Now Reading
मी एक प्रमुख पाहुणा!

मी एक प्रमुख पाहुणा!

Menaka Prakashan

रिक्षामध्ये बसल्यानंतर आणि रिक्षा सुरू झाल्यानंतर सहज माझं माझ्या कपड्यांकडे माझं लक्ष गेलं आणि मी सर्दच झालो. सगळे कपडे मातीने माखले होते. तो दगड उचलून रिक्षापर्यंत आणतांना कपड्यांचा बेरंग झाला होता. हातांनी थोडं झटकण्याचा प्रयत्न केला पण मातीचे ‘हट्टी डाग’ जसेच्या तसेच होते.

माझा मित्र दिवाकर देशपांडे याचा मला एक दिवस सकाळी सकाळीच फोन आला, ‘‘हॅलो, नमस्कार हो मातकर साहेब.’’
‘‘नमस्कार दिवाकरराव, बोला. अगदी ‘अहो, जा हो’ने सुरवात केलीस. बरं ते जाऊ दे. आज कशी काय सकाळी सकाळीच आठवण? काही विशेष?’’ मी विचारलं.
‘‘हो, विशेषच आहे. तुला एक आनंदाची बातमी सांगायचीय. नव्हे, नव्हे, तुला एक आमंत्रणच द्यायचंय.’’ तो म्हणाला; आणि त्यानंतर त्याने फोनवर जे काही सांगितले ते ऐकून मी तर खूपच खूष झालो.
तो सांगत होता, ‘‘तुला तर माहीत आहेच की, औरंगाबादपासून पस्तीस किलोमीटरवर माझं जन्मगाव सावंगी आहे. अधूनमधून मी सावंगीला जात असतो.’’
‘‘हो, कल्पना आहे मला.’’ मी म्हणालो.
‘‘तर सावंगीला पुढच्या आठवड्यात एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाचा तू प्रमुख पाहुणा आहेस. तसं सर्वानुमते ठरलं आहे. मी तुला हे निमंत्रण देत आहे.’’
‘‘अरे वा! हे तर छानच झालं. पण कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे, हे सांगशील की नाही?’’ मी विचारलं.

‘‘अरे, हो रे, तेच तर सांगतोय. ऐक.’’ दिवाकर सांगू लागला, ‘‘आमच्या गावामध्ये एक हायस्कूल आहे. तसंच एक ज्युनिअर कॉलेजही आहे. या वर्षी जे विद्यार्थी चांगल्या गुणांनी दहावी आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले, अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गावातल्या एका स्वयंसेवी संस्थेनं आयोजित केला आहे. त्याचप्रमाणे गावातल्या काही कर्तृत्ववान तरुणांचा सत्कार करण्याचंही ठरलं आहे आणि या सत्कार समारंभाचा प्रमुख पाहुणा म्हणून तुला बोलावण्याचं ठरलं आहे. तुझ्या साहित्यसेवेबद्दल तिथे मी सर्वांना अगोदरच माहिती सांगितलेली होती. त्या वेळी त्या सर्वांना तुझ्या साहित्यसेवेबद्दल ऐकून खूपच छान वाटलं होतं आणि त्यांनी तुला भेटण्याची, तुझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो योग या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता येत आहे. त्यामुळेच तुला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावण्याचं सर्वानुमते ठरवण्यात आलं आहे. येशील ना तू? कार्यक्रमाचं रीतसर लेखी निमंत्रण नंतर येईलच. तुझ्याकडून कन्फर्मेशन घेण्यासाठी अगोदर फोन केलाय.’’
‘‘नक्की येईन. माझा होकार समज. पण कार्यक्रम नेमका कधी आहे?’’ मी विचारलं.
‘‘पुढच्या रविवारी सकाळी अकरा वाजता.’’
‘‘अन् तिथे जाण्याची काय व्यवस्था आहे? तू असशील ना माझ्या सोबत? कारण तुझं गाव थोडं आडबाजूला आहे, म्हणून विचारतोय.’’
‘‘तेही सांगतो. माझ्या गावातला कार्यक्रम आहे म्हणून मी पूर्वतयारीसाठी शनिवारीच मुक्कामाला तिथे जाईन. माझ्या ओळखीचा एक रिक्षावाला आहे. त्याचं नाव बबन. त्याला मी सर्व सांगितलंय. तो रविवारी सकाळी दहाच्या सुमारास तुला न्यायला येईल. त्याचा मोबाईल नंबर तुला मेसेज करतो.’’ दिवाकरने सांगितलं.
‘‘म्हणजे? मी त्या कार्यक्रमाला रिक्षाने यायचंय?’’

‘‘हो, बबन माझ्या चांगला परिचयाचा आहे, सज्जन आहे. आणि रिक्षा स्पेशल केवळ तुझ्या एकट्यासाठीच आहे. चुकूनही त्या रिक्षावाल्याला ‘किती पैसे झाले?’ असं विचारू नकोस किंवा रिक्षातून उतरल्यावर पैसे देण्याचा प्रयत्न करू नकोस. त्याला मी अगोदरच पैसे देऊन टाकणार आहे. इथून निघाल्यावर साधारणपणे एक तासात तू तिथे सावंगीला पोचशील; आणि छोट्या गावातला कार्यक्रम म्हणजे अकराचे-साडेअकरा होतीलच. त्याची चिंता तू करू नकोस. दुसरं म्हणजे तुला प्रमुख पाहुणा या नात्यानं विद्यार्थ्यांसमोर आणि ग्रामस्थांसमोर प्रसंगाला अनुरूप असं बोलावं लागेल. तशा तयारीनं ये म्हणजे झालं. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी जेवणाची व्यवस्थाही तिथेच आहे. ठेवू का फोन आता? पुढच्या शनिवारी पुन्हा आठवणीसाठी फोन करेनच. ओके.’’ असं म्हणून दिवाकरनं फोन ठेवला.
माझा आनंद तर गगनात मावत नव्हता. माझी फार दिवसांची एक इच्छा पूर्ण होणार होती. कारण मागच्या अनेक वर्षांपासून माझ्या कथा, कविता, बालकथा, चारोळ्या वेगवेगळ्या मासिकांतून, नियतकालिकांतून अन् महाराष्ट्रातील दर्जेदार दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध होत होत्या. दिवाळीच्या दोन-तीन महिने अगोदर न चुकता संपादक मंडळींची आगामी दिवाळी अंकातल्या लिखाणासाठी आठवण करून देणारी पत्रंही येत. शिवाय माझं साहित्य आवडल्याबद्दल मला वाचकांची पत्रं येतात, फोनही येतात. माझ्या कथांना, कवितांना, स्पर्धांमधून पुरस्कारही मिळालेले आहेत. थोडक्यात काय, तर महाराष्ट्रातल्या साहित्यक्षेत्रामध्ये स्वत:चा एक वेगळा ठसा मी उमटवला आहे, असं म्हणण्यास हरकत नाही. स्वत:विषयी आणि स्वत:च्या लिखाणाविषयी अशी जाणीव जेव्हा मला होऊ लागली, तेव्हा माझ्या मनामध्ये एक विचार वारंवार उसळी मारू लागला. तो म्हणजे, एखाद्या छोट्याशा का होईना पण कार्यक्रमाचं अध्यक्षपद किंवा प्रमुख पाहुणेपद आपल्याला मिळायला हवं. मग भलेही ते छोटंसं कविसंमेलन असेल, स्थानिक पातळीवरचं साहित्य संमेलन असेल किंवा एखादा तत्सम सांस्कृतिक कार्यक्रम असेल. वरचेवर हा विचार माझ्या मनामध्ये जास्तच जोर धरू लागला; आणि तो जसजसा जोर धरू लागला तसतसा मी अस्वस्थ होऊ लागलो. म्हणतात ना की, एखाद्या गोष्टीची तीव्रतेने इच्छा व्यक्त केली की ती इच्छा लवकरच पूर्ण होते. माझंही तसंच झालं. खरोखरच मला हवी तशी संधी आज चालून आली होती. लगेचच ही आनंदाची बातमी मी सौ.ला सांगितली. तिलाही खूप आनंद झाला. पुढच्या रविवारी त्या कार्यक्रमात काय बोलायचं याची तयारी आतापासूनच करायला हवी, असं मनाशी म्हणत मी पुढच्या कामाला लागलो.
***

ठरल्याप्रमाणे आठवणीसाठी म्हणून शनिवारी दुपारी दिवाकरचा फोन आला आणि रविवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास बबन रिक्षा घेऊन माझ्या दारी उपस्थित झाला.
‘‘चला साहेब.’’ बबन म्हणाला.
‘‘बबनराव, आत या ना. चहा घेऊ.’’
‘‘नको, नको. उशीर होईल. रस्त्यात कुठेतरी टपरीवर चहा घेऊ. चला लवकर.’’ तो म्हणाला.
खास ठेवणीतले कपडे घालून मीसुद्धा जाण्यासाठी तयारच होतो. घरातल्या देवाच्या फोटोसमोर हात जोडून, सौ.चा निरोप घेऊन मी रिक्षात बसलो. ‘रिक्षामध्ये बसताना आधी उजवा पाय रिक्षात ठेवा’, हे कालपासून शंभर वेळा तरी मला सौ.ने बजावलं होतं. त्यामुळे उजवा पाय अगोदर रिक्षात ठेवूनच मी रिक्षामध्ये बसलो. कार्यक्रमाच्या निमित्तानं काय बोलायचं, याची मी कालपासून मनातल्या मनात उजळणी केलेलीच होती. तरीही रिक्षामध्ये बसल्यानंतर पुन्हा एकदा मी ते सर्व पुन्हा पुन्हा आठवून पक्कं करू लागलो. बबनसुद्धा अधूनमधून माझ्याशी जुजबी गप्पा मारत होता. तो स्वभावानं मोकळा वाटला. साधारणपणे अर्ध्या तासानंतर मोठा रस्ता सोडून आडवळणाने खडबडीत रस्त्यावरून आमची रिक्षा निघाली, तेव्हा जवळच एक चहाची टपरी पाहून बबननं रिक्षा थांबवली. आजूबाजूला रस्त्याच्या कडेनं काही लोक थांबलेले होते. बहुधा इच्छित स्थळी जाण्यासाठी एखादं वाहन मिळतं का, याची ते वाट पाहत असतील, हे मी ताडलं.
‘‘चला साहेब, इथे चहा चांगला मिळतो. इथून पुढचा रस्ताही थोडा खराब आहे. त्यामुळे खराब रस्त्यावरून गाडी चालवायला एनर्जी नको का?’’ असं म्हणून बबन हसू लागला.

आमच्यासाठी टपरीवाल्यानं स्पेशल चहा बनवून दिला. चहा घेतल्यानंतर मी चहावाल्याला पैसे दिले आणि आम्ही दोघं रिक्षाजवळ आलो. पाहतो तर काय, चार-पाच लोक रिक्षामध्ये जाऊन बसले होते. कुणी सावंगीला जायचं म्हणत होतं, तर कुणाला सावंगीच्या अलीकडे निमगावला उतरायचं होतं. बबननं त्या सर्वांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ‘पण आम्ही पैसे देतो ना, फुकट थोडीच न्या म्हणतोय?’ असं म्हणून दोघं-तिघं हमरीतुमरीवर आले. शेवटी बबननं त्या सर्वांची समजूत काढून महत्प्रयासानं त्या सर्वांना खाली उतरवलं. मग पुढच्या खडबडीत रस्त्यावरून आमचा प्रवास सुरू झाला. थोडा वेळ गेला आणि बबनने रिक्षा थांबवली. एका निर्मनुष्य जागेवर आमची रिक्षा थांबली होती. आजूबाजूला अगदी शुकशुकाट होता. दूरपर्यंत कुणाची चाहूल नव्हती.

‘‘काय झालं बबनराव? काही प्रॉब्लेम?’’ मी विचारलं.
‘‘खाली उतरा साहेब. आहे थोडा प्रॉब्लेम. पुढचं चाक पंक्चर झालंय.’’ बबन म्हणाला.
मी हातातल्या घड्याळात बघितलं. दहा वाजून पन्नास मिनिटं झाली होती.
‘‘आता काय करायचं?’’
‘‘अजिबात चिंता करू नका साहेब. आपल्याकडे स्टेपनी आहे. दहा मिनिटांत चाक बदलतो.’’ असं म्हणत तो कामाला लागला.
म्हणजे सावंगीला पोचेपर्यंत साडेअकरा होणार, असा मी अंदाज बांधला.
‘‘साहेब, तुम्हाला थोडा त्रास घ्यावा लागणार.’’
‘‘बोला, बोला, बबनराव, एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ.’’ असं म्हणून मी त्याच्या मदतीला गेलो.
‘‘काही नाही. मी जॅक घरी विसरलो. तो तिकडे मोठ्ठा दगड दिसतो ना, तो घेऊन या; आणि मी जसं पुढचं चाक बाजूला करीन तसा तो दगड समोर त्या चाकाऐवजी लावून द्या. आता तोच आपला जॅक.’’

तो तिथला दगड पाहून माझ्या पोटात तर गोळाच उठला. एकदम माझ्या तोंडातून उद्गार बाहेर पडले, ‘‘अरे बापरे! पण घरी इंग्रजी माध्यमातल्या आपल्या तिसरीतल्या चिरंजीवाचे अवजड दप्तर उचलून त्याच्या पाठीला अडकवायची आपली सवय इथे नक्की कामास येणार, हा विचार मनात आला आणि मला हायसं वाटलं. मग मनामध्ये एकदा बजरंगबलीचं नाव घेतलं आणि तो अवजड दगड ढकलत आणण्याचा आधी प्रयत्न केला. पण ते काही जमत नाही हे पाहून मोठ्या कष्टानं तो दगड दोन्ही हातांनी जोर लावून उचलला आणि रिक्षासमोर आणून पटकला.

‘‘वा! वा! जमलं.’’ बबन माझ्याकडे पाहत कौतुकानं म्हणाला.
‘‘आता असं करा, मी हे पुढचं चाक मोकळं केलं आहे. ते आता अलगद रिक्षाच्या खालून काढतो. तुम्हाला तो दगड रिक्षाखाली घालायला जमेल असं वाटत नाही. मी जसं हे पुढचं चाक बाजूला करीन, तसं तुम्ही पुढे येऊन हा रिक्षाचा पुढचा भाग ताकद लावून दोन्ही हातांनी तोलून धरा. मी लगेच दगड खाली सरकवतो.’’ बबन सांगू लागला.
मी ‘बरं’ म्हटलं. ‘नाही जमणार’ असं म्हणावंसं वाटलं. पण माझे शब्द मी आतल्या आत गिळले. कारण ‘अडला हरी…’
मग ती पुढची सगळी सर्कस पार पडल्यानंतर मी ‘हुश्श’ म्हणत आम्ही दोघंही रिक्षामध्ये बसलो.
‘‘मी जॅक घरी विसरल्यामुळे तुम्हाला त्रास झाला साहेब. सॉरी.’’ बबन म्हणाला.
‘‘होतं असं कधी कधी. जाऊ द्या.’’ मी म्हटलं.

रिक्षामध्ये बसल्यानंतर आणि रिक्षा सुरू झाल्यानंतर सहज माझं माझ्या कपड्यांकडे माझं लक्ष गेलं आणि मी सर्दच झालो. सगळे कपडे मातीने माखले होते. तो दगड उचलून रिक्षापर्यंत आणतांना कपड्यांचा बेरंग झाला होता. हातांनी थोडं झटकण्याचा प्रयत्न केला पण मातीचे ‘हट्टी डाग’ जसेच्या तसेच होते.
कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचायला आता उशीर होणार आणि आपल्यामुळे कार्यक्रम उशिरा सुरू होणार अशी एक अपराधी भावनाही माझ्या मनामध्ये उचल खाऊ लागली.
एकदाची आमची रिक्षा कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन पोचली तेव्हा पावणेबारा वाजले होते.
दिवाकरनं आम्हाला पाहिलं आणि तो पटकन पुढे आला. त्यानं माझं हसतमुखानं स्वागत केलं.
‘‘प्रवासात त्रास नाही झाला ना?’’ दिवाकरनं विचारलं.
‘‘अजिबात नाही.’’ मी माझ्या कपड्यांकडे पाहत सांगितलं. त्याचं बहुधा माझ्या कपड्यांकडे लक्ष गेलं नसावं.
‘‘मला उशीर नाही ना झाला?’’ मी दिवाकरला विचारलं.
‘‘अजिबात नाही. कारण इथले सरपंच परगावी गेलेत. ते दोन वाजेपर्यंत येतील. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन आहे.’’
‘‘असं होय. मला वाटलं मलाच उशीर झाला की काय?’’
तिथल्या शाळेसमोरच्या पटांगणावर कार्यक्रमाची व्यवस्था केलेली दिसत होती. वर कापडी मंडप होता आणि कार्यक्रमास येणार्‍या लोकांना आणि शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी खाली जमिनीवर एक मोठी सतरंजी अंथरलेली होती. त्या सतरंजीवरून लोक बिनदिक्कतपणे पायातल्या चपला आणि बूट न काढता इकडून तिकडे फिरत होते. माईकची व्यवस्था मात्र दिसत नव्हती.

मी बसण्यासाठी खुर्ची पाहू लागलो. पण त्या ठिकाणी एकही खुर्ची नव्हती. माझी अडचण बहुतेक दिवाकरच्या लक्षात आली असावी. तो म्हणाला, ‘‘शाळेच्या किल्ल्या, शाळेच्या शिपायाकडे आहेत. तो जवळच्याच गावाहून जाणं-येणं करतो. त्याला आज लवकर यायला सांगितलं होतं, पण अद्याप आला नाही. इतक्यात येईलच तो. तो आला की, शाळेमधून चार-पाच खुर्च्या आणि दोन टेबल बाहेर घेऊन मुलांकडून तिथे त्या कोपर्‍यात मांडून घेऊ म्हणजे झालं व्यासपीठ तयार! तोपर्यंत असा इकडे ये. इथेच खाली सतरंजीवर बसू मोकळेढाकळे.’’ असं म्हणून त्यानं खालीच बसकण मारली.
मग मीही अनिच्छेनं खालीच त्याच्याजवळ बसलो. कपडे खराब होण्याचा प्रश्नच नव्हता! ते आधीच खराब झालेले होते.
तितक्यात एक मुलगा अंगठ्याएवढ्या ‘यूज अँड थ्रो’ कपांमधून चहा घेऊन आला. रंगानं आणि चवीनं तो चहा निव्वळ गुळवणीसारखाच होता. दिवाकर सराईतपणे तो चहा प्यायला. पण मी मात्र कसाबसा घशाखाली उतरवला.

‘मी पुढची तयारी बघतो’ असं म्हणून दिवाकर तिथून उठला. थोड्या वेळेनंतर शिपाईमहाशय आले. दोन टेबल आणि चार खुर्च्या मुलांच्या मदतीनं त्या शिपायानं एका कोपर्‍यात मांडल्या. त्यावर एक टेबलक्लॉथ टाकून आजच्या कार्यक्रमाचं व्यासपीठ तयार केलं आणि तो शिपाई अदृश्य झाला. हळूच मी व्यासपीठावरची एक खुर्ची बाजूला घेतली आणि त्या खुर्चीवर बसून राहिलो. माझं अर्धं लक्ष घड्याळाकडे आणि अर्धं लक्ष सरपंचांच्या वाटेकडे होतं.
दोन वाजून गेले तरी सरपंचांचा पत्ता नव्हता. मंडपामध्ये बर्‍यापैकी मंडळी जमली होती. त्यांची चुळबूळही सुरू होती. एव्हाना माझ्या पोटात कावळ्यांनी भरतनाट्यम् सुरू केलं होतं. कार्यक्रमाच्या स्थळाच्या अगदी जवळच स्वयंपाक चाललेला होता. तिथल्या भाज्यांच्या फोडणीच्या वासामुळे माझी भूक जास्तच चाळवली. तितक्यात कुणीतरी बोललं, ‘‘आले, आले सरपंचसाहेब आले.’’ सर्वजण एकदम उठून उभे राहिले. मीही उभा राहिलो.
सरपंच आले आणि थेट व्यासपीठावरच्या खुर्चीत जाऊन बसले. झकपक कपडे घातलेले एक गृहस्थ त्या व्यासपीठाच्या बाजूला येऊन उभे राहिले. बहुतेक ते गृहस्थ म्हणजे त्या शाळेतले एखादे गुरुजी असावेत असा मी अंदाज बांधला.

‘‘आपल्या गावचे सर्वांचे लाडके सरपंच श्री. यादवसाहेब आलेले आहेत. आता त्वरित कार्यक्रमास सुरुवात होईल. तरी सर्वांनी शांत बसावे.’’ ते गुरुजी बोलू लागले, ‘‘सरपंच साहेब व्यासपीठावर येऊन बसलेलेच आहेत. तरी एक औपचारिकता म्हणून त्यांना मी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नामांकित साहित्यिक श्री. मातकरसाहेब यांना मी विनंती करतो की, त्यांनी व्यासपीठावर येऊन आसन ग्रहण करावं. ज्या संस्थेतर्फे आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या ‘जय हनुमान सेवाभावी संस्थे’चे चेअरमन श्री. लांडगे आणि सचिव श्री. कोळेकर यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो.’’
***

अशा प्रकारे सर्व पाहुणे व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यानंतर संस्थेचे सचिव श्री. कोळेकर यांनी प्रास्ताविक केलं. त्यांचं प्रास्ताविक संपतं न संपतं तोच सरपंच उभे राहिले आणि म्हणाले, ‘‘मित्रांनो, मला दुसर्‍या एका ठिकाणी ताबडतोब जाणं भाग आहे म्हणून तुम्हा सर्वांची क्षमा मागून मी थोडा अपवाद करतो आणि अध्यक्षीय समारोप उरकतो.’’

असं म्हणून त्यांनी जे भाषण सुरू केलं ते एका तासानंतरच थांबलं आणि त्वरित ते तिथून निघून गेले. सरपंचांची पाठ वळताच मंडपातील अर्धे अधिक लोक उठून शेजारीच असलेल्या भोजनव्यवस्थेपाशी जाऊन रांगा लावून उभे राहिले. शेवटी तर फक्त ज्यांचा सत्कार होणार होता तेवढेच मोजके सात-आठ विद्यार्थी आणि दोन-तीन कर्तृत्ववान युवकच मंडपात अगतिकतेनं बसलेले दिसले. सर्वांनाच भूक लागल्यामुळे असेल कदाचित माझ्या हस्ते त्या सर्व गुणवंतांचा सत्कार अवघ्या पाच मिनिटांत संपन्न झाला. लगोलग ते सूत्रसंचालन करणारे गुरुजी उठले आणि सर्व उपस्थितांचे आभार मानून मोकळे झाले. ‘‘त्याचप्रमाणे आज आपल्या या कार्यक्रमासाठी मुद्दाम औरंगाबादहून आलेले नामांकित साहित्यिक श्री. मातकरसाहेब यांचेदेखील मी आभार मानतो’’ असं शेवटी त्यांनी सांगितलं आणि सर्व उपस्थितांना ‘भोजन केल्याशिवाय कुणी जाऊ नये’ अशी आग्रहाची विनंती केली. त्यामुळे पडत्या फळाची आज्ञा घेऊन सर्वांनी दोन मिनिटांमध्ये मंडप रिकामा केला आणि भोजनस्थळी गर्दी केली.

मी एकटाच व्यासपीठावर उरलो. तिथल्याच एका खुर्चीत बसून मी माझ्या खिशातला, माझ्या न झालेल्या भाषणाचा कागद, कुणालाही दिसणार नाही अशा पद्धतीनं चुरगळून त्या टेबलाच्या खाली फेकून दिला आणि भोजनस्थळी जायला निघालो.

– उद्धव भयवाल

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.