Now Reading
घेई छंद!

घेई छंद!

Menaka Prakashan

शुक्रवारी संध्याकाळी विलास दमून भागून घरात शिरला. ऑफिसमधल्या कामाने त्याचा अगदी पिट्टा पडला होता. आता मस्त चहा, नाष्टा करावा, एखादी नवीन वेबसीरीज बघावी आणि सकाळी उशिरापर्यंत ताणून द्यावी, असं त्याला वाटत होतं. आज कधी नव्हे ते जरा लवकर घरी येता आलं होतं. उद्या-परवा सुट्टीच होती. जरा जुन्या मित्रांना भेटावं, गप्पा हाणाव्यात असा त्याचा मनातल्या मनात बेत चालला होता. त्याच विचारांत बॅग टी-पॉयवर ठेवून त्यानं सोफ्यावरचा पसारा एका बाजूला सरकवला आणि धप्पकन सोफ्यावर बसला. जितक्या जोरात बसला तितक्याच जोरात किंचाळला आणि उठून उभा राहिला. त्याची किंकाळी ऐकून त्याची बायको कल्पनाच नाही, तर आजूबाजूच्या फ्लॅटमधले शेजारीपाजारीही पळत आले.

‘‘काय ओ, काय झालं?’’, ‘‘काय झालं, यांना एवढं ओरडायला?’’ असं एकमेकांना विचारू लागले.
कल्पना, त्याची बायको पण प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत होती.
विलासनं स्वतःला सावरत हात मागे नेला आणि एक टोकदार टाचणी पँटमधून उपसून काढली. अतिशय संतापानं तो त्या टाचणीकडे पाहत होता.
‘‘अय्या! सापडली बाई ही एकदाची! केव्हाची शोधत होते मी!’’ कल्पनाने पुढे होत ती टाचणी अलगद त्याच्या हातातून काढून घेतली. शेजारच्या नीनाने आनंदाने टाळी वाजवली, तिचे डोळे पाणावले होते. कल्पनाची मैत्रीण सुरेखानं कल्पनाची पाठ थोपटली आणि म्हणाली, ‘‘बघ नीना, सापडली ना! उगीच दुपारपासून हळहळत होतीस. चांगल्या माणसांबरोबर नेहमी चांगलंच होतं.’’
विलास अवाक होऊन पाहतच राहिला.

‘‘मला टोचली ती टाचणी!’’ त्यानं चढ्या आवाजात निषेध नोंदवला.
‘‘अहो, एवढीशी ती टाचणी… टोचली टोचली काय करताय? माहितीये का? नीनाला वाटलं, त्या दुकानदारानं फसवलं की काय! पण त्यानं टाचण्या बरोबर मोजून दिल्या होत्या. ही एकच हरवलेली, बरं झालं बाई सापडली.’’ कल्पनानं त्याचा निषेध मोडीत काढला आणि सुरेखा आणि नीनासोबत ती आतल्या रूममध्येे गेली.
विलास अंदाज घेत सोफ्यावर टेकला. अजूनही त्याच्या टाचणी टोचलेल्या बुडाला हुळहुळत होतं.
‘कल्पना एवढी निर्दयी का? कशी? कधी झाली?’ त्यानं हताशपणे हात वर उडवले.
‘‘बाबाऽ’’ चिरंजीव निमेष, वय वर्षं दहा, हळूच जवळ सरकला.
विलासने प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे पाहिलं.
‘‘आई बदललीये.’’ स्थितप्रज्ञपणे त्यानं माहिती पुरवली.
‘‘कधी?’’ अनाहुतपणे विलासनं विचारलं.
कॉलनीतली प्रत्येक काकू, मावशी, आज्जीसुद्धा बदलली आहे.
‘‘म्हणजे?’’ आता विलास सावरून बसला.
‘‘आजकाल आपल्या कॉलनीत काय चाललंय, तुमच्या लक्षात आलं आहे का? घराघरात पॅराशूटच्या बाटलीपासून अननस बनवायची टूम आलीये.’’
‘‘का?’’
‘‘आता ‘का’ या प्रश्‍नाला उत्तर नाही. आधी कॉलनीतल्या सुरेखाकाकूच्या माहेरी कोणीतरी तो बनवला, तो सुरेखाकाकूनं पाहिला. आता त्याची संसर्गजन्य साथ कोरोनापेक्षा जोरात आपल्या कॉलनीत पसरलीये.’’
‘‘अरे देवा!’’

विलासचा कल्पनाच्या हस्तकलेला विरोध नव्हता, पण त्याचा त्रास त्याला व्हावा हे मात्र त्याला मान्य नव्हतं. पण कल्पना मात्र पतिव्रता होती, तिची कोणतीही गोष्ट विलासच्या सहभागाशिवाय पूर्णच व्हायची नाही.
रात्री जेवण वगैरे झाल्यावर त्यानं सिडने शेल्डनची परवाच ऑनलाईन मागवलेली नवी कोरी कादंबरी काढली. आता निवांत वाचत बसायचा त्याचा मूड होता. काही वेळानं मागचं सगळं आवरून कल्पना आली. तिच्या हातात तेलाची वाटी होती.
‘‘अहो, इथे बसा ना. डोक्याला छान तेलमालीश करुन देते तुमच्या!’’ तिनं एक खुर्ची पुढे सरकवली आणि मागे ती सज्ज होऊन उभी राहिली.
‘‘आज काय विशेष!’’ विलासनं कौतुकाने विचारलं आणि तो त्या खुर्चीत सैलावून बसला. कल्पनानं हळुवारपणे त्याला मालीश करायला सुरुवात केली.
‘‘विशेष काय असणार? तुम्ही रोज एवढे दमता. मला मेलीला तुमच्याकडे लक्ष पण द्यायला वेळ मिळत नाही. आज ठरवलंच होतं, मालीश करून द्यायची म्हणून!’’ छान मालीश झाल्यावर विलासला झोपच आली. कादंबरी वाचायचं टाळून तो झोपून गेला.
दुसर्‍या दिवशी पण कल्पनाने मालीश करून दिली आणि हा रोजचा शिरस्ताच झाला. बरं सुरुवातीला ह्यात जो हळुवार रोमँटिकपणा होता, तो जाऊन आता डोक्याला भसाभसा तेल चोपडण्यावर कार्यक्रम आला होता. विलासने तिला न दुखवता विरोध करायचा प्रयत्न करून पाहिला, पण व्यर्थ! डोक्याचं तेल आता शाम्पूने पण निघेना. विलासची पूर्वीची गोविंदासारखी हेअरस्टाईल आता अमोल पालेकरसारखी चप्पड दिसू लागली. ऑफिसमधले सहकारी त्याला हसत होते याचं वेगळंच दु:ख होतं.
निमेषची पण हीच अवस्था होती. शाळेत त्याला मित्र त्याला ‘चप्प्याऽ’ म्हटल्याशिवाय बोलत नव्हते.
‘‘हे सर्व काय चाललंय रे?’’ त्यानं अगतिकपणे निमेषला विचारलं.
निमेष येणार्‍याजाणार्‍या काकवांचं बोलणं ऐकायचा, त्यामुळे त्याच्याकडे माहितीचा खजिना खचाखच भरलेला असायचा.
‘‘बाबा, आईला तो अननस करायला पॅराशूट तेलाच्या दोन बाटल्या रिकाम्या करून हव्यात. म्हणून ही रोज मालीश सुरू आहे.’’
‘‘अरे देवा!’’ पुढचं काही ऐकायला विलास तिथे थांबलाच नाही.
***

पुढच्या शुक्रवारी रात्री कल्पनानं त्याला सांगितलं, ‘‘अहो, उद्या जरा मार्केटला जायचंय बरं का!’’
‘‘हं!’’ त्यानं न ऐकताच होकार दिला.
ती आनंदाने झोपी गेली. रात्री झोप अनावर झाल्यावर, पुस्तक हातातून पडायला लागल्यावर विलास पण झोपी गेला.
दुसर्‍या दिवशी कल्पनानं त्याला लवकरच उठवलं. डोळे चोळत त्यानं घड्याळ पाहिलं.
‘‘अजून सकाळ कुठे झालीये?’’ असं म्हणून तो परत झोपी गेला. तसं कल्पनानं त्याला गदागदा हलवलंच.
‘‘मार्केटमधे जायचंय हो.. कालच नाही का सांगितलं तुम्हाला!’’
‘‘कशाला?’’
‘‘आहे थोडं काम! सामान आणायचंय.’’ बळजबरीच तो उठला आणि तयार झाला. आताची अपुरी झोप दुपारी पूर्ण करायचं त्यानं ठरवलं. ते घरातून बाहेर पडताना चिरंजीव हसत होते. पण विलासनं तिकडे दुर्लक्ष केलं.
नेहमीच्या मार्केटकडे न जाता कल्पनानं आज त्याला दुसर्‍याच कुठल्या गल्लीबोळातून फिरवलं. मग एका चौकात ती उतरली. विलासला कार पार्क करायला सांगून, समोरचं एक दुकान दाखवलं आणि तिथे यायला सांगितलं. कार पार्क करायला विलास कितीतरी वेळ गोलगोल फिरत राहिला. कशीबशी त्याला पार्किंगला जागा मिळाली. कार लॉक करून तो कल्पनानं दाखवलेल्या दुकानात आला. त्या छोट्याश्या दुकानात बायकांची झुंबड उडाली होती. नक्की तिथे काय मिळतं, ते त्याला काही दिसलं नाही. कल्पना पण दिसेना. तो दुकानाबाहेर उभा राहिला, तर येणार्‍या-जाणार्‍या बायकांचे धक्के लागून, पायावर पाय पडून बेजार झाला. असं नेमकं काय घ्यायला आली असेल ही? काही वेळानं एक बाई त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. अस्ताव्यस्त केसांचं घरटं, एका हातात निरनिराळ्या रंगाच्या नायलॉनच्या वायर्स, दुसर्‍या हातात कसली कसली पाकिटं, कपडे चुरगळलेले! कुठलीतरी लढाई लढल्यासारखी तिची अवस्था होती. हसू दाबत त्यानं दुसरीकडे बघायला सुरुवात केली.

‘‘अहोऽ’’ परिचित आवाज आला, तसं त्यानं आजूबाजूला पाहिलं. कल्पना कुठे दिसेना, आवाज तर येतोय.
‘‘अहोऽ मी इथेय!’’ आत्ता त्याच्या लक्षात आलं की, समोर भोकाडीसारखी जी स्त्री उभी आहे, तीच त्याची प्रिय पत्नी आहे.
‘‘तू? ही अशी काय?’’
‘‘हे दुकान आहे ना, इथे हस्तकलेचं सगळ्ळं सामान मिळतं. त्यामुळेच तर बायकांची इतकी गर्दी असते. मला ज्या रंगाची वायर हवी होती ना, तीच बाकीच्या भवान्यांना पण हवी होती. ओढून ताणून मिळवलीये ही वायर!’’ कल्पनाचा चेहरा युद्ध जिंकल्यासारखा फुलून आला होता.
‘‘छान छान! आता जाऊ या ना घरी?’’ त्यानं घड्याळ बघत विचारलं.
तसा अर्धा दिवस उलटलाच होता, थोडी तरी झोप मिळाली असती.
‘‘छे छे.. अजून तर बरंच काम बाकीये.’’ कल्पनानं त्याच्या झोपेचं खोबरं केलं.
त्यानंतर ती सांगेल तिथे, म्हणेल तसा तो कार चालवत राहिला आणि कधीतरी घरी आला.
नंतर काय झालं, काय घडलं, ते आजही त्याला आठवत नाहीये.
***

दुसर्‍या दिवशी सकाळी त्याला जाग आली, तेव्हा घरात निबिड शांतता पसरली होती. अंदाज घेतच तो हॉलमधे आला. कल्पना तिथेच वायर, मणी, टिकल्या, बाटल्या आणि त्या दुष्ट टाचण्यांच्या ढिगात फतकल मारून बसली होती.
तो काही विचारणार इतक्यात स्वयंपाकघरातून चिरंजीव ट्रेमध्ये सरबताचे ग्लास घेऊन बाहेर आले. तो ट्रे त्यानं अदबीनं मातोश्रींसमोर धरला. पण कल्पनाची पापणी पण हलली नाही.
‘‘आई, घे थोडं सरबत घे. बरं वाटेल.’’ त्यानं एक ग्लास तिच्या हातात कोंबलाच. त्याच पडलेल्या चेहर्‍याने ती सरबत गिळू लागली. चिरंजीव ट्रे ठेवायला स्वयंपाकघरात गेले, तसा विलास पण त्याच्या मागे गेला.
‘‘काय झालंय रे?’’ त्यानं दबल्या स्वरात विचारलं.
उत्तरादाखल निमेषनं एक सुस्कारा सोडला.
‘‘सगळं मुसळ केरात!’’ तो हताशपणे उद्गारला.
विलासची नजर डस्टबीनकडे वळलेली पाहून त्याच्या कपाळावर आठी पडली.
‘‘बाबा, तुम्हाला म्हणी नव्हत्या का शाळेत? असो. तर आईने काल इतक्या कष्टाने आणलेली ती पिवळी वायर आहे ना, तो रंग हा नकोय. थोडा गडद हवाय, असं सुरेखाकाकूनं सकाळीच येऊन सांगितलंय. आई फार हिरमुसलीये.’’
‘‘असं झालं काय?’’ विचार करत विलास हॉलमध्ये आला.

‘‘कल्पू, अगं, रंगात थोडा फार फरक चालतो. फळांचे रंग कुठे एकसारखे असतात बरं?’’ त्यानं त्याच्या परीनं सावधपणे तिची समजूत घालायचा प्रयत्न केला. कारण आता परत त्या कुप्रसिद्ध दुकानात जाऊन आजचा दिवस वाया घालवायची त्याची अजिबात इच्छा नव्हती. पण परिणाम उलटाच झाला.
‘‘असं कसं? सगळ्यांच्या अननसाचे तुरे पिकलेले, गडद पिवळ्या रंगाचे आणि माझाच अर्धवट कच्चा हलक्या पिवळ्या रंगाचा नाही का दिसणार! ते काही नाही, गडद रंगाची वायर आणायलाच हवी.’’ डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसून ती आवरायला आत गेली. विलास जीव मुठीत घेऊन सोफ्यावर बसला. कल्पना आवरून बाहेर आली.
‘‘मी सुरेखाला बरोबर घेऊन जाते. तुम्ही काहीतरी बनवा आणि खाऊन घ्या.’’ एवढं सांगून ती तरातरा दाराबाहेर गेली. तसा विलासचा जीव मुठीतून परत शरीरात आला.
कॉलनीतल्या घराघरात अननस पिकत होते, म्हणजे बनत होते. शोकेसमध्ये अननसाचं भरघोस पीक आलं होतं. पॅराशूट तेलाला अचानक इतकी मागणी का येतेय, हे दुकानवाल्या भय्याला उमगत नव्हतं.
अननस बनवायच्या कामात विलासला पण महत्त्वाची भूमिका मिळाली होती, टाचणीनं त्या कापलेल्या वायरचे तुकडे, पॅराशूटच्या त्या जाड बाटलीला व्यवस्थित दुमडून लावण्याची! त्या जाड बाटलीत त्या टाचण्या घुसता घुसत नसत. आणि हे काम करताना टाचण्यांची डोकी बोटांत घुसून घुसून त्याची बोटं रक्तबंबाळ होत होती.
तशात एकादशीच्या घरी शिवरात्र आल्याप्रमाणे त्याची मेव्हणी पण अननस करायला त्याच्याच घरी येऊन राहिली होती. ‘साली आधी घरवाली’ असली तरी तिच्या ‘फेवर’साठी अजून दोन तेलाच्या बाटल्या डोक्यात मुरवून घ्यायची आणि अननसाला टाचण्या टोचायची विलासची अजिबात तयारी नव्हती. बायकोच्या या छंदापायी लवकरच आपल्याला संन्यास घ्यावा लागेल की काय, अशीही त्याला भीती वाटू लागली होती.
पण जशी अचानक ही साथ आली, तशी अचानक गेलीदेखील! अननस बनणं बंद झालं. घरात कुठेही पडलेले रंगीबेरंगी वायरचे तुकडे, पायाखाली येऊन अ‍ॅक्युपंचर करणारे मणी, बसताना कुठेही घुसणार्‍या टाचण्या, कपड्यावर चिकटून ऑफिसमध्ये ‘इज्जत का फालुदा’ करणार्‍या टिकल्या दिसेनाशा झाल्या. घर साफ राहू लागलं. बायका घरात लक्ष देऊ लागल्या. विलासची बोटं बरी झाली आणि त्यानंही एकदाचा सुटकेचा श्वास सोडला.
***

पुढचे काही दिवस बरे गेले.
एके दिवशी घरी आल्यावर त्याला टी-पॉयवर गोंडस, गुबगुबीत लोकरीचे गुंडे दिसले.
‘‘काय गं! काय विचार काय तुझा?’’ त्यानं मस्करीच्या सुरात कल्पनाला विचारलं.
‘‘नाही काही, नीनाची बहीण आम्हाला स्वेटर विणायला शिकवणार आहे.’’
‘‘काय्य?’’ तो अजाणता किंचाळलाच आणि त्या रेशमी, गुबगुबीत लोकरीच्या धाग्यातून सुटायची धडपड करू लागला.

– विनिता पिसाळ

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.