Now Reading
भुतांचं रहस्य

भुतांचं रहस्य

Menaka Prakashan

घरी पोचताच कंबर कसून साफसफाईला लागावं लागणार होतं. लाईट चालू असतील की नाही धास्तीच होती. पण घरी आल्यावर बटण दाबताच खोली प्रकाशमान झाली आणि आश्चर्याचा धक्काच बसला. आमचं घर चकाचक आवरलेलं होतं. अगदी आम्ही इथे राहत असताना कायम धुळीने माखलेलं झुंबर आणि धुळीत न्हात बसलेल्या बिदरी वर्कच्या फुलदाण्यांसह शोकेससाठी ठोकलेल्या काचाही एकदम नव्यागत स्वच्छ.

एरवी मी असल्यानं घरात काही फरक पडत नसला तरी मी नसल्यावर मात्र आमचं घर पंगूच होतं. त्यामुळे उद्यापासून चार-आठ दिवस मला गावाला जायचं म्हणजे त्यानं धडधाकट उभं राहावं याची तजवीज करण्याची जबाबदारी माझ्यावरच आली. तजवीज म्हणजे तरी काय की अर्जुन, ओम आणि त्यांचे वडील म्हणजेच माझा नवरा यांच्या सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र याशिवाय मधल्या आणि आयत्या वेळेच्या खाण्याची सगळी तयारी करून जायचं. हे करणं म्हणजे काही गंमत नाही. आमच्या घरात नवरा आणि दोन मुलं इन-मीन-तीन माणसं. नवरा बिचारा गरीब. म्हणजे आमचं लग्न झालं त्या वेळी तसा गरीब वगैरे नव्हता. आई-भावंडांच्या संगतीत असेपर्यंत त्याची पार्टी सॉलिड जड होती. त्या वेळी माझ्याशी भांड-भांड भांडायचा. पुढे त्याच्या आईसाहेब ऊर्फ आमच्या सासूबाई वृद्धापकाळानं थकल्या आणि भावंडं आपापल्या संसारात रमली तेव्हा माझ्यावाचून त्याला पर्याय राहिला नाही. माझ्या संगतीत कालांतरानं तो उत्तरोत्तर गरीब होत गेला. त्या मानानं या सगळ्या प्रवासात मी माझा आब सांभाळून आहे आणि मुलांबद्दल सांगायचं म्हणजे ती वयानं वाढलीत पण मनानं लहान मुलांच्याही वरताण. सहवासात असताना शारीरिक किंवा वैखरीची ताकद दाखवून एकमेकांना नेस्तनाबूत करण्याचा चंग बांधल्याप्रमाणे सदोदित कडकडा भांडत असतात. भारत-पाकिस्तान असे मोठे शत्रूही वेळ, प्रसंग, संधी बघून एकमेकांचा वचपा काढतील पण आमची दोघं म्हणजे प्रत्येक प्रसंगाला मोठी संधी समजून समोरच्याचा वचपा काढण्यास वेळ दवडायचे नाहीत. तर असो.

आपला जेवणाचा विषय चालला होता. तर या तिघांचे खाण्यापिण्याचे नखरे तीनशे माणसांनाही लाजवतील असे आहेत. भाज्यांचंच बघायचं झालं तर एकाला भेंडी डोळ्यांसमोरही चालत नाही तर एकाला उभ्या चिरलेल्या भेंड्याच लागतात आणि एक भेंड्याच्या कापाशिवाय कश्शाला हात लावत नाही. वर सांगितल्याप्रमाणे माझा नवरा गरीब त्यामुळे त्याला भाजी-भाकरी हे गरिबांचंच खाणं लागतं, माझी श्रीमंत मुलं त्याकडे ढुंकूनही बघत नाहीत. फुकटच्या शिरजोर्याक करत हिंडायला पनीर, बटर, चीजयुक्त पिझ्झ्यादी पदार्थच ती भरतात.

तर असा सगळा तयारीचा अवघड प्रकार असल्यामुळे त्या दिवशी संध्याकाळी बाहेर निघालेली मी रात्री आठलाच घरी पोचले. रात्रीसाठी स्वयंपाक काय करावा या छळत्या प्रश्नानेच घरात प्रवेश केला. भुकेनं कासावीस झालेली त्रयी मला फाडून खाईल असा अंदाज होता, पण तसं काही झालं नाही. मुलं आणि नवरा स्क्रीनला नाकं भिडवून बसली होती. माझी कोणी फारशी दखल घेतली नाही. मी उद्या गावाला जाणार म्हणून दोन शब्द बोलतील.. पण ऊंहू… मला जरा वाईटच वाटलं. मी जे आव्हान स्वीकारून गावी जायला निघाले होते, अगदी आव्हानात्मक परिस्थितीतही त्याचा सामना करायला कोणी धजलं नसतं. अशा प्रसंगी मला धीर-बीर द्यायचा सोडून मंडळी स्वतःतच मग्न. त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत हात-पाय धुवून तडक स्वयंपाकाला लागले.

जेवताना मी उद्यापासून घरी नसताना त्यांनी काय करावंपेक्षा काय करू नये याच्या सूचना देऊ लागलेच होते, की ओम म्हणाला, ‘‘आई, तुला भीती नाही ना वाटत?’’
‘‘भीती? कसली? एकटीनं मी कित्येकदा प्रवास केलाय.’’
‘‘अं हं.. प्रवासाचं नाही म्हणत मी… तू ज्या कामासाठी जाते आहेस त्याच्याबद्दल बोलतोय. तसा मी आणि अर्जुनने बराच रिसर्च केलाय या विषयावर. महत्त्वाच्या टिप्स तुला जेवण झाल्यावर देणारच आहोत.’’
‘‘कसला रिसर्च? कसल्या टिप्स?’’
‘‘आम्ही सगळा अभ्यास केला आहे. त्यामुळे तू एकटी जाऊन त्या प्रकरणाचा छडा लावण्यात काही हार्म नाही. नाहीतर आम्ही तुला एकटीला जाऊच दिलं नसतं.’’
मुलं काळजी करताहेत म्हटल्यावर लगेच हे म्हणाले, ‘‘तू हट्ट करून जातीयेस खरं तर. सध्या प्रोजेक्ट पिकवर आहे. डेडलाईन इतकी जवळ आली असताना हलणं शक्यच नाही. एका महिन्यानं नाशिकला गेलो तर काही फरक पडणार आहे का?’’
‘‘फरक आपल्याला काहीच पडणार नाही हो.. पण आरती सहा महिन्यांपासून आपल्या तिथल्या घराबद्दल काय काय सुचवू पाहत आहे. किती दुर्लक्ष करणार तिच्याकडे, आणि आता परवा तर सांगत होती की आपल्या रिकाम्या फ्लॅटमधल्या गडबडीमुळे लोकं एवढी धास्तावली आहेत की सोसायटीची तात्काळ मीटिंग घेऊन जोशींनी संकट निवारण यज्ञ करण्याचा प्रस्ताव मांडलाय म्हणे.’’
‘‘काय सांगतेस.. मग?’’
‘‘काय होणारे… नेहमीसारखं इतर सदस्यांनी पैसे द्यायला नकार दिला.’’
‘‘सगळा फालतूपणा आहे… संकट निवारण यज्ञ करायला निघाले आहेत… मी सांगतो ना, त्या जोशींचा नातेवाइकच पूजा सांगायला येणार असेल म्हणून बाकीच्यांनी कडाडून विरोध केला असणार. बरं झालं प्रस्ताव बारगळला एकदाचा.’’
‘‘बारगळतोय कसचा… सगळ्यांनी उचलून धरलाय. आपल्या घरासाठी यज्ञ करताहेत म्हणून त्याचे सगळे पैसे आपणच भरावेत असं सर्वानुमते ठरलं आहे.’’
‘‘रिडीक्युलस… काय मूर्खपणा आहे हा… सांग त्यांना… माझा असल्या फालतू गोष्टींवर विश्वास नाही… काय तर म्हणे भुताटकी आहे त्या घरात… असा यज्ञ करून भुतं गायब करायला मी एक पैसा देणार नाही त्या चांडाळांना. तुलाही तिथे जायची अजिबात गरज नाहीये.’’
‘‘अहो, ते म्हणतात तशा त्या घटना भुताटकीच्या नाहीत हे सिद्ध करायलाच मला जायचं आहे. नेमकं काय चाललं आहे ते बघायला तरी जायला नको का? शेवटी आपल्याच बंद घरात काही तरी घडतंय म्हणे ना… आजूबाजूच्या लोकांना असं भीतीच्या छायेत सोडून आपण इथे मजेत जगणं बरं का…’’
‘‘आई, लोकं म्हणतात तसं भुतं असू शकतात तिथे. विदाऊट प्रूफ आपण डिनाय करू शकत नाही. बाय द वे, नेटवरल्या हंड्रेड पैकी सेव्हन्टी फाय साईटसचं जगात भूत आहे असंच म्हणणं आहे. म्हणजे भूत असणारच. पण तू बिनधास्त घोस्ट हंटिंगला जा. माझा रिसर्च सांगतोय की हा प्रकार डोमेस्टिक घोस्टचाच असावा. तसे ते वाईल्ड किंवा डेडली फियेरेबल नसतात. हं …आणि आम्ही घोस्टला शूट करायला तुझ्यासाठी एक बॅग भरून ठेवली आहे. ती आठवणीने ने.’’
‘अगं, बाई किती काळजी आहे माझी माझ्या बछड्यांना.’ रात्री अंग टेकताच हा विचार मनात आला.

आमच्या त्या घरात डोमेस्टिक घोस्ट आहे म्हणे… वेडे कुठचे… माणूस मेल्यावर भूत होत असेल तर ती भुतं आपल्या या देशात कशाला मरायला राहतील. भूत होताच जातील की पळून ‘मोहक युरोपात’ किंवा ‘मंत्रमुग्ध अमेरिकेत’ स्थायिक व्हायला. तो काय मुक्त आत्मा… ना पासपोर्टची मिळविण्याची झंझट, ना व्हिसा नाकारण्याची कटकट… ना तिकिटाच्या भल्यामोठ्या रकमेची काळजी. मन मानेल तिथे भटकायला मोकळे. अशी चैन करायची सोडून एकच एक जुनाट घर धरून गांजल्या – पिचलेल्या माणसांना घाबरवत बसायला भुतं म्हणजे काय मूर्ख निरुद्योगी माणसं आहेत असं वाटतं की काय या लोकांना… मूर्ख लेकाचे… भूत असल्याच्या साईटस काढून मुलांची दिशाभूल करतात… समोर असलेल्या गोष्टी या लोकांना दिसत नाहीत आणि अस्तित्वात नसलेल्या गोष्टी बर्याक दिसतात. ढोंगी कुठचे. ती आरती म्हणजे एक नंबरची घाबरट. आता जाऊन आमच्या त्या फ्लॅटमधे म्हणजे पर्यायाने या लोकांच्या डोक्यात चाललेल्या गोंधळाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय मला काही चैन पडायचं नाही …पण तत्पूर्वी आमच्या त्या फ्लॅटबद्दल आणि तिथल्या गोंधळाबद्दल तुम्हाला सांगायलाच हवं.

साधारण दहा-बारा वर्षांपूर्वी आम्ही तो फ्लॅट घेतला. बदल्या होतात हे माहीत असूनही गुंतवणुकीच्या दृष्टीने म्हणून आम्ही तो घेतला. कालांतराने गुंतवणूक आणि आर्थिक फायदा राहिला बाजूला, भलत्याच गुंत्यात आमची गुंतवणूक झाली. तर त्या फ्लॅटमधे जेमतेम दोनच वर्षं राहता आलं. पुढे भोपाळ, चेन्नई, दिल्ली भारतभर भटकत राहिलो. सुरवातीला मुलं लहान होती आणि ह्यांचाही कामाचा व्याप एवढा वाढला नव्हता, तेव्हा मधून-मधून हौसेने सुट्टीत तिथे जाऊन राहायचो. पण नंतर बरीच वर्षं भाड्यानं दिला. तिथे जाणं-येणं जवळजवळ बंदच झालं. आता सध्या मात्र तो फ्लॅट रिकामाच आहे. तिथे बाजूच्याच बिल्डिंगमध्ये राहणारी माझी मावस बहीण आरती त्याची सगळी व्यवस्था बघते. सगळं कसं व्यवस्थित चाललं असताना तिचा सहा महिन्यांपूर्वी पहिल्यांदा फ्लॅटसंबंधी फोन आला. जरा घाबरतच… काय तर म्हणे आमच्या फ्लॅटची बाईकडून साफसफाई करवून, दरवाजे खिडक्या घट्ट बंद केल्याची खात्री करून ती गेली आणि दुसर्याटच दिवशी बाजारात जात असताना सहज तिने माझ्या बिल्डिंगकडे पहिलं तर हॉलची खिडकी सताड उघडी होती म्हणे. ‘अगं वार्यानने वगैरे उघडली असेल. खिडकी बंद करून यायच्या ऐवजी हे तू फोनवर मला काय सांगत बसलीस. लहानपणापासूनच तू एक नंबरची घाबरट आहेस.’ मी तो प्रकार हसण्यावारी नेल्यामुळे ती काहीच बोलली नाही.

मग बरेच दिवस तिचा फोन आला नाही म्हणून फोन केला आणि फोन न करण्याबद्दल जाब विचारला तर म्हणाली, ‘‘तुला मी काही सांगितलेलं पटत नाही. हसण्यावारी नेतेस, मग कशाला फोन करू?’’ अंजारलं-गोंजारलं तेव्हा भरपूर गप्पा मारल्या बयेनं.
घराचा विषय निघाला तेव्हा जरा शांत झाली. म्हणाली, ‘‘परवा गेले होते तिकडे. तुमच्या बिल्डिंगमधल्या दुसर्याह मजल्यावर. त्या मांजरांच्या घरात..’’
‘‘म्हणजे गीताकडे?… साड्यांचा बिझनेस करते तीच ना.. आम्ही तिथे राहत होतो तेव्हा तीन मांजरं होती त्यांच्या घरात. अर्जुन आणि ओम किती खेळायचे त्यांच्या सोबत. अजून मांजरं बाळगून आहे का गं ती?’’
‘‘नसायला काय झालंय. आता तर माणसांपेक्षा मांजरंच जास्त आहेत त्यांच्या घरात आणि तीही काळी कुळकुळीत आठ मांजरं. बैठकीतल्या खुर्च्या, सोफा अडवून तीच मंडळी सुस्त लोळत पडलेली असतात. त्यादिवशी तिच्याकडे साड्यांचा नवा स्टॉक बघायला गेले होते. तिथे तुझ्या शेजारी राहणार्याो जोशी काकू भेटल्या.’’
‘‘अरे वा! कशा आहेत त्या, मुलाचं लग्न झालं का त्यांच्या, काय म्हणत होत्या?’’
‘‘लग्न झालं. सूनही बरोबर होती त्यांच्या. ती छान आहे पण त्या काही फारशा बर्याो वाटत नव्हत्या.’’
‘‘का? काय झालंय?’’
‘‘त्यांनी आधी तुझी चौकशी केली. घर भाड्यानं गेलं का ते विचारलं, तुझ्या इकडे येण्याचं विचारलं आणि मला सुनेपासून बाजूला घेऊन गेल्या. हळू आवाजात म्हणाल्या, ‘‘अहो, अरुंधतीच्या फ्लॅटमधून रात्रीच्या वेळी आवाज येतात हो. भीतीने मला मेलीला झोपच लागत नाही.’’
‘‘काय आमच्या घरून आवाज? कसले आवाज?’’

‘‘आता ते आवाज डॉल्बी डिजिटल येतात की डॉल्बी डिजिटल प्लस ते काही मी विचारत बसले नाही हं अरू. पण त्या माझ्याशी बोलताहेत हे बघून त्यांची सून घाईने आमच्यापाशी आली आणि त्यांना घेऊन तडक निघूनच गेली. त्यांना खूप काही सांगायचं होतं असं वाटलं.’’
आरतीशी बोलणं झाल्यावर त्या विषयाचा विचार करणं भागच झालं. कारण याच जोशीकाकूंनी आम्ही गेल्यापासून एकदाच तीन वर्षांपूर्वी ‘मुलाचं लग्न काढलं आहे, आमची जागा कमी पडतीये. तुमचा फ्लॅट विकताय का’ हे विचारण्यासाठी फोन केला होता. मी स्पष्ट शब्दात ‘नाही’ म्हणाले आणि तो विषय तिथेच राहिला. परवा पुन्हा आरतीचा फोन येऊन गेला. जरा वैतागली होती. आमच्या फ्लॅटमधल्या आवाजांची, दरवाजे, खिडक्या आपटल्याची आणि अजून काय काय घडत असल्याची चर्चा सोसायटीत जोरात झडत होती. साफसफाईसाठी ठेवलेली बाई त्या घरात जायला तयार होत नव्हती आणि आमच्या बिल्डिंगमधले लोक येता-जाता आरतीला या विषयावर छेडत होते. त्याचा त्रास तिने इतका मनाला लावून घेतला होता की ती स्वतःचा फ्लॅट विकून दुसरीकडे जायच्या विचारात होती. तिच्या या निर्णयानं मात्र मला लाजल्यासारखं झालं. शिवाय ती सांगत होती की आठ दिवसांच्या आत आमच्यापैकी कोणी तिथे गेलं नाही तर त्या संकट निवारण यज्ञाचा सगळा खर्च सुमारे एक लाख रुपये आमच्याकडून वसूल करायचा यावर सोसायटीच्या मीटिंगमध्ये एकमत झालं होतं म्हणे. खरं म्हणजे त्यामुळेच मी वेळ न दवडता या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा ठरवला.

नवरा एकटीनं जायला नको म्हणत असतानाच सगळ्यांचा निरोप घेऊन निघाले. मी येणार असल्याबद्दल आरतीला किंवा आमच्या बिल्डिंगमधल्या कोणालाच मुद्दाम कळवलं नव्हतं. कारण सरळ होतं. त्यांच्या मनातील भुतं पळवून लावायची म्हणजे त्या कोणाचीही लुडबुड मला नको होती. रेल्वेच्या निर्धारित वेळेनुसार रात्री दहाला मी तिथे पोचण्याची शक्यता होती, पण गाडी आलीच दीड तास उशिरा, म्हणजे नाशिकला पोहोचायला आता बाराच वाजणार होते. गाडी सुरू झाली. गाडीच्या हेलकाव्याबरोबर डोक्यात विचार पिंगा घालू लागले. विषय तोच होता… भुतांचा. तसा भुताखेतांवर माझा अजिबात विश्वास नाही. त्यामुळे भीतीचं काही कारण नव्हतं आणि समजा माणसांनी केलेल्या कल्पनेप्रमाणे भुतं असतील तर हेवा वाटावा इतकी ती सुखी जमात असावी. शरीरविरहित अवस्था याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे शरीराचं वजन वाढायची भीती नाही, म्हणजे मानव म्हणून असणार्यास ९० टक्के चिंता संपल्या. कपड्यांची गरज नाही म्हणजे त्यांची खरेदी, ते धुणं, वाळवणं, घड्या घालणं कपाटात ठेवणं या निरर्थक कामाच्या या मोठ्या शृंखलेला कात्री. बरं सगळीच माणसं जशी वाईट नसतात, तशी सगळी भुतंही वाईट नसतात असं माणसंच म्हणतात नि मानतातही. काही भुतं त्यांच्या अफाट शक्तीनं झटक्यानं कामं उरकून माणसांना मदत करतात म्हणे. तशा एका भुताची गोष्ट माझी मामी अगदी शपथेवर नेहमी सांगायची. तेव्हा काही वाटायचं नाही, परंतु नंतर संसारात पडल्यावर तशा एखाद्या मदतनीस भुतासोबत प्रत्येक गृहिणीनं मैत्री करायलाच हवी हे प्रकर्षानं वाटून जात होतं… आजवर कोणाकोणाकडून ऐकलेल्या अनेक भुतांच्या गोष्टींची उजळणी करण्यात प्रवास कधी संपला ते कळलंच नाही.

स्टेशनवर दिव्यांचा चांगलाच झगमगाट असला तरी तिथली चहलपहल मंदावल्यागत वाटत होती. एखादा ठेलेवाला, एक-दोन भिकारी, इकडून तिकडे भटकणारी कुत्री आणि आमच्या गाडीतून उतरलेली आणि घाईनं गेटच्या बाहेर जायला निघालेली पाच-पन्नास माणसं… एकंदर एवढीच हालचाल. सामान घेऊन आरामात ह्यांच्याशी फोनवर बोलत निघाले होते तेव्हा एक विचित्र प्रकार लक्षात आला. आमच्या गाडीतले प्रवासी वळूनवळून माझ्याकडे पाहत वेगाने म्हणजे अगदी पळतच तिथून काढता पाय घेत होते. जणू मी त्यांना खाणारच आहे. सामान घेऊन मुख्य गेटपाशी पोहोचेपर्यंत स्टेशन रिकामं झालं होतं. घड्याळ पाहिलं. माझ्या अंदाजानुसार बरोबर बारा वाजता मी पोचले होते. स्टेशनबाहेर येऊन बघते तर एकूण एक प्रवासी गायब. एकदम सामसूम. गाडीतून उतरलेली सगळी माणसं अचानक एखाद्या भयकथेत शोभावीत अशी गायब कशी झाली. संशय दाटून आला. कितीही धीट असले तरी विचारांच्या रूपानं मनात प्रवेशलेली भुतं मन रिकामं करायला तयार नव्हती. बाहेर एकाही रिक्षाचा पत्ता नव्हता. आता कसं गाठायचं घर? पूर्वी समोरच बसस्टँन्ड होतं. आता दिसत नाहीये….

या विचारात असतानाच समोरच्या अंधारात होणार्याव हालचालीनं लक्ष वेधून घेतलं. अंधारात हलणारी ती अस्पष्ट आकृती वेगानं माझ्याच दिशेनं येत होती. ते काय आहे याचा थबकून अंदाजच लावत होते तेवढ्यात ती आकृती माझ्या पुढ्यात उभी राहिली. डोक्यावर दोन, हातात दोन आणि पाठीवर एक भलीमोठी बॅग… असा अक्षरशः सामान लादलेला तो मनुष्य होता. आता रात्री कुठलीच गाडी स्टेशनवर येणार नसताना हा इथे का आलाय… तेही एवढं समान घेऊन. माणूसच आहे ना की… अनेक भूतकथांमध्ये ऐकल्याप्रमाणे मी आधी त्याचे पाय उलटे वगैरे नाहीत ना याची खात्री करून घेतली. त्याचे पाय सरळ असून पायात पॅरॉगॉन हवाई चप्पल आहे हे बघून मीच उडू लागले. जवळ येताच त्याला बस स्टँन्डबद्दल विचारलं. विचारताना त्याचं नाक, डोळे, कान जागच्या जागी आहेत ना याची खात्री केली, कारण आमच्या छबीनेच एकदा सांगितलं होतं की, दर अमावस्येच्या रात्री त्यांच्या घराच्या जवळ असणार्या् वडाखाली गॉगल लावलेली एक व्यक्ती दिसते. ती येणार्या्-जाणार्यां ना एकच प्रश्न विचारते, ‘वेळ किती झालाय?’ आपण वेळ सांगू लागलो की गॉगल वर जातो आणि त्या गॉगलआड डोळेच नसतात म्हणे. गॉगल, टोपी, मफलर यांपैकी कोणत्याच गोष्टी याला परिधान करायला जागा नसल्याने मलाही संशयाला जागा उरली नाही. ‘बाहेर पडलात की उजवा हात घ्या. पाच-सात मिनिटे चाललात की स्टँन्ड लागेल. पण शेवटची बस नुकतीच गेलीये. तुम्हाला माहीत नव्हतं का? सगळे उतारू त्यातूनच तर गेले आत्ता. अवघड आहे. पण बघा तुमचं नशीब जोरावर असेल तर स्टँन्डच्या बाहेर एखादी रिक्षा मिळेल तुम्हाला. नाहीतर माझ्यासारखं सामान घेऊन भटकत राहावं लागेल इथेच..’ एवढं बोलून तो घाईने पुढ्यातून निघून गेला. त्याच्या शेवटच्या त्या गूढ वाक्यामुळे तो नक्की स्टेशनमध्ये जात आहे की मागच्यामागे अदृश्य झाला ते बघण्यासाठी मागे मान वळवण्याची हिंमत काही झाली नाही. सामान घेऊन बाहेर पडण्यासाठी उलट दिशेने पळत सुटले. बाहेर पडताच भोवतालचा अंधार गडद होऊ लागल्यासारखा वाटत होता. उजवीकडे वळले तर थंड हवेचा झोत अंगावर आला. पायाशी धूसर अशी एक सावली एकदम हलली. बेसावधपणे झालेल्या या हालचालीने क्षणभर दचकलेच. समोर बघितलं तर व्यवस्थित पार बांधलेल्या पिंपळाची वार्यालमुळे सळसळ चालली होती. छबी म्हणायची पिंपळावर मुंजा राहतो. तोच इकडून तिकडे फांद्यांवर उड्या मारतो आणि फांद्या सळसळतात. पण मला विचाराल तर भूत नसतंच, पण भुतांवर सोपा उपाय म्हणजे ‘रामनामाचा धावा करणं’ छबीनेच शिकवलं होतं.. राम..राम…राम… बर्याोच लांब पाच-सहा मिणमिणते लाईट्स आणि अंधुक बांधकाम दिसलं. म्हणजे तोच स्टँन्ड असावा. मी त्याच्या दिशेने निघाले. सुदैवाने तिथे रिक्षा होती ती घेऊन मी आमच्या सोसायटीत आले.

बरीच रात्र झाल्यामुळे सोसायटीत सामसूम होती. आमचा वॉचमन गंगाराम मस्तपैकी चढवून, डोळे मिटून गुंगीत डोलत होता. मी त्याच्या समोरून गेल्याचा त्याला पत्ताच नव्हता. घरी पोचताच कंबर कसून साफसफाईला लागावं लागणार होतं. लाईट चालू असतील की नाही धास्तीच होती. पण घरी आल्यावर बटण दाबताच खोली प्रकाशमान झाली आणि आश्चर्याचा धक्काच बसला. आमचं घर चकाचक आवरलेलं होतं. अगदी आम्ही इथे राहत असताना कायम धुळीने माखलेलं झुंबर आणि धुळीत न्हात बसलेल्या बिदरी वर्कच्या फुलदाण्यांसह शोकेससाठी ठोकलेल्या काचाही एकदम नव्यागत स्वच्छ. आम्ही मुद्दाम चालू ठेवलेल्या फोनच्या उपकरणावरही धुळीचा कण नव्हता. स्वच्छतेसाठी बाई इथे यायला तयार नाही असं आरती म्हणत होती मग घर आत्ताच हात फिरविल्यासारखं कसं वगैरे या विचारांच्या फंदात पडलेच नाही. खूप थकले होते. बेडरूममध्ये जाऊन पडल्याबरोबर झोप लागली.

रात्री कधीतरी बाहेरून जोराने दरवाजावर थापा मारल्यागत आवाज येऊ लागले तेव्हा मी खडबडून जागी झाले. थापांचा जोर आता चांगलाच वाढला होता आणि त्याबरोबर अगदी खोलातून एखाद्याने हाका माराव्यात तसे आवाज येऊ लागले. धडपडत उठून बसले. तर खोलीत सगळीकडे काळोख. रात्री एकदम काळोख नको म्हणून लावलेला कमी प्रकाशाचा दिवा उडाला की काय… चाचपडत लाईटचं बटण दाबलं पण उजेड पडला नाही. म्हणजे लाईट गेलेत. आता बाहेरून येणार्याड थापा क्षीण होत बंद झाल्या होत्या पण त्यापेक्षा मोठा बद्द…बद्द… असा खिडकीतून पडल्याचा किंवा उडी मारल्याचा आवाज येऊ लागला. काय प्रकार असावा हा….माझे कान तिकडेच लागून राहिले. तेवढ्यात आमच्या टेलिफोनची बेल वाजू लागली. ती दुप्पट मोठ्या आवाजात वाजत होती. माझ्या काळजात धस्स झालं. एवढ्या रात्री कोणाचा फोन…. स्टेशनवर उतरताच ह्यांना पोचल्याचं कळवलं होतं. अगदी मुलांशीही गप्पा मारल्या होत्या. मग आता कोणाचा फोन? तोही लँडलाईनवर… मनाचा हिय्या करून उठले पण दाराशीच थांबले… हॉलमधे कोणाचा तरी वावर जाणवू लागला होता. इकडून-तिकडे खोलीभर अगदी वेगाने, मधेच वस्तू घरंगळून पडल्याचा आवाज, घशातून निघालेला अस्फुट आवाज, मधेच आलेला गुरकावण्याचा आवाज. आता मात्र घशाला कोरड पडून मला घाम फुटायला लागला. गोंधळून गेले होते आणि अचानक एकदम बेडरूम प्रकाशमान झाली… डोळे फाडून दाराकडे पाहतच होते की पुन्हा मिट्ट काळोख झाला. परत थोडे आवाज… खोलीतला वावर… आणि मग दोन-तीनदा प्रकाश अंधाराचा तोच खेळ. आता मात्र मी पुरती घाबरले. काय चाललंय हे… धीटपणा दाखवत एकटी येण्यात चूकच झाली… काय करू आता… देवा तूच वाचव… भूत नसतंच… पण भुतांवर सोपा उपाय म्हणजे छबीची शिकवण राम…राम…राम…

ऊन अंगावर आल्यावरच सकाळी जाग आली. उठून बसले आणि काल रात्रीचा प्रकार आठवला. बाहेरच्या प्रकाशाबरोबर रात्री मनात ठाण मांडून बसलेली भीती कंटाळून पळाली. बेडरूमच्या खिडकीतून बाहेर लक्ष गेलं. कोवळं ऊन सर्वत्र पसरलं होतं. रस्त्यावरल्या झाडाची सळसळती पानं उन्हामुळे शेंड्याला सोनेरी दिसत होती. गणवेशातील छोटी मुलं चिमुकलं दप्तर सावरत गटा-गटानं रस्त्याच्या कडेनं निघाली होती. हूं… भूत-बित काही नसतंच. काल रात्री भीतीनं स्वप्न पडलं असावं.

सहजतेनं मी हॉलमध्ये आले आणि माझी नजर खिडकीशी थबकली. काल खिडकी बंद करून झोपले होते मग आज ती उघडी कशी… दिवाणकडे लक्ष गेलं. रात्री चांगली स्वच्छ झटकून टाकल्यागत दिसलेली चादर आज अशी घाण… काय पडलंय त्यावर अन्नाचे तुकडे… जवळ जाऊन पाहिलं तर वडा आणि पावचे तुकडे… म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे. आजकालची भुतं वडापावही खातात वाटतं… कधी ऐकलं नव्हतं. पण काय करतील, त्यांनाही या जंकफूडची चटक लागली म्हणायची… इतके दिवस बंद असलेलं घर काल आले तेव्हा नुकतंच साफसफाई केल्यासारखं स्वच्छ कसं होतं.. आणि कालच ऐकलेले ते गुरकावण्याचे आणि त्या पाठोपाठ घशातून निघालेले अस्फुट आवाज… परत भीतीनं घेरायला सुरुवात झाली… आरतीकडे जावं का? लोक काय-काय बोलतात शहनिशा करून यावं का.. आमच्या सोसायटीचे अध्यक्ष कोपरखळे. त्यांनी सांगितलेला आमच्या खालच्या मजल्यावरच्या नेन्यांचाच अनुभव नाही का… घरून विरोध असल्यानं नेने रात्री सिगारेट ओढायला गच्चीवर जात. त्या दिवशी लाईट गेल्यामुळे लिफ्ट बंद होती म्हणून पायर्यां नी जाऊ लागले तर अंधारात आमच्या दाराशी पांढर्याद कपड्यातली आकृती बसली होती म्हणे. त्या दृश्यानं त्यांची इतकी घाबरगुंडी उडाली की पुन्हा सिगारेट पिण्यासाठी त्यांचा हातच वळला नाही म्हणे. मिसेस नेनेंनी फार खूष होत ‘कोणाला सांगू नका पण असं असं झालं नि नवर्याळने सिगारेट सोडून दिलं’ म्हणत ही बातमी फोडली आणि काय सांगता… पापी लोकांनी पापं फेडण्यास काशीत गर्दी करावी तशी व्यसनी नवर्यां च्या बायकांनी नवर्यायची व्यसनं फेडण्यासाठी आमच्या बिल्डिंगपाशी गर्दी केली. पापं गंगार्पण करीत घाटाच्या पायर्यां वर सोडून जावं तसं बायकांनी आपले व्यसनी नवरे रात्री-अपरात्री आमच्या बिल्डिंगच्या पायर्यांाशी सोडायला सुरुवात केली होती म्हणे. त्यातून व्यसन सुटण्यासाठी कोणाला फायदा झाला माहीत नाही पण लिफ्ट बंद ठेवण्यासाठी बायकांना केलेल्या सहकार्यामुळे आमचा वॉचमन गंगारामची रोज तर्रर्र होऊन स्वर्गात जाऊन पडण्याची सोय मात्र झाली. पण काहीही असो, नेनेंना खरंच पांढर्या् कपड्यातील आकृती दिसली असेल का… तो किस्सा विचारून येऊयात का आरतीला? किंवा शेजारच्या जोशींकडे? त्यांना कसले आवाज ऐकू येतात ते तरी विचारून बघू… पण नकोच आजची रात्र काय होतंय ते पाहावं…

घर साफ करून, अंघोळ करून बाहेर पडले. इकडे-तिकडे दिवस घालवला आणि मुद्दामच थोडा अंधार पडल्यावर घर गाठलं. रात्री जेवणासाठी माझ्या आवडीच्या पनीर-पराठ्यांचं पार्सल बरोबर आणलंच होतं. खाऊन उरलेला पुडा बंद करून झोपले. आज रात्री काय होतंय याची थोडी धाकधूक होतीच. बेडरूमचं दार लावून झोपले. तरी झोप कुठची लागायची. डोळे मिटले तरी मन टक्क जागे. तेवढ्यात दारावर जोराने थाप ऐकू आली पण एकदाच. मग खिडकी उघडल्याचा आणि त्यापाठोपाठ हॉलमध्ये वावर असल्याचे आवाज येऊ लागले. काल खिडक्या लोटल्या होत्या आज मात्र कोयंडे लावले होते. काही वेळाने स्वयंपाकघरातून भांडी सरकविल्याचे आवाज येऊ लागले. मी सावध झाले. आज मात्र मी सगळी व्यवस्था नीट केली होती. माझ्या बेडरूममधला लाईट बंदच ठेवला असला तरी बाकी प्रत्येक खोलीत एक तरी लाईट चालू ठेवला होता. त्यामुळे बंद दाराच्या फटीतून प्रकाश आत झेपावत होता. आवाज सुरू होताच भीतीने स्तब्ध होत त्यावर मी लक्ष ठेवून होते. बंद दाराजवळून कोणीतरी गेलं असावं कारण एखादी आकृती पुढे सरकावी तसा काळोख फटीतून जाणवला. भीतीने अंगावर सरसरून काटा आला. उद्या सकाळ होताच इथून निघून जावं. फालतू साहसात पडायचं कारण नाही. भूत असतं-नसतं सिद्ध करण्याचा ठेका काही आपण घेतला नाहीये. संकट निवारण की भूत निवारण कोणताही का असेना तो यज्ञ करणारे करतील, त्याचे पैसे भरणारे भरतील… नाहीतर हा फ्लॅट विकतील. हे चार-पाच तास निर्धोक गेले म्हणजे झाले… राम…राम…राम…

पाखरांच्या किलबिलीसोबत सकाळचा उजेड खिडकीतून आत येऊ लागला. चांगलं उजाडल्याची खात्री करूनच जागची उठले. किचनमधल्या भांड्यांचा रात्री आलेला आवाज आठवला म्हणून तिथे गेले. पाहते तर काल रात्री खाऊन ठेवलेला पराठ्याचा पुडा ओट्याच्या पार दुसर्याआच टोकाला आणि तोही रिकामा. म्हणजे पराठा कोणीतरी खाल्लाय. खाली बघते तर सिगारेटचं एक थोटूक पडलेलं. इथं सिगारेट कशी आली… मला घाम यायला सुरुवात झाली. थोडं घाबरतच बाहेर हॉलमध्ये गेले आणि स्तब्ध झाले. कोपर्यापतल्या फोनचा रिसिव्हर चक्क खाली लोंबकळत होता. दोन पावलं पुढे होत रिसिव्हर उचलू लागले तर पुन्हा तिथे सिगारेटची थोटकं पडलेली दिसली आणि सोबत पनीर-पराठ्याचे तुकडे… बापरे हे काय होतंय… म्हणजे काल आणि परवा रात्री आपण एकट्याच नव्हतो या घरात. मग कोण होतं या घरात आपल्याशिवाय….सरळ सामान घेऊन चालू पडावं, इथे थांबण्यात अर्थ नाही. भीतीने काही सुचतच नव्हतं. पण कशी कोणास ठाऊक मला एकदम डिजिटल कॅमेर्याहची आठवण झाली. काल रात्री झोपण्यापूर्वी मीच तो तत्सम भुतांचं चित्रीकरण करण्यासाठी हॉलमध्ये ठेवला होता.

हो म्हणजे.. काल रात्री झोपताना मला मुलांची आठवण आली आणि आल्यापासून घडत असलेल्या गोंधळात पूर्ण विसर पडलेल्या घोस्ट हंटिंगसाठी त्यांनी दिलेल्या बॅगचीही… बघावं तरी मुलांनी भूत मारायला असं काय सामान दिलं आहे म्हणत बॅग उघडून बघते तर त्यात डिजिटल कॅमेरा. ते बघून त्याही अवस्थेत हसायलाच आलं आणि मुलांच्या निरोपाची आठवण झाली. ‘भूत दिसलं तर शूट कर. म्हणजे तुझी ब्रेव्हरी पोस्ट करता येईल. यातून कित्येक लोकांना नॉलेज मिळेल.’ …ओह बेट्यांनो, शूट याचा अर्थ मारणं नव्हता तर… पठ्ठ्यांना भुताचं आयतं चित्रीकरण हवं आहे.. तेही पोस्ट करायला म्हणे… रात्री कॅमेरा शूट मोडवर ठेवला असला तरी चित्रीकरण होण्याची काही खात्री नव्हती. हॉलमधली खिडकी आणि त्या समोरील सगळी खोली चित्रीकरणात यावी या दृष्टीनं कॅमेर्या्ची जागा निश्चित केली होती. काय दिसेल कोणास ठाऊक… मनात भीतीची लहर उमटली. खरोखरच काही भूतबित दिसलं तर अवघडच होईल. छबी सांगते त्याप्रमाणे भूत बघितलेली व्यक्ती तिसर्या दिवशी मरते म्हणे. तसं असेल तर आजच घर गाठायला हवं म्हणजे निदान मुला-माणसात तरी मरण येईल. उगाच माझा आत्मा मुलांची आणि नवर्याहची शेवटची भेट हुकली या अतृप्तीने भूत बनून भटकायला नको. पण यातही माणसांची एकवाक्यता नाहीये. मामी सांगत होती की त्यांच्या गावाच्या बंड्यानं भूत पाहिल्यापासून तो आजन्म बरळत सुटला होता म्हणे… तसं असेल तर हरकत नाही. कारण माझं एरवीचंच बोलणं आमच्या घरातील लोक ते बरळणं आहे या समजुतीनं दुर्लक्षित करतात म्हणा. पण नकोच… भूत आहे-नाही हे बघायच्या भानगडीत न पडता सरळ सामान उचलून चालायला लागूयात… पण दोन रात्री धीटपणे एकट्यानं काढल्या आणि आता मागे का हटायचं… काय व्हायचं ते होऊ दे.. भूत बघायची संधी सोडायची नाही.

अस्वस्थ मनानंच चित्रीकरण पाहायला सुरुवात केली. पहिलं स्क्रीनवर सगळं धूसर दिसू लागलं. त्या धूसरतेतच एक अस्पष्ट काळी आकृती उभी राहिली. मी आवंढा गिळला. काळी आकृती हलू लागली. एका टोकापासून दुसर्या् टोकापर्यंत तिचा वावर सुरू झाला. धडधडत्या अंतकरणाने पाहत होते. हळूहळू आकृतीत स्पष्टता येऊ लागली. कॅमेर्यााने लेन्स अॅाडजेस्ट केली आणि धूसर, अस्पष्ट काळी आकृती स्पष्ट झाली. ओह माय गॉड!! प्रचंड वेगानं धडधडणारं हृदय थांबतं की काय अशी परिस्थिती झाली. समोरील आकृती बघून मात्र मला प्रचंड धक्काच बसला. ती हलणारी, इकडून तिकडे जाणारी, माझं हृदय बंद पाडण्याचा प्रयत्न करणारी काळी धूसर आकृती एका मूषकाची होती. नाक फुरफुरवत, काळ्याभोर डोळ्यांनी टुकटुक बघत तो कॅमेर्याीसमोर धीटपणे स्थिर उभा होता. त्याची धिटाई बघून एक-एक करत थोड्याच वेळात त्याचे भाऊबंदही कुठून कुठून जमा झाले. पळापळी, वायरची ओढाओढी, धुडगूस जोरात सुरू झाला. डिजिटल कॅमेर्याीबद्दल त्यांना विशेष आस्था वाटली असावी कारण आळीपाळीने ते त्याला धडका देणं, त्याला चावण्याचा प्रयत्न करणं, त्यावर उडी मारणं हे प्रकार जोमानं करू लागले. मी नीट लक्ष देऊन बघितलं तर खिडकीला लावलेल्या पडद्याच्या रॉडवरून उड्या मारीत मूषक घरात एन्ट्री मारत होते आणि त्यातील बर्याखच जणांची उडी भिंतीत ठोकलेल्या काचेच्या स्टॅन्डवर ज्यावर फोन ठेवला होता तिथे पडत होती. त्या भानगडीत रिसिव्हर पडला होता. सगळे मस्तीच्या मूडमध्ये चेकाळल्यागत फिरत होते. हा त्यांचा पार्टी टाईम असावा म्हणून मजा मारण्याच्या दृष्टीने त्यातील काहींनी सिगारेटची थोटकं सोबत आणली होती. पार्टीसाठी खाण्या-पिण्याची व्यवस्था म्हणून एक-दोघांनी किचन गाठून पराठा बाहेर आणला होता. तो मिळविण्यासाठी पळापळी सुरू झाली होती. त्यात काही तुकडे पडले. तेवढ्यात खिडकीवर जोराची थाप पडली आणि मूषक पार्टी बिथरली. खिडकीचा कोयंडा थापेमुळे निसटून खाली आला. खिडकी उघडली गेली आणि संधिसाधू मनीम्यावने रंगलेल्या पार्टीत प्रवेश केला. परंतु तिच्या स्वागताला मूषक कुठचे थांबताहेत… सगळा समुदाय पसार. पण मनीम्याव कच्च्या गुरूची चेली नव्हती काही… आफ्टर ऑल तीही पार्टीत मजा मारायलाच आली होती. तिनं पळापळी करीत एक-दोघांचा पाठलाग सुरू केला. चुहा आगे बिल्ली पीछे असा सिलसिला बराच वेळ चालला. शेवटी पकडीत आलेले मूषक तिनं पंजाखाली दाबून ठेवले. त्यांच्या अस्फुट किंकाळ्या आणि तिचं गुरकावणं… तिला हुलकावणी देत त्यांचं सुटून पळणं आणि तिचा पुन्हा पाठलाग… सगळा प्रकार बघून हसणं आवरणं शक्यच नव्हतं. खो खो हसत सुटले. तेवढ्यात दारावरली बेल वाजली. जरा गोंधळलेच. मी इथे आहे हे कोणालाच माहीत नाही मग कोण आलंय. दार उघडलं तर दारात आरती. तिच्या मागे पाठमोरं पांढर्याो पातळात कोणीतरी जोशींच्या दाराकडे निघालेलं दिसलं. ‘‘काय गं तू कशी?’’ मी विचारलं.

‘‘कशी म्हणजे काय… परवा रात्री दार का नाही उघडलंस? किती थापा मारल्या दारावर पण उघडलंच नाहीस.’’ वैतागून ती.
‘‘पण मी आलेलं तुला…’’
‘‘तू नाही सांगितलं म्हणून काय झालं? भावजींना किती काळजी तुझी. तू तिकडून निघालीस तेव्हाच त्यांनी कळवलं होतं मला. लगेच कामवाल्या बाईला पकडून आणून साफसफाई करवून घेतली. पण रात्री माझ्या दिरांचा निरोप आला. आमच्या सासूबाईंची तब्येत जास्त झाली म्हणून. लगेच गाडी ठरवून गावी निघायचं ठरलं. मुलांची सोय लावली आणि तुझी खबर घ्यायला आलो तर दार उघडलंच नाहीस. काय गोंधळ नुसता… नेमके लाईटही गेले तेव्हाच… मोबाईल लागत नव्हता तुझा आणि फोन तू उचलत नव्हतीस… हाकाही किती मारल्या तुला… शेवटी कंटाळून निघून गेलो आम्ही.’’
‘‘म्हणजे त्या रात्री फोन करणारी आणि दारावर थापा देणारी तू होतीस… कमाल आहे. बरं ते राहू दे. पण तुझ्या सासूबाई कशा आहेत?’’
‘‘आता धोका टळला. चांगल्या आहेत त्या.’’
‘‘पण आरती आत्ता तुझ्या मागे त्या पाठमोर्याय कोण होत्या? पांढरं पातळ घातलेल्या.’’
‘‘जोशी काकू. तेच मी विचारत होते. त्यांना माहिती आहे का तू आल्याचं. दाराला कान लावून बसल्या होत्या. परवाच गंगाराम सांगत होता की त्या तुझ्या दाराशी बसून असतात म्हणे रात्रंदिवस. डोक्यावर थोडा परिणाम झालाय त्यांच्या. त्यामुळेच त्यांची सून कोणाशी बोलू देत नाही त्यांना.’’
‘‘ओह म्हणजे नेन्यांना दिसलेल्या पांढर्याय आकृतीचं प्रकरणही निकालात निघालं म्हणायचं. आणि काय गं आरती, त्या गीताची मांजरं चांगली गुबगुबीत झालीयेत गं?’’
बेसावधपणे ती सांगू लागली, ‘‘हो, गीता वैतागून सांगत होती परवा… ती एवढं चांगलं-चुंगलं खायला देते… ते सोडून कुठून तरी उंदीर मारून आणतात म्हणे रोज खायला… पण तुला काय माहीत गं तिच्या मांजरांबद्दल?’’
मी हसत सुटले. ती वेड्यासारखी माझ्या तोंडाकडे बघत राहिली. मला आणखीच हसू येऊ लागलं. मग माझा हात पकडून म्हणाली, ‘‘अरू, तू ठीक आहेस ना.. म्हणजे काल नि परवा रात्री एकटीच होतीस… काही अनुभव आले का गं?’’ मला आणखी जोरात हसू येऊ लागलं. तशी ती जरा गंभीर झाली, ‘‘सोन्यासारखा संसार आहे तुझा, कशाला या फालतू फंदात पडलीस. भावोजींना फोन लावू का? काही दिसलं का तुला? म्हणजे लोकं बोलतात न् भूत म्हणजे या घरात कोणाचा तरी वास आहे वगैरे…’’
‘‘लोक अगदी बरोबर बोलतात आरती. आमच्या या घरात एकाचा नव्हे अनेकांचा वास होता… म्हणजे प्रचंड गडबड चालली होती गं… चल तुला दाखवते.’’
साशंकतेनंच जरा भीत-भीतच ती माझ्या मागे आली. मी ‘ती’ क्लिप सुरू केली आणि तीही रंगून जाऊन रात्री घडणार्यात मूषक लीला ‘आ’ वासून पाहत राहिली.

दीपा मंडलिक, मुंबई
dvmandlik@gmail.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.