Now Reading
व्यर्थ टकळी टिकटॉकची

व्यर्थ टकळी टिकटॉकची

Menaka Prakashan

ऑफिसातून घरी आलो आणि घराची बेल वाजवली. दार उघडलं नि धक्काच बसला तो चिरंजीवांच्या बदललेल्या रूपानं. एरवी अकरावीची परीक्षा झाल्यावर सतत मोबाईल क्रीडेमध्ये मान मोडून गर्क राहणारा, बाह्य जगाचा विसर पडलेला बबलू स्वतः दार उघडायला आला होता. त्यांचं नवीन रूप पाहताच धक्का बसला. डोक्याच्या मागचा दोन्ही कानांमधला तसंच कानांच्या सभोवतालचा केसांचा भाग नवशिक्या न्हाव्यानं खरवडल्यासारखा दिसत होता, त्यातून हिरव्या हिरव्या वेड्यावाकड्या पायवाटा काढल्या होत्या, तर डोईवर लव्हाळी उगवावीत तसा केसांचा सळसळता लांब बुचका. त्याच्या नवीन केशसंभाराकडे बघत म्हटलं, ‘‘केसांच्या वृक्षराईत उवांचं संवर्धन करणार आहेस का? पाळलेल्या उवांना निवांत हिंडण्यासाठी पायवाटा पण छान ठेवल्या आहे. तुझं मस्तक म्हणजे दंडकारण्याचा नकाशा दिसतोय.’’ त्यावर किंचितसं लाजत बबलू म्हणाला, ‘‘बॉक्स कट केलाय आमच्या हेअर ड्रेसरनं. टकळीकर सरांच्या प्रॉस्पेक्टसमध्ये असाच हेअरकट करायला सांगितलाय. हा फोटो बघा.’’

‘‘अरे, हा केसांचा पुंजका म्हणजे सफेद गोट्यावर लव्हाळी उगवावीत तसं दिसतंय.’’ असं मी म्हणताच बायकोचा विस्फोट झाला. ‘‘बबलूला उगाच बोलू नका हं. केसाची पॉप्युलर फॅशन आहे ही. तुम्ही केसांच्या नव्या हेअर स्टाइलला लव्हाळं म्हणताहात, पण तुकाराम महाराजांनीच सांगितलंय ‘महापुरे झाडे जाती तिथे लव्हाळे वाचती.’ तुमच्या टकलावरचे केस महापुरात झाडं कोसळतात तसे गायब झालेत, ते बघितलंत? हल्ली काय फॅशन चाललीये अवगत नाही तुम्हाला.’’ मर्मावर घाव बसला.

तसं विषय बदलत मी म्हटलं, ‘‘ज्या प्रॉस्पेक्टसबद्दल बोललास ते टकळीकर सर काय शिकवतात?’’ त्यावर तत्परतेनं बबलूनं उत्तर दिलं, ‘‘डॅड, मी टकळीकर सरांची टिकटॉक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जॉईन करणार आहे. ते मराठी टिकटॉक क्लिप्सचे जनक मानले जातात. या क्लिप्स बनवण्याचं तंत्रशुद्ध शिक्षण देण्याची इन्स्टिट्यूट चालवतात. येणार्‍या काळात सोशल मीडियावर टिकटॉकपटू जबरदस्त नाव कमावणार याची सरांना खात्री आहे.’’
‘‘टकळीकरांची टिकटॉक इन्स्टिट्यूट ही काय भानगड आहे ते कळेल का?’’ असं मी विचारताच श्रीमती विजेसारखी कडाडली, ‘‘अय्या, तुम्हाला टिकटॉकगुरू टकळीकर माहीत नाहीत? टिकटॉक साइटवरच्या त्यांच्या मराठी टकळ्या खूपच लोकप्रिय झाल्यात. त्यांच्या टकळ्यांवर लाखो प्रेक्षकांची नजर पडलीये.’’
‘‘लाखोंची नजर पडावी इतकं त्याचं टक्कल सुंदर आहे का?’’ मी आश्चर्यानं विचारलं.
‘‘अहो, नजर पडली म्हणजे व्ह्यू मिळालेत. त्यांच्या टिकटॉकवरच्या टकळ्यांना लाखाहून जास्त प्रेक्षकांनी लाईक केलंय. या लाईक्सवर भरपूर कमाई होतेय टकळीकरांची. आमच्या महिला मंडळात तर सगळ्याच महिलांना त्यांच्या टकळ्या आवडतात.’’

एवढ्यात आमची कन्या मोबाइलसमोरचं आसन सोडून नागिणीसारखी फुत्कारली, ‘‘मम्मा, डोंट कॉल टकळी. कॉल इट टिकटॉक क्लिप. त्यांची एकेक क्लिप लाफ्टरचा फाऊंटन क्रियेट करते. डॅड, आपला बबलू साधा ग्रॅज्युएट होऊन काय करणार? जॉब मिळणं इज सो डिफिकल्ट. त्यापेक्षा हा कोर्स करून फेमस टिकटॉक आर्टिस्ट बनला तर ही कॅन मिंट मनी.’’ आमची कन्या इंग्रजीची मराठमोळी चिरफाड करत म्हणाली, ‘‘गेल्या वर्षी टकळीकरांनी बीडमध्ये मराठी टिकटॉक कलाकारांचं गेटटूगेदर घेतलं होतं. इट व्हॉज ग्रॅण्ड गॅदरिंग डॅडी.’’
एवढं ग्रॅण्ड गॅदरिंग घ्यायचं तर बीडमध्ये का घेतलं? मुंबई – पुण्याचे हॉल बंद ठेवले होते?’’ मी कुतूहलानं विचारलं.
‘‘मुंबई पुण्यात मराठी माध्यमाच्या शाळा तरी उरल्यात का? मराठीचं भवितव्य आता खेड्यापाड्यातच बहरणार.’’ आमच्या श्रीमती म्हणाल्या.
‘‘असं? म्हणजे हे मराठी टिकटॉकगुरू त्या चायनीज टिकटॉक अ‍ॅपवर हे टकळ्यांचे खेळ दाखवतात का? कशा प्रकारच्या टकळ्या बनवतात? बघू तरी.’’

एव्हढंच मी विचारताच कन्या आणि चिरंजीव आपापले मोबाईल फोन पकडून माझ्याकडे सरसावले. त्यांच्या त्या मोबाइलच्या इवल्याशा स्क्रीनवर पटापटा चित्रफिती दाखवू लागले. बायकोसमोर नांगी टाकणार्‍या आमच्यासारख्या हतबल नवर्‍याच्या वाईट दशा, प्रियकर प्रेयसीचे रुसवे-फुगवे, आपल्या टकलू नवर्‍याचं डोकं जवळ घेऊन आपल्या भरघोस केशसंभारानं टक्कल झाकून सेल्फी घेणारी प्रिया! अशा टकळ्या बघताना खीखी हसण्याचा आवाज आला की समजायचं टकळी संपली. मग आपण पण हसायचं असा इशारा मिळाला. श्रीमतीनं माझ्या विकपॉइंटवर बोट ठेवत चक्क खंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे तुकडे टकळी म्हणून ऐकवले. त्यानंतर मात्र मला माझ्या अज्ञानाची प्रचंड कीव आली. एवढं होतं ना होतं, तोच माझ्या पुढ्यात बीडच्या संमेलनाचं इतिवृत्त छापलेली वृत्तपत्रकात्रणाची फाईल पुढ्यात आदळली. सर्व तयारीनिशी मला पटवायचा प्रयत्न चालू होता आणि मी त्यात वाहून जात होतो. ‘शेअर मार्केटचे तक्ते वाचण्यापेक्षा ही चौकट वाचा’ असा दम मिळताच मी ते कात्रण निमूट वाचू लागलो. त्या इतिवृत्तात टकळीकरांचं जबरदस्त उदात्तीकरण केलं होतं. नको त्या ठिकाणी सेल्फी घेताना जीव गमावण्याची पर्वा न करणार्‍या अतिधाडसी तरुण पिढीला योग्य दिशा दाखवण्यासाठी टकळीकरांनी संमेलनाचं आयोजन केलं होतं. ती योग्य दिशा म्हणजे मनोरंजक घटना मोबाईलच्या इवल्याशा कॅमेर्‍यात चित्रित करून त्यांची काटछाट करून चित्रफीत बनवणं आणि त्या क्लिप्स टिकटॉकच्या साईटवर पोस्ट करणं. या उद्देशानं हे संमेलन भरवलं होतं असं जरी छापलं होतं, तरी आपल्या टिकटॉक इन्स्टिट्यूटची जाहिरात करणं हा टकळीकरांचा खरा उद्देश दिसून आला. संमेलनात शेवटी उपस्थित तरुण मुला-मुलींकडून सेल्फी काढताना जीव धोक्यात घालणार नाही अशी दृढ शपथ घेतली असं त्या कात्रणात लिहिलेलं वाचलं आणि माझे डोळे पाणावून गेले. टकळीकरांच्या महान कार्याला नमन करून मी बबलूला विचारलं, ‘‘तू इन्स्टिट्यूट कधी जॉईन करणार आहेस?’’ आपल्या खडूस वडिलांचं मतपरिवर्तन करण्यात यशस्वी झालो या समाधानानं दोघांनीही टाळ्या पिटून आनंद व्यक्त केला.
बबलू माझ्या पुढ्यात एक उत्कृष्ट आर्ट पेपरवर छापलेलं प्रॉस्पेक्टस घेऊन आला आणि म्हणाला, ‘‘डॅड, या कोर्सला प्रवेश घ्यायचा हे माझं स्वप्न आहे आणि त्याची पूर्तता तुम्हीच करू शकाल.’’

‘‘बोल बेटा, तुझ्या प्रवेशासाठी किती लाखांचं डोनेशन द्यायचंय ते सांगशील का?’’ मी माझ्या सर्व खात्यांमध्ये मिळून किती पैसे जमू शकतील याचा अंदाज घेत विचारलं.
‘‘डॅडी, प्रवेशासाठी आधी एक व्हीडिओ क्लिप स्वतः बनवून सादर करायची आहे. ती पसंतीस उतरली तरच मला प्रवेश मिळू शकेल.’’ बबलू सांगू लागला, ‘‘क्लिपचा विषय आहे ‘भक्ष्य आणि भक्षक’ या कल्पनेवर आधारित जिवंत चित्रफीत बनवून सादर करायचीये. तुमची मदत हवीये.’’ बबलू म्हणाला.
‘‘एखाद्या जियोग्राफी चॅनेलवर किंवा यू ट्यूबवर पाहिजे तेवढ्या चित्रफिती मिळतील. इंटरनेटवर कॉपी पेस्ट करायला किती वेळ लागणार?’’ मी सल्ला दिला.
‘‘डॅड, ज्या पार्श्वभूमीवर चित्रण करायचंय, त्या पार्श्वभूमीवर चित्रफितीचा निर्माता चित्रण करताना दाखवायचाय ही मुख्य अट आहे. तेव्हा कॉपी पेस्ट चालणार नाही.’’ बबलू म्हणाला.
‘‘मग भक्ष्य-भक्षक शोधण्यासाठी घोर जंगलात जाऊन मुक्काम करायला लागेल. कोण घेणार एवढी जोखीम? या टकळीकराला दुसरा विषय मिळाला नाही?’’ मी डोक्यावर हात मारत म्हणालो.
‘‘अहो मी एक सुचवू का? जंगलात कशाला जायचं? हे चित्रीकरण घरातल्या घरात करता येईल. पाल भिंतीवरच्या डासाला गट्टम करते. कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या माशीवर कोळी झडप घालतो, असे कितीतरी सोपे प्रसंग चित्रीकरण करता येतील की’’ श्रीमती म्हणाली.
‘‘अगं, तुम्हाला घरात झुरळं, पालींची कटकट नको, म्हणून आपण नियमितपणे कीटकनाशकं मारून घेतो. मग कुठून येणार पाल आणि कोळी?’’ मी सांगितलं.
‘‘आयडिया! आपण मांजर आणि उंदीर यांना समोरासमोर आणू. मांजर भक्षक आणि उंदीर भक्ष्य. मांजर उंदराला पकडताना चित्रीकरण करता येईल. सोपा उपाय आहे तो. श्रीमती शक्कल लढवत म्हणाली. आई शप्पथ! उंदरा-मांजराचा जिवंत खेळ पाहतच आम्ही लहानाचे मोठे झालो. टॉम आणि जेरीच्या कार्टून फिल्म्स तेव्हा जन्माला पण आल्या नव्हत्या. लहानपणी कुर्डीकर चाळीत राहत असताना आमच्या शेजारच्या बिर्‍हाडात राहणार्‍या शरदकाका, सुमा मावशी आणि त्यांच्या चार मुलींच्या संसारात एखादी मांजर आपल्या कैक पिल्लांच्या पसार्‍यासकट कुटुंबातल्या सदस्यांच्या स्वरूपात वावरायची. त्या ऐसपैस गोतावळ्याचे लाड व्हायचे, कारण त्याकाळी चाळीच्या मधल्या चौकात रहिवाशांनी टाकलेलं उष्टं, खरकटं खाण्यासाठी गटारनिवासी कळकट उंदरांची टोळकी फिरत असायची. उदर भरण्यासाठी अन्न मिळालं नाही तर तळमजल्यावर राहणार्‍या बिर्‍हाडांच्या घरात घुसायची. चंट उंदरीणबाई चाळीचे जिने चढून सर्वांत वरच्या मजल्यावरच्या कौलारू छप्पर आणि लाकडी वाशांमधल्या अरुंद पोकळीत सुखेनैव आपलं बाळंतपण उरकत असे. या पोकळीत पावसाळ्यात चिमण्यांची घरटी, कबुतरांचे थवे पण आसरा घेत असत. अनाहूत पक्षी-प्राण्यांच्या उपद्रवाला काबूत ठेवण्यासाठी मांजर पाळणं हा स्वस्त उपाय होता. सुमा मावशींच्या मांजरांची फौज दिवसा चाळभर हिंडून उंदरांचा आणि कबुतरांचा चोख बंदोबस्त ठेवायची. त्यामुळे चाळीतल्या खोल्या-खोल्यांमधून त्यांचे अतीव लाड व्हायचे. कुणी बशीतून दूध पाजे तर कुणी मटणाची हाडं द्यायचे! मत्स्यभक्षक रहिवासी रविवारी स्वयंपाकघरात शिजलेल्या माशांचे काटे खिलवून त्या फौजेला तृप्त करत. ते सारं आठवताच माझ्या डोक्यात ट्यूब पेटली. ‘‘अगं, आपण कुर्डीकर चाळीतल्या सुमामावशीला भेटूया. तिच्याकडे एखादं मांजर मिळालं तर आपल्याला चित्रीकरणासाठी भक्षकाचं मुख्य पात्र मिळेल.’’

‘‘डॅड, कुर्डीकर चाळीतून मांजर मिळेल, पण उंदीर कुठून मिळवणार?’’ बबलूनं विचारलं.
‘‘जर आपलं नशीब बलवत्तर असेल तर तिथूनच गटारचर उंदीर पण मिळेल. माझा इतके वर्षांचा अनुभव सांगतोय. फक्त उंदरासाठी पिंजर्‍याची व्यवस्था करायला लागेल. ती पण करू.’’ मी उत्तर दिलं.
‘‘डॅड, मांजर आणणार तर त्याच्या गळ्यात जीपीएसचं सिमकार्ड असलेली एक कॉलर लावायला पाहिजे. संजय गांधी उद्यानात वाघांच्या गळ्यात अशी कॉलर लटकवतात. मांजर सोसायटीभर फिरणार. मग ते कुठं फिरतंय, हे कॉलरमुळे ट्रॅक करता येईल.’’ आमच्या कन्येनं तारे तोडले.
‘‘अगं, मांजराच्या गळ्यात जीपीएसची कॉलर घातली तर ते लोढणं अडकवल्यावर ते उंदीर कसं पकडणार?’’ मी शंका व्यक्त केली.
‘‘त्यात काय, वाघ कॉलर अडकवल्यावर शिकार करत नाही का?’’ कन्या उत्तरली.
‘‘अगं, वाघाचा गळा केवढा, मांजराचा केवढा. हा तरी विचार कर.’’ मी म्हटलं.

‘‘बघा बरं! उद्या मांजर कुठे गायब झालं तर आमच्या फिल्मच्या मुख्य पात्राविना चित्रणच ठप्प होईल. मग हातावर हात चोळत बसू नका.’’ कन्यका म्हणाली.
संध्याकाळी कुर्डीकर चाऴीत सुमा मावशीला भेटायला गेलो. चाळीचा कायापालट झाला होता. चाळीच्या चौकात एकेकाळच्या मातकट जमिनीवर पांढर्‍या फरशा बसवल्या होत्या. चाळीत स्वच्छता मोहीम राबवली जात असल्यानं चौकात घाणीचा लवलेशही उरला नव्हता. फरशी चकाचक होती. माझ्या मनातल्या चाळीच्या चित्राला चांगलाच तडा गेला. चारही मुलींची लग्नं करून दिल्यावर शरदकाका आणि सुमामावशी दोघंच त्या खोलीत राहत होती. मला पाहताच मावशीला खूप आनंद झाला. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यावर मी बेशरम होऊन तिच्याकडे एका मांजराची मागणी केली. त्यावर ती खदाखदा हसली. ‘‘अरे, हल्ली शेजारचे मांजराला टिकूच देत नाहीत. चौकात फरशा घातल्यावर गटार बंद झालं. चौकात घाण उरली नाही, त्यामुळे हल्ली उंदीर बघायलाच मिळत नाही. पाचेक वर्षांपूर्वीपर्यंत एक बोका बाळगला होता. पण उंदीरच नसल्यामुळे त्याला नुसतं खाण्या-पिण्याशिवाय काहीच काम नव्हतं. त्यात कधी शेजार्‍यांच्या घरात घुसून दुधाच्या पातेल्यात तोंड घालायचा. शेजारी भांडायला यायचे. शेवटी कहर झाला तसा त्याला मासळी बाजारात सोडून दिला. तू फ्लॅटमध्ये राहायला गेलास, तुला मांजर कशाला हवं? उंदरांचा त्रास आहे का?’’
‘‘मला एक मांजर काही दिवसांसाठी पाहिजे होतं. मावशी, एक सांग तुझ्या तळमजल्यावर आता कधीच उंदीर येत नाहीत का?’’ मी विचारलं.
‘‘छे रे! कधी जर एखादा उंदीर चुकून आला तर महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसला कळवतो. त्यांच्याकडे उंदीर पकडण्यासाठी मूषकमारांचं पथक असतं. ती लोकं लगेच येऊन पिंजरा लावून उंदीर पकडतात. त्यासाठी त्यांना पगार मिळतो.’’

सुमा मावशीच्या उत्तरानं मी अजिबात निराश झालो नाही. उलट तिनं बोलता बोलता तिच्या नकळत मांजर मासळी बाजारात मिळेल आणि उंदीर वॉर्ड ऑफिसमधल्या मूषकमारांच्या पथकाकडे मिळू शकेल असंच सुचवलं होतं. त्यामुळे मला माझ्या पात्रशोधासाठी मदत मिळाली. येता-येता मासळी बाजारात एक चक्कर मारली. बरीच गब्दुल मांजरं तिकडं मोकाट फिरत होती. मग विचार केला आधी उंदराला ताब्यात घ्यावा आणि मग मासळी बाजारातून मांजराला उचलावं.
दुसर्‍या दिवशी सुट्टी घेऊन सकाळीच वॉर्ड ऑफिस गाठलं. तिकडून एका तरबेज मूषकमाराचा फोन मिळवला. त्याला फोन करून एक जिवंत उंदीर माझ्या हवाली करावा अशी विनंती केली. अशी विचित्र मागणी ऐकून तो वेडाच झाला. पण जेव्हा मी कळकळीनं विनंती करू लागलो तेव्हा त्यानं मला दुसर्‍या दिवशी साडेसहा वाजता अंधेरीतल्या एकमेव रेल्वे फाटकाच्या बाजूला उंदरासाठी रिकामा पिंजरा घेऊन बोलावलं. हार्डवेअरच्या दुकानात जाऊन एक पिंजरा विकत घेतला.
दुसर्‍या दिवशी पहाटे पहाटे साखर झोपेत रमलेल्या चिरंजीवांना गदगदून उठवलं आणि साडेसहा वाजता मूषकमारानं सांगितल्याप्रमाणे अंधेरी-जोगेश्वरीमधल्या रेल्वे फाटकाजवळ पिंजरा घेऊन पोचलो.

तिथं रस्त्याच्या कडेला मूषकमारपथकाची व्हॅन उभी होती. गेटच्या अलीकडे पिवळ्या चकचकीत पट्ट्या लावलेलं काळं जॅकेट, खाली काळी तंग तुमान, गमबूटमध्ये पाय घुसवलेले अशा वेषात एक माणूस उभा होता. त्याच्याकडे फवारे मारायचं एक यंत्र होतं, दोन लांब चिमटे घेऊन तो बसला होता. मी त्या पोषाखावरून मूषकमार तो हाच असावा असा अंदाज बांधून तिकडे गेलो. माझ्या हातातला रिकामा पिंजरा बघताच त्यानं मला ओळखलं. त्यानं न बोलता पिंजरा ताब्यात घेतला. जॅकेटच्या खिशातून सुक्या बोंबलाचा तुकडा काढला. पिंजर्‍याचा दरवाजा उघडून पिंजर्‍याच्या वरच्या बाजूला असलेल्या स्प्रिंगच्या खोबणीत अडकवला. खोबणीला ‘ळ’ आकाराचा हूक होता, त्या हुकाला खालच्या बाजूला सुकटाचा तुकडा अडकावला. त्यानंतर हुकाला खालून हलकासा धक्का देऊन पिंजर्‍याचं दार स्प्रिंगच्या खोबणीतून, सुटून खटकन बंद होतं की नाही याची दोन वेळा ट्रायल घेतली. मग रेल्वेगेटच्या आडव्या दांडी खालून शरीर घुसवत ट्रॅकच्या कडेला असलेल्या सुक्या गटाराजवळ गेला आणि तो पिंजरा गटाराच्या बाजूला बसवला.

‘‘चला आपला सापळा फिक्स झाला. आता लवकरच एखादा उंदीर सापडेल,’’ असं म्हणत आम्ही रेल्वे फाटकाच्या बाजूला उभे राहिलो. समोर रेल्वेचे चार ट्रॅक्स होते. चारी ट्रॅकवरून गाड्या धडाडत जायच्या. मनात प्रश्न पडला तो सरळ मूषकमाराला विचारला, ‘‘भाऊ, या धडधडत जाणार्‍या गाड्यांमुळे उंदीर इकडे फिरकतील असं वाटत नाही.’’
‘‘थोडा वेळ थांबावं लागेल. पाचेक मिनिटांत चार नंबरच्या ट्रॅकवर अंधेरीला सिग्नल नसल्यामुळे राजधानी एक्सप्रेस येऊन थांबेल. ती थांबली की राजधानीतल्या डब्यातले ट्रेन अटेंडन्ट प्रवाशांनी टाकलेलं अन्न ट्रॅकवर फेकून आपलं डब्यातलं साफसफाईचं काम करून घेतील. मग बघा गटारातून उंदरांचा लोंढा धावत येईल. तुमच्या पिंजर्‍यात त्यातला एखादा अवश्य सापडेल.’’
‘‘पण तुम्ही एवढ्या आत्मविश्वासानं कसं काय सांगू शकता?’’ मी विचारलं.
‘‘हा आमचा फेव्हरिट स्पॉट आहे. आठवड्यातून तीनदा मी इथं येतो. उंदीर जमले, की हा फवारा मारला की पंधरा-वीस उंदीर मरतात. ते मेल्यावर त्यांचे देह निळ्या पेटीत चिमट्यानं टाकतो. आम्हाला रोज शंभर उंदीर मारायचं टार्गेट दिलंय. ते कचेरीत मोजून दाखवायचे तरच आमची दिवसाची हजेरी लागते.’’
‘‘अरे बापरे, रोज शंभर उंदीर मारायचे म्हणजे अवघड काम आहे. रोज एवढे उंदीर पकडता येतात का!’’ चिरंजीवांनी प्रथमच तोंड उघडलं. पापी पोटासाठी काय करावं लागतं याचा ज्वलंत अनुभव ऐकत होतो. ‘‘मला नेमलेल्या भागात असे पंचवीस एक स्पॉट आहेत. भाजी मंडई, धान्याचं मार्केट, कचराकुंड्या अशा ठिकाणी हमखास उंदीर सापडतात.’’

‘‘या कामासाठी तुम्हाला भूतदयावादी संघटनांचा प्रचंड विरोध सहन करावा लागत असेल ना!’’ मी विचारलं.
‘‘छे हो. तो विरोध श्वानपथकाला कधीतरी होतो. आमचं तसं नाही. आम्ही पण भूतदया दाखवतो हं. एखादी गाभण उंदरीण दिसली तर तिला जिवंत सोडून देतो. नवीन उंदरांची प्रजा निर्माण होणं गरजेचं आहे तरच आमची नोकरी टिकून राहील.’’ मूषकमारानं आपल्या नोकरीचं महत्त्वाचं गुपित सांगितलं. एवढ्यात खरंच राजधानी एक्स्प्रेस रेंगाळत, घसरत चौथ्या ट्रॅकवर आली आणि थांबली. आतल्या डब्यातून ट्रेन अटेंडंटने नेहमीप्रमाणे प्रवाशांच्या जेवणासाठी वापरलेली सिल्वर फॉईलची बॉक्सेस, कागदाच्या ेट्स आत उरलेल्या अन्नपदार्थासकट रेल्वेच्या ट्रॅकच्या बाजूला टाकल्या. सिग्नल मिळाल्यावर गाडी धडधडत गेली आणि जादू व्हावी तशी छोट्या मोठ्या उंदरांची एक फौज गटारातून बाहेर आली. त्यातलाच एक उंदीर सुकटाच्या वासानं आम्ही लावलेल्या पिंजर्‍यात सुंघत घुसला. सुकटाला तोंड लावताच हूक हलला आणि पिंजर्‍याचा दरवाजा फटकन बंद झाला. मूषकमारानं पिंजरा माझ्या ताब्यात दिला. मी बक्षिसी म्हणून पाचशेची नोट त्याच्याकडे दिली. आम्ही दूर होताच हातातला फवारा त्या उंदरांच्या टोळीवर मारायला लागला. तो लांबलचक चिमट्यानं धारातीर्थी पडलेल्या उंदरांना उचलून बाजूच्या पेटीमध्ये टाकत मोजत होता. हाती लागलेल्या क्लिपच्या आमच्या कलाकार पात्राला अर्थातच उंदराला पिंजर्‍यासकट एका कपड्यात गुंडाळून स्कूटरवर टांग टाकून आम्ही घराकडे निघालो. चीऽऽ फीऽऽ आवाज करत ते पात्र तीव्र निषेध करत होतं, पण तिकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता.

उंदराचा पिंजरा लपत-छपत घरी आणला आणि मोहिमेचा एक टप्पा पार पडला. पिंजर्‍यातलं ते पीडित पात्र घरी आणताच कन्या आणि श्रीमती त्या पात्राच्या सरबराईत मग्न झाल्या. आमचं मास्टर बेडरूमच्या टॉयलेटमध्ये चित्रण करायचं ठरलं होतं. बिल्डर कृपेमुळे त्या बाथरूममध्ये स्लॅबखाली माळा अस्तित्वात होता. त्या माळ्यावर गीझरचं धूड बसवलं होतं आणि बाजूला एक माणूस कोंबून बसू शकेल एवढीच जागा होती. चिरंजीवांनी त्या जागेत बसून चित्रण करायचं ठरलं. बबलूनं चित्रीकरणासाठी बाथरूममधली अडगळ काढून साफसफाई केली, वेगवेगळे अँगल न्याहाळून योग्य जागेची निवड केली, चित्रीकरणाची पूर्ण योजना कागदावर बनवली. जेव्हा आम्ही आमच्या फिल्मच्या दुसर्‍या पात्राच्या शोधात मासळी बाजारात स्कूटर घेऊन निघालो तेव्हा भरदुपार झाली होती. पोतं, रस्सी आणि जुना टॉवेल अशी आयुधं बरोबर घेतली होती. मासळी बाजारातल्या बर्‍याच कोळणी सकाळी आणलेली मासळी विकून विश्रांतीसाठी घरी परतल्यानं एवढ्या अवाढव्य मार्केटमध्ये फक्त तीन-चार म्हातार्‍या कोळणी उरल्या होत्या, गल्ल्यातले पैसे मोजत बसल्या होत्या. मी आणि चिरंजीव पोतं लपवत चांगल्या मांजराच्या शोधात बाजारात इतस्ततः फिरत होतो. फुटाफुटावर सुस्तावलेली मांजरं जमिनीवर अंग पसरून झोपली होती. काही काळ्याकुट्ट लवीमुळे भयानक दिसत होती तर काही सफेद लवीची मांजरं अंगावर धूळ चिकटल्यामुळे भकास दिसत होती. त्यातलं एक मांजर तर सतार वाजवावी तशी पोज घेत मागच्या पायाची टांग डोक्याच्या बाजूला लावत जिभेनं आपलं गुप्तांग चाटत होतं. कोपरा नि कोपरा धुंडाळला तरी एकही मांजर घरी नेण्यायोग्य वाटलं नाही. आम्ही वेड्यासारखं फिरत असताना एका कोळणीचं लक्ष आमच्याकडे गेलंच.

‘‘साहेब, मघापासनं फिरताय, तुमचं काय हरवलंय?’’ त्या कोळणीनं विचारलं.
‘‘काही नाही मावशी, घरात उंदीर झालेत. घरी न्यायला एक मांजर शोधत होतो.’’ मी सांगितलं.
‘‘सोन्या, इकडची मांजरं उंदरं पकडायच्या कामाची नायेत. बाजारात फेकलेल्या म्हावर्‍यांच्या शेपट्या आणि कल्ले खाऊन खाऊन मस्तवाल झालीत. त्यांना उंदीर पकडायचा सरावच नाय.’’ त्या कोळणीनं उत्तर दिलं.
‘‘मावशी, मी फार मोठ्या आशेनं आलो होतो. उंदरांच्या त्रासानं आणि बायकोच्या तगाद्यानं जीव हैराण झालाय. काहीतरी उपाय सांगा ना.’’ मी विनवणी केली.
यावर मावशीनं तोडगा सांगितला. ‘‘त्या तिथं कुठंतरी एक भुर्‍या रंगाचा, काळ्या कानांचा सयामी बोका असेल, त्याला शोध आणि घेऊन जा. तो पकडेल उंदराला. पण कसा घेऊन जाणार त्याला?’’ तिनं विचारलं.
‘‘एक पोतं आणलंय. मांजरावर टॉवेल टाकणार. उचलणार आणि पोत्यात भरणार.’’ मी उत्तर दिलं.
‘‘अरे पोत्यात भरताना बोचकारलं तर विंजेक्शनं घ्यावी लागतील.’’ मावशीनं सल्ला दिला.
मी आणि बबलूनं पुन्हा आख्ख्या बाजारात पहुडलेली मांजरं बघितली. पण तो बोका काही दिसेचना. शेवटी त्या मावशीलाच शरण गेलो. तिनं मोठ्या आत्मविश्वासानं सौदा केला. ‘‘जर मी तुला तो बोका मिळवून दिला तर तुला माझी राहिलेली म्हावरं शंभर रुपयाला विकत घ्यावी लागतील. कबूल आहे?’’
सौदा तसा महाग वाटला नाही म्हणून मी होकार दिला. तशी तिनं हाक मारली, ‘‘गोंद्याऽऽ ये पुचूक पुचूक.’’ आणि काय आश्चर्य एक भुरकट रंगाचा काळ्या कानाचा अंगा-पिंडानं मजबूत असा देखणा बोका टुणकन उडी मारून कट्ट्यावर चढला. त्याच्या तोंडात पापलेटची छाटलेली शेपटी भरवत असताना तिनं मला इशारा केला आणि मी पटकन टॉवेल टाकत त्याची उचलबांगडी करून पोत्यात रस्सीनं बंद केला.
‘‘मावशी, बोके बहुधा आळशी असतात. हा बोका पकडेल ना उंदीर?’’ मी विचारलं. त्यावर मावशी हसली.
‘‘अरे बॉडी बघ त्याची. त्याच्या नुसत्या दर्शनानं उंदीर घाबरून जाईल. मग बघ तो कसा तुटून पडतो ते.’’ उरलेली मासळी कागदी थैलीत भरत माझ्याकडे दिली. मी मुकाट्यानं शंभर रुपये तिच्या हातात ठेवले.
‘‘मावशी आमच्या घरात मासळी चालत नाही. काय करू याचं? तूच ठेव.’’ मी काकुळतीनं म्हणालो.
‘‘अरे, या बोक्याला रोज कोलंबीच हवी. हलव्याच्या शेपट्यांचे तुकडे खायला लागतात. घाल त्यालाच. इथं सगळ्या कोळणींना हैराण केल्तं. पीडा टळली आमची.’’ मावशी म्हणाली.

तोपर्यंत पोत्यात भरलेला बोका पोत्यासकट उड्या मारत, म्याऊ-म्याऊ करत आरोळ्या ठोकू लागला. ते दृश्य बघायला तीन-चार टिल्ली पोरं जमा झाली. तसं चिरंजीवानं एका हातानं ते पोतं पकडलं आणि दुसर्‍या हातानं माशांची थैली सांभाळली. आम्ही स्कूटर घराकडे पिटाळली. आमच्या घरी महिला मंडळानं बाथरूममधल्या टाईल्स साबणानं धुऊन चकाचक केल्या होत्या. आमच्या पीडित पात्राची चांगलीच बडदास्त ठेवली होती. गटारातून आलेल्या त्या उंदराला सर्वप्रथम टॉयलेटमधल्या पाण्याच्या स्प्रेनं पिंजर्‍यातच आंघोळ घालून वर त्याच्या अंगाचा कुबट वास जाण्यासाठी माझा महागडा बॉडी स्प्रे मारला होता. उंदराला तळलेली भजी फार आवडतात म्हणून त्याच्यासाठी तळलेल्या खमंग भज्यांचा वास घरभर पसरला होता. पिंजर्‍याच्या जाळीतून भजी, वेफर्स घुसवून त्याचं आदरातिथ्य केलं होतं. एवढी बडदास्त ठेवल्यावर तो उंदीर पिंजर्‍यात शांत बसला होता. पोत्यात बांधलेल्या पात्राचा प्रवेश होताच सर्वांच्या उत्साहाला पारावर राहिला नाही. चित्रीकरणासाठी बाथरूममध्ये लोकेशन तयार होतं. एका खुर्चीवर चढून चिरंजीवांनी आपला देह त्या माळ्यावर उर्वरित जागेत कोंबला. हातात मोबाइल पकडून शूटिंगची ट्रायल घेतली आणि ओके करताच मी खुर्ची बाहेर काढून बाथरूममध्ये नाक दाबत थैलीतल्या मासळीचे दोन तुकडे टाकले. त्यानंतर बोक्याला पोत्यातून बाहेर काढत सरळ बाथरूममध्ये ढकललं, बोचकारणार नाही याची काळजी घेत दरवाजा पटकन बंद केला. अचानक मुक्त झालेल्या वातावरणात आमच्या खलनायकांचं आरडणं ओरडणं सुरू झालं. कुठून पळता येईल का यासाठी तो बाथरूमच्या कोपरा न कोपरा फिरला. पळून जायला जागाच मिळेना. कोपर्‍यात गावलेला मासळीचा तुकडा चघळत शांत बसला. वातावरण स्थिर झाल्यानंतर बाथरूमचा दरवाजा किलकिला करून पिंजर्‍यावरचा स्प्रिंगचा दरवाजा जोर लावून उघडला. उंदराच्या धूडानं पटकन बाथरूममध्ये उडी मारताच दरवाजा बंद करून घेतला. चिरंजीव आत कोंडून बसलेल्या अवस्थेत शूटिंग करू लागले. बराच वेळ कसलाच आवाज आला नाही. मग अचानक धाडधूम खासखूस असे आवाज येऊन फिल्मची खरी अ‍ॅक्शन सुरू झाल्याचा अंदाज आला. कदाचित आत पकडा-पकडी, पळा-पळी असले खेळ चालू झाले होते..

बराच वेळ आवाज येत राहिले, मग शांतता पसरली. अचानक खलनायक गोंद्या घसा खरवडून ओरडू लागला. तसा माझ्या मोबाईलवर चिरंजीवांचा फोन आला, ‘‘डॅड, सीन कट.’’
‘‘दरवाजा उघडून बोक्यावर टॉवेल टाकून उचला. मला बाहेर यायचंच.’’
‘‘शूटिंग संपलं का?’’ मी विचारलं.
त्यावर आमचा कॅमेरामन कम डायरेक्टर म्हणाला, ‘‘हो. उंदीर एक्झॉस्ट फॅनच्या पात्यांमधून वाट काढून बाहेर पळाला, बाहेरून जाळी बसवली नव्हती ना. पण दोघांमध्ये झटापट छान झाली. पटकन दार उघडून टॉवेल टाकून गोंद्याला पोत्यात कोंबला. चिरंजीवांनी खाली उतरून मोबाईलवर केलेलं शूटिंग दाखवलं. मोजून चाळीस सेकंद बोक्यात आणि उंदरात झटापट झाली. उंदीर भिंतीचा कोपरा पकडून वर-वर चढू लागला. गुळगुळीत टाइल्सच्या भिंतीवरून वर चढणार्‍या उंदराला पकडण्याचा प्रयत्न गोंद्यानं केला खरा, पण उंदराची नखं जास्त तीक्ष्ण होती आणि उंदराला भिंत वेगात चढायचा सरावही होता. त्या बाबतीत खलनायक बोका मागे पडला कारण त्याला गुळगुळीत भिंत चढायचा सरावच नव्हता. पीडित नायकानं खलनायकालाच चकवा दिला. पण हा सुखान्त शेवट आमच्या कन्येला मान्य नव्हता. तिला एक विलक्षण युक्ती सुचली. लॅपटॉपवर चित्रफितीचं संकलन करताना, संगीताचे ध्वनिमुद्रित तुकडे टाकताना सुरवातीचा गोंद्या पापलेटची शेपटी खात असल्याचा शॉट, शेवटच्या शॉटनंतर एडिटिंग करून असा चपखल बसवला की दर्शकांना वाटावं की शेवटी खलनायक भक्षकानं भक्ष्यालां गट्टम केलं. ईप्सित साध्य झालं. सर्वांच्या मनासारखी क्लिप झाली.

त्या रात्रीच बोक्याला रेल्वे फाटकाजवळ सोडून आलो. विचार केला, मासळी बाजारापेक्षा इथं राहिला तर त्याचा हा मार्जारजन्म सार्थकी लागेल. टकळीकरांना पाठवलेली ती क्लिप पसंत पडून चिरंजीवांना अ‍ॅडमिशन मिळाल्याचा ई-मेल आला, पण तोपर्यंत चाळीस सेकंदांच्या टकळीसाठी किती कष्ट उपसावे लागतात हे अनुभवल्यानं बबलूचा उत्साह केव्हाच मावळला होता. त्यात माय-बाप सरकारनं चायनीज टिकट़ॉक अ‍ॅपवर बंदी घातल्याचं कळलं आणि चिरंजीवांनी टिकटॉक ट्रेनिंग स्कूलचा नादच सोडला. मी सुटकेचा निःश्वास टाकला. सध्या सोसायटीत पार्क केलेल्या वाहनांच्या वायरी कुरतडल्याच्या तक्रारी वाढल्याहेत. आमच्या स्कूटरलाही तो धोका आहेच. पण मी गप्प बसलोय, कारण मला मुक्त फिरणार्‍या त्या मूषकाकडून होणार्‍या विध्वंसाच्या भीतीपेक्षा, जास्त भय वाटतंय, ते बोलावल्यावर लगेच धावत येणार्‍या महानगरपालिकेच्या मूषकमारांचं. न जाणो तोच मूषकमार आला आणि आम्हांला ओळखून आमचं मूषक उचलेगिरीचं बिंग बाहेर पडलं तर…

– शिरीष नाडकर्णी

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.