Now Reading
पुणेकर करी – अमेरिका वारी

पुणेकर करी – अमेरिका वारी

Menaka Prakashan

त्या वेळी एक डॉलर पासष्ट रुपयांना होता आणि पासष्टचा पाढा पाठ करायचा प्रयत्न करूनही पासष्ट चोक दोनशे साठ, या पलीकडे माझी मजल गेली नसल्यानं, चार डॉलर पलीकडे माझी खरेदी कधी गेलीच नाही. बरं तिथे नक्की कोण काय विकतंय हेही मला कळत नव्हतं.

या वर्षी लॉकडाऊनच्या उघड-बंद होण्यामुळे, घराबाहेरदेखील पडता येत नाही, याचं मला दु:ख झालं होतं. कोव्हिडमुुळे मोठी सुट्टी मिळाली खरी, पण बिनपगारी बसलो घरी, तेव्हा आठवली आमची अमेरिका वारी.
मागच्या वर्षी एके दिवशी, अत्यंत गोड आवाजात, ‘अहो’ अशी हाक कानावर आली. मला वाटलं आमची शेजारीण हाक मारतीये की काय! पण थांबा. तुमच्या वर जाणार्‍या भुवयांना खाली आणा. आमची शेजारीण, आमच्या किचनला खेटून असणार्‍या तिच्या किचनमधून, नेहमीच अशा हाक मारते, पण तिच्या नवर्‍याला.
तर अत्यंत गोड आवाजात माझ्या बायकोची हाक ऐकून मी दचकलो. मोदीजी ‘मित्रों!’ म्हणाले की काही लोकांची होते तशीच माझी अवस्था झाली. त्यावर बायकोनं माझ्या वर्मावर वार घातला, ‘‘बरं का, या वर्षी आपण अमेरिकेला जाऊया.’’
‘‘अगं पण..’’
‘‘अहो, कोलंबस असल्यासारखे घाबरताय कशाला? त्याला शोध लावायचा होता, तुम्हाला काय? नुसतं विमानात तर बसायचंय.’’
मी कोलंबसाबद्दल वाचल्यावर कळलं की, त्याला पैशाची चिंता नव्हती. त्याचा खर्च स्पेनच्या राजघराण्यानं केला होता आणि इथे तो मला स्वत:ला करायला लागणार होता.
इतिहास म्हणतो, इसाबेला राणीनं कोलंबसला प्रोत्साहित केलं. पण मला वाटतं, नवीन प्रदेशांच्या शोधात घराबाहेर पडण्याची प्रेरणा त्याला दुसर्‍याच राणीकडून मिळाली असावी – सौभाग्यवती कोलंबस यांजकडून!
अमेरिकेचा व्हिसा मिळवण्याचं दिव्य पूर्ण करताना, माझी मुलाखत घेणार्‍या अमेरिकन माणसानं मला इतक्या वेगानं, इतके प्रश्न विचारले, की घाबरून जाऊन मी वाटेल ती उत्तरं दिली. बहुतेक केवळ माझी कीव आल्याने त्याने मला पस्तीस टक्के मार्कांनी पास करून व्हिसा दिला असावा.
तोपर्यंत हिनं अनेक नातेवाईक आणि मैत्रिणींना लिहून आमची ट्रीप आखून ठेवली होती. त्यामुळे कोलंबसला पाठवणार्‍या राजा-राणी प्रमाणे अमेरिकेत अनेक दिलदार लोक आमच्या स्वागतासाठी तयार होते.

इंटरनेटवर संशोधन करून आणि बरेच हॉलीवूडचे सिनेमे (सबटायटल लावून) बघून मी अमेरिकेत जायची तयारी केली. पण अमेरिकेत पाय ठेवताच माझी विकेट पडली. मुंबईहून निघून आमचं विमान जिथे उतरलं त्या जागेचं नाव काही मला सुधरेना. ‘Newark’ चा उच्चार ‘न्यू आर्क’ करायचा की ‘नेवार्क’, हेच मला कळेना. त्यानंतर वॉशिंग्टनला गेल्यावर मला अगदी पुणेरी प्रश्न पडला. टनभर वॉशिंग केल्यानंतर पाण्याची टाकी रिकामी होणार नाही का? पण उत्तर जवळच सापडलं – बाल्टिमोर. म्हणजे जास्त बादल्या! आम्ही मिशिगनमध्ये हिच्या मैत्रिणीकडे गेलो, तर तिच्या मिस्टरांच्या चेहेर्‍यावर ना मिशी होती ना घरात गन! एकूणच अमेरिकेतल्या नावांची मला जरा गंमतच वाटली. त्यामुळे मी असा शोध लावला की, ‘डरप गेीश’ म्हणजे ‘सॅन जोसे’, हे नाव ‘संजय जोशी’ नामक महाराष्ट्रातून आलेल्या पहिल्या कॉम्प्युटर इंजिनीअरच्या आठवणीत ठेवलेलं असावं. त्याचा उच्चार ‘सॅन होजे’ करायला अर्थातच मला कधीच जमलं नाही.
तिथे आम्हाला एक पस्तिशीतली मराठी मुलगी भेटली. बोलता बोलता मी तिला विचारलं, ‘‘घरची आठवण येते का?’’
‘‘हो. मावशी आणि काकांची खूप येते.’’ ती हसत म्हणाली.
‘माय मरो आणि मावशी उरो’ अशी एक म्हण आहे, पण ही काका मावशीची भानगड मला काही कळेना. अनेक निरर्थक सिनेमे पहिल्यानं तीव्र झालेली माझी कल्पनाशक्ती तिच्या घराण्यात काय लफडं असेल हे तपासू लागली.
नंतर कळलं की, उच्चभ्रू घरातून आलेली ती कन्या, इथे घरकाम करून आणि मुलांची शाळेत ने-आण करून कंटाळली होती, म्हणून माहेरी स्वयंपाक करणार्‍या मावशी आणि ड्रायव्हर काकांची आठवण काढत होती.
त्यानंतर आम्ही माझ्या भाचीकडे गेलो आणि रविवारी सकाळी ती आम्हाला एका क्लबमध्ये घेऊन गेली. अनेक तरुण मंडळी आणि त्यांची लहान मुलं तिथे एकत्र जमली होती. मुलांना थोडं मराठी आणि थोडं भारताबद्दल ज्ञान देण्याचा प्रयत्न चालला होता. मुलंही उत्साहानं शिकत होती. पुण्यात एका रिक्षाचालकाला रस्ता सांगताना मी ‘उजवीकडे-डावीकडे’ म्हणालो तेव्हा महाराष्ट्रात जन्मलेला तो मराठी ड्रायव्हर मला म्हणे ‘लेफ्ट-राईट’ सांगा. त्यामुळे, मराठी भाषेवरचं प्रेम आणि पुढच्या पिढीला मातृभाषा शिकवायची ती धडपड पाहून मला खूप आनंद झाला.

मी कौतुकानं त्या मुलांचं मराठी शिकणं बघत असताना एक अत्यंत मॉडर्न आणि टुणटुणीत आजीबाई तिथे आल्या. त्यांच्या वागण्या-बोलण्यावरून त्या कोणीतरी टर्रेबाज असाव्यात असं स्पष्ट दिसत होतं. त्यांनी एका मुलाला उभं केलं आणि ‘भ’ पासून सुरू होणारे तीन शब्द विचारले. क्षणभर तो मुलगा विचारात पडला.
आणि मी सुद्धा. कारण ‘भ’पासून सुरू होणारे अनेक शब्द मला ठाऊक आहेत, पण त्यातला एकही तिथे उच्चारण्यासारखा नव्हता.
तेवढ्यात तो मुलगा म्हणाला, ‘‘भारूड.’’
आजीबाई म्हणाल्या, ‘‘अजून दोन शब्द सांग.’’
‘‘भजन आणि भक्ती.’’ तो म्हणाला.
एकविसाव्या शतकात अमेरिकेत हा ज्ञानेश्वर कसा काय जन्मला, या विचारात आश्चर्यानं मी त्याला म्हणालो, ‘‘भारूड हा शब्द एका वाक्यात वापरून दाखव.’’
मला वाटलं, ‘ए दारुड्या’प्रमाणे, तो ‘ए भारुड्या’ असं म्हणतोय का काय? तर तो म्हणाला, ‘‘माझी आजी भारुडाचे कार्यक्रम करते.’’
मी भावूक झालो, भारावून गेलो, माझं मन भरून आलं, भेसळीमुळे भ्रष्ट होत चाललेली आपली भाषा भविष्यात नष्ट होईल ही भयंकर भीती कमी झाली आणि…
…आणि आपल्यालाही ‘भ’पासून सुरू होणारे भरपूर चांगले शब्द आठवले ह्याचा मला भन्नाट आनंद झाला.
त्या आनंदात मी त्या आजींना विचारलं, ‘‘तुम्ही ‘भ’ हे अक्षर का निवडलंत?’’
त्यांनी रागावून माझ्याकडे बघितलं. ‘‘नवीन आहात का इथे?’’
‘‘पुण्याहून आलोय.’’
माझ्यावर सूड घेण्यासाठी त्या हसून म्हणाल्या, ‘‘अच्छा? शिकवा मुलांना एक मराठी गाणं.’’
मी घाबरून जागीच खिळून राहिलो.
‘‘ओह, कमाऑन’’ त्यांनी मला चिडवलं.
मोठा सुस्कारा सोडून मी आपणा सर्वांचं लाडकं बालगीत गायला सुरुवात केली, ‘‘नाच रे मोरा, आंब्याच्या वनात, नाच रे मोरा, नाच.’’
‘‘आता मुलांना इंग्रजीत अर्थही सांगा, तालासुरात.’’ त्या छद्मीपणे म्हणाल्या, अगदी जोरात.
गीतकार ग. दि. माडगूळकर आणि संगीतकार पु. ल. देशपांडे यांची मनातल्या मनात माफी मागून मी त्याच चालीवर, तेच शब्द इंग्रजीत गायलो, ‘‘ऊरपलश ेह शिरलेलज्ञ, ळप ींहश ारपसे र्क्षीपसश्रश, वरपलश ेह शिरलेलज्ञ, वरपलश.’’
‘‘खरं वाटत नाही? म्हणून तर बघा!’’
आणि ते ऐकल्यावर संपूर्ण ‘सिलिकॉन व्हॅली’मध्ये सगळ्यात ‘सिली कोण’ असेल तर हाच, असा चेहरा करून त्या निघून गेल्या.
‘भ’ वर इतकं प्रेम त्यांना का वाटत असावं, याचा मी विचार करत असताना त्यांचं नाव कळालं – भाद्रवी भास्कर भडभडे, आणि नंतर हेही कळलं की त्यांचे भ्रतार, म्हणजे मिस्टर, तिथे मोठे प्रस्थ आहेत.
अमेरिका भ्रमणात शेवटी आम्ही हिच्या भावाकडे उतरलो. आतापर्यंत सगळ्याच लोकांनी आमच्यासाठी खूप केलं होतं, पण इथे जास्त दिवस रहायचं होतं म्हणून मी विचारलं, ‘‘मी काही मदत करू का?’’
‘‘कांदे चिराल?’’ वहिनी आनंदून म्हणाल्या.
मी मन लावून कांदे चिरले.
‘‘अय्या, कित्ती छान चिरलेत!’’ त्या चित्कारल्या.
बायकोनं ‘घरी कशा जमत नाहीत या गोष्टी?’ अशा अर्थाचा कटाक्ष माझ्या दिशेला फेकला. पण परराष्ट्रात नवर्‍याची नाचक्की न करण्याचं भान ठेवून ती काही म्हणाली नाही.
‘‘ह्यांच्या डोळ्यात पाणी येत नाही का?’’ वहिनींनी विचारलं.
‘‘पत्थरदिल आहेत ते.’’ बायकोनं कुठल्यातरी सिनेमातला डायलॉग मारला.
एके दिवशी अचानक त्या वाहिनी मला आणि त्यांच्या नवर्‍याला म्हणाल्या, ‘‘तुम्ही दोघं बाहेर खरेदी करायला जा बरं.’’

मला कारण काही कळेना, पण मी त्यांच्याबरोबर मुकाट्यानं बाहेर पडलो आणि बंधू मला एका प्रचंड मॉलमध्ये घेऊन गेले. त्या वेळी एक डॉलर पासष्ट रुपयांना होता आणि पासष्टचा पाढा पाठ करायचा प्रयत्न करूनही पासष्ट चोक दोनशे साठ, या पलीकडे माझी मजल गेली नसल्यानं, चार डॉलर पलीकडे माझी खरेदी कधी गेलीच नाही. बरं तिथे नक्की कोण काय विकतंय हेही मला कळत नव्हतं. आपल्याकडे कशी स्पष्ट असतात नावं ‘देसाई बंधू आंबेवाले’, ‘चितळे बंधू मिठाईवाले’, ‘जोशी वडेवाले’ – म्हणजे काही शंकेला वावच नसतो. इथे सगळंच वेगळं! ‘अ‍ॅपल कॉम्प्युटर’ मला माहीत होतं, पण ‘कॅमल सिगरेट’ आणि ‘मँगो ब्रँड’चे कपडे?
खूप वेळ हिंडल्यावर शेवटी आम्ही एका बागेबाहेर फास्टफूडच्या ट्रकपाशी थांबलो. अमेरिकेत सगळंच बलाढ्य. तिथले सँडविच पाच मजली तर बर्गर तीन मजली. त्यांनी एक बर्गर घेतलं आणि सराईतपणे दोन्ही हातांनी दाबून घास घेतला. एका हातात चहाचा ग्लास असल्याने मी एकाच हातानं ते बर्गर तोंडात घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यातली निर्दयी कोंबडी, कांदा टोमॅटोचा हात धरून पळून गेली आणि दहा डॉलरचा बनपाव माझ्या हाती सोडून गेली.
वर त्या धक्क्यानं माझ्या शर्टचा, टी-शर्ट झाला, म्हणजे, त्यावर चहा सांडला.

मग भारतात आपण करतो तसं मी दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला, पण त्यांनी आठवण करून दिल्याने आधी रस्ता आणि मग शर्ट साफ केला. ‘दुसरं आणू का?’ असं त्यांनी विचारल्यावर मी नकारार्थी मान हलवली आणि फ्रेंचफ्राईजबरोबर आपलं दु:ख गिळलं. त्यातल्या त्यात अमेरिकेत रस्ता साफ करण्याचं श्रमदान केल्यानं ट्रम्प साहेब मला हारतुरे घालून आजन्म व्हिसा देऊन टाकतील, अशीही एक कल्पना माझ्या मनात येऊन गेली.
परत आल्यावर त्यांच्या घरासमोर एक मोठी गाडी लावलेली दिसली. कोण आलं असेल असा विचार करत मी त्यांच्याबरोबर घरात शिरल्यावर हॉलमध्ये एका हातात व्हॅक्युम क्लीनर धरून, चड्डी-बनियान घातलेली एक गोरी मुलगी कोक पीत उभी होती. यांच्या घरी झाडू मारायला ही सुंदरी कुठून आली हे मला काही कळेना. आमच्या यजमानांनी ‘हॅलो मारिया’ अशी हाक मारल्यावर त्या मुलीनं जवळजवळ त्यांना मिठीच मारली, आणि त्यानंतर, ‘आजकाल कसले ऐरे-गैरे इथे यायला लागलेत,’ अशी नजर माझ्याकडे फेकून ती कामाला लागली.
तिच्यापासून दूर आल्यावर ते मला हळूच म्हणाले, ‘‘ही आमची कामवाली. आठवड्यातून एकदा येते.’’ मग मला साक्षात्कार झाला की वहिनी आम्हाला बळजबरीने शॉपिंगला का पाठवत होत्या!

कामवालीबद्दल त्याचं प्रेम बघून मला आश्चर्य वाटलं नाही. कारण परदेशात सगळेच साधारणतः वागण्या-बोलण्यात गोड असतात. उलट मला आश्चर्य ह्याचं वाटतं की त्या लोकांच्या मानाने आपण बरेच तुसडे आणि तापट असूनही आपली लोकसंख्या इतकी कशी?
दोन-चार दिवसांनी निघायची वेळ आली तेव्हा माझ्या लक्षात आलं, इतक्या दिवसांत एकदाही गाडीचा हॉर्न ऐकू आला नव्हता, की वीज गेली नव्हती आणि ट्रॅफिक जॅमही झाला नव्हता. सगळं कसं सुंदर, शांत आणि सुरळीत चाललं होतं. माझा तर अमेरिकेतून पाय निघत नव्हता पण शेवटी परत यावं लागलंच.
समोर अप्सरा नाचत असूनदेखील चित्त विचलित होऊ न देता ध्यानस्थ बसून राहणं आणि ड्युटी-फ्री मधून जाताना मुठी, तोंड आणि पाकीट बंद ठेवून चालत राहणं ह्यात काहीही फरक नाही. आध्यात्म म्हणतात ते हेच.

रामायणातल्या खारीप्रमाणे अमेरिकेत माझ्याकडून छोटीशी मदत म्हणून मी वीस-तीस किलो कांदे चिरले होते, डोळ्यात पाण्याचा थेंब न आणता! पण भारतात परतल्यावर कांदा चिरायची सक्तमजुरी करावी लागली, तेव्हा माझ्या डोळ्यांतून आणि नाकातूनही पाणी आलं. मी म्हणालो हा कांद्याचा गुण, पण हिनं ओळखला माझा गुण. खरं कारण असं की तिथे मी चष्मा लावून कांदे चिरले आणि इथे मुद्दाम चष्मा काढून!
ते पाहून बायको म्हणाली, ‘‘कडू कारलं, तुपात तळलं, साखरेत घोळलं, तरी कडू ते कडूच.’’
‘‘म्हणजे काय?’’
‘‘म्हणजे तुम्ही.’’ ती हसत म्हणाली. ‘‘कट्टर पुणेकर, जगभर फिरले, अमेरिकेत राहिले, तरी पुणेकर ते पुणेकरच.’’
असा शेरा मारून, आंतराष्ट्रीय स्तरावरून राष्ट्रीय पातळीवर उतरत बायकोनं आमच्या अमेरिकन ट्रीपची सांगता केली.

– अविनाश चिकटे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.