Now Reading
बळीचा बकरा

बळीचा बकरा

Menaka Prakashan

मैनाबाईंनी टाकलेल्या तिरप्या कटाक्षानं रामा भगत पुरता घायाळ झाला. मैनाबाईवर फिदा झालेल्या रामा भगतानं बघता बघता मैनाबाईला पाच लाख रुपये दिले. मैनाबाईनं प्रेमानं रामरायाचे हात हातात घेतले व म्हणाल्या, ‘‘तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. सांगा, मी तुमच्यासाठी काय करू? तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे.’’

रामा दगडे मंजी एक नंबरचा भुक्कड माणूस. कामधंदा काय बी करायचा न्हाय. गावाबाहेरच्या म्हसोबाजवळ आंडं उतरून टाकल्यागत जवा बघावं तवा पडलेला असायचा. म्हसोबाच्या शेजारी करंजाच्या झाडाच्या सावलीत गांजा वडत तेल, आंंडं, रोट अन् गुबगुबीत लालभडक कोंबडा हे सगळं म्हसोबाला उतरून टाकलेले उतारे ह्योच दणकून हाणायचा अन् कमकून झोपायचा. दक्षिणा म्हणून टाकलेले, शे-दोनशे रुपये खर्चायला घावायचे त्यामुळे म्हसोबाच्या समोर झाडलोट करून साफसफाई करून दिवाबत्ती, उदबत्ती लावून कपाळाला कुंकू फासायचा. धोतर घालून उघडाच म्हसोबाच्या जवळ ढिरी खाजवत बसायचा. हळूहळू तो म्हसोबाचा भगत म्हणून प्रसिद्ध झाला.

पिंपळगावचा म्हसोबा नवसाला पावतो, म्हणून सगळीकडं कळालं तसं आसपासच्या पाच-पन्नास गावांतली माणसं म्हसोबाला यायला लागली. आपलं गार्‍हाणं सांगायला लागली, नवस बोलायला लागली. कोण म्हणायचं, ‘पोर होऊ दे’, कोण ‘बायको नांदू दे’, कोण ‘नवरा संबळू दे’, कोण ‘लगीन होऊ दे’, कोण ‘सासू मरू दे’, कोण सांगायचं, ‘सासरा मरू दे’, कोण ‘सटवीच्या तावडीतनं नवरा सुटावा’, तर कोण बोलायचं ‘लांडग्याच्या तावडीतनं बायको सुटावी’… प्रत्येकाचं वेगळंच दुखणं अन् प्रत्येकाचं वेगळंच लफडं.. ‘एक ना धड अन् भाराभर चिंध्या’ अन् ‘घरात भाकरी खायला वांदा अन् देवरुषाला देतोय नोटा बंद्या’… मनासारखं घडलं की सगळी हुकल्याली मंडळी नवस फेडायला लागली. गांजा-चिलीम, लिंबू, निवद, नारळ, तेल, उदबत्ती, कापूर, हळद-कुंकू, गुलाल, बुक्का, शेंदूर, आंडं-रोट, बाजरीच्या भाकरी, चपाती, चुलीवर शिजवलेला झणझणीत कोंबडा अन् लालभडक तर्रीबाज झणझणीत रस्सा अन् अजून टॉवेल-टोपी, धोतर, अडीच मीटर शर्टाचं पांढरं कापड हे सगळं मायंदाळं जमायला लागलं, तसं भगताचं चांगलं बस्तान बसलं. दक्षिणा बी खच्चून मिळायला लागली अन् म्हसोबाला कौल लावायचा चार्ज बी वेगळाच मिळायला लागला. लोकंबी येड्या डोक्याची अन् खुळ्या माजाची. वाजंल तिकडं गाजंल आन् गुलाल तिकडं चांगभलं. बोकडाची, बकर्‍याची अन् कोंबड्याची जत्रा जोरात भरू लागली अन् हजारात लोकं जेवायला घालू लागली.

रामा भगतानं आपलं इब्लीस डोकं चालवलं. म्हसोबाच्या शेजारी मोकळ्या जागेत बांधकाम करून गाळं काढलं. राहायला येणार्‍यांसाठी संडास-बाथरूम-खोल्या काढल्या, गावातली पाच-पन्नास पोरं, बाया, गडी कामाला ठेवली. म्हसोबाला उतरून टाकलेल्या गांजा-चिलीमपासून ते भाकरी-कोंबड्यापर्यंत सर्व वस्तू पुन्हा दुकानात विकायला ठेवल्या. तसेच द्रोण-पत्रावळी, तेल-मीठ, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, सरपण, गॅस, शेगडी, स्वयंपाकाच्या भांड्यापासून ते आचार्‍यापर्यंत सार्‍या वस्तू विकायला ठेवल्या अन् साईड बिझनेस चालू केला.

रामा भगताचे भक्तगण वाढू लागलं. मंत्र, तंत्र, करणी, बाधा हे प्रकार सगळीकडे वाढू लागले. कुणाची वैरणीची गंज आपोआप पेटू लागली, तर कुणाच्या घरावर रात्रीची दगडं पडू लागली, तर कुणाच्या दाराची रात्रीला कडी वाजू लागली.. हे सारे प्रकार व्यवसाय वाढीसाठी रामा भगताचे शिष्यगणच रात्रभर करायचे अन् घाबरलेले लोक दिवसा रामा भगताकडे जायचे. मग रामा भगत सांगेल त्याप्रमाणे भक्तगण बकर्‍या-कोंबड्यांची जत्रा करायचे. अशा प्रकारे रामा भगताचं एकंदरीत एकदम झकास चाललं होतं अन् अचानक चीनमध्ये कोरोनानं थैमान घालायच्या बातम्या टीव्हीवर झळकू लागल्या. चीनमधल्या लाखो लोकांना कोरोनाची बाधा झाली. हजारो लोक मृत्युमुखी पडू लागले. सर्दी, खोकला, ताप, घसादुखी ही लक्षणं असणारा आणि संसर्गजन्य कोरोना व्हायरस रोग झपाट्यानं फैलावू लागला अन् इकडे रामा भगत अचानक गायब झाला. त्याचा तपास लागेना. अशा महाभयंकर संकटाच्या वेळी रामा भगत नाहीसा झाल्यानं सगळ्या भाविक भक्तांची पाचावर धारण बसली. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. तरी रामा भगताचा तपास लागला नाही तशी भक्त मंडळींची चिंता आणखीनच वाढली.

पुढे चीनमधला कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी झाला तरी सार्‍या जगात कोरोनानं थैमान घालायला सुरवात केली होती. अन् इकडे रामा भगत अचानक प्रगट झाला. चीनचा कोरोना मीच बरा केला, असं त्यानं जाहीर केलं. रामा भगताला भेटायला भक्तांची रांग लागली. लोकांमध्ये उत्साह संचारला. रामा भगताचा जयजयकार होऊ लागला. एका उंचच उंच आसनावर मास्क बांधून पंचवीस फुटांवरून भक्तांना रामा भगत दर्शन देऊ लागला. कोरोनाच्या भीतीनं स्वतःला वाचवण्यासाठी भक्तगण रामा भगताकडे येऊ लागले. रामा भगतानं येणार्‍या प्रत्येक भक्ताला सहा फूट अंतर ठेवून आत प्रवेश करायला परवानगी दिली. येताना प्रवेशद्वारावर रामा भक्ताच्या शिष्यांकडून दहा किलो मीठ, पंचवीस लिंबं, गरम पाण्याच्या पाच बाटल्या, साखर, चहा पावडर, सॅनिटायझर बाटली, रामा भगत निर्मित आयुर्वेदिक काढ्याची शंभर रुपयांची बाटली आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी दोनशे रुपयांचा मास्क घेण्याची सक्ती केली. सॅनिटायझरची फवारणी करून एकेकाला आत सोडलं जाऊ लागलं. आत सोडलेला प्रत्येक भक्त, कोरोनापासून वाचवण्यासाठी रामा भगतापुढे लोटांगण घालू लागला.

रामा भगतानं प्रत्येकाला शंभर रुपयाला एक अंगार्‍याची पुडी दिली आणि सगळ्यांना एकच मंत्र दिला, ‘रोज अंगारा आणि मिठाच्या गरम पाण्यानं पाच वेळा गुळण्या करायच्या. शिवाय ग्लासभर गरम पाण्यात अंगारा आणि लिंबू पिळून दिवसभरात पाच वेळा द्यायचं. पाच वेळा गरम चहात अंगारा टाकून प्यायचा. पाच वेळा गरम पाण्यात अंगारा आणि व्हिक्सबाम टाकून वाफ घ्यायची. दिलेला आयुर्वेदिक काढा रोज दोन टाईम घ्यायचा. मास्क कायमस्वरूपी वापरायचा. वारंवार साबणानं हात धुवायचे व सॅनिटायझर हातावर मारायचा. सर्व प्रकारची फळं, भाज्या, दूध, दही, तूप, कोंबडा, बकरं, बोकडाचं मटण दणकून खायचं अन् कणकून झोपायचं.’ मंतरलेल्या अंगार्‍याच्या प्रभावानं आणि सॅनिटायझर व मास्कमुळे कोणालाही कोरोनाची करणी बाधा होणार नाही, याची त्याला खात्री होती. एवढंच नाही तर, ‘एकशे चौदा म्हसोबाचा शुभ आकडा असल्यामुळे आणि मला आकडा खेळण्याचा नाद असल्यामुळे प्रत्येकानं एकशे चौदा दिवस एकमेकांपासून दूर राहायचं’ असेही आदेश रामा भगतानं भक्तांना दिले आणि एक कानमंत्र दिला. नवर्‍यानं रानात झोपायचं, बायकोनं स्वयंपाकाच्या खोलीत झोपायचं, मुलानं ओट्यावर, तर सुनेनं बेडरूममध्ये झोपायचं. राहिलेल्यांनी माझ्या खोल्या भाडोत्री घेऊन एका खोलीत एकानंच झोपायचं. एकशे चौदा दिवस कोणाच्याही लग्नाला, सोळावा-पूजेला, जागरण-गोंधळ, बारसं, मयतीला, सावडणं, दहावा, तेरावा, श्राद्ध, वर्षश्राद्ध वा कुठल्याच कार्यक्रमाला जायचं नाही. हे सर्व आचरणात आणायचं. जो मी सांगितल्याप्रमाणे वागणार नाही, त्याच्यावर म्हसोबाची अवकृपा होईल आणि कोरोनाची बाधा होईल अशी भीतीही रामा भगतानं सर्व भक्तांना दाखवली अन् सगळीकडे एकशे चौदा दिवसांचं लॉकडाऊन जाहीर केलं. रामा भगताची ही ‘ब्रेकिंग न्यूज’ टीव्हीवर झळकली आणि रामा भगत जगप्रसिद्ध झाला. अशा प्रकारे रामा भगतानं कोरोनाच्या काळातही आपला धंदा अक्कलहुशारीनं जोरात चालवला आणि संपूर्ण गावंच्या गावं कोरोनामुक्त केली. त्यानं ‘कोरोनामुक्ती पुरस्कार’ आणि ‘कोरोना भूषण पुरस्कार’ स्वतःच स्वतःला जाहीर करून टाकला अन् अचानक एके दिवशी रामा भगताला एका मैनेची दृष्ट लागली अन् रामा भगत कोरोनाग्रस्त होण्याऐवजी प्रेमग्रस्त झाला.

मैना चिंचणीकर प्रसिद्ध तमाशासम्राज्ञी. बोलायची छान, नजरेचा बाण. ही लावण्याची खाण एक दिवस अचानक रामा भगताच्या म्हसोबाला पाया पडायला आली अन् रामा भगत खुळ्यागत तिच्या सौंदर्यावर फिदा झाला.
‘‘याऽऽ याऽऽ मैनाबाई… कसं काय येणं केलंत?’’ रामा भगत लाळघोटेपणा करत म्हणाला.
‘‘काय सांगायचं तुम्हास्नी, तमाशा चांगला फॉर्मात चालला होता बघा, पण सोंडग्याला झाला कोरोना अन् त्यातच तो मेला अन् माझ्या तमाशाचा सगळा इस्कोट झाला बघा. मुडदा बशीवला त्या कोरोनाचा. त्याला आली पटकी.’’ कडाकडा बोटं मोडत मैनाबाई म्हणाल्या.
‘‘मग आता वं कंस मैनाबाई! पुढे काय करायचं ठरवलंयसा तुम्ही?’’ काळजीच्या स्वरात रामा भगत म्हणाला.
‘‘आत्ता कोरोना बी गेला अन् सोंगाड्या बी मेला. आता सगळं तमाशाचं फड बी सुरू झाल्याची बघा. पण सोंगाड्याच न्हाय. आन सोंगाड्या न्हाय तर तमाशा न्हाय. आन तमाशा न्हाय तर काय बी न्हाय बघ. जरा भांडवलसुदीक कमी पडतंया. तवा म्हणलं, रामराया, आवं इकडं तिकडं कुठं बघताय. तुम्हीच माझे रामराया. आले तुम्हास्नी भेटाया. म्हसोबाला साकडं घालाया. नवसाला पावतो म्हणत्यात म्हसोबा राया. लय नाव ऐकलंया.’’ मैनाबाई रामा भगताला खुलवत खुलवत म्हणाल्या.
तशा रामा भगताच्या अंगात गुदगुल्या झाल्या.

‘‘आवो, म्हसोबाराया पावंल तवा पावंल. आधी ह्यो रामराया तुम्हाला पावला म्हणून समजा. काय समजलं?’’ रामा भगत खुळ्यागत म्हणाला.
‘‘मंजी? काय कळलं न्हाय बघा राम राया. जरा वाईच नीट बैजवार कळंल आसं सांगा की जरा.’’
मैनाबाई रामा भगताच्या गालावर हळूच टिचकी मारत म्हणाल्या, तसा रामा भगत चांगलाच मव्हारला अन् म्हणाला, ‘‘आवं, तुम्हाला म्हणून सांगतूया. कसला म्हसोबा अन् कसलं काय? आन् हा कसला पावतोया? ह्या आपल्या लोकांच्या खुळचट कल्पना. दगडाला शिंदूर फासला की झाला देव. इडी लोकं नवस बोलत्याती आन् त्यान्ला वाटतंया, या म्हसोबांमुळेे सगळं चांगलं झालं अन् मग नवस फेडत्याती. म्हसोबा राहिला उपाशी अन् आम्ही खातो तुपाशी! बोला किती पैसे पायजेत? मी देतो भांडवल पायजे तेवढं. तुम्ही फकस्त आकडा बोला. तुमचा आकडा लागलाच म्हणून समजा.’’
‘‘आवं, पाच लाख रुपये तरी लागत्याल बघा. लय उपकार होत्याल तुमचं.’’ पदराचा चाळा करत, तिरपा कटाक्ष टाकत मैनाबाई म्हणाल्या.
मैनाबाईंनी टाकलेल्या तिरप्या कटाक्षानं रामा भगत पुरता घायाळ झाला. मैनाबाईवर फिदा झालेल्या रामा भगतानं बघता बघता मैनाबाईला पाच लाख रुपये दिले. मैनाबाईनं प्रेमानं रामरायाचे हात हातात घेतले व म्हणाल्या, ‘‘तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. माझ्या भांडवलाचा प्रश्‍न तुम्ही सोडवला. माझा विस्कटलेला तमाशाचा फड तुम्ही सावरला. सांगा, मी तुमच्यासाठी काय करू? तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे.’’

‘‘आमच्यासाठी काय करणार असाल तर मग आमच्यासाठी एखादी झक्कास लावणी म्हणा ना. मंजी आमचा बी दिल खूष होऊन जाईल बघा.’’ रामा भगत म्हणाला.
रामा भगताला खूष करण्यासाठी मैनाबाई लावणी म्हणायला तयार झाल्या. ‘‘अहो रामराया, तुमच्यासाटी काय पण! आता तुम्हीच आमचे अन्नदाते अन् तुम्हीच आमचे आश्रयदाते. आता तुम्ही सांगायचं अन् आम्ही ऐकायचं!’’
‘‘वाऽऽ वाऽऽ वाऽऽ मग करा ना आमचा कलेजा खूष. म्हणा एखादी फक्कड लावणी.’’ रामा भगत आग्रह करत म्हणाला.
लावणी सादर करण्याची तयारी करत मैनाबाई म्हणाल्या, ‘‘मग ऐका तर-
‘भारानं वाकलाय
पिकलाय आंबा
राया हळूच चढून घ्या
लाल लाल भडक आंबा
तुमच्या व्हटानं चोखून खा
चिकानं भरलाय खाऊ नका थांबा
आधी धुऊन त्याला घ्या
गोड गोड पाडाचा आंबा
जरा दमानं तुम्ही घ्या
लाल लाल भडक आंबा
तुमच्या व्हटानं चोखून खा
गळतोय रस दाबू नका थांबा
हळूच पिळून घ्या
असा मिळणार नाही आंबा
तुम्ही आताच खाऊन घ्या
भारानं वाकलाय पिकलाय आंबा
राया हळून चढून घ्या
लाल भडक आंबा
तुमच्या व्हटानं चोखून खा
जरा व्हटानं चोखून खा
राया व्हटानं चोखून खा…’

रामा भगत मैनाबाईच्या लावणीनं जाम खूष झाला अन् रामा भगतानं दिलेल्या पाच लाख रुपये भांडवलामुळे मैनाबाईही खूष झाल्या.
रामा भगताला आता काय सुचेनासं झालं होतं. मैनाबाईवर त्याचा जीव जडला होता.
हळूहळू दोघं प्रेमात पडली आणि दोघांच्या गाठीभेटी वाढल्या. म्हसोबाच्या नावाखाली थाटलेलं दुकान बंद करून आता त्यानं तमाशात जायचं ठरवलं. पण कसं जावं हेच त्याला कळत नव्हतं.
एक दिवस अचानक वर्तमानपत्रात फोटोसह बातमी झळकली.
‘म्हसोबाच्या नावाखाली भोंदू रामा भगताची बुवाबाजी’, तर दुसरीकडे कोणीतरी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यामुळे रामा भगताची चौकशीही सुरू झाली.
तिसरीकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांनी रामा भगताला आव्हान दिलं. ‘चमत्कार, बुवाबाजी हे सारं खोटं असून म्हसोबाच्या नावाखाली भगत लोकांना फसवतोय’ म्हणून कार्यकर्ते जमा झाले.
‘‘भगत, चमत्कार-अंगारा-धुपारा हे सारं खोटं आहे. यानं कोरोना पेशंट बरा होतो, हे थोतांड आहे. तवा तुम्ही म्हसोबाच्या नावाखाली चालवलेला धंदा बंद करा.’’ एक कार्यकर्ता ओरडून म्हणाला.
‘‘म्हसोबा लोकांना पावतो. लोक नवस बोलल्यात व फेडत्यात अन् त्यांना गुण येतो. त्यांना कोरोना होत नाही. आणि मी काय कुणाला बोलवायला जात न्हाय. लोकंच माझ्याकडे येतात.’’ भगत ठासून म्हणाला.
‘‘मग आमचं चॅलेंज घ्या. आम्ही शंभर कोरोनाग्रस्त रोगी घेऊन येतो. त्यांना तुमच्या चमत्कारानं बरं करून दाखवायचं. ते बरे नाही झाले वा मेले तर सर्व जबाबदारी तुझी.’’ कार्यकर्ता म्हणाला.

कोरोनाग्रस्त शंभर रुग्णांच्या सोबत राहायचं म्हटल्यावर रामा भगताचं धाबं दणाणलं. प्रकरण अंगाशी यायला लागलं तसं रामा भगतानं सपशेल शरणागती पत्करली.
‘‘म्हसोबा, अंगारं, धुपारं, चमत्कार, नवस हे सारं झूट आहे. कोरोनाचे वा कुठलेच रोगी मी बरे करत नाही आणि नव्हतो. ते सगळं थोतांडच होतं, हे मी जाहीर कबूल करतो.’’ असं कबूल करून रामा भगतानं म्हसोबाच्या नावाखाली सुरू केलेलं दुकान कायमचं बंद केलं.
अखेर रामा भगतानं आपलं चंबूगबाळं आवळलं अन् लाखो रुपयांची माया घेऊन मैना चिंचणीकरच्या तमाशात भागीदार झाला. तिच्याशी लग्न करून त्यानं ‘रामा भगत पिंपळगावकरसह मैनाबाई चिंचणीकर’ तमाशा सुरू केला आणि तो पुढे लोकप्रियही झाला. रामा भगत आता सोंगाड्याच्या भूमिकेनं प्रसिद्ध झाला, पण रामा भगताचा तमासगीर आणि सोंगाड्या कसा झाला ते गुपित फक्त रामा भगतालाच माहीत होतं.

‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’कडे रामा भगतानंच निनावी पत्र टाकून म्हसोबा प्रकरणाचा पर्दाफाश करायला लावला होता. तसंच वर्तमानपत्रातसुद्धा रंगीत फोटोसहित बातमी तयार करून रामा भगतानंच गुपचूप पाठवली होती अन् पोलिस स्टेशनलासुद्धा निनावी तक्रार रामा भगतानंच केली होती. कारण त्याचा आता म्हसोबावर जीव राहिला नव्हता, तर मैना चिंचणीकरवर जीव जडला होता. त्यासाठी त्यानं म्हसोबालाच बळीचा बकरा बनवला होता. तिकडे मूकपणे म्हसोबा अश्रू ढाळत होता अन् इकडे रामा भगत तमाशाचा मालक झाला होता.
सोंगाड्या बनून लाखो लोकांना खदाखदा हसवत होता.

– संजय मोरे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.