Now Reading
जय कोरोना

जय कोरोना

Menaka Prakashan

एकदाचा कोरोना गेला आणि बबन पटाईतने, सगळीकडे धिंगाणा घालणार्‍या कोरोनावर चिंतन-मनन करण्यासाठी मेळाव्याचं आयोजन केलंय. काय असेल या मेळाव्याचं प्रयोजन? कोरोनाला सपशेल फेल करून, धडधाकट बरं झालेल्यांच्या मागण्या तरी काय आहेत? विषय जरा हलक्यात घेत ‘जय कोरोना’ म्हणा आणि वाचा ही धमाल कथा.

‘‘जय कोरोना साहेब.’’
पुढ्यात येऊन हात जोडत असं म्हणणार्‍या बबन पटाईतकडे पाहून तहसीलदारांंचा चेहरा आक्रसला.
‘‘जय कोरोना?’’ त्यांनी उजव्या हाताचा पंजा नाचवत विचारलं, ‘‘काय आहे हे?’’
‘‘हे साहेब, ज्या लोकायले कोरोना हून गेला, त्यायनं दुसरं काही ना म्हंता आता ‘जय कोरोना’ म्हन्याची मोहीम आमी हाती घेतली आहे.’’
‘‘मोहीम?’’ तहसीलदारांची मुद्रा प्रश्‍नार्थक झाली. ‘‘तुम्ही? आणि तुम्हाला कोरोना..’’
‘‘हौ साहेब. मले कोरोना झाला होता.’’
‘‘नाव काय तुमचं? आणि कुठं असता?’’
नाव सांगून बबन म्हणाला,‘‘मी घुंगशी मुंगशीले असतो. सरपंच आहो तथचा.’’
‘‘बरं मग?’’
‘‘त मले आपल्या तालुक्क्यातल्या कोरोना हून गेलेल्या लोकायच्या वतीनं एक निवेदन द्याचं आहे.’’ असं म्हणून बबननं खिशात हात घालून कागद बाहेर काढला आणि तहसीलदारांना सोपवला.
तहसीलदारांनी निवेदन वाचलं.
‘येत्या पंचवीस तारखेला शहरातल्या घोडा मैदानात आम्ही तालुक्यातले सर्व कोरोनामुक्त लोक मेळावा घेऊ इच्छितो. मेळाव्याला येणारे लोक, अगोदर झोटिंग बुवा चौकात जमतील. तिथून फेरी काढण्यात येईल. ही फेरी शहरातील प्रमुख मार्गांनी मैदानात पोचेल आणि मेळाव्यात प्रमुख वक्त्यांची भाषणे होतील. सलोखा आणि सामाजिक शांततेला बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य आम्ही करणार नाही. तरी कृपया या आयोजनास परवानगी द्यावी ही नम्र विनंती.’
मागणी वाचून तहसीलदार हसले. ‘‘काहीही मागणी करता का हो?’’
‘‘हा हाशाचा विषय नै साहेब.’’ असं म्हणताना बबनचा चेहरा गंभीर झाला. ‘‘ते म्हंतात ना, ज्याची जयते त्यालेच कयते.’’
‘‘हां ते ठीक आहे. पण कोरोनाची फाईल आपण आता नस्त केली आहे. तो गेलाय आता.’’
‘‘गेला, पन इतिहास रचून गेला ना.’’
‘‘मग त्या शिळ्या कढीला ऊत आणण्याचं कारण?’’
‘‘कसं आहे साहेब, ज्या ज्या म्हनून घटना-प्रसंगांनी या भूमीतलं जनजीवन घोयसघायस केलं, लोकं अदमुसे केले, त्याच्यावर वैचारिक मंथन कर्‍याची आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. अन् आतापर्यंत सार्‍यात मोठा धिंगाना कोनं घातला अशील, त तो कोरोनानं.’’
या गृहस्थाशी जास्त बोलण्यात अर्थ नाही, आणि विषयही फार काही गैर नाही हे ताडून तहसीलदारांनी निवेदनावर कोंबडा मारला आणि मेळाव्याला परवानगी दिली.

‘‘मिळालाच पायजे, मिळालाच पायजे!’’
‘‘कोरोनामुक्तांना न्याय मिळालाच पायजे!’’
‘‘कोरोनामुक्तांच्या एकजुटीचाऽऽ-’’
‘‘विजय असो, विजय असो!’’
‘‘जय कोरोना, जय कोरोना!’’
अकोटातल्या मुख्य मार्गांनी निघालेल्या कोरोनामुक्तांच्या फेरीत या घोषणांनी शहर दुमदुमून गेलं होतं. फेरीत सर्वच वयोगटातली तीन ते चार हजार मंडळी होती. पुढ्यातल्या काहींच्या हातात झेंडे होते. त्यावर मध्यभागी कोरोना व्हायरसच्या प्रतिमा चितारलेल्या होत्या. सर्वांत पुढे बबन आणि दोघे-तिघे होते.
घोडा मैदानात पोचल्यावर फेरीतली बायका माणसं खाली बसली आणि मेळाव्याला सुरुवात झाली. पुढ्यात मोठं व्यासपीठ उभारलेलं होतं. सुरुवातीला इतरांची भाषणं झाली. त्यानंतर बबन बोलायला उभा राहिला.
‘‘माझ्या तमाम कोरोनामुक्त बांधवांनो आणि माता भगिनींनो..’’ अशी सुरुवात करून तो खड्या आवाजात बोलू लागला, ‘‘पयल्या काळात ॠषी-मुनी लोकं येखांद्या हस्तीले शाप देत. मंग माफी-गिफी, दया-माया अशी याडजेस्टमेंट होये अन् उश्शाप देल्या जाये. त्याच्याबाद ते हस्ती जिती त राहे, पन मंग तिची कंडीशन घर का न घाट का अशी होये. शेम कंडीशन आपली झाली आहे सद्या. काहून की आपल्याले कोरोना झाला होता.’’
उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला.
‘‘मित्रहो, त्या कोरोनाचं मळं गेलं. पन जनरल पब्लिक आजूनई आपल्याले बाटल्या वान्नेरासारखी ट्रिटमेंट देत आहे. तुमाले कालचीच गोस्ट सांगतो, काल आमच्या गावात येका पोरीले पावने पाह्याले आलते. त्यायच्यातलं येक भोपंजी बुडगं तिले प्रश्‍न विचारत होतं. त आखरी त्यानं विचारलंच, का बै तुले कोरोना झाला होता काय? हे काय होय? हे दुसरं तिसरं कै नसून अमानवी वागनूक होय! अन् याच्या विरोधात आता आफून आपली ताकद पनाले लावली पायजे.’’
‘‘लावली पायजेऽऽ-’’ श्रोत्यांतून घोषणा झाली. ‘‘लावलीच पायजे!’’
‘‘कोरोना काळात आपल्याले दुनियाभर्‍याचं दाचळवाचळ करन्यात आलं. हिसळतिसळ करन्यात आलं. कोरोना पॉझिटिव डिक्लियर झाल्यावर आपल्या लोकायची गुन्हेगारायसारखी धरपकळ होत होती. पोलीस व्हॅनसारख्या अँबुलंस पाठून आपल्याले दवाखान्याईत कोंडन्यात येत होतं. तथी डाक्तर आपल्याजोळ येत नोते. येत होत्या त्या फक्त नर्सा. त्याई गोया द्याले. ज्यायच्यात लक्षनं नोते त्यायच्यावर चौदा दिवस निगरानी बदमासायसारखं ध्यान ठेवलं गेलं. आपले पॉझिटिव लोकं घरून उचलल्या जात होते, त शेजारीपाजारी लपूनछपून मजा पाह्यत होते. व्हिडिओ काळत होते. नै म्हन्याले गवरमेंडनं मोबाईलवर ते जाहिरात जारी केली होती- इनसे भेदभाव ना बरते, उनकी देखभाल करे. पन ते एवळी लंबी चौळी होती की लोकं आफून कोनाले फोन केला ते भुलत होते अन् त्यायचे डोक्से सटकत होते. म्हंजे गरमेंटई या जाहिरातीच्या आळून आपल्या चेंढान्या करत होतं.’’
‘‘करत होतंऽऽ-’’ उपस्थितांनी प्रतिसाद दिला. ‘‘करत होतं.’’
‘‘त मित्रांनो, आता वेळ आली आहे याचा जाब विचार्‍याची. याच्यावर चिंतन-मनन कर्‍याची. अन् ते आता सुरू झाली आहे!’’
टाळ्यांचा पाऊस पडला.

‘‘खरं त याची सुर्वात कशी करावं हा मले प्रश्‍न पळला होता. पन हे काम व्हॉट्सअपनं केलं. याच्यासाठी म्या लोय विचार केला होता. त्याच्यात मले हे सुचलं होतं. म्या मंग कोरोना हून गेल्या होया आपल्या लोकायनं पेशल गृप बनवावं असं आव्हान केलं होतं अन् ते व्हॉट्सअपवर केलं होतं. शिवाय नमस्कार ना म्हंता आता ‘जय कोरोना’ म्हनत जावावं हेई आव्हान केलं होतं. त ते ज्यमके व्हायरल झालं अन् सार्‍यायनं याक्सेप्ट केलं.’’
उपस्थितांतून नारा निनादला, ‘‘जय कोरोना, जय कोरोना!’’
‘‘मित्रहो, आता आपला दुसरा टप्पा आहे, गवरमेंडले सवलती मांग्याचा. आपल्याले येस्टी, रेल्वे, इमान अन् जहाज या प्रवासात सत्तर टक्के कंशेशन भेटलं पायजे.’’
‘‘भेटलं पायजे. भेटलंच पायजे.’’
‘‘आपली तिसरी मागनी राहील, नवक्रीत रिझर्व्हेशनची.’’
‘‘याऽऽ!’’ लोकांनी कल्लोळ केला. पाठोपाठ टाळ्यांचा कडकडाट झाला.
‘‘आफून चौथी मागनी करू- गवरमेंडनं कोरोनाविषयक स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं.’’
यावर टाळ्यांसोबत शिट्या कर्कशल्या.
‘‘अन् आपली पाचवी मागनी अशील, ज्याच्यानं कोरोना सार्‍या जगात पसरला, त्या चीन देशाले हरामखोर अन् बाजिंद्या लोकायचा देश म्हनून घोशित करावं.’’
टाळ्यांनी आसपासचा परिसर दणाणून गेला.
‘‘मंडळीऽ, ह्या मागन्या विनाकारन नैत. कोरोना काळात आपल्याले जे खराब वागनूक भेटली, आताई भेटत आहे, त्याचा मोबदला म्हनून आहेत. या मागन्यांचं रीतसर निवेदन आफून गवरमेंडच्या इकळे पाठोनार आहो. अन् त्या जर का मान्य झाल्या नैत, त मंग आफून आहो अन् गवरमेंड आहे.’’ बबन बेंबीच्या देठापासून गरजला, ‘‘अन् गवरमेंडनं आमाले असं तसं समजू नोय. आमी लोकायनं कोरोनाले टक्कर देली आहे! हौ. त्याले हारोलं आहे! अन् गवरमेंड काय कोरोनापेक्षा मोठं लागून गेलं काय?’’
‘‘बबन पटाईत तुम आगे बळोऽऽ’’ उपस्थितांनी गर्जना केली, ‘‘हम तुमारे साथ है.’’
बबन पुढे काही बोलणार तोच उपस्थितांतून एक व्यक्ती भेलकांडत व्यासपीठाच्या खालच्या भागात आली. तोल सावरत बबनला म्हणाली, ‘‘पटाईत सायेब, मालं येक म्हन्नं आहे.’’
बबननं खाली पाहिलं. ‘‘बोला?’’
‘‘सायेब,’’ व्यक्ती अंगाला हेलकावे देत म्हणाली, ‘‘कोरोनानं सगळ्यात पयला दनका कोनाले देला मैत आहे? तो देला बिळ्या पेनारायले अन् आमच्यासारख्यायले.’’
‘‘मंग?’’
‘‘लाकडौन सुरू झाल्याबराबर दारूचे दुकानं बंद झाले. पान ठेले बंद झाले. अन् झालं असं, का त्या टैमाले दारू अन् बिळ्या बिलॅकनं इकल्या गेल्या.’’
‘‘बरं मंग?’’
‘‘त आता हे पन मागनी करा, की कोरोनामुक्तायले गवरमेंडनं दारू अन् बिळ्या याच्यात सबशिळी देवाव.’’
उपस्थितांत जोरात हशा पिकला आणि बबन व्यक्तीला म्हणाला, ‘‘पन हे मागनी लॉजिकले धरून होनार नै ना भौ!’’
‘‘मंग दारू इक्याले परमिशन देनं हे कोंतं लॉजिक होय?’’ व्यक्तीनं अंगाला झटका देत प्रतिप्रश्‍न केला, ‘‘अन् कोनी जर का म्हनत अशील का, दारू खराब आहे, त मंग तिच्यातून गवरमेंडले जो टॅक्स भेटते त्याचं काय? तेच गोस्ट बिळ्या पेनारायची. बिळ्यायचे कारखाने बंद झाले त किती लोकं घरी बसतील? आहे कोनाले कै आयडिया?’’
‘‘बरं ठीक आहे.’’ बबननं विषय आवरता घेतला. ‘‘पाहू.’’
‘‘पाहू नै, पाहाच. कारन की कसं आहे भौ, की गवरमेंड सार्‍याच मागन्या मान्य करत नसते. म्हनून त लोकं चार-दोन मागन्या शिल्लकच्या करत असतात. तशा ह्या करा. जमलं त जमलं, नै त मंग पुळे मांगं आमच्या कॅटॅग्रीतल्या लोकायले येखांदा पेशल मोर्चा काळता यील.’’
‘‘ठीक आहे, ठीक आहे.’’
बबनचं भाषण झाल्यानंतर अकोटातल्या चार मुस्लिम इसमांचा सत्कार करण्यात आला.
कोरोना काळात जेव्हा रुग्णांजवळ जायला कुणीच धजत नव्हतं तेव्हा या मुसलमानांनी कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांना जेवण आणि चहा-नाश्ता पोचवण्याची सेवा दिली होती. तीही निशुःल्क आणि कित्येक दिवस. या योगदानाप्रती त्यांना बबनच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलं.
सत्काराला उत्तर म्हणून या लोकांना आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करण्यात आली तेव्हा ही मंडळी गांगरली. ‘‘अरे र्‍हंदेव, र्‍हंदेव. हमकू बोलने तो भी आता क्या भाय?’’ असं म्हणाली.

त्यावर दोन शब्द तरी बोला असं म्हटल्यावर त्यांच्यातला एक जण हिंमत जुटवून माइकवर गेला. सुरुवातीला कचरत चाचरत म्हणाला, ‘‘आदाब. मेरा नाम शराफत अली। मै ह्या सतरंजी पुरेमे खारी बावळीके पास रयता हूं। रिक्षा चलाता हूं।’’ मग लगेच त्याची भीड चेपली आणि त्यानं तोंड मोकळं सोडलं. ‘‘कोनसा कोरुना अन् कैसा कोरुना, कहां से आया था कजनी हरामज्यादीका! अन् कित्ता डरा दिया थाने लोगो कू।’’
‘‘अरे गाल्या मत देव हो बावा.’’ बबनच्या बाजूला बसलेल्या सूत्रसंचालकानं त्याला हळूच टोकलं. ‘‘ये जाहीर मेळावा है ना.’’
‘‘जी जी.’’ शराफत अली दबकला आणि सूत्रसंचालकाकडे पाहत म्हणाला, ‘‘पन मै गाल्या थोळी दे रया? मै कोरुना के बारे मे बोल रया।’’
‘‘तुम शिरीफ तुमने क्या किया वो बताव, तुमकू दवाखानेमे जाने का डर नै लगा क्या वो बताव अन् मेळावे के बारे मे बोलो।’’
‘‘जी जी.’’ शराफत गोरामोरा झाला. ‘‘तो हुवा यू, क्या उस समय लोगोकी कोरुना पेशंटके पास जाने को फट रई थी। हौर पेशंट जो थे, वो कोरुना से ज्यादा सर्कारी दवाखानेको डर रये थे। लेकीन हम लोग नै डरे। इसकी वजे ये है, क्या हमारे मौलाना साबने हमकू बताया था के इससे कुछ नै होने वाला। हौर उधर साला सर्कारी दवाखानेसे खबरे आ रयी थी, क्या व्हा पेशंटा को डिब्बे पौचाने मे, चाय पानी देने मे दिक्कत आ रयी है। फिर हुवा ऐसा के, मेरे साथ ये जो तीन जने है-’’ शराफतनं सोबत्यांकडे बोट दाखवलं. ‘‘येक ये रमजान कालीवाले है, ये गवली है हौर ये भी मेरे जैसा रिक्षा चलाता है। दुसरा हसन है और तिसरा कुद्दूस है। ये दोनो हमाली करते है इस्टॅन पे। तो कोरुना के वजे हमारे काम धंदे भी बंद हुये थे हौर जब ये बात पता चली तो हम बोले, क्यूं रे भाय, चलते क्या व्हा? तो बोले के चलो तो फिर गये हौर जो भी बनता फर्ज अदा किया।’’
उपस्थितांकडून टाळ्यांचा वर्षाव झाला.

शराफत मोहरून गेला. ‘‘हौर येई नै, आप लोगों का कोई भी काम रवो ह्या पे। हमकू फोनपर शिरीफ इत्तल्ला कर देना। दस मिनिट के अंदर हम लोग हाजिर नै हुये तो बोलना फिर। हौ! तो ह्या पे इत्ते बळे हुजूम के अंदर हमकू जो इज्जत दी गई, उसके लिये हम आप मेंबरान लोगो के शुक्रगुजार है। खास करके इस कारेकरमके कर्ताधर्ता मेहरबान बबनराव पट्टेवाले साहब- इनका हम तहे दिल से शुक्रिया अदा करते है।’’
‘‘पट्टेवाले नै.’’ सूत्रसंचालकानं हसत हसत दुरुस्ती केली. ‘‘पटाईत.’’
‘‘हौ हौ वौच।’’ शराफत गडबडला. ‘‘माफ करना साब, मै पळा लिखा नै हूं। अन् मैच नै, हमारे घर मे येक भी बंदा कोई पळा नै।’’
मेळाव्याच्या बातम्या जवळपास सगळ्याच वृत्तपत्रांनी प्रकाशित केल्या. काही वृत्तवाहिन्यांनीही याची दखल घेतली.
‘न्यूज बत्तिशी’ या वृत्तवाहिनीनं यावर ‘कोरोना काय देऊन गेला?’ हा विषय घेऊन पॅनेल चर्चा ठेवली. तीत बबनसह ‘सायंकाळ’ वृत्तसमूहाचे मुख्य संपादक गं. भा. भगीरथकर, होमिओपॅथीचे डॉक्टर वरुण तपासे, चित्रपट अभिनेत्री सखी सावंत ही मंडळी सहभागी झाली. सूत्रसंचालक अंजन मंजनकरनं सुरुवातीचं विवेचन केलं आणि भगीरथकरांना म्हटलं, ‘‘सर, तुम्हाला काय वाटतं? कोरोना आपल्याला काय देऊन गेला?’’
भगीरथकर सुतकी चेहर्‍यानं उत्तरले, ‘‘या देशात पहिली फूट ब्रिटिशांनी पाडली. दुसरी कोरोना पाडून गेला. बबन पटाईत यांनी केलेली मागणी हे याचं प्रत्यंतर आहे.’’
‘‘पण ब्रिटिश सत्ता होती अन् कोरोना हेही बिमारी होती.’’
‘‘आणि दोहोंत बरंच साम्य होतं. किंबहुना ते असतंच.’’
मंजनकर बबनला म्हणाला, ‘‘तुमचं काय मत आहे यावर?’’
बबन खाकरला आणि ताठ बसत उत्तरला, ‘‘आपल्याले येकच समजते, कोरोना हे बिमारी होती अन् ते जगात जानून बुजून फैलोल्या गेली. हे कांड त्या मिचक्या डोयाच्या चिनी माकोळ्यायनं केलं अन् त्याचा खतरनाक तळाखा कोनाले बसला अशील त तो आमाले बसला.’’
‘‘म्हंजे कोरोना चीनमुळे पसरला.’’
‘‘बिलकूल.’’
‘‘मग तुम्ही तुमच्या मागण्या आपल्या शासनाकडे करण्याचं कारण?’’
‘‘कारन आमी रयवासी अथचे आहो. अन् आमाले जे खराब ट्रिटमेंट भेटली ते अथच्या लोकायकळून भेटली.’’
‘‘त्यात शासनाचा काय दोष?’’
‘‘सर्कार बाकीच्या लोकायले कशा सवलती देते?’’
‘‘सखी सावंत,’’ मंजनकर सखीला म्हणाला, ‘‘कोरोना तुम्हाला काय देऊन गेला?’’
‘‘अ‍ॅक्चुअली,’’ कपाळावर आलेली केसांची बट मागं सारत सखी उत्तरली, ‘‘कोरोनानं मला काही टिपिकल गोष्टी शिकवल्या.’’
‘‘कुठल्या?’’
‘‘यू नो, मेनली यू ट्यूब बघायला शिकवलं. लॉकडाऊनमुळे घरात बसून बसून मला कंटाळा येत होता. या. सो मी मग डे नाईट यू ट्यूब बघू लागले. अँड आय टेल यू कॉन्फिडन्टली, की त्यावर खजिना आहे.’’
‘‘विशेष असं काय बघितलं त्यावर?’’
‘‘अ‍ॅट दॅट टाइम, एका गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. फॉकसाँग इक्वलंट ते ढोलक, हार्मोनियमच्या साथीनं गायिलेलं होतं अँड आय लाइक्ड इट सो मच. इट वॉज रिअली ऑसम अँड वंडरफूल.’’
‘‘कुठलं गाणं?’’
‘‘आय थिंक, ते रस्त्यावर गाणारे उत्तर भारतीय सिंगर होते, अँड साँग वॉज..’’ सखीनं बोटांच्या चुटक्यांवर गाणं गाऊन दाखवलं. ‘‘साले को ऐसा मारूंगा, साले को ऐसा मारूंगा, कहां से आया तू कारोना बतला दे तू आज, साले को ऐसा मारूंगा, साले को ऐसा मारूंगा, अरे कहां से आया तू, तेरे से बदला ले लुंगा’’
‘‘सखी सावंत, असं म्हटल्या जातं, की तुम्ही कशालाच भीत नाहीत.’’ मंजनकरनं तिच्याकडे एकटक पाहत म्हटलं, ‘‘मग तुम्ही कोरोनाला भीत होत्या का?’’
‘‘कोरोनानं मला नाही, मीच त्याला घाबरवलं.’’ असं म्हणून सखी जोरात हसली.
‘‘ते कसं?’’
‘‘या व्हायरसवर जे कव्हर होतं,’’ सखीनं विचारलं, ‘‘ते कशामुळे नष्ट होत होतं?’’
‘‘सॅनिटायझरनी. साबणानी.’’
‘‘या. तर घरात मी काय करत होते, की साबणानं वेळोवेळी हात तर धूत होतेच. शिवाय दुसरीकडे ‘आयुष’च्या वतीनं याला प्रतिबंध म्हणून अद्रक, हळद वगैरे टाकलेला काढा घ्यायला सांगितलं जात होतं. त्याची वाफ घ्यायला सांगितलं जात होतं.’’
‘‘होय. काढा आणि वाफ घ्यायला सुचवलं जात होतं.’’
‘‘पण ही वाफ म्हणा किंवा काढा म्हणा,’’ सखीनं ठासून विचारलं, ‘‘ते घेतल्यानं कोरोनाचे व्हायरस हमखास मरतातच असं कुणी सांगत होतं का?’’
‘‘नाही.’’
‘‘करेक्ट. तर मी काय केलं, की मी पातेल्यात पाणी गरम करत होते. त्यात साबण टाकत होते आणि त्याची वाफ घेत होेते.’’
सखीनं सांगितलेली मात्रा ऐकून सगळे चकित झाले. एवढे धीरगंभीर भगीरथकर, पण तेही हलले.
मंजनकरनं बबनला विचारलं, ‘‘तुम्ही काय म्हणाल यावर?’’
बबन थोडा हसला. ‘‘हा फार्मुला यायनं डब्ल्यूयचओच्या इकळे पाठव्याले पायजे होता.’’
‘‘मी का डॉक्टर आहे का?’’ सखी ताडकन म्हणाली, ‘‘आयम सेलिब्रेटी. अँड यू अंडरस्टँड, की हा उपचार माझ्यापुरता लिमिटेड होता. घरगुती होता. तो डब्ल्यूएचओकडे पाठवण्याचा प्रश्‍नच कुठं येतो?’’
मंजनकर डॉक्टरांकडे वळला. ‘‘डॉक्टर वरुण तपासे, कोरोना होमिओपॅथीला काय देऊन गेला?’’
तपासे बोलले, ‘‘खरं सांगायचं म्हणजे, कोरोनावर होमिओपॅथीत गोळ्या होत्या.’’
‘‘मग तुम्हा लोकांना बरकतीचे दिवस आले होते का? कारण या काळात तुमचे व्यवसाय तेजीत चालल्याचे रिपोर्ट आहेत.’’
‘‘दुदैवानं अजूनही होमिओपॅथीतल्या गोळ्यांची तुलना साबुदाण्याशी करण्यात येते. त्यामुळे हा अडसर कोरोना काळातही बराच कायम होता.’’
मंजनकरनं बबनला म्हटलं, ‘‘तुम्ही होमिओपॅथीच्या गोळ्या घेऊन पाहिल्या नाहीत का?’’
‘‘होमिओपॅथी आजून खेळ्यापाळ्यात घुसली नै.’’
‘‘घुसली तर?’’
‘‘कसं आहे साहेब, आजकाल लोकं घोळं प्रिपेअर करतात. फेकली टांग का ते पयाले लागलं पायजे. अन् होमिओपॅथीचं काम सायबैली आहे.’’
तपासेंनी युक्तिवाद केला, ‘‘तसं जरी असलं तरी आम्ही रोगाचं समूळ उच्चाटन करतो.’’
बबननं नकारार्थी मान हलवली. ‘‘पन तेवळं थांब्याची लोकायची तयारी नै साहेब. म्हनून त ते यालोपॅथीचे पाय धरतात. दुसरी गोस्ट होमिओपॅथीत आखीन येक लचांड आहे. ह्या गोया घ्याची सुर्वात त आहे, पन तिले अंत नै.’’
‘‘नाही नाही.’’ तपासेंनी इनकार केला. ‘‘असं काही नाही. हा गैरसमज आहे.’’
हा वाद वाढू नये म्हणून मंजनकर बबनला म्हणाला, ‘‘कोरोनानं सगळंच काही वाईट केलं नाही. काही गोष्टी चांगल्याही केल्या. प्रदूषण आटोक्यात आलं. लग्ना-मरणातले अनाठायी सोहळे आणि त्यावरचा खर्च वाचला. यावर काय म्हणाल?’’
‘‘तशी त इलक्टरी पन चांगल्यासाठीच असते. पन तिच्या वायराले हात लागून करंट बसला त? अन् तो कोनाले बसला? आमालेच ना?’’
‘‘व्वा.’’ मंजनकरनं दाद दिली. ‘‘गावखेड्यातले लोक आता हुशार झाले आहेत.’’
‘‘ते बह्याळ कदी होते साहेब?’’
‘‘क्या बात है!’’ मंजनकर खळाळून हसला. ‘‘बरं, ही संघटना स्थापन करण्याची प्रेरणा कुणामुळे मिळाली? कोरोनामुळे?’’
बबन हात जोडत म्हणाला, ‘‘मले साहेब समाजसेवेची आवळ आहे अन् ते लाहानपनापासून आहे. कोरोना हे निमित्त झालं.’’
‘‘तुमच्या मागण्या मान्य झाल्या तर, कोरोनाला चांगलं म्हणाल की वाईट?’’
‘‘ते भरपाई अशील, आमी जे भोगलं त्याची.’’
‘‘आणि मान्य झाल्या नाहीत तर?’’
‘‘मंग काय कर्‍याचं ते ठरवू. पन गवरमेंडनं येक ध्यानात ठेवावं. आमी कोरोनाले फेस केलं आहे!’’

ही चर्चा सर्वदूर पाहिली गेली आणि तिसर्‍या दिवशी वृत्तपत्रात एक बातमी प्रकाशित होऊन आली. जामोद तालुक्यातल्या धुंदी बुद्रूक इथं कोरोना मातेचं मंदिर उभारल्या जाणार होतं. कोरोना काळात धुंदीत पॉझिटिव्हांचा सुळसुळाट झाला होता. बाहेरून फारसं कुणी गावात येत नव्हतं, इथूनही कुणी तेवढं बाहेर जात नव्हतं पण तरीही रुग्ण सापडत होते आणि शेपटी लांबतच होती. ही काहीतरी दैवी आपत्ती आहे, त्या शक्तीचा गावावर कोप झाला आहे अशी ग्रामस्थांची समजूत झाली होती आणि त्यांनी गावाबाहेरच्या जमिनीवर एक दगड मांडून त्याला शेंदूर फासला होता. रोगराई म्हटली की तिच्या देवतांची नावं ढोबळमानानं स्त्रीलिंगी आढळतात. मग याला काय म्हणावं, तर कोरोना माता या नावावर एकमत झालं होतं.

बातमीत हा सगळा उल्लेख होता आणि आता तिथं मंदिर उभारणीचं काम हाती घेण्यात आलेलं असून दात्यांनी सढळ हस्ते देणगी द्यावी असं आवाहन करण्यात आलं होतं. बातमी प्रकाशित होताच कोरोनातून बचावलेल्या मंडळीचा धुंदीत ओघ लागला. वर्‍हाडच नाही तर विदर्भ आणि इतरही भागातले लोक दर्शनाला येऊ लागले. कुवतीप्रमाणे दान देऊ लागले. लगोलग भूमिपूजनाचा मुहूर्त काढला गेला. ते कुणाच्या हस्ते करावं, यावर सर्वांत अगोदर अमिताभ बच्चनचं नाव पुढे आलं. कारण त्याला कोरोना होऊन गेला होता नि म्हणून तो येईल असा धुंदीवासियांचा होरा होता. अमिताभसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न झाला. पत्र पाठवलं गेलं, ट्विटरवर संदेश लिहिला गेला. पण बच्चननं त्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. दुसर्‍या शोधात बबन पटाईतचं नाव पुढे आलं. त्याला सर्वांनी मान्यता दिली.
कोरोना मातेच्या डोक्यावर चढवण्यासाठी लाकडी मुकुट तयार करायचा होता. हे काम धुंदीतल्या बाप्पूराव होनमोडे या कसबी सुताराकडे देण्यात आलं. त्यानं कोरोना व्हायरसवर जे काटेेरी कवच असते ते दर्शवण्यासाठी मुकुटावर उभे खिळे ठोकले. हे कौशल्य खूप वाखाणलं गेलं आणि त्याच्याही बातम्या छापून आल्या.

ठरल्यावेळी भूमिपूजन झालं. बबन पटाईतनं आपल्या भाषणात कोरोनामुक्तांच्या मागणीचा पाढा वाचला आणि म्हटलं, ‘‘भक्तहो, कोनी कोनी मले विचारतात, की मागन्या मान्य नै झाल्या त तुमी काय करनार आहा? कोरोना या नावानं पक्ष काळनार आहा? की कोरोना हा धर्म स्थापन करनार आहा? पन आपल्याले असं कैच कर्‍याचं नै. नै. मित्रांनो, राज्यात तीनमुखी सर्कार आहे. यायले तीन तोंडं आहेत. अन् तीन जरी असले तरी या सर्कारनं येक गोस्ट लक्षात असू देवावं, आमी लोकायनं कोरोनाशी चार हात केले आहेत!’’
याच कार्यक्रमात बाप्पूराव सुताराचा बबनच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बाप्पूरावला पुठ्ठ्याची तपकिरी रंगाची जरीची टोपी भेट देण्यात आली आणि भटजीनं ती त्याला डोक्यात घालायला लावली.
सकाळची वेळ होती. बबन ओसरीत बसून वर्तमानपत्र वाचत होता. सोबत चहा पीत होता. एका बातमीनं त्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. कोरोनानंतर चीनमध्ये लोक पुन्हा मांसाहारावर तुटून पडले आहेत. वटवाघुळे, खवलेमांजरी, मसनेऊद यांचा अक्षरशः फडशा पाडू लागले आहेत, ही ती बातमी होती. बबन स्वतःशी म्हणाला, ‘‘हे चिनीमाकोळे मज्जावले सायाचे आखीन.’’
त्यानं चहा संपवून कपबशी खाली ठेवली. त्याच वेळी गावातली गोकर्णा म्हातारी त्याला भेटायला आली आणि आल्या आल्या कमरेवर हात ठेवून तिनं खड्या आवाजात म्हटलं, ‘‘कारे बबन, त्व्या संघटना काळली म्हंतात बापा त्या करुना हून गेल्या होया लोकायची.’’
‘‘हौ आजी. आयुष्यात माले कै खाब होते. येक होता गावचा सरपंच होयाचा. तो पुरा झाला. माली दुसरी खाईश होती, कोंतीतरी संघटना काळ्याची. ते या कोरोनानं पुरी केली.’’
‘‘म्हंजे काय त्व्या करुना होयाचाई खाब पायला होता काय?’’
‘‘तू आता बुडी झाली. त त्व्या काय म्हतारं होयाचा खाब पायला होता काय?’’
‘‘काहीई बोलतं काय रे उबार्‍या वानाच्या?’’ म्हातारी हसत हसत फिसकारली.
‘‘मंग तू कशी विचारून रायली?’’
‘‘बरं पन हे संघटनेची उठाकपटक कायच्यासाठी होय?’’
‘‘कायच्यासाठी म्हंजे? आमच्या लोकायचे प्रश्‍न सोळव्यासाठी.’’
‘‘म्हंजे ते काय सोयरे होत काय त्व्याले?’’
‘‘समदुःखी लोकं सोयरेच असतात येकमेकायचे.’’
‘‘पन याच्यात त्व्याला फायदा काय?’’
‘‘हरेक गोस्ट काय फायद्यासाठीच करत असतात काय?’’
‘‘नै त काय नुकसान होयासाठी करत असतात काय? अन् तू काय राजा हरिचन लागून गेला काय?’’
यावर बबन काही बोलणार तोच त्याचा मोबाईल वाजला. त्यानं ऑन करून तो कानाला लावला आणि म्हटलं, ‘‘हलो?’’
पलीकडून प्रश्‍न आला, ‘‘हलो, बबनभौ पटैत बोलता ना?’’
‘‘हौ. तुमी?’’
‘‘मी आमगाववून शकुंतलासुत बोलून रायलो.’’
‘‘कुठी आलं हे आमगाव?’’
‘‘खामगावजोळ रामगाव आहे कानी, तथून चार किलोमीटरवर आहे. जिल्हा बुलढाना. त मी वर्‍हाडी कवी आहो अन् मी चोवीस तास वर्‍हाडीत बोलत असतो.’’
‘‘वा वा. मस्त.’’
‘‘शकुंतला हे माल्या आईचं नाव आहे. माल्या कविता दैनिक लेक्रोन्नतीत छापून येत असतात अन् मी कविसंमेलनात जात असतो.’’
‘‘असं काय?’’
‘‘हौ. त मले कोरोना झाला होता.’’
‘‘कविसंमेलनात गेलते म्हनून?’’
‘‘नै नै. ते म्हंजे असं झालतं, की आमच्या घराच्या बाजूले पिंट्या नावाचं भंटोल पोट्टं रायते. ते म्हने कायचा कोरोना फोरोना, सारे ुु बनोयाचे धंदे आहेत. अन् ते मास्क ना बांधता गावात फिरे.’’
‘‘मंग?’’
‘‘मंग काय? त्याच्यात ते आमच्या घरी आलं अन् गोयलं नालायकानं आमालेई.’’
‘‘अरे.’’
‘‘हौ. त बबनराव म्या येका खास कारनानं तुमाले फोन केला.’’
‘‘सांगा ना.’’
‘‘आमच्या गावात पुर्षत्तम मळसने नावाचे गुर्जी आहेत. चांगला मानूस आहे. मी कविता लिहीत असतो हे त्यायले मैत आहे. पन माला कविता संग्रह कै आजून प्रकाशित झाला नै. तो करावं काय हे मी गुर्जीले विचारत असतो. त ते म्हंतात, आजकाल कविता लोय झाल्या, म्हनून लोकं त्या वाचत नैत. त झालं असं, की मले काल गुर्जी भेटले, अन् तेईनं मले येक खास सल्ला देला.’’
‘‘कोंता?’’
‘‘ते म्हंतात, तू आता कोरोनावर पुस्तक लिही. ते वाचल्या जैल. त मले हे म्हन्याचं आहे, की मी पुस्तक लिहितो. त ते प्रकाशित झाल्यावर त्याचं प्रकाशन मले तुमच्या हस्ते ठेव्याचं आहे. त येसाल काय तुमी?’’
बबन मान डोलवत म्हणाला, ‘‘नख्खी येतो.’’
‘‘थँक्यू. सो मच.’’
‘‘थँक्यू? हा कोंता वर्‍हाडी शब्द होय?’’
शकुंतलासुत कामाला लागला. त्यानं पुस्तक तर लिहायला घेतलंच, जोडीला ‘अखिल भारतीय कोरोनामुक्त वर्‍हाडी साहित्य संघा’ची स्थापना केली. काहीच दिवसांत, बुलढाणा इथं या संघाच्या वतीनं पहिल्या साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. उद्घाटक म्हणून बबनची निवड करण्यात आली. संमेलनात चर्चा, परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होते आणि ज्यांना कोरोना होऊन गेला आहे अशाच साहित्यिकांनी त्यात सहभागी होण्याची अट होती. या संमेलनाला कोरोनामुक्त ऐश्‍वर्या रॉयनं यावं यासाठी बरीच उठाठेव करण्यात आली. पण ते जमलं नाही.

मोठ्या गाजावाजानं संमेलनाला सुरुवात झाली. रात्रीचं कविसंमेलन खूप गाजलं. ‘माहा अशिम्टिमॅटिक कोरोना’, ‘जनाबुडी कॉरंटाईन होते ताहा’, ‘असे कसे फिरले नशिबाचे फासे, माह्या घरामव्हरे बांधले सिलिंगचे बासे’ या वर्‍हाडी कवितांना रसिकांनी डोक्यावर घेतलं.
‘कोरोनानं अल्कोहोलचं महत्त्व अधोरेखित केलं का?’ हा विषय घेऊन परिसंवाद ठेवण्यात आला होता. त्यात पिण्यासाठी प्रख्यात असलेले तीन समीक्षक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे परिसंवादातही त्यांच्या तोंडून वास येत होता आणि त्यांनी प्रतिपादन केलं, की अल्कोहोलचं महत्त्व पुराणकाळापासून आहे आणि ते अबाधित आहे. ज्यांना वासही सहन होत नव्हता त्यांना कोरोनानं ते हातात घ्यायला भाग पाडलं. लाक्षणिक अर्थानं हा अल्कोहोलचा विजय होता.
दुसर्‍या दिवशी कथाकथनाच्या सत्रात शकुंतलासुतच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. ‘कोरोना – तेरावा अवतार’ हे त्याचं शीर्षक होतं. मनोगत व्यक्त करताना शकुंतलासुत म्हणाला, ‘‘रसिकहो, कोरोना हे दुसरं-तिसरं कै नसून हा व्हायरसचा तेरावा अवतार होय. बर्‍याच लोकायची धारना हे आहे, की अवतार फक्त देवलोकच घेत असतात. पन असं नसते. काही अवतार राक्षस पन घेत असतात अन् कोरोना हा याच कॅटॅग्रीतला अवतार होता. आता तुमी म्हंसाल या दोन कॅटॅग्रीत फरक काय? त ज्या वाक्ती लोकाईत पाप अन् दुराचार वाळते त्या वाक्ती दैवी अवतार जन्म घेत असते. त ज्या टैमाले पर्यावरनात बिघाळ होते ताहा राक्षसायचा अवतार जन्माले येत असते.’’

शकुंतलासुताचा हा दावा ऐकून सर्वांचे कान टवकारले.
‘‘मंग तुमी म्हंसाल, कोरोनाच्या पयलचे बारा अवतार कोंते? मित्रहो, तसं पायलं त व्हायरस खंडीनं असतात. पन ज्यायले खतरनाक अन् मोस्ट वांटेड समजल्या गेलं असे बाराच व्हायरस आहेत.’’ शकुंतलासुतनं पुढ्यातल्या कागदावरचं पाहत म्हटलं, ‘‘त हे आहेत- मारबर्ग, इबोला, रेबीज, यचआयव्ही, स्मॉलपॉक्स, हंता, येन्फ्लूयेंझा, डेंगू, रोटा, सिओव्ही, सार्स अन् मर्स. अन् तेरावा कोन, त अर्थात हा कोरोना. त अशा अवतारायपासून संरक्षन कर्‍यासाठी आफून काय काय कर्‍याले पायजे, मन प्रसन्न कसं ठेवलं पायजे, कोंते पुस्तकं वाचले पायजेत, कोंत्या कविता वाचल्या पायजेत, हे म्या या पुस्तकात डिटेल लिहलं आहे. रसिकहो, मालं हे फक्त पुस्तक नै, त हा येक ग्रंथ आहे. अन् या ग्रंथाले रसिक मायबाप न्याय देतील याची मले फूल्ल खात्री आहे.’’
यानंतर बबनचं भाषण झालं. तो म्हणाला, ‘‘लोय टोले घिऊन वर्‍हाळकवी शकुंतलासुत यायनं हे पुस्तक जन्माले घातलं आहे. मले विश्‍वास आहे, या अपत्याची अवघं जग दखल घेतल्याशिवाय रायनार नै. शिवाय हा पलाट घिऊन येखांदा शिनमा आला पायजे हे माली आंतरिक इच्छा आहे अन् त्याच्यासाठी मी शकुंतलासुत यायले मनापासून शुभेच्छा देतो.’’

संमेलनात पुस्तकाच्या विक्रीचा स्टॉल लावण्यात आला होता. प्रकाशन समारंभ आटोपताच त्यावर वाचकांच्या उड्या पडल्या. काहीच वेळेत सगळी पुस्तकं संपली. हे पाहून शकुंतलासुताला दरदरून घाम फुटला आणि अस्वस्थ वाटू लागलं. त्याला तातडीनं दवाखान्यात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली. काय झालं ते सविस्तर विचारलं आणि निदान केलं, ‘‘काही नाही, फक्त रक्तदाब वाढला आहे आणि काळजी करण्यासारखं काही नाही.’’
डॉक्टरांनी गोळ्या लिहून दिल्या. प्रिस्क्रिप्शन घेताना शकुंतलासुतानं त्यांना विचारणा केली, ‘‘डॉक्टरसाहेब, येक विचारू?’’
‘‘बिलकूल.’’
‘‘माल्या या पुस्तकाची दुसरी आवृत्ती काळली अन् तेई खपली त मले अटॅक यिऊ शकते काय?’’
डॉक्टर गालात हसले आणि म्हणाले, ‘‘आला तरी आम्ही कशासाठी आहोत?’’
संमेलनाच्या बातम्या वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यातून सविस्तर झळकल्या.

कोरोना काळात लोकांचं किरकोळ आजारांनी बाधित होण्याचं प्रमाण एकदम खालावलं होतं. जे आजारी पडत होते ते घरीच माहितीतल्या गोळ्या-औषधी घेत होते आणि दुरुस्त होत होते. फारच तातडीचं वाटलं तरच दवाखान्यात जात होते. शिवाय या कालावधीत इतर आजारांनी मरणारांचं प्रमाण पण नगण्य झालं होतं. त्यामुळे सर्वसामान्य जनतेत अशी धारणा झाली, की माणूस घरी मरत नाही. मेला तर दवाखान्यात मरतो. या पार्श्‍वभूमीवर कोरोनापश्‍चात लोकांनी एवढ्यातेवढ्या कारणांसाठी दवाखान्यात जाणं कमी करून टाकलं. याचा एकूण परिणाम म्हणून मोठे डॉक्टर वगळता छोट्या डॉक्टरांच्या दवाखान्यात चिटपाखरूही फिरकेनासं झालं आणि ते हवालदिल झाले.
दर्यापूर तालुक्यातल्या टोंगलाबाद इथं एक अनोळखी माणूस गेले दोन दिवस घरोघर फिरत होता. तो अजाबराव हागोनेच्या घरी गेला आणि दारावर टकटक करत त्यानं हाक मारली, ‘‘आहेत का घरी?’’
आतून अजाबरावचा म्हातारा बाप नागोराव बाहेर आला. माणसाला निरखत म्हणाला, ‘‘घरी कोनी नै. मी आहो फक्त. बाकीचे सगळे लग्नाले गेले, लोतळ्याले.’’
‘‘बरं बरं ठीक आहे.’’ असं म्हणत माणूस निघून गेला. त्यावर सलग दोन दिवस त्यानं अजाबरावच्या घरी खेपा टाकल्या तेव्हा नागोराव म्हातारा त्याला म्हणाला, ‘‘हे पाय बाबू, तू कै चकरा मारू नोको. काहून, की आमच्या घरी कोनाचं लगन गिगन नै.’’
‘‘म्हणजे?’’ माणसाचा चेहरा प्रश्‍नार्थक झाला.
‘‘तू बँड पार्टीवाला होयेस ना?’’ म्हातार्‍यानं विचारलं.
माणूस खूप खजील झाला. ‘‘नाही आजोबा. मी डॉक्टर आहे. डॉक्टर प्रवीण लताड. कुणी पेशंट आहेत का ते शोधण्यासाठी मी तुमच्या गावात फिरत आहे आणि मी दर्यापूरला राहतो.’’
त्यानं मग कोरोनामुळे आमच्यासारख्यांवर ही वेळ आल्याचं सांगितलं तेव्हा म्हातारा त्याला म्हणाला, ‘‘मंग तुमी येक काम करना. घुंगशी मुंगशीच्या बबन पटाईतले भेटना.’’
‘‘हो हो.’’ डॉक्टरनं मान डोलावली. ‘‘नाव ऐकलं आहे मी, आणि वाचलं पण आहे त्यांच्या कोरोनामुक्तांच्या संघटनेविषयी.’’
‘‘त त्याले सांगा हे.’’
दुसर्‍या दिवशी डॉक्टर लताड बबनला जाऊन भेटला. त्याची व्यथा ऐकून बबनच्या तोंडून निघालं, ‘‘याले म्हंतात गाळ्याबरोबर नाळ्याची जत्रा.’’
‘‘हो ना यार.’’
‘‘पन सांगा इचिन त! बिमारी म्हतली का डाक्तर लोकायची चांदी असते. पन या कोरोनानं तुमालेई झोळपा देला.’’
‘‘हो. आणि यात फक्त लहान डॉक्टर भरडले गेले.’’
‘‘खरं त गवरमेंडनं मोठ्या डाक्तरायले सरकं कर्‍याले पायजे.’’ बबननं रोष व्यक्त केला. ‘‘हे मोठे डाक्तर पेशंटजोळून दीळ दोनशे रुपये फी घेतात. रोजचे शंभर दोनशे पेशंट काळतात. अन् दाखोतात काय हे इनकम? अन् भरतात काय त्याचा टॅक्स?’’
‘‘हो, तेही आहेच.’’
‘‘ठीक आहे. त तुमी जॉइन व्हा आमच्या संघटनेत. तुमच्या लोकायची अल्लग ब्रँच करू. आमी कोरोनामुक्त म्हतल्या जऊ त कोरोनाच्यानं ज्या डॉक्टर लोकायवर असर झाला त्यायले कोरोनाग्रस्त म्हतल्या जैल. अन् आमी आमच्या जशा मागन्या केल्या तशा तुमच्याईसाठी काही मागन्या करू.’’
‘‘त्या कोणत्या?’’
‘‘कोरोनाग्रस्त डॉक्तरायसाठी पेशल भत्ता मांगू.’’

लगेच बबननं अशा डॉक्टरांना संघटनेत येण्याचं आवाहन केलं. त्यांच्यासाठी शासनाकडे मागणी केली. त्यात एक पुरवणी जोडली. शासन जर म्हणत असेल, की आमच्याकडे पैसा नाही, तर ज्या डॉक्टरांची वारेमाप प्रॅक्टिस चालते त्यांचे रोजचे व्यवहार ऑनलाइन करावेत आणि त्या उत्पन्नावर जो कर गोळा होईल त्यातून ही मागणी पूर्ण करावी.
हा हा म्हणता तीन महिने उलटले. कोरोनामुक्त संघटनेचा शासनाकडे पाठपुरावा सुरूच होता. दरम्यान अकोट तालुक्यातल्या सावरगाव इथं गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत एका मंडळानं कोरोनाचं साेंंग काढलं. ते ढोल, झांजा आणि पावा या वाद्यमेळ्याच्या तालावर नाचवलं. या कृतीचा कोरोनामुक्तांच्या संघटनेनं निषेध केला. अशी सोंगं काढण्यावर बंदीची मागणी केली. ही मागणी मात्र शासनानं मान्य केली. तसं परिपत्रक काढलं आणि यापुढे कुठल्याही मिरवणुकीत सोंगं काढताना संबंधितांनी जिल्हा प्रशासनाकडून पूर्वपरवानगी घेणं बंधनकारक राहील, त्यात भावना दुखावणार्‍या सोंगांना प्रशासनाने मान्यता देऊ नये अशी तरतूद करून टाकली.

बाकी मागण्यांवर शासन ढिम्म राहिलं. अशा बाबतीत कोणतंही शासन तसं बधत नसतं. काही इंगा दाखवला तरच काहीतरी पदरी पडू शकतं हे बबन जाणून होता. तो आता अशा संधीची वाट पाहू लागला. तशात हिवाळी अधिवेशन आलं आणि बबनच्या अंगात चैतन्य संचारलं. त्यानं मोर्चाची हाक दिली.
नागपुरात कोरोनामुक्तांचा जंगी मोर्चा निघाला. घोषणा देत मोर्चेकरी विधानभवनाकडे जात होते. बबन आदी पुढे होते. मोर्चा गोवारी पुलाजवळ येताच त्यांच्यातलं कुणीतरी धावतच बबनजवळ आलं. त्याच्या कानाशी लागत घाबर्‍याघुबर्‍या म्हणालं, ‘‘बबनभौ बबनभौ,’’
बबन चालता चालता म्हणाला, ‘‘काय?’’
‘‘कोरोनाचा जय कोरोना कर्‍याची वेळ आली आहे.’’
बबन चमकला. ‘‘म्हंजे?’’
‘‘येक ब्रेकिंग न्यूज आली आहे.’’
‘‘कायची?’’
माणसाच्या हातात मोबाईल होता. तो बबनपुढे धरत त्यानं म्हटलं, ‘‘वाचा हे.’’
बबननं नेटवर आलेली बातमी वाचली. ती होती- चीन, अमेरिकेसह पाच देशांत आता नव्या व्हायरसचे आगमन. प्राण्यांतून आलेला हा व्हायरस कोरोनापेक्षाही घातक असून तो जगभर पसरण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

– अशोक मानकर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.