Now Reading
अनंत आठवणींचे पदर

अनंत आठवणींचे पदर

Menaka Prakashan

रविवार. सकाळी सकाळीच बेल खणखणली. अलगद घराचं दार उघडलं. अनपेक्षितपणे, ‘‘म्यां यावंजीऽऽ’’ लाडिक हाक. गोलमटोल चेहर्‍याची, काळीसावळी, वयानं अंगानं थोराड… पण चांगली धडधाकट उंच बांध्याची. हिरवीगार घट्ट इरकली, धारवाडी साडी-चोळी परिधान केलेली, कपाळावर ठसठशीत रुपयाएवढं कुंकू, गळ्यात लफ्फेदार चमकदार लांब मंगळसूत्र… नाकात चमकी, हातभर हिरव्यागार काचेच्या बांगड्या… चुडाच! गुलाबाचा टवटवीत रंगीबेरंगी गुच्छ घेऊन उभी. टपोर्‍या सुंदर डोळ्यांची सुहास्यवदना मी न्याहाळातच राहिले. ‘‘कोण हवं आपणाला?’’ माझा प्रश्न.
‘‘आपुनच की व्हं.’’ तिचं साधं सरळ उत्तर. मी मात्र पूर्णपणे संभ्रमात. विचारात. गोंधळात.

‘‘वळाकलं नाय म्यां? सुमाक्का!’’ फुलांचा गुच्छ माझ्या हाती देत तिनं चक्क माझे पाय धरले, नमस्कार केला. मी आश्चर्यचकित. माझ्या माहेरच्या नावानं मला हाक मारणारी ही कोण? इथे! मी एवढं तिच्यासाठी काय केलं आहे? यापूर्वी मुंबईत ती कुठे मला भेटल्याचं आठवत नाही. माझी ही अवस्था पाहून, पर्समधून एक पाकीट काढून तिनं माझ्या हाती दिलं. मोठ्या भावाचं- दादाचं- पत्र घेऊन ती आली होती. माझा पत्ता शोधत… मला भेटायला… कितीतरी वर्षांनी…
ती संकोचून दारातच उभी. ‘‘आत या… बसा…’’ मी तिचं स्वागत केलं. हॉलमधल्या कार्पेटवरच तिनं बसकन्- बैठक मारली. बळेबळेच तिला हात देत सोफ्यावर बसवलं. तिच्या मनात आजही पूर्वीचा- चाळीस वर्षांचा- परंपरेचा काळ होता. कुठेतरी आपण गरीब, हे श्रीमंत. आपण हलक्या जातीपातीचं… नोकर-चाकर, हे मालक, ही ग्रामीण वातावरणाची भिंत अजूनही तिच्या मनात कायम तशीच होती. हा तिचा पिढीजात संस्कार. विनम्रता होती. प्रत्येकानं आपल्या पायरीनं राहावं, वागावं या विचारांत ती वाढलेली. आदरयुक्त आपुलकीची भावना होती. आमच्या घराकडून, माहेरच्या माणसांकडून आजवर मिळालेली आधाराची, आश्रयाची तिच्या मनात सदैव जाणीव दिसत होती.

सांगली जिल्ह्यातल्या नेर्ले/ वाटेगाव / इस्लामपूरसारख्या ग्रामीण भागात वाढलेल्या, देवधर्म, उपासतापास, रीतिरिवाजाप्रमाणे सण साजरा करणार्‍या माझ्या अशिक्षित पण डोळसपणे व्यवहार करणार्‍या ‘अक्का-आजी’पासून आजतागायत आम्हा सर्व भावंडांनी, कुटुंबीयांनी घरात, शेतात काम करणार्‍या नोकरांना-कुळांना (वाटेकर्‍यांना) कधी तुच्छ मानलं नाही, अपमानास्पद वागणूकही दिली नाही. ही सर्व मंडळी खरोखरीच अत्यंत गरीब, निष्ठावान, विश्वासू होती, मग्रूर नव्हती. आजच्यासारखी.

काका-आजोबा, अक्काजींनी घरात असेल तो गोडाधोडाचा, पुरणपोळीचा, तर कधी मीठ-भाकरीचा आपल्या पानातलाच घास दारी आलेल्यांना ‘अतिथी देवो भव’ या आनंदानं देऊ केला होता. त्या प्रेमाच्या आशीर्वादानं पंचक्रोशीत ‘थोरले चुलत आजोबा- फंच्चू अण्णा’ कोर्ट-कचेरीची कामं करणारे, स्व कर्तृत्वानं नेर्लेकर गुरुजी-इनामदार, जमीनदार वतनदार अशी ख्याती असलेले! आमचं घर ‘वाडा’ सार्‍यांच्या कौतुकाचा विषय होता. सहा-सात भावंडांचं एकत्र कुटुंब होतं. नेर्लीतला चौसोपी भक्कम वाडा- गोदापणजीच्या- दुधोंडी गावच्या श्रीमंत कुलकर्णी भावंडांनी ‘भाऊबीजेची ओवाळणी’ म्हणून माहेरच्या वाड्यासाखा तंतोतंत बांधून दिल्याची नोंद आहे. ते वैभवाचे दिवस होते. महात्मा गांधी वधानंतर जाळपोळी झाल्या. ब्राह्मणद्वेष्ट्या गुंडांनी खेडापाड्यातली शांतता बिघडवली. पुढे ‘कूळकायदा’ आला. अनेकांनी शहरांकडे धाव घेतली. सुखासमाधानाचे दिवस संपले. आता तर ते फक्त ‘आठवणीचे’ दिवस आहेत, माझ्यासाठी.

माझ्याकडे घरकाम करत असलेल्या रकमाबाईंनी तत्परतेनं टीपॉयवर चहा-पोहे-पाणी आणून ठेवलं. घ्या म्हणत आग्रह केला. विनंती केली. तरी त्याकडे तिचं लक्ष नव्हतं. तिचं कावरंबावरं मन- मला, माझं घर- हॉल न्याहाळत माझ्याकडे पाहत म्हणाली, ‘‘लई… लई… झ्यॅक सजीवला ह्यो संसार सुमाक्का… तुमच्यावानी!’’ केवढा आनंद, उत्सुकता ओसंडून वाहत होती तिच्या चेहर्‍यावर, माझ्या भेटीनं!

तरीही ही नेमकी कोण? तिचं नाव काय? हा यक्षप्रश्न माझ्यासमोर. तसं तीच आपणहून बोलू लागली, ‘‘म्यॉ तुमची बालपनची… सगुणा! पवार. वडार जातीची. चौदा वर्षांची. तुम्ही सात-आठ वर्षांच्या हुता. तुमचं आज्जा-आज्जी इस्लामपुरात कोर्टासमोर, आपट्याशेजारी हुता. एक मागील रस्ता सोडून वडार वस्ती! माजंबी आज्जी-माय तुमच्या घरचं धुनं-भांडी, सारवण, झाडलोट पडंल ते काम करत हुतं. तिच्यासंगं मीबी यायची. भुईमुगाचं बी-बियाणं सोलाया… माझ्या दहा-बारा मैत्रिनी संगं, सोप्यात, अंगणात… गोठ्यात लई दंगा-धुडगूस घालायचो. शेंगदाणं खात खात. तरी बी आक्का आज्जी- काका आज्जा ओरडायचं नाय. हटकायचं नाय. लई भारी मानसं! घर मोठ्ठं तसं मन बी मोट्टं! पै-पाहुण्याचा रोझी राबता. मायलेकराचं मोट्टं धन… पोटाशी घेऊन बी समद्यांचं पिरमानं करायचा आज्जीमाय… कंदी कंदी उसंत नसायची जिवाला… वय झालं हुतं तरी. ताठ मानेनं उभी. आजून बी माज्यासमोर सणासुदीचं-सुगीचं तुमचं घर दिसतं. दिवाळीला तुमची साती भावंडं एकत्र… मुलाबाळा-लेकी-सुनांनी घर कसं लख्ख भरून जायचं. घराघरांत चहूबाजूला धनधान्याची पोती, गुळाच्या ढेपा, मका-हळदीच्या कणगी गच्च भरलेल्या. गोठ्यांत दूध-धुपत्यासाठीच गुरंढोरं असायची. सारं कसं साधंसुदं… आनंदानं नांदायचं घरदार. तुमच्या समद्यानबरोबर आम्हा नोकरमानसानांबी नवं कापड, धनधान्य, फराळाची भरभरून ताटं मिळायची. भेदभाव नसायचा. हे सारं सारं आज बी माझ्या मनात ताजं हायजी…’’

‘‘पहिल्यान् डाव अक्काआजी मायेच्या मांडीवर तुम्हास्नी पाहिलं. अगदी तस्सं, नक्षत्रावानी हायस्सा. आजबी- गोरं गोटं पिट्टं! हसरं, खट्याळ, द्वाड आज्जाबाईचं लाडकं नातुंडं!’’ किती किती कौतुकानं, उत्साहानं, मनापासून सार्‍या ‘आठवणी’ भरभरून बोलत होती ती. मी मंत्रमुग्ध होऊन माझं सारं बालपण आठवत साठवत होते. तिच्या या स्मरणशक्तीचं, चतुरपणाचं याही वयात दर्शन मला झालं, अगदी अनोखं!

हिंदू-मुस्लिम गुरुपरंपरेचं, सद्भावनेचं, ऐक्याचं प्रतीक असलेलं ‘ईश्वरपूर’- सध्याचं इस्लामपूर. संभू अप्पाचा उरुस (जत्रा) दणक्यात साजरा होई. त्या जत्रेतली अक्काआजीनं हौसेनं माझ्या गळ्यात घातलेली चमचमणारी, चार पदरी, हिरव्या-पोपटी, बारीक मोठ्या मण्यांची माळ ‘दूड’- तिची तिनं सांगितलेली गोष्ट तर नवलाईचीच! तिला ती माळ फार आवडलेली होती. अशी माळ आपणाला कंदी भेटंल का? या विचारात सदैव असताना, एका दुपारी आजी परसदारी तांदूळ निवडत होती. आम्ही पोरी-पोरी दोरीवरच्या उड्या मारत होतो. मला त्या जमत नव्हत्या. आजीच्या ते ध्यानात आलं. ‘जी जास्त उड्या मारून दाखवील, तिला दुडीची अश्शी माळ देईन…’ आजीनं सर्वांना बजावलं. सगुणेला ही संधी मिळाली. ती जिंकली. आम्ही सार्‍यांनी टाळ्या वाजवून तिचं कौतुक केलं. ‘माझ्या नातीला आपलं खेडेगावचं सारं खेळ शिकव’ बजावलं. संध्याकाळी माझ्याबरोबर तुम्ही जत्रेला चला… ‘तुमच्या पसंतीच्या दुडी सर्वांना मी घेऊन देते. संभूअप्पा-अंबाबाईचं दर्शन घेऊन येऊया… ठरलं तर!’

‘मी हरले, तू जिंकलीस’ म्हणत, मी सहजरीत्या माझ्या गळ्यातली दुड काढून तिच्या गळ्यात घातली. अगदी आनंदानं, माझ्यातर्फे ‘बक्षीस’ म्हणून, तर तिनं मला मिठीच मारली. तिच्या माझ्यातलं अंतरच तिनं मिटवलं. तेव्हा ती म्हणाली, ‘‘सुमाक्का, लई लई आनंदला ह्यो जीव… माज्या परीस धाकलं असून, बी केवढं मोठ्ठं मन हाय तुमचं. देवानंच दिलेलं हे शहाणपण!’’
आजी हे सर्व कौतुकानं पाहतच राहिली. तेव्हा तीच आज्जीला म्हणाली, ‘‘मला नगं ही दुड. ‘वस्तीवरची मानसं कुठून आणलीस? चोरलीस वाटतं.’ म्हणतील. घरचं बी दटावतील मला! नगं नगं मला.’’

‘‘थांब सगुणे, समद्यांना सांग… माझ्या नातीनं प्रेमानं, आपणहून दिली आहे. आजीनं जपून ठेव म्हणून बजावलं आहे. माझ्या लेकराचं मन मोडू नको. आजीबाईच्या सबूदानं आजपातूर ही ‘दुडीची माळ’ म्या जपलीया सुमाक्का. माजं लगीन झालं. दोन पोरं बी झाली. कर्नाटकात माझा दाल्ला कंपनीत कामाला व्हता. वाईच रांगडा गडी हाय… पर देवमाणूस! पंढरीची वारी करतुया.. पोरं शिकली-सवरली, मोठी झाली. ममई-पुन्यात नोकरी करत्यात. स्वतःच्या घरात संसार करत्यात. झ्यॉक हाय सारं माझं आज. तुमच्या भेटीसाठी जीव आसुसला व्हता. तुम्ही दिलेली दुडीची माळ, गळाभेट, म्या आजवर माझ्या मनात जपून ठेवलीया, आज्जीअक्काची आठवण हाय त्यात… बघा बघा,’’ म्हणत तिनं पर्समधून एक जुनी नागछाप हिंगाची डबी उघडून माझ्या पुढ्यात धरली. हिरवीगार मण्यांची दुड!

– शशिदा इनामदार

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.