Now Reading
‘वा’चा‘ना’

‘वा’चा‘ना’

Menaka Prakashan

सदावर्ते बाईंनी पत्र मोठ्यांदा वाचून दाखवून म्हटलं, ‘बघा, प्रत्यक्ष अध्यक्ष एवढं लक्ष घालताहेत. आता जबाबदारी तुमची आहे. आपल्याला आपले गुण दाखवायची ही संधी आहे.’ तोवर ते पत्र एकेका शिक्षकाकडं फिरत होतं. प्रत्येकजण वाचून अचंबित चेहर्याीनं दुसर्या कडं बघत होता.

पल्या शिक्षणसंस्थेची कीर्ती सर्वदूर पसरली आहे. आमचं नवं संचालक मंडळ तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं ही कीर्ती आणखी वाढावी म्हणून काही नव्या योजना, नवे उपक्रम आखत आहे. या सर्वांची माहिती व्हावी म्हणून मुद्दाम आजची बैठक बोलावली आहे.’’ संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष तळमळीनं बोलत होते. समोर संस्थेच्या शाळांचे तीस-एक मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक वगैरे पदाधिकारी हजर होते. नव्या योजना, नवे उपक्रम असं ऐकल्याबरोबर सगळ्यांनी आपापल्या डायर्या् आणि पेनं उघडली, आणि भराभरा टिपणं घ्यायला सुरुवात केली. दीड एक तासानंतर साहेब बोलायचं थांबले. आभार वगैरे झाल्यानंतर मंडळी हळूहळू बाहेर पडली.

बाहेर पडतापडता सदावर्ते बाई रांजणे सरांना म्हणाल्या, ‘‘साहेब किती छान बोलले ना. मी सांगते आता संस्था अगदी रुळावर येईल बघा सर!’’ ‘व्हय. पन ते नव्या योजना उपक्रम म्हनले… ते काय कळलं का?’ रांजण्यांनी विचारलं. सदावर्ते बाई म्हणाल्या, ‘‘हो म्हणजे टिपणं घेतलीत ना मी… आणि सविस्तर पत्र येईलच की… काळजी करू नका!’’ काळजी हा शब्द रांजणे सरांनी हातानंच उडवून लावला. ‘हॅः! काळजी करत नाय मी. मला काय? सायेब सांगल त्ये… त्यो म्हनला – का ही पूर्व… होय साहेब ही पूर्व…. फक्त नवी योजना काये बगायचं. रोज वर्गावर जाऊन शिकवाबिकवा म्हनला म्हंजे अवगड!’ रांजणे सरांच्या विनोदाला दाद देत मंडळी पांगली.

चार दिवसांनी प्रत्यक्ष अध्यक्षांच्या सहीचं पत्र सगळ्या शाळांत पोहोचलं. सदावर्ते बाईंनी सगळं पत्र अथपासून इतिपर्यंत दोनदा वाचून काढलं. ‘अलीकडच्या काळात शिक्षकांचे सांस्कृतिक, सामाजिक, कलाविषयक आकलन कमी झालं आहे, हे लक्षात घेऊन ही योजना आखली आहे. यात सर्व शिक्षकांचा सहभाग अनिवार्य आहे. प्रत्येकानं आपला प्रकार निवडून आठवडाभर त्याची तयारी करायची आहे. दर आठवड्याला एक किंवा दोन शिक्षकांनी शिक्षकसभेत सादरीकरण करणं अनिवार्य आहे. याचा वापर वर्गात शिकवताना केल्यास अधिक उत्तम. अध्यक्ष व कार्यवाह अचानक भेट देऊन या योजनेचं निरीक्षण करणार आहेत.’ सदावर्ते बाईंनी पत्र मोठ्यांदा वाचून दाखवून म्हटलं, ‘बघा प्रत्यक्ष अध्यक्ष एवढं लक्ष घालताहेत. आता जबाबदारी तुमची आहे. आपल्याला आपले गुण दाखवायची ही संधी आहे.’ तोवर ते पत्र एकेका शिक्षकाकडे फिरत होतं. प्रत्येकजण वाचून अचंबित चेहर्याुनं दुसर्याधकडं बघत होता. शेवटी सगळ्यात सीनिअर ठोमके सर म्हणाले, ‘म्हंजे म्याडम, तुमी म्हन्ता त्ये बरुबरच हाय. आता सन्स्था म्हटल्यावर जे काय सांगल तसं करायाच पायजे, पन मी काय म्हंतो, का येकदा परत इचारा म्हंजे काय चूक नाय ना लेटरात… म्हंजे काय का आपलं चुकाया नकं..’ त्यांचं वाक्य संपायच्या आत सदावर्ते बाई गरजल्या, ‘ठोमके सर… संस्थेच्या पत्रात चूक नसते आणि आपणही चुकायचं नाही. आपल्याला ही केवढी संधी आहे. पत्र वाचताच मी माझा प्रकार निवडलाय. तुम्हीसुद्धा निवडा आणि तयारीला लागा… काय रामनामे सर?’ ‘आम्हालाच बहुतेक राम म्हणायला लागणार…’ म्हणत एकशे दहा किलोचे रामनामे घाम पुसत उभे राहिले. ‘माझ्या सारख्याला हे प्रकरण अवघडच आहे.’ ‘तुम्हाला नाही शाळेच्या इमारतीला अवघड आहे.’ मागून हळू आवाजात जोशी सर पुटपुटले… ते मनावर न घेता रामनामे बाईंना म्हणाले, ‘पण आता तुमी म्हणताय तर… करतो काहीतरी.’ सदावर्ते बाई हसत म्हणाल्या, ‘मी म्हणते म्हणून नको… अध्यक्ष म्हणतात म्हणून..’ मग त्यांनी जोशींच्याकडं मोहरा वळवला. त्यांनी शब्दांची छडी उगारली. ‘मध्येच हळूहळू बोलून काय हसत होतात? जरा मोठ्यांदा सांगा म्हणजे सगळेच हसतो. पाच फुटांच्या आतले चार जणांत लपून जाणारे जोशी सर चेहरा गंभीर ठेवून म्हणाले, ‘म्हणजे माझं म्हणणं असं की शाळेच्या इमारतीची गंभीर अवस्था लक्षात घेता आदरणीय रामनामे सर जे काही करतील ते खालच्या मजल्यावरच करायला सांगावं, नाही तर वेगळाच उपक्रम व्हायचा.’ जोशींचं बोलणं ऐकून हसण्याची जराशी लाट उठली. स्वतः रामनामेही त्यात सामील झाले. ते हसू सहन न होऊन सदावर्ते बाई मोठ्यांदा म्हणाल्या ‘पुरे…. पुरे… जोशीसर विनोदापेक्षा तुमच्या तयारीला लागा.’ जोशी तत्परतेनं उत्तरले.. ‘माझी कायम तयारी असतीच! मला केव्हाही सांगा… देशी, विदेशी… तयार.’ त्यांच्या देशी-विदेशीवर आणखी एकदा सगळे हसले. आता मात्र सदावर्ते बाईंनी त्यांच्याकडं दुर्लक्ष करून आपला मोर्चा शिक्षिकांच्या दिशेला वळवला. ‘आणि तुम्ही गं?’ जवळीक साधण्यासाठी सदावर्ते बाई सर्वच शिक्षिकांना अगं-जागं करत. त्यांच्या प्रश्नावर त्यांच्या नजरेत भरायची संधी हेरून पांढर्याे केसांची पुरचुंडी बांधणार्याा, रिटायरमेंटला आलेल्या उत्पात बाई उभ्या राहिल्या. सगळी शाळा त्यांना आजी म्हणून ओळखायची. आजींनी जाड भिंगांच्या चष्म्याआडून बघत आदर आणि विनम्रतेचा खास स्वर लावला. ‘काही… म्हणजे प्रश्नच नाही… आम्ही सगळ्या स्त्री शिक्षिका म्हणजे एकदम तयार आहोत… म्हणजे तुमच्या कुशल नेतृत्वाखाली म्हणजे गेली दोन वर्षं शाळा उत्तरोत्तर प्रगतिपथावरच आहे. तुमच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली आम्ही काहीही करू… म्हणजे माझ्यासारखीला शेवटच्या वर्षात अशी संधी मिळते आहे… हे म्हणजे भाग्यच आहे… त्यात म्हणजे काही अडलं तर म्हणजे तुम्ही आहातच..’ आपल्या कौतुकानं सदावर्ते बाईंना एकदम आईस्क्रीम खाल्ल्याचा आनंद मिळाला. पण तो न दाखवता त्या एकदम म्हणाल्या, ‘आता चर्चा बास. आता एकदम कृती. पुढच्या शुक्रवारी मधल्या सुट्टीनंतर शिक्षकसभा… त्यात तुमचे सुप्त गुण दाखवा!’

मधला आठवडा कसा गेला कळलं नाही. अखेर शुक्रवार आला. मधली सुट्टी संपली आणि शिक्षकसभा सुरू झाली. सदावर्ते बाईंनी सुरुवातीलाच सभेचा ताबा घेतला. ‘ठरल्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी आपापला प्रकार निवडला असेल आणि आज तो दाखवालही अशी मला खात्री आहे. पण मी सुरुवात माझ्यापासूनच करणार आहे. मी जेव्हा संस्थेचं पत्र वाचलं तेव्हा मलाही जरा विचित्र वाटलं. पण नंतर वाटलं ही आपली हौस पूर्ण करायची संधी आहे. म्हणून मी ‘भरतनाट्यम्’ निवडलं.’ असं म्हणून बाईंनी एकदम नृत्याची पोज घेतली. हाताची मुद्रा आणि मुद्रेवर वेडसर दिसणारं हास्य. बरेच शिक्षक आ वासून बघत राहिले, आणि उरलेले आपापलं हसू दाबत बघायला लागले. ‘ता… थै… तक… थै…’ सदावर्ते बाईंचा तोडा सुरूच होता. शेवटी एक हात तरंगत ठेवून दुसर्याा हाताची करंगळी वर धरून बाई थांबल्या. घाम पुसत बसता बसता म्हणाल्या, ‘भरतनाट्यममध्ये हातांच्या प्रत्येक मुद्रेला अर्थ आहे. शेवटी मी जो हात वर केला ती सुदर्शनचक्राची खूण आहे.’ तेवढ्यात जोशी मागनं म्हणाले, ‘हे तुम्ही सांगितलं म्हणून बरं, नाहीतर शाळेत त्या मुद्रेचा अर्थ वेगळा होतोय ना! पण हे ता… थै… त्याचा वर्गात कसा काय उपयोग होणार?’ हे ऐकून सदावर्ते बाई ‘वत्सा तुजप्रत कल्याण असो’ असे भाव चेहेर्याचवर आणून बोलत्या झाल्या. ‘तेच तर कौशल्य आहे सर… आपली बुद्धी चालली पाहिजे. हे बोल मी तुमच्यासमोर दाखवले. वर्गात मी वेगळेच बोल घेणार. आता मी भूमिती शिकवते…’ असं म्हणत बाईंनी पुन्हा भरतनाट्यम सुरू केलं. डावा हात जमिनी समांतर हलवत म्हणाल्या, ‘पाया’, मग मानेनं गुणाकाराचं चिन्ह काढत ‘गुणिले’, पुढं उजवा हात डोक्याच्या वर नेत ‘उंची’. ‘पाया गुणिले उंची’ असं म्हणून दोन्ही हात तसेच ठेवून एका पुढं एक पाय टाकत त्या चौकोनाच्या आकारात फिरून म्हणाल्या ‘क्षेत्रफळ!’ जोशीसर एकदम म्हणाले, ‘हां, हे एकदम ब्येष्ट आहे. कामंच सोपं झालं’ टाळ्यांच्या कडकडाटात शिक्षक सभा संपली.

सोमवारपासनं शाळेत एकदम धुमशान सुरू झालं. वजनदार रामनामे सर सोमवारी येताना गांधी टोपी घालून, गळ्यात उपरणं घेऊन आले. वर्गात शिरतानाच त्यांनी खिशातले टाळ काढून गळ्यात अडकवले. बुक्क्याची पुडी टेबलावर ठेवून आपल्या कपाळाला आणि पोरांच्या कपाळाला बुक्का लावला आणि म्हणाले, ‘‘आपली संस्कृती शाळेत आली पाहिजे म्हणून मी तुम्हाला पोराहो वारकरी पद्धतीनं मराठी शिकवणार आहे. बोला पुंडलिका वरदे हारि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराजकी जय.’’ सगळी पोरं तारस्वरात किंचाळली. पोरांचा आवाज ऐकून सदावर्ते बाई धावत आल्या. तोवर रामनामे डोळे मिटून टाळांच्या तालावर एक पाऊल पुढं एक पाऊल मागं करायला सुरुवात केली होती. ‘तर पोरांहो, आज आपण मर्ढेकरांची कविता शिकणार आहोत’ असं म्हणून ‘ग्यानबा तुकाराम’च्या लयीत पावलं टाकत ‘कितीतरी दिवसात’ (ग्यानबा तुकाराम) एक पाऊल पुढं ‘नाही चांदण्यात गेले’ (ग्यानबा तुकाराम) एक पाऊल मागं अशी सुरुवात केली. दोन ओळीत पोरांनी लय पकडली आणि आख्खा वर्ग ‘ग्यानबा तुकाराम’ करत वारकरी नृत्य करत कविता म्हणत ‘बरी तोतर्याल नळाची’ ‘शिरी धार मुखी ऋचा’पर्यंत पोचले. शेवटी रामनमोंच्या टाळांच्या आणि पोरांच्या टाळ्यांच्या गजरात वारकर्यांचच्या सारख्या टणाटणा उड्या मारत ‘मर्ढेकर महाराज की जय’ ‘रामनामे महाराज की जय’ असा गजर करून थांबला. बाहेरून बघणार्याे सदावर्ते बाई संतुष्ट चेहर्यारनं ऑफिसकडं गेल्या.

सिनिअर असलेल्या ठोमके सरांची फार पंचाईत झाली. ‘थैमान’ या व्यतिरिक्त कोणताही नाचाचा प्रकार त्यांना शक्य नव्हता. आठवडाभर वेगवेगळ्या चॅनेलवरची गाणी बघून बघून त्यांनी धर्मेंद्र, सन्नी देओल आणि शम्मी कपूर असा लय आणि तालाशी अजिबात संबंध नसलेला नृत्यप्रकार स्वतःच बसवला. सोमवारी वर्गात पानिपत युद्ध शिकवताना धर्मेंद्रसारख्या दुडक्या चालीत इकडे मराठे… पेशवे, शिंदे, होळकर म्हणत दोन रांगांतून चक्कर मारली. मग सन्नीसारखं एक पाय, दोन पाय करत ‘इकडे अब्दाली बरोबर गिलचे’ करत दुसर्याक दोन रांगा पार केल्या. शेवटी पुढं येऊन हातात तलवार धरल्यासारखी छडी धरून कमरेवरच्या शरीराच्या शम्मी कपूरसारख्या हालचाली सुरू केल्या. म्हणजे कमरेखाली पाय स्थिर, वरती शम्मीसारखं झटके नृत्य करत लढाईचं वर्णन. दोन्ही हातांनी मानेमागं छडी धरून मानेला झटके देत एकदम कंबर वाकवून लाडिक चेहरा करत ‘संक्रांतीचा दिवस होता.. सदाशिवराव भाऊ पराक्रमाची शर्थ करत होता’ वगैरे सुरू झालं. मधेच एक पोरगं ‘खिक्क’ करून हसल्यावर एक हात कमरेवर ठेवून दुसर्यात हातानं छडी फिरवत, ठुमकत, मान तिरकी तिरकी करत ठोमके त्याच्यापर्यंत पोचले आणि त्यांनी छडीचा वार पोराच्या दंडावर काढला. त्याबरोबर त्या पोराचा वेगळाच नाच सुरू झाला.

तिकडं आजींनी म्हणजे उत्पातबाईंनी हिंदीच्या तासाला अलबेलामधल्या गीताबालीसारख्या आणि थोड्या भगवानसारख्यासुद्धा हातांच्या आणि जमतील तेवढ्या कमरेच्या हालचाली करत ‘‘तेज धूपसे यह लड जाता वर्षाके आगे अड जाता’ ही कविता ‘शाम ढले खिडकी तले’ ह्या गाण्याच्या चालीवर शिकवायला सुरुवात केली होती.

सगळ्यात धुमाकूळ घातला होता तो जोशी सरांनी. इंग्रजी शिकवताना ते पाचवीच्या वर्गात रॉक अँड रोल करत स्पेलिंग पाठ करून घेत होते. तर नववीला समीकरण शिकवताना ‘डावी बाजू आं वांहू वांहू बरोबर उजवी बाजू आं वांहू वांहू’ असं म्हणत भांगडा करत होते.

एकूण काय कुठं कथ्थक, कुठं कुचिपुडी, तर कुठं बाल्या नृत्य अशी सगळी शाळा नाचत होती. पोरांनाही नाचायला मजा येत होती. कधी शाळेकडं न फिरकणारे पालक आता ‘तास’ बघायला गर्दी करायला लागले होते. सगळं बघून सदावर्ते बाई बेहद्द खूष होत्या. अत्यंत संतुष्ट मनानं त्यांनी शुक्रवारच्या आढावा बैठकीची नोटीस काढली.

इकडं, आपण सुचवलेली नवी योजना कशी राबवली जाते आहे हे बघायला अध्यक्ष उत्सुक होते. त्यांनी कार्यवाहांना सांगितलं, ‘येत्या शुक्रवारी आपण अचानक सदावर्ते बाईंच्या शाळेला भेट देऊ. जरा बाजूला आहे शाळा, पण बाई उत्साही आहेत. त्यांनी नक्की पुढाकार घेतला असेल.’ कार्यवाह म्हणाले, ‘इतर कोणी संचालक येतात का बघतो.’ अध्यक्षांनी सांगितलं बघा बघा, आले तर चांगलंच आहे, म्हणजे ही मंडळी त्यांच्याही शाळांतून पाठपुरावा करतील.. पण बाईंना किंवा शाळेला मात्र आधी कळवू नका. अचानक जाण्यात गंमत आहे. कुणी कुणी काय काय निवडलंय? वर्गात कसं वापरलंय ते कळेल!’

शुक्रवारची आढावा बैठक सदावर्ते बाईंनी मुद्दाम वरच्या मजल्यावरच्या हॉलमध्ये बोलावली होती. ज्या शिक्षक-शिक्षिका काय करताहेत हे त्यांना बघायला मिळालं नव्हतं त्यांचं प्रात्यक्षिक सगळ्यांच्या समोर करायला लावायचा त्यांचा बेत होता. म्हणजे सगळी शाळा संस्थेच्या नव्या योजनेत सहभागी झाल्याचं समाधान त्यांना मिळालं असतं. मधल्या सुट्टीनंतर डबे खाऊन सगळे शिक्षक एक एक करत जमा झाले. सगळे उत्साहानं आपापले अनुभव सांगत होते. सगळ्यांचा एकच गलका सुरू होता. शेवटी सदावर्ते बाई उभ्या राहिल्या. मुलांना सांगावं तसं हात वर करून एकदम ‘शांतता’ असं ओरडल्या; त्यासरशी गलका एकदम थांबला. बाई म्हणाल्या ’आज मी प्रथम तुमचं अभिनंदन करते. संस्थेची योजना…’

एवढ्यात संस्थेचे अध्यक्ष, कार्यवाह आणि एक-दोन संचालक अशा सगळ्यांना घेऊन गाडी शाळेच्या आवारात आली. उत्साहानं अध्यक्ष खाली उतरले. बघतात तर सगळीकडं शुकशुकाट. वर्ग मोकळे. कपाळावर आठ्या घालत त्यांनी कार्यवाहांना विचारलं, ‘आज काय सुट्टी आहे, का शाळा लवकर सोडली?’ कार्यवाहदेखील बुचकळ्यात पडले. ‘संस्थेकडं तरी शाळेनं काही कळवलं नाहीये. काही कळत नाहीये.’ असं म्हणत कार्यवाह ऑफिसकडं निघाले. एवढ्यात अध्यक्ष, कार्यवाह, संचालक आलेत हे कुलकर्णी क्लार्कला ऑफिसच्या खिडकीतनं दिसलं. तो पळत बाहेर आला. त्याला कार्यवाहांनी विचारलं, ‘काय कुलकर्णी, शाळा का सोडली? शिक्षक कुठं आहेत? आणि मॅडम कुठं गेल्या?’ कुलकर्णींनी नेहमीप्रमाणं हेल काढत सांगितलं, ‘आज आढावा बैठक हाय म्हणून शाळा लवकर सोडल्या. म्याडम आणि समदे जण वरल्या हॉलमदी बैठकीत हैत. बोलवू काय?’ ‘नको, नको’ म्हणत कार्यवाहांनी विचारलं, ‘कसली आढावा बैठक?’ कुलकर्णी म्हणाला, ‘ते संस्थेची योजना नाय का नाचू आनंदे…’ अध्यक्ष एकदम दचकले, ‘काय?’, कार्यवाह म्हणाले, ‘चला आपण जाऊन बघूया! त्याला काय कळतंय, तो काहीही सांगेल.’ मग सगळे वरच्या मजल्याकडं निघाले.

हॉलमध्ये सदावर्ते बाई बोलत होत्या. ‘तुम्ही लोकांनी संस्थेची योजना यशस्वी करण्यासाठी जे कष्ट घेतले ते मी बघितले. फक्त रेश्मा बाईंचा तास राहिला. त्या काय करतात हे बघायची मला उत्सुकता आहे; म्हणून त्यांना तयारी करून यायला सांगितलंय. त्या शिवाय तुम्ही तुमचे अनुभव सांगा. काही सूचना असतील तर सांगा. म्हणजे आपण संस्थेची योजना अध्यक्षांच्या अपेक्षेप्रमाणे राबवू.’ बरोबर समेवर यावं तसे या वाक्याला अध्यक्ष हॉलच्या दारात प्रकट झाले. त्यांना अचानक बघून सदावर्ते बाई क्षणभर भांबवल्या. मग त्यांचा चेहरा एकदम प्रसन्न झाला. आपली कार्यक्षमता दाखवायची हीच संधी आहे हे त्यांनी हेरलं. अध्यक्ष आणि मंडळी आत आल्यावर सगळे शिक्षक पटापटा उभे राहिले. अध्यक्षांनी बाईंकडं आणि शिक्षकांकडं सुहास्य नजरेनं बघितलं आणि म्हणाले, ‘बसा बसा, तुमचं चाललंय ते बघायलाच आम्ही आलोत. तुमचं चालू दे,’ असं म्हणून अध्यक्ष शिक्षकांच्यात एका मोकळ्या बाकावर जाऊन बसले. बरोबरच्या मंडळींनीही मग बाक पकडले.

सदावर्ते बाईंचं व्याख्यान पुन्हा सुरू झालं. प्रत्यक्ष अध्यक्ष आल्यामुळं त्यांना जोर चढला. त्या थेट अध्यक्षांशीच बोलायला लागल्या. ‘तर तुम्हाला मी सांगते अध्यक्षसाहेब, आपली योजना माझ्या शाळेनं शंभर टक्के अमलात आणली. माझ्या शिक्षकांनी आपापला प्रकार निवडला. इतकंच नव्हे तर वर्गात शिकवताना त्याचा उपयोग केला. मी स्वतः सगळ्या वर्गावर गेले. सगळीकडं कसं वातावरण आनंदी, आनंद वर्गात, शिक्षणात अशी स्थिती. आज आपण अगदी योग्य वेळेला आलेले आहात. ज्यांचा तास बघायचा माझा राहिला, त्या रेश्माबाईंचं आज सादरीकरण आहे. नंतर शिक्षक त्यांचे अनुभव सांगणार आहेत, आपली परवानगी असेल तर रेश्माबाईंना निरोप पाठवते या म्हणून.’ सदावर्ते बाईंचं बोलणं ऐकून अध्यक्षांना आनंदाचं भरतं आलं. आपली योजना एवढी यशस्वी होईल अशी त्यांची अपेक्षा नव्हती. त्यांनी उत्साहानं सांगितलं, ‘हो.. हो.. बोलवा बोलवा.. मी अगदी उत्सुक आहे शिक्षकांचा सहभाग बघायला.’

रेश्माबाईंना निरोप सांगायला गेलेला शिपाई येताना आणखी एकाला घेऊन आला. सदावर्ते बाईंच्या कानाशी लागला. त्यांनी मान डोलावली आणि उठून सांगितलं, ‘पुढच्या दोन ओळींतले लोक मागं जाऊन बसा.’ कुणालाच काही कळेना. अध्यक्ष आणि इतर पाहुणे अचंबित झाले. इकडं मोकळे झालेले बाक शिपायांनी हलवायला सुरुवात केली. सगळ्यांच्या नजरेत उत्सुकता मावेनाशी झाली. मोठा चौक मोकळा करून शिपाई परत रेश्माबाईंच्याकडं सांगायला गेला.

रेश्माबाई शाळेतल्या सगळ्यात नव्या शिक्षिका होत्या. नुकतंच त्यांचं शिक्षण संपलं होतं. कॉलेजमध्ये त्या नृत्यबिजली म्हणून प्रसिद्ध होत्या. आज अध्यक्षांसकट सगळ्यांना इंप्रेस करण्यासाठी त्यांनी कंबर कसली होती.

इकडं हॉलमध्ये सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली होती. त्यात व्हरांड्यातून घुंगरांचा आवाज यायला लागला. मग सगळ्यांचे उत्सुक डोळे दारावर खिळले, आणि क्षणात ते उत्सुक डोळे विस्फारून फाटायची वेळ आली, कारण पिंजरा सिनेमातल्या शाळेच्या दारात उभ्या राहिलेल्या संध्या नटीसारख्या रेश्माबाई दारात उभ्या होत्या.

खास तमाशातल्या बायकांसारखा चापूनचोपून नेसलेला गडद जांभळा भरजरी शालू, दोन्ही हातात कोपरापर्यंत मॅचिंग बांगड्या, हातात, गळ्यात दागिने, मोठा आंबाडा, त्यावर निशिगंधाची वेणी, चेहर्याकवर मेकअप, डोळ्यात काजळ, लालभडक ओठ आणि पायात घुंगरू. बाईंनी डाव्या हाताची मूठ कंबरेवर ठेवली, उजव्या हाताची ओंजळ छातीजवळ आणून तर्जनी बाहेर काढत थोडी मान झुकवत विचारलं, ‘यावं का आत?’ ते बघून समस्त पुरुष मंडळींचा कलिजा खलास झाला, शिक्षिकांच्या आसूयेला धुमारे फुटले आणि अध्यक्षांनी ‘आ’ वासला. सदावर्ते बाईंनी कृतकृत्य चेहर्यांनं या अशी परवानगी दिली. एका हातात लफ्फेबाज पदर धरून एक हात कंबरेवर ठेवून रेश्माबाई कॅटवॉक करत आत मध्यावर उभ्या राहिल्या. त्यांच्या मागं थोड्या अंतरावर एक शिपाई हातात पृथ्वीचा गोल घेऊन आणि दुसरा शिपाई हातात नकाशा घेऊन ढोलकी आणि तुणतुणंवाल्यांसारखे उभे राहिले.

रेश्माबाईंनी मोबाईल समोरच्या बाकावर ठेवला. त्याच्यावर लावणीचं म्युझिक लावलं. जरा मागं सरकून पदर डोक्यावरून पुढं घेऊन दोन्ही हातात घेतला आणि मोबाईल म्युझिकच्या तालावर लावणी नृत्य सुरू केलं. इकडं अनेकांचे हात शिट्टी वाजवायला तोंडाकडं जात होते. पण अध्यक्षांच्यामुळे त्यांची पंचाईत झाली. म्हणून तोंडाकडं जाणारा हात दुसर्याय हातानं गच्च पकडून ठेवून मंडळी गप्प बसली.
बरोबर समेवर बाईंनी नाच थांबवून पदर डोक्यावरून मागं टाकला, डाव्या हातानं शड्डू ठोकला आणि उजवा हात वर करत म्हणाल्या ऐका…
सागर सोडुनि येती वारे
जमिनीवरती वाहत गं…
काय तयांचे नाव सांग तू,
काय तयांना म्हणती गं…
आणि समुद्रावरती जाती
वारे जमिनीकडुनी गं…
जरा आठवुनि सांग तयांचे
नांव, शहाणी म्हणेन गं…
असा सवाल टाकून डावा हात कमरेवर ठेवून उजवा हात डाव्या हातावर ठेवत बाई जरा झुलल्या आणि शिक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तोवर मागच्या शिपायांनी ‘म्हणेन गं… नारी गं…’ म्हणत झील धरली. आता सवालाला जबाब कोण देणार ही मंडळींची उत्सुकता फार न ताणता रेश्माबाईच ठेक्यात कॅटवॉक करत दुसर्याड बाजूला जाऊन उभ्या राहिल्या आणि मागं हेलकावणारा पदर खोचून बांगड्या मागं करत जोरात म्हणाल्या ऐका –
येती वारे जाती वारे
नकोस लढवू शक्कल गं
फुका विचारून प्रश्न फालतू
दाविसी का तू अक्कल गं… गं… गं… गं
समुद्र लंघुनी येती वारे
खारट पाण्यावरुनी गं,
‘खारे वारे’ म्हणुनी त्यांची
ओळख आहे जगात गं
उलटे वारे मातीवरुनी
पुन्हा सागरी जे जाती
‘मतलई’ त्यांचे नांव सांगते
मान शहाणी मज जगती

आता मात्र शिट्ट्या आणि टाळ्यांचा कल्लोळ झाला. स्वतः मुख्याध्यापिका सदावर्ते बाईंनी धावत जाऊन रेश्माबाईंना मिठी मारली आणि शिक्षकांकडं वळून म्हणाल्या, ‘असा भूगोल शिकल्यावर काय बिशाद आहे विसरायची.’ रेश्माबाईंनी हे सगळं कौतुक संतुष्ट चेहर्याानं हसत हसत स्वीकारलं आणि जरा पुढं झुकून सगळ्यांकडं बघत मुजरा करून त्या निघून गेल्या.

इकडं सदावर्ते बाई म्हणाल्या, ‘बघितलंत ना साहेब, असे एकापेक्षा एक गुणी शिक्षक आहेत माझ्या शाळेत, त्यांच्यामुळेच तर संस्थेची नाचू आनंदे ही योजना यशस्वी झाली.’ हे ऐकून अध्यक्षांचा चेहरा वेडावाकडा झाला. त्यांचं नेहमीचं हास्य लोपलं. त्यांच्या कानातनं वाफा यायला लागल्या. त्यांची अवस्था बघून शेजारी बसलेल्या नव्या तरुण संचालकाच्या कानात कार्यवाह कुजबुजले, ‘अध्यक्षसाहेब आता तांडवनृत्य करणार बहुतेक.’ त्यांनी खुणेनंच शिपायाला बोलावलं आणि त्याच्या कानात काहीतरी सांगितलं.

समोर सदावर्ते बाई बोलतच होत्या, ‘साहेब, आता शिक्षक त्यांचे अनुभव सांगणार आहेत. पण आपल्याला फार वेळ नसणार हे लक्षात घेऊन सर्वांच्या वतीनं फक्त जोशी सर बोलतील.’ नेहमी आगाऊपणा करणार्या जोशाला कसं अडचणीत आणलं असं मनात म्हणत त्या बसल्या. सदावर्ते बाईंची खेळी जोशी सरांच्या लक्षात आली. हा डाव कसा उलटवायचा हे त्यांनी एका क्षणात ठरवलं. ते उठले तेच अमिताभ बच्चनसारखा एक हात कमरेवर ठेवून दुसरा हात डोक्याच्या वर करून. त्याच्यासारखेच नाचत ते समोर आले. मग एकदम पवित्रा बदलून वांहु वांहु करत भांगडा सुरू केला. मग एकदम थांबून म्हणाले ‘लै भारी… तुमची योजना लै भारी… नाचू आनंदे म्हणजे एकदम मस्त. पहिल्यांदा तुमच्या सहीचं पत्र वाचलं तेव्हा एकदा वाटलं का प्रिंटिंग मिष्टेक हाय. हे वाचू आनंदे असणारे ते ‘वा’ चा ‘ना’ झालाय… आनंदीबाई, आनंदराव असेल कोणतरी. आमचे ठोमके सर म्हणालेसुद्धा, पत्रात काय चूक हाय का इचारा, पण सदावर्ते म्याडम म्हणाल्या का, ‘संस्था चुकत नाही.’ मग पटलं. वाचू आनंदे कोणीही करेल. नाचू आनंदे करणारे फक्त आपणच! गेल्या आठवड्यात लै मजा आली. आमाला नाचत शिकवायीच आणि पोरान्ला शिकायची. वाचू आनंदे असतं तर अवघड झालं असतं म्हणजे आता वाचायची सवय सुटलीय. आता नवी पुस्तकं वाचायची म्हणजे प्रॉब्लेम! त्यापेक्षा हे नाचू आनंदे बेष्ट! आणखी एक फायदा म्हणजे बोलवूनही न येणारे पालक शाळेत यायला लागले, आता बोला! आता रेश्माबाई असं शिकवायला लागल्या म्हंजे चौफुल्यावर आणि डान्स बारला जाणारे पालकही शाळेत त्यांच्या तासाला येणार! आणि नुसते येणार नाहीत शिक्षणाच्या फीचा त्यांच्यावर पाऊस पाडून जाणार. नाचू आनंदे वर्षभर चालू द्या. शाळेची नवी इमारत होती का नाही बघा… नाचू आनंदे… लै भारी.’

एवढ्यात अध्यक्ष उठले आणि बाहेर पडले. ते बघून कार्यवाह आणि इतर संचालकही बाहेर पडले. सदावर्ते बाई त्यांच्यामागं धावल्या… बाहेर व्हरांड्यातून वेगानं निघालेले अध्यक्ष कार्यवाहांशी बोलत होते, त्यातलं एकच वाक्य बाईंच्या कानावर पडलं, ‘उद्याच्या उद्या ही योजना बंद केल्याचं पत्र पाठवा.’ ते ऐकून बाईंनी विचार केला उद्याचं पत्र येईल तेव्हा येईल तोवर नाचू आनंदे!

जनार्दन लिमये, सांगली
editor@menakaprakashan.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.