Now Reading
लिंबू सरबत बुक ऑफ रेकॉडर्स

लिंबू सरबत बुक ऑफ रेकॉडर्स

Menaka Prakashan

‘‘अगं, जिथे शब्द मौन होतात, प्रेमभावना वाहून नेण्याची त्यांची मर्यादा खुंटते तेव्हा चुंबनाची भाषा सुरू होते!’’ इतकं चुंबन माहात्म्य ऐकून नीलम चाट पडली. नवर्यााकडे बघतच राहिली. नाही म्हटलं तरी तिच्यातील प्रेमभावनांना अभिषेकच्या शब्दाने स्पर्श केला होता.

‘‘अगं वाचलंस का त्या रेकॉर्ड बद्दल?’’ अभिषेकनं दबकत ओशाळत नीलमला विचारलं.
‘‘कसलं रेकॉर्ड?’’
‘‘अगं त्या रेकॉर्डबद्दल…’’
‘‘दर वर्षी होते ती स्पर्धा!’’
‘‘मी तुला इन्स्टाग्रामवर फोटो पाठवला होता ना दुपारी!’’
‘‘अहो, काय बोलताय, कोणत्या स्पर्धेबद्दल? आणि नीट सांगा! आई आता कीर्तनावरून येईलच! आणि आपलं परतीचं कोकणकन्येचं आरक्षण केलंय ना तुम्ही उद्याचं?’’ मेथीची भाजी निवडत नीलम अभिषेकला बोलली.
‘‘अगं.. तू मला पहिलं अहो-जाहो करणं बंद कर! कितीदा सांगितलंय मला अभी म्हणून हाक मारत जा!’’
‘‘मला मित्रांसमोर लाज वाटते! आता मुंबईची झाली आहेस तू! मॉडर्न हो आता!’’
‘‘नाही नाही, मी भाजीवाल्याला, सिलेंडरवाल्याला, अगदी रस्त्यावरील अनोळखी माणसालाही तुम्ही म्हणते मग.. तुम्ही तर माझे नवरे आहात! मी तुम्हाला तुम्हीच म्हणणार!’’
‘‘पहिल्यांदा तर आदरार्थी बोलताना नवर्यातचा नवरे करू नकोस! तुला मी हा एकच नवरा आहे. बरं ते मरू दे!’’
‘‘ऐक, एक स्पर्धा आहे! तू आधी हो म्हण! मग मी सांगतो काय ती! मला त्यात भाग घ्यायचा आहे!’’
‘‘अहो, घ्या की मग! माझ्या आजीने लग्नाच्या वेळी मला सांगितलंय की नवर्या ने बाहेर तोंड मारू नये यासाठी आपणच नवर्याआला प्रत्येक गोष्टीत साथ द्यावी! आणि तसंही देअर इज आलवेज अ वन वूमन बिहाईंड एव्हरी सक्सेसफुल मॅन! म्हणून घाबरू नका हो. मी तुमच्या मागे आहे!’’
अभिषेकचा चेहरा आशेच्या किरणाने उजळून निघाला.
‘‘आता तुम्ही ती संन्याशाप्रमाणे वीतभर दाढी वाढवून बसलायत. मी काही बोलले का तुम्हाला?’’
अभिषेकच्या उजळलेल्या चेहर्यासवर नीलमच्या या वाक्याने क्षणात काजळी पसरली.
‘‘अगं, हा नोव्हेंबर महिना आहे! नो शेव नोव्हेंबर! ऑफिसमध्ये सगळ्यात रुबाबदार दाढी ज्याची असेल त्याला प्राईझ मिळणार आहे!’’
‘‘बरं ऐक ना! तू हो म्हण ना स्पर्धेसाठी!’’
‘‘एक मिनीट, दारूबिरू पिण्याची स्पर्धा आहे का? तसं असेल तर मी बिलकूल परवानगी देणार नाही आताच सांगतेय ! वधू-वर संशोधन मंडळात पोरगा पूर्णपणे निर्व्यसनी आहे, हेच वाचून मी आईबाबांना पुढे जा म्हणाले होते! नाहीतर माझ्यासाठी राजबिंड्या, सॉफ्टवेअर इंजिनीअर्स, फॉरेनमध्ये राहणार्याच पोरांची लाइन लागली होती. पण, ते सारे अति मॉडर्न होते आणि मला माझ्यासारखा साधा,पारंपरिक नवराच हवा होता! म्हणून तर मी तुम्हाला ‘हो’ म्हटलं!’’
‘‘वाटलं होतं, इंजिनीअर असला तरी पोरानं मिशी ठेवली आहे, पोट सुटलं आहे, गळ्यात जानवं आहे, धार्मिक आहे, निर्व्यसनी आहे ! पण लग्नाआधी सोडमुंज झाली आणि तुम्ही जानवं खुंटीवर अडकवून ठेवलं! आता त्याच्यावर माश्या अंडी घालतात!’’
‘‘आणि परवा रात्री तुम्ही ऑफिसच्या पार्टीतून पिऊन आलात तेव्हा घरात भिंतीवर डोकं आपटून घेतलंत! आज सकाळपासून आई-बाबा मला विचारतायत अभिषेकरावांना कपाळावर टेंगुळ का आलंय!’’
‘‘नाही नाही नाही! दारूबिरू पिण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा नाही!’’
लाडाने नीलमचे हात हातात घेत अभिषेक गोडीगुलाबीने बोलू लागला, ‘‘अग्गं निलूडी, किती बोलतेस, ऐक. दारू वगैरेची स्पर्धा नाही आहे ही! आणि ही एकट्यानेच भाग घेण्याची स्पर्धा नाही. जोडीदारासोबतच भाग घ्यावा लागणार आहे, म्हणून तू हो म्हण ना गं गोडुली!’’
‘‘दूर व्हा बरं! पूजा व्हायची आहे अजून माझी! आणि कोणी बघितलं तर काय म्हणतील, हे असं अंगचटीला येणं बायकोच्या माहेरी!’’
‘‘अगगं!’’ त्रासिक आवाजाने पुढे पुन्हा लाडेलाडे बोलत अभिषेक म्हणाला, ‘‘बरं ऐक, ही स्पर्धा आपल्या जोडीदारासोबत भाग घेण्याची आहे. हं आता तू म्हणत असशील तर नेहाला विचारू का माझी जोडीदार म्हणून भाग घ्यायला!’’
नेहा अभिषेकची ऑफिसची कलिग, अभिषेकवर लग्नाआधीपासून लट्टू होती. आताही ती त्याच्या गळ्यात पडते असा नीलमला दाट संशय होता.
नेहाचं नाव ऐकताच नीलम चिडून बोलली, ‘‘काही नको! सांगा कोणती स्पर्धा आहे! घेते मी भाग तुमच्याबरोबर!’’
थोडंसं चाचरत, अडखळत अभिषेक बोलू लागला, ‘‘ऐक, तू चिडू नकोस. तुला आवडणार नाही, पण तू सकारात्मक दृष्टीने बघ या स्पर्धेकडे! भारतात प्रथमच होते आहे ही स्पर्धा!’’
‘‘सांगताय का कसली स्पर्धा आहे?’’
‘‘ही दीर्घ चुंबन स्पर्धा आहे!’’ सगळं अवसान एकवटून एका वाक्यात बोलून, नीलमचे दोन्ही हात हातात घेऊन स्वतःचा चेहरा झाकून तो बोलला.
‘‘काय?’’ अंगावर पाल पडल्यासारखी नीलम अभिषेकला दूर करत जोरात ओरडली!
‘‘शी! ही कसली वाईट, असंस्कृत, लैंगिकतेचं प्रदर्शन करणारी स्पर्धा! ज्या गोष्टी चार भिंतीच्या आत एकांतात करायला हव्यात त्याचं प्रदर्शन भरवणारी स्पर्धा!’’
अभिषेक समजवण्याच्या, भाषण देण्याच्या सुरात सांगू लागला, ‘‘नीलम, हा आधुनिक भारत आहे! आपण एकविसाव्या शतकात आहोत! प्रेमाच्या गोष्टीं मोकळेपणाने बोलणं, वागणं यात गैर ते काय! चुंबन ही तर प्रेमाची मूकभाषा! चुंबन हे तर प्रेमाचं राजचिन्ह!’’
‘‘राजचिन्ह! चुंबन महती सांगताना सरकारला मधे का आणताय! म्हणे प्रेमाचं राजचिन्ह!’’
‘‘अगं, जिथे शब्द मौन होतात, प्रेमभावना वाहून नेण्याची त्यांची मर्यादा खुंटते तेव्हा चुंबनाची भाषा सुरू होते!’’
इतकं चुंबन माहात्म्य ऐकून नीलम चाट पडली. नवर्यारकडे बघतच राहिली. नाही म्हटलं तरी तिच्यातील प्रेमभावनांना अभिषेकच्या शब्दाने स्पर्श केला होता.
जरा भानावर येत ती म्हणाली, ‘‘छे छे! पण तुमच्या प्रेमाच्या भाषेचं असं जाहीर प्रदर्शन मांडायची काय गरज पण?’’
‘‘अगं तुला कसं समजवून सांगू आता! ऐक, अशी महाचुंबन स्पर्धा ही जगात अमेरिकेत आणि दक्षिण कोरियात होत असते!’’
‘‘एका मोठ्या म्युझिक टीव्ही चॅनलने ही स्पर्धा आयोजित केली आहे, आणि इव्हेंट मॅनेजमेंट कम्पनी माझ्या मित्राचीच आहे, म्हणून आपली सहज एन्ट्री होतेय! नाहीतर लोक तळमळताहेत भाग घेण्यासाठी!’’
‘‘आणि लिम्का बुक ऑफ अॅीवॉर्डसचंही या स्पर्धेकडे लक्ष आहे! जगभराचे लोक लिम्का बुक ऑफ अॅणवार्ड्समध्ये नाव करतायत. मला पण रेकॉर्ड करायचाय! प्लीज तू हो म्हण ना!’’
‘‘काही नको लिम्का, कोकाकोला, फ्रुटी अॅरवॉर्ड्स आपल्याला! शरीराला हानिकारक असतात कोल्ड्रिंक्स! वाचत नाहीत का तुम्ही वर्तमानपत्रात! हाडं ठिसूळ होतात ही शीतपेयं प्यायल्यानं! आपलं साधं लिंबू किंवा कोकम सरबत, कैरीचं पन्हं प्यावं!’’
‘‘देवा मला वाचव रे या मुलीपासून! का मी अरेंज मॅरेज केलं कोकणातल्या खेड्यातल्या मुलीशी!’’ त्रासिक स्वरात अभिषेक आकाशाकडे बघत बोलला.
‘‘ऐक बाई माझे, लिम्का बुक ऑफ अॅ वॉर्ड्सचा कोल्ड्रिंक्सशी काहीही संबंध नाही गं! बरं, तू असं समज की लिंबू सरबत बुक ऑफ अॅडवॉर्ड्स किंवा कोकम सरबत बुक ऑफ अॅ्वॉर्ड्समध्ये नाव यावं म्हणून आपण भाग घेतोय! ठीक आहे!’’
‘‘नक्की काय करावं लागेल?’’
नीलमच्या या प्रश्नाने तिने शस्त्र खाली ठेवलंय याची जाणीव झाल्याने अभिषेक खूष झाला!
‘‘काही नाही गं! बस तेच करावं लागेल जे मी तुला ऑफिसला जाण्यापूर्वी करण्याचा प्रयत्न करतो पण तुला आवडत नाही! आणि रात्रीही बेडरूममध्ये तुझी सतत ‘ना’ असते!’’
‘‘तेच आपल्याला त्या स्पर्धेत करायचंय! चुंबन घ्यायचंय स्वीटहार्ट!’’ लाडे लाडे नाराजीच्या सुरात अभिषेक नीलमच्या चेहर्यायला दोन्ही हाताने धरत म्हणाला.
नवर्या ला बाहेर तोंड मारू द्यायचं नसेल तर बायकोनं नवर्यायच्या प्रत्येक गोष्टीत सोबत राहायचं! अभिषेकनं नेहाचं नाव घेतल्यानं, आजीचं हे वाक्य आठवल्यानं नीलम मुळीच इच्छा नसताना, मन मारून या तोंडी परीक्षेसाठी तयार झाली.
‘‘किती मिनिटांत रेकॉर्ड होतो लिंबू सरबत बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवण्यासाठी?’’
या प्रश्नाने अभिषेकमध्ये जोम संचारला, अगदी गंभीरपणे काही महत्त्वाची माहिती कोणाला सांगतोय या आविर्भावात अभिषेक सांगू लागला
‘‘तुला माहितीय जगात सगळ्यात दीर्घ चुंबन त्रेपन तास वीस मिनिटे एकोणीस सेकंदस्चं आहे! यूएसच्या कपलचा तो रेकॉर्ड आहे!’’
‘ऑएक !!!’’
नीलमनं एकदम उलटी केल्याच्या आविर्भावात तोंड उघडून जीभ बाहेर काढून ‘ऑएक’ आवाज केला!
‘‘अरे देवा ! इतकं लांब किस! शी! इतका वेळ एकमेकांच्या तोंडाला तोंड लावून बसल्यावर पुन्हा त्या दोघांनी एकमेकांचं तोंडही बघितलं नसेल! अति तेथे मातीच!’’
’’ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये!’’
’’ओठ मऊ लागले म्हणून….! जाऊ दे काय बोलणार!’’
’’हे बघा मी असलं काहीही करणार नाहीये!’’
’’तेही सगळ्यांसमोर! देवा! व्याडेश्वरा!’’

‘अगं इतका वेळ नाही, पण इतर स्पर्धकांपेक्षा आपण जास्त वेळ किल्ला लढवूया! फत्ते आपलीच होणार!’’
‘‘व्हय महाराजा!’’
‘‘चल जरा नेट प्रॅक्टिस करूयात!’’ असं खोडकरपणाने म्हणत अभिषेक नीलमला जवळ घेऊ लागला तेवढ्यात मागून, ‘‘अगं नीले, झाला का गं स्वयंपाक! ओसरीतून नीलमच्या वडिलांचा आवाज ऐकू आला, तसा अभिषेक झट्कन नीलमपासून दूर झाला.’’
‘‘अहो, अभिषेकराव माझा मोबाईल बंद पडला हो आज दुपारपासून, जरा बघता का!’’
अभिषेक मोबाईल घेऊन काय झालंय ते बघू लागला. इथे आल्यापासून त्याने सासू-सासर्यां ना व्हॉट्स अॅिप कसं वापरायचं शिकवलं होतं. महासंतापी जमदग्नीचे अवतार असलेल्या पारंपरिक विचारांच्या नीलमच्या तीर्थरूपांनी शांतपणे ते शिकूनही घेतलं.
शिवाय सासर्याथच्या मोबाईलमध्ये त्यानं स्वतःचं नाव गमतीने सन इन लॉ म्हणून सेव्ह केलं. अभिषेकनंही मुद्दाम नीलमला चिडवण्यासाठी तिच्या वडिलांचं नाव बाप इन लॉ असं ठेवलं.
दोन दिवस नीलमच्या माहेरी घालवून अभिषेक आणि नीलम दुसर्यान दिवशी गुरुवारी कोकणकन्येनं मुंबईला परतले.
अभिषेक ट्रेनमध्ये सतत चुंबन स्पर्धेबद्दल बोलत होता.
‘‘ऐक, हे वाच! प्रथम कुठल्याही स्पर्धेचे नियम, खेळाची माहिती घ्यायची असते! तर आज आपण प्रथम चुंबनाचे प्रकार समजावून घेऊ!’’ ‘आपापल्या वह्या काढा पोरांनो’ असं शिक्षकाच्या आविर्भावात अभिषेक सांगू लागला.
‘‘तर प्रथम प्रकार असतो जनरल किस.. त्यानंतर जरा जास्त इंटिमेट स्मूच! आणि तिसरा जालीम आवडता प्रकार असतो फ्रेंच किस!’’
‘‘शु शु चूप! अहो रेल्वेत सार्वजनिक ठिकाणी काय अश्लील बोलताय!’’
‘‘अगं यात काय अश्लील… अभ्यास, रिसर्च मस्ट असतो कोणताही प्रोजेक्ट करताना! माझा स्वभावच आहे तो!’’
‘‘देवा व्याडेश्वरा! नीलमनं कुलदैवताचं स्मरण केलं.
संध्याकाळी उशिरा पोहचल्याने प्रवासाच्या थकव्यामुळे अभिषेकने नीलमला नेट प्रॅक्टिस करायला भाग पाडलं नाही.

दुसर्याा दिवशी शुक्रवारी सकाळी ऑफिसला निघण्यासाठी अभिषेकला उशीर झाला. ऑफिसमध्ये सगळेजण अभिषेकच्या वाढलेल्या रुबाबदार दाढीचं कौतुक करत होते. सगळ्यांचं म्हणणं होतं ऑफिसमधील ही मुश्टॅच बिअर्डसम स्पर्धा तोच जिंकणार! त्यामुळे अभिषेक फार खूष होता. एकाच आठवड्यात दोन स्पर्धा जिंकण्याचा त्याची इच्छा होती.
ऑफिसमध्येही रविवारी मुंबईत लाँग किस कॉम्पिटिशन होतेय याबद्दलची कुणकुण लागली होती. त्याने मात्र कोणाला स्वतःच्या पार्टिसिपेशनबद्दल मुद्दाम सांगितलं नाही. त्याला कोणी स्पर्धक नको होते. या वेळी आपलं नाव गिनीज बुक नाही तर किमान लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवायचंच याचा त्याने चंग बांधला होता.
फक्त अडचण होती नीलमचीच. कोकणातल्या एका छोट्या गावातील मुलीशी आई-वडिलांच्या इच्छेखातर त्याने लग्न केलेलं होतं. नीलम मात्र पारंपरिक विचारसरणी असलेली, कायम कुंकू-टिकली लावणारी, स्वतःच्या दिसण्याबद्दल, कपड्यांबद्दल जागरूक नसलेली अति धार्मिक आणि काहीशी नीरस होती, हीच अभिषेकची तक्रार होती. तिला तो सतत आधुनिक होण्याबद्दल, राहणीमान आधुनिक ठेवण्याबद्दल, जरा रसिक होण्याबद्दल सांगायचा.
रात्री अभिषेक खुशीत घरी आला. अंघोळ करून फ्रेश झाला, आवडत्या फ्लेवरचं माऊथ फ्रेशनर वापरलं, त्याने खास कनौजहून आणलेला परफ्युम अंगावर शिंपडला.
आणि हॉलमध्ये ‘ढ्यांटढ्यां’ स्टाईलमध्ये एन्ट्री करत उत्साहात गाऊ लागला.
‘‘अरी ओ जानेमन बाहर निकल!’’
‘‘तू जो बोली थी पिछले बुधवार को अगले जुम्मे को चूम्मा दुंगी .. !’’
‘‘आज जूम्मा है! तो आजा! आजा!’’
‘‘जूम्मा चुम्मा दे दे! नीले चुम्मा दे दे चुम्मा!’’
ढगळ बंद गळ्याचा गाऊन घालून आलीया भोगासी.. चेहरा करून नीलम सरावाच्या मैदानात म्हणजे हॉलमध्ये आली.
अभिषेकनं लाईट्स बंद करून सुगंधी मेणबत्त्या लावल्या होत्या. हळू आवाजात इंग्लिश संगीत सुरू होतं.
‘‘कुर्यात सदा चुंबनम्! दीर्घ चुंबनम् सावधान!’’ म्हणत अभिषेकने नीलमला जवळ ओढलं, तिच्या गालाला हलकंसं किस केलं आणि मानेला एका हाताने हलकंसं पकडून तिला किस करण्यासाठी तिच्या ओठांच्या अगदी निकट गेला. तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवणारच, इतक्यात नीलमला जोरदार शिंक आली.
‘‘अहो तुमच्या मिशीचे केस माझ्या नाकात जाताहेत! दाढीच्या केसांमुळे माझ्या गालाला, मानेला गुदगुल्या होतात! मला नाही जमणार!’’
अभिषेकसमोर मोठा प्रश्न पडला. हृदयावर फार मोठा दगड ठेवून त्याने दाढी-मिशी काढण्याचा अत्यन्त कठीण निर्णय घेतला. त्याने विचार केला ‘मुस्टॅच’ असताना ही काही ‘स्मूच’ करणार नाही! बिअर्ड हँडसम स्पर्धेत आपण पुढच्या वर्षीही भाग घेऊ शकतो पण चुंबन स्पर्धा मात्र पुन्हा भारतात होईल की नाही याची शाश्वती नव्हती.
जेवण आटोपून त्याने दाढीचं पीक कापण्याची अवजारं काढली. प्रथम वस्तरा चालवताना त्याला अपार दुःख झालं, पण बायकोमुळे त्याने चेहर्याुवरील उभं पीक कापून स्वच्छ केलं.
सोललेल्या कोंबडीसारखा तो दिसू लागला.
अभिषेक बेडरूममध्ये गेला तर नीलम गाढ झोपून गेली होती.
नाराजीनं काहीही न बोलता अभिषेक तिच्याकडे पाठ करून झोपी गेला.

‘‘काय मत कॉम्पिटिशनबद्दल?’’ न्यूज चॅनलच्या अँकरने एका पॅनलिस्टला प्रश्न केला.
ही स्पर्धा आजच्या बिघडलेल्या पिढीचं निदर्शक आहे! हा उच्छानकुल प्रकार आहे!
‘‘तुम्हाला उच्छृंखल म्हणायचं आहे का?’’
‘‘तुमचं काय म्हणणं आहे मिस अनामिका बोस?’’ एका बॉयकट केलेल्या, कठोर चेहर्या.च्या मध्यमवयीन बंगाली विदूषीला प्रश्न केला.
‘‘ये एक अच्छा स्पोर्धा है! भारत का नौजवान के व्यक्ती स्वातंत्र्य का तुम लोग ऐसे हॉरन नही कर सोकते!’’
टीव्हीसहित जिकडेतिकडे चुंबन स्पर्धेबद्दल फार गरम चर्चा, वाद सुरू होता.
‘‘योगासन गुरू सोमदेवबाबा, तुम्ही कोणते व्यायाम सांगाल स्पर्धकांना या चुंबन स्पर्धेसाठी?’’
‘‘देखो बेटा, मैं कुछ होठो के व्यायाम बताता हूँ! आप प्रथम पाउटासन कीजिए!’’
‘‘शितली प्राणायाम कीजिए इससे आपकी सांस ऑर फेफडो की ताकद बढेगी! इससे अच्छा परफॉर्मन्स होगा बेटा!
इसके अलावा हमारी सप्तंजली ने फलों के रस से बबलगम, च्युइंगम बनाये है! आप उसे चुसिए ! उससे होठो का व्यायाम होगा!’’
दुसर्याा न्यूज चॅनलवर एक कुरळ्या केसांचा दाक्षिणात्य डॉक्टर सांगत होता, ‘‘चुंबन म्हणजे ह्युमन सलायवा -लाळेची देवाणघेवाण होय! मानवी लाळेची पीएच व्हॅल्यू ही चार पेक्षा कमी असते, त्यामुळे मानवी सलायवा हा अॅळसिडिक, आम्लधर्मीय असतो. काही स्त्री पुरुषांच्या लाळेमध्ये अॅासिड आम्लाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे स्पर्धकांना माऊथ अल्सरची, तोंड येण्याची तक्रार उद्भवू शकते! स्पर्धकांनी आपापल्या मुखाच्या, जिभेच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी!…’’

‘‘सॉरी! मला उशीर झाला! मी लवकर तयार होऊन येते!’’
आणि पटकन ती बेडरूममध्ये गेली. अभिषेक निःशब्द होऊन बघतच राहिला.
पाऊण तासानंतर नीलम बाहेर आली. तिने दुपारी एकटीने शॉपिंग केलेला, गुडघ्यापर्यंतचा चटकदार नेव्ही ब्लू रंगाचा, नाजूक काम केलेला स्कर्ट घातला होता. वर मोतिया रंगाचा गोल्डन आणिक काळ्या रंगाचं भरतकाम केलेला टॉप घातलेला होता. डोळ्यात काजळ होतं, डार्क ब्राऊन लिपस्टिक. मुख्य म्हणजे तिने गन्ध टिकली लावली नव्हती. नव्या हेअरकटमुळे ती अत्यन्त सुंदर, आकर्षक, एलिगंट आणि मादक दिसत होती. तो नीलमकडे बघतच राहिला.
हीच का गावंढळ राहणारी आपली बायको यावर विश्वास बसत नव्हता.
अभिषेकने फिकट निळी जिन्स आणि ग्रे टीशर्ट असा कॅज्युअल पेहराव करून, ते कारने जुहूला स्पर्धेच्या जागी पोहचले.
इमारतीबाहेर पोलिसांचा, विरोध करणार्यांजचा, पत्रकारांचा गराडा होता. स्पर्धेच्या विरोधात नारेबाजी सुरू होती. अनेक स्पर्धक जोड्या येत होत्या.
‘‘सर मॅम, आम्ही बोरोमायनस क्रीम कंपनीकडून आहोत! तुम्ही ही स्पर्धा जिंकलात तर तुम्ही सांगायचं आम्ही आमच्या ओठांना बोरोमायनस क्रीम लावतो! याचे तुम्हाला आम्ही पैसे देऊ मॅम!’’ एका जाहिरातदाराने अभिषेक आणि नीलमला ऑफर दिली.
अशाच प्रकारे माऊथ क्लिनर, टंग क्लिनर, माऊथ वॉश, माऊथ फ्रेशनर्सवाले इतर स्पर्धकांप्रमाणे नीलम अभिषेकलाही वेगवेगळ्या ऑफर्स देत होते. ते लोक स्पर्धेचेही प्रायोजक होते.
तेवढ्यात स्पर्धेविरुद्धचं आंदोलन जास्त उग्र बनलं.
जोरदार नारेबाजी, तोडफोड सुरू झाली.
तेव्हाच नीलमचा फोन वाजला, तिच्या वडिलांचा फोन होता. ‘नीलम हा काय स्वैराचार चाललाय तुम्हा दोघांचा! मला आत्ता व्हॉट्सअॅाप वर अभिषेकरावांचा मेसेज दिसला! त्यात फोटो होता चुंबन स्पर्धेचा! सासर्यांला असा फोटो पाठवता तुम्ही! बिलकूल अशा कुठल्या संस्कृती विघातक स्पर्धेत भाग घ्यायचा नाही! हेच संस्कार…’
‘‘बाबा मला ऐकू येत नाहीये काहीही.. रेंज नाहीये इथे. मी नंतर फोन करते तुम्हाला!’’ खोटंच बोलत नीलमने तिच्या वडिलांचा फोन कट केला.
‘‘काय हो, तुम्ही बाबांना या चुंबन स्पर्धेचा फोटो पाठवला का?’’
अभिषेकनं गोंधळून आपलं व्हॉट्सअॅ्प चेक केलं. त्याने जीभ चावली, ‘‘ओह शिट! अगं मी तुझं नाव बायको म्हणून सेव्ह केलंय ना, आणि चार दिवसांपूर्वी तुझ्या गावी तुझ्या बाबांचा फोन दुरुस्त करून दिला तेव्हा त्यांचं नाव मी गमतीने बाप इन लॉ असं सेव्ह केलं! तुझ्या आधी त्यांचं नाव वर आलं आणि घाईत चुकून मी त्यांनाच तो किस कॉम्पिटिशनचा फोटो पाठवला वाटतं! शिट!’’
तितक्यात एक अनाउन्समेंट झाली, ‘‘आम्हाला या स्पर्धेद्वारे कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत! या स्पर्धेला होणारा तीव्र विरोध बघता आम्ही ही महाचुंबन स्पर्धा रद्द करतो आहोत!’’
चुंबन स्पर्धा रद्द झाली ऐकून अभिषेक फार दुःखी झाला. दाढीही गेली, चुंबन स्पर्धाही गेली, हाती धुपाटणं.
गाडी चालवत अभिषेक-नीलम रात्री त्यांच्या घराच्या इमारतीखाली पोहचले. खूप नाराज झालेला अभिषेक रस्ताभर एक शब्दही बोलला नाही.
नीलमच्या ते लक्षात आलेलं होतं.
दोघंही लिफ्टमध्ये शिरले. लिफ्ट वर जाऊ लागली.
‘‘अभी..’’
हे ऐकल्यावर अभिषेकने चमकून नीलमकडे बघितलं.
‘‘अभी, आय लव्ह यू!’’
नीलमने अभिषेकला मागे अलगद ढकललं आणि लिफ्टच्या भिंतीला अभिषेकला टेकवून वेगाने त्याच्या डोक्याच्या मागे हाताने विळखा घालून त्याच्या ओठांत ओठ मिसळले, आणि न थांबता वेगाने, आवेगात त्याचं चुंबन घेऊ लागली.
अभिषेकसाठी हा धक्का होता. लिफ्ट बाराव्या मजल्यावर आली दार उघडलं गेलं. समोर वयस्क जोडपं लिफ्टमध्ये शिरायला उभं होतं. पण त्या दोघांना त्याची कल्पनाही नव्हती.
नीलमनं अभिषेकला सोडलं नव्हतं. तिचं दीर्घ चुंबन सुरूच होतं, आणि लिफ्ट पुन्हा खाली सहाव्या मजल्यापर्यंत येईपर्यंत भांबावलेल्या अभिषेकनेही नीलमच्या चुंबनाला प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली होती. दोघेही प्रेमात आकंठ बुडाले होते, आणि अभिषेक मनातल्या मनात खूष होत चुंबन स्पर्धेला धन्यवाद देत होता.

अभिजित पानसे, नागपूर
abhijeetpanse.flute@gmail.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.