Now Reading
अनार की चुडीयाँ

अनार की चुडीयाँ

Menaka Prakashan

डब्यात खुळ्ळऽऽ असा आवाज होताच तिनं डोळे उघडले. कळकटलेल्या गोणपाटावर पत्र्याचा डबा ठेवलेला होता. त्यात आणखी एक नाणं येऊन पडलं होतं. तिनं सुरकुतल्या हातांनी हळूच डबा उचलला. तळहातावर रिकामा केला. पंधरा नाणी होती. ‘किमान पंधरा रुपये तरी!’ तिनं मनाशी म्हटलं. डबा होता तसा गोणपाटावर ठेवला. दुसर्‍या हातानं कमरेला खोचलेली कापडाची पिशवी काढली. हातातली नाणी त्यात ओतली. पिशवी पुन्हा कमरेला लावून तिनं डोळे मिटून घेतले. थकल्या शरीराला कमरेचं ते छोटंसं ओझं गोड लागत होतं.

भोसले वाड्यामागच्या उकिरड्यातून ती पाय रेटत चालत होती. शरीर साथ देत नव्हतं. पावला-दोन पावलांवर ती खाली वाकून हाताला लागलेली वस्तू चाचपडून बघत होती. तिच्या मऊ झालेल्या डोळ्यांना स्पर्शाची सोबत लागायचीच. हाताला हवं ते लागलं, की ते पाठीवरच्या पिशवीत पडायचं. ती पिशवी घेऊन चालू लागली, की त्या पाठीवरून तारा-झाकणा-बिल्ल्यांचा किण्ऽऽ किण्ऽऽ असा आवाज यायचा.
गुप्ता रोज संध्याकाळी नौशाद आईस्क्रीमवाल्याच्या शेजारी वडापावची गाडी लावायचा. ती दररोज रात्री तिथे जायची. गुप्ता तिला दोन वडापाव द्यायचा. कधी जोडीला एखादी भजी. ती जमिनीवर गोणपाट टाकून खायला बसली, की स्वतःहून पाण्याचा एक ग्लास तिच्यासमोर ठेवायचा. जेवून झालं, की ती स्वीटी बिअर बारसमोर जायची. दुकानांच्या रांगेत शेवटाला एक वापरात नसलेली मुतारी होती. तिनं कुणाच्या तरी मदतीनं मोठा ायचा तुकडा टाकून मुतारीची जमीन आच्छादून टाकली होती. तिनं तिथे कोपर्‍यात एक जुनं खोकडं, दोन गोधड्या, चार-दोन कपडे, काही फुटकळ भांडी, सिमेंट लावून वापरात आणलेला माठ, देवाची तसबीर, एक रया गेलेला आरसा असं किरकोळ सामान ठेवलं होतं.

ती आत आली. पाठीवरच्या पिशवीतला सगळा ऐवज कोपर्‍यात ठेवून दिला. कपड्यांच्या पिशवीतून एक कानटोपी काढून घातली. खाली गोधडी अंथरली, दुसरी अंगावर घेतली. कमरेची पैशांची पिशवी गोधडीखाली सरकवली आणि तीन भिंतीच्या मुतारीत ती आकाशाखाली झोपी गेली.
रात्रीचं चांदणं तिला पहाटेपर्यंत कुरवाळत राहिलं.
ती पहाटेच उठली. बोचरा बारा तिच्या हाडांमध्ये शिरू पाहत होता. ती तशीच हळूहळू पावलं टाकत बिअर बारजवळ गेली. तिथे काम करणार्‍या किस्नानं नेहमीच्या ठिकाणी तिच्यासाठी चार रिकाम्या बाटल्या ठेवल्या होत्या. तिनं त्या उचलून आत आणल्या. चौकातल्या नळातून दोन बाटल्या पाणी भरून माठात ओतलं. चहाच्या गाड्यावरचा चहा ती फुरक्या मारत प्यायली.
सूर्य वर आला.
ती मंदगतीनं पावलं टाकत चालली होती. पाठीवरच्या पिशवीतून किणकिणीसोबत काचेच्या बाटल्यांचा एकमेकांवर हळूच आदळल्याचा आवाज येत होता. ती भंगारवाल्याच्या दुकानात शिरली. पिशवीतला माल तराजूत तोलला गेला. हातात आलेली चिल्लर कमरेच्या पिशवीत गेली.
ती पुन्हा चालू लागली.

मुनीरभाईंनी अगरबत्ती लावली. चंदनाचा सुगंध दुकानात दरवळला. पांढर्‍या केसांवरून हात फिरवत त्यांनी नोकराला आवाज दिला. तो पुण्याहून आणलेला मालाचा नवा बॉक्स घेऊन आला. मुनीरभाईंनी त्यातला बांगड्यांचा नवा-कोरा सेट देवासमोर ठेवला. हात जोडून अल्लातालाकडे दुआ मागितली. मग त्यांचं लक्ष समोरच्या बांगड्यांकडे गेलं. डोळ्यांची कड ओलसर झाली.
तेवढ्यात ती हळूहळू पावलं टाकत मुनीरभाईंच्या काऊंटरजवळ आली.
‘‘ए क्या है सुबह सुबह?’’
त्यांचा नोकर ओरडत पुढे झाला. तसं मुनीरभाईंनी शांतपणे त्याला हातानंच रोखलं. तिनं निर्लेपपणे कमरेच्या पिशवीतली नाणी काऊंटरवर ओतली. मुनीरभाईंनी नेहमीप्रमाणे नाणी मोजली. एक रुपयाची पन्नास नाणी! त्यातली पाच माघारी करून त्यांनी सगळी नाणी ड्रॉव्हरमधल्या वाट्यांमध्ये टाकली. पन्नासची एक नोट काढून तिच्यासमोर धरली. तिनं ती घेतली. दोन्ही हात छातीशी जोडून नमस्कार केला. रोजच्यासारखं काचेमागे ठेवलेल्या त्या डाळिंबी रंगाच्या बांगड्यांच्या सेटकडे एकवार पाहिलं आणि ती चालू लागली.
ती दर दोन-चार दिवसांनी मुनीरभाईंच्या दुकानावर सुटे पैसे घेऊन यायची आणि ते तिला चिल्लरच्या बदल्यात नोट द्यायचे. खूप दिवसांपूर्वी ती जेव्हा प्रथमच दुकानात आली होती, तेव्हा ती काचेमागच्या त्याच बांगड्यांकडे पाहत उभी राहिली.
‘‘ये अनार की चुडीयाँ हैं। चाहिए? पर थोडी महंगी है।’’ मुनीरभाई आवाजात शक्य तितका नम्रपणा ठेवत म्हणाले.
‘‘कितने की हैं?’’ तिनं विचारलं. त्यांनी किंमत सांगितली. ती काही न बोलता निघून गेली.

दुसर्‍या दिवसापासून ती सुटे पैसे घेऊन दुकानात यायला लागली. ती दरवेळी पैसे घेऊन जाताना त्या बांगड्यांकडे काही क्षण पाहत राही. मग आपल्या वाटेनं निघून जाई. मुनीरभाईंना तिचं ते तसं पाहणं फार वेगळं वाटे. एकदा त्यांनी तिला त्या बांगड्यांमधल्या चार बांगड्या काढून देऊ केल्या, पण तिनं त्या घेतल्या नाहीत.
मुनीरभाईंच्या दुकानातून निघाली, की ती गणपतीच्या देवळाजवळ पत्र्याचा डबा घेऊन बसे. थोड्या वेळानं ती एसटी स्टँडवर जाई. दुपारी वाटीत जमलेले पैसे घेऊन ती रावराणेची खानावळ गाठे. त्यानं उरलेलं-शिळंपाकं असं काहीबाही काढून ठेवलेलं असे. ते घेऊन ती बागेबाहेरच्या फुटपाथवर जाई. तिथे झाडाखाली जेवण करे. मग गावातल्या उकिरड्यांवर, रस्त्यांवर फिरे. पाठीवरची पिशवी जड होईस्तोवर शोधाशोध करी. संध्याकाळी महालक्ष्मीच्या देवळापुढे विसावे. रात्री गुप्ताकडे वडापाव खाई. गोधडी ओढून झोपून जाई. मग पहाटे उठल्यावर बारच्या बाहेरच्या त्या बाटल्या. चौकातला नळ. माठात पाणी. गाड्यावरचा चहा. भंगारवाल्याकडे फेरी. तिचा हा दिनक्रम ठरून गेलेला.

आज सकाळी तिला बरं वाटत नव्हतं, पण मन उत्साहित होतं. भंगारवाल्याकडून बाहेर पडल्यानंतर जरा जास्तच.
ती दुकानात पोचली. मुनीरभाई अद्याप आले नव्हते. नोकर पुढे झाला.
‘‘फिर आ गई? बडी धिट है! चल आगे जा!’’
ती तशीच उभी राहिली.
‘‘अरे, जा ना!’’ तो चिडला.
‘‘वो चुडी चाहिए!’’ तिनं बोट दाखवलं.
‘‘बोला ना आगे जा।’’
‘‘खरीदनी हैं।’’
‘‘बडी आई खरीदने! अभी तो बोहनी भी नही हुई। सुबह सुबह भिकारीयों को माल बेचें क्या? चल निकल!’’
मऊ डोळ्यांत रुतून बसलेली बांगड्यांची लालसर-डाळिंबी झाक घेऊन ती पाय खरडत निघून गेली.

मुनीरभाईंनी दुरून पाहिलं, तेव्हा ती म्हातारी दुकानाबाहेर निघत होती. नोकराचे हात जोरजोरात हलत होते. ‘तो नक्कीच काहीतरी अद्वातद्वा बोलला असणार.’ ते वयाला झेपेल तेवढ्या वेगानं चालत दुकानात आले.
‘‘क्या हुआ?’’
‘‘कुछ नहीं। ये अनार की चुडीयाँ खरीदनी हैं कह रही थी।’’
‘‘तो?’’
‘‘अजी, इन भिकारीयों के पास इतने पैसे कहाँ? बाहर निकालता तो लेकर उड जाती। आप भी उसे आने मत दिया करो।’’
मुनीरभाई काही बोलले नाहीत. इतर वेळी त्यांनी त्याला समजावलं असतं, पण आज त्यांचं कशातच लक्ष नव्हतं. ते उदास चेहर्‍यानं काऊंटरवर बसून राहिले. घरी अम्मीची खालावलेली तब्येत त्यांना अस्वस्थ करत होती. ते लहान असताना अम्मी त्यांना म्हणायची, ‘देख मुनीर, हम लोगों से अच्छे से पेश आए तो उनकी ढेर सारी दुआ मिलती है। हर किसी का दिल चुडीसा होता है। तोडना आसान हैं, पर संभालना मुश्कील!’ असं म्हणून ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवायची. तेव्हा तिच्या डाळिंबी रंगाच्या बांगड्या मुनीरच्या अगदी कानांजवळून किणकिणत जायच्या. तो नाद त्यांच्या मनाला मिठी मारून बसला होता. अम्मीची तब्येत खालावल्यापासून ती मिठी जरा जास्तच घट्ट झाली होती. तशातच नेहमी दुकानात येणार्‍या त्या म्हातारीला असं पिटाळून लावलेलं त्यांच्या मनाला सलू लागलं. त्यांनी काचेआडच्या बांगड्यांचा सेट एका पिशवीत भरला आणि ते चालू पडले.

‘‘इसे अनार की चुडीयाँ क्यों कहते हैं अम्मी?’’
‘‘क्योंकी ये इन अनार के दानो जैसी लाल जो है।’’ अम्मी त्याला अनार सोलून देत म्हणाली.
‘‘तो क्या इस में अनार का रस मिलाया जाता हैं?’’
‘‘तो फिर! अनार से ही तो बनती है ये चुडीयाँ!’’
अम्मीच्या वाक्यासरशी मुनीरचे डोळे आश्चर्यानं मोठे झाले होते. अम्मी पदर तोंडाला लावून खुदकन हसली होती.

मुनीरभाई पेठेतल्या रस्त्यानं चालत होते. पिशवीतल्या बांगड्यांचा किण्ऽ किण्ऽऽ आवाज होत होता. तो नेहमीच व्हायचा. अम्मी भांडी धुताना, खोबरं किसताना, ओले कपडे झटकताना. मग त्या किणकिणीला कंटाळून ती कधीतरी बांगडीची पिन लावून त्या बांगड्यांना बांधून ठेवायची. आवाज बंद व्हायचा, पण मुनीरला त्या मुक्या बांगड्या आवडायच्या नाहीत. तो अम्मीला पिन काढून ठेवायला सांगायचा. मग आई हसायची…

‘‘वो बुढी औरत कहाँ रहती हैं? वो झोला लेकर घुमती है ना, वो।’’
मुनीरभाई पेठेतल्या हारवाल्याला तिचा पत्ता विचारत होते. त्यानं त्यांना काहीतरी सांगितलं आणि ते पुढे चालू लागले.

दोन आठवड्यांपूर्वी अम्मी ठिकठाक होती. सकाळी मंडईत जायची. संध्याकाळी नदीवर. कधीतरी पीरबाबाच्या दर्ग्यातसुद्धा. एवढं वय झालं, तरी स्वतःच्या हातानं जेवायची. कुणाची मदत घ्यायची नाही, पण मुनीरभाईंना अम्मीला मदत करायला आवडायचं. त्यांच्या लहानपणी अम्मी शेणानं घर लिंपायची. तेव्हा मुनीर तिच्या हातांवर पाणी घालण्यासाठी वाट पाहत बसायचा. पाणी ओतताना तिच्या शेणानं भरलेल्या बांगड्यांकडे त्याची नजर असायची. तो त्यांच्यावर अलगद पाणी सोडायचा. शेण गळून जायचं. लाल-डाळिंबी चकचकीत काच दिसू लागायची. त्याला वाटणारी मजा मुनीरच्या डोळ्यांत दिसायची. अम्मीला भरून यायचं. तिचं ओलसर हसू किणकिणायचं.

त्यांना कुणीतरी सांगितलं, की ती गुप्ताच्या गाडीवर संध्याकाळची जेवते. मुनीरभाई त्या दिशेनं चालू लागले. एका हातात बांगड्यांची पिशवी आणि दुसर्‍या हातात अम्मीचा हात. मुनीर आईचा हात पकडून तिच्या खरेदीला आवर्जून जायचा. चालताना तिच्या बांगड्या त्याच्या गालाला लागायच्या. गार गार नुसत्या!

‘‘गरमागरम वडाय. आत्ताच काढलाय. खाणार?’’
‘‘नको. वो बुढी औरत कहाँ रहती है? संध्याकाळी तुमच्याकडे जेवते ती?’’
गुप्तानं पत्ता सांगत दूर बोट दाखवलं. मुनीरभाईंनी तिकडे पाहिलं.

अंधूक झालेल्या डोळ्यांना छताला भिरभिरणारा पंखा तेवढा दिसत होता. शाळेतून आल्यापासून मुनीर तापानं फणफणला होता. घसा पार सुकून गेला होता. ग्लानी येत होती. अंगातली सगळी ताकद कुणीतरी शोषून घेतंय, असं वाटत होतं. तेवढ्यात डोक्यावरून अम्मीचा हात फिरला. कपाळाला थंडगार बांगड्यांचा स्पर्श झाला. आल्हाद नुसता! पुन्हा डोक्यावरून हात फिरला. बांगड्या किणकिणल्या. मग बराच वेळ किणकिणत राहिल्या. मुनीरला गाढ झोप लागली.

‘तिला झोपेतून उठवावं की नाही?’ जुन्या मुतारीच्या समोर उभ्या असलेल्या मुनीरभाईंना कळत नव्हतं. म्हातारी आतमध्ये अंगावर गोधडी घेऊन पडली होती. गुप्तानं मुनीरभाईंना सांगितलं होतं, की तिची तब्येत ठीक नाहीये. त्यांनी तिच्या संसारावरून नजर फिरवली. मग तिच्याकडे पाहिलं.
तेवढंच शरीर. तशीच अंगकाठी. तशाच सुरकुत्या. मुनीरभाई पाहत राहिले. फक्त हातात बांगड्या तेवढ्या नव्हत्या. त्यांनी हातातली बांगड्यांची पिशवी तिच्या शेजारी ठेवली. खिशातल्या काही नोटा काढून पिशवीत ठेवल्या. ते निघून गेले.

ती पाचच्या सुमारास उठली, तेव्हा तिला छान वाटत होतं. तिला शेजारी ठेवलेली पिशवी दिसली. आत पाहते, तर डाळिबी बांगड्या! ती हरखली. तिनं पिशवीवरचं चित्र ओळखलं. हात जोडून छातीशी घेतले. मग तिनं ते पैसे पाहिले. ते कमरेला लावले. खोकड्याशेजारच्या आरशात डोकावून पाहिलं. पिशवी घेऊन ती बाहेर पडली.

काही आठवड्यांपूर्वी तिला दरदरून ताप भरला होता. ती मंदिराबाहेरच्या भिंतीला टेकून बसली होती. पोटात अन्न नव्हतं. अंगातला उरलासुरला जोर निघून चालला होता. पोटाला आतून ओढ लागत होती. तेवढ्यात डोक्यावरून एक हात थरथरत फिरला.
‘‘क्या? ठीक नहीए? क्या हुआ?’’
तिला कळलं नाही कोणंय ते. तिनं पुन्हा डोळे मिटले. काही वेळानं डोळे उघडले, तेव्हा कुणीतरी चपात्यांमध्ये गुंडाळलेली भाजी आणि औषधाची एक बाटली शेजारी ठेवून गेलं होतं.
दुसर्‍या दिवशी तिला थोडी तरतरी आली, पण डोळे जडावलेलेच होते.
‘‘आज ठीक हो ना?’’ त्या बाईनं विचारलं. तिनं कष्टानं डोळे उघडले. समोर प्रसन्न हसू होतं. तिचा सुरकुत्या पडलेला चेहरा हसला. आज चपाती-भाजी हातात मिळाली. पुढचे काही दिवस मिळत राहिली. मग ती बाई पुन्हा दिसली नाही.

ती पाठीवरची पिशवी सांभाळत चालली होती. हातातली बांगड्यांची पिशवी तिनं छातीशी धरली होती. तिनं दर्ग्याबाहेरच्या फुलवाल्याला त्या बाईबद्दल विचारलं होतं. त्यानं अंदाजानं तांबट आळीचं नाव सांगितलं. गावात तशा तीन आळ्या होत्या. ती शोधत चालली होती.
पंचायतीच्या मागची तांबट आळी आली. ती एका घराजवळ गेली. तिला हाकलवलं गेलं. मग दुसरं घर. पुन्हा तेच. पण मग कुणीतरी तिचं म्हणणं ऐकून घेतलं. तिनं त्या बाईचं वर्णन सांगितलं. आठवेल तसं. पत्ता मिळाला. चार घर सोडून ती एका घराजवळ आली. पांढरी चौकट असलेलं घर. दारात डाळिंबाचं, सदाफुलीचं झाडं होतं. त्यावर गोकर्ण पसरला होता.
तिनं दरवाजातून आवाज दिला. तिला पाहून एक तिशीतली बाई शिळ्या चपात्या घेऊन बाहेर आली.
‘‘भीक नकोय.’’ तिनं म्हटलं. हातातल्या पिशवीतल्या बांगड्या दाखवल्या. सगळं सांगितलं. म्हणाली, ‘‘त्या बाई परत भेटल्या नाहीत. काहीतरी देऊ वाटतंय. त्यांच्या हातात अशाच बांगड्या पाहिल्या होत्या. म्हणून घेऊन आले.’’
त्या बाईच्या चेहर्‍यावर आश्चर्य होतं. तिनं तिच्याकडून बांगड्यांची पिशवी घेतली. म्हातारीचा जाळीदार चेहरा खुलला. तिला थांबायला सांगून ती बाई पिशवी आत घेऊन गेली.

लाकडी पलंगावर अंगाचं मुटकुळं करून त्या बाई झोपल्या होत्या. मोलकरणीनं ती पिशवी शेजारच्या टेबलावर ठेवली. म्हणाली, ‘‘बाहर कोई भिखारन आई हैं। ये चुडी लेकर।’’
उशाशी बसलेल्या मुनीरभाईंचे डोळे चमकले. मोलकरणीनं सगळं सांगितलं.
मुनीरभाईंनी अम्मीकडे पाहिलं. तिला शांत झोप लागली होती, पण अंग गरम होतं.
त्यांनी पिशवी उघडली. त्याच बांगड्या.
त्यांचे डोळे भरून आले.
‘दुआ! नितळ दुआ!’
त्यांचं मन गदगदलं. डोळ्यांतून अम्मीकडे धावलं.
त्यांनी पिशवीतून बांगड्या काढून हातात घेतल्या. त्या किणकिणल्या. त्या जुन्या नादाचा तो प्रतिध्वनी आत उतरत गेला.
अम्मीनं हळूच डोळे उघडले. ती मऊसूत पडल्या डोळ्यांनी लहानग्या मुनीरकडे बघत हसली. तोदेखील कोवळ्या डोळ्यांनी हसू लागला.
छतातून आलेला उन्हाचा कवडसा मुनीरभाईंच्या हातातल्या बांगड्यांवर पडला होता. त्यातून निघालेली कितीतरी छोटी छोटी डाळिंबी प्रतिबिंबं खोलीतल्या भिंतीवर विखुरली होती. मुनीरभाईंच्या हाताच्या कंपनासोबत ती जागच्या जागी थरथरत होती
जिवंत असल्यासारखी!

– किरण क्षीरसागर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.