Now Reading
आगरी मांसाहारी तडका

आगरी मांसाहारी तडका

Menaka Prakashan

मांसाहारी जेवणात उच्च स्थान दिल जातं ते मटण आणि चिकनपासून बनणार्‍या पदार्थांना. आमच्याकडे डोहाळजेवणापासून बारसं, वाढदिवस, साखरपुडा, लग्नाचे मांडव, जत्रा यांसारख्या उत्सवांना मटण आणि चिकन म्हणजे कोंबडीचं जेवण हे अनिवार्य आहे. अहो, साखरपुडे, लग्नाचे मुहूर्त हे मांडव म्हणजे, हळदीचा दिवस मांसाहार खाण्याचा येईल, हे पाहूनच ठरवले जातात. जत्रेला कोंबडा-बोकडांचं टमान देऊन गावजेवण केलं जातं काही ठिकाणी. यातही चिकन स्वस्त, तर मटण महाग असल्यानं गरिबाघरच्या कार्यक्रमांना चिकनची मेजवानी असते, तर मटण परवडणार्‍यांकडे मटणाच्या जेवणाचा घाट असतो. बरं, मटणाबरोबर भोकाचे वडे, किंवा भाकरी, किंवा पोळे (घावनाचा प्रकार) यांची जोडगोळी ठरलेलीच असते. कोकणात मटणाबरोबर कोंबडीवड्यांची मेजवानी असते. घरगुती जेवणात काही मंडळी चिकन, मटणाबरोबर चिंचेची कढी, सोलकढीही करतात. अधूनमधून कलेजीचाही बेत केला जातो. बोकडाच्या तर नव्वद टक्के भागांच्या पाकक्रिया होतात. त्यात पाया सूप, भेजा, मुंडी, वज्री असे काही प्रकार असतात. अशा काही सहज करता येण्याजोग्या मटण-चिकन आणि त्यांच्या जोडीनं मांसाहाराची लज्जत वाढवणार्‍या काही पाककृती पाहूया.

आगरी पद्धतीचं मटण
साहित्य ः एक किलो चिकन, किंवा मटण, दोन ते तीन चमचे आलं-लसूण-मिरची-कोथिंबीर वाटण, दोन बटाटे कापून, चार-पाच लसूणपाकळ्या ठेचून, दोन मोठे कांदे चिरून, हिंग, हळद, दोन-तीन टी स्पून मसाला (तिखटाच्या आवडीवर), चवीनुसार मीठ, एक टी स्पून गरम मसाला.
वाटण : दोन छोटे कांदे आणि अर्धी वाटी सुकं खोबरं भाजून वाटून
कृती : प्रथम चिकन, किंवा मटण साफ करून धुऊन त्याला आलं-लसूण-मिरची-कोथिंबीरची पेस्ट लावून घ्यावी. मग थोड्या वेळानं टोपात तेल घालून त्यावर लसूणपाकळ्यांची फोडणी देऊन, कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतावा. मग त्यात हिंग, हळद, मसाला घालून त्यात चिकन, किंवा मटण घालावं. जर चिकन असेल, तर त्यासोबतच बटाटे घालावेत आणि जर मटण असेल, तर आधी ते अर्धं शिजवून मग बटाटे घालावेत. कारण मटण शिजायला वेळ लागतो. मग वरती ताट ठेवून ताटात पाणी ठेवावं. आता जेव्हा ढवळायचं असेल, तेव्हा ताटातलं पाणी त्यात टाकावं, किंवा गरजेपुरतं पाणी टाकावं. मग चिकन/मटण शिजलं, की त्यात कांदा-खोबर्‍याचं वाटण, मीठ आणि गरम मसाला घालावा. एक चांगली उकळी येऊ द्यावी आणि गॅस बंद करावा.
टीप :
बटाटा ऐच्छिक आहे. चिकन मुरवण्यासाठी आलं-लसणाच्या पेस्टसोबत दोन चमचे दही, किंवा एका लिंबाचा रसही लावतात.
पूर्वी कांदा-खोबरं अख्खं चुलीत भाजून ते पाट्यावर वाटून वाटण करत, त्याला वेगळीच चव असते.

२) पाया सूप
पाया सूप हे बोकडाच्या पायांपासून बनवतात. पाय साफ करण्याची पद्धत आहे. जर साफ न केलेले पाय आणले, तर पायाचे केस ज्वाळेवर धरून जाळावे लागतात. फार कटकट असते, त्यामुळे मटणवाल्याकडूनच हे सोलून घेतलेले चांगलं. घरी जाणकार असतील तर घरी साफ करायला हरकत नाही.
हे सूप एक वर्षाच्या बाळापासूनसुद्धा देता येतं, पण मग त्यात तिखट, मिरची घालू नये. यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं.
हाड आणि त्यावरचं मांस चांगलं मऊ शिजण्यासाठी आणि हाडाचा कस सुपात उतरण्यासाठी कुकरमध्येसुद्धा शिजवायला पाऊण तास लागतो. असं मटण पंधरा मिनिटांत होतं.
हे माझ्या पद्धतीनं बनवलेलं सूप आहे. अजून यात कॉर्नफ्लोअर आणि अन्य घटकही घट्ट होण्यासाठी घातले जातात.
साहित्य : बोकडाच्या पायाचे साफ केलेले पंधरा-वीस तुकडे (धुऊन), दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून, एक लसणाचा कांदा सोलून ठेचून, पाव टी स्पून हिंग, एक टी स्पून हळद, आठ-दहा काळी मिरी, पाच-सहा दालचिनीचे छोटे तुकडे, तीन-चार तमालपत्रं, चवीनुसार मीठ, दोन टे. स्पून तेल, गरजेनुसार पाणी. (जास्त तिखट हवं असल्यास मसाला/लाल तिखट, किंवा हिरवी मिरची आणि कोथिंबीर पेस्ट)
कृती ः कुकरमध्ये तेल चांगलं गरम करून त्यावर वरील गरम मसाले आणि लसूण टाकून फोडणी द्यावी. त्यावर कांदा घालून गुलाबी रंगावर परतावा. परतलेल्या कांद्यावर हिंग, हळद आणि जर तिखट हवं असेल, तर तिखट, किंवा मिरची- कोथिंबीर पेस्ट टाकावी (लहान मुलांना प्यायचं असल्यानं मी टाकलेली नाही). पायाचे तुकडे टाकावे, मीठ टाकावं. सर्व ढवळून त्यावर गरजेनुसार पाणी घालावं. कुकरचं झाकण बंद करून पहिली शिट्टी झाल्यावर गॅस मंद करून साधारण पाऊण तास तरी शिजवत ठेवावं. पाया शिजायला वेळ लागतो, म्हणून टोपात न शिजवता सरळ कुकरमध्येच शिजवावा. वाफ गेल्यावर गरमागरमच सर्व्ह करावं.

हिरवं चिकन
साहित्य ः एक किलो चिकन साफ करून धुऊन, दोन बटाटे फोडी करून, ग्रीन मसाला वाटण – दहा मिरच्या (तिखटाच्या आवडीनुसार), दोन मूठ कोथिंबीर, एक मूठ पुदिना, एक इंच आलं, आठ-दहा लसूणपाकळ्या, हिंग, हळद, चवीप्रमाणे मीठ, एक लिंबू, एक टी स्पून गरम मसाला, तेल.
कृती : प्रथम धुतलेल्या चिकनला वरचं वाटण, मीठ, हिंग, हळद, एक लिंबाचा रस चोळून घ्यावा आणि अर्धा तास मुरायला ठेवावं. मग तेलावर वरचं सगळं टाकून बटाट्याच्या फोडी टाकाव्या. मग सगळं एकत्र करून वाफेवर चिकन शिजू द्यावं. शिजल्यावर गरम मसाला टाकून परत एक वाफ आणून गॅस बंद करावा.
टीप : श्र बटाटे ऐच्छिक आहेत. आवडत नसतील, तर नाही घातले तरी चालतात. या चिकनला कांद्याची गरज नसते.

चिंचेची कढी
साहित्य : लिंबाएवढ्या चिंचेचा गोळा, दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून, एक वाटी ओलं खोबरं खवलेलं, एक-दोन मिरच्या, थोडी कोथिंबीर चिरून, थोडासा हिंग, अर्धा टी स्पून हळद, चार-पाच मेथीचे दाणे, चार-पाच लसूणपाकळ्या चिरून, प्रत्येकी अर्धा टी स्पून मोहरी, जिरे, कढीपत्ता, चवीनुसार गूळ चिरून, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी तेल.
कृती : प्रथम चिरलेला कांदा, खोबरं, गूळ, मिरची (चिरून), कोथिंबीर, हिंग, हळद आणि मीठ हे एकत्र करून हातानं थोडं कुस्करून ठेवावं. गॅसवर भांडं गरम करून त्यावर मोहरी, जिरे, लसूणपाकळ्या, कढीपत्ता आणि मेथ्यांची फोडणी देऊन लगेच त्यावर कुस्करलेलं मिश्रण टाकावं. मिश्रण थोडं परतून अर्धवट शिजलं, की त्यात लगेच चिंचेचा कोळ घालून (गरजेनुसार पाणी घालून) झाकण ठेवावं. उकळी यायच्या आत गॅस बंद करावा. उकळी येऊ देऊ नये.
तयार आहे चिंचेची कढी.
ही कढी मटणाबरोबर घेण्याची पद्धत आहे.
चवीला आंबटगोड लागणारी ही कढी नुसती प्यायलाही मजा येते.

टोमॅटोच्या ग्रेव्हीतलं मटण
साहित्य : एक किलो मटण, तीन ते चार टोमॅटो, चार कांदे, पाच-सहा लसूणपाकळ्या.
वाटण : एक इंच आलं, एक गड्डा लसूणपाकळ्या, मूठभर कोथिंबीर, पुदिना, दोन मिरच्या, अर्धा टी स्पून हिंग, एक-दीड टी स्पून हळद, तीन टी स्पून मसाला (तिखटाच्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता), एक टी स्पून गरम मसाला, दोन टी स्पून मीठ, दोन मोठे बटाटे, दोन-तीन पळ्या तेल.
कृती : मटण स्वच्छ धुऊन त्याला वर लिहिल्याप्रमाणे वाटण चोळून मुरवत ठेवावं. कांदा चिरून घ्यावा. लसूणपाकळ्या ठेचून घ्याव्या. बटाट्याच्या मोठ्या फोडी कराव्या. टोमॅटोची मिक्सरमध्ये प्युरी करून घ्यावी. नंतर कुकरमध्ये तेल गरम करून त्यात प्रथम लसूणपाकळ्यांची फोडणी द्यावी आणि लगेच कांदा घालून तो बदामी रंगाचा होईपर्यंत परतावा. नंतर कांद्यावर टोमॅटोचा रस टाकून परतावा. दोन-तीन मिनिटं शिजू द्यावा. नंतर हिंग, हळद, मसाला, गरम मसाला घालून ढवळावं. या मिश्रणावर मटण आणि बटाट्याच्या फोडी टाकाव्या. परतून त्यावर मीठ टाकून एकजीव करावं. रस्सा किती हवा त्याच्या जरा कमीच पाणी टाकावं. नंतर मटणाचं थोडं पाणी सुटतं. कुकरचं झाकण लावून पंधरा मिनिटं शिजत ठेवावं. वाफ गेली की झाकण काढावं. (हा फोटो अर्धं मटण संपल्यावर काढलेला आहे. वासानं आणि भुकेनं विसरले होते.:हाहा:) ही अशी तयार मटणाची वाटी.

टीप : टोमॅटोच्या प्युरीमुळे दाटपणा येतो, त्यामुळे सुकं खोबरं घालण्याची गरज पडत नाही. कमी कटकटीचा हा प्रकार आहे.  बटाटे आवडत नसतील, तर नाही घातले तरी चालतात.  हेच मटण पाणी न घालता सुकं बनवू शकता.  काहींना मटण टोपातच करायला आवडतं, पण कुकरमध्ये लवकर शिजतं, त्यामुळे वेळेची आणि गॅसचीही बचत होते.

कलेजी
साहित्य : पाव किलो कलेजी, दोन मोठे कांदे चिरून, चार-पाच लसूणपाकळ्या ठेचून, दोन टी स्पून आलं-लसूण पेस्ट, अर्ध्या लिंबाचा रस (नसला तरी चालेल), पाव टी स्पून हिंग, एक टी स्पून हळद, दोन टी स्पून मसाला, किंवा एक टी स्पून लाल तिखट, एक टी स्पून गरम मसाला, दोन टे. स्पून तेल, थोडीशी कोथिंबीर चिरून, चवीनुसार मीठ.
कृती : प्रथम कलेजी कापून स्वच्छ धुऊन घ्यावी. त्याला आलं-लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस लावून ठेवावा. भांड्यात तेल गरम करून त्यावर लसूणपाकळ्यांची फोडणी देऊन कांदा बदामी रंग येईपर्यंत तळावा. त्यात हिंग, हळद, मसाला घालून कलेजी परतावी. नंतर भांड्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवून वाफेवर मध्यम गॅसवर कलेजी शिजू द्यावी. मधून मधून परतावी. शिजल्यावर मीठ, गरम मसाला आणि कोथिंबीर घालून पुन्हा एक वाफ येऊ द्यावी आणि परतून गॅस बंद करावा. झाली कलेजी तयार.

चिकन लेगपिस
साहित्य : चिकन लेग पीस गरजेनुसार लागतील तेवढे.
मॅरिनेट करण्यासाठी : घट्ट दही (अंदाजे दोन लेग पीससाठी एक टी स्पून), लिंबूरस, आलं-लसूण-पुदिना पेस्ट, मीठ, लाल तिखट, गरम मसाला, रंग हवा असल्यास तंदूर कलर, किंवा काश्मिरी मिरची पावडर, तळण्यासाठी बटर किंवा तेल, सजावटीसाठी कांद्याच्या रिंग, कोथिंबीर, लिंबाच्या फोडी.
कृती : चिकन लेग पीसला दोन्ही बाजूंनी सुरीनं तीन-चार तिरक्या चिरा पाडाव्या. मॅरिनेट करण्याच साहित्य चिकनला लावून तीन ते चार तास मुरत ठेवावं (फ्रीजमध्ये सकाळी ठेवून संध्याकाळी केलं तरी चालेल). मुरल्यावर तेल लावलेल्या काचेच्या ट्रेमध्ये, किंवा मायक्रोवेव्ह नॉनस्टिक तव्यामध्ये पीसेस ठेवावे. वरून पातळ केलेलं बटर सोडावं. ट्रे हाय रॅकवर ठेवावा.
कॉम्बिनेशन (मायक्रोवेव्ह पॉवर ५०% + कन्व्हेक्शन २१० डिग्री) वर आठ-दहा मिनिटं चिकन ब्राऊन होईपर्यंत ठेवावं. ट्रे बाहेर काढून सुरीनं टोचून पाहावा. शिजलेलं असेलच, मग पीसेस उलटे करून दुसर्‍या ट्रेमध्ये ठेवावे, कारण चिकनचं पाणी ट्रेमध्ये साठलेलं असतं. जर दुसरा ट्रे नसेल, तर ते पाणी काढून टाकावं. पीसेस उलटे करून वरून परत बटर सोडावं. पॅन हाय रॅकवर ठेवून सहा-सात मिनिटं वरून ब्राऊन होईपर्यंत ग्रिल करावं. झाली तयार तंदुरी. जर पेशन्स असतील, तर आता पीसेस डिशमध्ये काढावे. वरून कोथिंबीर घालावी. कांद्याच्या रिंग्ज आणि लिंबाच्या फोडीबरोबर सर्व्ह करावं.
टीप : वरील रेसिपी मायक्रोवेव्हमधली आहे. जर मायक्रोवेव्ह नसेल, निखार्‍यावर किंवा तव्यात तेल टाकून फ्राय करू शकता.

सोलकढी
साहित्य ः एक ओला नारळ खवून, पंधरा-वीस कोकमं (आमसुलं), चार-पाच लसूणपाकळ्या (ऐच्छिक), एक चमचा जिरे, तूप, कढीपत्ता, साखर, मीठ, पाव ते अर्धा टी स्पून मिरचीपूड.
कृती : कोकमांमध्ये पाणी घालून ती उकळवत ठेवावी. उकळी आली की पाच मिनिटांत गॅस बंद करावा.
खवलेल्या नारळाच्या किसात लसूणपाकळ्या असल्यास त्या घालून थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवावं. मग एखा भांड्यात मोठ्या गाळणीनं, किंवा फडक्यानं गाळून घ्यावं. साधारण तीन वेळा पाणी टाकून दूध काढून घ्यावं. जिरे तव्यावर भाजून गार झाल्यावर कुटून घ्यावे.
कोकमाचा रस कोमट झाला, की तो दुधात मिसळावा. त्यातच कुटलेले जिरे, मीठ, साखर घालावी. मिरची, कोथिंबीर चिरून घातल्यावरही छान स्वाद येतो.
फोडणी हवी असेल, तर तूप गरम करून त्यात कढीपत्ता घालून थोडी मिरचीपूड घालावी आणि ही फोडणी वरील मिश्रणात ओतावी. झाली सोलकढी. (कढीपत्त्याचा घरात पत्ता नसल्यानं मी घातला नाही, वाचकांनी समजून घ्यावं.)
टीप :  सोलकढी ही लहान-मोठ्या सगळ्यांचीच आवडती कढी. अगदी नुसती प्यायला मजा येते. ज्यांना लसूण आवडत नाही, त्यांनी घालू नये.  हॉटेलमध्ये बिनफोडणीची सोलकढी मिळते.

खिम्याचं पॅटीस
साहित्य : पाव किलो खिमा, दोन कांदे चिरून, दोन टी स्पून आलं-लसूण-मिरची-कोथिंबीर पेस्ट, पाव टी स्पून हिंग, एक टी स्पून हळद, एक-दोन टी स्पून मसाला (लाल मिक्स मसाला/मटण मसाला), एक टी स्पून गरम मसाला, दीड-दोन टी स्पून मसाला, किंवा एक टी स्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्ध्या लिंबाचा रस, शॅलोफ्राय करण्यासाठी तेल.
कव्हरसाठी ः एक किलो बटाटे, ब्रेड स्लाईस, रवा, मीठ.
कृती :
खिमा : प्रथम खिमा स्वच्छ धुऊन घ्यावा. त्याला आलं-लसूण-मिरची-कोथिंबीरची पेस्ट लावून थोडा वेळ मुरू द्यावं. भांड्यात तेल टाकून त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा. त्यावर हिंग, हळद, मसाला घालून परतावं. या मिश्रणावर खिमा घालून पुन्हा चांगलं परतून घ्यावं आणि अगदी थोडं पाणी घालून भांड्यावर झाकण ठेवून खिमा शिजू द्यावा. खिमा भांड्यात शिजायला अर्धा ते पाऊण तास लागतो, कुकरमध्ये दहा मिनिटांत शिजतो. फक्त कुकरमध्ये केल्यास पाणी अजिबात घालू नये. मधून मधून खिमा परतत राहावं. शिजण्यासाठी पाण्याची गरज भाजल्यास ताटावरचं थोडं पाणी त्यात टाकून परतावा आणि परत ताटात नवीन पाणी वरून वाफेसाठी ठेवावं. भांड्यातला खिमा शिजल्यावर त्यावर मीठ, गरम मसाला घालावा. लिंबाचा रस घालून चांगलं परतून घ्यावा आणि एक दणदणीत वाफ येऊ द्यावी. खिम्यात जर पाणी असेल, तर ते आटू द्यावं.
कव्हर ः खिमा शिजता शिजताच एकीकडे बटाटे उकडून घ्यावे. कुकरमध्ये एक ते दोन शिट्ट्यांत शिजतात. बटाटे गरम असतानाच सोलून चांगले मॅश करून घ्यावे. ब्रेड स्लाईसचे तुकडे करून ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. मिस्करमधून काढलेल्या ब्रेडच्या चुर्‍यावर थोडं पाणी मारून तो मळून घ्यावा. आता तो मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये मिसळावा. या मिश्रणामध्ये आता चवीनुसार मीठ घालून ते एकजीव होईपर्यंत चांगलं मळून घ्यावं.

पॅटीस : बटाट्याच्या मिश्रणाचा लिंबाएवढा, किंवा आवडेल त्या आकाराचा गोळा करून घ्यावा. त्याची मोदकाला करतात तशी वाटी करावी. त्या वाटीत एक चमचा खिमा भरावा. आता ही वाटी हलक्या हातानं मोदकाप्रमाणे वरच्या बाजूला वळवत बंद करून पॅटीस तयार करावं. हे पॅटीस रव्यामध्ये हलक्या हातानं घोळवावं. तापलेल्या तव्यावर थोडं तेल सोडून हे पॅटीस मध्यम आचेवर शिजवा. एक बाजू साधारण चार-पाच मिनिटं शिजवून दुसरी बाजू तेवढीच शिजवावी. परतल्यावर पुन्हा एकदा तेल सोडावं म्हणजे पॅटीस खरपूस होतात. हे पॅटीस गरमागरम सॉससोबत खायला द्यावे.

चिकन लॉलीपॉप
साहित्य : वीस पीस चिकनचे लॉलीपॉपसाठी लागणारे, चार टी स्पून मैदा, दोन टी स्पून कॉर्नफ्लोअर, एक टे. स्पून आलं-लसूण-मिरची-कोथिंबीर पेस्ट, एक अंडं, तीन टी स्पून सोयासॉस, एक टी स्पून मिरेपूड, एक टी स्पून मिरचीपूड, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल, अ‍ॅल्युमिनियम फॉईलचे छोटे तुकडे (धरण्यासाठी).
कृती : घरच्या घरी चिकन लॉलीपॉप बनवणं सोपं असतं. चिकनवाल्याकडे लॉलीपॉपसाठी पीसेस हवेत असं सांगितलं, की तो बरोबर मांस वरच्या दिशेला ओढून आणि खाली हाडं असं करून तुकडे करून देतो.
हे चिकनचे तुकडे आधी स्वच्छ धुवावेत. या तुकड्यांना वरच्या साहित्यातलं तेल आणि अ‍ॅल्युमिनिअम फॉईल खेरीज सगळं व्यवस्थित चोळून घ्यावं. साधारण एक तास तरी मुरू द्यावं. आता कढईत तेल चांगलं गरम करून मीडियम गॅसवर हे तुकडे चांगले तळून घ्यावेत. गॅस मोठा ठेवू नये, त्यामुळे पीठ करपतं. साधारण दहा-पंधरा मिनिटं चांगलं शिजू द्यावं आणि बाहेर काढून त्याच्या खालच्या हाडाला अ‍ॅल्युमिनियम फॉईल गुंडाळून सर्व्ह करावं.
टीप : श्र लॉलीपॉप बनवण्याचा रेडीमेड मसालाही मिळतो, पण त्यापेक्षा घरी केलेला चांगला. श्र यात रंग येण्यासाठी खायचा लाल रंग वापरतात, पण मी वापरत नाही. त्याऐवजी काश्मिरी मिरचीपूड रंगाचं काम करेल.

धाबा स्टाईल चिकन
साहित्य ः एक किलो चिकन, दोन टे. स्पून आलं-लसूण-मिरची-कोथिंबीर पेस्ट, पाव वाटी दही, दोन मोठे कांदे चिरून, पाच-सहा लसूणपाकळ्या ठेचून, पाव टी स्पून हिंग, एक टी स्पून हळद, दोन-तीन टोमॅटो मिस्करमध्ये फिरवून, दोन-तीन मध्यम बटाटे मोठ्या फोडी करून, चार-पाच टी स्पून लाल तिखट किंवा रोजच्या वापरातला मसाला किंवा आवडीनुसार, पाव वाटी बेसन (तव्यावर खमंग भाजून), एक टी स्पून गरम मसाला, एक टी स्पून धणे पावडर, खडा मसाला, तीन-चार दालचिनीचे तुकडे, चार-पाच लवंगा, सात-आठ काळी मिरी, एक मोठी वेलची (बडी वेलची किंवा काळी वेलची), एक जायपत्री, तीन-चार तमालपत्र, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी तेल.
कृती ः चिकनला आलं-लसूण-मिरची-कोथिंबिरीची पेस्ट, दही आणि हिंग, हळद चोळून ठेवावी. भांड्यात तेल गरम करून त्यावर लसूण फोडणीला देऊन, खडा मसाला घालावा आणि कांदा घालून त्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतावं. आता यात टोमॅटोची प्युरी घालून ढवळून घ्यावं. हिंग, हळद, मसाला, भाजलेलं बेसन हे सगळं भांड्यातल्या मिश्रणावर टाकावं. चांगलं परतून घ्यावं. यावर चिकन आणि बटाट्याच्या फोडी घालाव्या आणि गरजेनुसार पाणी घालून शिजत ठेवावं. बटाट्याच्या फोडी शिजल्या की चिकनही शिजतं. चिकन शिजलं की त्यात मीठ, धणे पावडर, गरम मसाला टाकावा आणि परतून पुन्हा एक वाफ येऊ द्यावी. वरून थोडी कोथिंबीर पसरवावी. अशा प्रकारे तयार झालं धाबा स्टाईल चिकन.

– प्राजक्ता म्हात्रे, उरण (कुंभारवाडा), मो. 9869276155

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.