍यावरून यायला वेळ झाला, की कावरंबावरं होणारं आमचं घर, आई या घटना स्मृतीत असताना, आता या दिवसांत गुन्ह्याच्या अशा बातम्या वाचल्या, की घरच्या स्त्रीची, मुलांची काळजी मलाच वाटते. परागंदा झालेल्या ‘आजमच्या बायको’ची काळजी मलाच लागून राहिली होती… ही ‘आजमची बायको’ मग माझ्या कथेत येऊन बसली. ‘आजमच्या बायको’च्या कथेची ही हकीकत.

स्वस्थ आणि सुरक्षित माणसाला अस्वस्थ अन् असुरक्षित करणं हे खर्‍या साहित्याचं काम असतं असं म्हणतात, त्याचा अनुभव वाचकाला आलेला असतो.
त्यापूर्वी- त्या साहित्यनिर्मितीपूर्वी लेखकानं तसा अनुभव प्रत्यक्ष वा कल्पनेनं घेतला असतो, त्या अनुभवानं तो कमालीचा व्याकूळ आणि अस्वस्थ झालेला असतो. या अस्वस्थतेला वाट करून देण्यासाठी तो लेखक लिहिता होतो. त्याच्या अशा अस्वस्थतेतून उतरलेली कथा वाचकाला तेवढीच अस्वस्थ करेल – न करेल, हा वेगळा मुद्दा. लेखकाला मात्र त्यातून- त्या अस्वस्थतेतून तात्पुरता म्हणावा असा ‘जामीन’ मिळालेला असतो. सुटका नसतेच त्या लेखकाची, त्या अस्वस्थतेतून. त्या अनुभवापूर्वी तो लेखक जेवढा ‘सुखी’ असतो, जेवढा ‘गाफील’ असतो, तेवढ्याच तीव्रतेनं अशा अस्वस्थ करणार्‍या, अवचित उद्भवलेल्या अनुभवाचा चटका, एक व्रण कायम करून जात असतो.

आजमच्या बायकोच्या मन:स्थितीत मी आजन्म म्हणावा असा कैद झालेलो आहे… आजमच्या बायकोची आणि ‘मिन्नत’ कथेमधल्या रेहानाची जी मन:स्थिती आहे, त्यातून मला सुटका नाही. उलट या दोन्ही कथांचा मी पिंजरा करून घेतला आहे स्वत:भोवती, असं नेहमी वाटत राहतं.
आजमची बायको नायिका असलेली ही कथा आहे ‘रीत’ नावाची. त्या दिवसांत एका शब्दाचं शीर्षक असायचं माझ्या कथांना. का, ते माहीत नाही. आज मात्र असं वाटतं, की ठसठसणार्‍या वेदनेला जवसाएवढं तांबूस असं टोक आपोआप यावं, तशी ही शीर्षकं आहेत. विवंचनेच्या अनुभवांना आलेली अगतिकतेच्या वेदनेची ती टोकं. ‘मिन्नत’ आणि ‘रीत’. आणखी एक साम्य आहे या दोन्ही कथांत, ते म्हणजे निम्न आर्थिक स्थितीतल्या पोरसवदा मुस्लिम स्त्रिया या दोन्ही कथेतल्या. एकीची विवंचना मुलासाठी, तर दुसरीची पतीसाठी.

त्याचं असं झालं : तालुक्याच्या ठिकाणी मी सब-ट्रेझरी ऑफिसर या पदावर नोकरीत होतो. किरकोळ ऑफिस आणि अगदी किरकोळ कामं, पण महत्त्वाचे असे आर्थिक व्यवहार करणारं ते छोटं कार्यालय. दुपारच्या वेळेला थोडा निवांतपणा असायचा. एकदा साठी ओलांडलेला एक माणूस माझ्याकडे आला. अनोळखी. व्यवस्थित होता, पण विवंचनेत वाटला. आमच्या जिल्ह्याच्या कार्यालयातला आजम कारकून हा त्याचा मुलगा आहे, तो परागंदा झाल्याचं आम्हाला समजलं. ‘‘आप को कुछ खबर हैं क्या उसकी साहब…’’ तो मोठ्या काळजीनं विचारू लागला. आमच्या ऑफिसच्या कर्मचार्‍याचे वडील या नात्यानं मी त्यांना बसवून घेतलं. चहा दिला. हा आजम… तीन-चार दिवसांपूर्वीच वर्तमानपत्रात बातम्या होत्या, लॉटरीच्या तिकिटांच्या हिशोबात यानं अपहार केला होता, पोलिस केस केलेली होती.

त्या गृहस्थांकडून कळालं, की ते याच गावचे आहेत. आजमनं आपल्या बायको-मुलांना इथे सोडलं आहे, ‘‘घपला किया उसने ऐसा सुननेकु आया…’’ ते सांगू लागले. चेहर्‍यावर काळजी-चिंता आणि मुलाबद्दल रागही.
‘‘काही समजलं तर कळवतो,’’ असं जुजबी उत्तर मी दिलं. आदाब करून ते निघून गेले.
बस, एवढीच त्या गृहस्थाची भेट. पुन्हा भेटला नाही. जिल्हा कार्यालयात जायचो, तेव्हा हा आजम पाहण्यात होता फक्त. फाटक्या अंगाचा, मळका असा हा आजम. त्याला ‘जुव्वा’ खेळायची आदत होती म्हणे, तीसेक हजारांचा त्यानं अपहार केला, एवढं समजलं होतं.
नोकरीच्या त्या गावाला मी एकटा राहत होतो. आजमच्या व्यवहाराच्या निमित्तानं आमच्या सब-ट्रेझरीमधूनही माहिती मागवली होती. एक प्रकारचं दडपण तर होतंच, पण यात जिल्हा कार्यालयातले काही कर्मचारी-अधिकारीही विनाकारण अडचणीत आले होते. आता आजमला पोलिस शोधून काढतील, त्याला अटक होईल, अशा चर्चा सुरू होत्या. पोलिस ठाण्यात गुन्हा कबूल करवून घेण्यासाठी, अन्य माहिती काढण्यासाठी आरोपीला बेदम मारतात, एवढं मला माहिती होतं. हा मार… ते ओरडणं मी एकदा ऑडिटच्या दौर्‍यात असताना ऐकलेलं होतं. तालुक्याच्या रेस्ट हाऊसला मी उतरलो होतो आणि त्या तालुक्यात त्याच आठवड्यात दरोडा पडलेला होता. जिल्ह्याचे पोलिस अधिकारी रेस्ट हाऊसच्या दुसर्‍या सूटमध्ये उतरले होते. तालुक्याच्या पोलिस अधिकार्‍यानं काही संशयितांना धरून आणलं होतं. त्या सूटचं दार लावून त्या संशयितांची विचारपूस आणि त्यांना होणारी ती मारहाण… त्यांचं ते ओरडणं मला माझ्या बंद सूटमधूनही ऐकायला येत होतं.

त्या दिवशी मी रात्री जेवलो नव्हतो. त्यानंतर कुठेही पोलिस, हातकड्या घातलेले गुन्हेगार दिसले, की मला ही आठवण यायची.
आजमची कथा सुचली, तेव्हा अगदी नकळत मला ती घटना आठवली… बेदम मार. रस्त्यात कुठे मारामारी होऊ लागली, की मी अगदी घाबरलेल्या-थरारलेल्या मन:स्थितीनं ती पाहत असतो. दुपारी आजमचे वडील आलेले आठवलं. त्याचबरोबर त्यांचं ते वाक्यही, ‘म्हैना हो गया, देखो बिबी-बच्चों को छोड गया यहाँ…’ भयकारी भावनांनी मी घेरलो असतानाच आजमच्या त्या न पाहिलेल्या बायकोचा विचार आला मनात. हा बाप एवढा अस्वस्थ झालेला आहे, काळजीत आहे, तर त्याच्या बायकोची काय परिस्थिती असेल, तिच्या मुलांना माहीत असेल का बापाचं हे काम… पाहता पाहता आजमच्या त्या बायकोच्या मन:स्थितीत मी उतरलो, सोबत माझ्या मनातली ती रेस्ट हाऊसमधल्या संशयितांना झालेल्या मारहाणीची आठवण घेऊन.
आजमच्या बायकोची ही कथा मी लिहायला घेतली. माझ्या (आणि आजमच्या बायकोच्याही) मनात तो तणाव ठेवून. या तणावामुळे, कथा कशी लिहायची, तिचा शेवट कसा करायचा, कुठे जायचं, काहीच विचार झाला नाही. सकाळ झाली, आजमची बायको उठली, ते काहीच निश्चित न कळणार्‍या परिणामाला, काळजीला सोबत घेऊनच. हा तणावच मला कथेत हळूहळू पुढे घेऊन जाऊ लागला. आजमच्या वडलांची ती भेट, त्यांची ती काळजी, आजमबद्दल जुजबी माहिती, त्यानं केलेला पैशांचा अपहार, तो परागंदा झालेला आणि संशयितांना होणारी मारहाण, एवढेच मुद्दे घेऊन कथा लिहायला घेतली होती, ती दडपणामुळे, भयामुळे.

या निमित्तानं लक्षात आलं, की संकटात, किंवा भयाच्या स्थितीत माणसाच्या चेहर्‍यावर तणाव येतात, त्याची शारीर-भाषा बदलते… अशा प्रसंगाचं वर्णन शब्दांतून करतानासुद्धा असं वाटतं, की सगळे शब्दसुद्धा त्या तणावाच्या प्रसंगात जसे काही एकमेकांना धरून-सावरून थरारून पाहत आहेत त्या घटनेकडे.
दिवसभराची कामं तणावात होत असतात. आजमची आई, वडील असेच तणावात. आजमची बायको मान खाली घालून कामात गुंतलेली. मग गल्लीतली एक ओळखीची म्हातारी सहज म्हणून बोलायला येते. तिला खरं म्हणजे अंदाज काढायचा असतो, आजम कुठे आहे, काय झालं. आजमची बायको फणकार्‍यानं तिला उत्तर देते, नवर्‍याचं समर्थन करते. कुठून तरी तिलाही कळालेलं असतं, पोलिसांत फार मार देतात म्हणे, कुणा अमुकचा पोरगा, त्याला पोलिसांनी फार मार दिला. ‘खर्चेपानी को पुलीसवालों को पैसे दिये, तब छोड दिया,’ अशा त्या म्हातारीच्या बाता सहन झाल्या नाहीत, तेव्हा आजमची बायको उसळून म्हणते,
‘‘घपला? वो क्यूँ करेंगे घपला? देखो खालां, जो बुरे कामां करता उसको डर रह्यता समझे? सिदे काम करनेवालों को अल्लामियाँ देखताच, क्यों किसी को डरना?’’
ही हैदराबादी हिंदी-उर्दू भाषा मला इथे कामाला आली. आजमच्या बायकोला शंका होतीच. भीतीही होती.
आणि संध्याकाळ सरल्यावर अचानक आजम येतो. धार्मिक वृत्तीच्या त्याच्या बापाच्या चेहर्‍यावर आजमबद्दल संताप भरून होता. पोरं आजमच्या अंगाखांद्यावर खेळत होती, आजमची आई त्याची अगदी प्राथमिक अशी चौकशी करत होती. आजम अर्धवट उत्तरं देत होता, स्वत:तच गुंतून जात होता. आणि आजमची बायको, तिला काय करू काय नाही वाटत होतं. या वेळी रात्री आजमच्या घरासमोरून वरात जात असल्याचा प्रसंग आहे.
त्या दिवसांत माझी कथा प्रसिद्ध झाली, की मी तिची फोटोकॉपी काढून माझ्या आवडत्या लेखकाला पाठवायचो, कशी वाटली विचारायचो. ही कथा मी त्या वेळी आशा बगे यांना नागपूरला पाठवली होती. त्यांचं उत्तर आलं. त्यांनी या प्रसंगाचा उल्लेख करून म्हटलं, ‘असं वातावरण मी कधी पाहिलं नाही, फार प्रत्ययकारी असं आहे.’

कथेत या प्रसंगाचं वर्णन असं केलं आहे –
…आजमच्या घरासमोरून लग्नाची वरात जाऊ लागली. आजमची पोरं वरात पाहायला पळाली. आजमची बायको वरातीकडे पाहू लागली. कर्कश, पोटात गोळा उठेल अशा आवाजातला बँड, ट्यूबच्या काठ्या धरून जाणारी माणसं, मोठा जमाव आणि फुलांच्या हारांत लपलेला नवरदेव… प्रकाशाचे पट्टे घरातून सरकत जाऊ लागले; आजम, आजमचा बाप, म्हातारी, आजमच्या अंगावरून प्रकाश जाऊ लागला, अंधार होऊ लागला. एकमेकांचं बोलणं ऐकू येईनासं झालं…

रात्रीचा घरातला प्रसंग, हा या कथेतला मध्यवर्ती प्रसंग.
अगदी पहाटे उठून आजम निघताना त्याची बायको पुढे येऊन त्याला गळ्यातला एकमेव दागिना काढून देते. गलसर म्हणतात याला, हे माझ्या मुस्लिम मित्राला विचारून घेतलं होतं. दागिना नवर्‍याला देताना, ती म्हणते, ‘‘रखो, खर्चेपानी को…’’
आपल्या कक्षेबाहेरची कथा लेखकानं लिहू नये, असं वाचनात आलेलं होतं, ते पटलंही होतं. ‘कक्षा’ म्हणजे मर्यादा, असा अर्थ घेऊन ते समजून घेतलं होतं. त्या वेळी कधी असंही वाटून जायचं, की मग काय कारकुनानं कारकुनाच्याच कथा लिहायच्या का…
कक्षेचा अर्थ आवाका असा लक्षात घेतला, तेव्हा कथालेखनाचा अर्धाअधिक प्रवास झालेलाही होता. लक्षात आलं होतं, कक्षेतलेच हे अनुभव आहेत, आवाका मात्र मोठा, पसरलेला होता.
सात-आठ संख्या मोजताना कुणी बोटांची पेरं हिशोबात घेतं, कुणी बोटंच हिशोबात घेतं, तसं असेल हे.

– मधुकर धर्मापुरीकर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.