Now Reading
प्रस्ताव

प्रस्ताव

Menaka Prakashan

पांग्याण्णा, आनंदराव आणि टिल्या यांच्या गावात एकदा एक बुवा नाही तर महाराज आले महाराज! या महाराजांना सगळ्या विद्या ज्ञात होत्या. गावाचं, गावतल्या लोकांचं कल्याण करावं असाच या महाराजांचा हेतू होता. महाराज गावात आल्यानंतर एक किस्साच घडला. आनंदराव या किश्श्याविषयी सांगताहेत. तुम्ही पण ऐका हा किस्सा अगदी कान देऊन, तेही अस्सल ग्रामीण ढंगात…

‘‘आरं, एऽऽऽ पांग्याण्णा, कुनीकडं दौरा हाय? आरं लेका, मागं कशापायी बघतुयास? बावचळल्यागत! आऽऽरं, मी मन्याबा. तुला सादवतुया, हॅऽऽ हॅऽऽ हात द्वाडा! लई घाईत दिसतुयास!’’ मनोहर पंचाच्या हाकेसरशी पांग्गण्णा तोंडभर हसला आणि स्वतःच्या दीडपायानी चालत दरवाजात बसलेल्या मनोहर पंच म्हणजे ‘मन्याबा’कडे जात म्हणाला, ‘‘न्हाय बा! मला कसली घाई?’’
‘‘मग कुटं चालला हैस?’’ मन्याबानं रोखून बघत विचारलं.
‘‘आवंऽऽ आंद्याला बघावं म्हणून बायेर पडलुया. तसंच पाय मोकळं करावं म्हनलं.’’ पांग्याण्णा.
‘‘पल्याडनं इथवर आलायस, झालं का तुझं पाय मोकळं?’’
‘‘बस मग.’’ मन्याबानं असं म्हणताच पांग्याण्णा मन्याबाच्या दरवाजाजवळच्या कट्ट्यावर विसावला. तरी पांग्याण्णाच्या डोक्यात काहीतरी उलट-सुलट विचारांचं चक्र फिरतंय हे त्याच्या चेहर्‍यावरून स्पष्ट दिसत होतं. म्हणून ‘हालवून खुंटा बळकट करावा’ या इराद्यानं, ‘‘पांग्या, लेका, निवांत बस. च्या पानी घे अन् मंग जा’’ असं मन्याबा म्हणताच, ‘‘आवो पंच, असल्या ऊनाचा च्या? आवं, कसलं गरम हुतंया. बटाट्यागत उकडतंय.’’ ऐसपैस बसत पांग्याण्णा म्हणाला.
‘‘बरं बाबा, सरबात पिऊया. दम वाईच. सुनेऽऽ घरात सरबात बनवायला सांग.’’ मन्याबानं सुनीता-लेकीकरवी- घरात सरबताची ऑर्डर देण्याचा प्रयत्न केला, पण तो फोल ठरला. कारण तत्क्षणी, ‘‘सुनेऽऽ पंचास्नी सांग, सरबात बनवायला लिंबू लागतो. तवा सरबात बनवता येते. त्यो लिंबू घरात न्हाई.’’ बायकोच्या या फाटे फोडण्याच्या कृतीचा राग येऊन, मन्याबानं जरा रागातच लेकाला- टिल्याला- बाहेर बोलावलं आणि त्याला पानपट्टीच्या दुकानातून ताजं लिंबू आणायला पाठवलं. ‘‘आनि येताना तडक कुठं पेठंला, हाटेलातनी, दुकानातनी आंद्या दिसला, तर त्येलाबी म्होरं घालून आण. मी बोलिवल्या म्हणावं.’’ करड्या आवाजात पंच मन्याबा असं म्हणताच पांग्याण्णा दचकलाच!

मनोहर पंच म्हणजे मन्याबा. हा ग्रामपंचायतीत निवडून आलेला पंच! तसा त्याचा दरारा! म्हणूनच स्वतःला सावरत पांग्याण्णा म्हणाला, ‘‘आवो पंच, तसं आंद्याकडं माझं काईच काम न्हाई.’’ त्यावर ‘‘तुजं नसंल पर माजं हाये नंऽऽ’’ मन्याबा.
‘‘पंचाच्या आजच्या बोलण्याच चरिंतर जरा न्यारंच दिसतंया. आज आपलं काई खरं न्हाई.’’ असं काहीसं मनातल्या मनात पुटपुटणार्‍या पांग्याण्णाकडे मिस्कीलपणे पाहून मन्याबा म्हणाला, ‘‘पांग्या, एवढा चितागती का रं दिसतुयास?’’
‘‘मला कसली चिता (चिंता)?’’ पांग्याण्णा रेटून बोलतोय हे जाणून, ‘‘पांग्या, मलाच उलटा सवाल करतुयास व्हय? मंग तुला आता डायरेक इचारतो, ‘‘गंपतीच्या देवळाच्या व्हवरीत (ओवरीत) तू आन् आंद्यानं कोनत्या बुवावा वस्तीला आनून ठिवलाय?’’ मन्याबा.
‘‘देवाशप्पथ सांगतू, आमी न्हाय आनला त्येला! त्येचा त्योच आलाय.’’
मनोहर पंच आपल्याला काई तरी बिलामत घालाया बगतुया हे वाटून, पांग्याण्णा उसनं अवसान आणून मोठ्याला म्हणाला, ‘‘त्यो बुवा न्हाई. ते महाराज हैती महाराज!’’ पांग्याण्णाच्या मनावरचं दडपण या मोठ्यानं बोलण्यामुळे एकदम नाहीसं झालं.
‘‘कुटल्या गावचा हाये त्यो तुजा महाराज?’’ मन्याबा.

‘‘आवं पंच, मी बी पयल्या झूट महाराजांना हाच परस्न केला हुता की, तुमी कुनच्या गावचं बुवा? तर त्ये म्हनले, ‘‘मी बुवा न्हाई, महाराज हाय महाराज! आमाला कुटलं गाव आन ठावं! आमी परमर्तिक लोक!’’ असं पांग्याण्णा म्हणायला आणि टिल्या व आनंदराव म्हणजे आंद्या यायला एकच गाठ पडली.
हसत हसत आंद्या म्हणाला, ‘‘अहो अण्णा, मर्तिक म्हटल्यासारखं काय म्हणताय? मनोहर पंच, तुम्ही केव्हा आलात गावाहून? पुणे, मुंबईपर्यंत नेऊन तरी काही उपयोग झाला नाही असं कळलं मला! तरी काय वय होतं त्या आजींचं?’’ असा जुजबी पण महत्त्वाचा प्रश्‍न आनंदरावांनी विचारला. तेवढ्यात सुनेनं स्टीलच्या फुलपात्रातून सर्वांना सरबत आणून दिलं. सरबत पिऊन होताच पांग्याण्णा नवीन जोमानं सांगू लागला.
‘‘आवं पंच, त्या महाराजास्नी आतलं डोळं म्हंजी ‘दिव्य दृष्टी’ हाये. आणि लई काई काई कळतं. आन् त्येस्नी लई इद्या येत्याती या आंद्यापक्षी!’’ पांग्याण्णाच्या या बोलण्यावर आनंदराव, मनोहर पंच, टिल्या सगळे हसू लागले. त्यांना हसताना पाहून वरमून पांग्याण्णा म्हणाला, ‘मला न्हाई सांगता येत पर आंद्या समदं बैजवार सांगतु पारावर समद्यास्नी. त्या दिशी समदी कानात जीव आनून ऐकीत हुती आंद्याचं बोलनं!’’ आलेलं हसू दाबत मन्याबा म्हणाला.
‘‘आनंदराव, तुमी सांगा बरं समदं बैजवार! आमी बी कान दिवून ऐकतो.’’

तसं विशेष काही नाही, पण तुम्ही आस्थेनं विचारताय म्हणून सांगतो. चैत्र प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा! नित्यनेमाप्रमाणे आमच्या खालच्या वाडीतल्या काकू सडा संमार्जन करत होत्या. तेव्हा भगवी कफनी परिधान केलेले व डोईस भगवी टापशी बांधलेले, गळ्यात आणि हाती रुद्राक्षांच्या माळा घातलेले महाराज गणपती मंदिरासमोरच्या खालच्या आळीच्या आमच्या काकांच्या वाड्यासमोर उभे ठाकले. त्यांना पाहून, आर्थिक परिस्थितीमुळे वैतागलेल्या आमच्या काकू म्हणाल्या,
‘‘उजाडलं का बाबा तुम्हाला? सण, वार, देव, धर्म, काही उरलंच नाही. छोटे, वाडगाभर पीठ आणून घाल या बुवाला!’’
त्यावर अत्यंत तडफदारपणे महाराज म्हणाले, ‘‘आक्का, मी बुवाबाजी करणारा बुवा नाही. पोटाची खळगी देवाच्या नावानं भरणारा भिक्षेकी नाही. मी परमार्थिक, ज्ञान प्राप्त झालेला महाराज आहे. पण देवाच्या, परमेश्‍वराच्या कृपेनं ज्या विद्या मला प्राप्त झालेल्या आहेत, त्या तुम्हा प्रापंचिकांना कधीच ज्ञात होणार नाहीत. आक्का, माझ्या दिव्यदृष्टीला आता तुझ्या हा जीर्ण, शीर्ण, भग्न झालेल्या वाड्याचं गतवैभव दिसत आहे. या चौसोपी वाड्यात तू सोन्याच्या पावलांनी प्रवेश केलास. उंची वस्त्रं, सोन्याची जरीची वस्त्रं परिधान करून, नखशिखांत सुवर्णालंकार ल्यालेली तू साक्षात लक्ष्मीच दिसत होतीस. या वाड्यात रोज पाच-पंचवीस ब्राह्मणांची पंगत बसायची. पंच पक्वान्नांचा बेत असायचा. माणसं जेवून खाऊन तृप्त व्हायची. त्यांच्याकरता तू साक्षात ‘अन्नपूर्णा’ होतीस.

आता या भकास दिसणार्‍या या वाड्यातला गोठा खिलारी बैलजोड्यांनी, देखण्या गाई-वासरांनी, दुभत्या म्हशींनी, धष्टपुष्ट रेडकांनी भरलेला असायचा. ओसरीवर धान्याच्या राशी पडायच्या. मणामणाच्या कणग्यांनी ओसरी गच्च भरायची. तू सुपा-सुपानं भिक्षेकर्‍यांना भिक्षा वाढायचीस. तू फार दानधर्म करणारी दानशूर बाई आक्का! आक्का, तुझ्या पूर्वजांचं, तुझं ऐश्‍वर्य मला दिसतंय. या जळक्या वाड्याचं गतवैभव माझ्या डोळ्यापुढं तरळतंय! पण नियतीचे भोग तुझ्या वाट्याला आले. तुझा काहीही दोष नसताना! आप्तजनांनी वास्तव्य केलेला तुझा हा वाडा म्हणजे पोरा-बाळांनी, गुरा-वासरांनी भरलेलं साक्षात गोकुळच होतं. पण आता तुझ्या रत्नासारख्या लेकाला- रत्नाकरला, दोन उपवर सद्गुणी, सालस, सोशिक लेकींना आजोळात-तुझ्या माहेरात-ठेवावं लागलंय तुला! तुम्हा माय-लेकरांची परिस्थितीनं ताटातूट केलीय. ती तिघं तिथं आजी-आजोबांच्या सावलीत आहेत. पण तिथंही त्यांना कष्टप्रद जीवन जगावं लागतं आहे.’’

आणि महाराज असं म्हणताच इतका वेळ रांगोळी रेखणार्‍या आमच्या काकूनं डोळ्याला पदर लावला. पिठाचा वाडगा भरून घेऊन येणारी छोटी जागीच अडखळली. गुढी उभारण्याच्या तयारीत असलेले आमचे दत्ताकाका अक्षरशः आतून गहिवरले! त्यांनी अंगावरच्या जीर्ण झालेल्या फाटक्या दणक्याच्या खिशातून होती ती एकुलती एक पावली काढली आणि महाराजांच्या हातावर ठेवली व म्हणाले, ‘‘हे घ्या. आमचा म्हणून चहा प्या. पण कृपा करून सणा-वाराचं आमच्या जखमेवर असं बोलून मीठ चोळू नका! या आता!’’
‘‘आस्सं जखमांवर मीठ?… म्हंजी काय रं?’’ पांग्याण्णानं संभ्रमित होऊन विचारलं. लगेच, ‘‘लेका पांग्या, तुला न्हाई समजायचं त्ये.’’ मन्याबा पांग्यावर डाफरला. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून, चाबर्‍यासारखा पांगाण्णा बोलला.
‘‘न्हाय पर मला जर काकांनी ती पावली दिली असती तर मी तराट वाण्याच्या हाटेलात जाऊन च्या पेलू अस्तु आन् भज्जी बी…’’
‘‘एऽऽ पांग्या, जवा तवा सोंगाड्यागत बोलतुयास.’’ तिथं बसून ऐकणारा बाजा पांग्यावर खेकसला. त्या दोघांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून मन्याबानं परत विचारलं, ‘‘म्हंजे महाराजांनी त्ये पैसं घेतलेच न्हाईत?’’
‘‘नाही ना! उलट महाराज म्हणाले, ‘‘इनामदार, मी काही घेत नसतो. ज्याचं त्याचं शोधून, त्याला प्रयत्न करायला उद्युक्त करून, त्याचं त्याला देणं हा माझा धर्म आहे. कर्तव्य आहे. ही माऊली, तुमची पत्नी ‘इनामदारीण’ म्हणून या वाड्यात आली. तिची दैवगती फिरली. तिच्यामागे दारिद्य्र लागलं. दारिद्य्र तिची परीक्षा घेतंय, पण आक्का, तू भिऊ नकोस. तू या परीक्षेत पास होणार. इनामदार, आजपासून ही तुमची पत्नी माझी धर्माची बहीण आहे. आक्का, तू मला काही देऊ नको. मी तुला काहीही मागणार नाही. उलट मीच तुला देणार आहे.’’ असं म्हणून- ‘‘आंद्या लेका, ह्ये काय गुंत्यात अडकल्यावानी बोलतुयास!’’ मन्याबा.

‘‘आवं पंच, ऐका की म्होरलं.’’ बाजानं ऐकण्याच्या उत्सुकतेपोटी मध्येच तोंड घातलं. ‘‘आवो आनंदराव, मघाधरनं इचारिन म्हणतुया. खरंच तुमच्या काकांचा त्यो वाडा लई मोट्टा, लई भारी हुता म्हनत्यात. त्ये खरं हाय का? ’’ बाज्यानं विचारताच, ‘‘मंग? खोटं वाटतं का?’’ आनंदरावांनी बाज्याला प्रतिप्रश्‍न केला.
‘‘नाय वो! आवं, आमचं थोरलं चुलतं त्याकाळी मास्तर हुतं म्हनं. ते सांगायचं, ह्ये ‘बामणकाका’ बी त्या काळातलं व्ह. फा. (व्हर्नाकूल फायनल, मराठी सातवी) पास हैती. त्येस्नी म्हणं, इंग्रज सरकारनं तवा तलाट्याच्या नोकरीत बोलिवलं हुतं म्हण.’’ बाज्या.
‘‘हो. अगदी बरोबर आहे.’’ आनंदराव.
‘‘तवाच त्ये तलाठ्याच्या नोकरीवर गेलं असतं तर त्यांची अशी बेकार हालत झाली नसती.’’ पांग्याण्णा चुकचुकला. त्यावर परत आनंदराव सांगू लागला.
‘‘महाराज म्हणतात त्येच खरं आहे. हा दैवगतीचा फेरा आहे बाबांनो! सात-आठ वर्षं झाली भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यानंतर आपल्या भागात जाळपोळ झाली. ‘कूळ कायदा’ आला. महाराष्ट्रातलं जनजीवन कलुषित झालं. गुण्यागोविंदानं नांदणारी खेडी उद्ध्वस्त झाली. हे लोण खेड्यापाड्यात पोचलं आणि दारिद्य्राच्या वणव्यात कित्येक ब्राह्मण इनामदार, वतनदार कुटुंबं होरपळत आहेत. त्यापैकी आमचं व दत्ताकाकांचं कुटुंब आहे. खरंच १९१५ साली काकांना तलाठी पदाच्या नोकरीची संधी आली. त्या वेळी देशमुखी वतनाची चावडी म्हणून खेड्यातली चार आणे (चौथा हिस्सा) ब्रिटिश सरकारला व बारा आणे (पाऊण हिस्सा) देशमुखांना या प्रमाणात चावडी मिळायची. त्यामुळे काकांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती उत्तम होती. शिवाय चाळीस एकर स्वतःची जमीन होती. म्हणून काका नोकरीच्या फंदात पडले नाहीत आणि त्या काळात उत्तम शेती, मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरी अशी सामाजिक धारणा होती. पुढे पुढे स्वातंत्र्योत्तर काळात जमिनीसंबंधी कायदे कडक होत गेले. राहता वाडा अठ्ठेचाळीस साली जाळला गेला. दारिद्य्रामुळे माझे सज्जन, सुशिक्षित काका किंकर्तव्यमूढ झालेत. म्हणून आता ते महाराज सांगतील ते करायला तयार झालेत.’’ आनंदरावानं तांब्यातलं पाणी फुलपात्रात ओतून घेऊन पाण्याच्या घोटाबरोबर घशाशी आलेला आवंढा गिळला. ती संधी साधून मन्याबानं धास्तावून विचारलं, ‘‘त्यो येडा एक एकर क्षेत्रफळाचा चौसोपी चिरेबंदी, पडका, जळका वाडा महाराज इकत मागतुया का?’’
‘‘अहो मनोहर पंच, महाराज कशाला वाडा विकत मागतील? ते फक्त काकांना म्हणतात, तुमचा हा भग्न वाडा मला एकदाच आतून बघू देत.’’
‘‘त्ये कशापायी?’’
‘‘अहो पंच, महाराजांचं म्हणणं आहे, काकांच्या त्या वाड्यात गुप्तधन…’’
‘‘आता त्याच्या मायला! अस्सा! महाराजांचा डाव हाय व्हय?’’ मन्याबा.
‘‘अहो, डाव कशाचा यात? महाराज परमार्थिक मानूस! म्हणून त्येंच्या दृष्टीला…’’

‘‘पांग्याण्णा, गप बसा. मा सांगितलं ना? बरं का मनोहर पंच, महाराजांनी न घाबरता, दोन दिवस वाड्याच्या पार मागपर्यंत जाऊन, तटाच्या पडक्या, जळक्या भिंताडापर्यंत जाऊन, सगळा वाडा फिरून बघितलाय. पडक्या बुरुजावरून सर्व वाडा न्याहाळलाय. आहात कुठे? केवढं हे धाडस? मला वाटतं, वाडा जळल्यापासून परसदारीसुद्धा आमच्यातलंच काय, पण गावातलंसुद्धा कुणी मागं जाण्याचं धाडस केलं नाहीय. वाडा जळल्यापासून काकांचं सर्व कुटुंब गळक्या ओसरीवर आणि पुढच्या अंगणातच वास्तव्याला आहे. सागवानी जळक्या लाकडांच्या मेढी ठोकून त्यावर पत्रे टाकून अंगणातच आडोसा करून राहतात झालं! तर अष्टमीच्या मध्यरात्री, काकांच्या त्या भग्न वाड्यात असलेल्या ‘गुप्तधना’चा साक्षात्कार महाराजांच्या दिव्यदृष्टीला झालाय.’’
‘‘वाड्यात नेमकं कुठं गुप्तधन हाय म्हनं?’’ मन्याबाची चौकसखोर चौकशी!
‘‘पूर्व उत्तर कोपर्‍याच्या दगडी जात्याखाली, बैलगाडीच्या कण्या एवढ्या लांब, रुंद, जाडजूड कांबीला ओळीनं ‘सात मोहरांचे हंडे’, चांदीच्या जाडजूड साखळ्यांनी बांधलेले आहेत म्हणे. महाराजांच्या दिव्यदृष्टीला ते ओसंडून जाणारे म्हणजे शिगोशीग मोहरांनी भरलेले सात हंडे स्पष्ट दिसत आहेत. तेव्हापासून महाराज बेचैन झालेत. रात्र रात्र महाराजांना झोप लागत नाही. कारण ते ‘गुप्तधन’ महाराजांच्या स्वप्नात येऊन म्हणतंय, ‘आम्हाला बाहेर काढ!’ कारण इतक्या वर्षांत वाड्याच्या जमिनीखालून ते ‘सात मोहरांचे हंडे’ सरकत सरकत उत्तरपूर्व कोपर्‍याच्या दगडी जात्याखाली आलेले आहेत. तिथून वाड्याचा बाहेरचा तट नजीकच आहे. रात्री महाराजांना दृष्टांत होतो तेव्हा ते मोहरांचे हंडे महाराजांना म्हणतात, ‘‘आम्हाला आता बाहेर काढा. नाहीतर आम्हीपण वाडा सोडून जाऊ. मात्र एक करा, आम्हाला बाहेर काढण्यापूर्वी, आमच्या रक्षणार्थ इथे जो भुजंग आहे, त्याची विधिवत शांत करा.’’ असं महाराजांनी काकांना सांगितलं आहे. आणि ती शांत करण्याकरता काही वस्तू आणाव्या लागतील. त्यासाठी आधी खर्च करावा लागेल. असंही महाराजांनी सांगितलं आहे.’’ आनंदराव.

‘‘असल असल भुजंग असंलच! अशा गुप्तधनावर राखण कराया भुजंग असत्यातच!’’ मन्याबानं ठासून सांगितलं. पांग्याण्णा रीऽऽ ओढायलाच!’’
‘‘आंद्या, माझा सांगावा म्हणून काका इनामदारास्नी सांग, म्हणावं करा एकदा भुजंगाची शांत! जल्माचं दारिद्य्र फिटलं म्हणावं तुमच्या! एक न्हाई, दोन न्हाई, सात मोहरांचं हंडं! नशीब फळफळलं बघा इनामदाराचं! म्हनत्यातनं, भगवान देता है तो सप्पर (छप्पर) फाडके देता है।’’ मन्याबा असं म्हणताच आनंदा उत्साहानं सांगू लागला, ‘‘पण महाराज म्हणतात शांत करण्याकरता लागणार्‍या वस्तू इथं मिळत नाहीत. शिवाय त्या वस्तूंचाच खर्च महाराजांनी पाचशे रुपै सांगितलाय.’’
‘‘बापरे! पाचशे रुपै?’’ बाजीरावसगट सगळेच दचकले.
‘‘त्या वस्तू आणण्याकरता दोन-तीन गावं फिरावी लागणार, तो खर्च वेगळाच! आणि एवढी पाचशे रुपयांची रक्कम काकांकडं कुठली? आता लवकरच कॉलेजला उन्हाळ्याची सुट्टी लागेल. तेव्हा रत्नाकरदादा येईल तेव्हा बघू.’’ असं काकांनी महाराजांना तूर्त सांगितलं आहे. आणि तसंही काका रत्नाकरदादांच्या विचारानं कोणताही निर्णय घेतात. आणि तो तरी कशाला नको म्हणेल? त्याला तर डॉक्टरकीचं शिक्षण घ्यायचं आहे असं घरातले म्हणतात.’’ असं म्हणताच आनंदा उठू लागला. तेव्हा ‘‘ह्येचा कुठं गावात बोभाटा करू नका.’’ असं मन्याबानं बजावलं.

‘‘अहो मनोहर पंच, सार्‍या गावात ही बातमी फुटली आहे. आख्खं गाव काकांपेक्षा जास्त रत्नाकरदादाची व त्या ‘सात मोहरांच्या हंड्या’ची वाट बघत आहे.’’ पांग्गाण्णाकडे बघत आनंदानं हे सांगताच मन्याबानं पांग्याण्णाला चार सणसणीत शिव्या हासडल्या आणि गप्पांची म्हण किंवा चर्चेची बैठक संपली. जो तो आपापल्या घरी उद्योगाला गेला. पांग्याण्णा गणपतीच्या देवळाकडे महाराजांना बैठकीचा इतिवृत्तांत सांगायला दिडक्या पायानं झपाट्यावर गेला. पांग्याण्णाकडून इतिवृत्तांत ऐकून महाराजही खूष झाले. एकंदरीत ‘मासा गळाला लागतोय’ या आनंदात महाराजांच्या खालच्या वाड्यात फेर्‍या वाढू लागल्या. कॉलेजला सुट्टी लागताच रत्नाकर आजोळाहून म्हणजे सांगलीहून घरी आला. महाराज त्याच्या येण्याच्या पाळतीवरच होते. महाराज वाड्यात आले. पांग्याण्णाही बरोबर होताच. नमस्कार चमत्कार, ओळखदेख झाली. पांग्याण्णा खूप बोलत होता. काकू रीऽऽ ओढत होत्या. महाराज मनातून खूष झाले. रत्नाकर सारं ऐकत होता आणि काकू तर मोहरांच्या सात हंड्यांकरता उतावीळ झाल्या होत्या. ‘मासा थुकतंया’ म्हणजे मासा गळाला लागलाय अशा आविर्भावात महाराज होते.
काका इनामदारांनी महाराजांना विनंती केली, ‘‘महाराज, रत्नाकर आत्ताच प्रवासातून आलाय. जरा वेळानं आपण बसू.’’
‘‘बरं बरं!’’ म्हणून महाराज निर्धास्त झाले. ‘आता हे गिर्‍हाईक चांगलं गंडलंय’ अशा आत्मप्रौढीनं वाड्यातून बाहेर पडले.

स्नान व जेवण झाल्यावर, तासा-दोन तासानं रत्नाकरनं काकांकडे (वडिलांकडे) महाराजांबद्दल चौकशी सुरू केली. तेव्हा काकूच (आई) उत्साहानं घडलेली हकिगत, महाराजांचं म्हणणं, ते गुप्तधन म्हणजे ‘मोहरांचे सात हंडे’ बाहेर काढण्याकरता येणारा खर्च, महाराज कसे भूतकाळ जाणणारे आहेत, तसंच महाराज गेले दहा-बारा दिवस ते गुप्तधन आपल्याला मिळावं म्हणून धडपडत आहेत, अष्टमीपासून एकावळ (एकदाचं जेवण) करून दूध व एक धान्य म्हणजे शाळूची भाकरी एवढाच आहार घेऊन उपास करत आहेत, ‘मला त्यांनी धर्माची बहीण मानलंय’ वगैरे साग्रसंगीतपणे सांगितलं. तर ओसरीवर बसलेल्या पांग्याण्णानं या चर्चेत आपणहून भाग घेणं सुरू केलं.
‘‘आवं रत्नाकरदादा, आपण दिवसा तुमच्या वाड्यात फिरायला घाबरतो. पण ह्ये महाराज दिवसाच काय, राती बी पार मागच्या तटापातुर फिरत्यात. आवं, मापटंभर तांदूळ मंत्रून टाकल्याती त्यांनी समद्या तुमच्या वाड्यात! आन् त्ये ‘सात मोहरांचं हंडं’ त्या ततं जोत्यावर हळद-कुंकवाची रिंगण काढून खुंटवून ठेवल्याती. महाराजास्नी सर्व्या सिद्दी पराप्त (प्राप्त) झाल्याती. हायसा कुठं?’’
असा सज्जड दम भरून जोत्याकडं नेऊन, लांबूनच ‘महाराजांची करणी’ दाखवली.
‘‘आवं, पाडव्यापास्नं रातन् दिन मी हतंच राखणीला अस्तु. महाराजांनीच मला काका-काकूंच्या सोबतीला इतं र्‍हाया सांगिटलंया. तवाधरनं दोनी टायमाला काकूंच्या हातची शाळूची भाकर आन् कालवण खातुया. आन् निवांत पडतु ओसरीवर बघा!’’
पांग्याण्णाची रीऽऽ ओढायला काकू होत्याच. काकूंनी रत्नाकरला जोत्याजवळ जाऊ दिलंच नाही. कारण महाराजांची तशी ताकीदच होती. ‘महाराजांबद्दल रत्नाकरही विचार करू लागला,’ असं सर्वांना वाटू लागलं. काकू, पोरं, पांग्याण्णा सारे महाराजांची वाट पाहत होते.
महाराज थेट रात्रीच आले. त्यांनीही परत तोच तोच पाढा वाचला. तेव्हा रत्नाकर म्हणाला, ‘‘महाराज, तुम्ही गेले दहा-बारा दिवस इथं येत आहात. आमच्या एकंदर परिस्थितीची तुम्हाला कल्पना आली असेलच! तेव्हा आता एक मस्त प्रस्ताव मांडतो.’’ रत्नाकरचा प्रस्ताव ऐकण्याकरता सार्‍यांनीच जिवाचा कान केला. रत्नाकर सांगू लागला,
‘‘प्रस्ताव असा आहे. ते ‘सात मोहरांचे हंडे’ आम्हाला नकोत. आम्हाला संपत्तीची एवढी हाव नाही. चालू परिस्थितीत ‘एक मोहरांचा हंडा’ आम्हाला चिक्कार झाला. बाकी मोहरांचे सहा हंडे आम्ही तुम्हाला दान करतो.’’ असं मी तुम्हाला कोर्ट स्टँपवर लिहून देतो. तेव्हा महाराज तूर्त त्या स्टँप पेपरचा व तुम्ही म्हणताय त्या वस्तूंचा खर्च तुम्ही करावा ही माझी विनंती आहे तुम्हाला!’’ हा रत्नाकरचा प्रस्ताव ऐकताच पांग्याण्णा अत्यानंदानं जवळजवळ ओरडलाच,
‘‘सा मोहरांनं भरलेलं हंडे तुम्हाला ‘दान’! महाराज, ऐकताय न्हवं रत्नाकरदादा काय म्हनत्यात ते!’’
पण महाराज मात्र दचकलेच! त्यांना ही अपेक्षा नव्हती, तरीपण ‘‘ठीक आहे.’’ महाराज उठलेच. संभ्रमित अवस्थेत रत्नाकर सोडून बाकी सगळे चुळबुळत झोपले.
पाचशे रुपयांकरता ‘स्तुतिपाठक’ बनलेले महाराज पुन्हा कधी गावात दिसलेच नाहीत.

अधूनमधून अजूनही रत्नाकरदादा गावी गेला की, देवळाच्या ओवरीत पांग्याण्णा दिसतो. ‘‘आण्णा, बरं आहे का?’’ असं विचारताच, ‘‘आवं रत्नाकरदादा, कशाचं बरं… तवा पंचवीस रुपै मिळत्याल म्हणून तुमच्या सज्जन वडिलास्नी (संत तुकारामावानी देवगुनी) – काका इनामदारास्नी- भरीस घातलं. चांगल्या माणसाला फशिवण्याचा घाट त्या महाराजानी घातला. त्यात मी सामील झालू. तवा एका पायानी चालत हुतो, आता तर जाग्यावर! त्येचं पाप भोगतुय झालं! पर तुमचा ‘बामणी तिडा’ म्हंजी त्यो परस्ताव हो! तुम्ही ल्हान वयात लई भारी आयडिया बी लढवलीत. सुशिक्षितपणामुळं बिन बोलता! भांडणतंटा न करता! आन् महाराजासारखी ‘बुवाबाजी’ची कीड गावाबायेर गेली.’’ पांग्याण्णा दिलखुलास हसतो.

– कादंबरी देशमुख

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.