Now Reading
डुकराची अंडी…

डुकराची अंडी…

Menaka Prakashan

आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतात, ज्यांना काही कळायचा अवकाश की, ते गोष्ट ती सगळ्या गावाला सांगून मोकळे होतात. त्यांच्या पोटात, मनात काहीच राहत नाही. दुसर्‍यांना त्रास व्हावा असा त्यांचा उद्देश नसतो, पण त्यांचा तो स्वभावच असतो. असाच कोकणातल्या एका गावात वामन्या आहे. तोसुद्धा असाच. त्याच्या या स्वभावामुळे अशीच एक बातमी गावभर पसरलीय, त्यामुळे गावात अगदी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं, आपणही या गावाचा दौरा करूयात आणि गावात काय चाललंय ते बघूया…
(‘गाव गाता गजाली’ या टीव्ही मालिकेतल्या पात्रांचा स्वभाव विशेष वापरून लिहिलेली विनोदी मालवणी कथा)

प्रसंग 1
(सुहास गावातला कोणतंही काम करणारा छोटा ठेकेदार आहे आणि बबन दारूच्या व्यसनासाठी गावभर प्रसिद्ध आहे. दोघंही कणकवलीच्या बाजारात सकाळी फिरतायत, बबन रस्त्यात कोणाकडंही दहा रुपये मागतोय म्हणून सुहास वैतागतोय.)
सुहास : अरे, मेल्या कोणाकडेव धा रुपये कसले मागत रव्ह्तस, ह्यो तालुक्याचो बाजार हा, आपलो गाव नाय हां…
बबन : अरे, तुका ओळखत नसतील…. माका चांगलेच ओळखतत सगळे. त्यांका माहीत हां किती भारी माणूस असय तो मी. कळला?
सुहास : कळला, कळला… तुझा मोठेपण. कळला… माका
बबन: म! एक शिटी मारिन ना सगळी गर्दी जमा करीन कळला?
सुहास : (मोठ्यानं हसत) हो तुझी शिटी म्हणजे कोकण रेल्वेची शिटी ना?
बबन: माका चॅलेंज नको करू हां…
सुहास : (परत मोठ्यानं हसतो.)
बबन : तुका खोटा वाटता? आता बघच तू (एक विशिष्ट प्रकारची शिटी वाजवतो.)
(सुहास इकडं-तिकडं बघतो कोणी येत नाही.)
सुहास : (पुन्हा हसत हसत) तुझ्या शिटीमुळे बघ आता लय गर्दी जमंल. चल आता आपल्या गावाक जाऊया.
(बबन ऐकायला तयार नाही आणि निघायलाही तयार नाही. सुहास त्याचा हात धरून चालू लागतो. तेवढ्यात त्याला पुन्हा शिटीचा आवाज येतो. सुहास वैतागतो.)
सुहास : आता पुन्हा पुन्हा शिटी मारलस तर बघ हा! माका दिसला तू किती फेमस असस तो.
बबन : आईशप्पथ! मी शिटी मारुक नाय.
सुहास : तू नाय मी मारलंय. तू आधी घराक चल…
(सुहास बबनला घेऊन जाणार तेवढ्यात… तशाच प्रकारची शिटी वाजवत एक उंचापुरा धिप्पाड माणूस सुहाससमोर उभा राहतो. लांब मिश्या असलेला. तो शिट्या मारतोय पाहून सुहास परत रागावतो.)
सुहास : याका एक कळना नाय, तुमी पण काय खुळ्यागत शिटीयो मारतास?
(तो माणूस पुन्हा पुन्हा बबन्याकडे बघत बघत शिट्या मारत राहतो. बबनपण शिट्या मारायला लागतो, आणि ते शिट्या मारत एकमेकांना मिठी मारतात. सुहास हे सारं आश्चर्यानं बघतच राहतो.)
सुहास : अरे, मिठ्या काय मारतास? (मिश्या असलेल्या इसमकडे बघत) तुम्हीपण यातले? (अंगठा तोंडाकडे नेत – दारू पिल्याचा इशारा करत) याका (बबन्याकडे बघत) ओळखतास?
इसम आनंदानं मान हलवतो
सुहास : (बबनकडे बघत) तू पण ओळखतस?
बबन : अरे हे माझे मित्र. बाबीराव. मोठ्ठे शिकारी असत.
बाबीराव : अरे मित्रा ! (पुन्हा मिठी मारतात.)
सुहास : (स्वतःशी पुटपुटत) मित्र म्हणता धा रुपये मागितले नाय म्हणजे मिळवली.
बाबीराव : मित्रा, किती वर्षांनी? अरे काय शिकार करायचो आपण आठवतंय का?
बबन : आठवता मग सगळा आठवता. पैले जरा धा रुपये देवा.
(सुहास कपाळावर हात मारून घेतो.)
बाबीराव : (मोठ्यानं हसत) अरे, अजून तुझी ती सवय गेली नाही तर (खिशातून पैसे काढून देतो.)
बबन : (पैसे सुहासला दाखवत) बघितलंस ना?
सुहास : बाबीराव, तुम्ही याच्या बरोबर शिकार करायचास?
बाबीराव : शिकार, अरे हा माझा मित्र बरोबर असायचा ना तेव्हा हमखास शिकार मिळायची म्हणजे मिळायचीच.. अरे ही शिटी आमची प्राणी ओळखायची खूण आहे. अख्ख्या तालुक्यात यांच्यासारखा टेहळणी करणारा नसेल (बबनकडे बघत हळू आवाजात) आज रात्री येणार का शिकारीला? डुकराची टीप आहे?
बबन : येईन, पण माका एक मोठो वाटो व्हयो आणि धा रुपये.
बाबीराव : (हसत) अरे एक काय चार वाटे देईन तुला तू ये तर खरं.
सुहास : (आश्चर्यानं) काय म्हणतास चार वाटे खराच देशांल?
बाबीराव : मग काय. आणि धा रुपये पण. (मोठ्यानं हसतो.)
सुहास : मग काय नक्की येयीत तो… काय रे?
(बबन मान हलवतो.)
सुहास : (बाबीरावकडे बघत) हो म्हणता हां….
बाबीराव : मग रात्र पडता पडता त्याला इथंच यायला सांग… कसं?
सुहास : कुठं जाणार शिकारीला?
बाबीराव : ते असं सांगायचं नसतं… नायतर सगळं मुसळ केरात… काय?
सुहास : ठिकाय तो येईल इथं रात्री… पण त्याचे चार वाटे नक्की ना?
बाबीराव : (वैतागतो) तुमी पन या शिकारीला आणि चार वाटे घेऊन जा.
सुहास : मी नाय… तोच येयीत. (बबन्याकडे बघत)… चल रे… (बाबीरावाकडे बघत) आम्ही येतो. संध्याकाळी पाठवतो याला पण चार वाट्यांचा तेव्हढा लक्षात ठेवा हां.
(सुहास आणि बबन दोघंही जायला निघतात.)

प्रसंग 2
(गावात आल्यावर एका झाडाखाली उभं राहून सुहास आणि बबन गुपचूप काहीतरी बोलत असतात.)
सुहास : तुका सांगलय तसाच करायचा, मटणाचे वाटे मिळाले की सरळ माझ्याकडे यायचा. इकडं-तिकडं जाशीस तर फसवतील तुका लोकां, कळला? मी तुका व्यवस्थित व्यवहार करून देतंय.
(बबन मान हलवतो.)
सुहास : तुका माहिती हां ना, गावातली लोकां डुकराच्या मटनासाठी किती हावरी असत ती. म्हणून तुका सांगतंय (सुहास बबन्याच्या कानात बाकीचं सांगतो.) कळला ना म्हणून तुका सांगतंय…
बबन : आता मी जाऊ, माझी वेळ झाली (हाताच्या अंगठ्यानं दारू पिण्याची खूण करतो.)
सुहास : ता ठीक हा पण याव्ह लक्षात ठेव (तोंडावर बोट ठेवून चूप राहायची खूण करतो.)
(आपलं कोणी ऐकलं नाही ना बघण्यासाठी सुहास आजूबाजूला बघतो आणि बबनला निघण्याची खूण करतो आणि स्वतःही निघतो.)
पण त्यांच्या दुर्दैवानं वामन्या दुसर्‍या एका झाडाच्या मागून सारं ऐकत असतो. वामन्याला छोटी बातमीदेखील गावभर सांगण्याची खोड आहे.

प्रसंग 3 :
(आबा गावातले एक प्रतिष्ठित नागरिक आहेत. संदीप गावातला तरुण रिक्षावाला असून त्याला गावचा सरपंच व्हायचं आहे आणि नाम्या ज्याचं गावात सलून आहे. हे तिघंही नाम्याच्या सलूनमध्ये गप्पा मारत बसलेत. वामन्या तिथं धावत येतो.)

वामन्या : आबानू, आबानू कायतरी शिजता, कायतरी शिजता हां, नक्की कायतरी शिजता हां.
आबा : अरे, तुका काय करूचा हा, कोणाच्या घरात काय शिजता हां ता?
नाम्या : आता वामन्याचा काय तरीच, शिजवल्याशिवाय खातील कशी लोकां..
संदीप : शिजला तर काय झाला, तुका चायचो घोट मिळल्याशी कारण… काय?
वामन्या : तसा नाय, सुहास आणि बबनमध्ये कायतरी ॅन शिजता हां.
(सगळे एकमेकांकडे आश्चर्यानं बघतात)
वामन्या : मी कानांनी ऐकलंय..
संदीप : म्याड झालंस काय? मग आम्ही काय नाकानं ऐकताव?
आबा : ता जावून दे रे, काय ऐकलंस ता सांग?
वामन्या : कायतरी डुक्करच्या मटणाच्या वाट्याबद्दल गुपचूप बोलत होते दोघेव..
(सगळे उठतात आणि वामन्याच्या बाजूला येऊन उभे राहतात, नाम्या त्याचा उजवा हात हातात घेतो आणि संदीप डावा हात हातात घेतो, आबा त्याच्या खांद्यावर हात ठेवतात)
सगळे एकदम : काय? डुक्करचा मटण?
नाम्या : लय दिवस झाले रे, खाल्लय नाय.
(सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं.)
संदीप : आम्ही सकाळ-संध्याकाळ खाताव ना?
वामन्या : सुहास सांगत होतो बबान्याक, सगळे वाटे माझ्याकडे घेऊन ये म्हणान..
नाम्या : (वामन्याकडे बघत) तू काय करतलस त्या वाट्याचा?
वामन्या : माझ्याकडे म्हणजे सुहासकडे रे?
संदीप : म्हणजे अकखो डुक्कर दोघांत संपवुचो इचार दिसता, आबा कायतरी करूंक व्हाया हा.
(तेव्हड्यात नाम्याला लांबून सुहास हातात पिशवी घेऊन जाताना दिसतो.)
नाम्या : आबानू तो बघा सुहास खयतरी जाता हां घाई घाईत…
आबा : सगळ्यांनी गप्प बसा हां, मी विचारताय त्यांका काय ता…
(आबा जोरानं हाक मारतात.)
आबा : सुहास, अरे सुहास, खय चल्लस खय घाईत?
सुहास : (लांबूनच) खय नाय, हयसरच जाऊन येतंय जरा (हातातली पिशवी मागे लपवतो.)
आबा : अरे, दोन मिनिटा बस, एक गम्मत सांगतंय तुका…
सुहास : नंतर येतंय, मगे सांगा… (तिथून निघायला लागतो.)
आबा : तुझ्याच फायद्याचा हा. नंतर संधी गेली तर माका सांगू नको.
सुहास : (विचार करतो आणि थोडा कंटाळतच आबांकडे येतो) बोला काय ता पटापट.
आबा : अरे हो, एव्हडा काय काम काढलं?, वाघ मागे लागल्यासारखो पळतस तो..
सुहास : वाघ नाय काय डुक्कर (सुहास पटकन बोलून जातो.)
(सगळे एकमेकांकडे बघतात त्यांना वामन्यानं आणलेली खबर पक्की असल्याची खूण पटते.)
आबा : डुक्करचा काय म्हणत होतंस?
सुहास : वाघ खय हत आपल्याकडे… असली तर डुक्कराच म्हणून डुक्कर म्हटलंय (सुहास सावरून घेण्याचा प्रयत्न करतो.)
आबा : हळू बोल मेल्या सगळ्यांका कळात…
सुहास : काय ता?
संदीप : याच. डुक्कर मिळालो हा म्हणान…
सुहास : कोनाक मिळालो हा डुक्कर?
वामन्या : तुका…
सुहास : काय! कोण बोलला तुमका?
आबा : अरे, तुका म्हणजे माका, याका, नाम्याक सगळ्यांका…
सुहास : माका खय मिळालो?
आबा : आता आमका मिळालो म्हणजे तुका मिळातलोच ना?
सुहास : ता कसा काय?
संदीप : आता आपण काय वेगळे असावं काय? आता आमकां पयला कळला तर तुका आम्ही सांगताव… तसाच उद्या तुका असा काय तरी कळला किंवा मिळाला तर तू काय आमकां सांगतलस नाय काय?
आबा : ता सगळा जावूनदे , काम तुझ्या फायद्याचा हा…
नाम्या : आबा थांबा, तुम्ही त्यांका सांगतास खरा पण त्याका असल्या कामाचो अनुभव नाय हा… लक्षात ठेवा.
वामन्या : आणि नेहमीसारख्या काम अर्धवट ठेवल्यानं तर आपणाक कायव मिळाचा नाय.
आबा : तुमी गप्प बसा रे, सुहास आपलो मित्र हा… त्याच्यापासून आपण कायव लपवून ठेवुचा नाय… पहिली संधी त्यांकाच देवुक व्हई…
संदीप : आबा बरोबर बोलतत्, सुहास आपल्यापासून कायव कधी लपवून ठेवत नाय आपण सगळा त्यांका सांगूंक व्हयाबरोबर ना?… सुहास. (सुहास फक्त मान हलवतो…) तर या ठिकाणी माझ्या मतदारसंघात…
आबा : तू गप रव रे आपला ठरला सुहासाक संधी द्यायची. अनुभव नसलो तरी त्याकाच पहिली संधी द्यायची.
(सगळे एकदम मान हलवतात.)
वामन्या : पण काय ता हळूच सांगा गावात अजून कोनाक कळूक नको कसा?
संदीप : तुझ्याशिवाय अजून कोण सांगूंक जातला गावाक?
सुहास : आता काय ता सांगा. एकदाचा उशीर होता माका…
आबा : (हळू आवाजात) लवकरच आपल्याक एक डुक्कर मिळतलो हा…
सुहास : डुक्कर ?.. (आश्चर्याानं) कोण देतलो?
आबा : हा माझो ओळखिचो एक …पण त्याचो व्ययस्थित वाटो कर्नारो कोण तरी व्हयो हा त्याका….
सुहास : मग माझा नाव सांगाच तुम्ही त्यांका..
संदीप : पण आबा, त्यांका अनुभवी माणूस व्हयो हा…
नाम्या : याका फक्त मटण खाऊचो अनुभव हा …
सुहास : माका अनुभव नाय म्हणतास? या बघा काय ता (पिशवीत हात घालतो आणि हळूहळू त्यातून एक मोठ्ठा कोयता काढतो.)
वामन्या : कोयतो? (डोक्यावर हात मारतो) असले दोन कोयते माझ्याकडे असत म्हणान आबा काय माझा नाव पुढे करतले काय?
सुहास : तुझ्या कोयत्याने तू पाठ खाजव नायतर नारळ फोडयो. कोयतो मी मिस्त्रीकडे घेऊन चाललंय धार काडुक कळला? आबा, तुम्ही माजा नाव सांगाच… आणि घराकडे वाहिनीक सांगा मटणाचा वाटण तयार ठेवुक उद्या तुमच्या घरात डुकराचा मटण शिजतला…
आबा : उद्या कसा शिजतला डुक्कर पुढच्या आठवड्यात मिळतलो हा..
सुहास : तो तुमचो त्याआधी मी तुमका सगळ्यांका टोकन म्हणून देतंय डुकराचो वाटो… माका अनुभव नाय म्हणतास?
आबा : पण कसो काय?
सुहास : (त्यांना कणकवलीच्या बाजारात घडलेलं सगळं सविस्तर सांगतो.) पण या सगळा तुमच्या पुरता ठेवा जास्त वाटेकरी नको… कळला? (सगळे एकदम मान हलवतात.)
संदीप : बबन्याची ही कला आमकां ठाऊक नव्हती. काळजी नसावी. तर माझ्या मतदारसंघातले आमचे मित्र बबन यांना आज संध्याकाळी कणकवलीच्या बाजारात सोडण्याची जबाबदारी मी घेत आहे..
सुहास : नक्की सोडशील? चला माझा एक काम वाचला. आता निघतंय मिस्त्रीचा दुकान बंद व्हायच्या आधी पोचून कोयत्याक धार काढून घेउक व्हई काय? मटणाचे वाटे एकदम व्यवस्थित होवुक व्हयेत..
आबा : तू जा पटकन. मी सांगतंय तुझा नाव माझ्या मित्राक…
सुहास : नक्की सांगा हा आबा. मी चाललंय (सुहास निघून जातो)
नाम्या : आबानू. तुमची गोळी एकदम वर्मी बसली हा. सगळा एकदम बाहेर इला. पण मी काय म्हणतंय कोणत्या मित्राक तुम्ही सांगतालास?
आबा : काळजी नको. ता नंतर बघूया. पयला उद्याच्या मटणाची तयारी करूया सगळ्यांनी घरी जाऊन वाटणाची तयारी करा काय?

प्रसंग 4
(गावात शाळेतल्या मास्तरांचं एक छोटं किराणा मालाचं दुकान आहे, मास्तरांची बायको (माबा) दुकानात असते. सुहासची बायको (सुबा) दुकानात येते.)
सुबा : गो…जरा या समान दि… (एक यादी माबाच्या हातात देते. माबा यादी मोठ्यानं वाचते आणि सामान देते.) सुका खोबरा, नारळ, कांदा, गरम मसाला, लिंबू, वगैरे वगैरे…
माबा : मटणाचो बेत दिसता आज?
सुबा : आज नाय काय, उद्या आमचे हे म्हणाले वाटण करून ठेव.
माबा : पाव्हने येणार असतले…
सुबा : नाय तर, कोणी पावणे बिवणे नाय.
माबा : मग बरोबर, सुहास भावोजीनी कुठला तरी काम पूर्ण केला असताला…
सुबा : तू पण मस्करी करूंक लागलं ना. हे घे पैसे मी चाललंय माका काम हा…
(सुबा निघून जात असते तेव्हड्यात नाम्याची बायको (नाबा) पण मास्तरांच्या दुकानात येते आणि सामानाची यादी देते.)
माबा : सुके खोबरे, कांदे, नारळ, लिंबू, गरम मसाला वगैरे (सामानाची यादी मोठ्यानं वाचते आणि सामान देते.) तुमच्याकडे पण मटणाचो कार्यक्रम असा काय?
नाबा : आज नाय उद्या. येतंय मी.. लय कामा असत घराक…
(मागोमाग आबांची बायको पण सामानाची यादी घेऊन येते.)
माबा : (यादी मोठ्यानं वाचते… पुन्हा तेच सामान वाटणाचा.. पण काही बोलत नाही सगळं सामान बांधून देते.) आबांची बायको सामान घेऊन निघून जाते.
माबा : (स्वतःशीच) सगळे मटणाच्या वाटपाचा सामान घेऊन जातत. काय सांगतव नायत (तेवढ्यात मास्तर येतात.)
माबा : माका एक सांगा? गटारी कधी येता?
मास्तर : श्रावणाच्या आधी…
माबा : माका वाटता आपल्या गावात उद्या पुन्हा गटारी असतली…
मास्तर : कायव काय बोलतं?
माबा : अहो, सगळे मटणाच्या वाटपाचा सामान घेऊन जातत…
मास्तर : बरा हा ना! आपला दुकान चालता हा ना…
माबा : असा कसा, गावात काय चालला आपणाक माहिती नको.
(तेवढ्यात वामन्या दुकानात येतो आणि)
वामन्या : मस्तरानु या जरा सामान देवा…
(माबा वामन्याच्या हातातून खेचून घेते आणि मोठ्यानं वाचते.)
माबा : सुकं खोबर, कांदे, नारळ, गरम मसाला, लिंबू (अधून-मधून मास्तरांकडे बघते आणि त्यांना खुणावते.)
(सगळं सामान बांधून होतं.)
माबा : वामन भावोजी, खरा सांगा, उद्या तुमच्याकडे, आबा, सुहासाकडे मटणाचो बेत हा ना?
(वामन्या चपापतो.)
वामन्या : ता माका काय माहीत?
माबा : गावात तुमका माहीत नाय तर कोनाक माहीत असतला?
(वामन्या फक्त हसतो.)
मास्तर : तू जर खरा खरा सांगितलंस तर या सगळा सामान तुका फुकट देतंय… काय?
वामन्या : खराच? पण कोनाक सांगायचा नाय हा. कान करा इकडे… उद्या सुहास आमकां डुक्करचा मटाण देतलो हा..
मास्तर : काय? डुकराचा मटाण… पण त्यांका कोण देतलो?
(वामन्या सगळं सविस्तर सांगून टाकतो.)
मास्तर : वामन्या एक सांगतंय तो एक राजा हरिशचंद्र होऊन गेलो त्यांनंतर तू… एक नेहेमी खरा बोलतस. पण वामन्या तू असा गपचूप एकटोच मटान खातलंस? जमात तुका? आमची… गाववाल्यांची आठवण नाय येऊची काय तुका?
(वामन्या हळहळतो.)
मास्तर : थोडा थोडा का होईना सगळ्यांका मटाण मिळुक व्हयाच आत्ता सगळी जबाबदारी तुझी… कळला? मी आपलो सल्लो दिलंय तुका शब्द दिल्याप्रमाणे या सामान असाच घेऊन जा…
(वामन्या विचारात पडतो आणि तिथून निघतो.)
माबा : तुम्ही त्यांका सामान फुकट कशाक दिलास… आणि आपल्यापुरता काय ता मटान मागून घाययचा होता.. अकख्या गावाचा काय करूचा होता तुमका?
मास्तर : आता तू फक्त गम्मत बघत रव्ह
(वामन्या त्याच्या सवयीप्रमाणे ही बातमी गावभर करतो.)

प्रसंग 5
(मास्तरांचं किराणा दुकान आणि त्यापुढे गर्दी उसळली आहे. प्रत्येकजण आपली पिशवी पुढे करतो आहे आणि सामान मागतो आहे. वामन्या सगळ्यांना रांगेत उभे राहायला सांगतोय.)
मास्तर : (बायकोला) बघितलं, वामन्याक फुकट सामान दिला तर त्यान किती गिर्‍हायका आणल्यानं..
माबा : (आनंदानं) मानलंय तुमका… सगळे वाटणाचा सामान घेऊक इलेत….
(तेवढ्यात संदीप तिथं येतो…)
संदीप : निवडणुकीत मता देऊक लाईन लागता तशी लाईन मास्तरांच्या दुकानासमोर कशाक लागली हां?
(तो पुढं जायचा प्रयत्न करतो पण त्याला कोणी पुढं जायला देत नाही. सगळे त्याला रांगेत उभं राहायला सांगतात. तेवढ्यात त्याला वामन्या दिसतो.)
संदीप : अरे वामन्या, मास्तरांनी काय सेल लावल्यानी की काय एव्हडी गर्दी उसळली हा ती दुकानात?
वामन्या : (विषय बदलण्याचा प्रयत्न करतो.) ते जावूनदे.. तू कशाक ईलस?
संदीप : मी आपलो इललंय वाटणाचा सामान घेवुक.. बघतंय तर ही गर्दी… कशाक झाली एव्हडी गर्दी?
वामन्या: तू वाटपाचा सामान घेवुक… आलं असशील तर या लायनीत उभो रव. ते सगळेच वाटणाचा सामान घेऊकच इलेत.. (वामन्या मान खाली घालून सांगतो.)
(संदीप आश्चर्यानं त्याच्याकडे बघत राहतो. त्याला सगळं कळतं.)
संदीप : म्हणजे वामन्या तू मटणाची बातमी अख्या गावभर केलंस… सुहासाक कळला तर धार काढलेल्या कोयत्यानं पहिला तुझा मटण करीत मगे डुकराचा… कळला?

प्रसंग 6
(आबा, संदीप, नाम्या, वामन्या, सुहास सगळे डोक्याला हात लावून बसलेत.)
नाम्या : अख्या गावाक चार डुक्कर पुरणार नायत… आता मिळणार्‍या चार वाट्यांचो कसो पुन्हा वाटो करायचो? वामन्या या सगळा तुझ्यामुळे झाला हां..
आबा : आता काय… एक एक फोड येतली प्रत्येकाच्या वाट्याक…
सुहास : जाऊ दे आबा, पुढच्या आठवड्यात मिळणार्‍या डुकराचो आपणाक थोडो मोठो वाटो घेऊया. काय?
(सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघतात आणि चपापतात.)
संदीप : हो बरोबर…पण आता आजच्या शिकारीचा काय ता बघूया… आपलो शिकारी बबन खय उलांडलो हा तो बघा पयला… (सगळे निघायच्या तयारीनं उठतात… पण लांबूनच त्यांना घोळका येताना दिसतो.)
वामन : शोधुक कशाक व्हयो? …तो बघा तो इकडेच येता…
सुहास : एकटो नाय मोर्चो घेऊनच येता…..
(बबन आणि गावातली बाकीची तरुण मंडळी येऊन थांबतात… मंडळी घोषणा देतात.)
बबन शेट, आगे बढो… डुक्कर मारून आणणार कोण?… बबन शेट शिवाय आहेच कोण?
बबन शेट आगे बढो..
सुहास : (संदीपकडे बघत) बबन्याचो एकदम बबनशेट झालो…
संदीप : (घोळक्याकडे बघत) अरे थांबा, काय झाला? बबन्याच्या नावानं कशाक ओरोळ्या ठोकतास… निवडणूक जिंकल्यासारख्या?
बैल : (जो अख्ख्या गावात फक्त खाण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि बैल या टोपण नावानं परिचित आहे) संदीपा, निवडणूक जिंकण्यापेक्षा मोठा काम करूक चालले असत बबन शेट..
संदीप : ता माका माहिती असा रे, पण जास्त बोंबलू नका नायतर बाजूच्या गावातून पण वाटेकरी येतील… कळला?
सुहास : बरोबर! संदीपा, संध्याकाळ झाली असा! बबन्याची निघण्याची वेळ झाली हा… तू तुझ्या रिक्षानं त्याका सोडून ये पयलो… बबन्या तुझी तयारी झाली ना?
बबन : माझी कसली तयारी… माका फक्त एकच करूंचा हा (शिटी वाजवून दाखवतो)
सुहास : चल मग, संदीपाच्या रिक्षेत जाऊन बस पट्कन…
सुहासची बायको : थांबा, (ती ओवाळणी घेऊन पुढे येते आणि ओवाळते) बबन भावोजी, तुम्ही आता काय ओवाळणी नका देऊ, आल्यावर चार फोडी माका जास्ती द्यावा तीच माझी ओवाळणी…
मास्तरांची बायको : आमकां पण ओवाळूचा हा… (बाकीच्या बायका पण तसंच म्हणतात)
बैल : माका पण ओवाळूचा हा… बबन शेटला… (सगळे त्याच्याकडे आश्चर्यानं बघतात) ओवळणार्‍याक दोन फोडी जास्त देतलो ना तो..
आबा : बस झाला, पुरे झाला, सुहासाच्या बायलेन ओव्हाळल्यानं त्या गावाच्या वतीनं मी जाहीर करतय. संदीपा, तू त्याका रिक्षेनं घेऊन जा आणि उद्या सकाळी जाऊन पुन्हा रिक्षेनं घेऊन ये. मोठा माणूस हा तो आता!
बबन : असोच जावं?
सुहास : आबांनी असं म्हटल्यानी म्हूनुन तुका आता इमान व्हया झाला काय? आता काय रव्हला तुझा?
बबन : तसा काय मोठा नाय… पण एक रिक्वेस्ट होती. माका धा रुपये कोणीतरी देवा…
(बबन्यानं असं म्हणताच, घोळक्यातले सर्व हात दहा रुपये घेऊन पुढे येतात.)
घोळक्यातले सर्वजण : बबन शेट हे घेवा… माझे घेवा… माझे पण घेवा…
(बबन फक्त सगळ्यांच्या हाताकडे आश्चर्यानं बघतच राहतो)
संदीप : तर माझ्या या मतदारसंघात असो चमत्कार पहिल्यांदाच होता हा… सणाच्या वर्गणीसाठीपण असे कोणी पटकन पैसे काढत नाय… आज चमत्कारच झालो म्हणायचो…
सुहास : अरे संदीपा, बोलत काय रावलंस… जमा कर सगळ्यांकडून…
(सुहास, संदीप, वामन सगळेजण नोटा जमा करतात आणि बबन्याकडे देतात.)
(संदीप आणि बबन रिक्षेत बसून निघतात, सारेजण त्यांना हात हलवून निरोप देतात)
बैल : कधी एकदा उद्याची दुपार होता आणि डुक्कराचा मटण खातंय असा झाला हा माका. आज तर मी उपासच करतलंय.
(सगळे आपापल्या घरी निघून जातात.)

प्रसंग 7
(दुसरा दिवस दुपार होऊन गेलीय. सगळे जण संदीपच्या रिक्षेची आतुरतेनं वाट बघतायत.)
नाम्या : दुपारच्या जेवणाची वेळ टळून गेली. खयसर रवले दोघा?
सुहास : मी काय म्हणतंय… दोघांनीच वाटो परस्पर विकून फरार झाले नसतील ना?
आबा : तू बबन्याक आणूक गेलं असतं ना… तर या तू काय म्हणतं ना नक्की झाला असता…
वामन : संदीप, असो करुचो नाय. असा केल्यानं तर त्याका गावचा एकव मत मिळाचा नाय.
बैल : मतदानाचा नंतर बघाया… माझ्या पोटातले कावळे ओरडून ओरडून मेले. कालपासून कायव खावुक नायय मी महिती हा? आता तर माका चक्कर येतां असा वाटता.
नाम्या : उपकार केलेस आमच्यावर. या वामान्यामुळे सगळो घोळ झालो हा… बातमी सगळी गावभर केल्यानं माका वाटता पोलिसांका कळला असताला डुकराचा… त्यांका टाकल्यानी जेलात अगदी मुद्देमालासकट.
आबा : तुझ्या जिभेला काय हाड?
बैल : हाडाची गोष्ट करू नका हो… समोर मटान असल्यासारखा वाटता.
सुहास : बैला, जरा धीर धर..
वामन : कसलो धीर.. सगळ्या गावाचो धीर सुटलो हा… आता संध्याकाळ होत इली तरी दोघांचो ठिकानो नाय हा. सगळ्यांच्या घरात वाटण तयार हा, माहिती हा ना तुमका?
बैल : माका चक्कर येतासा वाटता, मी जरा पडतंय.. बबनशेट इले का उठवा माका… (तो तिथंच पहुडतो)

(आता संध्याकाळही संपत आलीय, काळोख पडायला सुरवात झाली आहे. सगळे अजून वाट बघतायत, पण उत्साह संपलाय.)
सुहास : आबानू मी काय म्हणतंय? गार्‍हाणा घालतास काय देवाकडे?
आबा : कायव काय! मटाण खावुक मिळून दे म्हणान गार्‍हाणा?… देव आपलीच मुंडी मुरगळीत… समजला?
(तेवढ्यात वामन्याला लांबून गाडीची लाईट दिसते)
वामन : (दूरवर बघत) माका वाटता इले बबन आणि संदीप…
(सगळेजण उत्साहानं उभे राहतात आणि लाईट येत असलेल्या दिशेनं बघायला लागतात.)
बैल : (बसून) माकाव उठून उभा राव्हूच होता पण उपवासमुळे त्राणच रावले नाय अंगात… माका दोन फोडी जास्त देवा हा?
(रिक्षा येऊन उभी राहते, काळोखात काहीही स्पष्ट दिसत नाहीये, सगळेजण रिक्षाच्या भोवती गोळा होतात.)
संदीप : मागे रव्हा!, मागे रव्हा!
सुहास / वामन : सगळ्यांनी मागे रव्हा रे, संदीपा एव्हडो येळ कशाक लागलो?
संदीप : सांगतंय, सांगतंय… धीर धरा….
बैल : मी काय म्हणतंय, बोलण्यात वेळ कशाक घालवतास… माका माझो वाटो देवा… जाम भूक लागली हा (पिशवी पुढं करतो)
संदीप : थांब, तुका वाटो मोठो देतंय हां…
सुहास : सगळ्यांनी लायनीत येवा रे
(संदीप गाडीतून एक पिशवी काढतो आणि त्यातून एक अंड काढतो आणि बैलाकडं देतो)
बैल : डुकराचा अंडा?
नाम्या : बैला, वस्तरो मारिन हा, कायव बोललंस तर… मेल्या डुक्कर अंडा देतां? डुकरिण अंडा देता …काय आबानू? (आबा हसत हसत मान हलवतात)
आबा : (हसत हसत) तुझ्या वस्तर्‍याक घाबरून डुकरिनच काय? गाय बकरयो पण अंडी देतील.
संदीप : डुकराची अंडी आणि डुक्कर पण दाखवतय हां तुमका सगळ्यांका…
बैल : माका दोन देवा… एक खावुक आणि दुसरा उबवुक!
सुहास : ता अंड्याचा राहून दे… डुकराचा मटण खय हा ता दि माझ्याकडे… वाटे करतय.
संदीप : डुकराचा मटाण कसलं मागतस… अख्खो डुक्करच आणलंय.
(जमलेल्या गर्दीत पुन्हा उत्साह आणि कुजबूज)
सुहास : काय म्हणत? खय हा मग तो?
संदीप : ह्यो काय (मागच्या सीटवर बोट दाखवतो.) चादर वर करून बघा.
(सगळी गर्दी पुढे होते… सुहास हळूच चादर वर करतो. तर बबन पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो)
सुहास : अरे ह्यो तर बबनो… डुक्कर खय हा?
संदीप: बघा तरी कसो डुकरासारखो पडलो हा…
नाम्या : त्याचा असा काय झाला?
संदीप : शिकार करूक गेलो आणि स्वतःच शिकार झालो…
वामन : कोणी केल्यानं शिकार त्याची? गोळी बिळी लागाक नाय ना?
संदीप : कोणी म्हणजे तुम्हीच सगळ्यांनी…
गर्दी : कायव काय बोलतं… आम्ही काय केला?
संदीप : काल सगळयांनी जे त्याका धा… धा रुपये दिलालास त्याचो यो प्रताप… मी त्याका काल जो सोडून इलय… तो आज दिवसभर कणकवलीच्या सगळ्या गुत्त्यातून शोधून आता उचलून आणलंय? आणि त्याच्याकडे जे पैसे उरले व्हते त्याची ही अंडी आणलंय दुकानांतून…
बैल : म्हणजे ही अंडी डुक्कराची नाय?
सदीप : तुका कशाक व्हई येगळी अंडी? तुझ्या डोक्यात भरली असत अंडी… मी काय सांगतंय? आता प्रत्येकाच्या घरात जा काही मटणाचा वाटण तयार केला हा त्यांनी ही डुक्कराची अंडी समजून खा… शेवटी माझ्या मतदारसंघाची माका काळजी हा.. कसा?
बैल : मग डुक्कराचा काय झाला?
संदीप : एक डुक्कर बसलो हा ना रिक्षात तो बघितलं ना… आता जावा सगळ्यांनी घरी आणि डुक्कराची अंडी खावा… (सगळे बबन्याला शिव्या देत निघून जातात.)
संदीप : चला आबानू मी पण दमलय… निघतय… याका सुद्धा घरी पोचवतंय…
(आता फक्त वामन, नाम्या, सुहास आणि आबा तिथं असतात)
सुहास : बबन्यान या बराबर करूक नाय! फसवंल्यानं सगळ्यांका!
नाम्या : भेटू दे तो उद्या वस्तारोच मारतंय… सगळ्यांचा वाटण फुकट गेला.
वामन : (सुहासाच्या हातातला कोयता बघत) याच्या कोयत्याक काढलेली धारपन फुकट गेली.
सुहास : ती काय फुकट गेलेली नाय हा. काय आबानू? पुढच्या आठवड्यात मिळतलो हा ना एक डुक्कर? काय आबा? पण आता कोणाकच बोलायचा नाय हां! पयलाच सांगतंय तुमका?
(वामन्या, नाम्या, आबा एकमेकांकडे बघतात. वामन्या मान हलवून नाही नाही म्हणतो. आबा हळूच नाम्या आणि वामन्याकडची अंडी घेतात आणि सुहासाच्या हातात ठेवतात.)
सुहास : माका कशाक देतास अंडी?
आबा : त्याचा काय हा सुहासा… मी सांगितलेलो डुक्कर पण फक्त अंडीच देता म्हणून ही अंडी तुका देतंय. तो कधी हाताक गावात याची शाश्वती नाय… कळला? ही त्या डुक्कराची अंडी समज! काय?

(वामन्या, नाम्या आणि आबा हसायला लागतात… सुहास काय ते समजतो.)

– राजेंद्र राणे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.