Now Reading
महाचर्चा

महाचर्चा

Menaka Prakashan

‘‘आपण प्रकरण मिटवायचं नाही, त्यांचं ते प्रकरण मिटवतील. आपण फक्त ‘हे असं का झालं?’ याच्यावर गावात महाचर्चा करायची. गावातल्या नव्या सुनेवर अत्याचार का होतात, त्याचे दुष्परिणाम काय होतील, असे अत्याचार थांबवण्यासाठी काय काय उपाययोजना केली पाहिजे, यावर आपण चर्चा केली पाहिजे.’’ गोपीनाथ आपल्या पत्रकारितेच्या भाषेत बोलत होता.

दुपारची एक-दीड वाजण्याची वेळ.
झेड पी सदस्य रामभाऊ कदमांच्या निधीतून उभारलेल्या बसशेडमध्ये उभा असलेला गोपीनाथ आत्ताच निघून गेलेल्या बसकडे पाठमोरा पाहत चिंतातूर नजरेनं विचार करत होता. तो भलताच अस्वस्थ वाटत होता. तोंडाने ‘चॅक चॅक’ आवाज करत हळहळ व्यक्त करत होता.
गोपीनाथला खरोखर फार दुःख झालं होतं. दुःख वाटावं अशीच घटना त्याने डोळ्यानं पाहिली होती. ही काही ऐकीव घटना नव्हती. कुणी सांगितलं असतं तर त्याने विश्‍वास ठेवला नसता. पण ही घटना त्याने स्वतःच्या डोळ्यानं पाहिली होती, अगदी पाच फुटांच्या अंतरावरून!
घटना साधीच होती पण गोपीनाथचं हृदय हेलावून जायला पुरेशी होती. मघाशी मित्रांबरोबर गप्पा मारत उभ्या असलेल्या गोपीनाथने पाहिलं की, महिन्यापूर्वीच लग्न होऊन गावात आलेली रमेशची बायको डोळ्याला पदर लावून रडत, हुमसत आपल्या वडिलांबरोबर बसस्टॉपवर आली. तिच्या हातात कपड्यांची बॅग होती. तिच्या वडिलांच्या हातातही बॅग होती.

उघड होतं की, रमेशची बायको रडत रडत माहेरी निघाली होती. तिला रडताना पाहिलं अन् गोपीनाथला धसका बसला. महिन्यापूर्वीच तर लग्न होऊन सुनीता वहिनी आपल्या गावात आल्या होत्या. लगेच त्या डोळ्याला पदर लावून माहेरी निघाल्या म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड दिसतेय. रमेशचं आपल्या बायकोबरोबर पटत नसणार किंवा सुनीता वहिनींना सासुरवास होत असणार म्हणूनच तिचे वडील येऊन तिला माहेरी घेऊन चाललेत.
खरं म्हणजे, काय झालं हे विचारण्याची गोपीनाथला मनापासून इच्छा झाली होती. पण तेवढ्यात काळेवाडीहून येणारी आणि तालुक्याला जाणारी बस आली आणि दोघंही पटकन बसमध्ये शिरून निघून गेले. तिला काही विचारण्याची संधी गोपीनाथला मिळालीच नाही.
बस निघून गेल्यावर गोपीनाथ भावश्याला म्हणाला, ‘‘काय झालं रं भावश्या?’’
‘‘कुठं काय?’’
‘‘अरे सुनीता वहिनींबद्दल बोलतोय मी.’’
‘‘आत्ता गाडीत बसून गेली ती?’’
‘‘हो.’’
‘‘तिचं काय?’’
‘‘ती रडत का गेली?’’
‘‘ती कुठं रडत गेली?’’ भावश्याने विचारलं.
‘‘अरे, तू पाहिलं नाय का? चांगली पदराने डोळे पुसत गेली ती.’’
‘‘कुणास ठाऊक? मी नाही पाहिलं तिच्याकडे.’’
मग मात्र गोपीनाथ चिडला. म्हणाला, ‘‘हेच चुकतं रे तुम्हा लोकांचं. तुम्हाला अजिबात सामाजिक जाणीव नाही. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, हे लक्षात ठेव. ती सुनीता वहिनी नुकतंच लग्न होऊन आपल्या गावात आलीय. ती का रडतीय, तिच्यावर कोणतं संकट आलंय, याची विचारपूस करायला नको?’’
‘‘मग तू का नाही विचारपूस केली?’’ भावश्या म्हणाला.
‘‘ती लगेच निघून गेली रे. पण मी गप्प बसणार नाही. मी या प्रकरणाचा छडा लावणारच. याच्यावर गावात महाचर्चा घडवून आणणार.’’ गोपीनाथ म्हणाला अन् तडक तिथून बाहेर पडला.
बाहेर सरत्या ज्येष्ठाचं ऊन पडलं होतं. आषाढ निघाला तरी अजून पावसाचा पत्ता नव्हता. गोपीनाथ तसाच तरातरा चालत सरपंच तात्यांच्या भेटीला निघाला.
खरं म्हणजे गावोगाव अन् सालोसाल दिसणारं हे दृष्य. गोपीनाथनं एवढं हळवं व्हायचं काही कारण नव्हतं.
पण गोपीनाथचं रक्त सामाजिक कार्यकर्त्याचं रक्त होतं. तो थंडपणे सगळं पाहत बसणारा माणूस नव्हता. त्यातून त्याला टीव्हीवरच्या महाचर्चेनं झपाटून टाकलं होतं.
तुम्हालाही या गोपीनाथची थोडी ओळख सांगायलाच हवी.

बी.ए. झाल्यावर गोपीनाथ सुरुवातीला पत्रकारितेचं काम करत होता. तालुक्याहून प्रसिद्ध होणार्‍या ‘सिंहगड वार्ता’चा तो हाडाचा पत्रकार होता. खरं म्हणजे, एवढ्यावर न थांबता त्याला कोणत्या तरी टीव्ही चॅनेलचा पत्रकार व्हायचं होतं, पण नाही जमलं. मात्र टीव्हीवर चालणार्‍या महाचर्चा तो आवर्जून पाहत होता. कोणत्याही विषयावर तज्ज्ञ मंडळी एकत्र जमवून त्या विषयावर सांगोपांग चर्चा करताना त्याने पाहिलं होतं. त्यामुळे महाचर्चा या एकाच विषयाने गोपीनाथ भारावून गेला होता. गोपीनाथला आपल्या गावात अशा अनेक समस्या दिसत होत्या आणि आपणही आपल्या गावात अशी महाचर्चा घडवून आणावी, असं त्याला सारखं वाटत होतं.
टीव्हीवर महिलांवर होणार्‍या अत्याचाराची महाचर्चा पाहून त्याला वाटायचं की आपल्या गावातही महिलांवर अत्याचार होतोय. याच्यावर महाचर्चा झाली पाहिजे. जो भेटेल त्याला गोपीनाथ म्हणायचा, ‘याच्यावर गावात महाचर्चा झाली पाहिजे.’ गावात दोन दिवस नळाला पाणी आलं नाही की तो म्हणायचा, ‘याच्यावर गावात महाचर्चा झाली पाहिजे.’ कुणाच्या शेतात चोरी झाली की तो म्हणायचा, ‘महाचर्चेनेच यावर उपाय निघू शकतो.’

एकूण काय, तर महाचर्चेच्या वेडानं झपाटून निघालेल्या गोपीनाथला आज चांगलाच विषय सापडला होता. नुकतीच लग्न होऊन गावात आलेली सुनीता वहिनी अत्याचार झाल्यामुळे रडत रडत गावातून निघून गेली होती. प्रकरण साधंसुधं नव्हतं. महिला अत्याचाराचं प्रकरण होतं. शिवाय गावच्या इज्जतीचाही प्रश्‍न होता. यावर गावात महाचर्चा झालीच पाहिजे, असा मनाशी ठाम निश्चय करत गोपीनाथ सरपंच तात्यांच्या घराकडे झपाट्यानं निघाला होता.
गोपीनाथ सरपंचाच्या घरी आला तेव्हा नुकतंच दुपारचं जेवण उरकून तोंडात बडीशेप चघळत सरपंच उघड्या अंगाने खुर्चीत आराम करत बसले होते.
नुकताच सरपंचांनी नवा बंगला बांधला होता. बंगल्यापुढं ऐसपैस चौथरा होता. नव्या जमान्यातली फरशी चौथर्‍यावर बसवली होती. तिथं आरामखुर्ची टाकून सरपंचांनी नुकतीच कुठं आरामाला सुरुवात केली होती. तेवढ्यात तरातरा चालत तिथं गोपीनाथ आला.
त्याला लगबगीनं येताना पाहिल्यावर सरपंचांनी विचारलं, ‘‘काय रे गोपीनाथ? लै तरातरा येणं केलं?’’
गोपीनाथ तोवर चौथर्‍याच्या पायर्‍या चढून वर आला अन् म्हणाला, ‘‘तात्या वाईट झालं हो.’’
‘‘का रे? काय झालं?’’ आता सरपंच तात्या थोडंसं घाबरून जात म्हणाले.
‘‘काय होणार? आपलं नेहमीचंच… आता मात्र याच्यावर गावात महाचर्चा झाली पाहिजे.’’ गोपीनाथ मूळ मुद्द्यावर आला.
आल्या आल्या त्याने महाचर्चेचा विषय काढला, तसे सरपंच तात्या थोडे सुस्तावले. ज्या अर्थी गोपीनाथनं महाचर्चेचा विषय काढला त्या अर्थी प्रकरण फारसं गंभीर नाही, हे तात्यांनी ओळखलं. ते गोपीनाथला म्हणाले, ‘‘बैस… आधी बसून घे तू.’’ सरपंच शेजारच्या खुर्चीकडे बोट करत म्हणाले. गोपीनाथ निवांतपणी खुर्चीत बसला.
‘‘हं काय झालं, जरा सविस्तर सांग.’’
‘‘तात्या हे बरोबर नाही. आपल्या गावात महिलांवर नेहमीच अत्याचार घडतात. मी तुम्हाला पत्रकार या नात्यानं आजपर्यंत कितीतरी वेळा यावर बोललो होतो. पण तुम्ही तिकडे लक्ष दिलं नाही. आता मात्र मी तुमचं काही ऐकणार नाही. आता यावर गावात महाचर्चा झाली पाहिजे.’’ गोपीनाथ दम न खाता म्हणाला.
‘‘अरे पण झालं काय, ते तरी सांगशील का?’’
‘‘प्रपंच करणार्‍या महिलांचं एक ठीक आहे. तिथं भांड्याला भांडं लागणारच. पण नुकतंच लग्न होऊन आपल्या गावात आलेल्या महिलेवर अन्याय होणं बरोबर आहे का तात्या?’’
‘‘आता कुणावर अन्याय झालाय?’’ सरपंचांनी विचारलं.
‘‘मागच्या महिन्यात त्या रमेश गाढवेचं लग्न झालं. अजून महिना पण झाला नाय तात्या अन् लगेच त्याची बायकू आज रडत माहेरी निघून गेली. हा अत्याचार नाय तं काय हाये तात्या?’’
मग गोपीनाथने जे घडलं ते सरपंचांना थोडक्यात सांगितलं.

आता सरपंच तात्यासुद्धा थोडेसे बुचकळ्यात पडले. मग ते गोपीनाथला म्हणाले, ‘‘जाऊ दे ना. गोपीनाथ नको तिकडे लक्ष देऊ. हा त्यांचा घरगुती मामला आहे.’’
‘‘असं कसं जाऊ दे तात्या? हा प्रश्‍न तुम्हाला अन् मला दुर्लक्षित करता येणार नाही. तुम्ही या गावचे सरपंच आहे आणि मी पत्रकार आहे. आपल्याला दोघांनाही सामाजिक भान राखलं पाहिजे. शिवाय आपल्या गावच्या अब्रूचाही प्रश्‍न आहे. आपणच जर अंग काढून घेतलं तर बाहेर आपल्या गावाला काही किंमत राहील का? अन् नव्या सुनेवर असे सारखे सारखे अत्याचार होऊ लागले तर आपल्या गावातल्या पोराशी कुणी पोरीचं लग्न लावून देईल का?’’ गोपीनाथने असं काही वक्तव्य केलं की, सरपंच तात्यांची बोलतीच बंद झाली.
त्यांना गोपीनाथच्या बोलण्याची दखल घ्यावीच लागली. ते तोंडातल्या तोंडात पुटपुटले, ‘‘तू म्हणतोस ते बी बरोबर हाये. हे प्रकरण आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाय.’’
‘‘मग? मी तेच म्हणतोय.’’ गोपीनाथ उत्साहानं म्हणाला.
‘‘मग? आता चार लोकं जमवून त्यांचं प्रकरण मिटवायचं म्हणतोस का?’’
‘‘नाही. आपण असं काही करायचं नाही. त्यांचं ते प्रकरण मिटवतील. आपण फक्त ‘हे असं का झालं?’ याच्यावर गावात महाचर्चा करायची. गावातल्या नव्या सुनेवर अत्याचार का होतात, त्याचे दुष्परिणाम काय होतील, असे अत्याचार थांबवण्यासाठी काय काय उपाययोजना केली पाहिजे, यावर आपण चर्चा केली पाहिजे. त्यातून विचारमंथन होईल आणि काहीतरी नवीन मुद्दे बाहेर येतील.’’ गोपीनाथ आपल्या पत्रकारितेच्या भाषेत बोलत होता.
सरपंचांना त्यातलं काही कळलं नाही. ते फक्त एवढंच म्हणाले, ‘‘बाप रे! महाचर्चेत एवढं समदं असतं व्हय?’’
‘‘मग? तुम्हाला काय वाटलं?’’
‘‘आम्हाला काय कळतंय त्यातलं गोपीनाथ? आमी पडलो अडाणी माणूस. तुला पेपरमधलं आणि टी.व्ही. मधलं समदं समजतंय. त्यो तुजा धंदाच हाये. तवा कर तुला काय करायचं ते. म्या नाय कशाला म्हणू? आण समजा म्या नाय म्हणालो आणि उद्या तू पेपरमंधी माज्या विरोधात बातमी दिली तर उगाच माजीच आब्रू जायची. कसं हाये, मामला लै नाजूक हाये. महिला अत्याचाराचा मामला हाये. तवा तुला पायजे ते कर.’’

सरपंचाने महाचर्चा घडवून आणायला गोपीनाथला परवानगी दिली.
तसा उत्साहानं गोपीनाथ म्हणाला, ‘‘तात्या नक्की ना पण?’’
‘‘हो. नक्की. नक्की.’’
‘‘म्हणजे मी महाचर्चा घडवून आणू शकतो ना?’’
‘‘हो. पण हे बघ म्या काय कवा असली महाचर्चा घडवून आणली नाय. त्यासाठी जे काय करायचं ते समदं तुलाच करावं लागेल.’’
‘‘समदं मीच करतो तात्या. तुमचा फक्त आशीर्वाद असू द्या माज्या पाठीशी. काय अवघड नाय बघा हे. फक्त तज्ज्ञ मंडळी नेमायची आणि घडलेल्या घटनेवर चर्चा करायची बस्स!’’ गोपीनाथ आपल्याला फार माहिती आहे अशा थाटात म्हणाला.
‘‘अरं पण ही तज्ज्ञ मंडळी आणायची कुठून? आपल्या गावात हाये का अशी माणसं?’’
‘‘आपल्याच गावातली तज्ज्ञ माणसं निवडायची तात्या, कारण घटना आपल्या गावात घडलीय.’’
‘‘कोण एवढं तज्ज्ञ हाये आपल्या गावात?’’ सरपंचांनी विचारलं.
‘‘का बरं? तुमी एवढं तज्ज्ञ हाये. गावातली आणखी चार-दोन माणसं निवडायची की काम झालं.’’ गोपीनाथ म्हणाला.
सरपंच तात्यांचा ऊर मात्र अभिमानानं भरून आला. गोपीनाथनं आपल्याला तज्ज्ञ म्हटल्यानं ते आनंदून गेले. म्हणाले, ‘‘ठीक हाये. तू म्हणतोस तर करू महाचर्चा. जमव चार माणसं.’’
सरपंचांनी पुन्हा एकदा गोपीनाथला परवानगी दिली अन् गोपीनाथ उत्साहानं चार माणसं जमवायला तिथून बाहेर पडला.
आपण आपल्या गावात टीव्हीतल्यासारखी महाचर्चा पहिल्यांदाच आयोजित करतोय. तवा ही महाचर्चा कशी जंगी झाली पाहिजे, या महाचर्चेत विचारांचा कीस निघाला पाहिजे, समदं गाव ही महाचर्चा ऐकायला जमवायचं, असा गोपीनाथनं चंगच बांधला. शिवाय या महाचर्चेच्या बातमीचं कव्हरेज करून पेपरला ही बातमी छापायला द्यायची असंही त्याने मनाशी ठरवलं.
गोपीनाथ कामाला लागला. आज सायंकाळीच ही महाचर्चा सरपंचाच्या नव्या बंगल्यासमोर आयोजित करायची असं त्यानं ठरवलं. महाचर्चेत सहभागी होण्यासाठी गोपीनाथनं सरपंचाची निवड आधी केलीच होती. मग त्यानं गावातल्या सगळ्यात वयोवृद्ध आणि अनुभवी असलेल्या सखू आजीची गाठ घेतली. तिला सांगितलं, ‘‘तुला आलं पाहिजे. तू तुझ्या सुनांशी कसं वागतेस ते सांगितलं पाहिजे. तुझे अनुभव गावाला उपयोगी पडतील.’’
सखू आजीनं यायचं कबूल केलं.
मग गोपीनाथनं ग्रामपंचायत सदस्य बालूशेठला गाठलं. त्यालाही सगळं सांगितलं तर बालूशेठचा ऊर अभिमानानं भरून आला. तो उगीचच कमीपणा घेत म्हणाला, ‘‘छे! आपल्याला काय कळतंय त्यातलं, आम्ही काय तुमच्यासारखे पत्रकार आहे काय?’’
‘‘तरीपण तुम्ही आलं पाहिजे. गावातली बरीच प्रकरणं तुम्ही मिटवल्यात. शिवाय तुम्ही तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पण आहात.’’
आता बालूशेठ काय बोलणार? त्यांनी होकार दिला.

मग गोपीनाथने तंटामुक्ती समितीच्या उपाध्यक्ष असलेल्या पाटलाच्या सूनबाईंची गाठ घेतली. तिला पण सगळं सांगितलं. विमलाबाई लगेचच तयार झाल्या.
खरं म्हणजे दोन पुरुष आणि दोन स्त्रिया महाचर्चेसाठी पुरेशा होत्या. पण ज्याची बायको रडत माहेरी गेली त्या रमेश गाढवेलाही चर्चेला बोलवावं असं गोपीनाथला वाटलं. म्हणून त्याने रमेशची गाठ घ्यायचं ठरवलं आणि दुपारीच त्याच्या घरी गेला. गोपीनाथची आणि रमेशची मात्र गाठभेट झाली नाही. रमेश कुठेतरी बाहेर गेला होता. मग गोपीनाथनं फोनवरून रमेशशी संपर्क साधला आणि गावात आज रात्री महाचर्चा आयोजित केल्याचं सांगितलं. तर रमेश जाम चिडला.
म्हणाला, ‘‘तुला कुणी या नसत्या उचापत्या करायला सांगितलंय?’’
तसा गोपीनाथ म्हणाला, ‘‘आपल्या देशात लोकशाही आहे रमेश, आणि लोकशाहीत कोणत्याही विषयाच्या अनुषंगाने महाचर्चा घडवून आणण्याचा कुणालाही अधिकार आहे. आमचा अधिकार तू काढून घेऊ शकत नाहीस.’’
‘‘पण हा माझा खासगी मामला आहे.’’
‘‘हा तुझा खासगी मामला असला तरी गावाच्या इज्जतीचा प्रश्‍न आहे. शिवाय मी पत्रकार आहे. तू पत्रकार असलेल्या गोपीनाथला अडवू शकत नाही.’’
‘‘मग कर तुला काय करायचं ते. मी मात्र मुळीच येणार नाही.’’
रमेशनं महाचर्चेत सहभागी व्हायला नकार दिला. गोपीनाथनं मात्र हार खाल्ली नाही. आपण आज आपल्या गावात महाचर्चा आयोजित करायचीच आणि ती यशस्वी करून दाखवायची, असं त्यानं ठरवलं.
शिवाय विषयही चांगला आहे- ‘नव्या सुनेवर होणारे अत्याचार.’
त्याच रात्री सरपंच तात्यांच्या नव्या बंगल्यापुढच्या चौथर्‍यावर गावातली पहिली महाचर्चा रंगली. ‘भीमाबाईची सून आणि रमेशची बायको सुनीता वहिनी माहेरी निघून गेली आणि त्यासाठी सरपंच तात्यांच्या बंगल्यावर गावाने बैठक बोलावलीय’ असा निरोप ग्रामपंचायत शिपायांच्या तोंडून घरोघर पाठवला गेला अन् सगळं गाव गोळा झालं. त्यांना वाटलं, ही गावबैठकच आहे. पण ही होती महाचर्चा, टीव्हीतल्या सारखी!
सरपंच तात्यांच्या बंगल्यापुढच्या चौथर्‍यावर सगळं गाव गोळा होऊन बसलं होतं. समोर चार-पाच खुर्च्या टाकल्या होत्या. आजच्या महाचर्चेत सहभागी होणारी तज्ज्ञ मंडळी खुर्च्यांवर बसली होती. मोठ्या दिव्यांच्या झगमगाटात महाचर्चेला सुरुवात झाली.

महाचर्चेचं सूत्रसंचालन गोपीनाथ करत होता. चर्चेच्या सुरुवातीला तो म्हणाला, ‘‘मंडळी, आज आपण इथं का जमलो आहोत हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. आपल्या देशात महिलांवर आणि विशेषतः नवीन सुनेवर नेहमी अत्याचार होतो. असाच काहीसा प्रकार आपल्या गावात पण घडला आहे. त्यासाठी आपण सगळे एकत्र जमलो आहोत. पण ही काही गावसभा नाही. आपण टीव्हीमध्ये बघतो तशी ही महाचर्चा आहे. तुम्हाला फक्त ऐकण्याच्या कामासाठी इथं बोलावलं आहे. आज आपल्या गावात जे घडलं त्याच्यावर समोर खुर्च्यांत बसलेली तज्ज्ञ मंडळी चर्चा करणार आहेत. त्यांचा तुम्हाला परिचय आहेच. पण टीव्हीवर जसा परिचय करून दिला जातो तसाच यांचाही परिचय आपण करून घेणार आहोत. महाचर्चा कशी टी.व्ही.तल्या सारखी ‘सेम टू सेम’ वाटली पाहिजे.’’
मग गोपीनाथनं आपल्या पत्रकारितेच्या भाषेत एकेकाची अशी काही ओळख करून दिली की गाववाल्यांना ही आपलीच वाटणारी माणसं एकदम निराळी वाटू लागली. सगळ्यांची ऐसपैस ओळख करून दिल्यावर गोपीनाथनं महाचर्चेला सुरुवात केली अन् म्हणाला, ‘‘मंडळी, माझा पहिला प्रश्‍न आहे सरपंच तात्यांना.’’
मग सरपंचाकडे वळून पाहत त्याने प्रश्‍न विचारला, ‘‘तात्या, आज आपल्या गावात घडलेल्या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे? सुनीता वहिनी आज माहेरी रुसून गेल्या याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय?’’
यावर सरपंच तात्यांनी उलट प्रश्‍न केला, ‘‘ती रुसून गेली की रडत गेली?’’
‘‘तेच ते, दोन्ही पण.’’

सरपंच तात्यांची धाकटी सून जरा उद्धट वागत होती. जरा काही झालं की ती रुसून माहेरी पळत होती. आज ती पण ही महाचर्चा ऐकायला बसली होती. इतर वेळी तिने सरपंचाचे दोन शब्दही कधी ऐकले नव्हते, पण तिला समजावून सांगायची ही चांगली संधी आहे असं वाटून सरपंच तात्या म्हणाले, ‘‘खरं म्हणजे अलीकडच्या शिकलेल्या पोरींवर काही संस्कारच राहिले नाहीत. त्यांना वाटतं आपण शिकलो म्हणजे फार शहाणे झालो. त्या वडीलधार्‍या व्यक्तींचा मान ठेवत नाहीत. त्यांना उलटून बोलतात. प्रपंचाची त्यांना काळजी नाही. थोडं काही झालं की लगेच माहेरी निघून जातात. प्रपंच म्हटल्यावर भांड्याला भांडं लागणारच. त्यांनी थोडं सबुरीनं घ्यायला नको? आता त्या भीमाबाईच्या सुनेने लगेच माहेरी जायचं काय कारण होतं का? काय कमी-जास्त झालं ते सहन करायचं.’’
लगेच गोपीनाथनं, पाटलांच्या सूनबाई विमलाबाईंना विचारलं, ‘‘विमलाबाई यावर तुम्हाला काय म्हणायचंय?’’
तशी विमलाबाई फणकार्‍यानं म्हणाली, ‘‘मला सरपंचाचं हे बोलणं अजिबात पटलेलं नाही.’’
सरपंच तात्याने ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या सासर्‍यांना चितपट केलं होतं. याचा राग तिच्या मनात होताच. ती तावातावानं म्हणाली, ‘‘रमेश भावोजींची बायको तडकाफडकी माहेरी निघून गेली ते बरंच झालं. तिने का ऊठसूठ अन्याय सहन करायचा? या जुन्या पिढीतल्या माणसांना वाटतं नवीन सुनेनंही आपण सांगू तसंच वागावं. पण आम्ही का तसं वागू? या जुन्या पिढीचे विचार तरी धड आहेत का? आता हे सरपंच, एवढे गावप्रमुख आहेत. त्यांचे विचार कसे आहेत? कोणती सून त्यांच्या विचारानुसार वागेल? त्यांची स्वतःची सून तरी त्यांचं ऐकते का विचारा बरं.’’
विमलाबाईंनी थेट सरपंच तात्यांच्या घरावरच हल्ला केला. ते सरपंचांना आवडलं नाही. लगेच ते म्हणाले, ‘‘तुमच्यासारख्या बायकांनी नव्या सुनेला फूस लावल्यावर ती तसंच वागणार.’’
‘‘आम्ही काय फूस लावली? आता त्या सुनीताबाईंच्या सासर्‍याने तिच्याशी नीट वागायला नको? नवी सून आहे म्हटल्यावर कसं तिच्या कलाने घ्यावं. लग्नातच त्यांची धुसफूस चालली होती. हवं तर रमेश भावोजींच्या सासर्‍याला विचारा.’’

आपल्या महाचर्चेचा पदर खाली घसरत चाललाय, हे बघून गोपीनाथने घाईघाईने चर्चेची सूत्र स्वतःकडे घेतली अन् म्हणाला, ‘‘थांबा. आपण सुनीता वहिनींच्या वडिलांनाच फोन करून विचारू आणि या चर्चेत सहभागी करून घेऊ. त्यांचंही मत विचारात घेतलं पाहिजे.’’
मग गोपीनाथनं रमेशच्या सासर्‍यांना फोन लावला पण फोन काही लागला नाही. लगेच गोपीनाथ म्हणाला, ‘‘या वेळी रमेशच्या सासर्‍यांशी फोनवरून संपर्क होऊ शकत नाही. आपण नंतर त्यांना फोन करून चर्चेत सहभागी करून घेऊ.’’
मग त्याने सखू आजीला विचारलं, ‘‘सखू आजी, तुम्ही अनुभवी आहात. सहा सहा सुनांना एकाच वेळी सांभाळलंय. पण तुमची कोणतीच सून अशी रुसून माहेरी गेली नाही. तुम्ही काय सांगाल तुमचा अनुभव?’’
तशी थरथरत्या आवाजात सखू आजी म्हणाली, ‘‘मुडदा बसवला त्या भीमीचा! आम्ही एकाच वेळी सहा सहा सुना सांभाळल्या आणि तिला धड एक सून सांभाळता येईना? लोकाच्या लेकराला कसं पोटच्या गोळ्यागत सांभाळावं हे तिला कळत नाय का?’’
‘‘सखू आजी, तुम्ही तुमच्या सुनांना कसं सांभाळलं ते सांगाल का?’’ गोपीनाथनं विचारलं.
‘‘म्या माज्या सुनांना कवा मान वर करून दिली नाय. उठता लाथ आणि बसता बुक्की घालून त्यांना सरळ करीत आले. पहाटं चार वाजताच म्या त्यांना लाथा घालून उठवायची अन् कामाला जुंपायची. नसत्या उचापत्या करायला त्यांना वेळच ठेवला नाय. त्यांनी नुसतं माहेरी जायचं नाव काढलं तरी म्या त्यांच्या झिंज्या धरून गप बसवायची. त्यांची काय बिशाद होती की ऊठसूठ माहेरी जातील?’’ म्हातारीच्या बोलण्यावर मोठा हशा पिकला.
चर्चेत सहभागी झालेली विमलाबाई म्हणाली, ‘‘हेच चुकतं या म्हातार्‍या माणसांचं! त्यांना वाटतं आपली सून म्हणजे घरादाराची बटीक आहे. सुनांना काही स्वातंत्र्यच नाही.’’

विमलाबाईच्या बोलण्यानं गोंधळ उडून महाचर्चा विस्कटून जाईल म्हणून गोपीनाथ घाईघाईने म्हणाला, ‘‘थांबा जरा, माझ्या हातात मोबाईल आहे. आपण या महाचर्चेत सहभागी करून घेण्यासाठी पुन्हा रमेशच्या सासर्‍यांना फोनवर संपर्क करू. त्यांच्याकडून खरी माहिती काढून घेऊ.’’
असं म्हणून त्याने पुन्हा रमेशच्या सासर्‍यांना फोन लावला. पण या वेळी त्यांचा फोन एंगेज लागला. ते दुसर्‍या कुणाशी तरी फोनवर बोलत होते.
‘‘अजूनही त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही. आता आपण आपल्या महाचर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या गावचे भगवान पाटील यांना फोन लावून त्यांचे मत विचारात घेऊ.’’
मग गोपीनाथनं भगवान पाटलांना फोन केला आणि आपल्या महाचर्चेचा विषय सांगून म्हणाला, ‘‘दादा, यावर तुमचं काय मत आहे?’’
आधीच सरपंचांवर चिडून असलेले आणि नको म्हणत असताना आपली सूनबाई त्या चर्चेला गेल्यामुळे पलीकडून भगवान पाटील तुसड्यागत म्हणाले, ‘‘त्या सरपंचाला म्हणावं नुसत्या चर्चा काय करता? कृती करा कृती. सरपंच झाल्यापासून बेणं नुसतं पुढारी छापाच्या चर्चा करतंय. बड्या बड्या थापा मारतंय, कामाच्या नावाने बोंब असतेय त्यांची.’’
पलीकडून भगवान पाटलांच्या बोलण्याचा भलताच सूर ऐकून गोपीनाथने घाईघाईनं फोन बंद केला आणि म्हणाला, ‘‘दादांशी पण या वेळी संपर्क होऊ शकत नाही. तोवर आता आपण ग्रामपंचायत सदस्य आणि आपल्या गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष असलेले बालूशेठ यांना त्यांचं मत विचारू की तुम्ही हे प्रकरण कसं मिटवणार?’’
‘‘मला विचाराल तर सांगतो की, रमेशला हे प्रकरण लै महागात पडंल. मी त्याच्या सासर्‍यांना चांगलं ओळखतो. ती माणसं गप्प बसणारी नाहीत. उद्या ते काठ्या-कुर्‍हाडी घेऊन आल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचं गाव लै डेंजर आहे, पण घाबरू नका. आपण असं काही होऊ देणार नाही. आपल्या गावात तंटा वाढणार नाही याची मी काळजी घेईन. उद्या ती माणसं आली तर आपण दोन्ही पार्ट्यांना समोरासमोर बसवून या प्रकरणावर तोडगा काढू, अशी लै प्रकरणं म्या मिटवल्यात.’’ बालूशेठच्या बोलण्यात एक प्रकारचा अहंपणा दिसून येत होता.

गोपीनाथ म्हणाला, ‘‘मंडळी, आपल्या गावात पहिल्यांदाच एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा आयोजित केली होती. ही चर्चा खूप फलदायी झाली. पण अजून ही महाचर्चा थांबवलेली नाही. तुमच्यापैकी कुणाला आपलं मत मांडायचं आहे का? काय वाटतं तुम्हाला आजच्या महिलांच्या वागणुकीविषयी किंवा त्यांच्यावर होणार्‍या अत्याचाराविषयी? रमेशने सुनीता वहिनींवर अत्याचार केला असेल की सुनीता वहिनी तडकाफडकी माहेरी निघून गेली असेल? कुणाचं चूक आणि कुणाचं बरोबर असेल?’’
गोपीनाथनं समोर बसलेल्या गाववाल्यांना महाचर्चेत सहभागी करून घेण्यासाठी विचारलं. बोलण्यासाठी एक-दोन हात वर झालेही. पण तेवढ्यात गोपीनाथचा फोन वाजला. बघतो तर फोन रमेशच्या सासर्‍यांचा. तसा उत्साहाने गोपीनाथ म्हणाला, ‘‘मंडळी, आपल्या आजच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी एक महत्त्वाचा फोन येतोय. आधी आपण तो फोन घेऊया. रमेशच्या सासर्‍यांचा फोन आहे. मग गोपीनाथने पटकन तो फोन उचलला आणि साऊंड केला. मग कानाला फोन लावून तो म्हणाला,
‘‘हॅलोऽऽ’’
‘‘हॅलो, हा कुणाचा फोन आहे? माझ्या फोनवर याचा मिस्डकॉल पडलाय. कोण बोलतंय?’’ पलीकडून आवाज आला.
तशी सगळी गर्दी चिडीचूप झाली आणि फोनच्या आवाजाकडे कान देऊन ऐकू लागली.
गोपीनाथ मात्र तातडीने म्हणाला, ‘‘हां, आण्णा, मी गोपीनाथ उचापते बोलतोय. उचापतेवाडीहून. तुमची सुनीता आमच्या गावची सून आहे आणि आज ती घरातून रुसून रडत रडत तुमच्याबरोबर माहेरी आलीय. या प्रकरणाची आमच्या सरपंचांनी आणि तंटामुक्ती समितीने गंभीर दखल घेतलीय. त्यासाठी आत्ता गावबैठक चालू आहे. बैठकीत महाचर्चा आयोजित केली असून त्यात तुमचाही सहभाग असावा, म्हणून मी मघाधरून फोन करतोय. आण्णा, सुनीताचं नुकतंच लग्न झालंय. अजून एक महिनाही झाला नाही लग्नाला तर ती लगेच रडत माहेरी गेलीय. नक्की काय झालं ते आम्हाला समजेल का आण्णा? ती रडत माहेरी का आली? काय भांडणतंटा?’’ गोपीनाथने विचारलं.

पलीकडून मात्र सुनीता वहिनींच्या वडिलांचा हसण्याचा आवाज आला. ते म्हणाले, ‘‘छे हो, कुठला भांडण-तंटा? आम्हाला फार चांगले सोयरे मिळाले बघा. माझ्या लेकीला लै जीव लावत्यात ते.’’
‘‘अहो मग दुपारी ती रडत रडत माहेरी निघाली ते?’’ गोपीनाथने आश्‍चर्याने विचारलं.
‘‘आता रडत नाही तर काय हसत माहेरी येणार का? अहो आत्ता आषाढ महिना निघालाय. आषाढात नव्या नवरा-नवरीने एकमेकांचं तोंड बघायचं नसतं, अशी जनरूढ हाये आपल्याकडं म्हणून मी तिला घेऊन आलो तं वाटलं तिला वाईट! नवर्‍यापासून दूर जातोय म्हणून आलं डोळ्यात पाणी. त्यात काय एवढं?’’
गोपीनाथने स्पीकरवर घेतलेल्या मोबाईलवरून आण्णांचा आवाज सगळ्यांनी ऐकला अन् गोपीनाथने आयोजित केलेल्या पहिल्याच महाचर्चेची हवाच निघून गेली.
गोपीनाथची पण हवा निघून गेली. त्याचा चेहरा हवा बाहेर पडलेल्या फुग्यासारखा झाला.
चर्चा ऐकायला जमलेली माणसं एकमेकांच्या चेहर्‍याकडे बघू लागली. सरपंचांनी तर डोक्यालाच हात लावला.
पण या धक्क्यातूनही गोपीनाथ सावरला अन् सपंचांकडे वळून पाहत म्हणाला, ‘‘तात्या, नव्या नवरा-नवरीला एकमेकांपासून दूर करणार्‍या आषाढातल्या या अनिष्ट प्रथेवरसुद्धा आपल्या गावात महाचर्चा झालीच पाहिजे.’’

– प्रा. साईनाथ पाचारणे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.