Now Reading
थोडासा ‘वाह्यात’ हो जाए!

थोडासा ‘वाह्यात’ हो जाए!

Menaka Prakashan

उर्दू आणि मराठीत दोन शब्द सारख्या अर्थाचे आहेत. ‘वाह!’, ‘वाहवा!’ म्हणजे शाबास! आणि त्यापुढे उर्दू शब्दकोशातून पुढे चालत गेलं की भेटतो ‘वाह्यात!’ वा निष्फळ, बाष्कळ! मराठीत सहसा हा शब्द वापरला जातो. पण तो शब्दकोशातून कुठे भरकटलाय, माहिती नाही. सांगायचं म्हणजं, वाहवा मिळवणारा माणूस एकदा का लोकप्रिय झाला, की त्याच्या नाकात वारं शिरतं. विनोदवीर, विनोदी लेखक, थट्टा मस्करी करणार्‍याला हे अधिक लागू होत असतं. पाहता पाहता तो अंगविक्षेप करायला लागतो. एका शब्दातून दुसरे काही सुचवायला जातो. कधी लोकप्रिय झालेला विनोदवीर किंवा लेखक आत्मविश्वास डळमळू लागला, की लागतोच अशा नादाला!

आणि तसं पाहिलं तर दर्जा आणि बाष्कळपणात फरक असतो, तो आपल्या नजरेचा! एखाद्याला पोट धरून हसवणारा विनोद, दुसर्‍याला पोट दुखवणारा, चीड आणणारा असतो. मग वाहवा कुणाला द्यायची आणि वाह्यात कुणाला म्हणायचं?! वाहवा आणि वाह्यातपणाचं हे नातं विनोदात नेहमीच जाणवत असतं. आणि व्यंगचित्रात सारखं सारखंच जाणवत असतं.
शारीरिक थट्टा-विनोदाची व्यंगचित्रं असतील तर हे प्रकर्षाने लक्षात येतं. विनोद चावट कोणते, अन् अश्लील कोणते, विनोदी कोणते आणि वाह्यात कशाला म्हणायचं हा नेहमीचा आस्वाद-गुंता. व्यंगचित्रकाराच्या हाती एक जालीम कायदा असतो, त्याच्या आधारावर तो नेहमीच ‘जामिना’वर सुटत असतो. अश्लीलता ही चित्रात नसते- तुमच्या नजरेत असते, हा तो कायदा! धक्का मारून रुबाबात जायचं त्यानं आणि धक्का खाऊन खांदा चोळत बसायचं आपण! आता हेच पहा ना, बाल्टीनॉफ या व्यंगचित्रकाराच्या चित्रात ब्रेसियर्सच्या दुकानातल्या बाईच्या खांद्याला धक्का लागला की!

दुकानासमोर- म्हणजे काऊंटरच्या खाली नजर टाकून पाहावी लागली, ती ही छोटी पोरं- यांची धक्का मारण्याएवढी ‘उंची’ तरी आहे काय! उगीच खेकसायचं म्हणजे! टीचरच्या बर्थडेसाठी एक आगळंवेगळं गिफ्ट द्यायची कल्पना खरं पाहिलं तर किती अभिनव आहे! ऊठसूठ चॉकलेट कँडी अन् फुलं देण्यापेक्षा काहीतरी ‘टिकाऊ’ भेट द्यायचा विचार करणारी ही पोरं, इथे किती मोठेपणाचा विचार करून आलेली आहेत! या व्यंगचित्रामध्ये वाह्यातपणाचा उत्तम तोल साधलेला आहे. एका बाजूला खेकसणारी दुकानदारीण आणि दुसर्‍या बाजूला ‘निरागस’ चेहर्‍यानं उभी असलेली लहान पोरं! दोन्ही बाजूचे चेहरे म्हणजे, विनोद आणि वाह्यातपणाचा तोल सांभाळणारा तराजूच! इथे कुठे आहे चावटपणा?! किंवा असलाच तर किती हवाहवासा वाटणारा!

काहीही म्हणा, चावटपणा हा प्रत्येकाला आवडत असतोच. नकारायचं कशाला? मग असं असेलच तर चित्र थोडं वाह्यात होऊन पाहायला काय हरकत आहे…?
महाराष्ट्रातले ज्येष्ठ व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांचं एक सुंदर व्यंगचित्र आहे- एका मिनिटांत साठ प्रती देणार्‍या झेरॉक्सच्या दुकानाचं; तिथे ग्राहकांची अजिबात गर्दीच नाही, मात्र शेजारच्याच झेरॉक्सच्या दुकानात ‘साठ मिनिटांत एक प्रत’ मिळते आहे, पण तिथे ‘ग्राहकां’ची रांग लागलेली आहे! कारण? ते तर स्पष्टच दिसतं आहे- पहिल्या दुकानात काऊंटरवर आहे ज्येष्ठ नागरिक आणि दुसर्‍या दुकानात अर्थातच, मत द्यायचा नुकताच अधिकार मिळालेली सुरेख पोरगी!
उत्तम व्यंगचित्रामध्ये आपल्या मनातल्या वाह्यातपणाला पेटवून तो व्यंगचित्रकार साळसूदपणाने पुढे निघून गेलेला असतो आणि आपण मनाची दारं बंद करून खुदुखुदु हसत असतो. ब्रिटिश व्यंगचित्रकार मायकेल फोक्स यांचं हे व्यंगचित्र अशा अनुभवाची साक्ष देतं.

टारझन म्हणजे, अर्धनग्न असलेला भक्कम माणूस आणि त्याची खासियत म्हणजे धावायची सोय असली तरी पारंब्यांच्या आधारे भरार्‍या मारण्याचा त्याचा शॉर्टकट! इथे असाच एक प्रसंग आहे- अर्थात रात्रीचा. अर्धनग्न टारझनची प्रेयसी आहे त्याच्या पुढे अर्थातच तशाच कपड्यात; (ती कुठून नऊवार नेसून डोक्यावर पदर घेणारी असणार?) आणि व्यंगचित्रकाराने तिची बाजू इतकी सफाईदारपणे मांडली आहे, की भानगड झाल्याची दाट शंका येऊनसुद्धा टारझनला हात चोळत बसावं लागलं. चित्रात अंधार आहे, दाट जंगल आहे, पारंब्याच्या आधारानं आत्ताच क्रॉस झालेला टारझनचा पूर्वज अंधारात लौकर दिसत नाही- टारझनलाच लवकर दिसला नाही, तर आपल्याला कसा दिसणार?
या संदर्भात विनोद आणि अश्लीलता यांच्या मर्यादा काय, याची चर्चा करणारा एक लेख ‘जनवाणी दीपावली विशेषांक, 1960’ मध्ये प्रसिद्ध झाला होता, त्यातील काही संदर्भ पाहू या. (सौजन्य- पुनःश्च)

‘हास्य निर्माण करण्याच्या हव्यासानं, अश्लील गोष्टीचा मोह टाळणं चांगल्या चांगल्या लेखकांनाही अशक्य होतं. अशा प्रसंगी ही अश्लीलता जास्तीत जास्त सूक्ष्म किंवा प्रकट असली, तर सुसह्य होते. ज्या विनोदात लैंगिक सूचकता अगदी उघडपणे प्रतीत होते, तो विनोद ओळखणं फारसं कठीण नसतं. व्यावहारिक ‘व्याकरणां’तील लिंगभेदावर माधवरावांनी जो विनोद केला आहे, तो फारच बहारदार आहे. त्यांच्या नाटकातलं एक पात्र म्हणतं, ‘भाषेच्या व्याकरणात ज्याच्या मागे ‘तो’ लागतो, ते पुल्लिंग, ‘ती’ लागते, स्त्रीलिंग. पण माणसाच्या व्यवहारांत ज्याच्या मागे ‘तो’ लागतो, ते स्त्रीलिंग आणि ‘ती’ लागते, ते पुल्लिंग, हा विनोद इतका स्पष्ट असूनसुद्धा तो अश्‍लील वाटत नाही.’
ही सूचकता शब्दांतली, कधी दोन अर्थांच्या स्पर्शाची. चावटपणाला वाह्यातपणाची बाधा एवढ्या लवकर होते, की चावटपणाची लज्जतच मागे राहून जाते. खरं म्हणजे, चावटपणाच्या सीमारेषेवर विनोदाची एवढी टवटवी असते, की माणसाची जी मूळ प्रकृती- जी अनेक कारणांनी बंदिस्त असते, ती अशी मनमोकळी होते. असं व्यंगचित्र पाहताना वाचकाला बाथरूममध्ये मनसोक्त गाण्यासारखाच आनंद होतो!

लेखकाकडे शब्दाचंच एक हत्यार असतं; व्यंगचित्रकाराकडे मात्र दोन हत्यारं असतात. पंजाबी संगीतातल्या वाद्यांपैकी ‘अलगुजा’ हे एक वाद्य असतं, दुहेरी बासरीचं. दोन बासर्‍या तोंडात घेऊन वादक ते वाद्य कसं काय वाजवत असतो, हे पाहताना गंमत वाटते. तसाच प्रकार व्यंगचित्रकाराचा. त्याच्याजवळही असंच वाद्य असतं, रेषेचं अन् भाषेचं. उदाहरण म्हणून चित्र क्र. 1, 2, 3, 4 आणि 5 ही व्यंगचित्रं पाहावीत. त्या त्या व्यंगचित्रकारांनी रेषेची अन् शब्दांची किती बहार उडवून दिली आहे. इथे शब्दाचा दुसरा अर्थ, किंवा शब्दांतली सूचकता ही रेषेतून स्पष्ट केली आहे. क्र. 3 च्या चित्रासोबत गाईडचं विधान नसतं, तर ते सरळ वाह्यात व्यंगचित्र झालं असतं. शिवाय या चित्रात ‘पाहणार्‍या’ पुरुषाच्या बायकोचं लक्षही त्याच्याकडे आहे, हे आपण पाहतो. एका पॉकेट कार्टून संग्रहाचं हे मलपृष्ठावरचं व्यंगचित्र आहे!

पीटर अर्नो हा अमेरिकन व्यंगचित्रकार. मोठा चावट म्हणावा असा; पण चित्रकलेवरची त्याची पकडच अशी, की चित्रातली त्याची पात्रं आणि तो चावट विनोद ही प्रसंगातली एक अपरिहार्य अशी परिस्थिती वाटावी! त्याशिवाय विनोदाला साजेसं त्याचं, ब्रशने रेखाटलेलं अप्रतिम असं व्यक्तिचित्रण!
शब्दरहित व्यंगचित्रांमध्ये व्यंगचित्रकार किती बहार उडवून देतो याची साक्ष देणारी ही व्यंगचित्रं पाहावीत. शब्दांतून सूचित होणारा चावटपणा (अश्लीलपणाला पर्याय म्हणून हा शब्द घेतो आहे, थोडा वापरण्यासारखा. ‘अश्‍लील’ वाह्यात वाटतो, नाही का!) नाहीतरी थोडा ‘लागतो’च, पण रेषेतून उमटलेला… लाजवाब!
आन्द्रे फ्रान्स्क्वाचं आणि (बहुतेक त्याचंच असावं) एक परकीय, अशी ही दोन्ही व्यंगचित्रं नग्नतेबद्दल सर्वसाधारण माणसांचं चोरटं कुतूहल, चावटपणा दाखवणारी आहेत. विविध माणसांचे नमुने इथे पाहायला मिळतील. त्यांचं ते पाहणं-शोधणं व्यंगचित्रकारांनी केवढ्या गांभीर्यानं चित्रित केलेलं आहे! इथे नग्नता तर आहेच, पण पाहणारी माणसंच नागवी झालेली आहेत की! चावटपणा हा तिथे नसतो, तर तो असतो आपल्या नजरेत, हे सांगावं ते चित्रकारांनी आणि व्यंगचित्रकारांनीच!
आणि हे शेवटचं व्यंगचित्र. व्यंगचित्रकाराचं नाव, तपशील काहीही नसलेलं आणि अवचितपणे मला सापडलेलं.

विवाहबाह्य संबंधात मला वाटतं, ‘त्या’ दोघांपेक्षा कमालीची रुची घेणारे असतात ते लेखक आणि व्यंगचित्रकार! या अशा भानगडीत गती यायच्या आधीच फजिती होत असते आणि व्यंगचित्रकार तर तयारच असतो, ‘सुटलेली’ कॅच करायला! इथे आपलं लक्ष आधी जातं, ते ‘लॅच की’नं उघडून दारात उभ्या असलेल्या सैतानाकडे. त्याच्या बॅगेवरच्या स्टिकर्सवरून लक्षात येत, परदेशात गेला होता गडी! तो जिकडे पाहतो आहे, त्याकडे आपलं लक्ष जातं-खुंटीवर लटकावलेलं हालो (halo!), तो हार्प… आणि या सैतानाच्याही आधी आपली नजर जाते ती बेडरूमकडे! तिथे भिंतीला लावून ठेवलेलं सैतानाचं हत्यार, शेपटीचं ते खास ‘ओनिडा’टोक अन् होतो की सगळा उलगडा!

हे व्यंगचित्र केवळ भानगडीचा विनोद नसून मजेदार तपशिलांनी सजलेलं दर्जेदार असं व्यंगचित्र आहे. शिवाय देवदूत आणि सैतानाची भानगड पाहून, मनात अनेक मजेदार विचार येतात. इंग्रजी ‘कोटेशन्स’ ही एका अर्थाने शाब्दिक व्यंगचित्रंच असतात- विनोद आणि सत्याची मजेदार गुंतागुंत असते त्यात! या चित्राच्या अनुषंगाने पुढील दोन ‘कोटेशन्स’ तर किती व्यवस्थित लागू होतात पाहा-
‘Simplicity and complexity need each other!’
आणि
‘Opposites attract… and then usually drive each other insane!’
‘भेटायला’ आल्यावर देवदूताने आपल्या वस्तू (?) भिंतीला लावून ठेवणं किती स्वाभाविक आहे, कुठेही विनोदाचा, भानगडीचा मागमूस नाही, हे पाहून आपल्याला सतत हसू येत असतं. महत्त्वाचं म्हणजे, देवदूताला आकर्षण वाटावं ते चक्क सैतानीचं? किंवा सैतानीला प्रेम वाटावं ते चक्क देवदूताचं? हे व्यंगचित्र आपण पाहत राहतो आणि आपल्याला सारख्या गुदगुल्या होतच राहतात.

व्यंगचित्र हे किती सशक्त दृष्य माध्यम आहे याचा हा उत्तम पुरावा!
अर्थात, इथे दिलेली परकीय उत्तम अशी व्यंगचित्रं ही या विषयावरची असून त्याच्या अर्थाबद्दल चर्चा करणं हे मात्र वाह्यातपणा होईल हे नक्की. कारण सूचकता ही अशा विषयावरच्या व्यंगचित्रातली खुबी, ती उलगडली की ‘आउट’ होऊ आपण! तेव्हा ही व्यंगचित्रं मनातल्या मनात चघळण्यासारखी- पण तशा अर्थांनं वाह्यात नाहीत.
चावटपणाचं असंच असतं, व्यंगचित्रकार चावटपणा करून निघून जाणार आणि त्यावर चर्चा करणारे आपण मात्र वाह्यातपणाचा बोल लावून घेणार! अर्थात आपल्याला तेवढं वाईट तरी कुठे वाटतं? खरं सांगा, व्यंगचित्रकारानं दिलेलं चावटपणाचं चॉकलेट आपण कळत नकळत चघळतोच ना – गोडीच तशी असते!

– मधुकर धर्मापुरीकर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.