Now Reading
भांडान

भांडान

Menaka Prakashan

शिगण्यांच्या घरात भांडाण लागल्याची बातमी वार्या सारखी गावात पसरली होती. कुणाचाही विश्वास बसणार नाही अशी ती बातमी म्हणजे गावाला नवलच होतं. कारण शिगण्यांच्या घरात साधी कुरबूर झाल्याचं सार्यात गावात कधी कुणी ऐकलं नव्हतं. तसं गावातल्या काही इब्लीस लोकांनी त्या कुटुंबात लावालावी करण्याचा प्रयत्न करूनही पाहिला होता, पण प्रत्येक वेळी ती लोकं तोंडघशी पडली होती.

आरं, राजाचा पत्ता कुठाय रं? लयी दिस झालं, दिसला बी न्हाय?’’ शिरपानं नाग्याला विचारलं.
दिवसभर कितीही आणि कुठेही कामं असली तरी रात्रीची जेवणं झाली की तासभर तरी पारावर बसून बाण्या हाणायच्या हा शिगण्याचा राजा आणि त्याच्या चार-पाच मित्रांचा कित्येक वर्षांचा नेम… पण कितीतरी दिवसांपासून म्हणजे जवळ जवळ लग्न झाल्यापासून राजा पारावर आला नव्हता.
‘‘आरं मर्दा, लगीन झालंय तेचं.. नवा नवा नवरा हाय.. त्येला हितं याला टाईम घावाय नगं व्हय..?’’ नाग्या डावा डोळा बारीक करीत हसत म्हणाला.
‘‘नवा नवा नवरा..? म्हंजी? लगनाच्या टायमाला बाकीची समदी काय जुनं जुनं नवरं असत्यात व्हय रं? आरंऽऽ काय मर्दा, काय बी बोलतूयास व्हय?’’
शिरपाचं नाग्याकडं लक्षच नव्हतं.. तो आपल्याच नादात न्हायतर काय? ‘‘ह्यो आसं बोलाय लागलाय जसा ह्यो हिकडं लगीन लागलं आन् लगूलग ह्यो पारावं आलाय दोस्तातनी बसाय आरं! सालभर त्वांड बी न्हवतं दावलं मर्दानं.. आखिरीला बायकूनं हाकालला घरातनं तवा पारावं याला लागला.’’
पारावार खसखस पिकली.
‘‘आरं, गप की मर्दा, उगा येकांद्याची किस्ती खेचायची?’’
‘‘व्हंय. तुजं लगीन झाल्याव बगू की..’’
‘‘आरं मर्दानू, इशय काय आन् न्हेताय कुठं? आपला राजा…’’
‘तसं न्हवं रं..’’
‘तसं न्हवं तर कसं?’’
‘‘आरं, घरात नवं माणूस आल्यालं आस्तंया..’’
‘‘व्हय, आता तूच शिकीव आमास्नी, आन् तुला काय ठावं रं? आरं ल्येका, तुजं लगीन ना फीगीन.. आन् आमास्नी शिकवाय लागलंय..’’
‘‘व्हय रं? समद्या दोस्तांत येकलाच र्हांयलायास की रं बिनलग्नाचा.. का रं?’’
‘‘आरं, त्येला काय ईचारतूस ? पोरगी नगं द्याला कुनी?’’
‘‘खराय मर्दा, व्हय रं, कुनीबी पोरगी दिना काय रं तुला?’’
‘‘व्हय रं.. हाय का वैनीची येकांदी भन बिन? लगूलग उरकून टाकू.’’
‘‘म्हंजी गुडग्याला बाशिंग बांधूनच हायस म्हन की..’’
‘‘तुमच्या संगती र्हाायाचं म्हनल्याव नगं का तुमच्यावानी र्हागयाला..’’
‘‘नगं रं बाबा, असं येड्यावानी करूस.. आरं मर्दा, उगा सुकात हायस..’’
‘‘म्हंजी?’’
‘‘राजाला ईचार. आरं लगीन म्हंजी क ची बाराखडी अस्तीया.’’
‘‘क ची बाराखडी? म्हंजी रं?’’
‘‘कुनीकडं निगालायसा? कशापाय निगालायासा? कुनी बोलीवलंय? कंचं काम हाय? कवासं येणार हायसा?’’
‘‘म्हंजी लगूलग जूपीच हूतीया म्हन की.’’
‘‘तर काय… वरीसभर लाडीगोडीनं आन् मागनं मातूर चिडीनं.’’
‘‘ए लाडीगोडीच्या.. आरं, मी राजा आला न्हाय त्येचं ईचारत हुतो. त्येचं काय?’’
शिरपानं मूळ विषयाला परत हात घातला.
‘‘आरं, त्योबी आडिकला आसंल क च्या बाराखडीत.’’ हसत हसत नाग्या म्हणाला आणि पारावर सगळ्यांनाच हसू फुटलं.
‘‘चला, जाया पायजेल. लई वखुत झालाय.’’ जगन्या उठता उठता म्हणाला.
‘‘व्हय. जा बाबा न्हायतर तुजी क ची बाराखडी घरात घ्याची न्हाय.’’ खंड्यानं जगन्याला चिमटा काढला.
‘‘आन् तुजी घील म्हन की? जेवाय न्हाय वाडलं कवा तर येत जा घरला उगा अनमान करू नगं.’’
‘‘व्हय. ईन की. पर तुला वाडत्यात न्हवं? न्हायतर उगड्यापाशी म्हंत्यात तसं.. रात सारी थंडीनं काकडून म्येलं असं हुयाचं?’’
सगळीच हसत हसत उठली आणि आपआपल्या घराकडं गेली. शिरपा मात्र तिथंच बसून होता. का कुणास ठाऊक पण त्याला राजाची आठवण येत होती. दुसर्याप दिवशी राजाच्या घराकडं जावं असा विचार करून तो उठणार तेवढ्यात त्याला दूरवर राजा दिसला. शिरपा त्याला हाळी मारणार होता पण राजा पाराकडंच येतोय हे लक्षात आलं तसं त्याने हाळी मारायचा विचार सोडून दिला.
‘‘हे भले, आज दोस्तांचं ध्यान झालं व्हय?’’
राजा जवळ येताच त्यानं राजाला विचारलं. राजा काहीच बोलला नाही. गप्पगप्पसा पारावर बसला. शिरपानं त्याच्याकडं पाहिलं आणि त्याचं काहीतरी बिनसलंय हे शिरपाच्या ध्यानात आलं. राजा स्वतःहून काहीतरी बोलेल म्हणून तो वाट पाहत बसला पण बराच वेळ राजा काहीच बोलला नाही तेव्हा शिरपानं त्याला विचारलं, ‘‘काय झालंय रं? येवडा गप का झालाईस्?’’
शिरपा एवढं खोदून विचारत होता पण राजा गप्पच बसला होता.
‘‘ह्ये बग राजा, त्वान्ड उगाडनार हाईस का न्हाईस? आरं बोलाल्याबिगर उमजंल कसं? आन् उमाजलंच न्हाई तर म्होरं वाट कशी चालाय ईल?’’
शिरपा एवढं बोलला तरी राजा ढिम्मच् .
‘‘वैनी बरी हाय न्हवं?’’
‘‘आसंल की..’’
‘‘आसंल की म्हंजी रं? हे काय बोलनं म्हनायचं का बोलन्याचं पिल्लू? भांडान बिंडान केलं का काय त्वा, वैनीसंगं?’’
‘‘भांडान काडाय आगुदर भेटाय, बोलाय पायजेल.’’
‘‘क्कायऽऽ? म्हंजी अजून बोलतबी न्हाईसा?’’
‘आजुनबी न्हाय.’’
‘‘पर का?’’
‘‘म्हातारी आय म्हनली, गणपती पातुर न्हाय बोलायचं. रीत हाय म्हनं शिगणे घराण्याची.’’
‘‘आरं, म्हातारी आय गावाला गेलीया न्हवं? आता बोलाय काय हुतंय?’’
‘‘आरं शिरपा, म्हातारी आय गावाला गेलीया पर घरात समदा बारदाना हाय. बोलाय न्हाय येत.’’
शिरपा आणि राजा बराच वेळ बोलत बसले होते. राजाचं लग्न झालं होतं पण घराण्यात चालत आलेल्या रीतीमुळे तो बायकोशी बोलूही शकत नव्हता. त्याचं मन त्यासाठी तडफडत होतं .
राजा आणि शिरपा पारावरून उठले तेव्हा आकाशातलं मळभ हटावं तशी राजाच्या मनातली आणि चेहर्यािवरची उदासीनता हटली होती. निश्चयी मनाने राजा घरी परतला होता.

‘‘येवड्या येरवाळी कुनाचं गं भांडान लागलंया?’’ हौसानं कानोसा घेण्याचा प्रयत्न करीत मिश्रीची पिचकारी टाकून गोठ्यात म्हशीपुढे वैरण टाकत असलेल्या सुनेला विचारलं.
‘‘म्या काय आइकलं न्हाई जी.. आत्ताच वैरणीस्नं आलो न्हव का? मला कसं ठावं आसंल?’’
‘‘ठावं हाय किस्ती कामाची हाईस ती.. जलम ग्येला राबून राबून.. डुईचं पार क्यास ग्येलं वैरणीचं वजं उचलून. आन काल ग्येली न्हाय निस्ती वैरण टाकाय तर आज सांगाय लागलीया.. तुला सवंनं इचाराय आलो तर लागली कामाचं सांगाय.. येवडी तालेवाराची हुतीस तर सांगायचं बाला येकांदा सायेब बगाय.. मला सांगाय लागलीया कामाचं..’’ हौसा करवादली.
‘‘उगा बा चं नाव मदी घ्याचं काम न्हाय सांगून ठ्येवते.. आन् म्या कवा काय सांगाय आलोतो कामाचं.. उगा काय तरी काडूून तंडू नगासा येरवाळचं.’’
सुनेनं आता सासूचं काहीही ऐकून घ्यायचंच नाही असं ठरवलं असल्यासारखं लगेच प्रत्युुत्तर केलं.
‘‘मला कशापाय सांगाय पायजेल? समद्या गावाला आयकाय जातं, ती का मला आयकाय येत न्हाय व्हंय? कवाबी बोलायचं ती करण्यातनं बोलल्यावानी काम वावभर आन् बोंब गावभर .. समद्यासनी वाटाय पायजेल.. सासू लय जाच करती.’’
‘‘मी कवा कुणासंगं बोलाय बी जात न्हाय.. तरीबी तुमचं आसं.. आन् सांगाय कशापाय पायजेल.. द्येवानं समद्यास्नी कान-डोळं दिल्यालं हायतीच की.. त्यास्नी आयकायबी येतं.. बगायबी येतं.’’
सासू-सुनेच्या भांडणात मधे कोण पडणार? पण आपण मधे पडलो नाही तर सारा दिवस त्या भांडायच्या थांबणार नाहीत हे हौसाच्या लेकाला, जगूला ठाऊक होतं.
‘‘ए, गप बसा आता.. येरवाळचं काय लावलंयसा ही?’’
‘‘मला नगं काय सांगूस. सांग तुज्या बायकूला. उगा वचावचा कराय लागलीया मगाधरनं..’’
‘‘मी कायबी वचावचा केलं न्हाय. वैरण टाकताना ह्येनीच ईचारलं, कुनाचं भांडाण लागलंया? मला काय ठावं त्ये?’’
‘‘ही लय झ्याक हाय. कुनाचं तरी भांडाण लागलंया आन् तेच्यावंनं तुमी भांडाय लागलासा व्हंय? आगं आये, मी बी आईकलं भांडाण लागल्यालं. शिगण्याच्या घराकडनं येत हुता आवाज.’’ जगू आईला म्हणाला.
‘‘काय सांगतूयस जगन्या? आरं, शिगण्याच्या घरचा येवढा मोठ्ठा बारदाना हाय पर कवा भांड्याला भांडं लागलं न्हाय.’’
‘‘व्हय.. आजपातूर लागलं न्हाय पर आता राजाचं लगीन झालंया.. नवी नवरी आलीया घरात.’’
‘‘व्हंय बाबा, ती बी खरंच हाय.. आजकालच्या पोरी म्हंजी..’’
‘‘ये आये, तसं न्हवतं म्हनायचं मला.. तू उगा पुन्यांदा सुरू करू नगंस..’’
शिगण्याच्या घरात भांडाण लागल्याची बातमी वार्या.सारखी गावात पसरली होती. कुणाचाही विश्वास बसणार नाही अशी ती बातमी म्हणजे गावाला नवलच होतं कारण शिगण्यांच्या घरात साधी कुरबूर झाल्याचं सार्यात गावात कधी कुणी ऐकलं नव्हतं. तसं गावातल्या काही इब्लीस लोकांनी त्या कुटुंबात लावालावी करण्याचा प्रयत्न करूनही पाहिला होता, पण प्रत्येक वेळी ती लोकं तोंडघशी पडली होती.
आधी नाना शिगणे आणि त्यांच्या पश्चात त्यांचा धाकटा लेक दादा शिगणे म्हणतील ती शिगण्यांच्या घरातली पूर्वदिशा. लहान-मोठी घरातली सगळी त्यांच्या शब्दाबाहेर नसायची. अजूनही नाहीत. चार घरच्या चार जणी घरात येऊनसुद्धा घरात भांडण कसलं ते नाही आणि हेच खरं तर सार्यात गावाला पडलेलं कोडंच होतं. न सुटणारं कोडं. नाना शिगणे माळकरी माणूस, पंढरीच्या पांडुरंगाची महिन्याची वारी करणारा. आषाढी- कार्तिकीला तर दिंडीतून पायी पंढरीला जाणारा. नानाच्या माघारी दादा शिगण्यांनी माळ घालून तोच वारसा चालवलेला. सारं घरंच भक्तिमार्गातलं आणि भक्तिमार्ग सावता माळ्याचा.. ‘कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई माझी’ म्हणणारा.. प्रत्येक जण मातीत राबणारा.. काळ्या मातीत सावळी विठाई पाहणारा.. शिगण्याच्या अशा घरात भांडण झालं हा सार्याझ गावात आश्चर्याचा आणि चर्चेचा विषय झाला होता.
नेहमीप्रमाणे दादा शिगणे वारीला गेले होते. प्रत्येक जण कामाच्या रामरगाड्यात आकंठ बुडून गेलेला होता. कामाचा घायटा उठला होता. सर्वजण आपापलं आवरून रानात जायची तयारी करत होते. राजाची आई कोणी कुठल्या वावरात जायचं ते सांगून कामाचं वाटप करत होती. सगळी आपापल्या कामाला निघून गेली. घरात सासू-सून दोघीच उरल्या.
गावाच्या तिन्ही दिशेला असणारी शिगण्यांची वावरं तशी गावाजवळच होती. मात्र चौथं गावापासून तीन-चार मैलांवर असणारं डोंगराच्या पायथ्याचं बिबट्याचं रान. कधीकाळी त्या शिवारात.. डोंगरात बिबट्याचा वावरं होता म्हणे, त्यावरून त्या शिवाराला ते नाव पडलेलं होतं. बाहेर गेलेला राजा परत आला.
‘‘आये, समदी ग्येली?’’
‘‘व्हय.’’
‘‘आन् बिबट्याच्या रानाचं काय? ततं कोन?’’ राजानं आईला विचारलं.
‘‘आरं, तकडं र्हायऊदे आज..’’
‘‘का?’’
‘‘कोन जायचं येवड्या लाम्ब?’’
‘‘तुजी सून हाय की.’’
‘‘आरं, नवी नवरी हाय ती. तिला रानात लावून द्याचं व्हय लगीच.’’
राजा एकदम तडकलाच.
‘‘हूं ऽऽ नवी नवरी.. बास झालं आता ती.. हितं रानातली कामं तुंबल्यात आन् तुमी बसा नवी नवरी म्हणून डोस्क्यावं घिवून.’’
आपल्या नवर्यांला एकदम असं चिडायला काय झालं हे न समजून राजाची बायको राजाकडे आणि सासूकडे पाहत राहिली.
‘‘आरं पर…’’
‘‘आरं न्हाय आन् फिरं न्हाय.. तसलं कायबी लाड नगं.. बिबट्याच्या रानात जायाला सांग तिला.’’
‘‘आरं पर येकली?’’
‘‘नगं जाया कामाच्या घायट्यात?’’
‘‘कुणाला तरी संगती नगं धाडाय?’’
‘‘कशापाय? काय बिबट्या खातूय व्हंय?’’
‘‘आरं, तसं कसं? ते रान बी ठावं न्हाय तिला.’’
‘‘मला तरी ठावं हाय न्हवं?’’
‘‘बरं बाबा जा..पर तन्डू नगं आता. आनी कोन संगं हाय न्हवं? न्हवं, बिबट्याचा कायबी नेम नस्तूया.. कुनीबी संगती असलेलं बरं.. न्हायतर तुजी म्हातारी आय आल्यावं मला बडबडंल.. उगा कंचा तरास नगं बग..’’
राजाचा एवढा वेळ टिपेला गेलेला आवाज खाली आला. आपली आई अजूनही तिच्या सासूला म्हणजे म्हातार्या आईला घाबरते हे पाहून त्याला खरं तर हसू आलं होतं, पण ते त्यानं दाबलं. राजाची बायको, रमा आधीच नवर्याईवर चिडली होती. त्यात ती झाल्या भांडणानं अधिकच चिडली. पण ती माय-लेकाच्या भांडणात काहीच बोलली नाही. एक तर लग्न झाल्यापासून नवरा एक शब्द बोलला नव्हता. एकमेकांबद्दल मनात वाटणारी ओढ मनातच होती.. आणि त्यामुळे ती त्याच्यावर जास्त नाराजही होती.
‘दोन शब्द बोलायला जमत नाही यांना… पण रानातल्या कामाला जुंपण्यासाठी सासूबाईबरोबर भांडण काढलं.’ रमाच्या मनाला हाच विचार त्रास देत होता. रानात जायचं म्हटल्यावर रमानं काही न बोलता जेवण बांधायला घेतलं.
‘‘आत्ती, जेवान किस्तं बांदू?’’ रमानं सासूबाईंना विचारलं.
‘‘संगती कोन कोन येनार हाय रं? त्येचंबी जेवान घ्याला बरं.’’
‘‘हायती. शिरपा न् दोगंजनं, पर त्येचं जेवान कशापाई?’’
‘‘आरं, आपल्या रानात येत्याती आन् त्येंचं जेवान घ्याला नगं व्हय?’’
‘‘दे काय द्याचं आसंल ती… पर लै येळ नगं लावूस.’’
राजा काहीतरी बोलायचं म्हणून बोलला होता. त्याचं मन कधीच रानात पोहोचलं होतं.
डोंगराकडचं बिबट्याचं रान त्याला खूप आवडायचं. त्याच्या आजोबांनी डोंगरकडेच्या बांधावर ओळीने आंब्याची पाच झाडं लावून अगदी उन्हाळाभर कावडीने पाणी घालून चांगलीच जोपासली होती. ती झाडं आता चांगलीच मोठी झाली होती. अगदी दीड-दोन कवळ्यात मावणार नाही एवढा खोडाचा घेर झाला होता. एकेका झाडाची गर्द सावली चांगली दोनेक गुंठ्यांत पसरलेली असायची. त्या आंब्याच्या बांधाच्या एका बाजूला मस्त डोंगर आणि खालच्या बाजूला काही अंतरावर असणारा पण रानातून कुठूनही दिसणारा पाझर तलाव..
डोंगरावर ठिकठिकाणी असणार्याय करवंदाच्या जाळ्या. सारा उन्हाळभर गावातली पोरं करवंदाच्या जाळ्यांत असायची.. करवंदाच्या जाळीला काटे नसते आणि रानात बिबट्याचा वावर असल्याची भीती नसती तर पोरं पार करवंद संपेपर्यंत करवंदीच्या जाळीतच दिवसभरच नव्हे तर रात्री मुक्कामालाही राहिली असती.
डोंगरात वावरणार्या बिबट्याच्या भीतीमुळेच पोराटोरांचा आणि कामाशिवाय थोरांचा वावर असा नसायचाच. कुणी एकटं-दुकटं जायला धजावायचं नाही. त्यामुळे तर डोंगराकडचं सारं शिवार अगदी भर दुपारी निर्जन असायचं, त्यामुळे अधिकच भीतिदायक वाटायचं. त्यामुळेच आधी राजाची आई नाही म्हणत होती, पण उगा घरात वाद- भांडण नको या विचारानं आणि त्यातही शिरपा आणि दोन-तीन मैतर संगती असल्यामुळे तिनं काहीसं निर्धास्त होऊन संमती दिली होती.
तरीही सासूला समजल्यावर ती आणि काय म्हणेल याची धास्ती तिच्या मनात होतीच. त्याचमुळे तिने, ‘उगा लय येळ थांबू नगासा.. वाईच कमी काम झालं तरीबी चालंल पर दिस मावळायच्या आत घरला या..’ असं दोघांनाही दोन-तीन वेळा बजावून सांगितलं होतं.
सासूनं सांगितल्याप्रमाणे रमानं जेवण बांधलं आणि सोप्यात येऊन उभी राहिली.
‘‘घ्येतलं न्हवं जेवाण.. जावा बिगिबिगी.. सांच्याला दिस मावळायच्या आत याचं ध्येनात ठेवा, न्हायतर म्हातारी आय काय सळ्ळी सोडायची न्हाय.’’
राजाच्या आईनं पुन्हा एकदा बजावलं. आईचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच राजा बाहेर पडला होता. ‘बरं आत्ती.’ म्हणून रमा जेवणाची पाटी उचलून डोक्यावर घेऊन त्याच्या मागून बाहेर पडली. तो पुढे चालत होता. त्याचावर चिडलेली ती मुद्दामहून बरंच अंतर ठेवून मागून जात होती.
गावाबाहेर पडतानाच जोतिबाच्या देवळाजवळून जाताना रामाने जोतीबाला बाहेरूनच हात जोडले आणि देवळामागल्या रानात काम करीत असलेल्या शिरपाला हाळी मारली.
‘‘तू हो म्होरं.. लगुलग येतो..’’
शिरपानं उत्तर देताच रामा पाणंदवाटेने डोंगराकडं जायला वळला. वळताना त्यानं मागे पाहिलं आणि रमा खूप मागे आहे हे पाहून त्याची चाल काहीशी मंदावली. रमा जवळ आल्यावर तो तिच्या गतीनं चालू लागला पण तरीही रमाच्या आणि त्याच्यामध्ये अंतर पडतंय हे जाणवून त्यानं मागे पाहिलं. रमाच्या चेहर्याचवर राग पाहून त्याला हसू आलं. त्याच्या चेहर्यांवरचं हसू मागून येणार्यास रमानं पाहिलं तसं ती अधिकच चिडली. दोघंच आहे म्हणल्यावर ते बोलतील.. निदान गावाबाहेर पडल्यावर तरी बोलतील असं तिला वाटलं होतं पण बोलायचं राहील लांबच.. उलट हसतायत असं मनात येऊन तिला जास्तच राग आला होता.
मागून येणारी रमा चिडून मुद्दामच अंतर राखून चालतीय म्हणल्यावर रामा झपाट्यानं चालायला लागला तसा रमानंही चालण्याचा वेग वाढवला. आंब्याचा बांध आला तसा गार सावलीत विसावून रामा थांबला. मागून आलेली रमा त्याच्याकडे रागाचा कटाक्ष टाकून काही अंतरावर डोक्यावरची जेवणाची पाटी खाली ठेवून विसावली. तिनं पदरानं घाम टिपला.. उन्हानं का त्याच्यावरच्या रागानं कुणास ठाऊक पण तिचा चेहरा लालबुंद झाला होता.
रमानं बिबट्याच्या रानाबद्दल, तिथल्या, डोंगरातल्या बिबट्याच्या वावराबद्दल सासूकडून, आज्जेसासूकडून बर्यााच गोष्टी ऐकल्या होत्या. अवतीभवती सारा निर्जन परिसर पाहून ती मनातून घाबरली होती. धास्तावली होती. काही वेळानं काही न बोलता रामा उठला. तो जेवणाच्या पाटीजवळ आला. तशी ती पण उठून उभी राहिली. रामानं जेवणाची पाटी आंब्याच्या बेचक्यात व्यवस्थित ठेवली. तिनं पाटी पडायला नको म्हणून पुढं होऊन पाहिलं, एखादा थोराड माणूस ऐसपैस मांडी घालून बसेल एवढं मोठं बेचकं होतं. पाटी पडायची जरासुद्धा शक्यता नव्हती. ती निर्धास्त होऊन मागे सरकणार एवढ्यात बिबट्याची डरकाळी कानावर आली आणि तिनं घाबरून जवळच असणार्यात नवर्याीला- रामाला घट्ट मिठी मारली..
रामानंही तिला मिठीत घट्ट धरलं.. ती बराच वेळ भीतीनं थरथरत होती.. काही वेळानं रामाचा वेगळा पण हवाहवासा स्पर्श तिला जाणवू लागला तसं तिनं हळूच मान वर करून रामाकडे पाहिलं. तो डोळे मिटून, तिला साठवून घेत असल्यासारखा तिला घट्ट मिठीत घेऊन कुरवाळत होता. त्याच्या चेहर्यालवर भीतीचा लवलेशही नव्हता, उलट वेगळाच स्पर्शानंद दिसला. क्षणभर तीही त्यातच डुंबून गेली होती, पण पुढच्याच क्षणी ती मिठीतून बाहेर यायचा प्रयत्न करायला लागली, तशी रामाने मिठी आणखीनच घट्ट केली.
‘‘अहो ,सोडा.. कुनी बगल..’’
‘‘कोन हाय बगाय? बिबट्या? बगू दे त्येला.’’
‘‘अवो, पर शिरपा भावजी याचं येतीली.’’
तिला आणखी घट्ट आवळत तो हसत म्हणाला, ‘‘त्यो तर कवाच आलाया.. डोंगरावं बिबट्याची राकाण कराय लागलाय..’’
‘‘अवो, पर बिबट्या.’’
त्यानं त्याला हवं होतं तसं तिचं तोंड बंद केलं आणि भवताल निःशब्द केला.

दिवेलागणीला सगळी रानातून परतायचा आधीच रमानं सार्याः घरातले केर-वारे करून रात्रीच्या स्वयंपाकाची सगळी तयारीही करून ठेवली होती. चुलीवर भात चढवला होता आणि वैलावर सगळ्यांसाठी चहाही ठेवला होता. सगळी हात-पाय-तोंड धुवून घरात आली तसं तिने सर्वांना चहा दिला.
रमाला घरात पाहूनच राजाची आई निर्धास्त झाली होती. ते दोघं वेळेवर घरी आल्यामुळे तिला कुणी बोल लावणार नव्हतं. त्यात रमानं जेवणाची तयारी केल्याचं पाहून तर ती जास्तच खूष झाली होती.
बायकांचा संध्याकाळच्या कामाचा घायटा सुरू झाला होता. बाईच्या जातीला येरवळी उठल्यापासून रात्री भुईला पाठ टेकंस्तोवर विसावा असा नसतोच. एक झालं की दुसरं. ते झालं की तिसरं असं चालूच असतं.. पण तसा शिगण्यांचा बारदाना मोठा असल्याने, आलटून-पालटून घरातली कामं केली जात असल्यानं कुणा ना कुणाला थोडा विसावा मिळत असे. तशी आज राजाची आई थोडी निवांत होती. खरं तर सकाळी राजा तंडला तेव्हा तिला खूप वाईट वाटलं होतं. आख्ख्या गावात भांड्याला भांडंसुद्धा न लागणारं घर पण ती लग्न होऊन घरात आल्यापासून पहिल्यांदाच भांडण झालं होतं आणि तेही तिच्या मुलामुळे. तिला आधी आलेला राग काहीसा निवळला असला तरी ती दिवसभर अस्वस्थच होती. ती त्याबद्दल कुणाजवळच बोलली नव्हती पण तिला तिच्या नवर्यातला म्हणजे दादा शिगण्यांना सारं सांगून मन मोकळं करायचं होतं. दादा वारीस्न परतायची ती वाट पाहत होती आणि मुक्कामी एसटीने ते येणार होते.
कुठूनसा राजा आला अन् घरात गेला. तिला वाटलं होतं पहिल्यांदाच दिवसभर जोडीनं रानात गेलेवते म्हटल्यावर गडी खूष असणार. तिनं त्याचा चेहराही न्याहाळला होता, पण तिला कसलाच मागमूस त्याच्याच नव्हे, तर दोघांच्याही चेहर्याहवर दिसला नव्हता. रामा पाच मिनिटांतच घरातून बाहेर आला तो तणतणतंच.
‘‘रामा, लेकरा काय झालं रं?’’ आईचं काळीज काळजीनं लपलपत विचारतं झालं.
‘‘काय हुयाचं र्हारयलंय आनीक… थोरल्यास्नी द्याला झेपंना आन ल्हानग्यास्नी द्यावा वाटंना.’’
‘‘आरं, वाईच ध्येनात ईल आसं बोलावं माणसानं.’’
‘‘काय बी न्हाय समदं ब्येस हाय की.’’
‘‘मग आसा चिडीला कशापाय आलायस?’’
‘‘व्हय, तुमास्नी मी चिडलो त्ये दिसतंय फकस्त.’’
‘‘तसं न्हवं लेकरा, आरं, सांच्यापारी आसं चिडू- भांडू ने रं. लक्षमी घरात येत आस्ती. काय झालं ती तर सांगशील?’’
‘‘काय बी न्हाय.. च्या द्या म्हनलं.. काकी कामात आन तुज्या सुनंला.. जाऊदेल.’’
पुढं काहीही न बोलता रामा तरातरा निघून गेला.
काय बोलावं, काय करावं, या विचारानं रामाची आई अस्वस्थ झाली.

मुक्कामाच्या गाडीनं दादा शिगणे वारीस्नं परत आले. सगळ्यांशी बोलणं झालं, प्रत्येकाच्या कपाळाला बुक्का लावून पांडुरंगाचा प्रसाद देऊन झाला. जेवण झालं आणि आईजवळ पारभर बसून तिची विचारपूस करून झाल्यावर दादा सोप्यातल्या माचावर ‘पांडुरंगऽऽ हरी’ म्हणत आडवे झाले. सगळी सामसूम झाल्यावर राजाची आई म्हणाली, ‘‘झोपलासा व्हय?’’
‘‘न्हाय.. का?’’
‘‘न्हाय, वाईच बोलायचं हुतं.’’
‘‘बोल की.’’
राजाचं चलिंदर बरं दिसत न्हाय.
तिनं राजाची चिडचिड, भांडण आणि घडलेलं सारं नवर्या?ला सांगितलं.
‘‘आगं पर घराण्याची रीत हाय ती.’’
‘‘अवो, पर रीत पडली आसंल तवा लगीन न्हानपणात हुईत हुती. पोरीला न्हानं आलं न्हाय आलं की लगीन हूत हुतं. त्यो जमाना ग्येला आता. पोर मोठी झाल्यावं आता लगीन हुतंय. त्येचा ईचार नगं कराय?’’
‘‘व्हय त्ये बी खरंच हाय म्हना. तू नगं ईचार करू लय. मी बगतो काय ती.’’
‘‘आईस्नी सांगाय पायजेल.’’
‘‘बगतो काय ती. सांगतो.. झोप आता.’’
दोन दिवसांनी राजाच्या मामीला बरं नसल्याचा सांगावा आला तसं दादा राजाला म्हणाले, ‘‘राजा, तुजी मामी आजारलीया. तिला बरं वाटंस्तवर चार रोज तू न् सूनबाई मामीकडं जाशीला काय रं? तिला बी तेवढाच ईसावा.’’
‘‘तुमी म्हणाल तसं.’’ मनातली खुशी लपवत राजा म्हणाला.
दुसर्याईच दिवशी येरवळी राजा रमाला घेऊन जोतीबाला म्हणून निघाला. चार रोज मामीकडं राहून परत येणार होता.
एस्टीजवळ शिरपा उभाच होता. रमासोबत राजाला आलेला पाहून त्यानं राजाला विचारलं, ‘‘कशी हुती ईगत?’’
‘‘लय भारी मर्दा, तुज्यामुळं समदं झ्याक झालं बग.’’
‘‘कसली ईगत?’’ रमानं उत्सुकतेनं राजाला विचारलं.
एकीकडे शिरपाच्या हातावर टाळी देत रमाकडे डावा डोळा मिटवत राजा म्हणाला, ‘‘भांडान काडायची..’
आणि रमा सारं काही आठवून खाली पाहत गालातल्या गालात हसू लागली.

आनंद हरी, इस्लामपूर
aanandahari01@gmail.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.