Now Reading
मुलगी गेली हो!

मुलगी गेली हो!

Menaka Prakashan

मग नाक चोळणार्याे वसंतरावांना, त्यांच्या मुलीच्या रूमचं दार उघडं दिसलं, तिला दोरीचं विचारावं म्हणून ते तिथे गेले. पण रूममध्ये दमयंती नव्हती. मग ते बाहेर आले, सगळ्या घरात तिला बघितलं. पण ती कुठेही दिसेना. इतक्या पहाटे ती कुठे गेली आहे, त्यांना कळेचना. तिच्या गाडीची किल्ली दिसत नव्हती, तिचा मोबाईल आणि चार्जर दिसत नव्हते. तिच्या चपलांचे तीन जोडही दिसत नव्हते.

काळ झाली. वसंतराव उठले. त्यांनी प्रातर्विधी आटोपले. मग ते बाहेर बेडरूमला लगतच असलेल्या टेरेसमध्ये गेले. ही टेरेस अत्यंत प्रशस्त असून, ती अदमासे ७ ु ५ म्हणजेच ३५ स्क्वे.फू.ची होती. मग त्यांनी सकाळचा व्यायाम करायला सुरुवात केली. तब्बल ५ जोर आणि तितक्याच बैठका मारून त्यांनी आता दोरीवरच्या उड्या मारायचं ठरवलं. पण त्यांना ती दोरी दिसेना. मग त्यांनी त्या विस्तीर्ण टेरेसमध्ये सगळीकडे ती दोरी शोधली, पण त्यांना त्या प्रकल्पामध्ये अपयशच आलं. मग मात्र ते संतापले. आपल्या वस्तूंना कोणीही हात लावायचा नाही, असं त्यांनी घरात बजावून ठेवलं होतं. आपल्या आज्ञेचं उल्लंघन कोणीतरी केलेलं आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी बायकोला जोरात हाक मारली. पण बायको इतकी गाढ झोपली होती, की तिला ती हाक मुळीच ऐकू गेली नाही. मग त्यांनी आणखीन २०-२५ हाका मारल्या. त्या हाका ऐकून, सोसायटीमधल्या इतर बायका उठल्या, आपापल्या टेरेसमध्ये येऊन वसंतरावांकडे बघू लागल्या. पण अनुपमा मात्र उठली नाही. शेवटी वसंतरावांनी तिला गदागदा हलवलं.
तेव्हा ती अर्धवट झोपेत म्हणाली, ‘‘इश्श, चावटपणा करू नका. दमू मोठी झालीय आता.’’
वसंतराव फ्रस्ट्रेट झाले. ते संतापून ओरडले, ‘‘ती दमू मरू देत. माझी दोरी कुठे आहे ते सांग.’’
‘‘कसली दोरी?’’ अनुपमाने जांभई देत विचारलं.
‘‘माझी उड्या मारायची.’’
‘‘आता उड्या कशाला मारताय या वयात?’’
‘‘मूर्ख म्हणून…. तू सांग बरं, माझ्या दोरीवरच्या उड्या कुठे ठेवल्या आहेत?’’
‘‘दोरीवरच्या उड्या की उड्या मारायची दोरी?’’
‘‘तेच ते. एक वस्तू तुमच्या राज्यात नीट सापडायची नाही.’’
‘‘नाडी देऊ का माझ्या परकराची?’’ यावर वसंतराव काही बोललेच नाहीत.
‘‘घ्या की नाडी. नाडी काय आणि दोरी काय! हातात काहीतरी त्या आकाराचं असलं म्हणजे झालं!’’
‘‘बावळटासारखं बोलू नको गं सकाळी सकाळी. बायकोच्या परकराची नाडी काढून मी उड्या मारतो, म्हटल्यावर सोसायटीत माझी काय पोजिशन राहील? आणि दुसरं म्हणजे तू कितीही लठ्ठी असलीस, तरी तुझी कंबर एवढी मोठी नाहीये, की तिच्या मापाची नाडी घेऊन मी उड्या माराव्यात!’’
‘‘अहो, परकराची काढायची नाहीये. परकरात घालायची आहे.’’
‘‘म्हणजे काय?’’
‘‘परकरात घालण्यासाठी मी परवाच १० मीटरचा गुंडा घेऊन आलीय… त्यातली घ्या तुम्ही वापरायला आणि उड्या मारून झाल्या की माझे दोन नवे परकर आहेत, त्यात ती आजच्या आज घालून ठेवा.’’
‘‘अगं शहाणे, ती नाडी आजच्या आज परकरात घातल्यानंतर उद्या उद्या कशा मारू? आपलं उड्या उड्या कशा मारू? आपलं उद्या उड्या कशा मारू? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाडीवरच्या उड्या मारायच्या नाहीयेत मला. दोरीवरच्या मारायच्या आहेत. आणि मी नाडी उड्या मारायला वापरली, तर उद्या तू दोरी परकरात घालून वापरशील.’’
यावर काहीही न बोलता अनुपमा उठली आणि ब्रश करायला बाथरूममध्ये गेली. वसंतराव तिच्या पाठोपाठ आत जायला लागले, पण तिनं त्यांच्या तोंडावर दार आपटलं. मग नाक चोळणार्याा वसंतरावांना, त्यांच्या मुलीच्या रूमचं दार उघडं दिसलं, तिला दोरीचं विचारावं म्हणून ते तिथे गेले. पण रूममध्ये दमयंती नव्हती. मग ते बाहेर आले, सगळ्या घरात तिला बघितलं, पण ती कुठेही दिसेना. इतक्या पहाटे ती कुठे गेली आहे, त्यांना कळेचना. तिच्या गाडीची किल्ली दिसत नव्हती, तिचा मोबाईल आणि चार्जर दिसत नव्हते. तिच्या चपलांचे तीन जोड दिसत नव्हते. आता मात्र वसंतराव चिंतित झाले. मग ते परत तिच्या रूममध्ये गेले, त्यांनी तिची कपाटं उघडली तर तिचे बरेचसे कपडेही दिसत नव्हते. मुख्य म्हणजे २ मोठ्या सूटकेसही गायब होत्या. वसंतरावांच्या पोटात गोळा आला. ते हताश होऊन हॉलमधल्या कोचावर येऊन गळून बसले. त्यांचं त्राणच गेलं. मग त्यांनी तिला फोन लावला. तो बंद होता. १०-१५ वेळा लावून बघितला पण बंदच होता. थोड्या वेळाने अनुपमा तिथे २ कप चहा घेऊन आली, एक कप त्यांना देऊन, ती पेपर चाळत आणि चहा पीत समोर बसली. मग वसंतरावच थोड्या वेळाने स्वतःशी म्हणाले, ‘‘कुठे असेल ही, टेन्शनच आहे!’’
‘‘एक गेली तर दुसरी आणू, त्यात काय एवढं!’’ अनुपमा म्हणाली.
‘‘दुसरी ? तुझं डोकं ठिकाणावर आहे नं?’’
‘‘त्यात काय? एवढी काही खास नव्हती! दळीद्री मेली. जेमतेम ५ फूट तर होती!’’
‘‘काय बोलते आहेस तू? डोकं ठिकाणावर आहे ना तुझं?’’
‘‘चांगलं ठिकाणावर आहे. बाजारात हजार पडल्या आहेत अशा. थोडे पैसे टाकले की लाखो मिळतात!’’
‘‘अगं, आपल्या पोटची आहे ती. असं कसं बोलवतं तुला!’’
आता मात्र अनुपमाला हसू आलं. ती खळखळून हसली.
‘‘एखादी मरतुकडी दोरी आपल्या पोटी कशी काय येईल?’’
मग मात्र वसंतराव भडकले.
‘‘ती दोरी गेली मश्णात. मी दोरीबद्दल बोलत नाहीये.’’
‘‘मग कशाबद्दल बोलताय?’’
‘‘दमयंतीबद्दल बोलतोय. ती कुठे दिसत नाहीये.’’
‘‘अहो, काल रात्री ती तिच्या मित्राकडे नाही का गेली झोपायला?’’
‘‘अनुपमा, मी तुझ्या पाया पडतो. झोपायला… झोपायला असं म्हणू नये. राहायला गेली किंवा गप्पा मारायला गेली असं म्हणावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल ती तिच्या मैत्रिणीकडे गेली होती. मित्राकडे नाही.’’
‘‘मित्राकडे नाही ना? मग कशाला काळजी करताय? येईल सुखरूप परत.’’
‘‘अगं, पण ती रात्री २ वाजता आली होती की परत तिच्याकडून.’’
‘‘अय्या हो, ते विसरलेच मी… आणि आलीय ना ती परत? मग तुम्ही कशाला टेन्शन घेताय?’’
तिचा तो मठ्ठपणा वसंतरावांना सहन होईना. मग त्यांनी अत्यंत शांत शब्दात तिला परिस्थिती समजावून दिली. मग मात्र तिला परिस्थितीचं गांभीर्य जाणवलं.
‘‘मग हो…आता काय करायचं?’’
‘‘काही नाही… आता आधी सगळ्यांना फोन करून विचारू या.’’
मग दोघांनी सपासप ४०-५० फोन्स लावले. त्यात त्यांचा फोन डिस्चार्ज झाला पण दमयंतीचा कुठेच पत्ता नव्हता. यात सुमारे अर्धा-पाऊण तास गेला. सोसायटीमध्ये तिच्या २ जवळच्या मैत्रिणींना फोन लावले, त्या दोघींचे आईवडील घाईघाईने तिथे पोचले.
‘‘तुम्हाला आत्ता सकाळी उठल्यावर कळलं का?’’
‘‘हो.’’
‘‘मग खूप धक्का बसला असेल.’’
‘‘हो.’’
‘‘आणि तशी तुम्हाला बाकी काही कल्पना नसेलच. बरोबर नं?’’
‘‘हो.’’
‘‘ती आणि आमची प्राजक्ता बरोबरच्याच ना?’’
‘‘हो.’’
‘‘आणि या तरुण मुली म्हणजे जिवाला घोरच हो. मला तर रोज संध्याकाळी प्राजूला बघेपर्यंत जिवात जीव नसतो माझ्या. कधी एकदा ऑफिसमधून घरी येतोय आणि तिला बघतोय, असं होतं. वसंतराव, तुम्हालाही दमूला असंच बघावंस वाटतं ना?’’
‘‘हो.’’
‘‘काही मदत लागली तर सांगा.’’
‘‘हो.’’
‘‘हे असं बोलणं पुरुष गटात चाललं होतं. तर बायकांच्यात साधारणतः अशा गोष्टी चालू होत्या.’’
‘‘म्हणजे काय अनुपमा, काल रात्री तुमचं काही बोलणं झालं नव्हतं?’’
‘‘नाही.’’
‘‘तुमची काही भांडणं झाली होती का?’’
‘‘नाही.’’
‘‘मग तिची काही मागणी होती का?’’
‘‘नाही.’’
‘‘परीक्षेत नापास-बिपास झाली होती का?’’
‘‘नाही.’’
‘‘हल्लीच्या मुलींना काही ताळतंत्रच राहिला नाहीये. नुसता आई-बापांच्या जिवाला घोर. आमची रिया अशी न सांगता एकदा गेली होती, आल्यावर चांगली उभी फोडून काढली तिला. मग मात्र मलाच फार वाईट वाटत होतं महिनाभर. तू असं काही करू नकोस हं, अनुपमा.’’
‘‘नाही.’’
म्हणजे वसंतराव फक्त हो म्हणत उभे होते आणि अनुपमा फक्त नाही म्हणत उभी होती. त्यांचं हे सर्व बोलणं होईपर्यंत तिथे ८-१० शेजारी, ३-४ मित्रमैत्रिणी आणि ७-८ नातेवाईक जमले होते. अर्थातच हे सगळे वेगवेगळ्या वेळी आले होते. त्यामुळे त्या प्रत्येकाला हे दमयंती आख्यान परत परत सेपरेट सांगून सांगून वसंतरावांचं तोंड दुखायला लागलं होतं. सगळ्यात शेवटी अनुपमाची आई म्हणजे शारदाकाकू तिथे आल्या. त्या आल्याआल्या अनुपमाच्या गळ्यात पडून रडायला लागल्या. इतक्या जोरात रडायला लागल्या, की त्या ७ मजली बिल्डिंगमधली बहुतेक सगळी माणसं धावत धावत तिथे आली. बर्यााच लोकांना तिथे नक्की काय झालं आहे, ते कळेना. एक-दोन लोकांना तर वसंतरावच वारले असं वाटलं, पण वसंतरावांना दारातच पाहून ते दचकले. आत अनुपमाही दिसली. मग मात्र कोण वारलंय ते न कळल्याने ते अजूनच गोंधळले. तोपर्यंत त्यांना शारदाकाकूंचं वाक्य ऐकू आलं.
‘‘जावईबापू, कुठे गेली माझी परी?’’ वसंतरावांनी ते ऐकून न ऐकल्यासारखं केलं.
‘‘आता ही परी कोण?’’ शेजारचे वेलदुरे, शेजारच्याच शिंद्यांच्या कानात पुटपुटले.
‘‘परी म्हणजेच दमयंती.’’ शिंदे म्हणाले.
‘‘मग दमयंती म्हणावं. परी काय परी? पंख होते का तिला?’’ वेलदुरे म्हणाले.
‘‘मी बोललोय का? मला काय झापताय?’’
‘‘झापत नाहीये हो. त्यांना सांगा.’’
‘‘मी माझ्या सासूशी बोलत नाही, यांच्या सासूशी कुठे बोलू?’’
‘‘माझी परी कुठे गेली… काय हो?’’ शारदाबाई परत कडाडल्या.
‘‘आता कुठे गेली आहे, हे माहिती असतं, तर गेले २ तास हा शो इथे लावला असता का? तिथे जाऊन तिला घेऊनच नसतो का आलो?’’ वसंतराव वैतागून म्हणाले.
‘‘निदान फोन तरी लावून बघा.’’ शारदाकाकूंनी पुढची सूचना केली. ती ऐकून वसंतराव वैतागले. आता या बाईला परत सगळं रामायण सांगायला लागणार, हे त्यांच्या लक्षात आलं.
‘‘लावा… लावा… लवकर लावा.’’ त्या परत म्हणाल्या.
‘‘फोन स्वीच-ऑफ आहे.’’ वसंतरावांनी सांगितलं.
‘‘काय बाई तरी माणूस आहे! अहो, मग सुरू करा.’’
‘‘…किंवा डिस्चार्जही असेल.’’
‘‘मग चार्जिंगला लावा पटकन.’’
‘‘कसा काय लावू?’’
‘‘काय बाई तरी… लेंग्यातून काढा आणि त्या भिंतीवरच्या गात वायर घाला.’’
‘‘तिचा फोन माझ्या लेंग्यात कसा असेल?’’
‘‘काय घोळ आहे… मला वाटलं की तिचा फोन डिस्चार्ज झालाय.’’
‘‘अहो मग, तिचाच फोन डिस्चार्ज झालाय. म्हणजे असावा….. डिस्चार्ज किंवा ऑफ. सॉरी, तुमचा फोन डिस्चार्ज झालाय असं वाटलं मला.’’
‘‘माझाही झालाच आहे. पण मी मघाशी तिच्या फोनच्या संदर्भात बोलत होतो.’’
या संभाषणानंतर तिथे परत एकदा शांतता पसरली.
‘‘पण कोणाबरोबर गेली आहे ही? आणि कुठे गेली आहे नेमकी?’’ इति शारदाकाकू.
‘‘अगं आई… नाही माहिती.’’ आता अनुपमासुद्धा वैतागली. तिला आता आपली आई इथे काय आणि कोणते प्रश्न विचारेल, याचीच धास्ती वाटायला लागली.
‘‘चल… मग पोलीस कमिशनरकडे जाऊ. तक्रार नोंदवून टाकू.’’ काकूंनी ऑर्डर दिली.
आता मात्र शेजारीपाजारी येऊन काकूंशी बोलायला लागले. डायरेक्ट कमिशनरकडे जायचं नसतं. अशा तक्रारी प्रथम आपल्या एरियातील पोलीस चौकीत जाऊन नोंदवायच्या असतात. अजून ३-४ तास वाट बघू आणि मग तक्रार नोंदवू. न जाणो, येईलही अर्ध्या एक तासात तिचा फोन किंवा ती स्वतः येईल…. अशा स्वरूपाची बोलणी तिथे चालू होती. प्रत्येक जण जे जे सुचेल, ते कुजबुजत होता.
‘‘मुलं हरवली तर काही वाटत नाही पण मुली हरवल्या की काळजी वाटते हो.’’
‘‘काय बोलताय तुम्ही?’’
‘‘तिचं त्या सनीबरोबर होतं म्हणे.’’
‘‘काय होतं?’’
‘‘काय काय विचारताय… ते हे…’’
‘‘हं हं… आलं लक्षात… पण नाही… तसं नव्हतं काही… तो तिचा नुसता क्रश होता.’’
‘‘काय होता?’’
‘‘क्रश.’’
‘‘क्रश म्हणजे काय?’’
‘‘क्रश म्हणजे थोडासा प्रियकर. म्हणजे अगदी डायरेक्ट प्रियकर नाही, पण त्याच्या आधीची स्टेप असते ती… अजून ४ पावलं पुढे गेलं की प्रियकरच. तोपर्यंत क्रशत्व असतं त्या मुलाकडे.’’
‘‘अच्छा… अच्छा… मग क्रश-बिश नव्हता तो.’’
‘‘कशावरून?’’
‘‘आमच्या अनघाचं आणि त्याचं सध्या चालू आहे.’’
‘‘पण काय हो बर्वे, क्रश म्हणजे काय?’’
‘‘आत्ताच सांगितलंय ह्यांना. तुमचं लक्ष कुठं असतं? आता परत परत नाही सांगणार.’’
‘‘पण सांगा की एकदा.’’
‘‘अहो, आग्रह काय करताय! इथे वेळ काय, प्रसंग काय!’’
‘‘नाही, मला आपली क्युरिऑसिटी आहे म्हणून विचारलं.’’
‘‘आता दमयंती आल्यावर विचारा तिलाच डायरेक्ट.’’
एव्हाना त्या घरात बाहेरची ३८ आणि घरची २ अशी ४० माणसं जमली होती. घरातल्या चारही खोल्या भरून गेल्या होत्या. सगळे जमून एक-दीड तास होऊन गेला होता. सगळे लोक ग्रुप आणि खोल्या बदलत फिरत होते. सरतेशेवटी, सगळे पुरुष हॉलमध्ये, बायका किचनमध्ये, दमयंतीच्या मैत्रिणी आणि ३-४ समवयस्क मुलं दमयंतीच्या बेडरूममध्ये, तर शारदाकाकू आणि काही नातेवाईक वसंतरावांच्या बेडरूममध्ये अशी विभागणी झाली. तितक्यात बर्व्यांनी वसंतरावांना चहा टाका बुवा.. असं सांगितलं. वसंतराव चपापले. त्यांच्याही लक्षात आलं की दीड तास झाला, मंडळी जमली आहेत, पण चहा-पाणी अजून झालेलं नाहीये. मग ते पळत उठले आणि अनुपमाला चहाची खूण करून आले. ते परत आल्यावर पलीकडचे पै म्हणाले, ‘‘वसंतराव, आता चहा झाल्यावर काहीतरी हातपाय हलवू. हा नुसता टाइमपास बरा नाही. नुसतं बसण्यात पॉइंट नाही. दहा ठिकाणी गेलं पाहिजे. पोलिसांना कळवलं पाहिजे. अहो, तरुण मुलगी आहे. हे असं स्लो स्लो हलून भागणार नाही.’’
सगळ्यांना त्यांचं म्हणणं पटलं. मग हळूहळू त्या घराला एक स्पीड आला. सगळेजण एकेक आयडिया सांगायला लागले. सर्वानुमते असं ठरलं की, चहा झाल्यावर अर्धा तास वाट बघायची आणि मग डायरेक्ट पोलीस कम्ेंट द्यायची. तितक्यात अनुपमाने वसंतरावांना खूण केली. ते पळत पळत तिकडे गेले. अनुपमाने दबक्या आवाजात प्रश्न विचारला.
‘‘आता, चहा कसा करायचा?’’
‘‘आधी आधण टाकायचं… मग साखर टाकायची… मग…’’
‘‘आहाहाहा… काय माणूसे… मी तुम्हाला चहा कसा करायचा याची प्रोसेस नाही विचारते.’’
‘‘त्याला रेसिपी म्हणतात. प्रोसेस नाही.’’
हे ऐकून अनुपमा चिडली, तिने त्यांच्या हाताला करकचून चिमटा काढला. बाकी कोणालाही कळू नये म्हणून वसंतराव हळूच कळवळले.
‘‘तुम्ही मला शिकवू नका, रेसिपी वगैरे सगळं कळतं मला. दूध संपलं आहे.’’
‘‘असं कसं संपलं दूध?’’
‘‘मी प्यायले १० लिटर, मुलगी पळाल्याच्या आनंदात! अहो, आपण दीड लिटर घेतो फक्त. घरात ४० माणसं आहेत आत्ता. जा पटकन दूध घेऊन या… आणि हो, गुपचूप आणा, चोरून.’’
’’चोरून? मूर्ख आहेस का तू ? हे संस्कार आहेत का आपले?’’
‘‘चोरून म्हणजे ढापून नाही. सगळ्या गावात जाहिरात करू नका, असं म्हणतीय मी.’’
मग वसंतराव घाईघाईने निघाले. त्यांनी एक मोठी पिशवी घेतली, पैसे घेण्यासाठी कपाट उघडलं, तर त्यांच्या पोटात अजून एक गोळा आला. त्यांची पैशाची जी छोटी पेटी होती, त्यात आता फक्त ५००० रुपयेच शिल्लक राहिले होते. म्हणजे दमयन्तीने जवळपास ६० हजार रुपये लंपास केले होते. अत्यंत दुःखी मनाने, त्यांनी तिथल्या हिरेन, रिया, पिंकी वगैरे २-३ मुलांना बोलावलं. त्यांना पिशवी आणि पैसे देऊन दूध आणायला पाठवलं. मग मुलं बाहेर गेली, अर्ध्या तासात दूध घेऊन आली, मग चहा टाकला गेला. मग बर्व्यांनी हिरेनला विचारलं, ‘‘दूध आणायला इतका वेळ लागतो का रे?’’
‘‘वाटेत अमृततुल्य दिसलं. आयडिया अशी आली डोक्यात, की दूध घेऊन जायच्या ऐवजी डायरेक्ट चहाच घेऊन जाऊ. पण हिशोब केल्यावर असं लक्षात आलं की, दूधच स्वस्त पडेल.’’
‘‘मग?’’
‘‘मग तिथे आम्ही चहा प्यायलो आणि चहावाल्याला विचारलं की दमयंती दिसली का कुठे!’’
हे ऐकून वसंतराव खवळलेच.
‘‘काय मूर्ख मुलं आहात तुम्ही? त्याला कशाला विचारलं? तो कशाला झक मारायला पाहील तिला? झालं…. आता हे सगळं, हा चहावाला गावभर करणार!’’
‘‘अहो काका, तुम्हीच मघाशी म्हणलात ना, की ती पहाटे गुल् झाली. आणि तो ४ वाजता उघडतो बरोब्बर. म्हणून मी त्याला विचारलं. मागे एकदा धोपावकरांची कुत्री हरवली होती, तेव्हा या चहावाल्यानीच शोधून दिली होती.’’
‘‘अरे, पण दमयंती काय कुत्री आहे का?’’
‘‘च्च… अहो असं काय करता… कुत्री शोधू शकतो, तो मुलगी नाही का शोधणार?’’
‘‘तो तिथे तपास करायला बसतो की चहा विकायला बसतो?’’
मग तिथे बराच गदारोळ झाला. त्यानंतर सर्वांना मुलांचं म्हणणं लक्षात आलं. ते हॉटेल सोसायटीच्या बरोब्बर समोर आहे. तो मालक ज्या पोजिशनमध्ये चहा करायला बसतो, ती जागा सोसायटीकडे परफेक्ट तोंड करून आहे, त्यामुळे त्याची नजर बरोबर सगळे काही हेरत असते. सकाळी सकाळी तिथे पोलीसही चहा प्यायला येतात. त्यामुळे तो माणूस फार वेलकनेक्टेड आहे. झाला तर फायदा होऊ शकतो. नुकसान काहीही नाही. ही सगळी चर्चा होईपर्यंत चहा झाला होता, तोच घराची बेल वाजली. अनुपमाने दार उघडलं. दारात पोलीस होते. त्यांना बघून सगळे दचकले. पोलीस शांतपणे आत येऊन बसले. थोडा वेळ ते काहीच बोलले नाहीत. प्रत्येकाला न्याहाळत होते. त्यांना तसं गप्प बसलेलं बघून, प्रत्येकाच्या पोटात गोळा येत होता. यांना न कळवता हे कसे काय आले आणि हे परस्परच आले आहेत म्हणजे यांनी काहीतरी वाईट बातमी आणली असेल, असे विचार सर्वांच्या मनात येत होते. कोणीच काही बोलेना. शेवटी शारदाकाकू भीत भीत म्हणाल्या, ‘‘तुम्ही कशासाठी आला आहात?’’
‘‘कशासाठी मंजी, या पोरांनीच बोलावलं आम्हाला.’’
‘‘आम्ही कुठे बोलवलं?’’
‘‘मंजे काय, तुमीच बबनरावानला बोल्ला ना? त्यांनी आमाला सांगितलं.’’
‘‘कोण बबनराव?’’
‘‘समोरचे चा वाले.’’
मग सर्वांच्या लक्षात आलं की ही मुलं ज्या चहावाल्याशी बोलली, त्यानं या पोलिसांना सांगितलं आणि म्हणूनच ते आत्ता चौकशीला इथे आले आहेत. मग वसंतरावांनी त्यांना थोडक्यात सगळी माहिती दिली. मग त्यातल्या धिप्पाड पोलिसाने विचारलं, ‘‘आच्छा… तर रात्री अडीचला ती आली आणि पहाटे ५ च्या सुमाराला ती गेली. करेक्ट?’’
‘‘हो… म्हणजे १०-१५ मिनिटं इकडे तिकडे.’’
‘‘नक्की कुठं गेली आहे ती?’’
या प्रश्नावर सगळे बुचकळ्यात पडले. लोकांना नेमकं तेच माहिती नव्हतं.
‘‘नक्की कुठं गेली आहे ती, असा तुमचा डाऊट आहे?’’ पोलिसांनी विचारलं.
‘‘मला तसा काहीच डाऊट नाहीये.’’ शेजारचे शिंदे म्हणाले.
‘‘आसं कसं? तुमची पोरगी हरवली म्हणाल्यावर डाऊट पायजेच ना.’’
‘‘खरं सांगायचं तर ती माझी मुलगी नाहीये.’’
‘‘मायला, मंग कुनाचीय?’’ लुकड्या पोलिसांनी दचकून विचारलं.
‘‘अहो, माझी मुलगी आहे ती. आत्ता हिनी दार नाही का उघडलं तुम्हाला?’’ अनुपमाकडे बोट दाखवत वसंतराव म्हणाले. वसंतरावांच्या या वाक्यानं पोलीस एक किलोभर गोंधळून गेले. त्यांना काहीही सुधारलं नाही.
‘‘याला काय अर्थ आहे? या बाईंनी दार उघडलं म्हणून पळवून नेलेली मुलगी तुमची?’’
‘‘या बाई घराच्या मालकीणबाई आहेत, म्हणूनच त्यांनी दार उघडलं. नाहीशी झालेली मुलगी त्यांच्या पोटी, माझ्यामुळे जन्माला आलेली असून, मी ह्यांचा नवरा आणि तिचा बाप आहे.’’
‘‘ओक्के…. मंजी पळवून नेलेली पोरगी तुमची आहे!’’
‘‘पळवून नेलेली? तुम्हाला कोणी सांगितलं की तिला पळवून नेलं?’’
हेच दोघं सांगत होते बबनरावानला. हिरेनकडे बोट दाखवत लुकड्या पोलिसाने सांगितलं. या वाक्याला अनुपमाच्या आईने मोठ्यांदा हंबरडा फोडला. तो हंबरडा इतक्या जोरात फुटला, की परत कधीही तो चिकटवता आला नसता. त्या आवाजाने दोघे पोलीस भयंकर घाबरले.
‘‘अहो… तुम्ही लवकर काहीतरी करा. नाहीतर ते दरोडेखोर माझ्या नातीचा खूनसुद्धा करतील. कोवळी पोर बिचारी. अजून तिचा सगळा जन्म जायचाय, लग्न व्हायचंय, मुलबाळं व्हायचीत… परमेश्वरा… काय पाप केलं होतं मी म्हणून तू हे दिवस दाखवतो आहेस…’’ असं आणि या अर्थाचं शारदाकाकू खूप काही बोलल्या… हे त्यांचं सर्व बोलणं आणि विलाप काही वसंतरावांना सहन होईना. ते खलासच झाले. ते इतक्या जोरात बेंबीच्या देठापासून हिरेनच्या अंगावर ओरडले, की तो देठ थरथरू लागला.
‘‘हिरेन, तुला कोणी सांगितलं की तिला पळवून नेलं म्हणून?’’
‘‘काका, आता सकाळपासून तोच विषय चालू आहे की. आपण इथे सगळे कशासाठी जमलो आहोत मग? तुम्हीच आम्हाला सांगितलं… दमू दिसत नाहीये म्हणून.’’ हिरेन रडक्या आवाजात बोलला.
‘‘अरे पण, पळून जाणं आणि पळवून नेणं, अशा दोन शक्यता आहेत की नाही? तू कशावरून छातीठोकपणे सांगतोस, पळवून नेली म्हणून?’’ वसंतरावांनी विचारलं.
‘‘तुमी कशावरून छातीठोकपणे सांगता, की ती पळूनच गेली म्हनून? तुम्ही बगितली का तिला पळून जाताना? का तिनी तुमाला फोन करून सांगितलं? की एशेमेस केला तिनी तुमाला की पप्पा, मी पळून चालली म्हनून. काय ओ? की इंष्टाग्रामवर ष्टोरी लिहिली तिनी, फोटोबिटो टाकून… रणींग अवे फ्रॉम हौस….आं?’’ धिप्पाड पोलिसानं असे एका-पाठोपाठ चार प्रश्न विचारले.
‘‘आन ओ आज्जी… तुमी जास्ती राडा करू नका इथं. यक तर तुमाला जणरल नॉलेज आजिबातच नाहीये. दरोडेखोर कशाला झक मारायला किडनापिंग कर्त्याल? उगाच आपलं कैच्या कै बोलाईचं मंजी काय? आन केवडा तो आवाज तुमचा. त्या आवाजानी मरतील ४-२ मानसं. आसं आजाबात रडत जावू नगा अडवान्समदी. तुमाला कन्फर्म न्यूज आहे का? पोरगी कापली-बिपली म्हनून? नै ना? मंग शांत पडा आतमदी जाऊन. पोरीचा खून जाला म्हने. उगा कामं वाडवू नगा आमची…. कामंबिमं हैत का नै तुमाला? चला… गर्दी कमी करा हितली. मानूस्की ठेवा जरा… एक तर मला बिपीचा प्राब्लेमे. शुगरपन लो आहे…’’ असं लुकडा पोलीस डाफरला.
पोलिसांनी थोडक्यात अशी त्याची वेदना मांडली. मग लोकांनाही त्याचा प्रॉब्लेम लक्षात आला. मग तिथल्या बायकांनी शारदाकाकूंना आत नेलं. कर्तव्यबुद्धीचा भाग म्हणून जे उगीचच आले होते, ते निघून गेले. ज्यांना खरोखर कामं होती, तेही निघाले. मग मोजकीच अशी १५-२० लोकं राहिली. मग धिप्पाड पोलिसाने, डोळा मारत विचारलं, ‘‘नेमकी काय भानगड आहे? कोनाबरोबर डाव होता तिचा?’’
ह्या प्रश्नाचा अर्थ कोणालाच कळला नाही.
‘‘डाव म्हणजे? कसला डाव?’’ अनुपमानं विचारलं.
‘‘अहो वहिनी, तरुण पोरगी आहे… सगळं सामानसुमान घेऊन गेली म्हनल्यावर, कायतरी डाव असनार ना… कोन तरी पेशल मित्र बित्र…’’ पोलिसानं क्लिअर केलं.
‘‘नाही हो… तसलं काही नाहीये.’’
‘‘कशावरून? वय किती आहे पोरीचं?’’
‘‘२२ पूर्ण.
मंग डाव असनारच. इषय कट.
अहो, असा कसा विषय कट होईल? तुम्ही जरा तपास करा ना.’’ अनुपमा म्हणाली.
‘‘आसं म्हनता… हिकडं या रे तुमी… आशे समोर या…. आता बगतो एकेकाकडं..’’ असं पोरांकडे बघत पोलीस म्हणाले. मग हिरेन, पिंकी आणि रिया त्यांच्यासमोर जाऊन बसले. मग पोलिसांनी त्यांना नाही नाही ते प्रश्न विचारले. पोरं बिचारी रडकुंडीला आली. मग मात्र बर्वे तावातावाने पुढे आले.
‘‘तुम्ही त्यांना कशाला त्रास देताय, त्यांना काहीही माहिती नाहीये.’’
‘‘हे तुम्हाला कसं माहिती?’’ पोलिसांनी उलट त्यांनाच विचारलं. त्यावर बर्वे गप्प झाले.
‘‘साहेब, तुमी एक काम करा. एफायार नोंदवा. मग घेतो एकेकाला आत. ढुंगणावर फटके पडले की बोलतील चटचट.’’ हे पोलिसांचं वाक्य ऐकताच वातावरण गंभीर झालं.
‘‘साहेब, तसं काही नाहीये, ही मुलं इथेच राहतात, या सोसायटीत. सगळे बालमित्र आहेत दमूचे. ते मदतीला आलेत.’’ वसंतरावांनी सांगितलं. यानंतर त्यांनी परत एकदा रात्री २ ते सकाळपर्यंत काय काय झालं, त्याचं पारायण केलं. मग मात्र पोलीस वैतागले.
‘‘एक काम करा, आज दिवसभर वाट बघा… नैच कै पत्त्या लागला, तर उद्या येऊन कम्ेंट करा, मग बघू.’’ असं म्हणून पोलीस उठले. मग वसंतराव त्यांच्यापाशी गेले आणि त्यांना म्हणाले, ‘‘हे बघा… म्हणजे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका… पण तुम्ही जरा स्पीडनी शोधून द्या आम्हाला… काय हवा तितका खर्च होऊ दे… मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत कॅश आणून देतो… नाही म्हणजे तुम्हालाही बरीच माणसं कामाला लावावी लागतील ना… मला आहे जरा कल्पना… १० ठिकाणी फिरावं लागेल… ठीक आहे ना?’’ हे ऐकून पोलिसांनी मान डोलावली आणि संथपणे निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ ७-८ माणसं निघून गेली. मग मोजकीच माणसं शिल्लक राहिली.
‘‘काकू, काल रात्री दमू कोणाकडे गेली होती?’’ रियानं विचारलं.
‘‘सोनियाकडे.’’
‘‘मग तिला नक्की माहिती असेल. तिला विचारायला हवं.’’
‘‘विचारलं ना. दिवसभरात ३-३ फोन झाले. तिला काहीही माहिती नाहीये.’’
इतक्या वेळ पोलिसांच्या भीतीने शारदाकाकू आत बसल्या होत्या. ते गेल्याचे लक्षात येऊन त्या बाहेर आल्या. बाहेर आल्या आल्या त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली.
‘‘मला सांग अनू, ती जेव्हा पहाटे बाहेर पडली, तेव्हा तुम्हाला कसं कळलं नाही?’’
‘‘अगं आई, आता झोपेत कोणाला काही कळतं का?’’
‘‘अगं पण तुला तिची हालचाल कशी नाही जाणवली?’’
‘‘च्च. आई, आम्ही वेगळ्या खोल्यांमध्ये झोपतो. ती वेगळी आणि मी वेगळी.’’
‘‘ती वेगळी झोपते? कशासाठी? हेच चुकता तुम्ही. वेगळं झोपायचं काही कारणच नाहीये. अशांनीच मुलांवर लक्ष राहत नाही. तुम्हाला मुलं नीट वाढवताच येत नाहीत. आपल्या घरी होती का अशी पद्धत, वेगवेगळं झोपायची?’’
‘‘अगं आई, आपली एकच खोली होती, तिथे वेगवेगळे कसे झोपणार होतो आपण?’’
‘‘तरी पण झालाच ना संसार! काही अडलं का?’’
‘‘अहो सासूबाई, पण हा कुठे विषय चालू आहे?’’
‘‘हाच विषय चालू आहे. ही तुमची बायको अशी हरवली असती, तर लग्न झालं असतं का तुमचं? झाली असती का तुम्हाला सोन्यासारखी मुलगी? बेजबाबदार माणसं. वेगवेगळी झोपतायत! आधी वेगवेगळं झोपायचं आणि मग नंतर मुलगी हरवली म्हणून ओरडत बसायचं!’’
हे सर्व संवाद सोसायटीतल्या शिल्लक बायका-पोरांसमोर चालू होते. त्यामुळे वसंतराव आणि अनुपमाला मेल्याहून मेल्यासारखं होत होतं. मग काकूंनी त्यांचा मोर्चा पिंकीच्या आईकडे वळवला.
‘‘काय गं, तू या पिंकीची आई ना?’’
‘‘हो!’’
‘‘मग तू कोणाबरोबर झोपतेस?’’
हा प्रश्न ऐकताच ती माऊली मुलीसकट दचकली.
‘‘बसली वाटतं दातखिळी. आलं लक्षात माझ्या. आणि तू रे घोड्या, तू कोणाबरोबर झोपतोस?’’
हा प्रश्न ऐकताच बर्वे दचकले. चाचरलेच ते.
‘‘मी… मी… आपलं… ते हे…’’
‘‘अहो बर्वेकाका, मी तुम्हाला नाही विचारतेय. मला माहिती आहे तुम्ही कोणाबरोबर झोपता ते. मी याला विचारतीय. तू…. तू… काय नाव तुझं?’’
‘‘हिरेन…’’
‘‘तू कोणाबरोबर झोपतोस?’’
‘‘मी एकटाच झोपतो.’’
‘‘का? तुझाही पळून जायचा बेत आहे वाटतं. अजिबात एकट्यानी झोपायचं नाहीये कोणी आजपासून. झोडून काढीन एकेकाला.’’
एकंदरीत, दमयंती नाहीशी झाल्यापासून, शारदाकाकूंच्या नाजूक मनावर बरेच आघात झाले होते. त्यामुळे त्या ताळतंत्र सोडून बोलत होत्या. सगळ्यांच्या ते लक्षात येत होतं. वसंतरावांनी अनुपमाला खूण केली, ती आईला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, असं सांगून, आतमध्ये घेऊन गेली. त्या दोघी आत गेल्या गेल्या, वसंतरावांनी मुलांना विचारलं.
‘‘इकडे या रे तिघं. मला सांगा.. तिचा कोणी बॉयफ्रेंड वगैरे नाहीये ना?’’
‘‘नाही काका.’’
‘‘नक्की?’’
‘‘नक्की काका.’’
‘‘असेल तर सांगून टाका बाबांनो.’’
‘‘आता नाहीच्चे तर कुठून सांगणार नं?’’
मग मात्र सगळे शांत बसले. कोणाला काही सुचेना. तिथे एक प्रकारची विचित्र शांतता पसरली. तिला कोणी मित्र नाही, तिला कोणी पळवूनही नेलं नाही, तिचं आई-वडिलांशी किंवा कोणाशी भांडण झालेलं नाही, मग नक्की काय झालं असेल? या विषयावर हलक्या आवाजात तिथे चर्चा चालू होती. लोक अनेक शक्यतांचा विचार करत होते. अनेक तर्क तिथे लढवत होते. पण कोणीही कोणत्याही कन्क्लूजनपर्यंत येत नव्हतं. पोलिसांऐवजी एखाद्या डिटेक्टिव्हकडे केस सोपवायची का, याचाही विचार चालू झाला. पण ही डिटेक्टिव्ह माणसं सतत गॉगल घालतात, पाईप ओढतात, तसंच त्यांच्याकडे पिस्तूल असतं आणि ते इंग्लिश बोलून भरपूर दारू पितात आणि जोरात गाड्या चालवतात, तसंच त्यांना सुंदर मैत्रिणी असून, त्या खूप कमी कपडे घालतात, अशी एकंदरीत डिटेक्टिव्ह लोकांबद्दल माहिती मिळाली, जी अर्थातच चांगली नव्हती. थोडक्यात, डिटेक्टिव्हबद्दल कोणाचेही अनुकूल असं मत पडलं नाही. शिवाय कोणाच्याही संपर्कात असा कोणी प्राणी नव्हता, हे वेगळंच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकाही डिटेक्टिव्हला मराठी भाषा येत नाही, त्यामुळे नकोच ती भानगड; असं ठरवून, या सर्व बाबींमुळे तो पर्याय नष्ट झाला.
थोड्या वेळाने, शारदाकाकू बाहेर आल्या. त्या हिरेन, रिया आणि पिंकीसमोर जाऊन उभ्या राहिल्या आणि त्यांना त्यांनी भयानक गुप्त आवाजात विचारलं,
‘‘दमयंती प्रेग्नंट नव्हती ना?’’ हे ऐकून हिरेन उठला आणि तिथून आतल्या खोलीत निघून गेला.
रिया आणि पिंकी काहीच बोलल्या नाहीत. मग मात्र काकू कडाडल्या.
‘‘सांगा…. होती का ती प्रेग्नंट?’’ हा प्रश्न ऐकून घरातले सगळेच दचकले.
‘‘अहो आज्जी, तसं नाहीये काही. अशी कशी असेल ती प्रेग्नंट?’’
‘‘तुम्हा मुलींचं हल्ली काही सांगता येत नाही. सिगरेटी पिता, गाड्या चालवता, गणपतीत नाचता आणि दारूसुद्धा पिता…. काही काही जणी तर रोज लिपस्टिकही लावतात.’’
‘‘सिगारेट, दारू, गाड्या आणि लिपस्टिक यांमुळे कोणी प्रेग्नंट होत नाही.’’ पिंकी चिडून बोलली.
‘‘तू शिकव मला. मुली कशा प्रेग्नंट कशा होतात ते. आणि प्रेग्नंट म्हणाल्यावर तो घोडा का निघून गेला तरातरा आतमध्ये?’’ हा प्रश्न ऐकून घोडा परत आत आला आणि हताश होऊन म्हणाला, ‘‘आहो आज्जी, मला भयंकर ऑक्वर्ड झालं. हे असलं काही ऐकायची मला सवय नाहीये. मी लहान आहे अजून!’’ आता यावर शारदाकाकूंना काहीतरी खमंग बोलायचं होतं, पण तितक्यात बेल वाजली. हिरेननं स्वतःची सुटका करून घेण्यासाठी दाराकडे धाव घेतली आणि दार उघडलं. तर दारात दमयंती उभी होती. तिला बघताच सगळे जण चकित झाले आणि सगळ्यांना बघून ती चकित झाली. मग तिथे एकच गोंधळ झाला. तिच्यावर शेकडो प्रश्नांची सरबत्ती झाली. ती सर्वांना कोपरापासून नमस्कार करून फ्रेश व्हायला तिच्या रूममध्ये गेली. थोड्या वेळाने, ती आंघोळ करून आणि चेंज करून आली आणि तिने विचारलं, ‘‘अय्या, व्हॉट अ सरप्राईज ! तुम्ही सगळे काय करताय इथे?’’
मग वसंतरावांनी तिला सर्व काही सांगितलं. की तू कशी आम्हाला न सांगता निघून गेलीस… मग आम्हाला काय काय वाटलं ते अगदी पोलीस येऊन गेले वगैरे.
‘‘आणि आज्जीला वाटलं की तू प्रेग्नंट आहेस म्हणून पळून गेलीस.’’ हिरेननं सांगून टाकलं.
‘‘अगं आज्जी, प्रेग्नंट असते तर पळून कशाला गेले असते, चांगली तुझ्याकडेच आले असते की मुक्कामाला.’’ हे ऐकून आज्जी परत एकदा खवळली.
‘‘लग्नाआधी काही राहायचं नाहीये प्रेग्नंट-बिग्नंट. चांगली फोडून काढीन सटवे. बरं ते मरू देत. कुठे गेली होतीस तू?’’
मग दमयंतीने अगदी सहज सांगायला सुरुवात केली.
‘‘एक तर इथे एवढा काही राडा होईल, याची मला कल्पनाच नव्हती. माझा गेले २-३ आठवडे प्लॅन चालला होता. शेवटी मी ठरवलंच की जाऊन यायचं. आई, इथे पानशेतच्या पुढे आपण ट्रीपला गेलो होतो, दोन महिन्यांपूर्वी तुला आठवतंय का? काय गं पिंके, रिया, हिरेन… आपणच गेलो होतो की सगळे…’’
सगळ्यांनी माना डोलावल्या. सगळ्यांना लख्ख आठवलं.
‘‘तिथे त्या कातकर्यांतच्या झोपड्यात आपण जेवलो होतो… त्या वेळी आपलं बोलणं झालं की यांना आपण मदत करायची म्हणून. पण अनेकदा बोलून तुम्ही कोणी तिकडे यायचं नावच काढत नव्हतात. मग मी सरळ उठले. जुने-पाने कपडे भरले २ सूटकेसेसमध्ये आणि बाबा, कपाटातले साठ हजार रुपये घेतले. प्रत्येक झोपडीत तीन तीन हजार दिले, कपडे वाटले आणि निघून आले.’’
‘‘अगं, पण आम्हाला उठवून जायचं. सांगून जायचं.’’
‘‘तुम्हाला उठवलं असतं, तर तुम्ही जाऊ दिलं नसतं.’’
‘‘नंतर फोन तरी करायचा.’’
‘‘काल रात्रीपासूनच डिस्चार्ज होता.’’
‘‘पण आम्हाला इथे काळजी वाटली ना…’’
‘‘मला वाटलं होईल…. २-३ तासांत. पण वाटेत जाताना गाडी पंक्चर. तिथे एक दीड तास गेला…. येताना ते जेव म्हणाले. या सगळ्यात खूप वेळ गेला…!’’
‘‘पण मला एक सांग… एवढ्या मोठ्या सूटकेस तू टू व्हीलरवरून एकटीनं नेल्यास कशा?’’
‘‘ते सांगते नंतर!’’ दमू हसत हसत म्हणाली.
‘‘अगं पण दमू… ते साठ हजार रुपये…. इतकी महागाई झालीय आधीच…’’ वसंतराव म्हणाले.
‘‘तुम्ही त्या वेळी देऊ या त्यांना पैसे, असं म्हणाला होतात, आता शब्द बदलू नका!’’
‘‘आणि मघाशी तर पोलिसांना म्हणालात, कितीही खर्च येऊ दे म्हणून, आता का हो?’’
अनुपमाच्या या बोलण्याला सगळ्यांनी दुजोरा दिला… मग देवासमोर साखर ठेवली गेली. थोड्या वेळानं आख्खी बिल्डिंग दमूला भेटायला येऊन गेली. त्यात एक-दीड तास गेला. एकीकडे नातेवाईक आणि मित्रमंडळींचे फोन येतच होते. वसंतरावांनी पोलिसांनाही फोन करून कळवून टाकलं. थोड्या वेळानं सगळे निघून गेले. मग घरातलेच लोक उरले. आता संध्याकाळ झाली होती. सगळ्यांना भुकेची जाणीव झाली. शारदाकाकू म्हणाल्या, ‘‘मी आता स्वैपाकाचं बघते.’’
त्यावर मोठं मन करून वसंतराव म्हणाले, ‘‘काही नको आता स्वैपाक-बिपाक. आता आपण बाहेरच जेवायला जाऊ. सकाळपासून दमले आहेत सगळेच.’’
या वाक्यानं घरात उत्साहाची एकच लाट पसरली आणि सगळेजण आवरायला लागले. बाहेर निघताना, वसंतराव बायकोला म्हणाले, ‘‘येताना मला ती दोरी आणायची आठवण कर. नाहीतर उद्याचा व्यायामसुद्धा बुडायचा.’’ ते ऐकून दमयंती हसत म्हणाली, ‘‘डोंट वरी बाबा, दोरी आहे सुखरूप. मीच नेली होती ती.’’
‘‘कशाला?’’
‘‘आपली ती काळी सुटकेस कपड्यांनी इतकी भरली होती, की तिचं झाकण लागेना. शेवटी वरून तुमची ती दोरी बांधली आणि तिची उरलेली टोकं मागच्या स्टील रॉडला बांधून टाकली!’’
एवढं बोलेपर्यंत ते पार्किंगमध्ये आले. गाडीला ती दोरी तशीच बांधलेली होती.
‘‘घ्या तुमची दोरी… सकाळी माझा जीव यांनी अगदी भंडावून सोडला होता.’’ मग अनुपमानं सर्वांना ते संपूर्ण नाडीपुराण ऐकवलं. ते ऐकून चौघंही हसू लागले. नंतर अनुपमा अभावितपणे बोलून गेली, ‘‘सुटले मी एकदाची…. आणि सुटली माझी परकराची नाडी!’’

मिलिंद शिंत्रे, पुणे
screenandplay@yahoo.co.in

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.