Now Reading
स्मिताच्या डोकेदुखीचं सर्जिकल स्ट्राईक

स्मिताच्या डोकेदुखीचं सर्जिकल स्ट्राईक

Menaka Prakashan

स्मिताच्या डोकेदुखीचा त्रास सध्या चांगलाच वाढला होता. सगळे उपाय करून झाले होते मात्र फरक काही पडत नव्हता. कोणताही नवा उपाय समजताच त्याचीही अंमलबजावणी केली जात होती, पण गुण काही येत नव्हता. अखेर त्यांना जालीम उपाय सापडला. हा उपाय होता आधुनिक रोबोटिक्स तंत्राद्वारे उपचार… काय आहेत हे उपचार, याचा स्मिताला फायदा होईल का असे प्रश्‍न तुम्हालाही पडलेत का? या प्रश्‍नांची उत्तरं मिळवण्यासाठी वाचा ही कथा…

अलीकडे स्मिताची डोकेदुखी वारंवार डोकं बाहेर काढत होती. तिला सर्दी-पडशाचा त्रास होताच. कसलंही निमित्त पुरायचं. पदराला, अ‍ॅप्रनला किंवा ओढणीला कांद्याचा वास लागलेला असो नाहीतर भाजीला फोडणी द्यायची असो, तळहातावर सॅनिटायझर चोळलं तरी तिला शिंका यायच्या. मग नाक लालबुंद व्हायचं. असं काहीतरी झालं की ती अधिकच सुंदर दिसायची. पण नाक गळायला लागलं की तिची हुस-हुस, मुस-मुस सुरू व्हायची. मग डोकं धरलं की विक्स लाव, रबेक्स लाव आणि निलगिरी लाव… नोजल ड्रॉप्स टाक… नाकाचं इनहेलर हे तर तिच्या पाचवीलाच पुजलेलं होतं.
आमच्या फॅमिली डॉक्टरांचं म्हणणं असं की तिला कशाची तरी अ‍ॅलर्जी आहे. स्मितानं स्वतःहूनच त्याचा शोध घेतला पाहिजे. एकदा नक्की कशाची अ‍ॅलर्जी आहे याचा शोध लागला की ती वस्तू वापरण्याचं तिनं टाळलं पाहिजे. मग आपोआप तिची डोकेदुखी नाहीशी होईल.
आता अ‍ॅलर्जी शोधून काढायची म्हणजे वेगवेगळ्या टेस्टस आल्याच. नाक, कान, घसा म्हणजे इ.एन.टी. टेस्ट झाल्या. मधुमेह आणि थायरॉईडसाठीच्या जेवणाआधी, जेवणानंतरच्या ब्लड टेस्टदेखील झाल्या. मग हृदयासाठी इ.सी.जी., इ.इ.जी. केले. डोक्यापासून पायापर्यंत फुल बॉडी स्कॅनिंग झालं. पन्नास अ‍ॅलर्जिक पदार्थांच्या तपासणींची महागडी पंक्चर टेस्ट पण करून घेतली. पण सर्व काही नॉर्मल.

मला खर्चाचा ताळमेळ बसवता बसवता नाकी नऊ आले पण स्मिताच्या नाकाचा निकाल काही लागत नव्हता.
एवढं करूनही स्मिताची कुरकुर चालूच. म्हणे माझं तिच्याकडं लक्षच नाही. हे मात्र अतिच झालं. ‘शेळी जाते जिवानिशी, खाणारा म्हणतो वातड लागते’. फिजिशियनपासून सगळे स्पेशॅलिस्ट झाले, पण अ‍ॅलर्जीवर तोडगा काही निघत नव्हता. स्मिताची डोकेदुखी म्हणजे विज्ञानाला एक आव्हानच होतं.
एक दिवस आमच्या फॅमिली डॉक्टरांनी मला नव्या आधुनिक रोबोटिक्स तंत्रज्ञानाची माहिती दिली. शहरात ‘नॅनो हेल्थ क्लिनिक’ म्हणून नवं हॉस्पिटल आलं आहे आणि ते डिजिटल अशा इन्फ्रास्ट्रक्चर सुविधेनं सुसज्ज आहे असं ते म्हणाले. तिथं स्मिताला घेऊन जाण्यासाठी त्यांनी मला चिठ्ठी लिहून दिली. मला त्यासाठी तिची ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागली.
माझ्यासाठी वटपौर्णिमेपासून ते करवा चौथपर्यंत नाना प्रकारची व्रत-वैकल्यं आणि उपास-तापास करणार्‍या स्मितासाठी सगळं काही करण्याची माझी तयारी होती. ठरल्या दिवशी ठरल्या वेळी आम्ही ‘नॅनो हेल्थ क्लिनिक’मध्ये मोठ्या आशेनं आणि उत्सुकतेनं प्रवेश केला. आणि काय आश्‍चर्य… क्लिनिकच्या रिसेप्शन काउंटरवर एक सुंदर यंत्र कन्या बसलेली होती. निळेभोर भिरभिरणारे बोलके डोळे, लाल चुटूक ओठ, चेहेर्‍यावर खळखळणारे हास्य, रेखीव आखीव शरीरसौष्ठव… बार्बीची बाहुलीच जणू. तिनं दिलखुलास हसूनच आमचं स्वागत केलं. ऑनलाईन अपॉइंटमेंट असल्यानं केसपेपर तयारच होता.
रिसेप्शन हॉलमध्ये एक लक्षवेधी सूचना लावलेला फलक होता.
‘‘येथे सर्व प्रकारच्या रुग्ण तपासण्या, औषध-पाणी, नर्सिंग सेवा, ऑपरेशन्स अत्याधुनिक यंत्र मानवाकडून केल्या जातात.’’
बापरे! हा काय प्रकार आहे. यंत्रमानवाकडूनच सार्‍या हॉस्पिटलची सूत्रं हलवली जातात. सारं अजबच! मी भिंतीवर आणखी काही ठळक लक्षवेधी बोर्ड वाचले.
‘‘येथे आपल्या डोक्याचे सर्व्हिसिंग करून मिळेल.’’
बापरे! हे काय आणखी? त्या बोर्डाजवळच गणपती, गुरुदत्त, नृसिंह यांची सुबक, सुंदर पोस्टर्स पण लावलेली होती. देवादिकांच्या डोक्यावरून ही डोकं जोडण्याची किंवा बदलण्याची शस्त्रक्रिया पुराणकाळापासूनच अस्तित्वात होती असंच त्यांना सुचवायचं होतं का?
आणखी एक बोर्ड.

‘‘शरीराचे कोणतेही स्पेअर पार्टस येथे बदलून मिळतील.’’
हे अगदी थक्क करणारं होतं. म्हणजे इथं हाता-पायाची खिळखिळी झालेली हाडं, छातीच्या बरगड्या, गुडघ्यातल्या वाट्या आणि मनगटातल्या बिजागर्‍या, मणक्यांच्या माळा, लवचिक स्नायू असे सर्वकाही स्पेअरपार्ट उपलब्ध होते तर.
म्हणजे कमालच होती.
शरीरशास्त्राच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची झलक दाखवणारा आणखी एक बोर्ड.
‘‘आपला डी.एन.ए. इथं शुद्ध करून व मागणीप्रमाणे बदलून मिळेल.’’
वा:ऽऽ हा डी.एन.ए. बदलायचा म्हणजे शरीराचा नकाशाच बदलणार की हो.
डी.एन.ए. मध्ये फेरफार केले तर तुमचे हव्या त्या श्रेणीच्या हव्या त्या व्यावसायिक माणसामध्ये रूपांतर करता येणार. म्हणजे समजा तुम्हाला वकील, इंजिनीअर, सी.ए., शिक्षक, सनदी अधिकारी व्हायचंय किंवा शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, तत्त्वज्ञ, कारखानदार, उद्योजक व्हायचंय. तर सारे पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत. आहे की नाही कमाल? या नवनवीन कल्पनांच्या चित्रफिती डोळ्यांपुढून सरकत असतानाच…
एक असिस्टंट रोबो अतिशय चपळ हालचाली करत हॉलमध्ये आला व आमच्या पुढ्यात उभा राहिला. स्मिताकडे रोखून पाहत तो म्हणाला, ‘‘मिसेस स्मिता चित्रे, चला तुम्हाला तपासणी थिएटरमध्ये जायचं आहे.’’ त्यानं मलादेखील मागोमाग यायची सूचना केली.
तपासणी थिएटर म्हणजे एक गुंतागुंतीच्या केबल्स लावलेलं, संगणकांचे संच असलेलं, वेगवेगळी निरीक्षणं नोंदवणारी थ्री डी एक्स रे मशिन्स, स्कॅनर्स व अनेक प्रकारचे मदर बोर्डस यांनी व्यापलेलं यांत्रिक थिएटरच होतं.

शून्य गुरुत्वाकर्षण असणारं अंतराळ यान कसं असावं तशी अंतर्गत रचना असलेल्या त्या तपासणी थिएटरमध्ये आम्हाला नेण्यात आलं. स्मिताला हॉलच्या मध्यभागी असणार्‍या उंच बेडवर आडवं केलं गेलं.
काही क्षणातच ‘बीम बीम बीम…’ करत डॉक्टरसारखा दिसणारा एक यंत्रमानव हॉलमध्ये लगबगीनं आला. डॉक्टरी वेष परिधान केलेला असला तरी त्याचे हात-पाय सुबक, ॅस्टिकचे होते. हेल्मेटसारखं गोलाकार डोकं, डोक्यावर अँटिना, आयताकृती उभट छाती, कवडीसारखे बटबटीत डोळे, ॅस्टिकचे कान, ॅस्टिकचं नाक, ॅस्टिकचे मोत्यासारखे चमकदार दात असलेलं तोंड असा एकूण त्याचा अवतार होता.
‘हाय’ असं म्हणत हात हलवत डॉ. रोबोनी आमच्याकडे पाहून स्वागतपर हास्य केलं. माझ्या हातात हात घेऊन त्यांनी हस्तांदोलनदेखील केलं. त्यांच्या डोक्यावरच्या अँटिनामधून ‘बीम… बीम…’ असा सूक्ष्म आवाज येतच होता.
‘‘स्मिताजी, तुमचा चेहेराच सांगतोय की तुम्हाला सर्दी-पडशाचा त्रास आहे. हो ना?’’ डॉ. रोबोनी स्मिताला विचारलं.
‘‘हो ना…’’ स्मितानं आपल्या तक्रारींचा पाढा वाचला. ‘‘निलगिरी, विक्स, रबेक्स, टायगर बामपासून ते आल्याची वडी, ज्येष्ठ मधाच्या काढ्यापर्यंत सारे प्रकार झाले पण गुण येत नाही.’’
‘‘अहो… नॅचरोपॅथी, अ‍ॅलोपॅथी, होमियोपॅथी, आयुर्वेदिक, युनानी सारे प्रकार करून झाले.’’
त्रासिक चेहेरा करून मी देखील म्हणालो, ‘‘कुठलीही पॅथी शिल्लक ठेवली नाही. योगा, हटयोगा, पंचकर्म थेरपी सर्व काही झाल्या.’’
‘‘काही काळजी करू नका. सर्व काही ठीक होईल.’’ डॉ. रोबो इतर डॉक्टर देतात तसा धीर देत म्हणाले.
यानंतर डॉ. रोबोनी प्रथम संगणक उघडून स्मिताचा बायोडेटा व दुखण्याचं स्वरूप नीट पाहून घेतलं. समोर भिंतीवरच्या मोठ्या स्क्रीनवर आम्हालादेखील हे सारं दिसत होतं.

मग त्यांनी स्मिताला तोंड उघडून ‘आऽऽ’ वासायला लावलं. नंतर जीभ दाखवायला सांगितलं. त्यांच्याकडे अत्याधुनिक असा अल्ट्रा सॉनिक स्टेथॅस्कोप होता. तो छातीला लावताच पडद्यावर तरंग लाटांसारख्या वेगवेगळ्या रेषा दिसू लागल्या. स्मिताकडं पाहून ते पुन्हा मिस्कील हसून म्हणाले, ‘‘स्मिताजी, तुम्हाला सर्दीची डीप अ‍ॅलर्जी आहे हे तर स्पष्टच आहे, पण त्यावर आमच्याकडे रामबाण उपायदेखील आहेत. कसलीच काळजी करू नका. नाडी बघू बरं.’’ असं म्हणून त्यांनी स्मिताचा उजवा तळहात हातात घेतला. नाडी तपासताना समोरच्या पडद्यावर स्मिताचा नाडीग्राफच दिसत होता. तिच्या हृदयाच्या हालचाली… फुफ्फुसं, यकृत आणि किडनीच्या कार्याचं लाईव्ह चित्रण तिथं दिसत होतं.
तपासणी चालू असतानाच संगणकाच्या प्रिंटरमधून काही रिपोर्टस एकापाठोपाठ बाहेर येत होते.
डॉ. रोबोनी मग सार्‍या प्रिंट्स तपासून पाहिल्या. त्यांनी स्मिताला उठायला सांगितलं.
एका रिपोर्टवर बोट ठेवून ते म्हणाले, ‘‘स्मिताजी, तुमचे रिपोर्ट तुम्हाला सर्दीची डीप ऍलर्जी आहे हे स्पष्टच दाखवतात. पण रोगाचं मूळ कारण शोधायचं तर तुमच्या मिस्टरांची पण तपासणी करायला लागेल.’’
‘‘माझी तपासणी कशाला?’’ मी आश्चर्यानं बुचकळ्यात पडून विचारलं.
‘‘त्याचं काय आहे, अ‍ॅलर्जीचा प्रसार व्हायरल इन्फेक्शननं देखील होऊ शकतो. संपर्कानंदेखील अ‍ॅलर्जी एकाकडून दुसर्‍याकडं जाते.’’ डॉ. रोबो म्हणाले.
‘‘अहो, पण मला मुळी सर्दी नाहीच.’’ मी चिडूनच पण नाराजीनं म्हणालो, ‘‘मग माझ्याकडून स्मिताकडं अ‍ॅलर्जीचं संक्रमण होण्याचा प्रश्नच येतोच कुठे?’’
‘‘टु बी ऑन सेफर साईड, मिस्टर चित्रे… तुमची तपासणी करावीच लागेल. अहो, अ‍ॅलर्जी चुंबन घेतल्यानंदेखील होऊ शकते.’’ डॉ. रोबोनी मला बखोटीला धरूनच टेबलावर आडवं केलं.
‘‘बापरे, म्हणजे उद्या असं काही रिपोर्टमध्ये निष्पन्न झालं तर स्मिताची चुंबनं घेणंदेखील मला बंद करावं लागेल काय?’’
नाइलाजानं का होईना माझ्याही सर्व तपासण्या पार पडल्या. सर्व रिपोर्ट बाहेर आले.
डॉ. रोबो म्हणाले, ‘‘तुमचे दोघांचे रिपोर्ट एकत्र ठवून मॅचिंग करून पाहावे लागतील, त्याशिवाय स्मिताजींच्या अ‍ॅलर्जीचं कोडं उलगडणार नाही.’’
‘‘अहो हे काय? कसले मॅचिंग करता? वधू-वर संशोधन आहे का हे, कुंडली जुळते का बघायला. लग्नाआधी आमचे 36 गुण मुळातच जुळलेले आहेत. आमच्या राशीत ना मंगळ ना शनी.’’ मी वरच्या पट्टीत आवाज चढवूनच म्हणालो.
त्यावर डॉ. रोबो शांतपणे म्हणाले, ‘‘हे वधू-वर संशोधन नाही हे खरं. पण अ‍ॅलर्जी शोधायची तर तुमचे दोघांचे डी.एन.ए. मॅच करून बघणं आवश्यक आहे. याला दोन-तीन दिवस लागतील. त्याची तपासणी आमच्या फ्लोरिडातल्या फार्मा लॅबमध्ये होते. रिपोर्ट आले की आमची रिसेप्शनिस्ट तुम्हाला अपॉइंटमेंट देईल. ठीके. पुन्हा भेटू तेव्हा चर्चा करू. बाय. सी ऽऽ यू.’’
‘‘पण डॉक्टर, मग काय करावं लागेल मला?’’ स्मिता न राहून म्हणाली.
‘‘अ‍ॅलर्जीचं मूळ सापडलं की तुम्हाला डोक्याचं सर्व्हिसिंग करून घ्यावं लागेल. चुटकीसरशी सर्दी पळून जाईल तुमची. काही काळजी करू नका.’’ डॉ. रोबो म्हणाले.

‘‘बापरे!’’ स्मिता घाबरून म्हणाली, ‘‘डोक्याचं सर्व्हिसिंग?? हा काय प्रकार आहे?’’
‘‘अहो, गाडीचं सर्व्हिसिंग करतात ना, तसंच डोक्याचं सर्व्हिसिंग करतात.’’ डॉ रोबो म्हणाले, ‘‘आपल्या मेंदूमध्ये अनेक प्रकारची कार्य करणारी केंद्रकं असतात. ही केंद्रक सर्व शरीरावर नियंत्रण करतात. खाणं, पिणं, बोलणं, वास घेणं, श्वास घेणं, हसणं, रडणं, खिदळणं, तहान, भूक, आनंद, सुख, दुःख सर्व भावभावना यांचे संवेदक बिंदू मेंदूत आपली आपली कामं पार पाडत असतात.’’
‘‘पण डॉक्टर, मेंदूचा आणि सर्दीचा संबंधच काय?’’ मी न राहवून विचारलं.
‘‘होय, फार मोठा संबंध आहे.’’ डॉ. रोबो म्हणाले, ‘‘मोठ्या मेंदूमध्ये अगदी मागच्या बाजूला अ‍ॅलर्जीचं केंद्रक असतं. तिथून सर्व प्रकारच्या अ‍ॅलर्जीचं नियंत्रण होतं. या केंद्रकाचं सर्व्हिसिंग केलं तर सर्व प्रकारच्या अ‍ॅलर्जी नष्ट होऊ शकतात. तुमची सर्दी पळालीच समजा.’’
डोक्याचं सर्व्हिसिंग म्हणजे अतिशय गुंतागुंतीचं, नाजूक आणि अवघड ऑपरेशन असणार या कल्पनेनंच स्मिता घाबरली. त्यामुळे एक क्षणभर पण न थांबता ती तपासणी थिएटरच्या बाहेर पळाली.

तरीही मला काही शंका-कुशंका विचारायच्या म्हणून तिथंच घुटमळत मी डॉक्टरांना विचारलं, ‘‘डॉक्टर, हे ऑपरेशन म्हणजे नक्की काय करता? ’’
‘‘वेल… डोकं सर्व्हिसिंगला टाकायचं म्हणजे डोक्याची सर्जरी करून डोकं धडावेगळं करायचं. म्हणजे एक प्रकारे डोक्यावर करण्याचं सर्जिकल स्ट्राइकच म्हणाना.’’ डॉ. रोबो खो खो हसून विनोदानं म्हणाले, सर्जिकल स्ट्राइक केल्यावर तुमचं डोकं पंधरा दिवस ते एक महिना तरी बाजूला काढून ठेवावंच लागेल.’’
‘‘पण मग तोपर्यंत वेगळ्या केलेल्या धडाचं काय? ते कुठं ठेवता?’’ मी विचारलं. माझ्या हृदयाची धडधड अर्थातच वाढायला लागली.
‘‘त्याला दोन पर्याय आहेत.’’ डॉ रोबो म्हणाले, ‘‘एक तर तुमच्या बायकोचं धड नॅनो कोल्ड स्टोरेजमध्ये सुरक्षित ठेवलं जाईल. दुसरा पर्याय म्हणजे तुमच्या बायकोच्या धडाला दुसर्‍या कोणत्याही व्यक्तीचं डोकं तात्पुरतं जोडून मिळेल. ही व्यवस्था अगदी गोपनीय राहील.’’
डॉक्टरांचा दुसरा पर्याय ऐकून माझं कुतूहल वाढलं. मी त्यांना उत्सुकतेनं विचारलं, ‘‘डॉक्टर, पण बायकोच्या धडाला दुसर्‍या कुणाचं डोके तुम्ही तात्पुरतं जोडून देणार?’’
‘‘तो तुमचा चॉईस असेल.’’ डॉक्टर म्हणाले, ‘‘आमच्याकडे स्त्रियांच्या अनेक मॉडेल्सच्या डोक्यांचा चार्ट उपलब्ध आहे. तुम्ही फक्त कोणतं डोक जोडायचं त्याची निवड करा.’’
डॉक्टरांनी माझ्या हातात नानाविध मॉडेल्सच्या डोक्यांचा चार्ट दिला आणि ते म्हणाले, ‘‘अर्थात याचे एक्स्ट्रा चार्जेस पडतील. प्रतिदिन अंदाजे एक लाख रुपये. त्यासाठी फायनान्स कंपन्या इ.एम.आय. वर कर्जदेखील उपलब्ध करून देतात.’’
मी मोठ्या आतुरतेनं त्या चार्टमधले चेहेरे न्याहाळले, तर काय आश्‍चर्य… त्यात माधुरी, करीना, कतरीनापासून ते प्रियांका, कंगना, दीपिका, सोनम, अनुष्का, जॅकलिनसारखी दिसणारी अनेक जणींची डोकी उपलब्ध होती. पाश्चिमात्य मॉडेल्समध्येदेखील सोफिया लॉरेन, मरिलीन मन्रो, जेनीफर, स्कारलेट, नताली, एम्मा यांचादेखील त्यात समावेश होता. हाय काय नि नाय काय?
मी स्मिताच्या डोक्याच्या जागी दुसर्‍या कुणाचं डोकं जोडून घ्यावं याची आभासी कल्पना करता करता अगदी हुरळूनच गेलो नि रोमांचित झालो. काय सुंदर कल्पना होती. वेळ पडली तर रीण काढून सण साजरा करायचा असं मी मनाशी पक्कं ठरवूनच तपासणी थिएटरच्या बाहेर आलो. आपल्या चॉइसचं डोकं स्मिताच्या धडाला जोडून घेतलं की महिनाभर मज्जाच मज्जा.
ऐश करो…

घरी गेल्यावर स्मिताला मी डोक्यावरचं सर्जिकल स्ट्राईक किती महत्त्वाचं आहे आणि डोक्याचं सर्व्हिसिंग करून घेणं किती अगत्याचं आहे हे पटवून देण्याचा सपाटाच लावला.
‘‘अगं, डॉ. रोबोनी शंभर टक्के खात्री दिलीय. तुझी सर्दी, पडसे, डोकेदुखी मुळासकट कायमची नाहीशी होत असेल तर काय हरकत आहे डोक्यावर सर्जिकल स्ट्राइक करून घ्यायला. धीर धरी रे धीरा पोटी …असती फळे रसाळ गोमटी.’’ मी म्हणालो.
त्या वेळी अर्थातच कल्पनेनं स्मिताच्या धडाला मी मनातून धीराधीरानं एका पाठोपाठ एकीएकीची रसाळ गोमटी डोकी लावून पाहत होतो.
‘‘ते काही नाही. मी तुझं अजिबात ऐकणार नाही. डोक्यावर सर्जिकल स्ट्राइक करायचा म्हणजे करायचाच.’’ मी ठासून म्हणालो.
‘‘अहो, मी अजिबात त्या फंदात काही पडणार नाही. भले माझं सर्दीचं नाक कापायची वेळ आली तरी चालेल, पण काही झालं तरी गळा कापून घ्यायची नाही मी.’’ स्मिताही ठामपणे म्हणाली.
‘‘अगं, असं काय करतेस? तुझ्यासाठी वाट्टेल ते करायची माझी तयारी आहे. गरज पडल्यास मी कर्ज काढीन पण तुझं डोक्याचं सर्व्हिसिंग करणारच.’’
अर्थातच पडद्यामागचं माझं गणित सुज्ञ वाचकांना सांगायला नकोच.
चार दिवसांनी मला ‘नॅनो हेल्थ क्लिनिक’चा कॉल आला. अर्थात पुढील मेडिकल सल्ल्यासाठी त्यांनी आम्हाला बोलावलं होतं. स्मिता काही क्लिनिकला यायला अजिबात तयार होईना.

ती म्हणाली, ‘‘ज्या गावाला मला जायचं नाही, त्या गावचा पत्ता विचारायचाच का?’’
अखेर हो नाही करता स्मितानं मला डी.एन.ए.चा मॅचिंग रिपोर्ट मी एकट्यानं पाहून यावा आणि डॉक्टर काय सल्ला देतात त्याची माहिती घेऊन यावी या गोष्टीला संमती दिली.
मोठ्या उत्साहात नवी स्वप्नं रंगवत मी ‘नॅनो हेल्थ क्लिनिक’ची पुढली अपॉइंटमेंट घेऊन ठरल्या दिवशी तिथं हजर झालो.
स्मिताची गैरहजेरी माझ्या फायद्याचीच होती. डॉ. रोबोबरोबर मी अधिक खासगी व मोकळेपणाने बोलू शकणार होतो. स्मिताच्या डोक्याच्या जागी कुणाचं डोकं बसवून घ्यायचं याचे अधिक पर्याय मला निवांतपणे पाहता येणार होते.
इतक्यात गेल्या वेळचा असिस्टंट रोबो नेहमीप्रमाणे चपळ हालचाली करत हॉलमध्ये आला व माझ्या पुढ्यात येऊन उभा राहिला. ‘‘मिस्टर चित्रे, चला तुम्हाला आत मध्ये बोलवलंय.’’
मी त्याच्या पाठोपाठ ‘वैद्यकीय सल्ला’ अशी नेमप्लेट असलेल्या दालनात गेलो. तिथं डॉ. रोबो आधीपासूनच बसलेले होते. त्यांनी माझं मोठ्यानं हसूनच स्वागत केलं.
‘‘मिसेस स्मिता कुठं आहेत? त्यांना नाही का आणलंत?’’ त्यांनी विचारलं.
‘‘स्मिताचं डोकं आज जास्तच दुखतंय. त्यामुळे मी एकटाच आलो.’’ मी म्हणालो.
‘‘ठीक आहे. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. ’’ डॉ. रोबो मला मिस्कीलपणे न्याहाळत म्हणाले, ‘‘इट्स ऑल राइट. तुमच्या दोघांचे डी.एन.ए.चे मॅचिंग रिपोर्ट माझ्याकडे तपासून आलेत बरं का मिस्टर चित्रे.’’
‘‘हो का…’’ मी उत्सुकतेनं बोललो, ‘‘काय आहे आमच्या रिपोर्टमध्ये?’’
‘‘स्मिताजींचं हार्दिक अभिनंदन! त्यांच्या डोकेदुखीच्या अ‍ॅलर्जीचं मूळ कारण सापडलं आहे.’’ डॉ. रोबो पॉज घेऊन म्हणाले.
‘‘स्मितातर्फे मी तुम्हाला धन्यवादच देतो डॉक्टर.’’ मी अधीर होत विचारलं, ‘‘काय आहे बरं रिपोर्टमध्ये अ‍ॅलर्जीचं मूळ कारण?’’
‘‘अहो, तुमच्यातूनच त्यांच्यामध्ये अ‍ॅलर्जी परिवर्तित म्हणजे ट्रान्सफॉर्म होते आहे.’’ इति डॉ. रोबो.
‘‘ती कशी?’’ मी चकित होऊन विचारलं.
‘‘अहो, तुम्ही जेव्हा स्मिताजींचं चुंबन घेता तेव्हा त्या चुंबनातूनच त्यांना अ‍ॅलर्जी होते आहे.’’ डॉ. रोबोनी आमच्या चुंबनांचा पंचनामाच केला .
‘‘पण डॉक्टर, चुंबनातून सर्दीची अ‍ॅलर्जी कशी काय ट्रान्सफॉर्म होते, हे नाही समजलं मला.’’ मी शंका काढली.
‘‘त्याचं असं आहे, चुंबन घेताना तुमच्या मेंदूतलं सर्दीचं केंद्रक जागृत होतं व ते प्रवाहित होऊन स्मिताजींकडे हस्तांतरित होतं. थोडक्यात, तुमची सुप्त सर्दी चुंबनातून त्यांच्यात घुसते. परिणामी स्मिताजींचं सर्दी-पडसं वाढून अंतिम प्रवास त्यांच्या डोकेदुखीकडे होतो.’’ डॉक्टर रोबो शांत चित्तानं म्हणाले. हे चुंबनायन ऐकून मी खजील झालो खरा पण अशा उघड पंचनाम्यामुळे माझं पित्तच खवळलं होतं.
‘‘काय सांगता, पण स्मिताच्या डोक्यावर सर्जिकल स्ट्राइक करून जर सर्व काही ऑल वेल होणार असेल तर माझी कसलीच हरकत नाही.’’ मी माझा मुद्दा लावून धरत म्हणालो.

‘‘मिस्टर चित्रे, डोक्यावर सर्जिकल स्ट्राइक तर करावंच लागेल, पण ते स्मिताजींच्या डोक्यावर नव्हे, तर तुमच्या डोक्यावर करावं लागेल.’’ डॉ. रोबो आता गंभीरपणे म्हणाले, ‘‘वाटल्यास तुम्ही आजच अ‍ॅडमिट व्हा. शुभस्य शीघ्रम. तुमच्या डोक्याचं इमर्जन्सी सर्व्हिसिंग करून घेऊ.’’
‘‘हॅलो डॉक्टर, असं अचानक काय झालं? माझ्या डोक्याचं सर्व्हिसिंग का म्हणून करावं लागेल?’’ हे विचारताना मला घाम फुटायला लागला होता.
‘‘होय, तुमच्या मेंदूमध्ये अ‍ॅलर्जीचं जे केंद्रक आहे तिथंच सारा बिघाड आहे ना.’’ डॉ. रोबो म्हणाले, ‘‘ते स्वच्छ करावं लागेल. त्याचं शुद्धीकरण झालं की तुम्ही स्मिताजींचं मुक्तपणे चुंबन घेऊ शकता. शिवाय स्मिता मॅम डोकेदुखीच्या अ‍ॅलर्जीतून आपोआपच मुक्त होतील.’’
हे काय भलतंच झालं? मी काहीसा भांबावलोच. ‘आ बैल मुझे मार’ अशी माझी अवस्था झाली.
तरी पण डॉक्टरना मी धीरानं विचारलं, ‘‘समजा माझ्या डोक्याचं सर्जिकल स्ट्राइक करून डोकं सर्व्हिसिंगला टाकलं तर माझ्या धडाचं काय करणार तुम्ही? ते तर नॅनो डीप कोल्ड स्टोअरेजमध्येच ठेवणार ना.’’
‘‘नाही. तो चॉइस स्मिताजींचा असेल. तुमच्या धडाला तात्पुरतं कुणाचं डोकं लावून द्यायचं असेल तर ते ठरवण्याचा हक्क स्मिताजींचा असेल.’’ डॉ. रोबो खो खो हसून म्हणाले.
हे ऐकून माझं डोकं गरगरायला लागलं. मी माझं डोकं दोन्ही हातांनी गच्च धरून ठेवलं. मेंदूत झिणझिण्या यायला लागल्या. माझा मेंदू ऑपरेशन थिएटरमध्ये असून स्मिता मात्र तिच्या आवडीच्या हिरोचं डोकं माझ्या धडाला लावून एन्जॉय करते आहे असं चित्र माझ्या डोळ्यांपुढे दिसायला लागलं. धर्मेंद्र, अमिताभपासून आमिर, सलमान, शाहरुख, रणबीर, खुराना, अर्जुनपर्यंत सारे चेहरे पुढ्यात नाचायला लागले.

‘‘डॉ. रोबो, धन्यवाद… मला यावर विचार करावा लागेल.’’ सावध होऊन मी म्हणालो आणि खाडकन उठून उभा राहिलो.
हातचं सावज जाऊ नये म्हणून डॉ. रोबो म्हणाले, ‘‘तुम्ही आजच अ‍ॅडमिट झालात तर पन्नास टक्के डिस्काउंटची स्पेशल ऑफर आहे माझ्याकडे.’’
वैतागलेला मी अबाउट टर्न करत काहीही न बोलता त्यांच्या टेबलावरचे आमचे सगळे रिपोर्ट गोळा करून नि तोपर्यंत आलेल्या प्रचंड बिलाचा भरणा करून नॅनो हेल्थ क्लिनिकमधून काढता पाय घेतला. मी वाटेत सगळे रिपोर्ट्स सार्वजनिक कचरा कुंडीत टाकून दिले.
घरी आलो तेव्हा चिंताग्रस्त स्मिता माझी आतुरतेनं वाट पाहत होतीच. तिच्याकडे चोरट्या नजरेनं पाहत मी म्हणालो, ‘‘स्मिता, फक्कडपैकी आलं, वेलची, तुळशीची पानं घातलेला चहा करायला टाक पाहू. तुझं ऑपरेशन टळलं.’’
‘‘काय झालं? काय म्हणाले डॉक्टर?’’ स्मितानं आनंदित होऊन विचारलं.
‘‘आपल्या डी.एन.ए. चे 36 गुणदेखील जुळतात म्हणाले. सबब ना तुला ना मला कसलीच अ‍ॅलर्जी नाही. तुझी सर्दी, पडसं, डोकेदुखी अ‍ॅलर्जी मुक्त आहे.’’
‘‘अरेच्या! मग डोक्याच्या सर्जिकल स्ट्राइकचं काय झालं?’’ स्मिता म्हणाली.

‘‘त्यांनी चुंबनांचे स्ट्राइकस वाढवायला सांगितले. दीर्घ श्वास घेऊन अनुलोम-विलोम न करता डोळे मिटून योगातली प्रदीर्घ चुंबनं घ्यायची सवय करा म्हणजे चक्क चुंबनाचे सर्जिकल स्ट्राइकच करा असं ते म्हणाले. तुझी सर्दी पळालीच समजा. ती घालवण्याचा हा सोपा एकमेव रामबाण उपाय त्यांनी मला पुन्हा पुन्हा करायला सांगितला.’’ स्मिताला अधिकच जवळ ओढून घेत तिच्यावर सर्जिकल स्ट्राइक करण्याच्या इराद्यानं मी म्हणालो.
‘‘इश्श’’ लाजलेल्या स्मिताचा प्रतिकार अर्थात कधीचाच संपला होता. दोघांचे प्रदीर्घ चुंबनांचे स्ट्राइक रेट विनाथांबा वाढले होते.

– सुरेशचंद्र वाघ

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.