Now Reading
‘शहनाई’ बजे ना बजे

‘शहनाई’ बजे ना बजे

Menaka Prakashan

‘‘चला, मुलीचा खास हिरवा मास्क आणा; नवे ग्लोव्ह्ज आणा, सॅनिटायझर आणा, चला चला!’’ गुरुजी, मास्काधिष्ठित लग्नसोहळा संपन्न करत होते. ‘शहनाई’ हॉलची तारीख रद्द केली, तरी सोशल डिस्टन्स ठेवून, ‘कोरोन्टाईन’मध्ये व्हॅलेन्टाईन एकत्र आलेच! कसे? कुठे? एका सोशल मॅरेजची, फुल्ल सॅनिटराईज्ड लव्ह स्टोरी! ‘शहनाई’ बजे ना बजे!

मकरंदचं हे नवं प्रेमप्रकरण मार्गी लागतंय न लागतंच, तोच हे नवं काय झेंगाट मागे लागलं ते त्याला कळेना. विशेष म्हणजे वीणाकडून सहज होकार मिळाला नि तिच्या माहेराहूनही औषधालाही नकार मिळाला नाही. ते म्हणजे कुठल्याही प्रेमविवाहाला अजिबात म्हणजे अजिबातच न शोभणारं होतं. निदान एखादा कुणीतरी अतिदूरचा नातेवाईक तरी आक्षेप घेऊन आपलं उरलंसुरलं अस्तित्व दाखवेल हाही त्याचा अंदाज चुकला, त्यामुळे अगदी झणझणीत नाही, पण एवढं मिळमिळीत लव्ह मॅरेज- म्हणजे अगदीच रविवारच्या दिवशी भेंडवणीचं जेवण जेवल्यासारखं होत होतं.
त्यानं वीणाला एका गुलाबी होऊ शकल्या असत्या अशा क्षणी पुन्हा पुन्हा विचारूनही पाहिलं, ‘‘म्हणजे? एका- म्हणजे- एकाही नातेवाइकाचा विरोध नाही आपल्या लग्नाला?!’’

वीणानं कॉफीचा कपच चिअर्ससारखा उंचावत म्हटलं, ‘‘आता पुन्हा विचारलंस तर तो एक विरोधक मीच होईन!’’
मकरंदला वीणाचं हे मोकळेपण आवडलं. तितक्यात वेटरनं येऊन सांगितलं, ‘‘मास्क लावा म्हणून ऑर्डर आहे मालकाची!’’
‘‘अरे, पण कॉफी घेणार कशी? मास्क लावून?’’
‘‘ते तुमचं तुम्ही ठरवा. एक तर आम्ही उद्यापासून हॉटेल बंद करणार आहोत. तुम्ही बहुधा शेवटचं गिर्‍हाईक!’’
वीणा खुदकन् हसली नि तिनं मास्क चढवला.
मकरंदचा पार रसभंग झाला. चांगलं डोळे भरून पाहता यावं म्हणून या जरा एकांतातल्या नि बहुधा शुकशुकाटच असणार्‍या कॉफीहाऊसमध्ये आपण आलो काय नि वीणाचा पूर्ण चेहरा बघण्याऐवजी ‘मास्क’वादी बघावं लागतंय काय!
स्कूटरला किक् मारता मारता मकरंद म्हणाला, ‘‘आता उद्यापासून ही जागाही बंद!’’
‘‘मकरंद, आता महिन्या-दीड महिन्याचा तर प्रश्‍न आहे. तोवर सगळं वातावरण अगदी तुला नि मलाही हवं तसं होईल बघ. ‘शहनाई’ हॉलचं बुकिंग नक्की झालंय!’’
वीणाचा प्रचंड आशावाद पाहून मकरंद नाही म्हटलं तरी सुखावलाच. मिस्कीलपणे त्यानं तिचा गाल ओढण्याचा प्रयत्न केला, पण मास्कच कानाच्या खुंटीवरून घसरला.
‘‘अरे, माझा मास्क! परवाच नवा आणलाय.’’
‘‘अगं, प्यार सलामत तो मास्क पचास!’’
‘‘ते खरंय, पण मी एकच आहे!’’
‘‘ते बरंय, नाहीतर मास्क लावलेल्या कुणालाही वीणा समजून…’’
मकरंद जरा रुमानी होत तिला बिलगू लागताच वीणानं म्हटलं, ‘‘मकरंद, सोशल डिस्टन्सिंगचा काटेकोर नियम? तो पाळायला सांगेल हं तो मालक.’’
‘‘अरे देवा!’’
स्कूटरला किक् मारून दोघं निघाले. स्कूटरला गती आली.
वीणाला वाटलं, मकरंदच्या पाठीवर जरा रेलावं… तोंडाला ‘मास्क’ असला म्हणून काय आतून उमलायच्या भावनांना थोडाच मास्क आहे?
मकरंदलाही वाटत होतं, कुठलं तरी निमित्त काढावं! स्कूटर थांबवावी! हा ओठांवरचा अंतरपाट दूर करावा आणि पुढच्या भेटीपर्यंत पुरेल अशी धुंद आठवण घेऊन जावी. ‘ब्रह्मांड’ सोसायटीत वीणाला घराजवळ ड्रॉप करून मकरंदनं डाव्या हातानं स्वतःचा मास्क दूर करत विचारलं, ‘‘पुढच्या वेळी पूर्ण चेहरा दिसणार ना?’’
‘‘पुरे पुरे! सात-आठ दिवसांत इलाज सापडेल. तोपर्यंत ‘टेक केअर’ मकरंद! पण मी दिलेलं गिफ्ट घरी गेल्यावर बघ नि लगेच कळव मला कसं वाटलं ते!’’
‘‘येस्स! पण वीणा, प्लीज एकदाच तो मास्क…’’
‘‘ओहो! आता मात्र मी रागवेन हं!’’
‘‘रागाव, पण या मास्कच्या आड तुझा तो रागावल्यावर आणखीनच सुंदर दिसणारा चेहरा…’’
‘‘पुरे पुरे! मला कविताबिविता समजत नाहीत हं. मी आहे सोशोची स्टुडंट, तीसुद्धा पपांची!’’
‘‘चंद्राला मास्क लावल्यावर तो कसा दिसेल? तुझ्यासारखा का गं?’’
‘चंद्राला मास्क’ या कल्पनेवर मात्र वीणा झंकारली. ‘‘तू नं- उगीचच इंजिनीअर झालास मकू; कुठे त्या सिमेंट-दगड-विटा न् कुठे तुझा हा चंद्राला मास्क!’’
‘‘वीणुल्या, पण चंद्राचा मक्ता फक्त कवींचा का गं, इंजिनीअर कविता करू शकत नाही. ही बघ- मी काल रात्री तुझ्यासाठी कविता लिहिलीय!’’
वीणाला हे अगदी रोमांचकारी वाटलं. तिला आठवलं, बी.ए.च्या शेवटच्या वर्षाला तिच्यावर मदन फातरफेकर नावाच्या अतिशय हळव्या मुलानं एक कविता केली होती. तेव्हा त्याचा भयंकर भावुक चेहरा पाहून ती मदनपासून चटकन दूर गेली होती.
‘‘कसला विचार करतेयस वीणा?’’
‘‘कवितेचा!’’
‘‘ओह्- कवितेचा!’’
वीणाची तार एकदम तुटली. ‘‘अरे, प्लीज नको. तुझ्या नाही, त्या मदनची कविता आठवली!’’
‘‘म्हणजे, माझ्या आधी तुझ्यावर कुणी..’’
वीणा फिस्सकन हसली, तेव्हा तिच्या मास्कमधूनही ओठ हललेले जाणवले.
‘‘अरे मकरंद, प्रत्येक मुलाला वाटतं, आपणच पाहिले!’’
मकरंदला वाटलं, आता आपली पहिली नि बहुधा शेवटची कविताही खिशातच गुदमरणार.
‘‘बाय द वे, चल वाचून मोकळा हो तुझी कविता!’’
‘‘वाचून मोकळा हो? कविता वाचणं म्हणजे काय- ‘औषध घेऊन मोकळा हो!’ किंवा ‘रडून मोकळा हो!’ असं आहे का?’’
तो आपलं स्वतःलाच म्हणाला, ‘जाऊ दे, कवितेच्या कागदाची घडी अशीच राहू दे!’
‘‘अरे, आता वाच म्हटलं तरी प्रॉब्लेम!’’
‘‘जाऊ दे! फिर कभी!’’
वीणाला हा प्रस्ताव अर्थातच आवडला.
‘‘ठीक. पण मग निघूया? अरे, अजून सगळी खरेदी व्हायचीय लग्नाची!’’
पुन्हा एकदा मकरंदचा तो अनादी संशयात्मा जागा झाला. ‘‘वीणा, होईल ना गं सगळं व्यवस्थित?’’
‘‘काय?’’
‘‘हेच ते, लग्न- हनिमून…’’
वीणा खळखळून हसली नि मकरंदला कळायच्या आत तिनं स्वतःचा मास्क पटकन काढला, नि-
‘‘अगं, पण माझा मास्क तसाच!’’
आपण अगदीच बुवा बेसावध, या जाणिवेनं मकरंद खजिल झाला. तेवढ्यात वीणाचा फोन व्हायब्रेट झाला. ‘‘अरे, घरचाच फोन. चल, निघायला हवं. हे बघ मकू, लग्न अगदी मस्त होईल. पण मकू, टेक केअर. ऐन लग्नाच्या वेळीच नको व्हायला.’’
‘‘काय?’’
‘‘काय? काय?’’
वीणा घराकडे वळली.
‘इतकं सोशल डिस्टन्सिंग? पण हा डिन्टन्सिंगचा काळ लांबणार तर नाही नं…?’ मनातल्या मनात आलेल्या शंकेला त्यानं उडवून लावलं. आजही वीणा पूर्ण चेहर्‍यात दिसली नाही, ही रुखरुख ठेवूनच मकरंद घरी परतला. लिफ्टमध्ये त्याच्या एकदम लक्षात आलं, आपण वीणाचा मास्काधिष्ठित चेहरा आठवून गाणं गुणगुणत आहोत. ‘आधा है चंद्रमा…’
***

पपा-मम्मा थोडे अतिच काळजीत दिसले. ‘व्हॉट हॅपन्ड यार?’ दोघांनी एकमेकांकडे एकदम पाहिलं नि ‘सांगावं का?’ या इशार्‍यानं पुन्हा पाहिलं, पपा-मम्मी असं गूढ का वागतायत? त्याला कळेना.
‘‘आधी संपूर्ण फ्रेश हो. मग बोलू!’’
‘‘ठीक आहे, पण वीणानं दिलेलं गिफ्ट तर बघशील?’’ मकरंद चिडचिडून म्हणाला.
छान, चकचकीत कागदाआड दडलेली सॅनिटायझरची बाटली पाहताच पपा-मम्मा फिस्सकन् हसले. मकरंदला मात्र वीणाकडून इतक्या अन् रोमँटिक गिफ्टची अपेक्षा नव्हती. त्याचा चेहरा मास्क उतरवण्यापूर्वीच उतरला. पण पप्पा मात्र सुखावले. स्वतः सोशॅलॉजीचा प्राध्यापक असल्यामुळे आपल्या ‘डॉटर इन लॉ’नं हा ‘लॉ’ अगदी परफेक्ट पाळला, यामुळे ‘आपला मुलगा बर्‍या घरात पडलाय’ असं त्यांना वाटून गेलं. पण हा विनोद, त्यानं मकरंदचा त्याहून पडलेला चेहरा पाहून करण्याचं टाळलं.
‘‘बोला!’’ फ्रेश होताच मकरंदनं एक कटाक्ष पपांकडे नि दुसरा ममीकडे टाकत विचारलं.
दोघांनी पुन्हा एकमेकांकडे गूढ नि रहस्यमय नजरेनं पाहिलं.
‘‘अरे यार, हा काय सेव्हंटीतला पिक्चर सुरूय का? प्रेम चोप्रा नि बिन्दू एकमेकांकडे पाहतायत नि ‘बोल राका’ म्हणतायत!’’
ममी म्हणाली, ‘‘बेटा, मन जरा खंबीर कर.’’
‘‘काय झालं? वीणाच्या घरून काही विरोध?’’ मकरंदनं थेट मुद्द्यालाच हात घातला.
‘‘घरून काही विरोध नाही, पण आता तुमचं लग्न..’’
‘‘काऽऽय? मोडलं?’’
‘‘छे रे! मोडायला ते काय खेळणं आहे का? ‘शहनाई’ हॉलच्या मॅनेजरचा फोन आला होता.’’
‘‘अरे, अ‍ॅडव्हान्स दिलाय वीणाच्या पपांनी!’’
‘‘तरीही…’’
‘‘अजून डिमांड केलीय का?’’
पपा-ममींनी बोलाच्या आधीच मकरंद शंका मांडत होता.
‘‘तारखा रद्द. बुकिंग कॅन्सल केलंय आपलं.’’
आता मकरंद ताडकन् उडालाच. तेवढ्यात त्याचा फोन, ‘ये क्या हुआ? कब हुआ?’ गुणगुणला. ममी कडाडली, ‘‘तरी मी म्हणत होते, बदल ही रिंगटोन, आमच्यावेळची आहे.’’
ममी फोडणीसारखी तडतडली, पण ‘‘आता मला आवडतात सेवन्टीतली गाणी, आणि रिंगटोन बदलून काय होणार आहे का? हॅलोऽऽ’’ ममीवर करवादत मकरंदनं सूर बदलला.
‘‘हाय मकू, गिफ्ट कसंय?’’
‘‘वाईट अन् रोमँटिक. अगदी गोली मारो भेजेमें…’’
मकरंद इतका डेस्परेट झाला होता की, दोन्ही बाजूंनी पपा-ममी ‘कूल कूल’ असं खुणावत राहिले.
वीणा तर टूथपेस्ट स्वतःहून बाहेर यावी तशी हसत होती.
‘‘व्हॉट हॅपन्ड? कूल डाऊन!’’
‘‘फूल डाऊन झालोय.’’ मकरंद फिस्कारला.
‘‘का?’’
‘‘शहनाई हॉलनं तारीख कॅन्सल केलीय कारण लॉकडाऊन…’’
‘‘सो व्हॉट? व्हाय आर यू सो डेस्परेट?’’
‘‘वीणा, आर यू ओके? काहीच वाटत नाहीय का तुला?’’
‘‘नाही, मला दुपारीच अंदाज आला होता. पपा-ममीला मेसेज आलाय.’’
‘‘तरीही तू?’’
‘‘हो, लग्न तर होणारच! शहनाई बजे ना बजे!’’
हातात एखादा उंदीर धरावा त्याप्रमाणे तो फोनकडे वेंधळ्यासारखा बघतच राहिला.
पपा-ममी दोघंही एकाच वेळी त्याच्याकडे आले.
‘‘काय म्हणतेय वीणा?’’
‘‘शी इज सो कूल पपा!’’
पपा खुलले. ‘‘दॅट्स द स्पिरिट! शेवटी स्टुडंट कुणाची आहे?’’
अभिमानानं छाती फुगवत पपांनी ममीला विचारलं.
ममीनं थोडं रोमँटिक होत दुर्लक्ष केलं.
‘‘चांगलं थाटात करायचं होतं हो लग्न!’’
‘‘हो नं, नि ते पुन्हा पुन्हा थोडं होतं!’’
पपाही ममीच्या जरा जवळ सरकले.
‘‘पुरे, आता तुम्हीही जरा कूल कूल व्हा!’’
‘‘येस्स! ट्राईंग!’’
***

कुशी बदलून बदलून उशीही कंटाळली असेल. मकरंदला काही सुचेना. त्याला नाही नाही ते सुचू लागलं. उघड्या डोळ्यांनी स्वप्नंही नाक ओढत, गालाचा मुका घेतात, नि चिडवतात असं त्याला वाटू लागलं. त्याच्यासमोर कल्पनेतलं लग्नचित्र समोर आलं.
गुरुजी म्हणताहेत, ‘चला, मुलीचा हिरवा मास्क आणा, सॅनिटायझर कुठेय?’ तर मध्येच कुणीतरी आगाऊ नातेवाईक ‘सोशल डिस्टन्सिंग! सोशल डिस्टन्सिंग!’ म्हणत वीणात नि आपल्यात अंतर निर्माण करतोय. पन्नास जणच बोलावलेत, तेही कोण आलेत ते कळत नाहीयेत. मास्क लावल्यानं सर्व बायका- थोड्याफार फरकानं सारख्याच दिसताहेत! दोन म्हातार्‍या बायका- त्यांना नमस्कार करायला आलेल्या नातींना विचारतायत, ‘‘अग्गोबाई! कोण तू? हेमंताची नीलू का? ओळखलंच नाही!’’
‘‘नाही आजी, मी जनार्दनची विनू!’’
‘‘हो क्का? डोळाभर पाहीन म्हटलं, पण आता केव्हा दिसशील कोण जाणे!’’
स्वागताला थांबलेल्या दोघी, येणार्‍या वर्‍हाड्यांच्या अंगावर गुलाब पाण्याऐवजी सॅनिटायझर फवारताहेत नि रुखवताच्या टेबलावर तर भलत्याच गोष्टी दिसत आहेत- आयुष्मान काढ्याच्या बाटल्या, दोघांची नावं विणलेले मास्क! हनी आणि मून लिहिलेले हँड ग्लोव्ह्ज! तापमापक यंत्र! लग्नानंतरचे अनुलोम- विलोम- हे परमपूज्य श्यामदेवबाबांचं पुस्तक!
गुरुजींनी सप्तपदीचं अंतर तर वाढवलं आहेच, पण सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं म्हणून शेल्याची गाठ आधीच सोडवली आहे! यज्ञविधी करतानाही ‘डाव्या हातानं उजव्या हाताला हात लावा’ हेही केलं जात नाही.
आपल्याला पन्नास निमंत्रितांत बोलावलं नाही म्हणून वैतागलेल्या नातेवाइकांची फोनवरील रुसवाफुगवी सुरू आहे.
ओह्! म्हणजे असं होणार तर आपलं कोरोन्टाईन मॅरेज!
मग न झालेलंच बरं!
त्याला वाटलं, वीणाला आता फोन करावा. आपला वैताग सांगावा. पण नको. ती तर फुल पॉझिटिव्ह आहे. अर्थात लग्न होणारच या विचारात…
पलीकडच्या खोलीतूनही पपांचं घोरणं त्याची येऊ येऊ पाहणारी झोप उडवत होती. झोपेत ममा पपांनाच बहुधा ओरडत असावी.. क्षणभर मकरंदला वाटलं, दोन भलेभक्कम मास्क घ्यावेत नि या दोन घोरोनांना लावावेत, पण त्यानं तो विचार मनातच रद्द केला.
तेवढ्यात त्याला भास झाला.
भासच तो! पण खरा की खोटा म्हणून त्यानं फोन पाहिला.
वीणाचा मिस्ड कॉल!
अँ? वेळ? एक मिनिटापूर्वीचीच? म्हणजे ती पण जागी आहे?
पुन्हा- ‘ये क्या हुआ? क्यों हुआ?’ रिंगटोन वाजली.
‘‘कोण?’’
‘‘नाही येत नं झोप?’’
‘‘नको नको ती स्वप्नं…’’
‘‘तीच हवी हवी ती करून घे!’’
‘‘वीणुल्या, तू जागी?’’
‘‘मला सॉरी म्हणायचं होतं…’’
‘‘प्लीज, म्हणजे तू हे लग्न…’’
‘‘वेडोबा, ते तर होणारच, पण मी तुझी कविता ऐकली नाही. हर्ट केलं का तुला?’’
मकरंदला वाटलं, फोनमधून चटकन वीणाकडे जावं नि मास्क नसलेल्या तिला विनाअट जवळ घ्यावं. टप्पोरे बोलके डोळे चुंबावेत.. एवढं बळ? पेशन्स? तिच्यात? कसा ते विचारावं.
पण फोनमधून असं मध्यरात्री तिच्या ‘ब्रह्मांड’ सोसायटीत, तेही चौदाव्या मजल्यावर जाणं शक्य नव्हतं.
‘‘गप्प का? डिस्टर्ब केलं का?’’
‘‘डिस्टर्ब होतो मघाशी, आता ओके आहे!’’
‘‘मकु, उद्या-परवा भेटू तेव्हा मला तुझ्याकडून एक गिफ्ट पाहिजे.’’
‘‘गिफ्ट?’’
‘‘आधी ‘हो’ म्हण!’’
‘‘पण काय?’’
‘‘आपल्या लग्नाच्या मंगलाष्टका तू लिहायच्यात. मज्जा येईल!’’
मकरंदला ही कल्पनाच भारी रोमहर्षक वाटली.
‘‘अगं, पण ऐकणार कोण? पन्नासजण तर हॉलमध्ये… त्यात तू- मी- गुरुजी- दोघांचे पपा-ममी; हॉलचा व्यवस्थापक सोडून बेचाळीस जण…’’
‘‘त्यात केटररची माणसं…’’
‘‘जेवण आहे? म्हणजे परमिशन आहे?’’
‘‘पॅकेट्स वाटणार जेवणाची! किती वेगळं लग्न! मला तर भारी वाटतंय!’’
तेवढ्यात दिव्याचं बटण दाबण्याचा आवाज, नि खोलीत प्रकाश. समोर डोळे विस्फारून पपा-ममी!
‘‘मक्या, कुणाशी बोलतोयस?’’
‘‘अं?’’
‘‘ओके ना? बघू- ताप नाहीये, पण काढा गरम करते. तो घे! झोप!’’
‘‘वीणाचा फोन आला होता.’’
‘‘कसं शक्य आहे? तुझा फोन आमच्या बेडरूममध्ये चार्जिंगला लावलाय.’’
बापरे!
मग हे हातात काय घेऊन बोलत होतो?
टीव्हीचा रिमोट!
ओह् माय गॉड!
ममीनं काढा आणलाही.
‘‘झोप आता!’’
काढा घशात लोटून मकरंद अंथरुणावर पडला. त्याला वाटलं- पुन्हा मघाचचा भास कंटिन्यू व्हावा. वीणाला कडकडून भेटावं, सोसंल तेवढं डिस्टन्स ठेवून- नि जाग आहेच तर मंगलाष्टकं लिहावी. निदान सुरुवात तरी करावी.. वीणाला गिफ्ट द्यायचीयेत ती… भासात का होईना वचन दिलंय मी!
नि त्यानं- मनातल्या मनात ओळी जुळवायला सुरुवात केली.
‘आली मंगल घटिका समीपही
झालो कोरोन्टाइन!
सोशल डिस्टन्सिंग जपूनही
आली व्हॅलेन्टाईन!’

नि एकदम हॉलमध्ये व्हीडिओ कॉल जागे झाले, न येऊ शकलेले सारे नातेवाईक या सोशल डिस्टन्सिंग मॅरेजला आपापल्या घरातूनच अक्षता टाकत होते- ‘कुर्यात सदा…’

– प्रवीण दवणे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.