Now Reading
अनुभवांची शाळा

अनुभवांची शाळा

Menaka Prakashan

हसतमुख, बोलकी, सेल्स आणि मार्केटिंगमध्ये एमबीए केलेली प्रियांका आणि स्थिर, गंभीर, शांत सॉफ्टवेअर इंजिनीअर सूचक. असं हे एक लाघवी वर्‍हाडी जोडपं. आयटीत काम करणार्‍या या दोघांनाही स्वयंपाकाची प्रचंड आवड. नोकरी करता करताच पुण्यातल्या कोरेगाव पार्कसारख्या पॉश भागात त्यांनी ‘सावजी खमंग’ नावाचं एक हॉटेल उघडलं. मस्त चालायला लागलं. काही महिन्यांनी आयटीवाल्यांच्या हिंजवडीलाही एक नवीन हॉटेल त्यांनी सुरू केलं. सगळंच छान चाललं होतं. पण कोरोना आला आणि घरून काम करता करता ‘आपण नेमकं काय करतोय? कशा पद्धतीनं जगू पाहतोय?’ या विचारांनी पछाडलेल्या दोघांनी बघता बघता नावाजलेली आपली दोन्ही हॉटेल्स बंद केली. आणि कोकणात, निसर्गाच्या सान्निध्यात, जास्तीत जास्त पर्यावरणवादी होत पुढचं आयुष्य जगण्याचा निर्धार केला. त्यांचा हा प्रवास त्यांच्याच शब्दांत…

गेल्या तीन महिन्यांत प्रियांका आणि मी अगदी पराकोटीचा प्रवास केला. प्रवासात बरेच वेगवेगळे अनुभव आले. इथे सगळे अनुभव मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. इथे असलेले सगळे अनुभव अगदी खरे आणि आमच्यासोबत जसे घडले, अगदी तसेच लिहून काढले आहेत. यात वर्णन केलेल्या वेगवेगळ्या लोकांना आम्ही गेल्या तीन महिन्यांत भेटलो आहोत. त्यांच्या अनुभवांतून आम्ही खूप शिकलो आहोत.

प्रारंभ
कोरोना. लोकांना २०२० अगोदर हा शब्द ऐकला, की मनात लाडू फुटायला लागायचे, कारण तोपर्यंत हा शब्द फक्त बियरसाठी वापरला जातो, हेच माहिती होतं. २०२० या वर्षात हा लाडू धपकन फुटला.
असो. ‘वर्क फ्रॉम होम’ हा नवीन पण तात्पुरता असा पर्याय आम्हा आयटीवाल्यांना मिळाला. सुरुवातीला याचा आनंद होऊनही तो किती काळ टिकला, हा मुद्दा वेगळाच. याच काळात आम्ही आमच्या मुंबईच्या घरी जाऊन काम करायचं ठरवलं. कितीही बाहेर राहिलो, तरी आपल्या जन्मभूमीत परत येण्याची मजा काही वेगळीच.
परेश आणि अपेक्षा, माझ्या शाळेतली ओळख. आमच्या घराजवळच या जोडप्याचं घर, पण तरीही फार काळानंतर आम्ही भेटलो. माझा स्वभाव थोडासा गंभीर, किंवा पहिल्या भेटीत समोरच्याला न समजण्यासारखा आणि त्याच्या विरुद्ध प्रियांकाचा स्वभाव. म्हणतात ना, अपोझिट अ‍ॅट्रॅक्ट, आमचं काही असंच झालं असणार. आम्ही लग्नबंधनात अडकलो. प्रियांकाच्या उत्साही आणि स्वागतप्रिय स्वभावामुळे परेश-अपेक्षा आमच्या आयुष्यात आले. अपेक्षानं तर असंही म्हटलं, ‘प्रियांकाच आम्हाला आमच्या शाळेतली मैत्रीण वाटते.’ असो, मला वाईट वाटायचं काहीच कारण नाही, कारण ‘हिर्‍याची पारख फक्त जोहरीला’.
कॉर्पोरेटमधून निवृत्ती आणि निसर्गात राहण्याची ओढ ही आम्हा दोघांना अगोदरपासूनच होती. एक दिवस परेश-अपेक्षाशी बोलताना लक्षात आलं, की कोकणात जागा घेतली तर? कोकणच्या सौंदर्याची तुलना इतक्या सहज इतर कुठल्याही जागेशी करता येणार नाही, हे आम्हाला गेल्या इतक्या वर्षांच्या प्रवासात नक्कीच कळलं होतं.
त्यामुळे आमच्या इम्पेशंट वृत्तीनं स्थिर वृत्तीवर मात करत पुढच्या पंधरा मिनिटांतच ठरवलं, की ‘वर्क फ्रॉम होम’चा फायदा करून घ्यायचा आणि आपल्याला हवी असलेली जागा कोकणात मिळवायची.

रत्नागिरी
२८ नोव्हेंबर २०२० आम्ही चौघं रत्नागिरीत पोचलो. पुन्हा लॉकडाऊन लागणार, या भीतीनं जितक्या लवकर कोकणात जाता येईल तितक्या लवकरचा ॅन आम्ही केला. रत्नागिरी तसं शहरच. चौघांनाही एखाद्या गावात मातीच्या घरात राहण्याची इच्छा होती, पण कुठून तरी सुरुवात करावी म्हणून अपेक्षाच्या ओळखीनं रत्नागिरी शहरात नको असूनसुद्धा आम्ही एक रो हाऊस भाड्यानं घेतलं. सुरुवातीचे दोन आठवडे स्वतःला अ‍ॅडजस्ट करण्यातच गेले आणि मग हळूहळू आम्ही तिथे रमलो.
अपेक्षानं तिच्या ओळखीमधल्या होत्या नव्हत्या त्या सगळ्यांना फोन करून ‘आम्ही जागा शोधतोय,’ असं कळवलं होतं.
अजून एक आठवडा गेल्यानंतर वाटायला लागलं, की जर काँक्रीट जंगलातच राहायचं, तर पुणे, किंवा मुंबईचं घर काय वाईट! सुरुवातीला जागा बघण्याचा कार्यक्रम हासुद्धा फार क्वचितच होत होता. रात्री उशिरापर्यंत (म्हणजे जास्तीत जास्त दहा वाजेपर्यंत) बोलत बसणं, बॅडमिंटन खेळणं, परेशनं चुलीवर भाजलेले काजू खाणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रियांकानं गाडी शिकणं हे झालं.
अचानक हे सगळं करताना परेशला त्याच्या गावी काम निघालं आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला.

माजळ, लांजा आम्ही परेशच्या गावी पोचलो.
सुंदर कौलारू घर, समोर बरंच मोठं अंगण, शेणानं सारवलेली पडवी, अंगणात एका बाजूला तुळस, दुसर्‍या बाजूला पारिजात आणि जास्वंदाचं झाड. त्यावर चेरी ऑन द केक म्हणजे घराच्या मागे असलेलं भलमोठं फणसाचं झाड. इतकं मोठं, की त्याच्या फांद्यांनी पूर्ण घरच वेढलेलं होतं. पहिल्या पंधरा मिनिटांत तर आम्ही दोघं ते पाहून फार भारावून गेलो. ठरलं तर, मग इथेच थाट मांडायचा आणि जितकं शक्य असेल तितके दिवस इथेच राहायचं.
परेशला गावी असलेलं काम म्हणजे त्यांना बोरवेल पाडून घ्यायची होती. आमच्यासाठी ती गोष्टसुद्धा नवीनच, म्हणून ती सगळी प्रोसेस जाणून घेण्याचं कुतूहल होतंच. अगदी दोनच दिवसांनी तो भलामोठा ट्रक आत घेऊन बोर पाडणारी माणसं तिथे पोचली. त्यामधले कॉन्ट्रॅक्ट घेणारे तावडे हे परेशच्या नात्यातलेच. जमिनीतलं पाणी शोधणं आणि माणसांकडून बोर पाडून घेणं, हे त्यांचं काम.
जमिनीतलं पाणी शोधणं? काय थट्टा चालली आहे? तरी, ही काय जादू आहे, हे पाहण्यासाठी आम्ही तिथेच उभे राहिलो. मग तावडेबाबा हातात नारळ घेऊन काहीतरी मंत्र पुटपुटत सगळीकडे फिरू लागले. काही मिनिटांतच तो नारळ त्यांच्या हातावर सरळ उभा राहिला आणि ते पाहून आमचं तोंड उघडंच राहिलं.

जे दिसतंय ते खरंच आहे का, हे पाहण्याच्या उद्देशानं प्रियांका आणि मी स्वतः हातात नारळ घेतला. आम्ही आमच्या आयटीमधले काही मंत्र पुटपुटत तावडे यांनी जे केलं, तसं करण्याचा प्रयत्न केला आणि बघतो तर काय, नारळ खरंच हातावर उभा राहिला. प्रियांका आणि मी एकमेकांच्या तोंडाकडे बघतच राहिलो. आमची आयटीची तल्लख बुद्धी तरीही अ‍ॅक्सेप्ट करायला तयार नव्हती, पण निसर्गापुढे कुणाचं चाललंय, ते आमच्यासारख्या साधारण माणसांचं चालणार!! शेवटी या अनुभवामुळे, निसर्गात बरंच काही शिकण्यासारखं आणि कुतूहल आहे, हे आमच्या बुद्धीनं मानलं.
बोर झाली, अगदी एकशे पाच फुटांवर पाणी लागलं.

अजून एक गमतीदार किस्सा आठवतो. सुरुवातीला त्या कौलारू घरात रात्री झोपताना प्रियांकाला कसला तरी आवाज यायचा. कसला आवाज काहीच माहीत नव्हतं. पण मी आपला ढाराढूर झोपायचो. असंच एका रात्री तिनं मला उठवून सांगितलं, की बाहेर कुणीतरी घराभोवती फेरी मारतंय. मी झोपेतच ‘कोण आहे रे तिकडे’ असं म्हटलं आणि परत झोपलो. काही वेळानं प्रियांका स्वतः पाहण्यासाठी उठली, तर कळलं की हा सगळा आवाज रात्री उंदीरमामा करत होते. मग सकाळी हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर रात्रीच्या भुताचा आणि चोराचा विचार करून आम्ही खूप हसलो.
कोकणात आल्यापासून फक्त रस्त्यावर एखादा लहान साप दिसेपर्यंतच आमची मजल होती.
आम्ही परेशच्या मामाला भेटायला गेलो होतो. त्यांच्या अंगणात लाकडाचे लहान तुकडे उन्हात वाळवायला ठेवले होते. या पूर्ण प्रवासात आमच्यासाठी सगळंच नवीन होतं. ‘हे काय आहे? कशासाठी आहे?’ यावर, ‘‘याला ‘गरुडवेल’ म्हणतात, हे घनदाट जंगलात सापडतं. ते तुमच्या खिशात ठेवलं, तर साप तुमच्या जवळ येत नाही,’’ असं मामांनी सांगितलं.
नारळ हातावर उभा राहण्याचा हा धक्का अजून होताच, त्यामुळे मामांनी सांगितलेली गोष्ट आम्ही निमूटपणे ऐकली. विश्वास ठेवून आम्ही आमच्यासाठीही थोडी गरुडवेल बरोबर घेतली.

सकाळी उठून फिरायला जंगलात जाणं, येताना चुलीसाठी लाकडं आणणं, संध्याकाळी काम संपलं, की गावातल्या मुलांबरोबर क्रिकेट खेळायला जाणं, हे सगळं सुरू होतं. त्यातच अचानक माझ्या गालावर एक पुरळ उठलं. दिसायला अगदी भयंकर आणि दोनच दिवसांत त्यात पू भरला. आता हे काय नवीन, हा प्रश्न पडला. मला नागीण अगोदर होऊन गेली होती, त्यामुळे बहुधा तेच असेल, असं वाटलं. पण गावात काही लोकांनी बघितल्यानंतर ते म्हणाले, की कोळी चावला बहुतेक. कोळ्याचं कोष्टक हा माझा सगळ्यात मोठा शत्रू. गावात चालताना मला त्याचा खूप त्रास व्हायचा. असो, हे सगळं होत असताना आम्ही अ‍ॅलोपॅथी सोडलं असल्यामुळे आयुर्वेदिक औषध शोधायला लागलो. मग तांदूळ आणि दूर्वा एकत्र वरवंट्यावर वाटून त्याची पेस्ट बनवून पुरळावर लावली. तीन-चार दिवसांतच आराम पडला. आपल्या आयुर्वेदात खरंच खूप ताकद आहे, पण तरीही आपण त्याचा वापर करत नाही.

अजून एक किस्सा आठवतो तो म्हणजे, असंच एकदा सकाळी फिरायला जात असताना एक भलामोठा पक्षी दिसला. मोठी पिवळी चोच, पांढरे आणि काळे पंख. नशिबानं गावातले गृहस्थ आम्हाला दिसले. त्यांनी सांगितलं, ‘‘हा गरुड आहे.’’ आमच्या कपाळावर आठ्या पडल्या, कारण शाळेत फोटोत बघितलेला गरुड आणि काकांनी दाखवलेला गरुड यात खूप फरक होता. मग गूगलदेवीवर सर्च केल्यानंतर कळलं, की हा ‘धनेश’ होता. इंग्लिशमध्ये ‘हॉर्नबिल’. लक्षात घ्या मी ‘गुगलदेवी’ म्हटलं, कारण एखाद्या पुरुषाकडे इतक्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असणं शक्यच नाही.

रोजचा दिवस नवनवीन गोष्टी शिकवत होता. आपण किती अजाण आहोत, आयुष्यात काहीच शिकलो नाही, याची जाणीवही करून देत होता. अगदी लहानसहान गोष्टी म्हणजे, फुलांचा गजरा कसा बनवायचा, खराटा झाडू नारळाच्या झावळ्यांपासून बनतो आणि तो कसा बनवायचा, ते अगदी पुस्तक वाचण्याची चांगली सवय सुद्धा लागली. याचसोबत धनेश, घुबड, मोर, किंगफिशर, रानकोंबडी, कोतवाल, बुलबुल इतर सुंदर पक्षी, कोल्हे, मुंगूस, मोठमोठाले गावठी डुक्कर, कांदेचोर, यांसारखे निरनिराळे प्राणीसुद्धा आम्ही बघितले. आठवड्यातून एकदा घरात शेण सारवणंही शिकलो.
असाच एक दिवस मी पडवीत ऑफिसचं काम करत होतो आणि अचानक प्रियांकाचा आवाज आला. ती मला बाहेर बोलावत होती आणि बाहेर जातो तर काय, सहा फूट लांब आणि जाडजूड असा, आम्ही राहत होतो त्या अंगणातून बाहेर पडणारा साप मला दिसला. त्या वेळेला मात्र तोंडचं पाणी पळालं आणि मामांची गरुडवेल आठवली.
आता वेळ होती परेश-अपेक्षाला मुंबईत परतायची. ऑफिसचं काम निघालं होतं. पण आमचा प्रवास असाच सुरू राहणार होता. फरक फक्त इतकाच, की आम्हाला कुणाची साथ नसणार होती. पण एवढं खरं, की कोकणाची खरी ओळख आणि गावात राहण्याची सोय या सगळ्या गोष्टी आम्हाला फारच उपयोगात येणार होत्या.

प्रथमेश ऊर्फ बाबू- परेशच्या काकांचा मुलगा, ओंकार त्यांचा शेजारी. आमची चांगलीच गट्टी जमली होती. या दोघांबरोबर मग जंगलात फिरणं, घरी छोटीशी पार्टी करणं, या सगळ्या गोष्टी आम्हाला ऑफिसच्या कामासोबत करायला मिळत होत्या. बाबू आमच्यासोबत बराच फिरला. देवगड, सावंतवाडी अशा ठिकाणी आम्ही जिथे भेट दिली काहीतरी शिकण्याच्या नादात, त्या ठिकाणी बाबूची कंपनी आम्हाला होतीच.
या सगळ्या गोष्टींबरोबरच हळूहळू शेती हा विषयसुद्धा आम्ही समजण्याचा प्रयत्न करत होतो. कार्पोरेट जगातून निवृत्ती घेतल्यानंतर सुखासमाधानानं आत्मनिर्भर पद्धतीनं जगता यावं म्हणून शेती शिकावी, असं वाटलं.
बाबूचे आई-बाबा हळूहळू आमच्यापाशी मोकळे व्हायला लागले. मग त्यांनाच आम्ही विचारलं, ‘‘शेती शिकवाल का?’’ त्यांनी अगदी प्रश्नार्थक चेहर्‍यानं आमच्याकडे पाहिलं. कदाचित त्यांना वाटलं असेल, की शेतीत काय शिकण्यासारखं आहे, किंवा यांना काही वेड लागलंय, शेती शिकायचं म्हणतात. पण त्यांनी आम्हाला ‘शिकवीन’ असं म्हणताच आम्ही खूष झालो. आमच्या शेतगुरूंना आम्हीच अट दिली, की रासायनिक नको आणि त्यांनी ती लगेच मान्य केली. अशा रीतीनं आमचं पहिलं पाऊल शेतीत पडलं. मग नांगरणी, पेरणी या सगळ्या गोष्टी केल्या. पेरणीनंतर लहानसा कोंब कधी बाहेर येईल, याची आतुरता तर काही वेगळीच होती. हे सगळं काकींनी अगदी सहजपणे त्यांच्या शेतात आम्हाला शिकवलं.

आम्ही अगदी शेतात जाऊन भाज्या काढून आणत होतो. आयुष्यात ज्या भाज्यांची नावं ऐकली नाहीत अशा भाज्या खात होतो. हे सगळं सुरू असताना एक दिवस बाबू थोडा विचित्रपणे वागताना दिसला. विचारपूस केल्यानंतर कळलं, की तो आत्ताच त्याच्या काजूच्या बागेत फवारणी करून आलाय. अगदी धक्काच बसला. फवारणी केल्यानं शेतकर्‍याला इतका त्रास होतोय. तर मग हे युरिया, एन्डोसल्फान वगैरे रसायन आपल्या शरीरात काय करत असतील? आणि हे बघून त्या रात्री प्रियांका अस्वस्थ होती आणि तिचा, आमचं ‘सावजी खमंग’ रेस्तराँ बंद करण्याचा निर्णय नक्की झाला.

याच काळात आम्ही ‘जीवो जीवस्य जीवनम्’ असं सांगणार्‍या सुभाष पाळेकरसरांना आणि अन्नशास्त्रात प्रावीण्य मिळवणार्‍या राजीव दीक्षित यांना ऐकायला सुरुवात केली होती. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा जिवंत नमुना आम्ही पाहत होतो. या सगळ्या बुद्धिजीवी लोकांनी जे सांगितलं, ते अगदी बरोबर आहे आणि आपण एखाद्या अजाणतेपणाच्या जगात जगतोय, हे लक्षात आलं. हे सगळे अनुभव आम्हाला सुखकारकपेक्षा अगदी हलवून ठेवणारे होते.
सावंतवाडी, मिठबाव, आंबोली प्रवास सुरू होताच आणि या खडतर प्रवासात एकीकडे नवनवीन गोष्टी उलगडत होत्या. जंगली प्राणी, किडे या सगळ्यांबरोबर जगणं हे अगदी आमच्या पुण्या-मुंबईपेक्षा विरुद्ध होतं. तितकं सोपं नव्हतं. हे सगळं करत असताना आम्ही अजूनही काही समविचारी लोकांना भेटायचा प्रयत्न केला. त्यापैकी एक म्हणजे वर्षाआंटी, आंबोलीमधल्या. योग पारंगत आहेत. त्यांच्याकडे वर्षानुवर्षं परदेशी विद्यार्थ्यांपासून अनेकांचा ओघ असतो. त्यांच्याशी चर्चा करत असताना, त्यांचं एक वाक्य माझ्या डोक्यात घर करून बसलं. त्या म्हणाल्या, ‘‘माणसांची भीती वाटते, जनावरांची नाही.’’
असो. प्रियांका देवगडमधल्या मिठबावची. लग्नानंतर कधी अशी वेळच आली नाही, की तिच्या गावाला आम्हाला जावं लागेल. मला वाटतं, याचं मूळ कारण म्हणजे सगळे नातेसंबंधी कोकणात नसून, शहरांमध्ये आले होते. पण कोकणात आल्यानंतर ही गोष्ट काही कळली नाही, की देवानं निसर्गाचा खजिना देऊनही इथली माणसं पुण्या-मुंबईसारख्या शहराकडे कामाच्या शोधात का पळतात?
कोकणात आल्यामुळे प्रियांकाच्या गावाला जायचं ठरलं. बरं झालं, मी प्रियांकाच्या सांगण्यावरून तयार झालो. मिठबाव, अगदी समुद्रालगत वसलेलं एक गाव. या गावाचं सौंदर्य मोजणं, किंवा ते कागदावर उतरवणं हे माझ्यासारख्या नवशिक्याला तर अगदी अशक्यच. पण एखाद्या स्वप्नातली जागा, अगदी स्वच्छ, कौलारू घर, नारळाच्या आणि सुपारीच्या बागा, पारदर्शक समुद्राचं पाणी आणि निसर्गानं घातलेली पांढर्‍या वाळूची चादर. आहाहा! शब्दच अपुरे पडतील! अशा या गावातली प्रियांका. आयुष्यभर रागावणार आहे मी तिच्यावर, कारण इतक्या उशिरा तिनं मला तिच्या गावी नेलं.
पुढचा प्रवास होता सावंतवाडीचा. खरोखर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात खूप फरक आहे, हे जाणवत होतं. जागा, तिथली बोली, तिथले लोक, यातला फरक प्रकर्षानं कळून येत होता. सावंतवाडीत आम्ही तीन दिवस होतो. थोड्या जागा बघितल्या, पण मुंबई-पुण्याहून फार दूर होईल, यामुळे परतलो.

पुणे, सोलापूर, मुंबई
अचानक भावाचा साखरपुडा आहे, असं कळलं. त्यामुळे पुन्हा जाणं गरजेचं होतं. थोडं नकोसं वाटत होतं, पण आपण कर्मसंन्यासी नाही, हे जाणवलं. पुण्यात पोचलो आणि आपण घरी न येता कुठेतरी भलत्याच ठिकाणी आलोय, जिथे फार गर्दी आहे, आवाज आहे, गोंधळ आहे, असं वाटत होतं. दोन दिवस आराम करून सोलापूरला निघालो. तिथे भेटायचं होतं भांगेसरांना आणि पाहायची होती त्यांची तीन गुंठा शेती.
ठरल्या दिवशी भांगेसरांच्या घरी पोचलो. अगदी शेताच्या मध्यभागी त्यांचं घर होतं. सुरुवातीच्या भेटी झाल्यावर आमची चर्चा सुरू झाली. ‘आम्ही जगातलं सगळ्यात श्रीमंत कुटुंब आहोत.’ सरांच्या या एका वाक्यात बरंच काही दडलेल होतं. शेती आणि झाडं यांना श्रीमंती समजणारी ही वेगळीच व्यक्ती होती. पुढे त्यांची शेती, राहत असलेलं घर पाहिल्यानंतर, त्या शेतात बसून त्यांच्या आईनं बनवलेलं स्वादिष्ट जेवण जेवल्यानंतर त्यांच्या वाक्याचा अर्थ कळला.
इथेच आम्ही पहिल्यांदा लाल भेंडी, घेवड्याची एकशे दहा फूट लांब वेल पाहिली, जमिनीला मिठी मारलेल्या चिंचेच्या झाडाच्या चिंचा पाहिल्या. केळीच्या झाडावर केळीचा घड इतका मोठा होता, की त्याला आंब्याच्या झाडाबरोबर दोरीनं बांधावं लागलं होतं.
आतापर्यंत जवळपास पूर्ण कोकणपट्टा आम्ही पालथा घातला होता आणि उरला होता तो फक्त दापोलीजवळचा भाग.

कुडावळे, दापोली
उत्कृष्ट लेखिका आणि ज्या आमच्या गो-टू पर्सन आहेत अशा सुजाता राय काकी यांचा शेजारधर्म आम्हाला पुण्यात लाभलाय. त्यांच्याकडून आम्ही बरंच काही शिकलोय. आयुष्याला एका वेगळ्या नजरेनं पाहायला त्या आम्हाला शिकवत आहेत. अंबोलीच्या ज्या वर्षाआंटीबद्दल मी उल्लेख केला होता, त्यांच्या या मोठ्या बहीण.
आमचा आत्तापर्यंतचा प्रवास आणि भेटलेल्या लोकांच्या अनुभवांतून आम्हाला आमच्या आयुष्यातलं पुढचं गणित हळूहळू उमजलं आहे. सुजाताकाकींचा यात खूप मोठा वाटा आहे. एकदा त्यांच्याशी बोलत असताना प्रियांकानं सांगितलं, की ‘आम्ही कोकणात जागा बघतोय.’ तर त्यांनी लगेच ‘‘तुम्ही जोशी फूड प्रॉडक्ट्सचे मालक शिरीष जोशी यांच्याशी बोला,’’ असं सांगितलं, ‘‘ते माझे चांगले परिचित आहेत आणि ते नक्की मदत करतील.’’
शिरीष जोशी हे पुण्यातलं मोठं नावं. आम्ही लगेच त्यांना फोन केला आणि आमची पूर्ण कथा सांगितली. जोशीकाकांनी सुद्धा लगेच विनायक श्रीकृष्ण महाजन हे नाव उच्चारलं. ते दापोलीत शेतकर्‍यांसाठी काम करतात, असं सांगितलं. अर्थात, हे महाजन कोण, हे आम्हाला काहीच माहीत नव्हतं. पण नंतर जे उलगडलं, ते पाहून आम्ही किती नशीबवान आहोत, हे कळलं.

महाजनकाकांशी फोनवर बोलून आम्ही लगेच कुडावळे-दापोलीचा रस्ता धरला. तिथे पोचत असताना आसपासचा परिसर पाहून प्रियांकाच्या आणि माझ्या मनात अचानक विचार आला, की इथेच आपलं नवीन घरटं व्हावं. ही जागा अगदी मुंबई-पुण्यापासून जवळ आहे, त्यामुळे ते गणितसुद्धा जुळत होतं.
इथे पोचताना आम्हाला अजून एक नवीन अनुभव आला, तो म्हणजे चकवा. रस्ता मला माहीत नव्हताच, पण आम्ही पंधरा किलोमीटर जवळ असताना जवळपास पंचवीस किलोमीटरचा चकवा आम्हाला लागला आणि आम्ही फिरून फिरून पुन्हा त्याच ठिकाणी येऊन पोचलो. अगदी नवलच!
महाजनकाका हे नाव पूर्ण दापोलीत शेतकर्‍यांमध्ये प्रसिद्ध आहे. वयाची पासष्ट वर्षं पूर्ण होऊनही एखाद्या तरुणासारखा हा माणूस पायात चप्पल न घालता गेली चोवीस वर्षं शेतकर्‍यांसाठी झटतोय. शेतकरी का आत्महत्या करतो? शेती का मागे राहिली? असे सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि तेही अगदी कोणत्याही पुरस्काराची, किंवा कसलीही अपेक्षा न ठेवता. अशा माणसाच्या सहवासात वेळ घालवणं, हे आमचं भाग्यच. काकांसोबत थोड्या वेळात बरंच काही शिकायला मिळतं. अशी आमची दापोलीमधली यात्रा सुरू झाली.

काकांनी त्यांच्या जागेत असणारं एक लहानसं घर आम्हाला राहण्यासाठी दिलं आणि मग प्रियांकाचं पुन्हा घराला घरपण आणण्याचं काम सुरू झालं. तिथेच कुणीतरी मला म्हणालं, ‘वेड्याला वेडी भेटली आहे. ते अगदी बरोबरच.’
इथेच आम्ही दगडाचा बांध कसा घातला जातो, जागेची मोजणी कशी केली जाते, हे सगळं शिकलो. राहण्याची जागा गावापासून दोन किलोमीटर लांब. आजूबाजूला जंगल आणि मधे घर. इथे पहिल्याच आठवड्यात आम्ही इतके किडे, पाली, साप, विंचू पाहिले, की आता आपल्याला इथे राहता येईल का, हा प्रश्न पडला. आम्ही आमचं अंथरूणसुद्धा यामुळे गाडीत ठेवत होतो. मग दुसरा प्रश्न यायचा, की रात्री झोपताना ते सगळं गाडीतून परत घरात आणायचं आणि ते पण रात्रीच्या लख्ख काळोखात. पण हळूहळू सवय झाली आणि मग काळोखाची, किंवा किडे-मुंग्याची भीती संपली. वर्षाआंटीच्या म्हणण्याची प्रचिती आली.
असं सगळं सुरू असताना आमच्यासारख्या उनाड मुलांमध्ये काकांनी काय पाहिलं कुणास ठाऊक, की त्यांनी त्यांचा शेजारी होण्याचा पर्याय आम्हाला दिला. यासाठी आम्ही त्यांचे आयुष्यभर आभारी राहू.

– प्रियांका आणि सूचक

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.