Now Reading
तिच्या मुखपट्टीसाठी….

तिच्या मुखपट्टीसाठी….

Menaka Prakashan

लिओनार्दो व्हिंची रात्रभर तळमळत होते. त्यांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. या कडेवरून त्या कडेवर जाता जाता आपला कडेलोट तर होणार नाही ना, अशी भीती त्यांना एकदा वाटली आणि ते धाडकन बेडवरून उठून धावत सुटले.
तडक पोचले ते तिच्या खोलीत. ती जागेवरच असल्याचं बघून त्यांना हायसं वाटलं. धावल्यामुळे त्यांना दम लागला. म्हणून ते खाली बसले. त्यांनी डोळे मिटले. दीर्घ श्वास घेतला. पुन्हा डोळे उघडले आणि तिच्याकडे बघून आर्तपणे म्हणाले, ‘‘माय, माझं ऐक तू आता तरी.’’
ती त्यांच्याकडे न बघताच म्हणाली, ‘‘लिओ, हे बघ मी तुझी माय नाही नंबर एक आणि नंबर दोन म्हणजे मी तुझं अजिबातच ऐकणार नाही.’’
‘‘पण कां ऐकणार नाहीस? त्यातच तुझं भलं आहे की..’’ तिच्याकडे बघण्याचा प्रयत्न करत लिओनार्दो म्हणाले.

‘‘माझं भलं कशात आहे, हे तुला कसं माहीत लिओ.’’
‘‘म्हणजे गं काय?’’
‘‘म्हणजे असं की, तू मला जेव्हा घडवलंस तेव्हा मी रडत होते का, हसत होते का, स्मित करत होते, की काहीच करत नव्हते की तुला इशारा करत होते.. हे तुला कळलं नाही ना? त्यामुळे झालेला घोटाळा सहाशे वर्षं तसाच राहिला. त्यामुळे माझी मी की माझा मी की तुझा मी की तुझी मी, हेच कळेनासं झालंय. या घोटाळ्यानं माझं जे वाटोळ्ळं झालं ते झालंच झालं. आता कशाला करतोयस भल्याची बात? तू करून बसलायस माझा घात!’’
‘‘अगं तू हे काय बोलतेयस? त्यानं माझ्यावर किती आघात झालाय! तुझं काय नि कस्सं वाट्टोळं झालंय सांग बघू’’ असं लिओनार्दो यांनी तिला विचारलं, तेव्हा तिनं लिओनार्दो यांना काळकुपित घालून ढकलून दिलं.

लिओनार्दो गटांगळ्या खात खात 1756 सालातल्या तिच्या दालनी पोचले तेव्हा तिच्यासमोर नेपोलियन बोनापार्ट उभा होता. त्याच्या हातात लिलीचं फूल होतं. नेपोलियनला ती आवडली होती. फार जरी नसली तरी त्याच्या दिलाच्या एका कोपर्‍याला तिनं धडक दिली होती. त्यामुळे, ‘होशील का तू माझी सतरावी राणी?’ असं तो वारंवार तिला विनवणी करत असल्याचं लिओनार्दो यांनी बघितलं. पण ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. तेव्हा नेपोलियनला कळेना की, आता ढसाढसा रडावं की तलवार काढून हिचा शिरच्छेदच करावा! नेपोलियन पहिल्यांदाच इतका विचारात पडला. युद्धावर जाताना आणि घनघोर युद्ध सुरू असताना मध्येच ‘पॉवर नॅप’ घेताना, कोणताही विचार न करणारा नेपोलियन इतका विचार करतो हे बघून लिओनार्दो थक्क झाले. ‘ही बया यास होकार का देत नाही?’ हा सवाल त्यांना पडला. ती आपल्या सवालाला जवाब देत नाही हे बघून अखेर नेपोलियन रागानं लालबुंद झाला. त्यानं कट्यार काढून तिच्या मुखकमलाकडे नेली. आता ही गेली, तेराच्या भावात, आपल्याला हिची तेरवीच करावी लागेल असं वाटून लिओनार्दो यांनी डोळे मिटले. पण तिथे अघटित घडलं. नेपोलियनं तिच्या मुखासमोर कट्यार नेताच तिनं जराही न विचलित होता आपलं मुखकमल किंचितसं खुलं केलं. त्या मुखकमलदलात दंतपंक्ती नसल्याचं दिसताच नेपोलियन मोठी आरोळी देत मूर्च्छित पडला. त्या आरोळीने लिओनार्दो यांनी घाबरून डोळे उघडले. जणू काही झालंच नाही, घडलंच नाही अशा स्थितीत ती होती.
नेपोलियनचा पोषाख घालून आपण आता पॅरिसला गेलो तर त्याच्या सोळा राण्यांसमवेत ‘साज-ए-संगीत’ करण्याची संधी मिळू शकते असा डावीकडून दुष्ट आणि उजवीकडून सोयीचा म्हणजेच ‘प्रॅक्टिकल’ विचार लिओनार्दो यांच्या मनी आला. डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे बघत असतानाच मूर्च्छित पडलेला नेपोलियन कधी शुद्धीवर आला आणि त्यानं तिथून कधी पोबारा केला हे लिओनार्दो यांच्या लक्षात आलं नाही.
नेपोलियन तिथून जाताच तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ‘‘बघ, आज मी राणी होता होता राहिले. तुला कळलं ना खरं कारण काय ते.’’ लिओनार्दो यांच्याकडे बघून ती म्हणाली. ‘‘तरी तू म्हणतोस माझं काहीच वाटोळ्ळं झालं नाही. तूच सांग मी कां म्हणून तुझं आता ऐकायचं?’’
***

लिओनार्दो यांना तिनं पुन्हा एकदा काळकुपित ढकलून दिलं. ते गटांगळ्या खात या वेळी 1500 सालात म्हणजेच त्यांच्याच काळात पोचले.
काहीच महिन्यांपूर्वी ते तीर्थयात्रेस गेले होते. यात्रेतील प्रसाद देण्यासाठी लिओनार्दो तिच्या दालनात पोचले. पाहतात तो काय, त्यांच्या आधी तिथे पोचलेले महाराजश्री अच्युत देवराय तिला एकटक न्याहाळत होते. हा भटक भवाना आर्यवर्तातून इकडे कशासाठी मरायला आलाय, असा विचार लिओनार्दो यांच्या मनात आला. त्याला तसं खडसावून विचारावं म्हणून त्यांनी तोंड उघडलं. पण त्यांना ही कृती करताच आली नाही, कारण महाराजश्री अच्युत देवराय विद्युतवेगानं गर्रदिशी वळले आणि त्यांनी लिओनार्दो यांच्या मानेवर तलवार ठेवली.

‘‘कोण आहेस रे तू, असा चोरून-लपून आम्ही आणि हिच्या संभाव्य प्रेमालापास बघू इच्छिणारा? यू इडियट, बत्तमीज, दुसर्‍याच्या खिडकीत डोकावणार्‍यास आर्यावर्तात डोमकावळा म्हणतात. तो तरी परवडला, कारण तो ‘क्रॅव क्रॅव’ करत तरी येतो, तू तर चोरट्या पावलानं आलास. भुरटा चोर की भरकटलेला सोंगाड्या? ही तलवार तुझ्या मानेवर चालली तर तुझं काय होईल याचा, गंगाधरराव, विचार करा…’’ महाराजश्री देवराय पश्चिमेकडून आर्यावर्तातल्या दक्षिण प्रांतात कधी पोचले हे त्यांच्याही लक्षात आलं नाही. मात्र त्यांच्या तलवारीची धार बघून ती इतकी घाबरली की मोठ्या कष्टानं ती किंचाळली. त्या किंचाळण्यानं महाराजश्री अच्युत देवरायांचं लक्ष तिच्याकडे गेलं. तिचं उघडं मुखकमल बघून त्यांची तलवार गळून पडली. आपणसुद्धा आता गळून पडतो की काय असं महाराजश्रींना वाटलं.

‘‘अरेरे, हे काय हे काय बघतो आम्ही. आम्हास वाटलं समोर हंस आहे, पण समोर बेडूक निघावा, आम्हास वाटलं समोर अप्सरा असावी, पण समोर शूर्पणखा निघावी, आम्हास वाटलं समोर गुलाबांचा ताटवा असावा पण सडलेली सदाफुली निघावी, आम्हास वाटलं समोर इंद्रधनुष्य असावं पण समोर जळलेलं लाकूड निघावं, अरेरे हे काय आणि कसं, केव्हा आणि कुठे झालं? आम्हास वाटलं, हिच्या रूपानं सर्वगुणसंपन्न महाराणी मिळेल, विजयनगरच्या साम्राज्यास! पण हाय रे दैवा, आम्हास हाय खावी लागते की काय! आम्ही हाय खाल्ली तर लक्षात ठेव हे दुष्टात्मे, तू कधीही हसू शकणार नाहीस, रडू शकणार नाही. भोजनोत्तर कोणतीही क्रिया – प्रतिक्रिया तुला करता यायची नाही, हा माझा श्राप आहे श्राप.’’ तिच्याकडे बघून बराच वेळ महाराजश्री अच्युत देवराय हा असा संवाद करत राहिले. संवाद करता करता त्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहत होत्या. त्या धारेतच ते कधी वाहून गेले हे त्यांना कळलं नाही. डोळे मिटलेल्या तिनं जेव्हा काही काळानंतर हलकीशी नेत्रपल्लवी केली तेव्हा समोर महाराजश्री अदृष्य झाल्याचं बघून तिला हायसं वाटलं. त्याचबरोबर तिनं जोराचा हुंदका दिला. त्या हुंदक्यानं अर्धवट बेशुद्धावस्थेत गेलेले लिओनार्दो शुद्धीवर आले.

ते बघून ती त्यांच्यावर डाफरली. ‘‘हेच हेच आणि असं तू माझं वाट्टोळं केलंस. माझ्या दंक्तपंक्तीचा प्रपंच मोडून टाकल्यानं आज विजयनगरच्या साम्राज्याची महाराणी होता होता राहिले. कुठे फेडशील रे हे पाप म्हातार्‍या?’’ असं दु:खावेगानं बोलून तिनं डोळे मिटून घेतले.
काही क्षण असेच गेले. आपलं काय चुकलं हे लिओनार्दो यांना कळेना. दंतपंक्ती महत्त्वाच्या की हसू महत्त्वाचं, हा प्रश्न त्यांच्या मनात रुंजी घालू लागला. लिओनार्दो यांनी तिच्याकडे निरखून बघितलं. तिचं हसू साल्व्हदोर दालीच्या मिशीसारखं रहस्यमय झाल्याचं त्यांना वाटलं. ते हसू होतं की क्रिया होती की प्रतिकिया होती की आभास होता, लिओनार्दो यांच्या मनात अशा विचारांचा कल्लोळ उठला. या विचारानं थकवा येऊन ते खाली बसणार तोच ती कडाकडली, ‘‘माझं वाट्टोळं करणार्‍या मठ्ठ म्हातार्‍या, मी आता अजिबातच तुझं ऐकणार नाही!’’
***

‘‘पण माझं ऐकणं हे तुझ्यासाठी हिताचं आहे. जे झालं ते होऊन गेलं. आता जे होणार आहे ते आपण टाळलं पाहिजे. तू मुखपट्टी घातलीच पाहिजे. त्यातच तुझं हित आहे.’’
‘‘हाऽऽ हाऽऽऽ हाऽऽऽ मी आणि मुखपट्टी? अरे गाढवा..’’ ती लिओनार्दो यांना उद्देशून म्हणाली.
तिचे हे बोल ऐकून लिओनार्दो प्रारंभी दचकले. आपण गाढवासारखं रेकावं असं त्यांना वाटू लागलं.
‘‘तू जर आता मुखपट्टी घातली नाहीस तर तुझी तू राहणार नाहीस आणि ज्याला ज्याला तू त्याची व्हावी असं वाटेल त्यालाही तसं वाटणार नाही…’’ लिओनार्दो कसं बसं बोलू शकले.
‘‘हे बघ आता तुझ्या कोणत्याही भूलथापांना मी भुलणार नाही.’’ असं बोलून तिनं पुन्हा डोळे मिटून घेतले.
***

लिओनार्दो यांच्यापुढे गहन प्रश्न निर्माण झाला. मुखपट्टी न घालणं याचा अर्थ कोरोनाशी मैत्री. ही अशी मैत्री तिच्याशी होऊ नये यासाठी लिओनार्दो यांची धडपड सुरू होती. ही धडपड मध्येच बंद करणं शहाणपणाचं नव्हतं. त्यामुळे लिओनार्दो यांनी ट्रम्प काकांचे जावई जेरिड यांच्याकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला. कारण सांप्रतकाली त्यांची शक्ती, ट्रम्प काकांइतकी पॉवरफूल असल्याचं लिओनार्दो यांना थडग्यातसुद्धा जाणवत होतं. आपल्या समस्या निराकरणासाठी या जावयाइतका सक्षम आणि समर्थ कुणी असू शकत नाही, हे त्यांनी ताडलं. जावयाला भेटायला ते थेट वॉशिंग्टनला जावयाचे वास्तव्य असणार्‍या महाली पोचले.
त्या वेळी इव्हांका ताई, या जेरिड यांच्या अवतीभवती रुंजी घालत होत्या. लिओनार्दो यांनी आपल्या येण्याचं वर्तमान जावयाच्या कानी घातलं. ‘‘यू कॅन ओन्ली डू धिस, सच इज युअर पॉवर,’’ असं लिओनार्दो त्याला उद्देशून म्हणाले. जावयाच्या अंगावर मूठभर मांस चढलं. आपल्या नवर्‍याची अशी ख्याती आणि कीर्ती सातासमुद्रापलीकडेच नव्हे, तर पंधराव्या शतकातल्या थडग्यापर्यंत पोचल्याची बघून इव्हांका ताईंचा ऊर भरून आला. तिनं नवर्‍याकडे पाहत प्रेमळ नेत्रपल्लवी केली. मात्र ताईंचा नवर्‍याबद्दलचा हा आदर काही क्षणातच काळजीत रूपांतरित झाल्याचं लिओनार्दो यांच्या लक्षात आलं. ते शंभर टक्के खरं होतं, कारण तिच्या मुखपट्टीच्या मुत्सद्देगिरीसाठी हा गेला नि तिच्याच मुखात मुख घालून बसला, तर कोणत्या भावात जाईल ते, असा वस्तुनिष्ठ विचार इव्हांका ताईंच्या मनी रुंजी घालू लागला. त्यामुळे त्यांनी त्याला खुणेनेच बजावलं, ‘नो वे म्हणजे नो वे.’
इव्हांका ताईंनी मार्गात मोठा धोंडा टाकल्यानं लिओनार्दो निराश झाले. त्यांची निराशा ताईंपासून लपून राहिली नाही. त्यांनी लिओनार्दो यांना त्यांच्याच काळातली, शॅट्यू-दे-सेग्यूइन-बॉर्डाक्स-सुपिरिऑर नावाची वाइन देऊन ही निराशा काही अंशी कमी करण्याचा प्रयत्न केला आणि लिओनार्दो यांना निरोप दिला.
***

‘आता काय?’, लिओनार्दो यांच्या रूहच्या आतल्या आवाजानं बाहेरच्या आवाजास विचारलं. ट्रम्प काकांच्या जावयाची निवड करून आपला मोहरा चुकलाच असं लिओनार्दो यांनी स्वत:ला समजावलं. स्वत:च्या चुकीस माफी देऊन ते माघारी वळत असतानाच लिओनार्दो यांना समोरून येणारे ट्रम्प काका दिसले. ते दिसताच लिओनार्दो यांचे डोळे लकाकले. रूह थरथरली. ट्रम्प काका हे ‘मुखपट्टी लगाव ऑपरेशन’मधील ‘ट्रम्प कार्ड’ होऊ शकतात, हे लिओनार्दो यांच्या लक्षात आलं.
‘‘ओ हाय लिओ ब्रो,’’ लिओनार्दो यांच्यासमोर येऊन ट्रम्प काकांनी त्यांना नमस्कार केला.
‘‘हॅलो,’’ म्हणत लिओनार्दो यांनी काकांकडे बघितलं. काकांनी मुखपट्टी लावलेली दिसत नव्हती. ते बघून त्यांना किंचित बरं वाटलं.
‘‘तुम्ही मला ओळखता ट्रम्प काका?’’ लिओनार्दो डोळे विस्फारून म्हणाले.
‘‘अरे तुलाच काय, तुझ्या तिलासुद्धा मी चांगलाच ओळखतो.’’ ट्रम्प काका गडगडाट करत म्हणाले.
‘‘काका… काका असं जर असेल तर मग मला वाचवा ना, सॉरी सॉरी तिला वाचवा ना…!!’’ त्यांच्यापुढे लोटांगण घालत लिओनार्दो म्हणाले.
‘‘व्हॉट डू यू मीन, ह्यू एन त्संगने आणखी काही आगळीक केली की काय?’’ काका गरजले.
‘‘कोण आहे रे तिकडे, कोणत्या बिळात हा उंदीर लपून बसलाय याचा शोध घेण्यासाठी ड्रोन पाठवा रे!’’ ट्रम्प काकांनी आदेश दिला.
काहीतरी गफलत होतेय हे लक्षात आल्यानं लिओनार्दो यांनी पुन्हा काकांचे पाय पकडले.
‘‘अरे, डोंट टच माय फीट, पाय धरायला आय अ‍ॅम नॉट रॅमडेव बाबा…’’
‘‘सर सर, माझं म्हणणं ऐकून तर घ्या.. लिओनार्दो गयावया करत म्हणाले. त्या वेळी ते सशापेक्षाही गरीब झाले होते. आपल्यासमोर एक ससा गयावया करतोय, हे बघून काकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या आनंदातच ते लिओनार्दो यांना घेऊन आपल्या कार्यालयात गेले. त्यांना बसवून स्वत: उभे राहूनच लिओच्या कानात विचारते झाले.
‘‘तिला काही झालं आहे काय? इज शी प्रेग्नंट? कितवा महिना?’’
‘‘नो नो काका. तसं काही नाही. मात्र ती माझं काहीच ऐकत नाही. तिच्या भल्यासाठी सांगतो तरी ती ऐकत नाही.’’
‘‘काय ऐकत नाही?’’
‘‘काका, अहो तिनं आता मुखपट्टी लावायला नको का?’’
‘‘कशासाठी लावायची मुखपट्टी? किस गधेने कहा है की मुखपट्टी लावायला पाहिजे म्हणून? मी कुठे लावलीय मुखपट्टी?’’ लिओनार्दो यांच्याकडे बघून काका गरजले.
‘‘पण काका, तुम्ही कुठे आणि ती कुठे…? कोरोना तुम्हाला घाबरतो हो, पण तिला कोरोनाने दगा दिला तर..? मला तर यात कॉन्स्परसी दिसतेय.’’
कॉन्स्परसी हा शब्द कानावर पडताच ट्रम्प काका सावध झाले. लिओनार्दोच्या डोळ्यात डोळे घालून त्यांनी विचारलं,
‘‘कसली कॉन्स्परसी?’’
‘‘तिला पळवून नेण्याची.’’
‘‘पुन्हा एकदा रावण आला की काय?’’
‘‘काका, तुमच्या लक्षात कसं येत नाहीय, कोरोना हाच रावण आहे. तो एकदा का तिच्या मुखासमोर गेला की त्याने पळवलीच म्हणून समजा.’’
‘‘समजा त्याने पळवली तर पळवली, मुझे क्या ले ना दे ना….!’’
‘‘अहो काका, जरा चिरंजीवांचा विचार करा.’’
‘‘काय विचार करा? विचार करण्याचं काम बिल गेट्सचं, सत्या नाडेलाचं. माझं नाही. दे थिंक, आय री-थिंक. विच इज बेटर दॅन देअर थिंकिंग.. हाऽ हाऽऽ हाऽऽऽ’’ काका पुन्हा एकदा गडगडाट करत बोलले.
‘‘अहो काका, आम्ही आपल्या चिरंजीवांच्या लग्नाच्या विचाराबद्दल सांगत होतो. लवकरच ते विवाहयोग्य होतील. जसा तुम्ही सुशील जावई निवडला तशी सूनबाई नको का सुलक्षणी? तिच्याशिवाय सांप्रतकाली आम्हास तरी कुणीही सातासमुद्राच्या इकडे आणि तिकडेही दिसत नाही…’’
सुशील जावयाच्या जोडीनं सुलक्षणी सुनेची लिओनार्दो यांनी घातलेली सांगड ट्रम्प काकांना फार भावली. त्यांनी डोळे मिचकावत ‘आता काय करायचं?’ असं लिओनार्दो यांना विचारलं. सध्याच्या परिस्थतीत तिला मुखपट्टी लावण्याची सर्वाधिक कशी गरज आहे, हे काकांना पटवून देण्यास लिओनार्दो यशस्वी झाले. आपलं ती काहीच ऐकत नसल्यानं तुमच्याकडे रदबदलीसाठी आल्याचं, त्यांनी गयावया करत काकांना सांगितलं. काकांचा अहं त्यामुळे सुखावला आणि लिओनार्दोसोबत, तातडीनं तिला समजावयाला त्यांनी प्रस्थान केलं. जावईबापू चरफडत राहिले.
***

ट्रम्प काका जेव्हा लिओनार्दोसमवेत तिच्या दालनात पोचले तेव्हा तेथील दृष्य बघून त्यांना भोवळ येता येता राहिली. कारण त्या दालनात आधीच कुणीतरी आलं होतं. त्या क्षणी ती व्यक्ती सहा लेअरची मुखपट्टी तिच्या मुखाभोवती लावत होते.
‘‘कोण रे तू?’’ काका गरजले.
तिला मुखपट्टी लावून, काकांच्या आधीच तिथे पोचलेल्या व्यक्तीनं शांतपणे मागे वळून बघितलं. त्या व्यक्तीस बघून काका थक्क झाले, कारण ती व्यक्ती दुसरी-तसरी कुणी नसून पुतीन होते.
‘‘मिस्टर पुतीन, तुम्ही इथे? काकांच्या या आश्चर्ययुक्त प्रश्नांच्या उत्तरात पुतीन तिच्यासारखेच हसले की हसण्याची क्रिया केली हे काही काका आणि लिओनार्दो यांना कळलं नाही.
लिओनार्दो तिच्याकडे नाराजीचा कटाक्ष टाकत म्हणाले, ‘‘तुला मी एवढी विनवणी करत होतो, मुखपट्टी लावण्यासाठी हातापाया पडत होतो, पण तू माझं ऐकलं नाहीस आणि आता यांच्या गळाला लागलीस.’’
‘‘‘हाऽऽ हाऽ हाऽऽ’’ ती पुतीन यांनी लावून दिलेल्या मुखपट्टीत मुक्तपणे हसली. दंक्तपंक्तीच्या भेसूर अंधाराची आता तिला भीती उरली नव्हती.
‘‘कुणाला होकार आणि कुणाला नकार द्यायचा, याचासुद्धा मला अधिकार नाही का?’’
‘‘म्हणजे…?’’
या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या भानगडीत ती पडली नाही. ती फ्रेममधून बाहेर पडली आणि पुतीन काकांच्या हातात हात घालून पुढे चालू लागली.
जाता जाता मागे वळून पुतीन म्हणाले, ‘‘बाय दे वे लिओ, आम्ही जी कोरोना विषाणू लस स्पुटनिक शोधलीय ना, तिचा प्रयोग मला हिच्यावर करायचाय. सहाशे वर्षांची हिची शाश्‍वतता, आता नाही टेस्ट करायची तर कधी? एकदा ही टेस्ट झाली की तिला कधीच मुखपट्टी लावण्याची गरज पडणार नाही आणि तुमचं काळीजही त्यामुळे वरखाली होणार नाही…’’
लिओनार्दोने कपाळावर हात मारून घेतला. ट्रम्प काकांना आपली चूक लगेच कळली. त्यांनी लगेच खिशातून मुखपट्टी काढली आणि लावली. योग्य वेळी आणि योग्य त्याच ठिकाणी मुखपट्टी लावायची असते, या स्वत:च्या सर्वश्रेष्ठ विधानाची नेमक्या क्षणी आठवण झाली याचा त्यांना झालेला आनंद कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शोधलेल्या लसीपेक्षाही अधिक दिसत होता.
***

कुणाच्या का होईना ती म्हणजेच मोनालिसा, मुखपट्टी लावण्यास तयार झालीय. आता सहाशे वर्षांत मुक्तपणे हसतेय याचा आनंद मनवायचा की सावज भरकटलंय म्हणून दु:खाचे कढ काढत बसायचं, या विचारात लिओनार्दो यांचं रूह सध्या गढून गेलंय!

– सुरेश वांदिले

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.