Now Reading
अनुबंध

अनुबंध

Menaka Prakashan

‘विविध वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होणारी माझी पत्रं तुला आवडतात. ती प्रसिद्ध होतात, त्याचा तुला आनंद आणि अभिमानही वाटत असे. तेव्हा तू नेहमी म्हणायचीस, ‘आता मोठे लेख लिही…’ आता मी मोठे लेख लिहायला लागले… दिवाळी अंकातही ते छापून यायला लागलेत… अर्थात सुधारायला खूपच वाव आहे. तू असतीस तर…’ हा संवाद माझा आजीशी कायम सुरू असतो. काही चांगलं झालं तरी, किंवा वाईट झालं तरी. या संवादात आजोबाही सामील असतात… वीस वर्षं झाली आजीला जाऊन, पण तशीच्या तशी ती आठवतेय. बारीक, सडसडीत. संध्याकाळ झाली, की आरशासमोर उभी राहून केस नीट करणार, मग गंगावन लावणार, त्यानंतर अंबाडा. कानांजवळच्या केसांना काजळी हवीच. तिचं अशाप्रकारे तयार होण्याचं मला नेहमीच कौतुकमिश्रित नवल वाटायचं.

शेक्सपिअर म्हणून गेलेत, की नावात काय आहे…? पण नाव हीच तुमची ओळख असते. ही माझी ओळख मला आजीनंच दिली… नाव देऊन – निरुता. पुढे पुढे हे वेगळं नाव ऐकून लोक त्याचा अर्थही विचारू लागले.
हा शब्द तिला तिच्या ‘ज्ञानेश्वरी’त भेटला आणि माझी ओळख देऊन गेला.

(तोचि तो निरुता । समदृष्टी तत्वता ।
हरि म्हणे पंडुसुता । तोचि ब्रह्म ॥ १०४)
अध्याय पाचवा ज्ञानेश्वरी

माझ्या आजीचा (कमलिनी पाध्ये) जन्म १९ फेब्रुवारी १९२१ चा. मुंबईत दादरस्थित पाध्ये कुटुंब अत्यंत संपन्न स्थितीतलं. त्या काळी हे कुटुंब चांदीच्या ताटं-वाट्यांत जेवायचं. त्या काळी त्यांना फिरायला न्यायला बग्गी यायची. ही बग्गी बाकीच्यांसाठी स्वप्नवतच असे. कमल धरून ही सर्व सात भावंडं. चार बहिणी, मोठी ताई, नंतर आजी, बेबी आणि शेंडेफळ म्हणजे भानू. त्या काळी मुलींनी शाळेत जाणं काहीसं अप्रचलितच, पण या सर्व बहिणी शिकल्या. आजी त्या काळची जी.ए. म्हणजे आत्ताची बी.ए. शिक्षणाची आवड तिच्यात, तिच्याच आईकडून आली. तिला तीन भावंडं रामचंद्र, प्रभाकर आणि प्रकाश. रामचंद्र (तात्या) त्या वेळचा रेडिओ इंजिनीअर झालेला. प्रकाश एम.एस्सी. आणि प्रभाकर म्हणजेच लेखक भाऊ पाध्ये. कालौघात या तीन भावंडांपैकी कुणीच घराण्याचं ऐश्वर्य टिकवू शकलं नाही. आता तर दादरची पाध्येवाडी नावालाच उरलीये.

माझी आजी सर्वार्थानंच पुढारलेली, कारण त्या काळी म्हणजेच १९४२ साली आजी प्रेमविवाह करू शकली. तेही सर्वसंमतीनं. त्यांच्याच शेजारी काकांकडे राहणारा रामचंद्र बापट हा एक कोकणामधला तरतरीत, जिद्दीचा आणि कष्टाळू तरुण. शिक्षणासाठी काकांकडे येऊन राहिलेला. काकांकडे त्याचं कष्टप्रद जीवनच सुरू होतं. आजोबांचा मुक्काम घरच्या गॅलरीत असे. पोट भरण्याची वानवा. म्हणून स्वतःच्या शिक्षणाबरोबर शिकवण्या घेत. त्यांची हलाखीची परिस्थिती पाहून माय-लेकी दुःखी होत. मग त्यांच्यासाठी जेवण नेऊन देत. कैक वेळेस कपडेही देत असत. कालांतरानं आजोबा हेमराजवाडीत राहायला गेले (हेमराजवाडी, गिरगांव). त्यांच्याबरोबरच बंडू गोरे (मृणाल गोरेंचे यजमान), करमरकर हे त्यांचे मित्रही होते. तिथे गेल्यावर आजी-आजोबा दोघांना एकमेकांविषयीच्या भावनांची जाणीव झाली. आजीचा या धडपड्या मुलावर विश्वास होताच आणि पुढे तो सर्वार्थानं सार्थही ठरला.
आजोबांनी शून्यातून स्वतःचं विश्व उभं केलं. त्या सर्वात त्यांना आजीची कायमच साथ मिळाली. शैला आणि शुभा या मुलींच्या जन्मानंतर तिनं ती करत असलेली नोकरी सोडली. आजोबांनी डबघाईला आलेल्या ‘गुडविल कंपनी’ला सोनेरी दिवस दाखवले.

‘गुडविल कंपनी’तर्फे त्यांनी माहीममध्ये बिल्डिंगही बांधली. आपल्या सर्व मित्रांना विम्याची रक्कम भरून घर घेण्याची व्यवस्था केली. आजही स्ट्रक्चरल रिपेअर नसलेली ती इमारत उभी आहे. नंतर नंतरच्या काळात आजी, ‘‘आपल्या मुलींसाठीही घरं ठेवायला हवी होती,’’ असं वारंवार म्हणायची.
आजीचा मैत्रीण परिवार बराच मोठा. कृष्णाताई जोशी ही तिची मैत्रीण ‘वाङ्मय विकास मंडळा’ची अध्यक्ष. त्यांनी आजीला या संस्थेमध्ये ओढलं. मंडळातर्फे दादरच्या ‘वनिता समाजा’मध्ये निरनिराळे सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रम होत. त्यात ती खूप गुंतून गेली.
आजीची दुसरी खास मैत्रीण म्हणजे लीलाताई पुरंदरे. अतिशय हुशार. या लीलाताईमुळे ती ‘ज्ञानेश्वरी’कडे वळली. लीलाताई तिला आणि तिच्या मैत्रिणींना ‘ज्ञानेश्वरी’ समजावून सांगत.
‘वाचनाचा नाद मला लहानपणापासूनच होता. नंतर नंतर वाचनाची दिशा ठरत गेली. कोणत्या पुस्तकांचा संग्रह हवा ते आपसूकच ठरत गेलं. आपण एकत्र असताना तुझ्या ज्ञानेश्वरी ज्ञानाचा मी उपयोग करून घ्यायला हवा होता. एकत्र चर्चा करायला माझ्याकडे त्या वेळेस प्रगल्भता नव्हती. ते क्षण निघून गेले. आता आईशी विविध विषयांवर, मग त्यामध्ये अध्यात्मही येतंच, चर्चा होते.’

आजोबा गेल्यानंतर मी आजीसोबत काही वर्षं राहिले होते, तेव्हा तिनं मोठ्या कौतुकानं वाङ्मय मंडळाच्या मैत्रिणींना भेटवायला नेलं होतं. वर्तमानपत्रांत पत्रं यायला लागली होती. त्यातली काही मी मंडळात वाचून दाखवली. सर्व मैत्रिणींनी मिळून मला बक्षिसीही दिली होती.
आजीच्या दोन्ही मुली शैक्षणिकदृष्ट्या खूप उंचीवर पोचल्या. डॉ. शैला (माझी आई) वैज्ञानिक आहे. तिच्या नावावर तीन पेटंट्स आणि पन्नासहून अधिक पेपर्सही आहेत. तिची दुसरी मुलगी शुभा एम.ए. झाली. ती बँकेत चांगल्या हुद्द्यावर होती. ती एम.ए.ला विद्यापीठात दुसरी आली होती.
आई माझ्या वेळी गरोदर असताना काही चुकांमुळे मला बरीच वर्षं त्रास झाला. या चुकीचं ओझं आयुष्यभर आजीनंच वाहिलं. ते दिवस कुटुंबासाठी अवघड होते. जेव्हा डॉक्टरांकडे जायचं असेल, तेव्हा तेव्हा आजी कायम आमच्याबरोबर असे. डॉ. करमरकर आणि डॉ. कांगो हे आजोबांचेच मित्र, त्यामुळे घरच्यासारखेच होते.
त्या काळात आम्ही घर शोधत होतो. त्यादरम्यान आम्ही आजीच्याच घरी राहत होतो. खूप छान दिवस होते ते. आजी-आजोबांचा सहवास खूप लाभला. मावशी खूप खेळवत असे.

आजीच्या हाताला जात्याच छान चव होती. जेवण जरासं गोडसरच असायचं तिचं. नारळाच्या दुधाच्या आमट्या ही तिची खासियत. तिनं शेवटपर्यंत मिक्सर वापरला नाही. डावीकडची हिरवी चटणी ती पाट्यावर वाटलेली, त्याची चव अफलातून असायची. आमटीला लागणारं नारळाचं दूध ती पाट्यावर वाटे. जेवण गरमच असलं पाहिजे, यावर तिचा कटाक्ष असायचा. हे गरम प्रकरण इतकं, की ताटावर बसेस्तोवर गॅस सुरू असायचा. आजोबा पानावर येऊन बसायचे आणि वाढलं नसेल, तर ‘घास-लेट’ असं वाटी वाजवत म्हणायचे. गरम फुलके म्हणजे तव्यावरून थेट पानातच! लहान असताना पीठीसाखर-तूप फुलक्यांबरोबर खाणं मला नेहमी आवडायचं. (आईमध्ये गरम जेवणाचं आणि नारळाच्या दुधाच्या आमट्या करणं, हे उतरलंय.)

तिची देवपूजा हे मोठं प्रस्थ होतं. ती चालेही दोन तास. रोज गुरुवारी संध्याकाळी दत्ताची आणि साईंची आरती करे. ज्ञानेश्वरांचं नेवासे आणि शिर्डी ही तिची श्रद्धास्थानं होती. आम्ही सर्वजण नेवासेला गेलो होतो, तेव्हा समाधीची आणि इतर जागा मला तिनं उत्साहानं दाखवल्या होत्या. ती शेवटपर्यंत सिटीलाईटला भाजीला जायची. चतुर्मास ती नेहमीच पाळायची. चतुर्मास समाप्ती बटाटेवड्यांनी होत असे. कोथिंबीर आणि आलं-मिरची वाटून केलेले वडे चविष्ट होत असत. आम्ही सर्व मिळून वड्यांवर ताव मारत असू. साट्याच्या पदर सुटलेल्या करंज्या ही तिची आणि माझ्या आईची स्पेशालिटी. या करंज्या करणं म्हणजे खूप जिकरीचं. पूर्ण दिवस यात जात असे. दिवाळीच्या दिवसांत आजी आमच्याकडे यायची. मग एक खोली करंज्यांसाठीची जागजुमा एकत्र करून गप्पा मारत मारत करंज्या कार्यक्रम पार पडत असे. आजोबा तिला सोडायला आणि न्यायला येत. अजूनही करंज्या करण्याचा दिवस असला, की सर्व आठवणींचा पट समोर उभा राहतो. तिला बाहेर हॉटेलमध्ये सर्वांना खिलवायला खूप आवडायचं. तिथे मिळणारे सर्व पदार्थ ती मागवायची. स्वतः जास्त खायची नाही, मग तो पदार्थ इतरांच्या पानात जात असे.

आजीच्या नातेवाइकांचा गोतावळा खूप मोठा. आजीचा कुणावरही विश्वास पटकन बसायचा, पटकन कौतुकही करायची आणि तितक्याच गतीनं कुणालाही तोडून टाकायची. स्वरूपानंद स्वामींवर तिची नितांत श्रद्धा. तेही पाहुणचारासाठी घरी मुक्कामाला येत. (स्वामी असून त्यांचा योग्य तो पाहुणचार आणि बडदास्त ठेवावी लागे, याचं मला कायम आश्चर्य वाटत राहिलंय.) आजी मात्र हा पाहुणचार आनंदानं करत असे. त्यांची एक शिष्या नीता ही आजीकडे वास्तव्याला होती. ठरावीक वेळेस दूध, फळं, ध्यानासाठी खोली अशा स्वरूपाचा पाहुणचार असायचा. त्यांना कुठे जायचं असल्यास वाहनाची सोय इतर भाविक करत.
ज्योतिषशास्त्रावर तिचा विश्वास. माझी मावशी कर्करोगानं आजारी होती. त्या सुमारास आजी शाहू मोडकांकडे तिच्याबाबत विचारायला गेली होती. अर्थात, त्यांचा होरा अचूक ठरला. माझ्या बाबतीतसुद्धा ती अनेक ज्योतिष्यांना विचारायची. माझं लग्न कुणा एका पत्रकाराशी होणार, असं तिला बर्‍याच जणांनी सांगितलं होतं.
माझ्या बालपणीच्या काळाला ती स्वतःला दोषी मानत असे. हा सल तिच्यामधून कधीच गेला नाही. तिच्या घराजवळच माझ्या होमिओपॅथीच्या डॉक्टरांचा दवाखाना होता. मला तिथपर्यंत जायला लागू नये म्हणून तीच माझं औषध घेऊन मला अर्ध्या वाटेवर भेटत असे. माझ्यामधला आत्मविश्वास वाढावा, असं तिला नेहमी वाटत असे.

चंदेरी हा वस्त्रप्रकार हा फक्त आजीसाठीच बनवला गेला आहे, असं मला कायम वाटत आलंय. चंदेरी साड्यांमधले सर्व रंग तिच्या कपाटात होते. गिरगावातून तिचा खास चंदेरीवाला घरी येत असे. त्याच्याकडे मात्र अफलातून साड्यांचे रंग असत. मग सुशेगातपणे साड्यांचं प्रदर्शन आणि खरेदी होई. तिचा चंदेरीवाला यायच्या दिवशी ती आम्हाला आणि तिच्या मैत्रिणींनाही बोलावत असे. अशा वेळेला मस्त खाण्याचा बेत असे.
‘आजी’ म्हटलं, की नकळत आठवतो तो आजीचा बटवा. माझ्या आजीच्या बटव्यात एकच रामबाण औषध होतं. ते म्हणजे ‘कुटजारिष्ट’ हे औषध ती सर्वांनाच सुचवत असे. तिला स्वतःला मधुमेहाचा त्रास होता, पण आवडीच्या खाण्यावर तिनं बंधनं कधीच घातली नाहीत. तिला आणि आजोबांना आंबे खूप आवडत. खरंतर मधुमेहाची औषधं वेळेवर आणि नियमितपणे घ्यायची असतात, पण तिनं हे नियम कधीच पाळले नाहीत.

वर्तमानपत्रांमधून चालू घडामोडींविषयी जाणून घ्यायला तिला आवडे. तसंच मराठी मालिकाही ती नेहमी बघत असे. त्यावर चर्चा करायला फोनही होत असे. शुभामावशीला कर्करोगाचं निदान झालं. तो मोठा आघात आजी-आजोबांच्या उतारवयात होता. त्या काळी (१९८५) कर्करोगावर प्रगत उपचार नव्हते. मावशी जसलोक हॉस्पिटलला होती, तेव्हा आजी आणि माझी आई दिवस ठरवून तिला डबा पाठवायच्या. तो डबा आजोबा घेऊन जात असत. हॉस्पिटलमधून मावशी आजीच्या घरी विश्रांतीला आली, तेव्हा मी जात असे. त्या प्रसंगीही आजी, मावशीला मला काय खायला दे, हे सांगून ठेवायची.
शुभाचा- तिच्या मुलीचा- कर्करोगानं तरुण वयातच मृत्यू झाला. ते दुःख केवळ तिच्या आध्यात्मिक बैठकीमुळे ती पचवू शकली. शुभाचं लग्न प्रेमविवाह पद्धतीनं झालेलं. पण ती गेल्यानंतर चार वर्षांनी तिच्या नवर्‍यानं दुसरी चूल मांडली. हाही आघात आजीनं पचवला.
आजीला घरचा मदतनीस म्हणून राधा कायम हाताशी असे. तसंच तुकाराम हा नावाप्रमाणेच संत होता. या दोघांवर खरंतर स्वतंत्र लेख होऊ शकतील. माझ्या वाढदिवसाला ती कायम श्‍लोकरूपी संदेश लिहून देत असे. मी त्याची नेहमी आतुरतेनं वाट पाही.

शिक्षणानंतर मला नोकरी मिळत नव्हती. तिनं तोही प्रश्‍न शेजारच्या सुबोध सप्रे यांच्याशी बोलून सोडवला. मी त्यांच्या कार्यालयात जायला लागले.
‘२००१ साली आई-बाबा अमेरिकेत माझ्या बहिणीकडे गेले होते. मी एकटी माझ्या घरी आणि तू एकटी तुझ्या घरी. मग एकत्र का राहिलो नाही आपण? आजही मला त्याची खंत वाटते. तुम्ही सर्व भारत फिरलात, पण आजोबांना सिंगापूरला जायचं होतं. तेही राहिलंच. त्याचीही बोच आहेच मनात. तुझं मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्याचं घाटत होतं. कधी नव्हे ते तू आमच्या घरी राहायला यायचं कबूल केलं होतंस. तू अधेमधे यायचीस, पण फार राहिली नाहीसच कधी. जिद्दीनं एकटीच राहिलीस आणि मनासारखी जगलीस. कारण मोतीबिंदूचं ऑपरेशन व्हायच्या अगोदरच, किंवा आमच्याकडे यायच्या आधीच तू दूर निघून गेलीस.’

– निरुता भाटवडेकर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.