Now Reading
मदनाची मलायका

मदनाची मलायका

Menaka Prakashan

मी रागानं बेभान झालो. नंतर विचार केला, ‘समजा मदनला चार शिव्या हासडल्या, दोन थोबाडीत मारल्या किंवा बदडून जरी काढलं तरी तो गप्प बसेल. मग माफी मागेल, पाय धरेल आणि परत निर्लज्जासारखा मित्र मित्र म्हणून जवळ येईल. पण त्याच्या अंगातली खोड काही जाणार नाही. त्यापेक्षा त्याला अशी अद्दल घडवावी की, एखाद्या स्त्रीच्या वाटेला जायच्या अगोदर दहा वेळा विचार करेल.’

‘मदन’ हा आमच्या कॉलेज जीवनातला ‘जानी दोस्त’. देवानंद टाईप केसांचा कोंबडा, रंगीबेरंगी कपडे अन् स्टायलिश वागणं असणारा मदन, तरुण वयात आम्हाला ज्या ‘विषयांची’ जिज्ञासा होती पण ज्ञान नव्हतं अशा अभ्यासेतर विषयांत तो तज्ज्ञ व पारंगत असल्याने, तो आमचा ‘गाईड’ होता. मॅट्रीकच्या वर्गात तीन-चार वर्षं मुक्काम ठोकल्यामुळे तो वयाने आमच्यापेक्षा मोठा आणि अनुभवी होता. त्या काळात त्याच्या ‘हाताखालून’ व ‘नजरेखालून’ गेलेल्या मुली आता कॉलेजात शिकत होत्या. मुलींशी बोलायला लाजणार्‍या बुजणार्‍या प्रसंगी थरथरणार्‍या आम्हा सर्व मित्रांना, मुलींशी बिनधास्त बोलणारा, टिंगलटवाळी करणारा मदन ‘हिरो’ वाटला नाही तरच नवल! त्याच्या वासुगिरीवर आम्ही जाम खूष होतो.

मित्रांकडून (कधीही परत न देण्यासाठी) हातउसने पैसे घेणं, चहा-नाष्ट्यासाठी मित्रांना घेऊन कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जाणं अन् कोणाला तरी बिल द्यायला सांगून सर्वांच्या आधी बाहेर सटकणं, असे त्याच्या फसवेगिरी व फुकटेगिरीचे उद्योग आम्ही गप्पपणे सहन करत होतो. कारण त्याच्या ‘जॉली’ स्वभावामुळे आम्हाला कॉलेज जीवनाचा खरा आनंद उपभोगायला मिळत होता. त्याच्या अशा फुकटेगिरीची टिंगलटवाळी करून त्याला आम्ही कितीही जरी शिव्या घातल्या तरी तो हसत हसत सोडून देई कारण त्याला माहीत होतं की यांनी आपल्याविरुद्ध कितीही ‘बें बें’ केलं तरी हेच बकरे आपल्याला पुढे कायम कापायचे आहेत.
अशा प्रकारे आम्ही कॉलेज जीवन एन्जॉय करत होतो. तशात कॉलेजातल्या व गावातल्या अनेक मुलींच्या बापांच्या तक्रारी मदनच्या बापापर्यंत पोचल्या. आजपर्यंत त्याने केलेल्या भानगडी, लफडी निस्तरता निस्तरता नाकी दम आलेल्या त्याच्या बापाची, ‘आपला चैनी, उधळ्या, छानछौकी दिवटा चिरंजीव’ पुढे काहीही काम न करता आपल्या जिवावर ऐतखाऊ जीवन जगणार, अशी खात्री झाल्याने अखेर त्याच्या बापानं त्याचं लग्न एका श्रीमंत घरातल्या एकुलत्या एक दिसण्याच्या बाबतीत सगळा उजेडच असलेल्या मुलीबरोबर ठरवून टाकलं.

आम्ही ग्रॅज्युएट झालो अन् आमचं कॉलेज जीवन संपलं. एकूण एक विषयात नापास झालेल्या मदननं शिक्षणाला रामराम ठोकला. लवकरच आम्ही सर्वजण नोकरी-धंद्याला लागलो. दोघा-तिघांची लग्नंही झाली. शिक्षण संपलं तरी आमचा ग्रुप टिकून होता. रिकामटेकडा मदन तर सर्वांचा कॉमन मित्र होता.
मदनच्या दृष्टीने आम्ही सर्वजण पूर्वीचे कापायचे बकरे राहिलो नव्हतो, तर एक तारखेला सोन्याचं अंडं देणार्‍या कोेंबड्या झालो होतो.
‘‘तुम्ही काय बाबा नोकरी धंदा करणारी ‘मालदार’ माणसं, आम्ही आपले कफल्लक बेरोजगार!’’ असं म्हणत उधार, उसनवारीच्या नावाखाली त्याचं आम्हाला टोप्या घालणं सुरूच होतं.
लग्न झालं तरी मदनचा स्त्रीलंपट स्वभाव बदलला नव्हता. त्याच्या बायकोला मात्र आपल्या स्टायलिश नवर्‍याचं भारी कौतुक वाटायचं. त्यामुळे ती बिचारी आपल्या पतीदेवाची मनोभावे सेवा करायची. पण हा पठ्ठ्या बायको म्हणजे ‘दासी’ समजून बाहेर आपल्यासाठी एखादी ‘राणी’ मिळते का याच्या शोधात ‘वासुगिरी’ करत फिरायचा.
त्याला आम्ही सर्वजण म्हणायचो, ‘‘मदन्या साल्या, लग्न झालं तरी तू बाहेरख्याली रंगेल आयुष्य जगतो आहेस. आम्ही बघ कसे सज्जन, सभ्य माणसासारखं जीवन जगतोय..’’
ते ऐकून मदन्या मोठ्याने हसत म्हणायचा, ‘‘साल्यांनो एक तर तुम्हाला तशी संधी चालून येत नाही, तुमच्यात अजिबात धाडस नाही त्यामुळेच तुम्ही असे बेचव, अळणी जीवन जगताय!’’
तेही खरंच होतं. नाकासमोर बघून चालणार्‍या, प्रतिष्ठेला जपणार्‍या आम्हा मित्रांच्या जीवनात एखादं प्रेमप्रकरण किंवा एखादी भानगड घडण्याचा योग कधी जमून आलाच नव्हता.
पण काही दिवसांतच माझ्या जीवनात तसा ‘योग’ आला.
फ्लॅटमध्ये मी एकटाच राहत होतो. एकदा दुपारी फ्लॅटचं दार बंद करून निघालो तर पलीकडच्या जोशी काकूंच्या घरातून एका तरुणीच्या बोलण्याचा मधुर आवाज आला. मी कान देऊन ऐकत उभा राहिलो. तंबोर्‍याची तार छेडल्याप्रमाणे नाजूक आवाजात सफाईदार हिंदीत ती बोलत होती. त्यानंतर नेहमीच दुपारच्या वेळी हा नाजूक आवाज ऐकू यायचा. आवाजावरून ती तरुणी नक्कीच सुंदर असली पाहिजे, या विचारानं तिला पाहण्याची माझी उत्कंठा शिगेला पोचली होती. आता आपली उत्कंठा नेहमीप्रमाणे दाबून टाकायची नाही असं ठरवत माझ्या अंगी मदनचं धाडस संचारलं आणि मी तडक बाजूच्या जोशी काकूंच्या फ्लॅटकडे कूच केलं.

दारात मला पाहताच काकू म्हणाल्या, ‘‘काय रे आज अचानक आमची कशी काय आठवण झाली?’’
काय म्हणते तुमची तब्येत वगैरे काहीबाही बोलून मी हळूच म्हणालो, ‘‘काकू, तुमच्याकडे हिंदी बोलणारी कोणी पाहुणी आली आहे का?’’
काकू हसतच म्हणाल्या, ‘‘चल रे! ती पाहुणी कसली? आमची नवीन कामवाली मलायका नावाची मुलगी आहे. आताच ती गेली बघ.’’
मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारून मी लगेचच तिथून काढता पाय घेतला.

मी दुपारी जेवण करून जिन्यातून खाली निघालो की, तिचं बोलणं ऐकत थांबत होतो. मलायका हे तिचं नाव अन् नाजूक आवाजातलं तिचं सफाईदार उर्दूमिश्रित हिंदी बोलणं ऐकून माझ्या डोळ्यासमोर मलायका अरोराचाच चेहरा तरळायचा. तिला पाहण्याची माझी उत्सुकता इतकी वाढली की, एके दिवशी मी घरातलं स्टूल बाहेर घेतलं, जोशी काकूंच्या वॉशरूमच्या जिन्याच्या बाजूची भिंत सात-आठ फूट उंच होती. मी स्टुलावर चढलो अन् पलीकडे नजर टाकली तर मलायका मला पाठमोरी दिसली. तिचा उंच शिडशिडीत नाजूक बांधा, अंगावर काळ्या रंगाचा सलवार कुर्ता, त्यातून दिसणारी तिची गोरीपान गुलाबी पाठ, दाट-काळेभोर केस पाहून मी अक्षरश: घायाळ झालो. ‘ओ हो ! ही तर मलायका अरोराच आहे!’ असं म्हणत, ती बाहेर येण्याची वाट पाहत मी थांबलो. तेवढ्यात जिन्यातून कोणीतरी येत असल्याचा आवाज आला आणि मी पटकन उडी मारून माझ्या घरात सटकलो.
तिची ती सुंदर पाठमोरी आकृती पुन्हा पुन्हा आठवत पडून राहिलो. मी विचार केला, ‘च्यायला! खरोखरच आजपर्यंत आपण आपल्या भावना मारत जगत आलो आहोत. तो मदन्या म्हणतो त्या प्रमाणं आपलं जीवन बेचव, अळणी आहे हेच खरं! आपल्या आयुष्यात काहीच थ्रिल नाही. ‘जो हो गया, सो हो गया, अभी ये चान्स छोडनेका नहीं’ असं म्हणत माझ्या अंगात ‘मदन’ संचारलाच.

मी लगेच जोशीकाकूंकडे गेलो आणि मला कामासाठी बाई पाहिजे म्हणून सांगितलं.
काकू म्हणाल्या, ‘‘अरे उद्या दुपारीच मलायकाला तुझ्याकडे पाठवते. फारच प्रामाणिक आणि कष्टाळू मुलगी आहे. तिलाही कामाची गरज आहेच.’’
पहिलं काम तर फत्ते झालं होतं. दुसर्‍या दिवशी अर्ध्या दिवसाची रजा टाकून मी घरी आलो.
अंगातला पांढरा शर्ट काढून रंगीत शर्ट घातला. तोंडाला पावडर लावून, केस विंचरले, अंगावर सेंट मारून मलायकाची वाट पाहत बसलो. थोड्या वेळातच दारावर टकटक झाली. धडधडती छाती घेऊन दाराजवळ गेलो अन् म्हणालो, ‘‘कौन है?’’
बाहेरून किणकिणता नाजूक आवाज आला, ‘‘मैं मलायका हूँ साब! आपनेही मुझे बुलाया था।’’
दाराशी लगटून उभ्या असणार्‍या माझ्यामध्ये व बाहेरच्या बाजूच्या मलायकामध्ये फक्त दोन इंच जाडीच्या दरवाजाचं अंतर आहे, या विचारानंच माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. मी हळूच दार उघडलं.
बाहेर आलेले वेडेवाकडे फारोळे दात, दातांमुळे मिटता न येणारं ‘आ’ वासलेलं तोंड, बसकं नाक, मिचमिचे डोळे असणारी गोरीपान मलायका समोर उभी होती.
अरे बापरे! देवानं हिला बनवताना उंच बांधेसूद अंगकाठी, गोरा गुलाबी रंग, काळा दाट केशसंभार, मधुर आवाज दिला पण, चेहरा बनवताना देव झोपला होता की काय? या विचारानंच स्वप्नभंग झालेला मी आतमध्ये वळलो. माझ्या मागोमाग तीही आली.
काहीतरी कारण सांगून तिला कामावर ठेवण्यास नकार देऊन कटवावं असं मनात आलं, पण एखाद्या गरजू गरीब मुलीला नाराज करणं माझ्या बुद्धीला पटलं नाही.
मी तिला फ्लॅट फिरून दाखवला आणि कामाचं स्वरूप सांगितलं. तिनं लगेच कामाला सुरुवात केली.
ती एका रूममध्ये गेली की मी दुसर्‍या रूममध्ये जात होतो. अर्ध्या तासापूर्वीची माझ्या मनातली मलायका आली असती तर मी तिचा पिच्छा सोडला नसता. पण आता मात्र मी तिच्यापासून दूर पळत होतो.

काम संपवून ती निघून गेली. मी घरभर फिरलो, आई असताना होतं तसं सगळं घर चकचकीत झालं होतं. सगळ्या वस्तू जागच्या जागी गेल्या होत्या. घासलेली भांडी, धुतलेले कपडे सारं लखलखीत दिसत होतं. ‘जाऊ द्या! मलायका अरोरा नाही तर नाही! या निमित्तानं कामाला एक चांगली बाई तरी मिळाली!’ या विचारानं मी माझं अपेक्षाभंगाचं दु:ख झटकून टाकलं.
कधी नव्हे ती माझ्या आयुष्यात एक गुलाबी संधी चालून आली होती अन् माझा असा पोपट झाला.
पण तिकडे मदन्यानं मात्र सर्वांना हैराण करून सोडलं होतं. त्याच्या स्त्रीलंपटपणाची झळ आता मित्रांच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत पोचायला सुरवात झाली होती. तो कोणा मित्राच्या घरी गेला तर त्याच्या मोलकरणीची छेड काढणं, फ्लॅटवर गेला तर खिडकीतून समोरच्या गॅलरीत दिसणार्‍या एखाद्या तरुणीकडे टक लावून बघत बसणं, खाणाखुणा करणं, मित्राच्या लग्नाला गेला तर तिथल्या स्त्रियांच्या घोळक्यात घुसखोरी करून जुनी ओळख असल्याप्रमाणे हास्यविनोद करत गप्पा मारत बसणं, एखादी स्त्री मोकळेपणानं बोलली तर तिचा फोन नंबर घेऊन संपर्क वाढवणं, या अशा त्याच्या बाईलवेड्या हरकतींनी सर्वांना नुसता वैताग आणला होता. एकेकाळी त्याच्या असल्या वासुगिरीमुळे आम्हाला तो ‘हिरो’ वाटत होता. पण आता मात्र तो ‘व्हीलन’ वाटू लागला होता.
मित्रांकडून त्याचे वेगवेगळे किस्से ऐकल्यावर वाटलं, ‘बरं झालं आपण त्याच्याशी फटकून वागतो अन् त्याला आपल्या फ्लॅटवर येऊ द्यायचं टाळतो ते!’
पण माझा हा आनंद अल्पकाळच टिकला. कारण दुसर्‍याच दिवशी गावाकडून वहिनीचा फोन आला.
मी मनातून चरकलो कारण एक महिन्यापूर्वीच वहिनी तिची तब्येत बरी नसल्यानं तिची धाकटी बहीण सुलभाला घेऊन डॉक्टरांना दाखवण्यासाठी आली होती. आता परत ती आजारी पडली की काय, या काळजीनंच मी फोन घेतला.

‘‘काय झालं वहिनी, तब्येत बरी आहे ना?’’
‘‘भाऊजी मला मेलीला काय होणार? अगदी ठणठणीत आहे. तुम्ही कसे आहात आणि तुमचा तो जिवलग, खास मित्र मदन काय म्हणतोय?’’
मदनचं नाव ऐकताच मी घाबरत म्हणालो, ‘‘का काय झालं वहिनी, तुम्ही त्याची चौकशी का करताय?’’
‘‘काही नाही. मी आणि सुलभा तुमच्याकडे आलो होतो, तेव्हा आम्ही इकडे यायच्या आदल्या दिवशी तो तुमच्याकडे आला होता. त्याच्या समोरच मी तुम्हाला ‘उद्या एकच्या बसने मी जाते’ असं म्हणाले होते. दुसर्‍या दिवशी आम्ही स्टँडवर गाडीची वाट पाहत बसलो असताना तो आला अन् मित्राला सोडायला आलो होतो, असं म्हणत आमच्याबरोबर गप्पा मारत बसला. आम्ही नको नको म्हणत असताना आम्हाला कॅन्टीनमध्ये चहा प्यायला घेऊन गेला. नंतर आम्हाला गाडीत बसवून गाडी हलल्यावरच हात हालवून ‘बाय बाय’ करत गेला. त्यामुळे मला त्याचं फारच कौतुक वाटलं.’’
मदनचा असला लंपटपणा माहिती असल्यानं मी त्याचा विषय टाळत म्हणालो, ‘‘जाऊ द्या वहिनी, तुमची तब्येत कशी आहे ते बोला!’’
‘‘जाऊ द्या काय भाऊजी, खरी भानगड तर पुढेच आहे. आमच्या भेटीत तुमच्या मित्रानं सुलभाचा फोन नंबर कधी घेतला हे मला माहीत नाही. इकडे आल्यावर सुलभाला त्याचे फोन यायचे. व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज यायचे. तुमचा मित्र म्हणून सुलभाही हळूहळू मेसेज पाठवू लागली. पुढे पुढे त्याचे चावट विनोद, अश्‍लील मेसेज येऊ लागले तसा सुलभानं त्याचा फोन नंबर ब्लॉक करून टाकला. तो तुम्हाला भेटला तर म्हणावं, आमच्या सुलभाला नादी लावणं एवढं सुलभ नाही. माझ्याशी गाठ आहे म्हणावं!’’

चिडून फणकार्‍यानं बोलणार्‍या वहिनीला शांत करत मी म्हणालो, ‘‘वहिनी, असल्या नालायक माणसाला मित्र म्हणून जवळ केलं ही माझी चूक आहे. वहिनी तुम्ही शांत राहा. मी काय करायचं ते बघतो. नाही तुमचे अन् सुलभाचे पाय धरून त्याला माफी मागायला लावली तरच बघा!’’
मी रागानं बेभान झालो. नंतर विचार केला, समजा मदनला चार शिव्या हासडल्या, दोन थोबाडीत मारल्या किंवा बदडून जरी काढलं तरी तो गप्प बसेल. मग माफी मागेल, पाय धरेल आणि परत निर्लज्जासारखा मित्र मित्र म्हणून जवळ येईल. पण त्याच्या अंगातली खोड काही जाणार नाही. त्यापेक्षा त्याला अशी अद्दल घडवावी की, एखाद्या स्त्रीच्या वाटेला जायच्या अगोदर दहा वेळा विचार करेल.’
आम्ही जमलो असताना मी मित्रांना मदनचा माझ्या बाबतीत घडलेला किस्सा सांगितला. मग प्रत्येकजण स्वत:ला आलेला त्याचा वाईट अनुभव सांगू लागला. लग्न झालेले दोघे-तिघे तर म्हणाले, ‘‘आमच्या बायका म्हणताहेत की तुमचा तो मित्र चांगला नाही, त्याला घरात आणत जाऊ नका.’’ हे ऐकून सर्वजण जाम संतापले अन् ‘त्याला आता आपण सर्वजण मिळून मरेस्तोवर चोप देऊ’ असं म्हणायला लागले.

मी शांतपणे म्हणालो, ‘‘मला पण तसंच वाटत होतं. पण त्याचा काही उपयोग नाही. मी एक प्लॅन केला आहे. वेळ आल्यावर सर्वांना सांगेनच.’’
दुसर्‍या दिवशी मलायकाचं घरकाम होताच, मी तिला थांबवून मदनबद्दल सर्व माहिती सांगून माझ्या प्लॅनमध्ये मदत करण्याची विनंती केली.
सर्व ऐकून झाल्यावर गंभीर चेहरा करुन ती म्हणाली, ‘‘साब तुम्हारे इस प्लॅनमें मैं खुद बदनाम तो नहीं हो जाऊंगी ना?’’
मी समजुतीच्या सुरात म्हणालो, ‘‘मलायका, तुम कुछ फिकर मत करो, तुम मेरी बहन जैसी हो। तुम्हे कुछ तकलीफ नही होंगी, इसकी जिम्मेदारी मेरे उपर छोड दो।’’

दोन दिवसांआधीच मलायकानं तिच्या बहिणीच्या लग्नासाठी दोन हजार रुपये अ‍ॅडव्हान्स म्हणून मागितले होते. तो धागा पकडून मी तिला म्हणालो, ‘‘अगर तुम मुझे मेरे प्लॅनमें मदद करोगी तो मैं तुम्हारे बहनकी शादीके लिए पाँच हजार रुपया दे दूँगा।’’
हे ऐकून ती लगेचच मला मदत करायला तयार झाली. दुसर्‍या दिवशी ती कामावर येताच, तिचा फोन घेतला. मदनला फोन लावल्यावर त्याचाशी काय बोलायचं हे तिला सविस्तरपणे सांगितले.
ऐनवेळी काही बोलावं लागलं तर ते तिला हळूच सांगण्यासाठी तिच्या शेजारीच बसलो. मी मदनला फोन लावून स्पीकर ऑन करून तिच्याकडे फोन दिला. फोन लागताच मी पढवल्याप्रमाणे ती म्हणाली, ‘‘हॅलो मन्सूर, मैं मलायका बोल रही हूँ। मेरे साथ शादीका वादा करके तुम कानपूर चले गये, उसे दो साल हो गये। कितने दिनसे मैं फोन लगा रही हूँ। तुम तो फोन भी नही उठाते, आज पहली बार फोन उठाया! मन्सूर कुछ तो बोलो, चुप क्यौं बैठे हो?’’
‘‘हॅलो मलायकाजी मैं मन्सूर नहीं मदन बोल रहा हूँ।’’
‘‘ओ हो सॉरी मदनजी, शायद राँग नंबर लग गया।’’
‘‘नो सॉरी-थँक्यू फॉर राँग नंबर. उसकी वजहसे तो मुझे आपकी मधुर आवाज सुननेका मौका मिला। मुझे लगा कहीं तो फिल्मकी शूटिंग चल रही है। और मलायका अरोरा फोनपे फिल्मका डायलॉग बोल रही हैं।’’
नाजूक आवाजात खळखळून हसत मलायका म्हणाली, ‘‘हाऊ स्वीट मदनजी, आप तो बहुत रसिक इन्सान लग रहे हो। थँक्यू! बाय बाय, अँड लव्ह यू’’ असं म्हणत मलायकाने फोन बंद केला.
मी लगेच तिच्या फोनवर तो मदनचा नंबर ‘डेंजर’ म्हणून सेव्ह केला आणि मलायकाला म्हणालो, ‘‘हा डेंजर नावाचा फोन कधी आला तर अजिबात उचलायचा नाही.’’

दुसर्‍या दिवशी कामावर आल्यावर ती म्हणाली, ‘‘काल रात्री डेंजरचे तीन-चार कॉल येऊन गेले.’’
माझ्या सांगण्याप्रमाणे मलायका फोनवर ज्या लडिवाळपणे बोलली त्यामुळे मदन्याची झोप नक्कीच उडणार, हे मला माहीत होतं.
मी परत मदनला फोन लावून मोबाईल तिच्याकडे दिला. ती म्हणाली, ‘‘हॅलो, आपके नंबरसे मुझे मिस्ड कॉल आये हैं। आप कौन हो?’’
‘‘हॅलो मलायकाजी, मैं मदन बोल रहा हूँ। कल मैं आपके साथ कुछ बोलना चाहता था लेकिन आपने फोन रख दिया।’’
‘‘हाँ हाँ मदनजी, कोई दिक्कत नहीं, अभी बोल दिजीए ना।’’
‘‘थँक्यू मलायकाजी. मैं आपको रिक्वेस्ट करता हूँ, की आप उस धोकेबाज मन्सूरके लिए इतनी परेशान क्यो हो रही हो? उसे अपने दिल और दिमाग से निकाल दो, मैं आपके साथ हूँ ना।’’
‘‘थँक्यू मदनजी, मैं अभी बिझी हूँ, फिर बाते करेंगे. बाय।’’
तिनं फोन ठेवताच आम्ही मोठमोठ्याने हसू लागलो. एका फोनमध्येच मदन्या जाळ्यात आला होता.
मी मलायकाच्या फोनवर बॅलन्स टाकला आणि तिचं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट सुरू केलं. तिच्या डी.पी. साठी फोटोगॅलरी मधून एक फोटो सिलेक्ट केला. काळ्या बुरख्यातील स्त्रीनं चेहर्‍यावरचा बुरखा अर्धवट वर उचलला आहे आणि आतून तिचा सुंदर चेहरा दिसत आहे, असा ‘मेरे महेबूब’ सिनेमातल्या साधनासारख्या दिसणार्‍या चेहर्‍याचा तो फोटो मी डी.पी. वर टाकला. मी माझ्याकडचा दुसरा एक हँडसेट तिला दिला अन् आमचा प्लॅन पूर्ण होईपर्यंत तिचा फोन माझ्याकडेच ठेवून दिला.
मग ‘हाय’ म्हणून मी मदनला एक मेसेज पाठवला.
‘व्हेरी ब्यूटिफुल अँड नाईस डी.पी.’ म्हणून मदनचा लगेच मेसेज आला. तिथून पुढे मग मदनची आणि मलायकाची (म्हणजे माझीच) मेसेजची अखंडपणे देवाणघेवाण सुरू झाली. ‘मदनजी तुमच्या आवाजावरून तुम्ही मला जुना व्हीलन मदन पुरी सारखे वाटत होता. पण तुमच्या फोटोतली देवानंद टाईप हेअर स्टाईल अन् देखणा मुखडा यामुळे तुम्ही तर हिरोच दिसता आहात’ असा प्रेमाच्या मेसेजेसचा धुवाँधार वर्षावच सुरू झाला.
एवढं चांगलं पोषक वातावरण तयार झाल्यावर मी मूळ प्लॅनच्या कामाला लागलो. मला मलायकाच्या भावाच्या रोलसाठी एका मुस्लिम तरुणाची गरज होती. मला एकदम आमच्या ऑफिसमधल्या सुभान्याची आठवण झाली. उंचापुरा, मजबूत शरीरयष्टी आणि दाढीमिशा असणारा माझ्या ऑफिसमध्येच माझा एक मित्र होता. मी तर त्याचं टोपण नाव सुलतानच ठेवलं होतं.

मी सुलतानला मदन्याचं ‘चरित्र व चारित्र्य’ कथन केलं आणि माझा प्लॅन सांगितला. त्या प्लॅनमधली त्याची भूमिका सांगितली.
खूष होऊन तो म्हणाला, ‘‘अरे, मी कॉलेजमध्ये अनेक एकांकिका गाजवल्या आहेत. अजूनही संधी मिळाली तर नाटकात काम करतो. तुझा हा व्हीलनचा किरकोळ रोल मी कसा झकास वठवतो ते तू बघच!’’
अखेर मलायका आणि मदनचा सार्वजनिक बागेत भेटायचा दिवस ठरला. मी मलायकासाठी एक भारी, रेशमी बुरखा खरेदी केला. डोळे आणि नाकावर जाळी असल्यानं कणभरही चेहरा दिसत नव्हता.
मलायका ठरलेल्या वेळेआधीच बागेतल्या त्या कोपर्‍यातल्या बाकावर येऊन बसली. आम्ही सर्व मित्रं पाठीमागच्या दाट वेलींच्या कुंपणापलीकडे, फटीतून टेहळणी करत थांबलो होतो. तेवढ्यात इस्त्रीचे कडक कपडे घातलेला मदन आला. बत्तीशी दाखवून हसत तिच्या शेजारी बसला. मान वाकडी करुन तिच्याकडे पाहत त्यानं,
रूख से जरा नकाब उठा दो मेरे हुजूर ।
मेरेही दिलका फूल खिला दो मेरे हुजूर॥
या गाण्याच्या दोन ओळी स्टाईलमध्ये म्हटल्या आणि तिचा मेहंदी लावलेला गोरापान नाजूक हात हातात घेतला. तेवढ्यात ठरल्याप्रमाणे सुलतान तेथे पोचला.
त्याला पाहताच मदन दचकला. कोरलेली दाढी, डोळ्यांत सुरमा, गळ्यात तावीज घातलेला उंचापुरा सुभान्या खरोखरच मलायकाचा भाऊ सुलतान म्हणून शोभत होता.
त्याला पाहताच मदनचा हातातला आपला हात सोडवत मलायका उठून उभी राहिली.
तिच्याकडे रागानं पाहत सुलतान म्हणाला, ‘‘मलायका तुम यहाँ क्या कर रही हो? और ये लडका कौन है?’’
‘‘भैय्या, मैं यहाँ पेहलेसे बैठी थी। ये यहाँ आया और मेरा हाथ पकड रहा था। उतने मे तुम आये, नहीं तो मैं जोरसे चिल्लानेवाली थी।’’
‘‘झूठ क्यौं बोल रही हो मलायका? मैं तुम्हारे मोबाईलपर इस लडकेने भेजे हुए सब मेसेजेस देख चुका हूँ। कितने दिनोंसे तुम्हारा ये लफडा शुरू है?’’
मदन म्हणाला, ‘‘भाईसाब हे लफडं नाही. आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत.’’
हे ऐकताच सुलतानने खाडकन् त्याच्या कानफटात मारली अन् त्याचा हात पिरगाळत त्याच्या खिशातला मोबाईल काढून घेतला आणि म्हणाला, ‘‘हरामखोर! खोटं बोलतोस होय, गजानन ढेरपोट्याचा मुलगा मदन तूच ना? मी तुझी सगळी माहिती काढली आहे. घरात लग्नाची बायको असताना बाहेर लफडी करत फिरतोस होय? थांब आता मी पोलीस स्टेशनला जातो आणि माझ्या बहिणीला लग्नाचं आमिष दाखवून फसवत होतास, तिला फूस लावून इथे घेऊन आलायस, याची तक्रार देतो. पुराव्यासाठी तुझा मोबाईल माझ्या ताब्यात आहेच. चल गं मलायका….’’ असे म्हणत तो तिला घेऊन निघाला.

मदन त्यांच्यासमोर जमिनीवर अक्षरश: आडवा पडला आणि सुलतानचे पाय धरून रडत म्हणाला, ‘‘मला माफ करा. पाहिजे तर मला अजून मारा, पण पोलीस स्टेशनला जाऊ नका. नाहीतर माझा बाप मला घराबाहेर काढेल, बायको सोडून जाईन. मला वाचवा. तुम्ही सांगाल तसं मी करायला तयार आहे.’’
सुलतानने खाली वाकून त्याचे केस धरून त्याची मान वर उचलली. मदन कसाबसा उभा राहिला. चेहरा वेडावाकडा करून तो रडत होता.
सुलतान म्हणाला, ‘‘मी सांगेल तसंच करणार का?’’
मदनने होकारार्थी मान हलवली तसे मदनने त्याचे केस सोडून दिले.
सुलतान म्हणाला, ‘‘आताच्या आता पन्नास हजार रुपये आणून दिलेस, तर तुझी सुटका होईल.’’
कपड्यावरचा धुरळा झटकत एक हात पुढे करत मदन म्हणाला, ‘‘तेवढा माझा मोबाईल द्या. मी लगेच जाऊन पैसे घेऊन येतो.’’
सुलतान त्याच्यावर खेकसत म्हणाला, ‘‘ए मवाल्या, मला तू येडा समजतोस का? आधी पैसे घेऊन ये मग मोबाईल देतो. तोपर्यंत तुझ्या मोबाईलवरचे बायकांचे नंबर घेतो. म्हणजे तू आणखी कोणाकोणाला त्रास दिला तेही मला समजेल. चल निघ लवकर.’’ म्हणत सुलतानने त्याच्या पेकाटात लाथ मारली.
मदन निघाला तसे आम्ही पाठीमागच्या रस्त्याने गेटसमोर येऊन भेळेच्या गाड्याजवळ उभे राहिलो.
तेवढ्यात पेकटात लाथ बसलेला मदन कंबर चोळत रडका चेहरा घेऊन आला. तो इतका घाबरला होता की त्याचं आमच्याकडे लक्षच नव्हतं. आमच्यातला एकजण म्हणाला, ‘‘का रे मदन तू इकडे कुणीकडे? ये ना भेळ खायला!’’
पटदिशी जवळ येत तो म्हणाला, ‘‘बरं झालं तुम्ही सर्वजण देवासारखे भेटलात. आता मी पैशांसाठी तुमच्याकडेच येणार होतो. अरे, एक मस्त पोरगी गटली होती. अचानक तिचा भाऊ आला अन् सगळा लोच्या झाला. मी रेडहँड सापडलो. पन्नास हजारांशिवाय तो प्रकरण मिटवायला तयार नाही. प्लीज मला मदत करा आणि सगळे मिळून मला पैसे द्या.’’ म्हणत त्यानं हात जोडले.

त्याच्याकडे रागाने पाहत मी म्हणालो, ‘‘तुला एवढे पैसे द्यायला आम्ही काय सावकार आहोत काय? मदन्या, तू गळ्यात लॉकेट आणि बोटात अंगठ्या घालून मारे ऐटीत गावभर भानगडी करत फिरणार आणि गरज पडली की आमच्याकडे पैसे मागणार, त्याऐवजी ते लॉकेट आधी मोड अन् तुझी भानगड मिटव.’’
केविलवाणा चेहरा करत तो म्हणाला, ‘‘अरे ते सासर्‍यानं दिलंय. दिसलं नाही तर तो बोंब मारेल!’’
‘‘मग त्याला सरळ सांगून टाक, की मी बाहेर एक भागनड केली, ती मिटवण्यासाठी लॉकेट मोडलं. नाहीतर ती भानगड घरापर्यंत गेली असती आणि माझी बायको मला सोडून गेली असती. तुमच्या मुलीचा संसार वाचवण्यासाठीच मी ते विकलं.’’ मी असं म्हणताच सर्वजण हसू लागले.
आपली डाळ शिजत नाही हे पाहून तो म्हणाला, ‘‘जाऊ द्या, तुमचं मित्रप्रेम आटलंय. मग काय, आता मी जातो एखाद्या सराफाकडे आणि लॉकेट गहाण ठेवून पैसे घेऊन येतो. तुम्ही मात्र इथेच थांबा. मिटवताना तुम्ही पाहिजे. आता मला निदान तेवढी तरी मदत करा.’’

तो पैसे घेऊन येताच आम्ही त्याच्याबरोबर बागेत गेलो. त्यानं ते पैसे सुलतानच्या हातात दिले.
आता आम्ही सहा-सातजण सोबत असल्यानं त्याला धीर आला होता. त्यामुळे तो मोठ्या आवाजात, गुर्मीत सुलतानला म्हणाला, ‘‘नीट मोजून घ्या पैसे आणि माझा मोबाईल परत द्या.’’
मी हळूच सुलतानला खुणावलं. त्यानंही मदन्याला सणसणीत चार-पाच चापटा मारल्या आणि त्याची मानगूट पकडत म्हणाला, ‘‘अरे ए भामट्या, तुझा हा मोबाईल बायकांच्या नंबर्सनं नुसता भरलाय. यापुढे तू अशा भानगडी करणार नाही याची खात्री काय? आता मी सांगतो तसे कर.’’ असं म्हणत त्यानं काही सूचना केल्या आणि आम्हाला म्हणाला, ‘‘आता तुम्ही व्हीडिओ शूटिंग घ्या आणि त्याची क्लिप मला पाठवा.’’
आम्ही लगेच व्हीडिओ शूटिंग घ्यायला सुरवात केली.
मदन पहिल्यांदा मलायकाच्या पाया पडला. गुडघे टेकून तिची माफी मागितली. मग हात जोडून सर्वांसमोर उभे राहत, ‘‘मी आजपर्यंत अनेक स्त्रियांना छेडलं, त्रास दिला पण यापुढे मी असं करणार नाही.’’ असं वचन देऊन माफी मागितली.

मगच सुलतानने त्याच्या हातात त्याचा मोबाईल दिला आणि म्हणाला, ‘‘यापुढे जर असा प्रकार केल्याचं कानावर आलं तर लगेच ही क्लिप व्हायरल करेन. आता माझ्याकडे तुझा बाप, तुझ्या बायकोपासून सर्वांचे नंबर आहेत हे लक्षात ठेव आणि आता सरळ घरी जा. मागेसुद्धा वळून पाहू नकोस, जा पळ.’’
मदन लगेच लगबगीनं तिथून सटकला.
तो दूर जाताच, त्यानं आजपर्यंत आम्हा सर्वांकडून उसने घेतलेल्या पैशांची आम्ही यादी काढली आणि सर्वांना त्याप्रमाणे वाटप केले. पाच हजार रुपये मलायकाच्या हातात ठेवत तिला म्हणालो, ‘‘केवळ तुझ्यामुळेच हे शक्य झालं. आम्हा सर्वांतर्फे तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी हा आमचा आहेर!’’
सुलतान ऊर्फ सुभानची पाठ थोपटत म्हणालो, ‘‘व्हीलनची भूमिका पार पाडून आज तू खरा हिरो ठरला आहेस. त्यानिमित्त उद्या संध्याकाळी राहिलेल्या पैशांतून जंगी पार्टी करूया!’’

दुसर्‍या दिवशी पार्टीसाठी सर्वजण जमले. सुलतान आणि एक-दोघं यायचे असल्यानं आम्ही स्टार्टर्स मागवून खात बसलो होतो. तेवढ्यात रम्या धापा टाकत आला आणि म्हणाला, ‘‘च्यायला मी उगाच त्या फुलवाल्याच्या दुकानासमोरून आलो. तिथे गजरे घेणार्‍या बायकांचे चेहरे न्याहाळत बसलेल्या मदन्यानं मला पाहिलं, आता तो माझ्या मागावर आहे.’’
तेवढ्यात मदन आलाच आणि खुर्ची ओढून बसला आणि प्लेटमधलं स्नॅक्स खायलाही सुरवात केली. कोणीतरी म्हणालं, ‘‘का रे मदन्या, कालच्या प्रकरणाचा धसका घेतलेला दिसतोयस.’’
तसा तो म्हणाला, ‘‘काय सांगू दोस्तांनो, मी एकदम नटीसारखी पोरगी पटवली होती. ती माझ्यावर प्रेम करत होती. मीही तिच्यावर प्रेम करत होतो. पण तो व्हीलन भाऊ अचानक टपकला अन् सगळा पचका झाला.’’

मोबाईल समोर टाकत म्हणाला, ‘‘नुसता तिचा व्हॉट्सअ‍ॅप डी.पी. बघा अन् तिनं पाठवलेले प्रेमभरे एकएक मेसेज वाचा मग कळेल की, ती किती सुंदर होती आणि माझ्यावर किती प्रेम करत होती ते!’’
डोळा बारीक करत सर्वजण माझ्याकडे बघून हसू लागले, तसा तो म्हणाला, ‘‘जळा साल्यांनो जळा! तुम्हाला कोणालाच आजपर्यंत काही जमलं नाहीये आणि मला ती मलायका गटली म्हणून तुमची किती पोटदुखी झाली हे कालच बघितलं.’’
तेवढ्यात गेटमधून सुलतान येताना दिसला म्हणून आम्ही तिकडे पाहू लागलो. मदननंही सहज वळून पाहिलं अन् सुलतान दिसताच ताडकन उठला अन् धावतच पाठीमागच्या दारानं पसारही झाला.
मदनला सरळ करायला आता आम्हाला ‘सुलतानी उपाय’ सापडला होता.

– शेखर गजभार

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.