Now Reading
रट्टा

रट्टा

Menaka Prakashan

कोरोना काळात यमाजीरावांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देणार्‍या मारुतरावाची अवस्थाही जेलमधल्या कैद्यासारखी झाली होती. दररोज काही ना काही कारण सांगून घराबाहेर पडण्याचा मारुतरावाचा डाव जानकी हाणून पाडत असे. या लॉकडाऊनमुळे त्याची गत डालग्यात डाळलेल्या कोंबड्यासारखी झाली होती. पण एकदा…

कोरोना. एक भयंकर संपर्क रोग. या रोगानं समद्या जगात थैमान घातलंय… सार्‍यांना घाबरवून सोडलंय. भल्याभल्यांची भंबेरी उडालीय. सारं जग कसं काळजीनं ग्रासलंय, परंतु मारुतरावाला मात्र भलतीच काळजी लागून राहिलीय….. ‘कोरोना परवडला, पण बायको नको’ अशी त्याची गत झालीया. या बायकोनं मारुतरावाचं जिणं मुश्कील करून ठेवलंय.
जानकी – मारुतरावाची लाडकी बायको. तशी प्रेमळ. पण ‘कोरोना’ फैलावल्यामुळं तिचं वागणंच बदललं. तिच्या या विचित्र वागण्यानं मारुतरावाच्या डोक्याचा नुसता भुगा झालाय. जानकीच्या तर्‍हेवाईक वागण्यामुळंच तो आज सकाळ सकाळीच तिच्यावर जाम भडकला होता आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटत होता, ‘‘आऽयला या बायकुच्याऽऽ….. सकाळधरनं नुस्ता तोंडाचा पट्टा सुरू केलाय. बायकु हाय का हैवान? नुसती आपली बडबड…. बडबड लावलीया. आसं वाटतंय, फाड फाड कानाखाली जाळ करावा…..’’
जानकी स्वयंपाकघरात काम करत होती. नवर्‍याचं पुटपुटणं कानावर येऊन धडकताच ती तिथूनच गरजली,
‘‘काय वं, काय झालंय बडबडायला?’’
‘‘कुटं काय?’’ सकाळचा चहा घोटल्यावर गुडघ्याभोवती हाताची घडी घालून भिंतीला टेकून सोप्यात बसलेला मारुतराव सटपटला आणि सारवासारव करत जानकीशी बोलणं त्यानं टाळलं.
परंतु जानकी पुन्हा बोलली, ‘‘मला काय कुक्कुलं बाळ समजता व्हय? समदं ऐकलंय म्या…’’
‘‘तुजं अपालं कायतरीच!’’ म्हणत मारुतरावानं विषय तिथंच संपवला, पण जानकीचं बडबडणं सुरूच राहिलं. ती तरातरा मधल्या दरवाजाजवळ येऊन थांबली आणि नवर्‍यास म्हणाली, ‘‘…आनी व्हय वो, आसं खुडूक कोंबडीवानी किती येळ बसणारायसा?’’
‘‘मग काय करू म्हंतीस?’’ मारुतराव वैतागला.
‘‘सैपाकाचं काय तरी बगा.’’
‘‘म्हंजे?’’
‘‘भाजी आमटीचं… काय तरी भाजीपाला घिवून या.’’
मारुतराव चटकन उठला. अंगात शर्ट घातला. मोळ्यास अडकवलेली कापडी पिशवी घेऊन तो घराबाहेर पडला… आणि डाव्या हाताने मिशा साफ करत चालू लागला. दोन-चार पावलं चालून गेल्यावर जानकीची पुन्हा हाक आली. म्हणाली, ‘‘हाताला सॅनिटायझर लावलं का?’’
‘‘व्हय.’’
‘‘तोंडाला मास्क लावा.’’
मारुतरावानं कानास अडकवलेला मास्क उजव्या हाताने वर उचलून नाकावर अडकवला.
जानकीनं पुन्हा सूचना केली, ‘‘आनि ह्ये बगा, सकू भाजीवालीपास्नं जरा चार हात लांब र्‍हावा. न्हाईतर फुडं फुडं करशीला? तुमचा काय भरवसा न्हाई. गुलूगुलू बोलत फुडं सरकत र्‍हाशिला…’’
‘‘यवडंबी मला कळत न्हाई व्हय?’’ मारुतराव रागानं बोलत समोर बघत चालू लागला आणि बघता बघता दिसेनासा झाला.
मारुतराव अर्ध्या-एक तासानं भाजीपाला घेऊन घरी आला.
एक पाऊल घरात टाकताच जानकीचं चर्‍हाट सुरू झालं, ‘‘कुनाला टच केलं न्हाईसा न्हवं? लोकांपास्नं चार हात लांब हुभं र्‍हायलातासा न्हवं? सकूच्या हाताला हात लागला न्हाई न्हवं?’’
‘‘आगं, थांब थांब. किती परश्‍न इचारत्येस? पयल्यांदा घरात तर यीवू दे…’’ मारुतराव खेकसला.
जानकी जल्दीनं बोलली, ‘‘तितंच थांबा.’’
‘‘आता आनि काय?’’
‘‘पैलं हातपाय ध्वा.’’
मारुतरावानं हातपाय धुतलं आणि तो पिशवी घेऊन घरात आला तश्शी जानकी बडबडली, ‘‘आवोऽऽआवो डायरेट आत कुटं?’’
‘‘मग काय भायेर जाऊ?’’ मारुतराव चिडून बोलला.
जानकीनं सूचना केली. म्हणाली, ‘‘त्यो भाजीपाला मोठ्या पातेलात ध्वा. मग आत या.’’
आता काय करावं या जानकीला? कोरोनाचा फैलाव झाल्यापासून तिनं मारुतरावाला अगदी सळो की पळो करून सोडलं होतं. पण मारुतरावानं कठोर भूमिका घेतली नाही, कारण गोड बोलून राहण्यातच आपला फायदा आहे, असं त्याचं ठाम मत होतं.

कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा, कोरोनाची संक्रमित साखळी तुटावी म्हणून सरकारनं लॉकडाऊन जाहीर केलं, त्या दिवसापासून मारुतरावाच्या घरात जानकीनं अगदी कडक लॉकडाऊन पाळलं होतं. सरकारनं जरी पुढं-मागं लॉकडाऊन शिथिल केलं, तरी घरातलं लॉकडाऊन शिथिल होईल असं काही मारुतरावाला वाटत नव्हतं.
मारुतरावानं हातपाय धुतलं. टॉवेलनं हातपाय पुसता पुसता जानकीला म्हणाला, ‘‘च्या कर एक कप.’’ आणि तो भिंतीला पाठ टेकून निवांत बसला आणि आत बघत जानकीस त्यानं विचारलं, ‘‘आबा कुटं दिसत न्हाईत…’’
‘‘शेताकडं जाऊन येतु म्हनल्ये.’’
‘‘आगं, पन त्येनला आडवायचं न्हाई का?’’
‘‘म्या म्हनल्ये, जाऊ नगासा… पन माजं कुटं ऐकतेत? सुटले तर्राट.’’
‘‘काय म्हनावं या आबाला…’’ मारुतराव चिडला.
इतक्यात जानकी चहा घेऊन आली. मारुतराव चहाचा कप हातात घेत जानकीला म्हणाला, ‘‘बस जरा जवळ.’’
‘‘तुमचं आपलं कायतरीच!’’
‘‘यवडं लाजायला काय नवी न्हवरी हैस व्हय?’’
‘‘तसं न्हवं…’’
‘‘आगं तुज्याशी म्हत्त्वाचं बोलायचं हाय.’’
जानकी मारुतरावापासून चार हात लांबच बसली.
मारुतराव विनवणीच्या सुरात बोलला, ‘‘ये की जवळ.’’
‘‘म्या हित्तं ठिक हाय… तुमी काय ते बोला.’’
‘‘ह्ये आसं किती दिस चालायचं?’’
‘‘कस्याबद्दल बोलतायसा?’’
‘‘समदं काय फोडून सांगाय पायजे का काय…’’
जानकी एकदम ओरडली,‘‘व्हा तिकडं… हिकडं कुटं सर्काय लागलाय? तुमाला काय येळ काळ समजतंय का न्हाई? कोरोना कसा फैलावत चाललाय… आनी तुमांला ‘न्हाई…न्हाई’ ते सुचाय लागलंय.’’
‘‘आगं, तुला समजत कसं न्हाई?’’
‘‘ह्ये बगा… मला सऽम्मदं समजतंय. लॉकडाउन म्हंजे… समदंच ‘लॉकडाऊन’ कळालं का?’’
मारुतराव पुन्हा बोलला, ‘‘आसं कुटंवर चालायचं?’’
‘‘कोरोनाची लस येइपरेंत.’’
मारुतराव आनंदित होऊन गडबडीनं बोलला, ‘‘रशियानं लस काडल्या की!’’
‘‘तुमाला पायजे तर लस घीवून या.’’
आता मारुतराव काय बोलणार? मनातल्या मनात चरफडला. सुक्काळीच्या! आता यवडंबी बायकुला कळू ने?
जानकीला एवढं कळलं असतं, तर मारुतरावाचं वाळवण झालं नसतं. बिच्चारा मारुतराव!

या कोरोनामुळं आणि कोरोनानं भयग्रस्त झालेल्या जानकीच्या या विचित्र वर्तनामुळं मारुतरावाचं जिणं अगदी पार बदलून गेलं होतं. कोरोना आणि कोरोना हाच विषय त्याच्या डोक्यात तरळत होता. या कोरोनामुळं सर्वांच्याच स्वातंत्र्यावर गदा आली होती. कधीतरी एकदा हा कोरोना जाईल आणि आपलं आयुष्य पूर्ववत सुरळीत होईल, या आशेवरच तो आता आयुष्य जगत होता. जानकी असं विचित्र का वागते याचा विचार करता करता मारुतरावाला रात्री झोप कधी लागली हे कळलंसुद्धा नाही.

कोंबडा आरवला आणि दिवस उजाडला. सकाळच्या कामाच्या घाईगडबडीत दिस किती वर आला हे कोणालाच कळलं नाही. सकाळी पावणेआठच्या दरम्यान चहापान आटोपल्यावर जानकी आपल्या कामाला लागली. स्वयंपाक करण्यात दंग झाली, तिनं स्वयंपाक करून सगळं आवरून घेतलं. कोरोनामुळं लॉकडाऊन असल्यानं घराबाहेर पडता येत नव्हतं. घरात बसून बसून तरी किती बसायचं? जानकी तर कोरोनाला घाबरून घराबाहेर पडत नव्हती. त्यामुळं कामाचा सारा भार मारुतरावावर पडला होता. काय लागलं तर तोच घराबाहेर जाऊन भाजीपाला, दळण, किराणा माल, औषधं आणत असे. मारुतरावाचे सत्तरी ओलांडलेले वडील यमाजी काही काम नसल्यामुळे, शिवाय घरात बसून कंटाळल्यामुळे बाहेर पडण्यासाठी धडपडत होते. ते घरातल्या घरात इकडून तिकडे, तिकडून इकडे येरझार्‍या घालत होते. मारुतराव आणि जानकीची नजर चुकवून, गावातून फेरफटका मारून येण्याच्या तयारीत होते. खुंटीवरचा पटका डोक्याला बांधून पुन्हा घरात फेर्‍या मारू लागले. घरात बसून दिवस जात नसल्यामुळं, काहीतरी करावं म्हणून मारुतराव जात्यावर खुरप्याला धार लावत बसला होता. तो धार लावण्यात दंग असल्याचं यमाजीच्या लक्षात येताच ते घराबाहेर सटकले. चार-पाव पावलं पुढे जातात न जातात तोच… तोच जानकीची नजर यमाजीरावांकडे गेली.

ती नवर्‍याला आतूनच बोलली, ‘‘व्हय वो…’’
‘‘काऽय?’’
‘‘कुटं ध्यान हाय तुमचं?’’
‘‘काय झालं?’’
‘‘आवोऽऽ मामंजी पळाल्ये की! बोलवा त्येनला.’’
मारुतरावानं खुरप्याला धार लावण्याचं मध्येच थांबवून बाहेर नजर टाकली आणि तो मोठ्यानं गरजला.
‘‘आबाऽऽ … अवो आबाऽ’’
यमाजीराव मागे वळून बघत जागच्या जागी थांबले.
मारुतरावानं खडसून विचारालं, ‘‘कुटं निगालायसा?’’
‘‘गावात जाऊन येतु…’’ यमाजीराव संकोचून बोलले.
‘‘फिरा मागारी… या हिकडं.’’
यमाजीराव दारात येत म्हणाले, ‘‘का रं?’’
‘‘का म्हंजे? काल जाऊन आलायसा न्हवं शेताकडं?’’
‘‘……..’’
‘‘गावात फिरायला बंदी हाय, ठावं हाय न्हवं?’’
‘‘माज्याच गावात फिरायला मला बंदी?’’
‘‘तुमी कोन टेकुजीराव लागून गेला व्हय?’’
‘‘मला म्हातार्‍याला कोन आडीवतंय?’’
‘‘पोलीसांचं चार रट्टं बसलं म्हंजे कळंल… म्हातारपन’’
बाप-लेकाचं बोलणं चालू होतं, त्या दरम्यान जानकी सोप्यात येऊन थांबली होती.
ती थोडी गुश्श्यातच बडबडली, ‘‘व्हय वं मामंजी… तुमाला कळत कसं न्हाई?’’
‘‘काय झालं?’’
‘‘कोरोना पसरलाय, जरा काळजी घ्या की!’’
‘‘मला काय हुतंय?’’ यमाजीराव बोलले.
‘‘त्येला काय हुतंय म्हनून निष्काळजी र्‍हावू नगा.’’
मारुतरावानं मध्येच त्यांना सुचवलं, ‘‘आबाऽऽ तुमच्या सारक्यांनी घराभायेर पडूच ने.’’
जानकी म्हणाली, ‘‘आनि काय वो मामंजी, पंचायतीची रिक्शा समद्या गावबर फिरतीया- ‘इनाकारण कुनी घराभायेर पडू नगा. काळजी घ्या. मास्क वापरा. सॅनिटायझर वापरा,’ आसं पुकारून बी तुमास्नी कळू ने?’’
मारुतरावानं री ओढली. म्हणाला, ‘‘सर्कार जनतेची यवडी काळजी घेतंय, तरीबी लोक बेजबाबदार वागत्यात.. मग कोरोना पसरायचा कसा र्‍हायील? तुमाला कदी कळनार?’’

मारुतराव आणि जानकीच्या प्रश्‍नांच्या सरबत्तीनं यमाजीराव निरुत्तर झाले आणि त्यानं घरीच राहणं पसंत केलं.
उपदेश करणं फार सोप्पं, पण वागणं अवघड असतं.
कोरोना काळात यमाजीरावांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देणार्‍या मारुतरावाची अवस्था जेलमधल्या कैद्यासारखी झाली होती. दररोज काही ना काही कारण सांगून घराबाहेर पडण्याचा मारुतरावाचा डाव जानकी हाणून पाडत असे. लॉकडाऊनमुळे त्याची गत डालग्यात डाळलेल्या कोंबड्यासारखी झाली होती.
पण एकदा काय झालं…
लॉकडाऊनच्या काळात सकाळी सहा ते दहा या वेळेत दूध, भाजीपाला, दळण, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्याची लोकांना मुभा होती आणि दहानंतर पुन्हा संचारबंदी. या संचारबंदीच्या काळात जानकीस न सांगता तिची नजर चुकवून गावातून फेरफटका मारण्यासाठी मारुतराव सटकला आणि त्याला पोलिसांचा दणकून मारही मिळाला. अर्ध्या एक तासानं जानकीचं नेहमीचं काम आटोपल्यावर तिच्या लक्षात आलं, मारुतराव कुटं दिसनात म्हणून तिनं यमाजीरावांना विचारलं, ‘‘मामंजी…. ह्यें कुटं तुमाला दिसलं का?’’
‘‘न्हाई.’’
‘‘कुटं उलतलाय हा बाबा, कुनाला दक्कल!’’ जानकी पुटपुटली.
इतक्यात मारुतराव टपकला. जानकी आपल्याला आता फैलावर घेणार या भीतीनं तो मनातून सटपटला खरा, परंतु चेहर्‍यावर तसा आव न आणता बायको समोर दिसताच जागेवरच शांत बसला. जानकीला आपल्या नवर्‍याची खोड माहीत होती. तिनं मारुतरावास फैलावर घेतलं.
गुश्श्यातच बोलली, ‘‘कुटं गेल्तासा?’’
‘‘कु… कु… कुटं न्हाई.’’
‘‘मग इतका येळ कुटं हुतासा?’’
‘‘त्ये आपलं ह्येच की!’’
‘‘ह्येच की म्हंजे?’’ जानकी मोठ्यानं बोलली, तसं मारुतरावानं खरं सांगितलं,‘‘ फि…रू…न आलो…’’
‘‘तुमाला काय कळतैय का न्हाई?’’ जानकीनं आवाज चढवत विचारलं.
मारुतराव काय बोलणार? तो मनातल्या मनात म्हणाला, ‘बोल बाई. काय बोलायचंय ते बोल… म्याच चुकलोय… तू तर काय करनार?’
मारुतरावानं जानकीच्या तोंडास तोंड देण्याचं टाळलं. मारुतराव भिंतीला पाठ टेकून बसताना तो विव्हळला, ‘‘अ… या… याऽऽऽ’’
‘‘तुमचं स्वाँग कळतंय मला.’’
‘‘आगं, स्वाँग न्हाई… खरंच इवळतुया. तुला न सांगता गेलु… आनि पोलिसांच्या तावडीत सापडलु. पोलिसांनी पंध्रा-वीस उटाबश्या काडाय लावल्या… शिवाय पोलिसी मारही मिळाला. अयायाऽऽ’’
जानकी नेटानं बोलली, ‘‘आसंच पायजे… म्या तित्तं आसत्ये, तर आनकी चार काट्या घाला म्हनून सांगिटलं आसतं…’’
‘‘आगं, काय बोलत्येस?’’
‘‘व्हय… बरूबर बोलत्ये.’’
जानकी कोरोनाचा संसर्ग फैलावल्यापासून काळजी घ्यायला सांगत होती. ते आता रट्टे खाल्यावर मारुतरावाला चांगलं पटलं. मारुतराव म्हणाला, ‘‘तू म्हंतेस त्येच खरं…’’
जानकी समजावणीच्या सुरात सांगू लागली, ‘‘आवं, सर्कार आमच्या जिवाची काळजी घेतंय, आनी आपुन का त्येंच्या म्हन्न्यापर्माणं वागू ने?’’
‘‘व्हय… बरुबर हाय. घरी र्‍हावू… निवांत र्‍हावू. कोरोनाला पळवून लावू.’’
‘‘आत्ता कसं बोल्ला…’’
‘‘बायकु असावी तर अश्शी…’’ मारुतरावानं जानकीचं कौतुक केलं.
त्यावर यमाजीराव मध्येच तोंड घालत बोलले, ‘‘शेताकडं गेल्तो तवा… मलाबी चार रट्ट बसलं. पन सांगनार कसं?’’
..आणि तिघंही खळखळून हसले.

– मधुकर फरांडे, कोल्हापूर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.