Now Reading
अवस्थांतर

अवस्थांतर

Menaka Prakashan

होमाच्या धुरामध्ये आहुती घालणार्‍या वैभवच्या डोळ्यांपुढे पातळसा पडदा होता. आज सुनीलाचं वर्षश्राद्ध, त्या निमित्तानं घरावर असणारी अमंगळाची छाया नाहीशी व्हावी म्हणून आईनं उदकशांती करण्याचा घाट घातला होता. त्या उदकशांतीच्या होमापुढे बसलेल्या वैभवच्या मनाची शांती कशानंच होणार नव्हती. होमातल्या ज्वाळांकडे बघताना त्याला फक्त सुनीलाचे डोळे दिसत होते, जे त्याला अतिशय प्रिय होते.

जेव्हा सुनीलाला त्यानं पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा तिच्यात प्रथमदर्शनी आकर्षण वाटावं असं काहीच नव्हतं. आई तर कमालीची नाराज झाली होती. या शहरातल्या मुली, फोटो असा सिनेमातल्यासारखा पाठवतात आणि बघायला गेलो, तर पाप्याचं पितर!
वैभव तसा उंच, देखणा म्हणावा असा होता. शिवाय व्हेटर्नरी डॉक्टर. गावात स्वतःची दहा हजार कोंबड्यांची पोल्ट्री. शिवाय आजूबाजूच्या चार गावांत स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिस. ती पण चांगली चाललेली, त्यामुळे खेड्यात राहणारा, एवढं सोडलं तर त्याच्या स्थळात काहीच कमी नव्हतं. सुनीला ही त्यामानानं शहरात वाढलेली, बीएस्सी झालेली, पुण्यात शिकलेली, पण वरकरणी एकदम सामान्य मुलगी होती. त्यामुळे वैभवच्या घरच्यांचं मत ही शहरातली मुलगी करण्यासाठी तसं प्रतिकूलच होतं, पण वैभव ठाम होता. त्यानं एकदाच तिच्या डोळ्यांत पाहिलं आणि ते टपोरे डोळे त्याच्या मनात कायमचे ठसून गेले होते. असे टपोरी, भावस्पर्शी डोळे आपल्याकडे रोखून बघताहेत, ही कल्पनाच त्याला सुखावून गेली होती. त्यानं तिच्याशीच लग्न करायचा आपला निश्चय आईला सांगितला होता. शेवटी आईनं वैभवच्या हट्टापुढे हार मानली होती.

सुनीला लग्न करून घरात आल्यापासून वैभवचं जगच बदलून गेलं होतं. खेड्यात वाढलेल्या वैभवला मैत्रिणी सोडाच, फारशी मुलींशी बोलायची सवयही नव्हती. पण सुनीला इतकी मनमोकळी होती, की तिनं वैभवला आपला जिवलग मित्र बनवून टाकलं होतं. ती खूप हुशार आणि चौकस होती. प्रत्येक नवीन अनुभव घ्यायला उत्सुक असायची. त्यामुळेच शहरात वाढलेली असूनही तिनं खेड्यातलं जीवन चटकन आपलंसं केलं. हनीमूनहून आल्यानंतर केवळ आठ दिवसांतच तिनं वैभवकडून पोल्ट्रीच्या व्यवहाराची माहिती करून घेतली. त्यानंतर ती रोज तीन-चार तास पोल्ट्रीत जाऊ लागली. हळूहळू पोल्ट्रीचा सर्व व्यवहार ती स्वतंत्रपणे सांभाळू लागली. त्यामुळे वैभवनं पोल्ट्रीत रोज जाणंही बंद केलं आणि त्यालाही दिवसातून थोडा मोकळा वेळ मिळू लागला. जर कोंबड्यांचं काही आजारपण वगैरे असेल, तरच सुनीला वैभवला बोलावी, नाहीतर त्याच्या नुसत्या सल्ल्यानं ती पोल्ट्री व्यवस्थित चालवी.

वैभव आणि सुनीला एकमेकांच्या आधारानं, पण स्वतंत्रपणे प्रगती करत होते. भविष्याचे बेत आखले जात होते. त्यातच त्यांना आपलं कुटुंब आणखी मोठं होणार असल्याचं समजलं. मग तर त्यांच्या आनंदात अजूनच भर पडली. आता त्यांच्या गप्पांचे विषय बदलले होते. बाळाचं नाव काय ठेवायचं, ते कुणासारखं असेल, किंवा असावं, त्याला काय बनवायचं, याबद्दल बोलण्यात आता त्यांचे तासन् तास जात असत.

सुनीलाला पाच महिने पूर्ण झाले, तेव्हा त्रास कमी झाला आणि ती चांगली फिरू लागली. तेव्हा तिला अचानक कोल्हापूरला एकट्या राहणार्‍या आपल्या आत्याची आठवण झाली. तिच्याजवळ चार दिवस राहून खाण्यापिण्याची हौस पुरवावी, आराम करावा, असं तिला वाटू लागलं. तिनं वैभवजवळ हा विषय काढला, तेव्हा त्याच्या डोक्यात एक कल्पना चमकली. तो सुनीलाला म्हणाला, की ‘सुनी, आपण गोव्याला जाऊया का आधी तीन दिवस? मग तुझ्या आत्याकडे जाऊ येताना. तिथे तीन दिवस राहू आणि फिरत फिरत येऊ. नाहीतरी बाळ आल्यावर आपल्याला लवकर कुठे जाता येणार नाही.’ या कार्यक्रमात फक्त एक बदल म्हणजे वैभवच्या आईच्या सूचनेप्रमाणे त्यांना कोल्हापूरजवळ ज्योतिबाच्या दर्शनाला जायचं होतं. वैभवनं अतिशय उत्तम व्यवस्था केली होती. त्याप्रमाणे त्यांची गोवा ट्रिप अगदी अविस्मरणीय झाली. ते तीन दिवस अगदी मुठीत पकडून ठेवावेत, असं दोघांना वाटत होतं. कोल्हापूरच्या आत्याकडे मुक्काम करून दुसर्‍या दिवशी दोघं ज्योतिबाच्या दर्शनाला गेले. देवाच्या दर्शनाला जायचं म्हणून सुनीला साडी नेसली होती. दर्शन झाल्यावर दोघं मजेत हिंडत होते. कुठे कुठे फोटो, सेल्फी काढणं चालले होतं. देवालयाच्या आवाराच्या बाहेर रेलिंग काढलेलं होतं आणि बाहेरच्या झाडाच्या बुंध्यावर एक छानशी जागा बनली होती बसण्यासाठी. सुनीलाला तिथे बसूनच फोटो काढायचा होता. वैभवनं सावकाशपणे तिला तिथे बसवलं, फोटो काढला, नंतर हात देऊन तिला झाडावरून खाली उतरवलं आणि तो जायला वळला. निमिषार्धात काय झालं ते कळलंच नाही, पण पाय घसरून सुनीला खाली गेली, ती थेट दरीत. वैभवनं मागे वळून पाहिलं, तेव्हा सुनीला नाहीशी झाली होती, मागे उरले होते ते शोधण्याचे वगैरे सर्व उपचार.

‘असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय ।
मृत्योर्मा अमृतं गमय…
म्हणजेच हे प्रभू, आम्हाला असत्य सोडून सत्याची वाट दाखव, म्हणजेच जे खरं आहे, जे सत्य आहे तेच आम्हाला अंगीकारण्याचं बळ दे. आजूबाजूला असलेल्या अंधकारातून प्रकाशाची वाट दाखव. मृत्यूमधून बाहेर येऊन अमरत्वाची वाट दाखव,’ असे गुरुजींचे शब्द कानी पडले, तेव्हा वैभव कासावीस झाला. ‘ही वाट कधी आणि कशी दिसणार आहे? माझ्या मनामध्ये एवढा अंधकार पसरलेला आहे, की प्रकाशाची तिरीप पण आतमध्ये येऊ शकत नाही. एवढीशी चोवीस वर्षांची सुनी अमरत्वाला पोचली… कधी, कशी? माझ्या डोळ्यांदेखत नाहीशी झालेली सुनी आज अमरत्वाला पोचली, असं गुरुजी म्हणतात.’ त्याला काहीच उमगेना, नुसती जिवाची तगमग वाढत होती.

शेवटी तो घरातून बाहेर पडला. त्याच जागी जाऊन बसायचं आणि आपल्या मनातला सगळा कल्लोळ सुनीलाला तिथेच जाऊन सांगायचा. कदाचित तिचा आत्मा, तिचं शरीर तिथे ते सगळं ऐकेल आणि आपलं मन समजून घेईल, असं त्याला वाटलं.
तो ज्योतिबाला पोचला. डोंगर चढून वरती गेल्यावर देवळात न जाता बाहेरच्या कट्ट्यावरच स्थिरावला. त्या जागेच्या जवळच बाहेरच्या कट्ट्यावर तो बसला होता. स्वतःचा स्वतःशी विलाप सुरू होता. असा खूप वेळ गेला. संध्याकाळ संपून रात्र होऊ लागली. देवळातले दिवे लागले, पण वैभवला काळवेळेचं भान नव्हतं. तिथून उठायचं नाही, असं जणू त्याच्या मनानं ठरवलं होतं. त्यामुळे तो आजूबाजूला बघतच नव्हता. मंदिराकडे पाठ करून तो एकटक त्या झाडाच्या बुंध्याकडे बघत होता. मनात एकीकडे त्याच दरीत उडी मारायचे विचार पुन्हा पुन्हा येत होते. दुसरीकडे आई-बाबांचे त्याच्या काळजीनं सदैव व्यापलेले चेहरे डोळ्यांपुढे येऊन हे पाप करावयला मन धजावत नव्हतं. बाजूला काय चाललंय, याचं भान नव्हतं. अशातच त्याला अचानक पूर्वी कधीतरी ऐकलेली गोष्ट कुणीतरी कानात कुजबुजावी तशी आठवायला लागली. एका आईचा पुत्र अतिशय गुणवान, आज्ञाधारक, सुंदर असतो. तिच्या जगण्याचा तो आधार असतो. परंतु एक दिवस दुर्दैवानं तो अपघातात प्राण गमावतो. त्या स्त्रीचं हृदय दुःखानं फाटून जातं. पुत्राचे दशक्रिया विधी होईपर्यंत तिचं रुदन संपतच नाही. सगळे संस्कार झाल्यावर रात्री तिचा पुत्र तिच्या स्वप्नात येतो. त्याच्या चेहेर्‍यामागे तेजोवलय असतं, जणू श्रीकृष्णाची मूर्तीच तिच्यासमोर आहे असं दिव्य तेजोवलय लाभलेला तिचा पुत्र तिला समजावतो, की हे ‘माता, तू कशासाठी एवढा शोक करतेस? जे नाहीसं झालं ते तर पंचवायुतत्वांनी बनलेलं माझं शरीर होतं. ते आज नाही, तर अजून काही वर्षांनी मातीत मिसळणारच होतं. या जगात झाडाची पानं गळतात, ऋतू बदलतात, तसंच आपलं शरीरही आपली अवस्था बदलतं. त्याचप्रमाणे माझ्या शरीरानं अवस्था बदलली आहे. पण माझा आत्मा, माझं मन तुझ्याजवळच आहे. माझा आत्मा हा मी आहे, हे समजून तू वाग. मला बरं वाटेल असं कर. माझ्या राहिलेल्या इच्छांबद्दल विचार कर. त्यातलं जे जमेल ते केलंस, तर मला आनंद होईल.’

नकळत वैभव या शब्दांमध्ये गुंतून गेला… कालचक्र सुरूच राहणार आहे… ऋतू बदलणार, सृष्टिचक्र बदलणार, आपणही त्याचाच एक भाग आहोत, हे सत्य त्याला उमगलं. आता सुनीलाचं शरीर गेलं, तरी मन आपल्याबरोबर आहे, या भावनेनं जगायला हवं. आपल्या चांगल्या, किंवा वाईट या भावनाच आपल्याबरोबर इथून पुढे आपल्याबरोबर असणार आहेत. तिच्यासोबत आयुष्य घालवणं आता कधीही शक्य होणार नाही, या भावनेनं आतून कोसळलो होतो. गेलं वर्षभर हा मनाचा चाललेला संघर्ष त्याच भावनेतून चाललेला होता. आणि मनाला फसवल्यासारखं वाटू नये म्हणून स्वतःलाही शब्दात तसं काही सांगितलं नव्हतं. तिचं नसणं हे आता शब्दापासून वेगळं काढून विनाशब्दाची भावना बनवणं आवश्यक आहे. दुःख शब्दांच्या पलीकडे नेऊन ठेवलं, तरी भावनेत कायमच राहणार आहे. त्यासोबतच आता आयुष्य घालवावं लागणार आहे, या भावनेसह उठून तो गडाची उतरणीची वाट चालू लागला.

– दीपाली कुलकर्णी

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.