Now Reading
स्वच्छ गाव… एक अभियान

स्वच्छ गाव… एक अभियान

Menaka Prakashan

‘पैशाला दोन बायका’ म्हटल्यावर गावातील तरुण पोरांपासून ते काठी टेकत चालणार्याह म्हातार्याध माणसांनीही सकाळी दहा वाजल्यापासून ग्रामपंचायतीसमोर गर्दी करायला सुरुवात केली, शिवाय काही रिकामटेकड्या बायांनीही गंमत म्हणून हजेरी लावली होती. एकंदरीत ‘पैशाला दोन बायका’ हा विषय गावातील लोकांच्या चर्चेचा झाला होता. लोक आपसांत कुजबुजत होते.

सरपंच सदाभाऊ कुंभार यांनी रविवार असूनही सर्व ग्रामपंचायत स्त्री-पुरुष सदस्यांना फोन करून ग्रामपंचायतीच्या मीटिंग हॉलमध्ये सकाळी ठीक अकरा वाजता तातडीनं हजर राहायला सांगितलं.
खरं तर ग्रामपंचायतीची मासिक मीटिंग चार दिवसांपूर्वीच झाली होती, पण तरीसुद्धा सरपंच सदाभाऊंनी एवढ्या घाईगडबडीनं आपल्याला का बोलवावं याचं नवल सर्व सदस्यांना वाटलं. रविवार सोडून सोमवारी बोलावलं असतं, तर काय बिघडलं असतं? पण कुणी सांगावं? सदाभाऊ आपलाच हेका खरा करणार. सदाभाऊ सरपंच झाला म्हणून कधीही सदस्यांना बोलवावं? ग्रामपंचायत सदस्य म्हणजे काय सरकारी नोकर आहेत? अधिकार्याझनं कधीही बोलवावं… कोणतंही काम सांगावं आणि नोकरानं गपगुमान करावं. सरपंच सदाभाऊ स्वतःला समजतो तरी काय?
सरपंचांनी रविवारी सकाळी फोन करून ग्रामपंचायतीमध्ये हजर राहण्यास सांगितलेली गोष्ट सदस्यांना आवडली नाही, पण करणार काय? एखाद्याचा चारचौघांत पाणउतारा करण्यात सदाभाऊ एवढा तरबेज होता, की समोरच्या माणसाला काहीच बोलता येत नसे. म्हणून अशा फटकळ स्वभावाच्या सरपंचाच्या नादी लागण्यापेक्षा काही सदस्यांनी ग्रामपंचायतीमध्ये हजर राहणं पसंत केलं, शिवाय तीन मुर्दाड सदस्यांनी ऐनवेळी अकराच्या सुमारास सरपंचांना फोन करून काही तरी पटेल असं (खोटं) कारण सांगून ग्रामपंचायतीत हजर राहण्याचं टाळलं.
अकरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत सरपंचांसह एकूण सहाच सदस्य उपस्थित राहिले होते. दोन स्त्री सदस्या आणि तीन पुरुष सदस्य. अकराचे बारा… सव्वाबारा वाजून गेले तरीसुद्धा उरलेले दोन सदस्य (बहुतेक त्यांनी दांडी मारलेली असणार.) येणार नसल्याचं सरपंच सदाभाऊंच्या लक्षात आलं. सांगितलेली वेळ टळून जाऊन तास-सव्वा तास होऊन गेला, तरीसुद्धा ते राहिलेले दोन सदस्य ग्रामपंचायतीकडे फिरकलेसुद्धा नाहीत. सदाभाऊंना वाटलं, की ते दोन सदस्य येणार नसल्यानं मीटिंगला सुरुवात करायला काय हरकत आहे? शिवाय आजच्या तातडीच्या मीटिंगला कोरमची काय गरज नव्हती. केवळ चर्चाच करायची होती, परंतु सरपंच सदाभाऊ नेमकं कोणत्या विषयावर बोलणार आहेत याची आतुरता हजर असलेल्या सदस्यांना लागून राहिली होती.
सरपंच सदाभाऊ आपल्या नेहमीच्या खुर्चीत विराजमान झाले होते. त्यांच्यासमोर उजव्या हाताला सावित्री पाटील आणि रूपाबाई जाधव बसल्या होत्या, तसंच स्त्री सदस्यासमोर सुनील इंगवले, नेताजी कांबळे आणि अमजद मुजावर हे तिघंजण बसले होते.
सदाभाऊ जवळ बसलेल्या… आणि कंटाळलेल्या आत्मारामच्या सुनीलनं थोडं डावीकडं, थोडं उजवीकडं वळून अवघडलेलं अंग ढिलं करून आळस झटकून दिला आणि सदाभाऊस म्हणाला,
‘सरपंचसायेब, झाली एवढी पोकळ चर्चा रग्गड झाली… आता मुद्द्याचं बोला.’
डाव्या हातावर हनुवटी टेकवून बसलेल्या रूपाबाई जल्दीनं म्हणाल्या,
‘व्हय… व्हयं. लौकर आवरा…’
‘एवडी घाई का?’ सरपंच सदाभाऊ बोलले.
‘ह्यें घरी जेवायला येतील. ह्येंनला जेवायला वाडाय पायजे. न्हाईतर…’
‘काय करतील?’ सदाभाऊंनी विचारलं.
‘अंगावर धावून येतील.’
‘मग येऊ देत की!’ सरपंच सदाभाऊ हसत हसत गमतीनं म्हणाले तसं रूपाबाई पट्कन म्हणाल्या,
‘माज्या न्हाई. तुमच्या… आनी तुमालाच शिव्या हासडतील.’
सरपंच सदाभाऊ हडबडलेच.
सावित्रीनं तिखट-मीठ लावून सांगितलं,
‘सायेब, रूपाचा न्हवरा… लै तिरसट हाय बगा. तुमाला सांगतु सायेब… पर्वाचीच गोस्ट. दारावर भाजी विकायला आलेल्या मानसाबरुबर एवडं काय बोलत हुतीस, म्हणून रूपाबाईला बडवून काडलं की वो! लै सौंशयी हाय तिचा न्हवरा… कुटं गेली म्हनून समजल्यावर तडक हीत्तं यील.’
‘मग वो?’ नेताजी मध्येच बोलला.
‘मग काय? एकदा का पिसाळला, की त्येला म्होरचं कायच दिसत न्हाई. म्हनून म्हंते मुद्द्याचं बोला…’ रूपाबाईनं सांगून टाकलं.
फटकळ स्वभावाचा सरपंच सदाभाऊबी मनातून हबकला, पण चेहर्यारवर तसं न दाखवता म्हणाला,
‘सावित्री, तुमी आसं करा… सदस्यांचा आजून काय पत्त्या न्हाई. त्येनला यायला टैम लागंल. तवा… तुमी घरी जा. जे ठरलं त्यो निर्णय कळवू.’
सरपंच सदाभाऊंचा आदेश मिळताच सावित्री पाटील आणि रूपाबाई जाधव खळखळून हसत मीटिंग हॉलमधून बाहेर पडल्या. तसं सदाभाऊना हायसं वाटलं.
समोरच्या भिंतीवरील घड्याळाकडे नजर जाताच नेताजीनं किंचित रागानं विचारलं,
‘सदाभाऊ, वाजले किती…? एकला धा मिंटं कमी हैती… आवरा लौकर.’ आणि त्यानं मुद्द्यालाच हात घातला, ‘का बोलावलंय म्हनायचं?’
नेताजी सरपंचापेक्षा साताठ वर्षांनी मोठा असल्यानं सरपंचास नेहमीच ‘सदाभाऊ’ म्हणत असे.
सरपंच सदाभाऊ पुढं बोलू लागले,
‘गेल्या दोन दिसांपूर्वीची बातमी वाचली का?’
सरपंचांना नेमकी कोणती बातमी अपेक्षित आहे? त्या तिघां उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांना त्या बातमीचा काही अर्थबोध होईना.
कसा होईल?
वर्तमानपत्रात अनेक बातम्या असतात. नेमकी कोणती बातमी सांगायची? शिवाय वर्तमानपत्र वाचण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. कोण राजकीय बातम्या आवडीनं चाळतो… कोण सिनेमाचं पान बघतो… तर कोण खून, मारामारी या बातम्या चवीनं वाचतो. कुणाला आकड्याचा नाद असतो… त्याची नजर आकड्यावरच असते. कोण भविष्य अजमावतो, तर कुणाला छोट्या जाहिराती बारकाईनं वाचण्याचा छंद असतो. प्रत्येकाचा बातमीकडे बघण्याचा कल वेगळा असतो. नेमकी कोणती बातमी सांगायची हा प्रश्नस उपस्थित तिघाही सदस्यांना समजेना. अमजद मुजावरला न राहवल्यामुळे अखेर तो बोलला,
‘कंची बातमी म्हनायची?’
सुनीलनं मध्येच तोंड खुपसलं. म्हणाला, ‘खंडेराव परटाची ल्येक पळून गेली न्हाई का…?’
‘काय ल्येकानू… तुमाला लफड्याशिवाय दुसरं काय सुचतच न्हाई…’ सरपंचानं सुनील इंगवले यास चांगलंच झापलं.
नेताजी गडबडीनं बोलला,
‘त्ये र्हांवू द्या. सदाभाऊ… सांगा पट्कन.’
सरपंच सदाभाऊ दोन्ही हातांच्या घडीचा भार टेबलावर देऊन, थोडं पुढं झुकून आपल्या मनातला विचार सांगू लागले,
‘त्येचं काय हाय… देशातली शेरं सोच्छ आनी सुंदर व्हावीत म्हनून आपल्या सरकारनं सोच्च सर्वेकशन मोहीम राबवलीय… त्येच्या बातम्या दरोज पेपरांत येत्यात…’
‘मग तुमचं म्हन्नं काय हाय?’ सुनील इंगवलेनं विचारलं. सदाभाऊ पुढं बोलू लागले,
‘तवा मला वाटतं, आपुनबी आपला गाव सोच्छ ठेवायचा…’
नेताजीनं शंका उपस्थित केली. म्हणाला, ‘सदाभाऊ, ही योजना शहरापुर्तीच हाय.’
‘म्हनून काय झालं? ही योजना आपल्या गावात राबवायची… गाव सोच्छ सुंदर करायचा…’
‘त्ये खरं हाय, पन निधी कुटून आनायचा?’
सुनीलनं नेमका मुद्दा उपस्थित केला.
सरपंच सदाभाऊ बोल्ले,
‘चौदाव्या वित्त आयोगातील निधी खर्च करायचा…’
‘आनी कुनी आब्जेक्शन घेटलं तर?’
अमजद मुजावर बोलून गेला.
सरपंच सदाभाऊ समजावून सांगू लागले,
‘त्येची काळजी तुमी करू नगा… त्ये मी बगून घेतो. चांगल्या कामाला कोन विरोध करनार न्हाई…’
मघापासून गप्प बसलेला नेताजी बोलू लागला. म्हणाला,
‘सदाभाऊ… ह्ये सगळं खरं हाय, पन त्यासाठी आपल्याला गावसभा बोलवावी लागंल.. तसंच गावकर्यांऊना या योजनेची माहिती समजावून सांगावी लागंल, शिवाय त्यांच्या चांगल्या सूचनाही आपल्याला स्वीकाराव्या लागतील… कस्सं?’
‘बरोबर हाय.’ सदाभाऊला पटलं.
‘मग बोलवा की गावसभा.’ अमजद पुढं सांगू लागला, ‘चौकाचौकात लावा गावसभेची नोटीस.’
‘त्येचा काय बी उपेग न्हाई. कोन वाचनार नोटीस? त्यापेक्षा आसं करा…’ सुनील पुढं बोलू लागला, ‘रमजानची रिक्षा सांगा… त्याच्याकडं स्पीकर सेट हाय. त्यो करतोय सगळं वेवसथित.’
‘मागच्या गावसभेला रमजानचीच रिक्षा फिरवली हुती न्हवं? किती लोक आले? शेवटी सभा रद्द करावी लागली…’
नेताजीनं मागील अनुभव कथन केला.
सदाभाऊ आत्मविश्वाुसानं बोलला,
‘आता तसं हुनार न्हाई… उद्या बगाच. मैदान कसं फुल्ल भरतंय त्ये…’
दुसर्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून रमजानची रिक्षा गावातील चौकाचौकांत, तसंच प्रमुख मार्गावरून फिरू लागली. रमजान आपली रिक्षा प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी थांबवून सरपंच सदाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे सादवत होता,
‘ऐका वो ऐका…
पैशाला दोन बायका.
ठिकाण ः ग्रामपंचायती समोर
वेळ ः सकाळी ठीक अकरा वाजता.
तरी सर्वांनी हजर र्हाववावे ओऽऽऽ’
एवढंच तो पुकारत होता. गावसभेचा जरासुद्धा नामोल्लेख करत नव्हता. त्याच्या या पुकारण्यानं गावातील लोक गोंधळून गेले होते. त्यांनी रमजानच्या रिक्षाभोवती गराडा घातला… रमजानला खोदून खोदून विचारलं, ‘ही काय भानगड?’ रमजान काही सांगत नव्हता. तो फक्त मोठ्यानं सादवत होता, ‘पैशाला दोन बायका….’
‘पैशाला दोन बायका.’ म्हटल्यावर गावातील तरुण पोरांपासून ते काठी टेकत चालणार्या् म्हातार्यास माणसांनीही सकाळी दहा वाजल्यापासून ग्रामपंचायतीसमोर गर्दी करायला सुरुवात केली, शिवाय काही रिकामटेकड्या बायांनीही गंमत म्हणून हजेरी लावली होती. एकंदरीत ‘पैशाला दोन बायका’ हा विषय गावातील लोकांच्या चर्चेचा झाला होता. लोक आपसात कुजबुजत होते.
ग्रामपंचायतीसमोर असलेल्या दगडी बांधीव स्टेजवर खुर्च्या मांडून ठेवलेल्या होत्या. तसंच त्या ठिकाणी स्पीकरचीही व्यवस्था केली होती. अनाउन्सर माईक हातात घेऊन, ‘हॅलो… हॅलो…’ करत स्पीकर सेट व्यवस्थित जोडल्याची खात्री करून घेत होता… अकरा वाजायला अजून दहा मिनिटं बाकी होती.
सव्वाअकरा वाजून गेले… गावसभेसाठी आलेले ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतीमध्येच बसून होते. अजून तीन सदस्य यायचे होते. उरलेले तीन सदस्य आल्याबरोबर सर्व सदस्य ग्रामपंचायतीतून बाहेर पडले आणि स्टेजच्या दिशेनं येऊ लागले. स्टेजवर येताच सर्वजण आपापल्या खुर्चीत स्थानापन्न झाले. लोकांची चुळबुळ सुरू झाली, कुजबुज वाढली. गोंगाट वाढत चाललाय हे लक्षात येताच खुर्चीतून उठून सरपंच सदाभाऊंनी माईकचा ताबा आपल्याकडे घेतला आणि बोलू लागले, ‘शांत र्हा …. शांत र्हा . खाली बसा… खाली बसा…’ हातवारे करून लोकांना शांत बसवू लागले. सर्व लोक शांत झाले आणि उभे राहिलेले लोक जागा मिळेल तिथं दाटीवाटीनं खाली बसले.
सरपंच सदाभाऊंनी खुणावताच ग्रामसेवक डी. टी. शिंगे पुढं झाले आणि त्यांनी ग्रामसभेचा उद्देश स्पष्ट करून पुन्हा ते आपल्या जागेवर, सदाभाऊंच्या बाजूस असलेल्या खुर्चीत जाऊन बसले. सदाभाऊंनी सर्व सदस्यांवर एकदा नजर टाकली आणि सदस्यांना विचारलं, ‘कोन बोलनार है का?’ परंतु कोण बोलणार नसल्याचं त्यांच्या लक्षात येताच ते पुढं सरसावले आणि डायसवरचा माईक ठीक करत म्हणाले,
‘लोकहो, तुमी गावसभेला आलात, त्याबद्दल पयल्यांदा तुमांस धन्यवाद… आमी ठरवलंय आपला गाव सोच्छ्… सुंदर करायचाय… त्यासाठी तुमचं सकार्य आमाला पायजे. आपला गाव जिल्ह्यात आदर्श गाव म्हनून वळकला पायजे. आनी हो…’
‘पैसं आणल्यात…’
पासष्ट वर्षांचा आकाराम चव्हाण मध्येच चेकाळला.
कोण तरी खोडसाळपणानं म्हटलं,
‘कशाला?’
‘बाई पायजे. एक न्हाई. दोन…’
तशी गर्दी खळखळून हसली.
शिरदवड्या किस्नाचा राजा थोडी टाकूनच आला होता. तो मधूनमधून बरळत होता… ‘पैशाला दोन बायका..’
सदाभाऊंनी राजाच्या बोलण्याकडं दुर्लक्ष केलं; पण ‘पैसं आणल्यात..’ हा धागा पकडून मधेमधे बडबडणार्यार आकारामला टोमणा हाणला. म्हणाले,
‘बगा… सोच्छ्, सुंदर गावासाठी लोक पैसंबी द्यायला तयार हैत…’
तशी सारी मंडळी चिडीचूप झाली.
कुठूनतरी मध्येच आवाज आला,
‘आधी ग्रामपंचायतीचा भ्रष्ट कारभार स्वच्छ करा म्हनावं…’
लोक धाडसानं बोलू लागले, तसं मारुती यमाजीलाही बोलण्याचं बळ आलं आणि सरपंचाकडे हातवारे करून म्हणाला,
‘वो सरपंच… आमचं संडास तटलंय… जरा बगा की!’ मारुतीनं असं विचारताच सारी मंडळी खदखदून हसू लागली, पण मारुतीचं बोलणं सुरूच होतं, ‘संडासचं पर्करण कवा मंजूर हुनार?’
सरपंच सदाभाऊंनी मारुती यमाजीची समजूत घातली. बोलणार्यां च्या तोंडाला काय हात लावता येतो? गावसभेत गोंधळ… गोंगाट वाढत चालल्याचं लक्षात येताच सदाभाऊंनी गावसभा आटोपती घेतली. स्वच्छ, सुंदर, आदर्श गावाची योजना, करावयाचे उपाय याची सविस्तर, पण थोडक्यात माहिती सांगितली. शिवाय लोकांच्या चांगल्या सूचना स्वीकारण्याचंही मान्य केलं आणि दुसर्यार दिवसापासून याची अंमलबजावणी करण्यात येईल, असं सांगून सभेची सांगता केली.
ग्रामसभेला लोक गोळा करण्याची सरपंच सदाभाऊंची ‘पैशाला दोन बायका’ ही भन्नाट कल्पना सर्वच सदस्यांना खूपच आवडली होती.
सरपंच सदाभाऊ गावसभा संपवून दुपारी अडीच वाजता घरी आले. त्यांनी घरी आल्या आल्या आपले दोन्ही हात कोचवर मागे आडवे पसरून ऐसपैस रेलून बसले आणि डोळे मिटून पडून राहिले. रागिणीला सदाभाऊ आल्याची चाहूल लागताच तिनं नवर्याबला आतूनच आवाज दिला… म्हणाली,
‘आवो, ऐकलासा का?’
‘काऽऽय?’ सदाभाऊ हडबडून उठत बोलला.
रागिणी हातात झाडू घेऊनच बाहेर आली आणि नवर्यााच्या हातात झाडू देत म्हणाली,
‘घ्या… हा झाडू.’
‘कशाला?’ सदाभाऊ गोंधळून गेला.
‘समदं घर झाडून काडा.’
‘कोन मी?’ सदाभाऊ नवलाईनं बोल्ला.
‘तुमी कोन झॅगीरदार लागून गेलासा का काय!’
‘आगं, मी सरपंच हाय…’
‘सरपंच गावचं हैसा. म्या घरातली सरपंच हाय. हित्तं माजा कायदा…’
बायको अशी का वागाय लागलीया हे काय सरपंच सदाभाऊंना समजंना. का भुतानं झपाटलंय हिला….
रागिणी पुन्हा गरजली,
‘घर झाडून काडताय न्हवं?’
‘हो… हो. काडतो की! मी कुटं न्हाई म्हटलंय?’
सदाभाऊनं नरमाईच्या सुरात सांगितलं.
रागिणी खळखळून हसली आणि नवर्यािला समजून सांगू लागली… म्हणाली,
‘आवो, ग्यान सांगणं लै सोपं असतंय…’
‘म्हंजे?’
‘तुमी गाव सोच्च कराय निगालाय… मग आधी घरापास्नं सुर्वात कराय नंग?’
‘व्हय.’
‘व्हय काय? काडा लोटून…’ रागिणी रणरागिणीच होती.
– आणि सदाभाऊंनी ‘स्वच्छ गाव… सुंदर गाव’ या योजनेची सुरुवात आपल्या घरापासूनच केली.
‘स्वच्छ गाव… एक अभियान’ ही योजना कशी यशस्वी करायची याचं नेटकं नियोजन सरपंच सदाभाऊ आणि त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांनी केलं होतं.
ग्रामस्वच्छता, आरोग्य, वृक्षसंवर्धन, पर्यावरण, व्यसनमुक्ती आणि प्लॅस्टिक मुक्ती या विविध विषयांचं महत्त्व सांगणारी घोषवाक्यं गावकर्यां चं लक्ष वेधून घेतील अशा गावातील प्रमुख ठिकाणी मोठ्या अक्षरात उठून दिसत होती. एकंदरीत ही घोषवाक्यं ‘स्वच्छ गाव’ होण्यासाठी मोलाची मदत करत होती. तसंच अधूनमधून प्रबोधनपर पथनाट्याचे कार्यक्रमही होत असत. शिवाय गावातील ठिकठिकाणी मोकळ्या जागेत ‘ओला कचरा-सुका कचरा’ असं वर्गीकरण करून कचराकुंड्या ठेवल्या होत्या. ग्रामपंचायतीनं ‘स्वच्छ गावा’साठी चांगली जय्यत तयारी केली होती.
गावात एकूण चार प्रभाग. प्रत्येक प्रभागाची जबाबदारी प्रत्येकी दोन सदस्यांवर सोपवली होती, शिवाय ग्रामपंचायत कामगारही गावाच्या स्वच्छतेसाठी मनापासून तळमळीनं राबत होते.
दररोज सायंकाळी पाच वाजता दिवसभरात केलेल्या कामाचा आढावा सरपंच सदाभाऊ, ग्रामसेवक डी. टी. शिंगे आणि ग्रामपंचायत सदस्य घेत असत. रोजच्या कामात येणार्यार अडचणी, लोकांच्या तक्रारी आणि त्यावर करावयाचे उपाय यावर सखोल चर्चा केली जायची.
रोजच्याप्रमाणे ग्रामसेवक, सरपंच आणि त्यांचे सहकारी सदस्य ग्रामपंचायतीच्या मीटिंग हॉलमध्ये कामाचा आढावा घेण्यासाठी बसले होते.
सायंकाळचे पाच वाजले होते. तरीही अजून ग्रामपंचायत कामगार आले नव्हते. सव्वापाच वाजून गेले आणि एकेक कामगार येऊ लागले. अखेरीस साडेपाच वाजता उरलेले सर्व कामगार आले आणि त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा पाढा वाचला, परंतु नेमाण्णा आवळे गप्प राहिलेला पाहून सरपंच सदाभाऊंनी उजव्या हातानं मिशा साफ करत आणि केसावरून हात फिरवत आपुलकीनं विचारलं,
‘का रं, तू का बोलंनास?’
‘मी उद्या जानार न्हाई. हापिसातलं कोंचंबी ढीगभर काम सांगा…’ नेमाण्णानं स्पष्ट शब्दांत सांगितलं.
‘कोन काय बोल्लं का?’ सदाभाऊ.
‘व्हय.’
‘कोन?’
‘पैलवान आण्णा निंबाळकर…’
‘काय म्हनला?’
‘शिव्या हासडल्या… आनी एक ठोसाबी लगावला की गालावर!’
‘कशाबद्दल?’
नेमाण्णा सविस्तर सांगू लागला. म्हणाला,
‘त्येचं काय झालं… मी रस्ता साफ करत हुतो. इतक्यात माजी नजर सहज समोर गेली, तर पैलवान निंबाळकरनं ओला-सुका कचरा वेगळा न टाकता एकाच कोंडाळ्यात टाकला. मला र्हासवलं न्हाई. त्याला म्हनलं, ‘वो पैलवान, कोंडाळ्यावर लिवलेलं बगून तरी कचरा टाका की!’
‘मग वो’ कधी न बोलणारा ग्रामसदस्य अशोक अमृतानं नाकावरचा चष्मा वर सारत विचारलं.
नेमाण्णा पुढं सांगू लागला,
‘मग क्काय! मला म्हनला कसा, ‘व्हय रं ××× मला शानपन शिकवतोस?’
‘आणि?’ मध्येच नेताजी बोलला.
‘आनी काय सांगतोय व्हय? दिला की ठोसा गालावर.’ नेमाण्णा तोंड ‘आ’ करून ढिला झालेला दात सर्वांना दाखवू लागला. म्हणाला,
‘बगा की! दात कसा हालाय लागलाय…’
डाव्या गालाला हात लावत नेमाण्णा पुन्हा विव्हळला, ‘अयायायाया…’
ग्रामसेवक डी. टी. शिंगेनं घाबरून विचारलं, ‘काय झालं?’
‘जोराची कळ आली…’
‘नेमाण्णा, सोसलं पायजे सारं…’ ग्रामसेवकानं समजून सांगितलं, तसं नेमाण्णा रागानं उसळून बोल्ला,
‘व्हय. तुमाला हित्तं बसून सांगाय काय जातंय? जरा गावातून फेरफटका मारून बगा… मग समजंल.’’
सरपंच सदाभाऊनं विचारलं,
‘आनी काय म्हनला का रं पैलवान?’
‘तर्र… तुमाला तर लै बोल्ला.’
‘काय म्हनला?’
‘म्हंतुया कसा, ‘गाव सोच्च कराय निगालाय. आधी गटारी साफ करा म्हनावं… आठ-आठ, धा-धा दिवस गटारी साफ केल्या जात न्हाईत. घंटागाडीचा तर पत्त्याच न्हाई… सरपंचाचं लक्ष हाय का ह्येच्याकडं? तुजा त्यो सरपंच… ग्रामपंचायतीमध्ये बसून अंडी घालतोय व्हय रं?’
‘आसं म्हनला?’
‘व्हय.’
‘तित्तं जाऊन त्याला जाबच इचारतो…’
‘नगं… नगं.’
‘का?’
‘त्यो तुमची वाटच बगत बसलाय. आनी म्हंतोय कसा, ‘सरपंच नुस्ता हीकडं यीऊ देच. न्हाई त्येच्या गळपटीला धरून जाब इचारला न्हाई तर बाऽचं नाव सांगनार न्हाई.’
सरपंच सदाभाऊचा चेहरा खर्रकन उतरला. पंचमंडळी आपसात कुजबुज करू लागली. सदाभाऊ उसनं अवसान आणून बोलला,
‘त्येच्या आयला त्येच्याऽऽऽ…’
आणि रोजच्याप्रमाणं दैनंदिन कामकाजाचा आढावा घेण्याचं काम संपलं.
रात्रीचे साडेआठ वाजले होते. सरपंच सदाभाऊ हॉलमध्ये उद्याच्या कामात नियोजनात काय बदल करता येईल याचा विचार करत आरामखुर्चीत बसले होते. रागिणी स्वयंपाक आवरून रिकाम्या वेळेत मधल्या खोलीत टी. व्ही. बघत बसली होती. इतक्यात बाहेरून हाक आली,
‘सरपंच हैत का?’
‘कोन त्ये?’ सदाभाऊंनी आतूनच विचारलं.
‘मी… भुजिंगा सुतार.’
‘ये. आत ये.’
भुजिंगा सुतार पुढं केलेलं दार ढकलून आत आला. त्याच्या चेहर्यापवर राग दिसून येत होता. आत येताच तावातावानं म्हणाला,
‘त्या कोंडाळ्याची काय तरी विल्लेवाट लावता का न्हाई?’
भुजिंगाचा रागीट अवतार बघून सरपंच सदाभाऊ शांतपणे म्हणाले,
‘बस आधी खुर्चीवर. काय झालं ते बैजवार सांग सगळं’ आणि आत वाकून बघत रागिणीला म्हणाले,
‘रागिणी टी. व्ही. चा आवाज थोडा कमी कर.’
रागिणीनं झटक्यात टी. व्ही. असा काही बंद केला, की ती रागावल्याचं सदाभाऊंच्या ध्यानात आलं; परंतु तिकडे लक्ष न देता भुजिंगास म्हणाले,
‘बोल. काय तक्रार हाय?’
‘आमच्या घराजवळच्या तेवड्या कचरा कुंड्या हालवा.’
‘का?’
‘सगळा कचरा रस्त्यावर झालाय. सुतार गल्लीत समदीकडं घाण वास पसरलाय..’
‘ठीकाय्. उद्या कचर्यातचा उठाव करतो.’
भुजिंगा सुतार अजून घुश्श्यातच होता. म्हणाला,
‘ते काय न्हाई… आधी कचरा कुंड्या तितनं हालवा. न्हाईतर सुतार गल्लीतला सगळा कचरा तुमच्या दारात आनून टाकतो…’
सदाभाऊ क्षणभर अवाक् झाले आणि भानावर येताच भुजिंगास समजावणीच्या सुरात बोलले,
‘भुजिंगा. पर्तेकांनी आसं वागल्यावर गाव कसं सोच्छ् हुईल?’
‘ते मला म्हाईत न्हाई. उद्या तितनं कचरा कुंड्या हालल्या पायजेत म्हंजे पायजेत. न्हाईतर गाठ हाय माज्याशी…’ भुजिंगा जसा घाईगडबडीनं आला होता तसा तो सरपंच सदाभाऊला दम देत, फणफणत बाहेर पडला.
सरपंच सदाभाऊ भुजिंगा सुताराच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहतच राहिले आणि नकळत मनातल्या मनात पुटपुटले, ‘तुज्याशी न्हाई, बावा. आता माज्या बायकोशी गाठ हाय…’ आराम खुर्चीतून उठत सदाभाऊ रागिणीस मवाळ शब्दांत म्हणाले,
‘चल. जेवू या.’
‘जेवा तुमचं तुमीच. मी न्हाई जेवनार.’
रागिणी फणकार्याजनं बोलली.
सदाभाऊंनी शांतपणे विचारलं,
‘काय झालं?’
‘ही काय तुमची वागायची रीत झाली?’
‘काय चुकलं माजं?’
‘तुमचं न्हाई… माजंच चुकलं, तुमासंगं लगीन करून.’
‘रागिणी… समजून घे.’
‘कशाला आन्ता आसली मानसं घरात?’
‘मी काय सुताराला बोलवून घेतलं हुतं घरात? ये म्हनून…’
‘ह्ये बगा… गावच्या तक्रारी पंचायतीतच सोडवायच्या. घरापरेंत कुनाला आनायचं न्हाई… आसली मानसं, तर अजिबातच न्हाई.’
रागिणीचा राग थोडा कमी झालाय असं वाटल्यावर सदाभाऊ लाडात येऊन रागिणीस हलवत म्हणाला,
‘चल. जेवून घे.’
रागिणीनं सदाभाऊचा हात झटकन झिडकारला. ती बोलली,
‘अंगाला हात लावायचा न्हाई माज्या…’
‘बरं…. र्हा्यलं.’ सदाभाऊ ओढून ताणून खोटं हसू चेहर्याुवर दर्शवीत बोलला.
सदाभाऊला रागिणीचा अस्सा राग आला, पण करणार काय? शब्दानं शब्द वाढतो म्हणून मूग गिळून बसण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याला वाटलं, आपण आईवडिलांपासून वेगळं राहायला नको होतं.
जेवण झालं आणि ती दोघं झोपी गेली, परंतु सदाभाऊंनी आख्खी रात्र जागून तळमळत वाया घालवली. रात्री ते स्वतःच अधूनमधून बडबडत होते, ‘सोच्छ् गाव… एक अभियान. चांगभलंऽऽऽ…’

‘स्वच्छ गाव… एक अभियान.’ हा उपक्रम राबवायला सुरुवात केल्यापासून सरपंच सदाभाऊ रोज गावातून फेरफटका मारत असे.
खरं तर त्यांचा पिंड राजकारणी नव्हता, पण समाजसेवा करण्याकडं त्यांचा कल अधिक होता आणि म्हणूनच योगायोगानं सरपंचपद मिळाल्यापासून गावाचा विकास करण्याच्या ध्येयानं प्रेरित होऊन त्यांनी ‘स्वच्छ गाव… एक अभियान’ ही योजना आपल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्यानं राबवण्याचं धाडस केलं. म्हणूनच गावाचा विकास व्हावा ही मनापासून तळमळ होती. ‘स्वच्छ गाव’ कसं होईल हाच विचार त्यांच्या डोक्यात सतत घोळत असे.
आज सकाळी दहा वाजता सदाभाऊ एकटेच बाहेर पडले आणि स्वच्छ गावासाठी आणखी काय काय करता येईल याचं निरीक्षण करण्यासाठी पायी पायी फिरू लागले. इतक्यात त्यांच्या समोरून पंधरा-सोळा वयाच्या दरम्यानची दोन पोरं येत होती. त्यातील एकानं रस्त्यातच गुटख्याची पिचकारी मारली. ते बघून सरपंच सदाभाऊंना वाटलं, आपण यांना शहाणपणाचे चार शब्द सांगू या, म्हणून सदाभाऊंनी त्या पोरांना हाक मारली,
‘हिकडं या रं…’
‘काय?’ पोरं जवळ आली.
‘रस्त्यावर अशी घाण करणं बरं है का?’
दोघांपैकी एकजण डांबरटपणानं म्हणाला,
‘रस्ता काय तुमच्या बापाचा है का?’
‘तुमच्याही बापाचा न्हाई… आनी माज्याही बापाचा न्हाई, म्हनून काय घाण करायचा? आपलं गाव आपण सोच्छ् ठेवायला नगो का?’
सरपंच सदाभाऊला वाटलं कदाचित आपण कोण आहोत हे माहीत नसावं, म्हणून तर अशी बेताल बोलताय्त. इतक्यात तिथं धुळा पाटील आला आणि हात जोडून म्हणाला,
‘नमस्कार वो सरपंच सायेब…’
तशी त्या हूड पोरांनी घाबरून धूम ठोकली.
धुळा पाटील पुढं बोलू लागला,
‘हिकडं कुटं म्हनायचं?’
‘गाव सोच्छ् करायचाय् की!’
‘करा… करा.’ आणि धुळानं काढता पाय घेतला.
सरपंच सदाभाऊ थोडं अंतर चालून गेल्यावर ते सनीकॉर्नर या ठिकाणी आले. त्या ठिकाणी चार वर्षांचं एक पोरगं गटारीजवळ उघड्यावर शौचास बसलेलं होतं. ‘इथं का बसलाय्स?’ या भावनेनं त्यांनी त्या पोराकडं बघितलं. तसं दोन्ही हाताच्या मुठीत शर्ट धरून बसलेलं ते पोरगं दणाट पळालं आणि आपल्या दारासमोर येऊन उभं राहिलं. आतूनच त्याची आजी म्हणाली, ‘झालं का?’ पोरगं काही बोलंना तशी ती म्हातारी आजी हातात पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आली आणि तिनं नातवाला विचारलं, ‘काय झालं रं…?’ पोरगं त्याच्याकडे येत असलेल्या सरपंचाकडं बघत होतं. इतक्यात सदाभाऊ त्या ठिकाणी आले आणि आजीस म्हणाले,
‘पोरांना आसं उघड्यावर बसवू नगा… रोगराई पसरते.’
‘कुटं बसवायचं? का आनून बसवू तुमच्या दारात…’
आजीबाईस काय बोलावं हे सरपंचाना समजेना. ते म्हणाले,
‘घरी संडास है का न्हाई?’
‘हाय की!’
‘मग तित्तं बसवायचं.’
‘कार्ट तितं बसतच न्हाई.’
इतक्यात पोराची आई – सोनाबाई बाहेर आली. म्हणाली,
‘अवो आत्त्या, ह्ये आपलं सरपंच हैत न्हवं का?’
‘मला गं काय ठावं?’ आजी पोराचं ढुंगण धुता धुता म्हणाली आणि सरपंचाकडं वळून बोलली,
‘या. च्या करते. माज्या हातचा च्या तर पिऊन जावा… चांगली आठवण राहील.’
‘नगं… नगं.’ म्हणून सरपंच सदाभाऊ बोळातून बाहेर पडले आणि मुख्य रस्त्यावर आले. तिथून ते पुढच्या आडव्या रस्त्याला लागले. डाव्या बाजूस वळताच तिथं त्यांना कपाळ भरून लावलेला भंडारा… डोक्यास अस्ताव्यस्त पटका… डाव्या खांद्यावर घोंगडं… हातात कुर्हााड घेऊन थांबलेला बापू धनगर दिसला. वय पन्नाशीच्या आसपास. बाजूस साताठ शेळ्या मेंढ्या चरत होत्या. त्यातील एक बकरं रस्त्याच्या कडेला नुकत्याच लावलेल्या झाडाचा पाला खात होतं. सदाभाऊची नजर त्या बकर्यातकडं जाताच ते पटकन बोलले,
‘अवो, बापू…’
‘काय?’
‘कुटं ध्यान हाय तुमचं?’
‘काय झालं?’
‘अवो, त्यो बकरा बगा की! झाडाचा पाला खातोय.’
‘खाऊ दे की! मुकं जनावर हाय त्ये. मुळासकट तर खात न्हाई…’
‘मग ही झाडं कशी जगतील?’
‘ते काम तुमचं.’
बापू धनगर या अडाणी, आडमुठ्या माणसाला कसं समजून सांगावं हे सरपंच सदाभाऊला समजेना. बापू धनगर मध्येच म्हणाला,
‘तुमी सरपंच हैसा न्हवं?’
‘व्हय.’
‘मग आसं का करत न्हाई…’
‘काय?’
‘गावातील जनावरांसाठी एकादी चारा छावणी का सुरू करत न्हाईसा?’
‘करू की! दुष्काळ पडल्यावर…’
सरपंच सदाभाऊ चिडून बोलला आणि पुढं सांगू लागला,
‘ह्ये बगा बापू… उद्यापास्नं शेळ्या-मेंढ्या हिकडं आनू नगासा.’
‘आनी आनल्या तर…?’
‘पकडून… पंचायती म्होरं बांधू.’
बापू धनगरानं डाव्या हातानं मिशांना पीळ देत म्हटलं,
‘नुस्तं हात लावून तर बगा…’
सरपंच सदाभाऊ अशा या तिरसट माणसाबरोबर काय बोलणार?
सदाभाऊ फटकळ असला, तरी समोरच्या माणसांचा स्वभाव लक्षात घेऊन तो त्यांच्याशी बोलायचा. बापू धनगराच्या विचित्र स्वभावामुळे त्याच्याशी एकट्यानं वाद घालण्यात काही अर्थ नाही हे ओळखून सदाभाऊ परीट गल्लीतून घराच्या दिशेनं निघून गेला. क्षणभर त्यांना वाटलं, ‘स्वच्छ गावा’च्या फंदात आपण उगीच पडलो.
सरपंच सदाभाऊ, उपसरपंच अविनाश कोले आणि त्यांचे सर्व ग्रामपंचायतीचे सहकारी सदस्य, तसंच ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीचे सर्व कामगार ‘स्वच्छ गाव… एक अभियान’ ही योजना मनापासून राबवत होते.
दररोज सायंकाळी पाच वाजता दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला जात असे, त्या वेळी प्रत्येकजण आपापले अनुभव कथन करताना सारी पंचायत खळखळून हसायची.
सरपंच, उपसरपंच आणि त्यांचे सहकारी सदस्य ‘स्वच्छ गावा’साठी गावातून फेरफटका मारत असत. त्यांना आलेल्या अनुभवातून दुरुस्ती केली जायची. कासवाच्या गतीनं का असेना गावाचं रूप हळूहळू पालटत असल्याचं सर्वांना जाणवत होतं. सरपंच सदाभाऊ आणि त्यांच्या सहकार्यां ना वाटलं, की ‘स्वच्छ गाव’ हा उपक्रम यशस्वी होईल का नाही अशी शंका होती; परंतु हळूहळू गावकर्यांवच्यातही बदल जाणवू लागला आणि आता गाव ‘स्वच्छ’ करण्याचं गावकर्यांचनीच मनावर घेतलं होतं. त्यामुळे ग्रामपंचायतीलाही मोठा हुरूप आला होता. गावाचं रूपडं पालटलं. अवघ्या पंचक्रोशीत… तालुक्यात ‘स्वच्छ गावा’चा बोलबाला झाला. गावाचे फोटो, गावाचं नाव कुठल्या ना कुठल्या वर्तमानपत्रात झळकत होतं.
अखेरीस ‘रुकडी’ गावाची दखल जिल्हा परिषदेनं घेतली आणि गावास ‘स्वच्छ गाव… एक अभियान’ या उपक्रमास विशेष अनुदान जाहीर केलं. ही बातमी ग्रामपंचायतीत येऊन धडकली. गावकर्यांपना समजली, त्यामुळे सर्वांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
आपल्या सुपीक डोक्यातली कल्पना… आपण राबवलेली ‘स्वच्छ गाव… एक अभियान’ योजना साकार होताच रुकडी गावचे सरपंच सदाभाऊ नकळत नाचत उद्गारले,
‘ढॅण्टॅढॅणण्ण्…’
आणि ग्रामपंचायत अवाक् झाली.

मधुकर फरांडे, कोल्हापूर
editor@menakaprakashan.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.