Now Reading
अवघे धरू सुपंथ

अवघे धरू सुपंथ

Menaka Prakashan

मालतीबाईंनी पूजा संपवली आणि ‘शिवलीलामृता’चा पुढचा अध्याय वाचायला घेतला. तो त्यांचा नित्यक्रम, पण आज त्यांचं चित्त नेहमीसारखं त्यात एकाग्र होत नव्हतं. नवर्‍याबद्दलच्या चिडीनं परिसीमा गाठली होती आणि त्याचं रूपांतर स्वतःच्या निष्फळ आयुष्याच्या तिरस्कारात झालं होतं. तातडीनं जे जीवन कुठेतरी संपवावं, या विचारापर्यंत आलं होतं. पण ते त्यांना पटेना, म्हणून तो विचार मागे सारण्यासाठी त्यांनी तो अध्याय मोठ्यांदा वाचायला सुरुवात केली. अध्याय संपला. मग त्या तीर्थ टाकायला पाठीमागच्या बागेत गेल्या. सुकलेल्या तुळशीकडे बघताना त्यांना पुन्हा दाटून आलं.

‘…लग्नानंतर ही पुन्हा बहरेल, पण आपण? सत्तरी संपत आली. उताराला लागलेलं हे आयुष्य. असंच घरंगळत संपायचं. या प्रपंचासाठी झिजायचं, एवढंच माझं काम. हरकत नाही. आपल्याच माणसांसाठी हे करायचंय ना, मग त्यातही आनंद आहे, पण तो समोरच्याला कळायला हवा ना? का प्रत्येक गोष्टीत उलटाच अर्थ काढायचा? सासरचं मनुष्यबळ नाही, म्हणून माहेरची जोडून ठेवली. संसारात काय कमी अडचणी असतात? आलीच ना वेळेवर मदतीला. तेदेखील न बोलावता, त्याचं काही नाहीच. उलट त्यांनाच नावं ठेवायची. म्हणे, माहेरची शिस्त इथे नको. शिस्त का वाईट आहे? तुमच्या व्यसनांचे दुष्परिणाम मुलांवर होऊ नयेत म्हणून मी धडपडले, तर म्हणे, मला मोकळं जगूच देत नाहीस! सतत भीती, ताण आणि कडवट शब्द यांचीच सोबत. जाऊदे, झालं गेलं ते गंगेला मिळालं. आता तर आपण दोघंच आहोत ना, समजुतीनं आनंदानं राहू. ते नाही. फक्त स्वतःचा विचार आणि स्वतःचीच मजा. दुसर्‍याचा विचारच नाही. कसं वागायचं माणसानं?’
त्या मग पाय ओढत घरात शिरल्या, तर दारातून आत येताना महेशराव दिसले. त्या तिथूनच कडाडल्या,
‘‘आलात जाऊन? केलंत मनासारखं?’’
त्यांनी बायकोकडे दुर्लक्ष केलं. ते आत गेले. फ्रेश होऊन, शांतपणे कपडे बदलून बाहेर आले. तिथल्या आरामखुर्चीत अंग लोटत ते म्हणाले, ‘‘जरा चहा देतेस का?’’
‘‘का? तिथे झाला नाही?’’
‘‘नको म्हटलं.’’
‘‘ठेवलाय.’’ तिनं आतूनच सांगितलं.
डोळे मिटून कपाळ दाबत बसलेल्या नवर्‍यासमोर चहाचा कप ठेवत त्या म्हणाल्या, ‘‘चहा घ्या. आलं घालून केलाय. बरं वाटेल.’’

महेशरावांनी चहा घेतला. त्यांना खरंच बरं वाटलं. कप समोरच्या टीपॉयवर ठेवत असतानाच प्रश्‍न आला.
‘‘आता तरी सांगणार आहात का, की काय झालं संजयकडे? जीव टांगणीला लागलाय माझा.’’
‘‘काय झालं हे जणू तुला माहीतच नाही असं बोलतेस.’’
‘‘अंदाज होता, म्हणून ‘जाऊ नका’ म्हणत होते. पण तुम्ही आणि माझं ऐकणार?’’
‘‘हे बघ, मला खरंच आता कसलेही वाद, भांडणं नकोत. मुलाचा फोन आल्यावर जायला नको?’’
‘‘अपमानित होऊन आलात ना? म्हणून चहा पण घेतला नाही का?’’
‘‘हो. नातीच्या साखरपुड्याची बातमी मित्राकडून कळते, हे चांगलं आहे का, म्हणून विचारलं. तर तो म्हणतो, ‘सांगणार होतो, पण कामाच्या धांदलीत झाला उशीर…’ शिवाय पैसेही मागितलेत त्यानं.’’
‘‘किती?’’
‘‘एक लाख.’’
‘‘तुम्ही काय म्हणालात?’’
‘‘साखरपुड्याला यायचं की नाही, हे आम्ही चर्चा करून ठरवू. पैशांची तर बातच सोड. उठून निघून आलो.’’
‘‘तुटला तर आहेच आपल्यापासून. आता तर तो पक्का तुटला.’’
‘‘जाऊदे. सोडून द्यायला शीक.’’
‘‘कसं शिकू? तीन मुलं असून मी निपुत्रिक. हा थोरला इथे राहतो म्हणून आशा होती, पण तोही गेला धाकट्यांच्याच वळणावर. काय पाप केलं होतं मागच्या जन्मी म्हणून देव ही अशी एकाकीपणाची शिक्षा देतोय?’’
‘‘कुठेतरी गुंतव स्वतःला.’’
‘‘तुमच्यासारखं? दारू आणि दारूडे मित्र. असं गुंतवू?’’
‘‘आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन पेशंटना मदत करतो. आठवड्यातले सातही दिवस जातो.’’
‘‘माहीत आहेत तिथले पराक्रम.’’
‘‘तुला माझं काहीच आवडत नाही.’’
‘‘तसं नाहीये. न आवडणार्‍या मुलीशी लग्न करावं लागलं म्हणून हा असा माझा आयुष्यभर छळ आहे.’’
‘‘कितीदा सांगितलंय, की तसं काही नाहीये. पण तू समजूनच घेत नाहीस.’’
‘‘तुमचं वागणं खरं काय ते सांगतं. उगाच नाही तुम्ही माझ्या माहेरच्यांना नावं ठेवत.’’
‘‘आता या परिस्थितीत तरी मागचं विसरायला शिक.’’
‘‘म्हणजे तुम्ही बोलत राहा आणि मी दुर्लक्ष करू, असंच ना?’’
‘‘याकरताच मला घरीदेखील यावंसं वाटत नाही. सारखी कचकच.’’
‘‘तरी तुम्ही घरी येता. मला तर का आणि कुणाकरता जगावं, हेच कळत नाही. त्याचं काय?’’
पुढचं ऐकण्यासाठी महेशराव थांबलेच नाहीत. आत गेले. कपडे बदलून रागारागानं ताडताड बाहेर पडले.
कोपर्‍यावरच्या पानपट्टीवाल्याकडून एक सिगारेट घेतली आणि बाजूच्या कट्ट्यावर बसून ते शांतपणे ओढू लागले.

‘…कुठल्याही बाजूनं सुखी नसलेला माझ्यासारखा दुसरा या जगात कुणीसुद्धा नसेल. लहानपणी परिस्थितीनं नाडलं. नंतर आश्रितासारखं राहावं लागलं. त्याला स्वतःचा आवाज नसतोच. नशीब! आमच्याच शहरात इंजिनीअरिंग कॉलेज होतं, म्हणून डिप्लोमा झालो. पी.डब्ल्यू.डी.मध्ये लागलो. देवानं अशी काही खेळी केली, की जिच्याबरोबर मला लग्न करायचं होतं, तिच्याऐवजी हिच्याशी करावं लागलं. हिचाही झालेला गैरसमज अजूनसुद्धा तसाच आहे. ठाम. काय करणार? मुलं ही अशी! त्यामुळे मी सध्या तुटलेल्या पतंगाप्रमाणे आकाशात मुक्तपणे विहरतोय. अशावेळी अगदी पहिल्यापासून आजपर्यंत खरी सोबत कुणी केली असेल, तर ती मित्रांनी आणि या दारूनं. ती कशी सोडणार? आमच्याबरोबरच त्यांचाही अंत… वा! काय छान वाटतंय! सिगारेट पिण्याला कुणीतरी मुरली वादनाची उपमा दिलीय. क्या बात है!…’
‘‘ए महेश, इथे का बसलायेस?’’ श्रीपादनं विचारलं. त्यांनी मित्राचा आवाज ओळखला.
‘‘घरी ताप झाला, की मी इथे येतो. तुला माहिती आहेच.’’
त्याकडे दुर्लक्ष करत श्रीपाद म्हणाला, ‘‘चल, तुझ्याच घरी. तुम्हा दोघांकडे काम आहे.’’
‘‘आत्ता?’’
‘‘हो, आत्ताच.’’
‘‘अजिबात नाही. त्यापेक्षा इथे बसू.’’
‘‘इथे? नको. त्यापेक्षा असं कर, माझ्या घरी चल. तुला एकट्याला तरी मनातला विचार सांगतो.’’
‘‘डोकं फार आऊट आहे रे.’’
‘‘आलं लक्षात, पण बोलायचा विषयही महत्त्वाचा आहे आणि तातडीचा आहे. तुझ्याशी अगोदर चर्चा केली, की मला धीर येतो. म्हणून म्हणतो, चल.’’
हा श्रीपाद महेशचा वर्गमित्र. लहानपणापासून एकत्र. त्यांच्या ‘सुपंथ ग्रुप’चा प्रमुख. या ग्रुपची मूळची कल्पना त्याची. कार्यकर्त्याचे सारे गुण त्याच्यात एकवटललेले. त्यामुळे निवृत्त लोकांच्या सकाळच्या फिरण्याच्या मंडळींमध्ये त्यानं ही योजना मांडली. सर्वांनी उचलून धरली. सुरुवातीला या दोघांपासून सरू झालेला हा ग्रुप आता दहा लोकांचा झालाय.

श्रीपादला या महेशचा फार कळवळा. पतिपत्नीतले विकोपाला गेलेले मतभेद, पडलेली प्रचंड दरी, निरस होत चाललेलं नातं आणि हे कमी काय म्हणून मुलं असून सोसायला आलेलं एकटेपण यानं त्याला आणि त्याच्या पत्नीला- सुधाला- काळजी वाटायची. ती दोघं त्यांच्या परीनं या दोघांना जपायची. दोन्ही घरांत तसा मोकळेपणा होता. मुख्य म्हणजे श्रीपादच्या घराचा शब्द ही दोघंही ओलांडत नव्हती.
चालताना मारलेल्या गप्पा आणि घरी गेल्यावर सर्वांनी केलेली विचारपूस यातून महेश ऐकण्याच्या मनःस्थितीत आला, हे जाणून श्रीपादनं बोलणं सुरू केलं.
‘‘मागच्या खेपेला विजापूरहून आलेले माझे काका आठवत असतीलच. त्यांनी त्यांच्या शेजारच्या व्यंकटबद्दल प्रस्ताव आणला होता. या वर्षी तो दहावी होईल. त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी इथे काही सोय होऊ शकेल का? घरची फार गरिबी आहे.’’
‘‘तू बोलला होतास. आपल्या ग्रुपनं दोन-दोन महिने ठेवून घ्यावं आणि हे अकरावीचं वर्षं काढावं, असं तू सुचवलं होतंस.’’
‘‘हो, पण कुणी काही त्यावर बोललं नाही.’’
‘‘कसे बोलतील? आपल्यातलं कुणीही आता घरातले कर्ते राहिलेले नाहीत. घर लेक-सुनांच्या ताब्यात आहे.’’
‘‘पण तुझ्याकडे तसं नाही ना? तुम्ही दोघंच आहात.’’
यावर महेश हसून म्हणाला, ‘‘तुला माझं घर त्या कामासाठी योग्य वाटतंय, याचंच मला हसू येतंय.’’
‘‘हसू नकोस. आता हा प्रश्‍न ऐरणीवर आलाय. काकांना मी शब्द दिलाय आणि त्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्‍न आहे. महिन्याभरात तो येईल. सुरुवात तुमच्या घरापासून करायची, असं आम्ही दोघांनी ठरवलंय. मला सांग, तू तयार आहेस ना?’’
‘‘मी आहे रे, पण तिची खात्री मी देऊ शकत नाही. कारण घरातलं करावं तिलाच लागणार.’’
‘‘मग सुधाला वहिनींशी बोलायला सांगू?’’
‘‘प्रयत्न करायला काय हरकत आहे. दोन महिन्यांचा तर प्रश्‍न आहे.’’
‘‘तोपर्यंत मी पुढच्या दोन महिन्यांसाठी दुसर्‍याला तयार करतो. नाहीतर माझं घर आहेच.’’
‘‘तुझ्या घरात काय कमी अडचणी आहेत? तसा विचारच करू नकोस. आमच्याच घरी ठेवू. मॉडर्न शाळेत त्याला घालू. तिथले सगळे माझ्या ओळखीचे आहेत. तू कागदपत्रं मागव.’’
‘‘घाई करू नकोस. वहिनींनी ‘हो’ म्हणायला हवं ना?’’
‘‘तेही खरंच.’’
तेवढ्यात फोन वाजला. मालतीबाईंचा होता. महेशसाठी त्या जेवायच्या थांबल्या होत्या. श्रीपादनंच ‘पाठवतो लगेच’ म्हणून सांगितलं.
घरी परत जाणार्‍या पाठमोर्‍या महेशकडे ती आकृती दिसेनाशी होईपर्यंत श्रीपाद बघत राहिला.

दहा दिवस झाले व्यंकट महेशच्या घरी येऊन. त्याचं कॉलेजही सुरू झालं. तसा तो छोट्या गावातून मोठ्या शहरात आलेला. तसंच साध्या घरातून सुखवस्तू बंगल्यात राहायला लागलेला. मनाचा गोंधळ, संकोच आणि बावरलेपण हे सुरुवातीला दिसणारच. जसं घरात, तसंच बाहेरही. अशात स्वतःच्या परिस्थितीची जाण, पण तीही विसरून जावी असं कुमार वय. त्यात भाषेचा प्रश्‍न. त्याला मराठी येत असलं, तरी त्याचा मूळ कानडी हेल, तो डोकावणारच. त्याची मनात सदैव भीतीची जाणीव. जास्त करून कॉलेजच्या वातावरणात. अशा वेळी हे महेश आजोबा आणि मालती आजी त्याला जवळचे वाटले, तर त्यात नवल काय!
‘‘ही जबाबदारी फक्त दोन महिन्यांपुरती आहे म्हणून मी ‘हो’ म्हटलं. तेसुद्धा सुधावहिनी घरी आल्या म्हणून. खरं म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच ‘नाही’ म्हणून सांगून टाकायचं.’’
‘‘कसं टाकणार? श्रीपादनं शब्द दिला होता. आता तेवढंच जवळचं घर राहिलंय आपल्याला.’’
‘‘असूदे. मी सगळं त्याचं नीट करीन. एवढीदेखील कसूर ठेवणार नाही. पण तुम्ही पिताय हे त्याला अजिबात कळता कामा नये.’’
‘‘मी कबूल केलंय ना.’’
‘‘आपल्या घराबद्दल चांगलं मत व्हायला पाहिजे त्याचं.’’
‘‘त्याचं? एवढं का महत्त्व त्याला?’’
‘‘नंतर इतरांच्या घरात जाणार आहे तो. तसा मुलगा साधा आणि सालस दिसतोय. वळण पण चांगलं आहे. पानात काही टाकत नाही. ताट एकदम स्वच्छ.’’
‘‘वडील भिक्षुकी करतात.’’
‘‘गरिबी कुणाला चुकलीये. ती असली तरी समाधान हवं. नाहीतर आपण बघा, नुसती कडकड.’’
‘‘माझ्याबाबत तसं नाही. मी मजेत असतो.’’
‘‘कशाला माझ्यापाशी खोटं बोलता? तोंडावर खरं बोलायला धैर्य लागतं.’’
महेशराव ओशाळले. विषय बदलत म्हणाले, ‘‘ती यादी दे. मी सामान आणून टाकतो. येताना मंडईतही जाऊन येतो.’’
मंडईकडे जाताना मनात तोच प्रसन्न विचार.

‘…एवढा नीट संवाद घरात खूप दिवसांनंतर घडतोय. त्याचंच आश्‍चर्य वाटतंय. मुलं लहान होती, त्या वेळी होत होतं. त्या वेळीही ती माझं पिणं मुलांपासून दडवायच्या सतत प्रयत्नात असायची. अर्थात, तिला शब्द दिला होता, त्याप्रमाणे घरी मी कधीच प्यायचो नाही. आमची नोकरी, त्यातली फिरती, साईटवरचं मोकळं वातावरण, यानं ही सवय लग्नाअगोदरपासून लागली. तसं बघायला गेलं, तर घरच्या आक्रसललेल्या वातावरणातून या नोकरीनिमित्त एकदम मोकळ्या आणि तशा अर्थी श्रीमंत वातावरणात गेलो. त्याचा हा परिणाम असावा…’’
‘आजोबा’ ही हाक कानी आली आणि महेशराव दचकले. पाठीमागे वळून पाहतात, तर मित्राच्या सायकलवर पाठीमागे बसलेला व्यंकट हाका मारत होता. आजोबा थांबलेले पाहून तो उतरून जवळ आला.
‘‘कुठे निघालात?’’
‘‘मंडईत.’’
‘‘मी येऊ?’’
‘‘चल.’’
‘‘ईशान, जाताना माझ्या घरी हे दप्तर टाक. त्यातला तुझा डबा आठवणीनं काढून घे.’’
ईशान गेला. व्यंकट चालता चालता बोलत होता.
‘‘आजोबा, हा ईशान आपल्या घराजवळच राहतो. वर्गातसुद्धा माझ्याच बेंचवर बसतो.’’
महेशराव हे सारं ऐकत होते, पण त्यांचं मन त्या ‘आजोबा’ या हाकेभोवतीच फिरत होतं.
‘…किती दिवसांनी ही हाक ऐकतोय मी. किती गोडवा भरलाय यात. पाच नातवंडं आहेत, तरीसुद्धा ही हाक दुर्मीळ झालीये माझ्यासाठी…’
त्यांना एकदम थकून गेल्यासारखं वाटलं. चक्कर येईल की काय, अशी भीती वाटली. ते एकदम घाबरून बाजूच्या बंद दुकानाच्या पायरीवर सावली बघून बसले.
‘‘काही होतंय का आजोबा?’’ व्यंकटनं काळजीनं विचारलं.
‘‘काही नाही. ऊन लागलं ना, त्यानं जरा थकल्यासारखं वाटलं.’’
व्यंकटनं शेजारच्या हॉटेलमधून पाणी आणलं. पाणी प्यायल्यावर आजोबांना जरा बरं वाटलं. ते लगेच म्हणाले, ‘‘चला, निघूया.’’
‘‘तुम्ही बसा इथे. मी सगळं घेऊन येतो.’’
‘‘तुला नाही कळणार.’’
‘‘सगळं कळेल.’’
त्याच्या निरागसतेनं ते विरघळले. यादी, पैसे देत त्यांनी दुकानाची त्याला माहिती दिली. मनात थोडी धुगधुग होती. पण आता नाईलाज होता. त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांची मुलं येऊ लागली.

‘…आपली मुलं याच्याएवढी होती, तेव्हा अशीच लाघवी होती. पण मग बदलली कशी? आणि इतका बदल? आई-वडील नकोसे वाटेपर्यंत? आमच्याकडून काही चुकलं का? कुठे कमी पडलो आम्ही? सासू-सुनेचं पटत नाही, बायकोपुढे मुलांचं काही चालत नाही, हे मी समजू शकतो. पण पोटच्या मुलांचं काय? त्यांना मागचं काहीच आठवत नाही? खाल्लेल्या खस्ता, वेळोवेळी केलेली मदत, मुलांसाठी सारं काही असं मानणारे आम्ही, यातलं काहीच आठवत नाही? आता उरलेलं आयुष्य म्हणजे निव्वळ पोकळी आहे. त्यात हा आम्हा दोघांतला विसंवाद. आयुष्याला चव कशी येणार…?’
महेशरावांना एकदम दारूची आठवण झाली. श्रीपादला फोन करावा का, असा विचार मनात आला. तेवढ्यात हॉटेलचा पोर्‍या चहा घेऊन आला.
‘‘कुणी सांगितला?’’
‘‘त्या तुमच्या पोरानं. पाण्याचा ग्लास द्यायला आला होता. पैसे पण दिलेत.’’
एवढ्याही कृतीनं त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी स्वतःला समजावलं.
‘या रविवारी ट्रिपला जायचंय ना, तोपर्यंत पिण्याचा विचारही बंद. ठरवलंय ना आपण…’
या नुसत्या विचारानंही त्यांना प्रसन्न वाटलं आणि ते उत्सुकतेनं व्यंकटची वाट पाहू लागले.

पंधरा दिवसांनंतरची सकाळ. अकराचा सुमार. व्यंकट शाळेत गेलेला. त्याच्यासाठी बाहेर आलेल्या मालतीबाई दारात, दूरवर नजर टाकत कुठे महेशराव दिसतात का, याचा अंदाज घेत तशाच उभ्या. मलूल चेहरा, नजरेत काळजी आणि विचार करून थकलेली काया. गेला आठवडा घरात पूर्वीचाच ताण. फरक एवढाच, की हा व्यंकट शाळेत गेल्यावर त्याचा उद्रेक व्हायचा. परिस्थितीच तशी निर्माण झाली होती.
…ज्या मित्रानं साखरपुड्याची बातमी दिली, तोच परत येऊन सांगून गेला, ‘देऊ नका तुमच्या नातीला त्या घरात. चांगलं नाही ते. द्याल तर आयुष्यभराची काळजी पदरात पडेल…’ त्या वेळी श्रीपादभाऊजी पण घरातच होते. कुणालाच अन्न गोड लागेना. ह्यांनी, भाऊजींनी नीट चौकशी केली. बातमी खरीच होती. अशा वार्ता खोट्या नसतातच. संजयकडे दोन फेर्‍या झाल्या. त्यालाही कळलेलं होतं, पण सारं अस्पष्ट होतं. खात्री पटल्यावरही निर्णय होईना. त्या चर्चेचा परिणाम नेहावर होऊ लागला. काल रात्री संजयचा फोन आला. घाबरला होता. आज सकाळी लवकरच हे त्याच्याकडे गेले. जेवायची वेळ झाली, तरी अजून पत्ता नाही…’

मालतीबाईंच्या मनात हा सारा क्रम सारखा येत होता. त्याचबरोबर मनात येणारा तो दुष्ट विचार अजून का जात नाही, याचीही चीड येत होती.
‘या उलट्या काळजाच्या मुलाच्या मदतीला कशाला जायचं? अर्थात, हा काही टिकणारा विचार नव्हता. तो लगेच गेला. शिवाय ह्यांनीही समजावून सांगितलं. म्हणाले, ‘भांडण तुझं सुनेशी आहे. पोराचं वागणं आपल्या दोघांनाही आवडत नाही, म्हणून तर आपण अलिप्तपणे वागतो. पण त्यात नेहाचा काय दोष? तिच्या आयुष्याचा प्रश्‍न आहे. कळूनदेखील ते असं उद्ध्वस्त होऊन द्यायचं का? इथे हुशारीपेक्षा अनुभवच कामास येतो. आपल्याला तिला वाचवायला हवं. तेव्हा असला विचार या वेळी करू नकोस…’
‘मला हे का कळत नाही? माझे गळणारे डोळे हेच नाही का सांगत? पण मग का हा दुष्ट विचार अजूनही मनात येतो?…’
घरासमोर रिक्षा थांबली. त्यातून नेहाला घेऊन महेशराव उतरले. तशा मालतीबाई घाईघाईनं पुढे गेल्या. नेहाला जवळ घेत हळूहळू घरात आणलं.
रात्री मुलं झोपल्यावर मालतीबाई व्हरांड्यात बसलेल्या महेशरावांकडे जाऊन म्हणाल्या, ‘‘तुम्ही गेलात म्हणून विषय संपला.’’
‘‘संपवायलाच हवा होता. मला राहवलंच नाही. नुसता गोंधळ. दरडावूनच संजयला म्हटलं, ‘तू जाऊन त्यांना हे लग्न होणार नाही, असं स्वच्छ सांगून ये. तू आल्यावर मी घरी जाईन. जाताना नेहाला बरोबर नेणार आहे.’’
‘‘तिथे बाचाबाची झाली असणार. हा तापट आहे ना.’’
‘‘बजावलं होतं. फक्त सांगायचं आणि निघून यायचं. तसंच केलं त्यानं. ते चरफडले. उघडे पडले ना!’’
‘‘वाचली पोर.’’
‘‘ ‘सगळं आम्हाला कळतं.’ काय कळलं? नीट चौकशी नाही, चारजणांशी बोलणं नाही.’’
‘‘बरं झालं झाडलं ते. अक्कल येईल आता.’’
‘‘तसं काही समजू नकोस. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. नेहाला बरी करून पाठवली, की आपलं काम झालं.’’
‘‘काम कसं संपेल? आाता तिच्या लग्नाचं तुम्हीच बघायला नको का?’’
‘‘तुला तसं वाटून, किंवा मी ठरवून का तसं होणार आहे? खोटी आशा धरू नकोस. काय होतं, याचे कमी का अनुभव आहेत आपल्यापाला?’’
‘‘जाऊदे तो विषय… माझ्या मनात दुपारपासून एक येतंय. सांगू का?’’
पत्नीचा स्वर आणि इतक्या शांतपणानं चाललेला संवाद ऐकून महेशरावांना आश्‍चर्य आणि बरंही वाटलं. घर जरा वेगळं भासलं. ते हसून म्हणाले, ‘‘सांग ना.’’
‘‘नेहा बरी होईपर्यंत व्यंकटला श्रीपादभाऊजींकडे पाठवूया का?’’
‘‘नको. तुझ्या मनात हा विचार का आलाय ते कळतंय मला. तरी पण नकोच असा विचार करायला. प्रत्येक घरात प्रश्‍न असतात. तपशिलात फरक. त्याच्या घरात प्रश्‍न होते म्हणून तो इकडे आला ना? इथल्या प्रश्‍नांसह तो आपल्या घरात रुळायला हवा. रुळेलही. शिवाय त्याची तुला सोबत होईल.’’
‘‘जबाबदारी टाळण्यासाठी मी नाही म्हणतेय.’’
‘‘माझ्याही मनात तसं नाही. शिवाय तो जाणार कुठे? श्रीपादच्या घरी त्याचे आई, वडील आहेत. वहिनींची आजारी आई आहे. दोन महिने तरी रेटू आपण.’’
‘‘हे सगळं माझ्या मनात या नेहामुळे आलं. तसा हा पोरही समजूतदार आहे. आज पूजा आपणहून त्यानं केली. तुम्ही सकाळी लवकर गेलात आणि माझं मनच बेचैन झालं. काही सुचेचना.’’
‘‘आपण हॉस्पिटलमध्ये जातो. काही केसेसमध्ये दुःख बघवत नाही. शेवट ठाऊक असतो. तरी पण आशादायी चित्र उभं करून आपण धीर देतो. अशा आशेनंही त्यांची मनं उभारी घेतात. ते सारं आपल्याला कळतं. अशातूनच आपण तिथे का जात असतो, याचं उत्तर मिळून जातं.’’
त्या रात्री दोघांनाही शांत झोप लागली.

नेहमीप्रमाणे दुसर्‍या रविवारी दुपारी चार वाजता सिव्हिल हॉस्पिटलमधल्या खोलीत ‘सुपंथ ग्रुप’ची बैठक सुरू होती. आज एक नवीन सभासद रुजू झाले होते. एकूण अकरा झाले. आठवड्याच्या कामांची वाटणी, त्यातली प्रत्येकाची ड्युटी, एकमेकांच्या सोयी बघून श्रीपादभाऊ ही कामं करत होते. हॉस्पिटलमध्ये पेशंटना फॉर्म भरून देणं, नेमक्या डिपार्टमेंटला पाठवणं, त्यांच्या वैयक्तिक अडचणी सोडवणं, पैशांची मदत करणं, रुग्णांपाशी बसणं, अशी अनेक कामं होती. गेल्या महिन्यापासून पंचवीस घरं अशी तयार केली होती, की ती एक वेळचं दोन माणसांचं जेवण देणारी होती. अर्थात, एक दिवस अगोदर त्यांना तशी कल्पना द्यायची होती. नवीन कल्पना सुचत होत्या. जसं जमेल, जेवढं झेपेल, तेवढं ही मंडळी आनंदानं करत होती. निवृत्तीनंतरच्या आयुष्यातला हा उत्साह इतरांबरोबर त्यांनाही अचंबित करून टाकत होता.
सगळी ठरलेली कामं संपल्यावर श्रीपादभाऊ उठले. उंच, गोरेपान, पांढर्‍याशुभ्र केसांचा सुबक भांग पाडलेले, सोनेरी काड्यांचा चष्मा, व्यवस्थित इनशर्ट केलेले हे भाऊ या ग्रुपचे लीडर म्हणून शोभत होते. त्यांनी समारोपात व्यंकटचा विषय मांडला.
‘‘ ‘एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या आपल्या ब्रीदवाक्याप्रमाणे कर्नाटकातल्या व्यंकट नावाच्या गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेतली आहे. सध्या तो महेशरावांकडे राहत आहे. त्याबद्दल त्यांचं प्रथम अभिनंदन करूया. दोन महिने तो तिथे राहील. हा आणखी एक नवा उपक्रम. अर्थात, सर्वांच्या संमतीनंच सुरू केलेला. इतर कामांसारखंच हेही काम आपण आपल्या आनंदासाठी करतोय, हे सूत्र कायम आहेच.’’

दोन आठवड्यांनंतरचा रविवार. सकाळचे साडेनऊ वाजलेले. दरवाजाची बेल वाजली. तशा मालतीबाई आतून बाहेर आल्या. दारात संजयएवढा एक तरुण उभा.
‘‘मी ईशानचे वडील. व्यंकटचे आजोबा आहेत?’’
‘‘हो, आहेत. अंघोळीला गेलेत. येतीलच इतक्यात. बसा.’’
‘व्यंकटचे आजोबा’ या शब्दांनीच बाईंना घेरून टाकलं. अजून त्याला येऊन दीड महिना व्हायचाय, तोच ही बिरुदावली चिकटली. त्याचा त्यांना खूप आनंद झाला, कारण तो पोरगा होताच तसा लाघवी. म्हणून तर सकाळी टूरवरून परतलेल्या बाबांबरोबर निघालेल्या नेहानं त्याला बरोबर आपल्या घरी नेलं. संजयपाशी तिनं तसा हट्टच धरला. या प्रसन्नतेतच त्यांनी पोहे करायला घेतले.
अंघोळीहून आलेल्या महेशरावांना त्या हळू आवाजात म्हणाल्या, ‘‘ईशानचे वडील आहेत. थांबवून घ्या. मी पोहे टाकलेत.’’
महेशराव बाहेर आले.
‘‘तुमचा व्यंकट चांगला मित्र झालाय ईशानचा. गट्टी आहे दोघांची.’’
‘तुमचा व्यंकट! दोन महिन्यांचा पाहुणा…’
महेशरावांच्या मनात हा विचार आला, पण त्यांनी तो बाजूला सारत मुद्द्याला हात घातला.
‘‘काय काम काढलंय?’’
‘‘ईशानच्या कॉलेजमध्ये गेलो होतो. देशमुखसरांना भेटलो. तुम्हाला ते ओळखतात.’’
‘‘खूप चांगली घरगुती ओळख आहे.’’
‘‘ईशानला बायॉलॉजीचा क्लास लावू का? आणि कोणता लावू? हे विचारलं.’’
‘‘काय म्हणाले ते?’’
‘‘लावा म्हणाले. क्लासध्ये करून घेतात आणि मुलं करतात. मी उद्या जाणार आहे. मनात आलं, व्यंकटचीही फी भरून यावं. देशमुखसरांनी त्याच्याबद्दल सगळं सांगितलंय. तुमच्या या कामात मलाही सहभागी होऊ द्या.’’
‘‘काही हरकत नाही. आमच्या ग्रुपनं त्याला दत्तक घेतलंय, असं म्हणा ना. श्रीपाद साने हे सगळं बघतात. त्यांची परवानगी घेतो आणि कळवतो. अगदी आजच.’’
‘‘यात माझाही स्वार्थ आहे.’’
‘‘स्वार्थ?’’
‘‘हो, स्वार्थ. त्याच्या नादानं आमचा ईशान सुधारेल. अभ्यासाची त्याला गोडी लागेल.’’
‘‘तुमचा ईशानही चांगला मुलगा आहे. सुरुवातीचे आठ दिवस तो याला त्याच्या डब्यातलं खायला द्यायचा. आम्हाला कल्पना नव्हती. कळल्यावर ही द्यायला लागली.’’
पोहे, चहाच्या सोबतीनं गप्पा मग चांगल्याच रंगल्या. शेवटी मालतीबाईही त्यात सामील झाल्या.

ईशानचे वडील गेल्यावर मालतीबाईंनी लगेच काळजीनं प्रश्‍न केला, ‘‘हा संजय व्यंकटला काही वेडंवाकडं तर बोलणार नाही ना?’’
‘‘नाही. तो नेहाला न्यायला सकाळी आला, त्याच वेळी त्याला तसं बोललोय. केवळ तिच्या तब्येतीकडे बघून मी पाठवतोय, असं बजावलंय.’’
‘‘बरं झालं, पण पोरीनं फारच मनाला लावून घेतलंय. अजून फारशी बोलत नाही. गप्प गप्पच असते. पूर्वीपेक्षा कमी आहे. तरी पण काळजी वाटते.’’
‘‘वाटणारच. मोठा घाव सोसलाय पोरीनं. तो भरून यायला वेळ लागेल. डॉक्टर म्हणतात, की गुंतवा तिला.’’
‘‘हल्ली ती व्यंकटबरोबर मंडईत जाते. शिवाय हा व्यंकट तिला अभ्यासातलं काही ना काही विचारत असतो.’’
‘‘चांगलं आहे. संवाद राहतो. तिचा रिझल्ट लागला, की एम.एस्सी.ला अ‍ॅडमिशन घेऊन टाक म्हणून मी संजयला सकाळीच सांगितलंय. पण या दोघांचं गूळपीठ कसं काय झालंय, याचं कोडं मला अजूनही उलगडत नाहीये.’’
‘‘त्यात काय अवघड आहे. त्याचा निरागसपणा तिला आवडतो. अहो, आज तो तिला बिशीबिळी भात करून दाखवणार होता. सगळी तयारी केली होती.’’
‘‘सकाळी तू त्याचा डबा करून देतेस, याचंच मला अजूनही आश्‍चर्य वाटतं.’’
‘‘अहो, कळलंच नाही मला. या ईशाननं याच्या दप्तरातला डबा काढून घेतला, तेव्हा लक्षात आलं. खूप वाईट झालं, पण हा पोर बोलला का? नंतर तरी कधी बोलला असता का? मुळीच नाही.’’
‘‘परिस्थिती शिकवते. म्हणून ही मुलं लहान वयात मोठी होतात.’’
‘‘तुम्ही नाही का सायकल दिलीत त्याला.’’
‘‘मला तरी कुठे ही गरज कळली आधी? शाळेतून येताना कुणाच्या तरी सायकलवरून डबलसीट बसून आलेला दिसला आणि मी दुरुस्तीला दिली.’’
‘‘पण आता हा जाणार. बोललाय तुम्ही त्याला.’‘
‘‘नाही. अवघडच आहे, पण पाठवायला हे हवंच. आपण थोडंच त्याला दीर्घकाळ ठेवून घेणार आहोत?’’
‘‘तेही खरंच म्हणा,’’ असं म्हणून मालतीबाई तिथून उठल्या आणि हा संवाद तिथेच थांबला.

‘‘आपल्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये छोटीशी का होईना, पण वेगळी जागा दिली, याबद्दल सिव्हिल सर्जनांचे आपण अभिनंदन करूया. त्यांनी त्यांच्या केबिनमध्ये आपणा सर्वांना बोलावून गुलाबाचं फूल दिलं आणि कॉफी. त्यांनी आपल्या कामाचं कौतुकही केलं. हा माणूस वेगळाच आहे. सिव्हिल हॉस्पिटलचं रूपच बदलवून टाकलंय त्यांनी. त्यांच्यासाठी हा पहिला पेग. चीअर्स!’’ मानेकाकांनी उत्साहातच ग्लासाला ग्लास भिडवत पार्टीची सुरुवात केली. आज त्यांच्या बंगल्यातल्या गच्चीवर सगळेजण जमले होते. महिन्यातून ते एकदा एकत्र जमत. असं मोकळं घर कधीतरी मिळतं. मग गप्पा आणि वेळ याला बंधनच नाही.
‘‘आपल्या ग्रुपला हे स्वरूप ज्यांनी दिलं, त्या श्रीपादभाऊंना हे सारं श्रेय जातं. तेव्हा त्यांच्यासाठी चीअर्स.’’ दीपक निलाख्यांनी ग्लास उंचावत सांगितलं. पार्टी कुठेही असो, अ‍ॅरेंज या निलाख्यांनी करायची, हे ठरलेलं.
‘‘मागच्या वर्षी या गच्चीवर आपण बसलो होतो. आठवतंय ना?’’
‘‘चांगलं आठवतंय. काल घरातले सगळे ट्रिपला गेलेत, लगेच मी चान्स घेतला. निलाख्यांना ताबडतोब कळवलं.’’ माने मिळालेल्या स्वातंत्र्याचा हक्क पूर्णपणे बजावत होते.
हॉस्पिटलमधल्या कामाची पावती देणार्‍या अनुभवांचे जो तो आपापल्या परीनं कथन करत होता. हे निवृत्तीचं आयुष्य यानं किती समृद्ध बनत चाललंय, याची जाणीव त्यातून ठिबकत होती. खरं म्हणजे प्रत्येकाची घरात होणारी कुचंबणा, किंवा अजूनही असलेले प्रश्‍न, याची एकमेकांना माहिती होती. पण ते सारं टाळून ही मंडळी जीवनातला शाश्‍वत आनंद शोधण्यात यशस्वी झाली होती. त्याचंच हे दर्शन होतं.
गप्पांतूनच रोख व्यंकटच्या केसकडे वळला. विषय निघाला तसे सर्व एकदम गप्प झाले. काहींच्या नजरा एकमेकांकडे वळल्या. तसा हातातला ग्लास टीपॉयवर ठेवत, थोडा वेळ थांबून माने सांगू लागले, ‘‘श्रीपादभाऊ, आम्ही सहाहीजण तुम्हाला कबूल केल्याप्रमाणे त्या व्यंकटला आमच्या घरी ठेवून घेऊ शकत नाही. आम्हालाली खूप वाईट वाटतंय. पण काय करणार? घरात शांतता राखायची असेल आणि आम्हाला सुखानं राहायचं असेल, तर मुला-सुनांविरुद्ध नाही वागता येणार. कारण त्याचं करावं त्यांनाच लागणार आहे.’’
‘‘हे मात्र खरं आणि करावं खूप लागतं. त्यात आपल्यापैकी तिघं एकटे आहेत.’’ महेशराव म्हणाले.
‘‘आणि आम्हा दोघांच्या बायका आजारी असतात.’’
पण त्यांना पुढे बोलू न देता माने म्हणाले, ‘‘कुणीही तपशील सांगू नका. सगळं सगळ्यांना माहीत आहे. घरं आमची आहेत. आमच्या नावावर आहेत, पण त्या आम्ही अर्थानं उपरे आहोत. यात समजून घ्या.’’
‘‘तुम्ही नका एवढं वाईट वाटून घेऊ. निघेल मार्ग.’’ श्रीपादभाऊ समजूत घालत म्हणाले.

‘‘भाऊ, आम्ही एक मार्ग काढलाय. माझ्या ओळखीच्या वसतिगृहात मी बोलून ठेवलंय. पूर्ण वर्षाचे आम्ही पैसे भरू. जेवणाची सोय लावून देऊ. जसे आपण हॉस्पिटलमध्ये जातो, तसे तिथे जाऊ. पण त्याचं शिक्षण पूर्ण करू. घरचं वातावरण त्याला मिळालं नाही, तरी हेतू साध्य करू. बघा, तुम्हाला पटतंय का?’’ मान्यांनी सगळ्यांच्या वतीनं प्रस्ताव मांडला.
‘‘अहो, न पटायला काय झालं मानेकाका. निर्णय परिस्थितीनुरूप घ्यायचे. शेवटी शिक्षण महत्त्वाचं. तुम्ही जसं मोकळे होऊन बोललात आणि त्याबरोबर जबाबदारीनं पर्याय सुचवलात, याचा खरा आनंद आहे. आपल्या ग्रुपचं ते बळ आहे.’’ श्रीपादभाऊंनी स्वतःचंही मन मोकळं केलं.
‘‘पाच वर्षं होतील या दिवाळीत आपल्या ग्रुपला.’’
विषयाला मिळालेल्या अशा कलाटणीनं परत हळूहळू गप्पांचा फड जमला. उशिरापर्यंत पार्टी चालली.
परतताना महेशच्या घरासमोरच्या कोपर्‍यावरच्या पानपट्टीवाल्याकडून सिगारेट घेतल्या आणि भाऊ बाजूच्या कट्ट्यावर बसले. वाटेत ते गप्प होते. उशीर झाला असला, तरी ज्या रीतीनं ते बसले, त्यावरून त्यांना काहीतरी बोलायचं आहे, हे जाणून महेशही सिगारेटचा आस्वाद घेत राहिला.
‘‘नेहा गेली घरी?’’
‘‘हो. चार दिवस झाले. संजयच्या घरातही बदल होतोय, असं वाटू लागलंय. अर्थात, त्याबद्दल खात्री कशी देणार?’’
‘‘तरी तुला हे मला सांगावं एवढं महत्त्वाचं वाटलं, हीसुद्धा खूप जमेची बाजू नाही का?’’
‘‘आहे तर.’’
‘‘विचार नेहमी असाच करावा. आपल्या सहा मित्रांच्या घरी जे स्वातंत्र्य नाही, ते तुझ्या घरी तुला आहे, याचं तुला आज भान आलं असेल.’’
‘‘होे. विषय साधा व्यंकटच्या दोन महिन्यांच्या राहण्याचा होता.’’
‘‘त्याचं महत्त्व जाणून घे. म्हणजे तू किती भाग्यवान आहेस हे कळेल.’’
‘‘खरं आहे.’’
‘‘मान्यांनी त्यांच्या सहाही घरांचा तपशील कुणाला सांगू दिला नाही. आपणा सर्वांना माहीत आहेच. तरी पण ज्या घरात आपण राहतोय, त्याबद्दल जाहीर वाच्यता त्यांनी टाळली.’’
‘‘आलं लक्षात मी कुठे चुकतोय ते. हिच्याबद्दल बोलताना मला कसं भान राहत नाही, याची मला आत्ता आठवण झाली.’’
‘‘मला सांग, वहिनी तुला यायला कितीही उशीर झाला, तरी जेवणासाठी वाट पाहत असतात. त्या घरचं सगळं बघतात, म्हणून तू निर्धास्तपणे बाहेर पडू शकतोस. छान स्वयंपाक करतात. तसा तू घरात काही बघत नाहीस. अगदी स्वतःचंदेखील.’’
‘‘खरं आहे हे. ही जाणीव या महिन्यात मला सतत होतीये. पश्‍चात्तापही होतोय.’’
‘‘कारण सांगशील?’’
‘‘हा व्यंकट! तो आल्यापासून मला घरातलं चित्रच वेगळं दिसायला लागलंय.’’
‘‘चित्र पूर्वीचंच पुढे सुरू आहे. बदललीये तुझी दृष्टी.’’
‘‘तसं असेल.’’
‘‘नाही, तसंच आहे.’’
‘‘अरे श्रीपाद, घरात इतकी कामं असतात, हे मला कुठे ठाऊक होतं? इतके दिवस एवढा संवाद तरी आमच्या दोघांत कुठे होता?’’
‘‘वाद, भांडणं?’’
‘‘ती होतात, पण अधूनमधून. पूर्वीसारखी रोज नाहीत.’’
‘‘आणि तुझं पिणं?’’
‘‘ते तुला माहीत आहेच. खूप नाही, पण थोडं कमी झालंय. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे, त्यावरून घरी आल्यावर जी बोलणी खायला लागायची, ती मात्र बंद झालीयेत.’’
‘‘का?’’
‘‘मी आल्यावर खरं ते सांगून टाकतो.’’
‘‘म्हणजे पूर्वी…’’
‘‘जाऊदे… खरं आणखी एक कारण आहे.’’
‘‘कोणतं?’’
‘‘या व्यंकटची ती सांगेल ती सगळी कामं मी करतो. अगदी मनापासून.’’
‘‘तू आत्मपरीक्षण करू लागलास, हे फार छान झालं. काही झालं तरी मी व्यंकटला वसतिगृहात पाठवणार नाही. तो शेवटचा उपाय. आमच्या घरी नेईन पण…’’
‘‘तुझ्या घरी मी त्याला पाठवणार नाही. तुझ्या घरातल्या अडचणी का मला माहीत नाहीत?’’
‘‘मग ठेवून घेतोस का तुझ्याकडे?’’
‘‘हो.’’
‘‘खरंच.’’
‘‘हो, अगदी खरं. आनंदानं. खरं म्हणजे आता तो गरजू नसून, आम्हा दोघांना तो हवा आहे.’’
‘‘छान! हेच मला हवं होतं.’’ हे म्हणताना श्रीपादचा गळा दाटून आला होता. ते महेशला जाणवलं.
‘‘तरीसुद्धा मी हिच्याशी बोलतो आणि तुला कळवतो.’’

श्रीपाद दिसेनाशा होईपर्यंत महेश तसाच उभा राहिला. मग हळूहळू तो घराकडे निघाला. बेल वाजवल्याबरोबर मालतीबाईंनी दार उघडलं.
अजून श्रीपादचा गदगदलेला चेहरा समोर असल्यामुळे महेशच्या सार्‍याच हालचालींत एक संथपणा होता. मालतीबाई त्यानं दचकल्या. त्यांनी स्वतःला कितीही आवर घालायचा प्रयत्न केला, तरी त्यात यश आलंच नाही. त्यांनी एकदम प्रश्‍न केला, ‘‘काय ठरवलंय व्यंकटंचं? पाठवणार?’’
‘‘तुला काय हवंय?’’
‘‘राहू दे त्याला इथेच. वर्षभर सांभाळू आपण.’’ त्यांनी नवर्‍याचे हात हातात घेत अगदी विनवत म्हटलं.
महेशरावांनी तिच्या हातावर थोपटत म्हटलं, ‘‘तसंच होईल.’’

– प्रकाश पाठक

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.