Now Reading
येथे कर माझे जुळती

येथे कर माझे जुळती

Menaka Prakashan

ठोंब्यानं लिहिलेला तो निबंध मात्र वाचून दाखवायचं धाडस त्याच्या एकाही सरांमध्ये नव्हतं. ठोंब्याच्या आईला त्याची ती वही घरी अचानक सापडली आणि त्याचे हे अमूल्य विचार गुलदस्त्यात न राहता उघडकीला आले. अन्यथा जग एका महान वैचारिक मंथनास मुकलं असतं. असा हा ‘बहुगुणी’ ठोंब्या! किती वर्णावी त्याची महती नि गाव्या त्याच्या पराक्रमाच्या ओव्या!

आता हे कांजी मारून, डबल इस्त्रीचं कडक असं वाटणारं नाव म्हणजे एखादा उग्र, करारी, संतापी व्यक्तिमत्त्व असणारं असं चित्र अनाहूतपणे जर तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं असेल तर तुमचा हा तर्क साफ चुकला बरं का महाराजा! आमच्या पलीकडे एक घर सोडून जांबुवंतरावांचा ब्लॉक आहे. या जांबूवंतांना रुद्रेश्‍वररूपी पसायदान लाभलं. या रुद्रेश्‍वराची जन्मगाथा तशी मनोरंजकच म्हणायची. जांबुवंतरावांना अपत्यप्राप्ती होत नसल्यानं त्यांच्या मातोश्री म्हणजे रुद्रेश्‍वराची आजी नातवंडं व्हावं यासाठी महादेवाला नवस बोलली. यथावकाश आजींचा नवस फळाला आला आणि हा नवश्या रुद्रेश्‍वर अवतरला! आता कुणीही नवजात बालकानं या जगात प्रवेश केल्याक्षणीच ‘ट्याऽहाँ’ केलं पाहिजे हा तर खरं निसर्गनियम. पण तसं घडलं नाही. रुद्रेश्‍वरानं जेमतेम डोळे किलकिले करून व एक सणसणीत जांभई देऊन आपल्या जगप्रवेशाची नजाकत दाखवली. तेव्हा जर शक्य असतं तर त्यानं सुईणबाईंनाच समजावलं असतं, ‘‘माई, आत्ताच काय या सगळ्याची घाई आहे? मग थोड्या वेळानं सावकाश रडेन ना मी! तोपर्यंत एक छानशी झोप काढतो.’’

रुद्रेश्‍वर या नावाशी कुठलंही साधर्म्य नसलेला हा ठोंब्या, थंड गोळा आपल्याच पोटी का यावा, पुढे कसं होणार याचं, ही खंत श्रीयुत जांबुवंत जमदग्नींना लागलेली. याचं जन्माक्षर बहुदा ‘ढ’ असावं आणि त्यावरूनच तर खरं याचं नाव ठेवायला हवं होतं. पण करता काय? आईच्या नवसाची कृपा म्हणून तिच्या सांगण्यावरूनच याचं नाव ठेवलं होतं, रुद्रेश्‍वर.
तान्हेपणीदेखील हे चिरंजीव रडण्या-बिडण्याच्या व तोंडानं आवाज काढण्याच्या फारसं फंदात न पडता किंवा त्याच्या पाळण्यावर टांगलेल्या हलत्या-फिरत्या खेळण्यांकडे ढुंकूनही न बघता दिवसातले एकवीस-बावीस तास फक्त झोपा काढणं आणि अधूनमधून जर चुकून जाग आलीच, तर जांभया देणं एवढंच सत्कार्य करत. पाळण्यातही इतर तान्हुल्यांप्रमाणे हातपाय हलवणं, उसळ्या मारणं, हुंकार देणं इत्यादी गोष्टींमध्ये याला बिलकूल गम्य नव्हतं. ‘उगीच कशाला या भानगडीत पडा आणि आपल्या अतिप्रिय छंदाचा, झोपेचा वेळ दवडा!’ असा विचारही या बालकानं केला असावा. सुरुवातीला त्याचा हा गुण न कळल्यामुळे ‘हा जन्मजात बहिरा-मुका तर नाही ना?’ अशी शंका जांबुवंतरावांना आली. पण चिरंजीवांनी एकदा मध्येच ‘आँवऽ टँवऽ’ केलं आणि नेमकी त्याच वेळी त्या थोर पित्यानं ‘फुईऽ फुईऽ सटक’ अशी जोरदार शिंक दिली. ती त्यांनी एवढ्या जोरकसपणे दिली की, सोसायटीत झोपलेल्या चार-दोन कुत्र्यांनी दचकून जागं होऊन धूम ठोकली आणि त्याबरोबरच रुद्रेश्‍वरानंसुद्धा कधी नव्हे ते चमकून आपल्या जन्मदात्याकडे बघत स्वतःची मान हासडून मूक निषेध दर्शवला. त्याच्या कधीही न बघितलेल्या या जलद हालचालींमुळे जांबुवंतरावांनी मात्र ‘सुटलो बुवा! नाणं अगदीच काही बद्द नाहीये’ म्हणून निःश्‍वास सोडला.

दिनमान, मास, सालाच्या गतीनं काळ पुढे सरकत होता. या बाळाचं रुद्रेश्‍वर हे असलं जड-बोजड नाव (आणि शरीरही अर्थात तसंच!) आमच्या रोजच्या व्यवहारात कुणालाच झेपण्यासारखं नव्हतं. त्याच्या नावाची शक्य असलेली तोडफोड म्हणजे रुद्य्रा, रुद्दु वगैरे वगैरे करण्याचा आमच्या परीनं केलेला प्रयत्न फोल ठरला. शेवटी सर्वानुमते सुटसुटीत व त्याला साजेसं असं म्हणून ‘ठोंब्या’ या उपनावावर शिक्कामोर्तब झालं व पुढे तेच नाव रूढ झालं. सोसायटीतले एकमेव गोखलेकाका मात्र त्याला प्रेमानं, आदरानं ‘ठोंबेश्‍वर’ म्हणायला लागले. योग्य वयाचा झाल्यावर एका शुभदिनी हा आदरणीय ठोंबेश्‍वर त्याच्या पिताश्रींबरोबर त्याचं नाव शाळेत घालण्यासाठी गेला. तिथल्या हेडमास्तरांनी अतिशय प्रेमानं त्याला जवळ घेऊन विचारलं, ‘‘बाळा, तुला सर्वांत कुठला खेळ खेळायला जास्त आवडतं?’’
‘‘भिक्कार-सावकार’’ रुद्रेश्‍वर खिशातले शेंगदाणे खाता खाता आळोखे-पिळोखे देत म्हणाला.
‘‘काय, काऽय म्हणालास?’’ गुरुजनांनी गोंधळात पडत विचारलं, ‘‘ते राहू दे. तुझा एखादा आवडता छंद सांग बरं!’’

त्याबरोबर त्या वीरानं अत्यंत तत्परतेनं त्याच्या शाळेच्या टिफीनमधले दोन लाडू, पाच ग्लुकोज बिस्किटं व तीन काजू चिक्क्या हेडमास्तरांना दाखवत न बोलता तल्लीनतेनं खायला सुरुवात केली. हाच तर त्याचा आवडता छंद होता. पुढचे दहा ते पंधरा मिनिटं बाकी सगळ्याचा विसर पडून, तो फक्त त्याच्या खाद्यविश्‍वात डुंबत होता. हे सगळं आपल्या कुवतीबाहेरचं आहे हे उमजून हेडमास्तरांनी त्या अजाण बालकाची पित्यासह बोळवण केली. एव्हाना जांबुवंतरावांना याची सवय झाली होती. ‘चला, ही नाही तर दुसरी शाळा! देवा, मास्तरांना माफ कर. यात त्यांचा काय दोष?’ असं स्वतःशीच म्हणत ते या बालवीरास घेऊन पुढे निघाले. अर्थातच यापलीकडे त्यांच्या हातात दुसरं होतं तरी काय? शेवटी एका शाळेच्या याच्याशी तारा जुळल्या. ‘आता तरी घोडं गंगेत न्हाऊ दे रे बाबा परमेश्‍वरा! सुधारू रे हा दिवटा!’ त्यांनी मनोमन प्रार्थना केली. पण हा त्यांचा भ्रम ठरला.

काळ पुढे सरकत होता. ठोंब्या त्यानुसार उभा (कमी), आडवा (जास्त) वाढत होता. एकदा त्याच्या शाळेतून जांबुवंतांना निरोप आला. ‘उद्या सकाळी लवकर शाळेत या. पाण्याचे नळ दुरुस्त करायचेत.’ जांबुवंतराव तर चक्रावूनच गेले या निरोपानं!
‘आता माझा नळदुरुस्तीशी काय संबध?’ त्यांना समजेना. पण जेव्हा याचा त्यांना उलगडा झाला, तेव्हा ते चक्कर येऊन पडायचेच राहिले. त्याचं झालं असं होतं, ठोंब्याच्या वर्गात त्याच्या गणिताच्या शिक्षकांनी एक गणित सोडवायला दिलं ते असं काहीसं होतं- आपल्या शाळेच्या पाण्याच्या टाकीला तीन नळ आहेत. त्यातला एक गळका असून दुसरा फुटका आहे. जर तीनही नळ बंद केल्यास तीच टाकी साडेतीन तासांत भरते, तर दोन नळ बंद केल्यास तीच टाकी तीन तासांत भरते. तर एक नळ बंद केल्यास ती टाकी किती तासांत भरेल?’’
वर्गातली सगळी मुलं गणित सोडवायला लागली. ठोंब्या पटकन उभा राहत म्हणाला, ‘‘सर सर, मी काढलं उत्तर या गणिताचं, सांगू?’’ या विद्वानानं काय सांगावं? तर म्हणे, ‘‘माझे वडील प्लंबर आहेत. त्यांना हे सांगा, ते लगेच दुरुस्त करतील हे सगळे फुटके आणि गळके नळ. झट्दिशी टाकी भरेल मग. हाय काय अन् नाय काय!’’
‘काहीही म्हणा, पण पोरगं सुधारतंय. स्वतः नाही पण बापाला कामाला लावला,’ असा सुप्त विचार जांबुवंतरावांच्या मनात चमकला.
तर हे असं गटांगळ्या खात, वेडेवाकडे का होईना पण हातपाय मारत हे चिरंजीव शिक्षणात पुढे ‘ढकलले’ जात होते.

मध्येच शाळेत सहामाहीची टेस्ट झाली. या महान बालकाची प्रगती विलक्षण नेत्रदीपक होती. प्रत्येक विषयात त्यांनी सोडलेले तोफगोळे आणि टाकलेले बॉम्ब बघून खरं तर तो ‘परमवीर चक्रा’चा अथवा ‘सहामाही श्री’चा मानकरी व्हायचाच बाकी होता. त्याचा एक मासलेवाईक किस्सा म्हणजे ठोंब्याच्या सरांनी त्याच्या मराठी भाषेच्या उत्तरपत्रिकेचं वर्गात केलेलं जाहीर वाचन. प्रश्‍नपत्रिकेतला एक प्रश्‍न होता- ‘रोजच्या व्यवहारात वापरल्या जाणार्‍या खालीलपैकी कोणत्याही दहा म्हणी व वाक्प्रचारांचा अर्थ सोप्या भाषेत सांगा.’- त्यावर या ज्ञानी पुत्रानं ‘कोणत्याही दहा’ या सूचनेला न जुमानता, ‘आला बॉल की हाण सिक्सर’च्या सूत्रानुसार ‘दिसली म्हण वा वाक्प्रचार की लगाव आपला षटकार’ करत पूर्ण प्रश्‍नांची जी चिरफाड केलीय त्याला भूत-वर्तमान-भविष्यात तोड नाही. ऐकाच मग त्याचे एकेक फटके.
घरोघरी मातीच्या चुली ः पूर्वीच्या काळी घराघरांतून मातीच्या चुलीवर स्वयंपाक करत. लोकांना याची अजिबात लाज वाटत नसे, जरी नाका-तोंडात धूर गेला तरी!
खेळखंडोबा (होणे) ः महान क्रिकेटपटू खंडू रांगणेकर यांना क्रिकेटचा सामना सुरू होण्यापूर्वी त्यांच्या वडिलांनी त्यांना दिलेला आशीर्वाद – ‘खेळ खंडोबा’!
दुरून डोंगर साजरे ः पद्मावतीच्या डोंगराला देवीच्या उत्सवात लायटिंगची छान आरास करतात. अगदी दुरूनही ती रोषणाई उठून दिसते.
दुष्काळात तेरावा महिना ः गेल्या वर्षी अधिक मास म्हणजे एक जास्तीचा महिना आला होता. म्हणून त्या वर्षात तेरा महिने होते. त्यामुळे गेल्या वर्षी दुष्काळ पडला होता.

बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले ः पण जो चालता बोलता असतो, त्याची पावलं कशी धरणार? तो तेवढा वेळ थांबायला तर हवा ना!
देव भावाचा भुकेला ः आमच्या वर राहणार्‍या देव काकांचा भाऊ अतिखादाड आहे. त्याला सारखी भूक लागत असते.
चोराच्या मनात चांदणे ः चोर रात्री चोरी करायला बाहेर पडल्यावर मनातल्या मनात ‘चांदण्यात फिरताना’ किंवा ‘चांदणे शिंपीत जाशी’ ही गाणी म्हणतात.
तीन चोक तेरा ः हे नक्कीच आमच्या वर्गातल्या प्रभ्यानं सांगितलं असणार. त्याला ना सतत कशाची तरी घाई झालेली असते. तो नेहमी आमच्यापेक्षा एक स्टेप पुढे असतो. आम्ही ‘तीन चोक बारा’ म्हणायच्या आत हा पठ्ठ्या ‘तेरा’वर पोचलासुद्धा!
नाचता येईना अंगण वाकडे ः दामल्यांच्या निर्मलेची नाचाच्या क्लासला बरेच दिवस जाऊनही फारशी प्रगती न झाल्यानं दामले काकांनी शेवटी त्यांच्या वेड्यावाकड्या अंगणाला फरश्या बसवल्या.
नाव सोनुबाई, हाती कथलाचा वाळा ः आमच्याकडे घरकामाला सोनूबाई येताना नेहमी एक पिशवी आणतात. त्यात बहुधा कथलाचं भेंडोळं असावं. कारण त्यांचा नवरा कल्हईवाला आहे.
वाळवंटातील जहाज ः हे वाळवंटात एकदम कसं येईल? आधी तिथे समुद्र बांधावा लागेल ना!
भिकेचे डोहाळे लागणे ः शेजारच्या गल्लीतल्या भिकूशेठच्या बायकोचं नाव भिकी, तिला लागलेले डोहाळे.
पंत मेले, राव चढले ः गेल्या आठवड्यात चौथ्या मजल्यावरचे काशिनाथपंत वारले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे मित्र रामरावांना एवढे सगळे जिने चढून जावं लागलं.
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ः आमच्या समोरचा मामा हलवाई रोज रात्री घराच्या गच्चीवर झोपतो. तिथे तुळशीची खूप झाडं लावल्यानं डास, किडे असलं काही येत नाही. बहुगुणी तुळस कीटकनाशक आहे.

परमपूज्य रुद्रेश्‍वराचं हे उत्तुंग, बेफाम सिक्सर्सचं प्रकरण फक्त मराठी विषयापुरतंच मर्यादित नव्हतं. विविध विषयांत त्यानं केलेल्या अतिप्रगल्भ बुद्धीच्या प्रदर्शनाचं कौतुक करायला त्याच्या एकाही गुरूकडे शब्द नव्हते. परीक्षेच्या निकालादिवशी या बाळाच्या पराक्रमानं भारावलेले त्याचे शिक्षक त्याला म्हणाले, ‘‘हे महान बालका, तुला त्रिवार वंदन! आता हे तुझं अगाध, अमूल्य संशोधन तुझ्या जन्मदात्यांच्या पायावर घाल. अगदी भरून पावतील ते.’’ आणि त्यांनी बाल ठोंब्याचं प्रगतिपुस्तक त्याच्या मातापित्यास दाखवलं. एकाही विषयात उत्तीर्णतेच्या किमान मर्यादेच्या जवळपासही न फिरकलेलं त्याचं ते प्रगतिपुस्तक त्याच्या सोशीक पित्यानं पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि निर्विकारपणेे बाजूला सारलं. प्रगतिपुस्तकात सर्व विषयांची टोटल, अगदी हस्तकला आणि शारीरिक शिक्षणासह होती पंचाण्णव! त्याच्या उत्तरपत्रिका वाचल्यावर गहिवरून ते त्याला म्हणाले, ‘‘हे पराक्रमी बालका, असाच जा जोशीकाकूंकडे आणि त्यांना तडक आपल्याकडे बोलावलंय म्हणून सांग. त्यांच्याकडून मीठ-मोहोर्‍या ओवाळून घेऊ. शुंभा, तुझ्यावरून नाही, आम्हा दोघांवरून! धन्य जाहलो आम्ही!’’
इकडे रुद्रेश्‍वर त्याचं प्रगतिपुस्तक हातात नाचवत सगळ्यांना सांगत होता, ‘‘अहो, हे बघा, मला टोटल पंचाण्णव मार्क मिळालेत. सगळ्या तुकड्यांमध्ये मी या विषयात पहिला आलोय.’’
आता मात्र ‘नेमका कशामुळे याचा मेंदू गंजलाय, अगदी हाताबाहेरची केस आहे हो ही!!’ अशी हवा सोसायटीत पसरली.

या महावीराच्या ‘मिसाईल्स’ची रेंज इतकी अफाट की, शत्रूगोटातील कुणालाच, म्हणजे त्याच्या शिक्षकांनाही, त्याचा सुगावा लागणं अशक्य आहे. याचा धडधडीत पुरावा म्हणजे त्यानं लिहिलेला एक निबंध. विषय होता- ‘अशी असावी आमची आदर्श शाळा.’ तो संपूर्ण निबंध म्हणजे जणू एखाद्या खंद्या वीरानं आपल्या शत्रूला अमोघ शस्त्रानं नामोहरम करून सोडण्यासारखं होतं. त्यानं या निबंधात प्रकट केलेल्या त्याच्या ‘आदर्श’ विचारांचे नमुने एखाद्याची शुद्ध हरपतील. काय होतं असं त्यात?
१) आठवड्यातले कमीत कमी तीन दिवस शाळा फक्त दुपारी दोन ते पावणेतीन या वेळातच भरावी. कारण तो पाऊण तास डबा खाण्यासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मधल्या सुट्टीनंतर शाळेतून पळून जाणं थांबेल.
२) इतिहासातील सनावळ्या, तहाची कलमं, वेगवेगळी राजघराणी, तसंच भूगोलातले खारे व मतलई वारे, पृथ्वीवरचे वेगवेगळे कटिबंध, हवामान, नद्यांची नावं वगैरे वगैरेवर भरवर्गात प्रश्‍नरूपी कोडी घालून आम्हा अजाण विद्यार्थ्यांना भंडावून सोडणं हा दंडनीय अपराध समजला जावा.
३) गणिताच्या परीक्षेत सगळ्यांना आधीच अगणित मार्क्स देऊन पास करावं. त्यामुळे त्या पेपरात आम्हाला जी मोठमोठाली आकडेमोड करावी लागते, त्याकरता सूत्रं व प्रमेयं पाठ करावी लागतात. अशा अन्यायकारी गोष्टींना आळा बसेल.
४) शास्त्र विषयातले वेगवेगळे प्रयोग दाखवून वेळ दवडण्यापेक्षा त्या वेळात नकलांचे अथवा जादूचे प्रयोग दाखवावेत, शाळेतल्या शाळेत का होईना!
५) मुलं ही देवाघरची फुलं असतात. त्यांच्या गृहपाठाच्या वह्या आणि पेपरांमध्ये फुल्या मारणं, मोठ्ठाले भोपळे काढणं यांसारख्या क्रूर कृत्यांचा शाळेत मागमूसही नसावा.
६) फूटपट्टी, खडूचे तुकडे वगैरेंसारख्या तत्सम घातक वस्तूंचा मुक्त हस्ते वापर करून, यांचा आमच्यावर नेम धरून काही गुरुजन वर्गात घातपात घडवतात. अशा वस्तूंना शाळेतच काय, पण शाळेच्या कंपाऊंडपासून कमीत कमी पन्नास मीटर परिघातही थारा नसावा.
७) चोपणे, कानपिळे, बकुले इत्यादी ‘मारकुटे’ कुळातील मास्तरांना शाळेत ठेवून दहशतवाद पसरवू नये.
८) मला नेहमी एक कोडं पडतं. तास चालू असताना वर्गातल्या इतर मित्रांशी बोलणं किंवा मध्येच एखाद-दुसरा कागदी बाण मारणं, एखाद्या अभ्यासू खडूस मुलाला वाकुल्या दाखवणं, काहीच नाही तर मग शेवटी एखादी डुलकी काढणं याची आम्हाला का बरं मुभा नसावी? हे सर्व निर्बंध उठवायलाच हवेत. काहीही न करता नुसतंच वर्गात बसण्याची शिक्षा का?
९) दिवाळी, नाताळच्या सुट्टीत होमवर्क देऊन आमची गळचेपी करू नये. ‘होम’ हे असलं ‘वर्क’ करण्यासाठी नसतंच मुळी! यामुळे आमच्या खाण्या व झोपण्यात व्यत्यय येतो. खरं तर होमवर्कचं संपूर्ण उच्चाटन व्हायला हवं.
१०) शारीरिक शिक्षण व समाजसेवा यांसारखे दांडगट, अघोरी विषय सरसकट शाळेत आणून आम्हा विद्यार्थ्यांच्या हळव्या व संवेदनशील मनावर मोठा आघात झाला आहे. आम्ही हे कसं सहन करायचं?

तर दोस्तांनो आणि आदरणीय गुरुवर्यांनो, आदर्श शाळेत विद्यार्थ्यांचा आदर होतो व तेही मग शिक्षकांचा आदर करतात. तर आमची, म्हणजे आपली शाळा आदर्श करायची असेल तर वरील गोष्टींचा गंभीर विचार व्हावा व तसे बदल घडवावेत असं मला मनापासून वाटतं.
ठोंब्यानं अशा धर्तीवर लिहिलेला तो निबंध मात्र वाचून दाखवायचं धाडस त्याच्या एकाही सरांमध्ये नव्हतं. ठोंब्याच्या आईला त्याची ती वही घरी अचानक सापडली आणि त्याचे हे अमूल्य विचार गुलदस्त्यात न राहता उघडकीला आले. अन्यथा जग एका महान वैचारिक मंथनास मुकलं असतं. असा हा ‘बहुगुणी’ ठोंब्या! किती वर्णावी त्याची महती नि गाव्या त्याच्या पराक्रमाच्या ओव्या!

गेल्या महिन्यातलीच गोष्ट. सोसायटीतल्या सोमणांच्या समीरचं लग्न होतं. झाडून सगळ्या सोसायटीला निमंत्रण होतं. ठोंब्याची उपस्थिती अर्थातच अपरिहार्य होती. दुपारची बाराची वेळ. लग्न लागून बुफे जेवणाला नुकतीच सुरुवात झाली होती. अलिखित नियमानुसार ठोंबेश्‍वरानं आपलं अत्यंत आवडीचं शुभकार्य- खादंती- सुरू केली. अत्यंत मनोभावे आहुतीमागून आहुती त्याच्या पवित्र उदरकुंडलात पडत होत्या. वेळेचं भान त्याला अजिबात नव्हतं. नवखे अचंब्यानं त्याचा हा सोहळा पाहत होते. दोन-सव्वादोन तास झाले, याचं थांबायचं नाव नाही. हातातोंडाची गाठ अव्याहत सुरूच! सोसायटीतले गोखले काका शेवटी न राहवून म्हणाले, ‘‘बाळा, अरे कधीपासून उदरणभरण चाललंय. बस झालं की आता.’’ त्यावर ठोंब्यानं अतिकष्टानं जेमतेम काकांकडे वर बघून प्रश्‍नांकित चेहरा केला आणि आपलं क्षणभर खंडित झालेलं सत्कार्य पुढे चालू ठेवलं. गोखल्यांनी त्याला पुन्हा टोकलं व पोट फुटेस्तोवर न खाण्याची तंबी दिली. ठोंब्यानं या वेळी त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. मग मात्र काका भडकून म्हणाले, ‘‘ठोंबश्या, आता थांबवतोस तोंडाचा कारखाना की पाडू तुझं ते इंजिन बंद?’’
‘‘समजतंय सगळं मला काका. याचा त्रास होतोय हो! पण केवळ सोमण काकांना वाईट वाटू नये म्हणून, त्यांचा शब्द राखण्यासाठी केवळ मला हे सगळं करावं, सोसावं लागतंय. मला क्षमा करा.’’ ठोंबेश्‍वर उवाच!
‘‘अरे, काय बोलतोयस काय? तुझं तुला तरी कळतंय का?’’ कधी नव्हे ते गोखले काकांनी चिडून गोंधळत विचारलं.
‘‘हे बघा, वाचा…’’ असं म्हणत या बकासुरानं सोमणांकडची लग्नपत्रिका काकांसमोर धरली.
पत्रिकेत छापलं होतं- स्नेहभोजन दुपारी बारा ते अडीचपर्यंत!

असा आहे हा ठोंब्या ऊर्फ ठोंबश्‍वर ऊर्फ रुद्रेश्‍वर! या पठ्ठ्याची गावी किती थोरवी, सांगावी तितकी कमीच त्याची थोरवी! पण कसाही असला तरी शेवटी आमचा आहे, समस्त सोसायटीचा आहे. त्याशिवाय का आमची आख्खी सोसायटी शब्दशः त्याच्यापुढे नतमस्तक होते नि म्हणते- ‘हे वीर सुपुत्रा, येथे, येथेच कर अमुचे जुळती!’

– संजय साताळकर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.