Now Reading
अफलातून… आई…

अफलातून… आई…

Menaka Prakashan

सायंकाळची वेळ असली, तरी अंधारून आलं होतं. ढग काळवंडले होते. संजीवनी या बाहेरच्या कल्लोळाला आतल्या शांततेनं अनुभवत होती. अशातच दारावर थाप ऐकू आल्यानं संजीवनीनं जाऊन दार उघडलं. दारात अश्विन दिसणं हे तिच्यासाठी अनपेक्षित होतं. तिच्या चेहर्‍यावर आपसूक आनंद दाटला.

‘‘आई, सरप्राईज द्यायचं म्हणून न कळवता आलो.’’ थोडंसं अवघडून, पण आनंदी चेहर्‍यानं अश्विन म्हणाला.
संजीवनीनं प्रसन्न चेहर्‍यानं स्मितहास्य केलं. इतक्या दिवसांत न झालेल्या भेटीत त्याच्या बाह्यस्वरूपात झालेला बदल शांतपणे टिपून घेतला.
‘‘जा, बॅग ठेव आणि फ्रेश हो आधी.’’ संजीवनी त्याला म्हणाली.
घरात आल्यावर तो बॅगेतून कपडे काढून बाथरूममध्ये गेला.
‘‘मी एकटीपुरताच स्वयंपाक करत होते. तुझ्यासाठी वाढवते रे.’’ संजीवनी म्हणाली.

‘‘काहीतरी हलकं कर आई. मला जास्त भूक नाहीये.’’ त्याचा आवाज आला. प्रवासाहून आला, की नेहमीचं त्याचं हे उत्तर ऐकून संजीवनीला हसू आले.
संजीवनी आणि अश्विन एकत्र जेवण करू लागले. आल्यापासून अश्विनला आपल्या आईच्या देहबोलीतला, वर्तवणुकीतला बदल स्पष्टपणे कळत होता. याचबरोबर व्यक्तिमत्त्वात आलेलं स्थैर्य त्याला जाणवत होतं. ‘आपण इतक्या दिवसांनी, तब्बल काही वर्षांनी आल्यावर घरातही बदल घडला आहे. घरात बरीच व्यक्तिमत्त्वविकासाची, स्वमदतीची पुस्तकं आली आहेत.’ अश्विनच्या मनात हळूहळू सर्व गोष्टींची नोंद होत होती. तिनं अश्विनला ख्यालीखुशाली विचारली, पण त्यात अश्विनबद्दलचा अति काळजीचा नव्हता.
जेवण झाल्यावर वरवरच्या गप्पा झाल्या आणि अश्विन प्रवासाच्या थकव्यानं लगेचच आडवा झाला. आई आणि मुलाच्या नात्यात पडलेल्या दरीमुळे अश्विन तिला तब्बल अडीच-तीन वर्षांनी भेटत होता. इतक्या वर्षांनंतर भेटून संजीवनी आनंदली होती, हे त्याला दिसत होतं. तरीही तिच्या आतला काहीतरी झालेला बदल त्याच्यापर्यंत पोचल्याशिवाय राहत नव्हता. त्याचं त्याला आश्चर्यही वाटत होतं.

दोन दिवस गेले आणि त्याला हा फरक प्रकर्षानं समजत गेला. दोन दिवसांत काही अट्टहास नाही, की काळजीपोटी अश्विनला काही बोलणं नाही.
‘‘आई, असं काय झालंय, की तू इतकी बदललीस?’’ अश्विननं अगदी न राहवून हा थेट प्रश्न विचारलाच. या वाक्यासरशी तिच्या चेहर्‍यावर मंद स्मित दाटलं. ती अश्विनच्या डोळ्यांत काही क्षण पाहत त्याला म्हणाली, ‘‘प्रेमानंच मी बदलले…’’
तसं अश्विन तिच्याकडे प्रश्नार्थकपणे आश्चर्यानं बघू लागला.

‘‘अरे, मी प्रेमापोटी बोलतेय. आई आहे मी तुझी. मला काळजी नाही वाटणार का याची?’’ अश्विनला परगावात नोकरी लागली आणि ती करण्यासाठी घर आणि गाव सोडून जाण्यापेक्षा इथेच काहीतरी बघ, असं संजीवनीचं मत होतं. ते त्याला मान्य नव्हतं आणि आईच्या अशा वागण्याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. इतरांच्या पालकांना मुलाबद्दल अशा वेळी अभिमान वाटला असता आणि आपली आई मात्र स्वार्थी विचार करतेय, अशी तुलना त्यानं मनोमन केली.
शेवटी अश्विननं खूप समजावल्यावर कशीबशी ती तयार झाली, पण संजीवनीला सतत त्याची काळजी वाटायची.
तो गावाला कधीतरी आला, तरी संजीवनी त्याची काळजी वाहायची. जेवणाच्या बाबतीत त्याच्या सवयींत बदल झाला होता. नोकरीनिमित्त बाहेर असल्यानं त्याला नीट काही खायलाप्यायला मिळत नसेल म्हणून संजीवनी त्याला सतत काही ना काही खाण्याचा आग्रह करायची. त्याच्याही नकळत त्याचं इतरांसोबतचं बोलणं ऐकून नंतर ती काहीतरी सल्ले द्यायची.
छोट्या छोट्या गोष्टींतली इतकी काळजी बघून त्याला भीती वाटायची. या अतिप्रेमाचाच अश्विनला त्रास होऊ लागला.
‘तुझं खाणं कमी झालं आहे. नीट जेवत नाहीस तू.’ नेहमीच्या अशा बोलण्याला कंटाळून एकदा अश्विननं चिडून म्हटलं,
‘‘तुझ्या या काळजी घेण्यानं मला बरं नाही वाटत, उलट त्याचा त्रास होतो. आणि माझ्याबद्दल विचार न करायला मी लहान नाही. सारखं सारखं काय आहे तुझं?’’
‘‘अरे, तुझ्याच चांगल्यासाठी सांगतेय ना?’’
‘‘मीही तेच सांगतोय, माझं चांगलं कळतं मला. मी लहान नाही.’’
अश्विनच्या या बोलण्यानं संजीवनीला वाईट वाटलं.
एके दिवशी संजीवनीनं येऊन अश्विनला प्रसाद दिला. त्यानं ‘कसला प्रसाद आहे,’ हे विचारलं, तेव्हा ती म्हणाली,
‘‘अरे, तुला नोकरीत प्रमोशन आणि पगारवाढ होण्यासाठी मी नवस केला होता.’’
‘‘तुझी पण ना कमाल आहे आई… कष्ट मी केले, त्या नवसानं काय होणार आहे.’’ त्यानं हसत म्हटलं.
‘‘देवावर विश्वास असला पाहिजे, त्याच्या मर्जीनं सगळं होतं.’’
‘‘बरं, तुझ्या मनाचं होऊ दे समाधान.’’
अश्विनचा मूड चांगला दिसतोय, हे बघून ती पुढे म्हणाली,
‘‘तुला पण एक छोटी गोष्ट करायचीये. तू चार शनिवार उपवास करणार, असंही मी बोलले होते.’’ यावर अश्विनच्या डोक्यात एक तिडीक येऊन गेली. पोटात भीतीची कळ आल्यासारखं झालं.
‘‘आई, तुला जो काही गोंधळ घालायचा आहे, त्यासाठी मी काहीच विरोध केला नाही. पण त्यात मी काही करण्याची तू अपेक्षाही करू नकोस.’’
अश्विन उद्वेगानं रागात म्हणून निघून गेला.
संजीवनीला एकदम रडू कोसळलं.

अश्विन मात्र या सगळ्याला कंटाळून गेला, ते नोकरी असणार्‍या शहरातून परत येईनाच. संजीवनीचे फोनही उचलेना. यामुळे ती दुःखात बुडाली. भर दिवसाही तासन्तास झोपू लागली. अश्विनने तिच्याशी संपर्क तोडल्यानं तिला आपल्या जगण्यातला अर्थ हरवल्यासारखं झालं. स्वप्नंही पुत्रवियोगाची पडू लागली. मन कोलमडल्याचा परिणाम तिच्या शरीरावरही झाला. काहीही करण्याचा तिचा उत्साह निघून गेला. तिच्या घराजवळ राहणार्‍या जवळच्या काही मैत्रिणींना ती आपलं दुःख वारंवार सांगून अश्रू ढाळू लागली.
‘‘तुमचाच मुलगा आहे तो, आईची किंमत कळाली, की येईल पुन्हा तुमच्याजवळ. काळ आणि वेळ बदलते. हेही दिवस बदलतील. पण तुम्ही असं कोलमडून जाऊ नका.’’ अनेकांनी तिला धीराचे शब्द दिले.

अश्विन भूतकाळातल्या प्रसंगांतून भानावर आला. ‘आईच्या अतिप्रेमानं आपल्याला असह्य झालं होतं, मग ती कसल्या प्रेमानं बदलली?’ त्याच्या मनात प्रश्न होताच.
संजीवनी सांगू लागली, ‘‘दीड वर्षापूर्वीची गोष्ट. एका व्यक्तीवर माझं प्रेम बसलं.’’ पुन्हा अश्विन थक्क झाला. आपण ऐकलं तसंच आणि तेही आपली आईच हे म्हणाली का, अशा नजरेनं तो स्तब्धपणे आईकडे बघू लागला.
‘‘मी एका व्यक्तीच्या प्रेमात पडले हेच म्हणाले मी. तू बारा वर्षांचा होतास रे, जेव्हा तुझे वडील गेले. या नैसर्गिक भावना दाबून टाकल्या म्हणजे त्या दबून राहतात का? मी ते उघडपणे सांगतेय इतकंच. आमच्या दोघांच्या बोलण्यातून त्याचंही माझ्यावर तितकंच प्रेम असल्याचं मला वाटलं. एकदा मी त्याला ते व्यक्त केलं, पण त्याला मी त्या अर्थानं आवडत नव्हतेच. मी हिरमुसले. मी त्याच्याशी संपर्क तोडला. पण तो मुद्दाम भेटून एकदा मला म्हणाला ‘माझ्याप्रति प्रेम व्यक्त करायला तुला अवघड गेलं असेल, तरीही तू ते व्यक्त केलंस. या गोष्टीचा मी आदर करतो. तू स्वतःशी प्रामाणिक आहेस. मनात जे आहे ते व्यक्त करणं चांगली गोष्ट आहे. तुझं माझ्यावर प्रेम असण्याला माझी काही ना नाही.’ त्याच्या या समजावण्यानं मी खुशालून गेले. एकदा मी त्याला म्हणाले, ‘तू अफलातून आहेस. तू सोबत नसूनही असं वाटतं, की तू सोबत आहेसच.’ ‘म्हणजे तुला असं म्हणायचं आहे, की मी तुझ्यातच आहे. पण हे कसं शक्य आहे? तू तर तूच आहेस. आणि जिथे तुला वाटतंय मी अफलातून आहे, ती भावना, तो भाग तुझाच आहे. मग याचा अर्थ तूच अफलातून नाहीस का?’ तो म्हणाला आणि मी खोलवर विचार करू लागले. कोणतीही एखादीच घटना आपल्याला बदलू शकते, याचा मला त्या दिवशी प्रत्यय आला. काहीतरी नवीनच उकल झाल्यासारखं मी याचा विचार करू लागले. दुसर्‍या दिवसापासून त्यानं सांगितलेले हे शब्द आठवताना असं वाटलं, खरंच सगळं आपल्या आतच आहे. शोध मात्र बाहेर सुरू आहे. जगातल्या प्रत्येक नातेसंबंधात हेच तर होत असतं. आपल्या आईसोबत राहता येत नाही, हा तुझासुद्धा त्रास होताच की.’’
आपल्या आईकडून इतकं मोठं तत्त्वज्ञान ऐकताना आणि उघडपणे व्यक्त होताना पाहून त्याला समाधान वाटत होतं.

काही क्षण शांततेत गेले. मग अश्विन म्हणाला, ‘‘बरोबर म्हणालीस तू आई. मी तुझ्यापासून लांब जाऊ लागलो, त्याचा मलाही त्रास होतच होता. पण जवळ असल्यावर माझ्या छोट्या छोट्या गोष्टींवर तुझं लक्ष ठेवणं, सारखं सारखं काळजी करत राहणं, याचीच मला चीड यायची. मला त्रास व्हायचा, भीती वाटायची. मी तुझ्याशी संपर्क तोडल्यावर मला शेजारच्या साठेकाकूंनी फोन करून ‘तुझी प्रकृती ठीक नाही, माझ्यामुळे तू दुःखी आहेस,’ असं सांगितलं. हे ऐकून तर मला जास्तच भीती वाटली. स्वतःबद्दल अपराधीपणाची भावना मनात निर्माण झाली. मी नंतर फोनवर बोलून तुला समजावलं, पण माझं तुला येऊन भेटण्याचं धाडस झालं नाही.’’

‘‘ते नंतर उमजत गेलं मला. अतिप्रेमामुळे मी तुझेच पंख छाटत होते, हे मला कळालं नाही. तू माझा मुलगा आहेस हे बरोबरच, पण मग सतत एक आई म्हणून तुझ्यावर अपेक्षा लादत राहायचं? माझं स्वतःचं काही आयुष्य आहे का नाही? एक आई म्हणून जगणं आणि तुझ्याकडून एका मुलाच्या अपेक्षा करणं, एवढंच माझं ध्येय आहे? माझं वैयक्तिक काही ध्येय आहे का नाही? ते अजून एका व्यक्तीवर प्रेम जडल्यावर कळालं. त्यानं मला स्वतःच्या आयुष्याचा अर्थ शोधण्यास भाग पाडलं. मला समजत गेलं, खूप काही आहे करण्यासारखं. एकुलता एक मुलगाच म्हणजे माझं सर्वस्व, हा मीच निर्माण केलेला एक भ्रम होता…’’
हे ऐकताना आपली आईच नक्की बोलतेय, का हा आपल्याला भास होतोय, असं अश्विनला पुन्हा पुन्हा वाटत होतं.
‘‘हो, हा भ्रम. मनानं निर्माण केलेल्या या दुःखातून मला बाहेर पडायचं होतं. माझी सगळी ऊर्जा मी तुझ्याबद्दल विचार करण्यात घालवत होते. आपल्या जवळच्या व्यक्तीशिवाय आपण अपूर्ण असतो, असं आपल्याला वाटतं. पण हे पूर्णत्व इतर गोष्टींतूनही मिळू शकतं. आपलं ध्येय, आपली स्वप्नं मोठी ठेवली, तर काही दु:खं आपोआप बाजूला पडून जातात बघ.’’
‘‘आई, कसलं स्वप्नं सापडलं तुला?’’ अश्विन अगदी स्थिरपणे आईकडे बघत म्हणाला.
संजीवनी म्हणाली, ‘‘फक्त आई हे नातं सोडून माझं अजून कुठलं ध्येय आहे, जे माझं आयुष्य उजळून टाकेल, हे शोधण्याचा मी प्रयत्न केला.’’ या वाक्यानं अश्विन अजूनच ‘आ’ वासून आपल्या आईकडे बघू लागला. ती पुढे बोलू लागली,
‘‘मी स्वतःचा दिनक्रम आखून घेतला. माझ्यासारख्या एकल असणार्‍या व्यक्तींचा गट बनवला. आठवड्यातला एक दिवस फक्त सामाजिक कामासाठी ठेवला. आपण इतरांसाठी काहीतरी करू लागलो, की आपोआप एक ऊर्जा मिळत राहते. ते करताना आपण आपल्या विचारांतून बाहेर पडून दुसर्‍यासाठी विचार करत असतो. हे करत असताना लक्षात येत गेलं, की अर्थपूर्ण आयुष्य जगणं सोपं आहे.’’

आपली आई स्वतंत्र झालेली पाहून त्याला स्वतःला मोठं स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटत गेलं.
काही क्षण अबोलपणे गेले.
संजीवनीची नजर एका जागी स्थिरावली आणि ती म्हणाली, ‘‘अनेक नाती जितकी घट्ट असतात, त्यात तितकीच पारतंत्र्याची एक बेडी असते. आई आपल्या मुलावर निरपेक्ष प्रेम करतेच, पण त्या प्रेमातही मुलावर एक पारतंत्र्यता लादली जाते. ती आपल्या मुलालाच सर्वस्व समजते, आणि यात ती आपलं स्वत्व विसरते. यात तिला कळतच नाही, ती स्वतःसाठी आणि मुलासाठीही एका बाजूला दुःखाचं संचितही साठवत राहते. यामुळेच आई गेल्यानंतर त्या आठवणी मुलाला वेदनेत आणि अश्रूंत नेतात. मी या नात्याच्याच माझ्यापुरत्या कक्षा बदलायच्या इतकं उत्तुंग स्वप्न पाहिलं आहे. माझ्या पश्चातही माझ्या येणार्‍या आठवणी सुंदर असाव्यात, त्यातून तुझ्या डोळ्यांत आनंदाश्रू ओघळावेत. मात्र त्या आठवणीत वेदना, पश्चात्ताप नसावा, यासाठी मीच प्रयत्न करायचं ठरवलंय. बघू, मी कशी निभावू शकते? ‘आय लव्ह यू, बट आय डोंट नीड यू…’ एकाच ओळीचं तत्त्वज्ञान, जिवापाड त्याचा मी सराव करतेय…’’
संजीवनी बोलून थांबली. आपल्या आईनं आपल्या आयुष्याला अशा पद्धतीचा शोधलेला अर्थ ऐकून अश्विनचे डोळे समाधानानं आणि आईच्या अभिमानानं ओले झाले.

– राहुल शिंदे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.