Now Reading
असण्याचा अर्थ

असण्याचा अर्थ

Menaka Prakashan

‘मला क्षमा करा. मी बाविसाव्या वर्षी हे जग सोडून जातो आहे. मी जसा आहे, तसा मला कुणी समजून घेत नाही. माझ्या कॉलेजमध्ये सतत मला चिडवलं जातंय. माझ्या भावनांवर मी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा मला खूप त्रास होतोय. मी माझ्या जगण्याचा तिरस्कार करतो. मी जसा आहे त्यात माझी काहीच चूक नसून, देवाची चूक आहे. कोणती शिक्षा, कोणता शाप म्हणून देवानं मला असा जन्म दिला, मला माहीत नाही. घरचेही मला समजून घेत नाहीत. माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये.’ त्यानं सुसाईड नोट लिहून टेबलावर ठेवली आणि दोरी पंख्याला बांधून स्वतःच्या गळ्यात अडकवली.

वेदना संपता संपता तो कुठल्या तरी पोकळीतून गेल्यासारखा प्रवास करू लागला. तो कुठे होता, काय करत होता, त्याचं त्याला भान उरलं नव्हतं. प्रवास करता करता त्याला जास्तच भीती वाटू लागली. शरीर सुटूनही त्याला जोडलेल्या भीती, दुःख अशा जाणिवा कितीतरी वेळ होत राहिल्या. मात्र काही वेळानं अचानक त्याला यात बदल जाणवू लागला. हळूहळू भीती विरघळून जाऊ लागली. मग अशी अवस्था लाभली, जिथे तो काळ आणि जागा विसरून गेला. सगळं कसं शांत, उल्हसित वाटू लागलं.
या दिव्य अनुभूतीत असतानाच समोर देव ठाकलेला बघून त्याला आपण स्वप्नात आहोत की काय, असं वाटू लागलं.
देव आणि तो एकमेकांकडे पाहू लागले. बराच वेळ त्यांच्यात संवाद न होताही प्रेमाची, शांततेची अनुभूती त्याला मिळू लागली. बंधनाचे सगळेच पाश तुटल्याच्या अवस्थेत त्याला मुक्ती जाणवू लागली.
‘शेवटी तू आत्महत्या केलीस?’ देवाच्या या प्रश्नावर आत्तापर्यंत भूतकाळ विसरलेल्या त्याला अचानक सर्व काही आठवलं. पण त्याला त्या भूतकाळाची तसूभरही वेदना झाली नाही, याचं त्याला अप्रूप वाटलं. मात्र तरीही त्याच्या मनात आता असंख्य प्रश्न दाटले.
‘देवा, कोणत्या पापाचं, कोणत्या कर्माचं प्रायश्चित म्हणून असा अपुरा जन्म मला लाभला? का तू असा अन्याय माझ्यावर केलास?’ भौतिक आयुष्यात सतावणारे आणि सतत द्वंद्व निर्माण करणारे प्रश्न त्यानं देवाला विचारलं.
‘प्रायश्चित? मी तुझ्यावर अन्याय केला?’ देवानं हसत त्याला प्रतिप्रश्न केला आणि देव त्याच्याकडे पाहू लागला.
मग त्याला अशा शांत अवस्थेत देवाच्या खुलाशाशिवाय या शरीरात जन्म घेण्याआधीचा प्रसंग दिसू लागला.

जीवनाच्या शाळेत अनेक शरीरांत जन्म घेतल्यानंतर त्याच्या आध्यात्मिक स्तरावरच्या प्रगतीत फारसा बदल झाला नव्हता. शिवाय इतक्या जन्मात तेच तेच संदर्भ, तेच तेच अनुभव, सारखीच आव्हानं घेतल्यानंतर त्याला वाटू लागलं, पुढचा जन्म आता वेगळ्या आव्हानांचा घ्यायचा. यादरम्यान एकदा त्याची आणि देवाची भेट झाली.
‘देवा, पुढचा देहाच्या जन्माचा अनुभव घ्यायला आता मी तयार आहे, पण मला आता एकदम आव्हानात्मक जीवन हवं आहे.’ तो कळकळीनं देवाला म्हणाला. तसा देव फक्त हसू लागला.
‘कित्येकजण आपली आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी मोठी आव्हानं घेतात. जन्म घेतल्यानंतर मात्र सगळं स्वत्व विसरतात. भौतिकतेत इतके विरघळतात, की जगणं असह्य होऊन जातं. मग ‘मी काय पाप केलं म्हणून मला हे जीवन मिळालं,’ असं हतबलपणे म्हणत राहतात. काहीजण मलाच शिव्या देत राहतात. तेव्हा पुन्हा एकदा नीट विचार करून सांग. पेलेल तुला मोठं आव्हान?’ देव म्हणाला.
देवाच्या या बोलण्याचा अर्थ त्याला कळला, पण तो उत्साही होता. त्याला काही करून आता मोठं आव्हान हवंच होतं.
‘हो, मला कठीण आव्हानं येतील असा जन्म सांग. काहीतरी वेगळंच. ज्याच्यात एक वेगळीच गंमत असेल.’ तो म्हणाला.
त्याच्या इच्छेनुसार देवानं जरासा विचार केला.
‘एक अतिशय वेगळं आयुष्य… चौकटीबाहेरचं… ज्या आयुष्यात तुझं अस्तित्व समजायलाच तुला संघर्ष करावा लागेल. तुझ्या अस्तित्वाचे संदर्भ शोधताना तुला खूप कष्ट घ्यावे लागतील.’ देवाचं हे बोलणं त्याला गूढ वाटू लागलं. देवानंच पुढे उलगडा करायला सुरुवात केली,
‘जो मानवी देह तुला मिळेल, त्याच लिंगाच्या व्यक्तीशी तुझं शारीरिक आणि मानसिक आकर्षण असेल. सुरुवातीला तुला खूप संघर्ष करायला लागेल. पावलोपावली तुझ्या अस्तित्वावर घाला घालून ते मिटवण्याचा प्रयत्न केला जाईल. अशा गोष्टींमध्ये तुझी ऊर्जा खर्च होत राहील, पण जेव्हा तू यावर खोलवर जाऊन ठरवू लागशील, तेव्हा तुला याचा अर्थ सापडेल. जन्माच्या प्रवासात येणार्‍या ‘मी कोण आहे’ या प्रश्नाचं शेवटपर्यंत अनुत्तरित राहणारं उत्तर तुझ्या या वेगळ्या लैंगिक कलामुळे तुला मिळायला मदत होईल. आहेस तू या आव्हानात्मक जन्मासाठी तयार?’
देवाच्या बोलण्यात हरवून जात त्याला हे आव्हान वेगळं वाटलं. आत्तापर्यंत त्यानं हे आव्हान कधीच ऐकलं नव्हतं. या दिव्य अवस्थेत त्याला हे आव्हान आवडलं. या जन्मातून होणार्‍या प्रगतीच्या कल्पनेनं तो भारावून गेला.
‘यातही तुला थोडी कठीण पातळी हवी आहे का सोपी? तुला पुन्हा सांगतो, इथून खूप उत्साहात घेतलेलं आव्हान भौतिक जगतात त्रासदायक ठरलं, की मनुष्य कोलमडून जातो.’ देवाच्या या बोलण्यावर त्यानं काही क्षण विचार केला. जन्मोजन्मीच्या प्रवासाचा अनुभव आठवल्यावर त्याला देवाला यातून नेमकं काय सांगायचं आहे, हे समजलं.
‘किती गमतीचा खेळ आहे हा! इतकं कठीण आव्हान इथून फारसं अवघड वाटत नाही.’ सहजपणे त्याच्याकडून हे उद्गार निघाले.
‘भौतिकतेतही कोणत्याही मोठ्या गोष्टीला एका पूर्णत्वाच्या दृष्टीनं पाहिलं, की तेही आव्हान हे साधा खेळ होऊन जातं. पण जेमतेम अगदी मोजकेच भाग्यशाली स्वतः जाणू शकतात. नाहीतर बहुतेकांच्या बाबतीत अहंकार स्वत्वापर्यंत पोचू देत नाही आणि मग भौतिक जगणं भयमय होऊ लागतं.’ देवानं खुलासा केला.
पुन्हा दिव्य आणि शांत अवस्थेत तो विचार करू लागला. मग म्हणाला,
‘मला माहीत आहे, आता जी अवस्था आहे ती अवस्था भौतिक जगात सहजासहजी नाही लाभणार. त्यासाठी मोठ्या प्रयासानं प्रगती करावी लागते. पण ती प्रगती करण्यासाठीच आता मला जोखीम पत्करायची आहे. मला यातलीसुद्धा कठीण पातळी हवी आहे.’ तो अगदी ठामपणे म्हणाला.
‘हा तुझा अंतिम निर्णय असेल, तर मग त्यानुसारच मी तुला पुढच्या आयुष्याची रूपरेषा सांगतो. खरंतर या आव्हानात तुला थोडासा सोपा मार्ग घेता आला असता. ज्या वातावरणात राहशील, तिथे तुझ्या स्वीकारासाठी काही सोपे मार्ग होते. पण तुला कठीण आव्हानच हवं आहे. आता तुझ्या आव्हानानुसार तुझा अशा भूमीत जन्म होईल, जिथे तुला याबद्दल उत्तरं शोधताना खूप संयम बाळगावा लागेल. या भूमीत या लैंगिकतेबद्दलच अनेक गैरसमज असल्यानं तुला याचा पावलोपावली संघर्ष करावा लागेल. चहुबाजूंनी तुला अंधार दिसेल, पण शेवटी त्या अंधारातून चालत गेलास, की उजेड मात्र सापडेल. त्यातूनच तुझी अलौकिक प्रगती होत राहील. जिथे विशिष्ट लैंगिकता असणं म्हणजे काय, याचे जे अलिखित नियम तयार झाले आहेत, तिथे हे तुझं अस्तित्व इतरांना शक्यतो सहजासहजी समजणारच नाही. तुझ्या भावना म्हणजे अर्थहीनपणा ठरवला जाईल, त्याचं हसू केलं जाईल. पण या अशा जन्मातल्या अनुभवामुळे पृथ्वीतलावर तुझ्यापुरती तरी तुझ्या अवतीभवतीच्या वातावरणात बदल घडवण्याची तुझ्याकडे मोठी संधी आहे. प्रत्येकाला आध्यात्मिक भेटवस्तू असतातच, तसंच मार्ग शोधताना तुलाही त्या भेटवस्तू मिळत राहतील, वेगवेगळ्या मार्गांनी.’ देवानं त्याला सांगितलं आणि त्याची या वेगळ्या जन्माची अनंत उत्सुकता निर्माण झाली.
या अवस्थेत त्यानं देवाचा आशीर्वाद घेतला.

हा सगळा प्रसंग आठवून तो स्तब्ध झाला. शब्दांविना तो देवाकडे पाहत राहिला.
आपलं जीवन शापित नसून, ते आपल्याच प्रगतीचा आपण निवडलेला मार्ग आहे, हे जीवनाचं इतकं मोठं गूढ कळल्यावर त्याला अव्यक्त समाधान आणि शांतता लाभली होती.
‘म्हणजे मी कोण आणि का होतो, याची मला भौतिक जगात तिळमात्रही जाणीव नव्हती? समाजाच्या चौकटीत मी भयभीत होऊन गेलो, मी प्रगती करायची सोडून माझी अधोगती झाली… आत्महत्या करून मी मरून गेलो…’
शांतपणे पश्चात्तापाचे बोल त्याच्या तोंडून निघाले. मात्र लगेचच त्याचा गैरसमज देवाच्या पुढच्या बोलण्यानं दूर झाला.
‘अजून तुझा मृत्यू झालेला नाही… तू आत्महत्या केलीस, पण त्यात तुझ्या शरीराचा अंत झाला नाही.’
या खुलाशानं जन्माचा अंत अजून झालाच नाही, म्हणून त्याला सुखद धक्का बसला. कृतज्ञतेनं तो देवाकडे पाहू लागला. त्याला त्याचं शरीर हॉस्पिटलमध्ये बेशुद्धावस्थेत पडल्याचं दिसू लागलं. आध्यात्मिक जाणिवेतून त्याला आता भौतिकतेची जाणीव होऊ लागली.
अचानक त्याला दिसलं, आपल्या मागे आपलं कुटुंब आहे. आत्महत्या केल्यापासून आपल्याला त्यांचा विसर पडला आहे.
‘हे काय देवा! माझं कुटुंब इतकं अस्वस्थ, दुःखी कष्टी झालं आहे. तरी मला आतापर्यंत त्यांचा विसर पडला होता. इतका स्वार्थी आहे मी?’ तो नवल वाटून म्हणाला. देवाला त्याच्या या बोलण्याचं हसू आलं. देव म्हणाला,
‘आता पुन्हा तुला भौतिकता दिसू लागली म्हणून हा स्वार्थाचा विचार उत्पन्न झाला. स्वार्थाचा खरा अर्थ कित्येकांना अजून समजलेलाच नाही. स्वतःचं खरेपण, स्वतःचा आत्मानंद शोधण्यात कसला स्वार्थ? मी तुझी निर्मितीच अशी केली आहे. सत्याचा शोध घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.’
देव थोडासा थांबून पुढे म्हणाला, भौतिक शरीराच्या मध्यंतरीच क्वचितच नशिबानं आध्यात्मिक जगताची सफर घडते. ती तुला घडली आहे. ती वाया घालवू नकोस. तुझ्या आत्महत्येच्या प्रयत्नासाठी जी थोडी अधोगती झाली, ती मी माफ करेन. पण आता तू परत जाऊन निडरपणे जग.’
देवाच्या या बोलण्याने तो भलताच स्थिर आणि समाधानी झाला. त्याच्यात प्रचंड बळ आलं. तो पुन्हा भौतिक शरीरात संपूर्णपणे सामावणार इतक्यात त्याला देव म्हणाला,
‘एक शेवटची महत्त्वाची गोष्ट ऐक. आता तुला समजलेला या जन्माचा खरा अर्थ आणि जाणीव भौतिकतेत गेल्यावरही तुझ्या स्मरणात राहील. तरीही आयुष्याच्या प्रवासात येणार्‍या काही गूढ वळणांबद्दल तू अजून अनभिज्ञच आहेस. या गोष्टी त्या त्या टप्प्यावरच तुला गोंधळात टाकतील. आयुष्यात काही गोष्टी ‘हो’ किंवा ‘नाही’ अशा नसतात. त्याला तर्क उपयोगी येत नाही. काही चुकीचं घडेल म्हणून निर्णय घ्यायला घाबरू नकोस. निर्णय चूक किंवा बरोबर, असं काही नसतं. त्यातून शिकणं आणि अनुभव घडत असतो.’
हे बोलणं त्याला समजलं. आयुष्यात येणारं टप्प्याटप्प्यावरचं गूढपणच आपल्याला प्रगतीच्या कोणत्या परमोच्च बिंदूपर्यंत पोचायचं आहे, याची जाणीव करून देऊन त्या पथावर जाण्याची वाट दाखवतं, याची त्याला पूर्ण जाणीव होती. जितकं ज्ञान त्याला आता मिळालं होतं, त्याच्यासाठी तो देवाचा कृतज्ञ होता.
त्या कृतज्ञतेनं त्यानं देवाचा निरोप घेतला.

हॉस्पिटलमध्ये तो शुद्धीवर आलेला बघून त्याच्या कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नाही.
‘‘आई… दादा… बाबा…’’ डोळे उघडून प्रत्येकाकडे बघताना त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच शांततेची चमक दाटली होती. क्षणन्क्षण त्याला अर्थपूर्ण वाटत होता. जीवनाला आत्ताच नव्यानं सुरुवात झाल्यासारखं त्याला वाटत होतं.
‘‘त्रास होत असेल, तर बोलायची गरज नाही. आराम कर.’’ त्याची आई आनंदभरल्या डोळ्यांनी त्याला म्हणाली. त्याच्या चेहर्‍यावर हलकेच स्मित झळकलं आणि त्यानं पुन्हा विश्रांतीसाठी डोळे मिटले. त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं दडपण गेलं.
बेशुद्ध अवस्थेत घेतलेला आध्यात्मिक जगताचा अनुभव त्याच्या शरीरात होता.
मनानं आपला ताबा घेतला आणि त्याच विचारात आपण आत्महत्येचं पाऊल उचललं. आपल्या आयुष्याला विशिष्ट असं ध्येय आहे आणि ते आपल्याला शोधायचं आहे, याची त्याला जाणीव आता होत होती.

दवाखान्यातून घरी आल्यावर कितीतरी दिवस तो वर्तमानातच वावरत होता. वैचारिक गोंधळ शांत झाल्याने सृजनात्मक विचार मनातून येत होते. त्याच्या घरची मंडळी तो भूतकाळातल्या त्रासात जाऊ नये म्हणून त्यानं केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाबद्दल त्याला काही विचारत नव्हती.
मात्र एकदा त्याला आपण लिहिलेल्या सुसाईड नोटबद्दल आठवण झाली आणि ती वाचून आपल्या कुटुंबाला आपल्या लैंगिकतेबद्दल कळलं असेल, असं वाटलं.
‘‘मी आत्महत्येचा प्रयत्न करायच्या आधी एक चिट्ठी लिहून ठेवली होती. ती वाचली तुम्ही?’’ त्यानं आपल्या कुटुंबासमोर हा विषय काढला. त्याच्या आई-वडलांनी एकमेकांकडे बघितलं.
‘‘तुला त्रास होईल म्हणून आम्ही याबद्दल काही दिवसांनी तुला विचारायचं ठरवलं होतं, पण आता तू विषय काढलाच आहेस, तर… तू जसा आहेस, आम्हाला अजूनही त्यातलं फारसं काही कळत नाही. एक मात्र नक्की, या गोष्टीसाठी तुला आम्ही त्रास देणार नाही. जे वागणं तुला बदलायला त्रास होईल, ते केवळ आमच्या दृष्टीला खटकतं म्हणून बदलण्यासाठी तुझ्यावर दडपण आणणार नाही. मात्र हा शाप आहे, असं समजून स्वतःला दूषणं देत बसू नकोस.’’ आईच्या या उद्गारावर तो धन्य झाला.
‘‘जे मी सुसाईड नोटमध्ये लिहिलं, ते माझ्या मनात एका विशिष्ट विचारांच्या चक्रात अडकून आलेलं होतं. एका बाजूनं चुकीच्या पद्धतीचे विचार मला वेदना देत होते आणि त्यामुळे मी लिहिलं. हा शाप वगैरे काही नाही, हे मला माहीत आहे. जसं तुम्हाला माझ्याबद्दल काही गोष्टी कळत नाहीत, तसंच मलाही कित्येकदा मन द्विधा अवस्थेत घेऊन जात होतं. काय हरकत आहे, असं कल्लोळात असायला? भविष्याबद्दल माहीत नाही, हेच जीवनाचं गूढ जगण्याला अर्थ देतं. जीवन एखाद्या कोणत्याही खेळासारखं आहे. खेळण्याच्या प्रत्येक टप्याचा आनंद घेतला, की अंतिम काय होणार, याची आसक्ती, भीती, चिंता उरत नाही.’’ तो बोलत असताना त्याच्या बोलण्यातला खोल अर्थ आणि समंजसपणा यांमुळे पालकांना समाधानमिश्रित आश्चर्य वाटत होतं.
त्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नातून तो वाचल्यानंतर त्याच्यासोबत संपूर्ण कुटुंबालाच पुनर्जन्म झाल्यासारखं वाटत होतं.

त्यानं पुन्हा आपल्या सुसाईड नोटबद्दल सगळ्यांना जाहीर केलं.
‘‘माणूस स्वतःला ओळखण्यात चूक करतो. आत्महत्या करताना जे विचार माझ्या मनात आले होते, ते तेव्हा मी झालेल्या उद्ध्वस्तपणानं आले होते. आत्महत्येतून वाचल्यानंतर मला जणू पुनर्जन्म मिळाला. माझ्या सुसाईड नोटमधले विचार मला दुरुस्त करायचे आहेत. माझं जीवन हे काही शापित जीवन नाही. मी जो आहे त्याचा मला आनंद आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला आपण जसे आहोत, जे आहोत त्याला एक अर्थ आहे. संघर्ष हा जीवनाचा भाग असेल, तर मला आता आनंदानं संघर्ष करायचा आहे. उलट माझ्या आयुष्यात जास्त अडथळे असतील, तर ते मला आनंदानं पार करायचे आहेत. मी स्वतःला बदलणार नाही. तुम्हाला माझ्यामुळे त्रास होत असेल, तर तुम्ही मात्र माझ्याशी संबंध तोडू शकता. त्याचा मी आदर करेन. ही पुनर्जन्माची मिळालेली अनोखी देणगी मला अर्थपूर्ण जगण्यात वापरायची आहे.’’

– राहुल शिंदे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.