Now Reading
गोष्टी युगा युगांच्या

गोष्टी युगा युगांच्या

Menaka Prakashan

बारा-पंधरा मिनिटं चालल्यावर समोरच त्याला तळं दिसलं. त्या दिशेनं जात असताना झाडाआड त्याला काहीतरी चमकताना दिसलं. पाहिलं तर तिथे भलं मोठं चाक. आता ते कशाचं, म्हणून बघायला पुढे गेला तर चक्क चार चाकांसह संपूर्ण सोनेरी रथ उभा! आणि एक नव्हे तर तीन रथ उभे. आता, हे रथ कोणाचे? रामदासला प्रश्‍न पडला.

तसा रामदास काही फार श्रद्धाळू नव्हता. म्हणजे कुठल्याच बाबतीत म्हणा ना! वारा येईल तशी पाठ फिरवण्यात तो वाकबगार. पुन्हा त्याला वर्ज्य असं काहीच नव्हतं. त्यावरून तो राजकारणी असल्याचं तुमच्या लक्षात आलंच असेल. तर या कलियुगाच्या अर्काला जनतेची आणि पक्षश्रेष्ठींची नस पक्की ठाऊक होती. ती नस पकडूनच तो तुतारीच्या चिन्हावर आजवर लगातार निवडून येत होता. पण यंदा मात्र ते चित्र बदललं होतं. तुतारी पक्षात बरीच उलथापालथ झाली होती. पक्षश्रेष्ठींची प्रीती ढोलकी पक्षातील ‘क्रिपावंत’ या मोठ्या नावावर अचानक जडली होती. जे ढोलकीचा नाद सोडून तुतारी पकडायला पक्षात दाखल झाले होते. शेवटी काय हातात ढोलकी असो वा तुतारी, मनात जनसेवेची तळमळ असली म्हणजे पक्ष, चिन्ह या गोष्टी गौणच ठरतात… नाही का…? असं असलं तरी क्रिपावंतच्या पक्षांतरामुळे रामदास अस्वस्थ झाला होता. कारण या निवडणुकीत आपला पत्ता कट होऊन क्रिपावंतला तिकीट मिळणार याची पक्की खबर त्याला मिळाली होती.

या खबरीनं तो आत्मचिंतनास निघालाच होता की तेव्हढ्यात त्याला आत्मक्लेश व्हावा अशी घटना घडली… त्याच्या अनेक पैकी एका कृष्णकृत्याची चित्रफित हां हां म्हणता व्हायरल झाली. त्यात तो जनतेच्या पैशावर डल्ला मारायच्या गोष्टी कंत्राटदाराशी बोलत होता. ते कमी की काय म्हणून पाठोपाठ (दहा वर्षांपूर्वीचं) प्रकरण नव्यानं उकरून काढलं गेलं. मैदानाची आरक्षित जागा व्यावसायिकाला दिल्याचं प्रकरण. रामदासला काही कळायच्या आत, समाजमाध्यमांवर या गोष्टी वेगानं पसरू लागल्या. ही ‘कृपा’ क्रिपावंतची आहे हे रामदासच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. पुढची दिशा ठरवण्यासाठी त्यानं लगेच त्याच्या खास सूत्रांशी म्हणजे पंडित, लांजेकर आणि सावंत यांच्याशी चर्चा केली. या आपत्तीच्या बीमोडाची योजना लगोलग बनवली गेली. बाकीचे कामाला लागले आणि ठरल्यानुसार गुप्त होण्यासाठी, रामदास त्याच्या फार्म हाऊसला एकटाच निघून गेला.

चार दिवसांनंतर त्यानं आखलेली रणनीती यशस्वी होऊ पाहत आहे याची कुणकुण त्याला लागली. योजनेचा चमत्कार बघण्याची आता त्याला घाई लागली होती. म्हणून लगेच त्यानं गाडी हाकत परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. गर्द झाडीनं झाकलेल्या रस्त्यावरून त्याच्या गाडीनं वेग घेतला. ‘बातमीच्या’ उत्सुकतेपोटी मधूनच त्याची मोबाईल तपासणी चालूच होती. काळ थांबला की काय, असा विचार करत असतानाच त्याची गाडीच अचानक धक्के खात थांबली. बंद पडलेल्या गाडीला शिवी हासडत रामदासनं आधी मोबाईल उघडून रेंज तपासली. ती फुल दिसताच मोबाईल खिशात टाकत तो बाहेर पडला. त्यानं गाडीचं बॉनेट उघडलं तर इंजिनातून वाफा निघत होत्या. ‘आता इंजिन गार झाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, इथं कुठे पाणी मिळतंय का पाहू’ म्हणत रामदास गाडीतल्या बाटल्या घेऊन झाडीत शिरला. झाडीत शिरून झपझप पावलं टाकत निघाला. बारा-पंधरा मिनिटं चालल्यावर समोरच त्याला तळं दिसलं. त्या दिशेनं जात असताना झाडाआड त्याला काहीतरी चमकताना दिसलं. पाहिलं तर तिथे भलं मोठं चाक. आता ते कशाचं, म्हणून बघायला पुढे गेला तर चक्क चार चाकांसह संपूर्ण सोनेरी रथ उभा… आणि एक नव्हे तर तीन रथ उभे. ‘हे रथ इथे कसे?’ हा प्रश्न पडतापडताच उत्तराचा अंदाजही त्यानं लावला. नक्कीच इथे देवादिकांच्या एखाद्या मालिकेचं शूटिंग चाललं असणार. आजकाल त्यांचं भारी पेव फुटलंय.

तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला आणि लांजेकरनं अपेक्षित बातमी दिली, ‘‘दादा, आपला व्हीडिओ हिट झालाय. बिनघोर राहा…’’ या खुशीतच रामदास त्या रथांना ओलांडून पुढे गेला तर तळ्याच्या काठी दगडांवर त्याला देवादिकांच्या मालिकेत घालतात तसले कपडे घातलेले तीन पुरुष दिसले आणि बाजूला उभा असलेला आधुनिक कपड्यातला तो त्यांचा डायरेक्टर असावा असं त्याला वाटलं आणि आपला अंदाज खरा ठरला, याचा त्याला आनंद झाला. त्यांचं आपसात चाललेलं बोलणं रामदासच्या कानावर पडलं. टिपेला पोचलेले त्यांचे संवाद, रामदास दिसताच शांत झाले. त्यांनी त्याला खुणेनं बोलावून घेतलं.
तो येताच हात जोडत तिघांनी म्हटलं, ‘‘यावं… यावं. आमच्या विनंतीस मान देऊन आपण येण्याचे केलेत. आम्ही अति प्रसन्न जाहलो.’’
‘च्यायला… भूमिकेतून बाहेर निघतच नाहीयेत वाटतं.’ रामदास स्वतःशीच पुटपुटला.
‘‘आदरणीय मानवा, या ठिकाणी येऊन तू आम्हाला उपकृत केले आहेस… तू तुझा अल्प समय आम्हास अर्पिल्यास आम्ही कृतज्ञतेच्या पावसात न्हाऊ.’’ असं त्यातल्या उंच महापुरुषानं म्हटल्यावर तर रामदास गोंधळलाच.
त्याचा गोंधळ पाहून बाजूचा पुरुष म्हणाला, ‘‘भयाचं कारण नाही. तुला अभय आहे. आमच्यात एक कलह माजला आहे. त्याचं समाधान…’’
‘‘महाराजांनो थांबा! मालिकेच्या शूटिंगमध्ये तुमच्या भूमिकेत तुम्ही किती खोलवर शिरला आहात. अहाहा! असं प्रेम असावं कामावर! पण कृपया मला माफ करा. मी आधीच एका प्रॉब्लेममध्ये आहे. त्यात हे भयंकर डायलॉग बोलून मला पिडू नका प्लीज. माझ्याशी बोलायचं असेल तर नीट मराठीत बोला, नाहीतर मी निघालो.’’
‘‘थांब रामदास, आम्ही शूटिंगसाठी जमलो नाहीये.’’ आधुनिक पोशाखातला एक पुरुष बोलला.
‘‘काय म्हणालात? ‘रामदास’? माझं हे नाव तुम्हाला कसं माहिती? कोण आहात तुम्ही?’’
‘‘आम्ही चार युगं आहोत…’’
‘‘मस्करी नको… समजेल असं बोला.’’
तिघांना थोपवत आधुनिक पोशाखातला म्हणाला, ‘‘रामदास, चार युगांबद्दल तू ऐकलं आहेस ना… त्यातला मी कलियुग आहे. मी सर्वज्ञात आहे. विश्वास नसेल तर ऐक… क्रिपावंताने तुला धक्का देऊन विचारमग्न केलं आहे. त्यातून मार्ग काढत तू रणनीती आखलीस आणि रणांगणावर उतरायला परत निघालाच होतास की तुझी गाडी बंद पडली. पाण्याच्या शोधात तू इथे आला आहेस… बरोबर ना?’’
रामदासनं आश्चर्यानं विचारलं, ‘‘तू नक्की कलियुग ना?’’
‘‘हो, आणि हे सगळ्यात उंच आहेत ते सत्ययुग, हे त्रेतायुग आणि हे द्वापारयुग.’’
‘‘संपलेली युगं इथे?’’
‘‘आम्ही निषेध नोंदवायला आलो आहोत.’’
‘‘कशाचा?’’
‘‘कलियुगाचा. त्याच्या राज्यावर नाराज आहोत आम्ही. काय ही अवस्था पृथ्वीतलाची! सर्वत्र अराजकता…’’ सत्ययुग बोललं.
‘‘हो ना, सत्य आहे. पण हा ऐकत नाहीये. स्वतःची महती सांगत बसलाय.’’ त्रेतायुग म्हणालं.
‘‘रामदास, तू राजकारणी असल्याचं कलियुगाने सांगितलं. राजकारणी आणि जनता, राजा-रयत याप्रमाणेच युगं आणि मानवजात याचं अतूट नातं आहे. म्हणून या वादात मानवाचा कौल महत्त्वाचा. यासाठीच ठरवलं की तळ्याकाठी जो मनुष्य येईल त्यानेच श्रेष्ठत्वाच्या वादाचा फैसला करावा. तेव्हा या कामी आम्ही तुझी निवड केली आहे.’’ द्वापारयुग म्हणालं.
‘‘मला जायची घाई आहे हो… शिवाय तुम्हा युगांबद्दल मला फारशी माहितीही नाहीये. तेव्हा मी कसा फैसला करू?’’
‘‘आम्ही सांगतो ना तुला. आमच्या युगातल्या एकेक कथा ऐक. त्यावरून तो काळ मानवाच्या जगण्यासाठी कसा होता ते समजेल. मग तर झालं?’’
रामदासला मान हलवण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. तरी त्याच्या मनात संशय होताच. आपल्याला बुद्दू बनवून कोणी मुद्दाम याचं चित्रीकरण तर करत नाहीये ना… त्यानं हळूच आजूबाजूला पाहिलं.

रामदासची अवस्था बघून सत्ययुग हसून म्हणालं, ‘‘रामदास, साक्षात आम्ही समोर असताना तुझ्या मनात हा अविश्वास? त्यात तुझा दोष नाही, छळ-कपटाने भरलेल्या कलियुगाची देणगी आहे ही. पण माझं राज्य असं नव्हतं. शब्दांनाही किंमत असलेल्या माझ्या राज्यात स्वप्नात दिलेला शब्दही पाळला जायचा. आमच्या युगातली कथा म्हटली की हरिश्चंद्रच डोळ्यासमोर येतो. तर तपस्वी, पवित्र, सत्यवादी आणि दानी असणार्‍या या राजाची एकदा ब्रह्मदेव आणि विश्वामित्रांनी परीक्षा घ्यायची ठरवली.’’
‘‘थांबा… थांबा… माहिती आहे ती कथा. ऐकत आलोय लहानपणापासून… पण काय हो, आत्ताच त्या राजाच्या गुणांची एवढी मोठी वाजंत्री तुम्ही वाजवलीत, मग त्या गुणी मानवाची परीक्षा घ्यायचा गाढवपणा करायचा कशाला? याचा अर्थ अविश्वास हा तुमच्याही मनात होताच म्हणायचा की… कलियुगातल्या माणसांसारखा!’’
यावर गालातल्या गालात हसणार्‍या कलियुगाकडे पाहत सत्ययुग म्हणालं, ‘‘ते सत्ययुग होतं. म्हणून स्वप्नात मागितलेलं राज्य हरिश्चंद्रानी विश्वामित्रांना देऊन टाकलं. सत्ययुगाची तुलना आजच्या जगाशी करू नकोस.’’
‘‘मोठं आलंय सत्ययुग! मला सांगा, तुमच्या काळात राज्य कोणासाठी होतं हो? हरिश्चंद्रासाठी की विश्वामित्रासाठी?’’
‘‘हा काय प्रश्न झाला का? कलियुगातला असल्यानं तुला राज्य राजकारण्यांसाठीच असतं असं वाटत असेल. पण नीट ऐक, राज्य हे नेहमी जनतेसाठीच असतं. ते चालवणारा शासक हा केवळ सेवक असतो जनतेचा…. शोषक कदापि नसतो.’’
‘‘हो ना? मग तुमच्या काळात जनतेच्या भावनांचा घोर अनादर केलात तुम्ही… विश्वासघातच म्हणा ना. अहो राजा हरिश्चंद्रानं त्याचे गुण दाखवत विश्वामित्राला राज्य देऊन टाकलं. पण असा तो जनतेवर लादूच कसा शकतो विश्वामित्राला? जनमत चाचणीशिवाय हा सत्ताबदल का होऊ दिला गेला? कलियुगा, आपल्या राज्यात हे घडलं असतं तर केवढा गदारोळ माजला असता नै…. विश्वामित्राला खाली ओढून सत्ता काबीज करण्यास बंडखोरांचं पेव फुटलं असतं. एकेकाला सांभाळता सांभाळता नाकीनऊ आले असते.’’

‘‘हो ना रामदासा, पण जरा वेळ हा मुद्दा बाजूला सारला तरी ते ‘तपस्वी विश्वामित्र’ राज्य घेतात आणि पुन्हा दक्षिणा मागतात?’’
‘‘ढोंगीपणा नुसता. एकीकडे दाढी, जटा वाढवत मायेपासून दूर म्हणून जंगलात घोर तपश्चर्या करत हिंडायचं आणि दुसरीकडे… राज्यासोबत त्याची तिजोरी, महत्त्वाची खाती आणि महामंडळं मिळाली असताना वर दक्षिणेची अपेक्षा? दुटप्पीपणाचा कळसच हा…’’ रामदास म्हणाला.
‘‘हूं… मला हे लोक बोल लावायला आले आहेत. पण माझ्या युगातील माणसं हावरट, लोभी, अप्पलपोटी असली तरी त्या भावनेशी प्रामाणिक तरी आहेत. त्यांचं दर्शन घडविताना त्यांना किंचितही लज्जेचा स्पर्श होत नाही…’’ कलियुगानं सांगितलं.
‘‘सत्ययुगातलंच त्याच तपस्व्यांचं मेनका प्रकरण विसरून कसं चालेल…’’
‘‘रामदास…. विश्वामित्रांबद्दल एक अपशब्द बोलशील तर बघ…’’
‘‘सत्ययुगा, अशी मुस्कटदाबी इथे चालायची नाही. आम्ही कलियुगातली माणसं कुठेही, कधीही, कोणाहीबद्दल काहीही बोलू शकतो. तुम्हाला माहीत नसेल पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात याला. ते आम्हाला कलियुगानं दिलं आहे.’’
‘‘कलियुगा, कठीण आहे. अरे, या अभिव्यक्ती स्वातंत्र्यापायी लहान-महान कोणाची किंमतच ठेवली नाहीत तुम्ही…’’
‘‘तुम्ही मोठी ठेवलीत! दिलेल्या शब्दाची किंमत म्हणून बायको, मुलासह राजाला बाजारात विकायला बसवलं. गुलामीच्या प्रथेला प्रोत्साहन दिलंत. पुढे राजा-राणीची ताटातूट, पुत्र रोहिदासचा अपमृत्यू, कहर म्हणजे स्वतःच्या मुलाचं प्रेत जाळण्यासाठी राजाने राणीकडे धनाची मागणी करणं. अरे, एखाद्याचा अंत तरी किती बघायचा…’’ कलियुगाने आपली बाजू मांडली.

राजकारणातले वादविवाद आणि चिखलफेकीची सवय असलेल्या रामदासानं चेव चढल्यागत कलियुगाला साथ देत सुरू केलं, ‘‘सत्ययुगा, आता असे अमानवीय प्रकार अजिबात चालायचे नाहीत. संबंध असो वा नसो, लोक पेटून उठतील आणि अत्याचाराविरोधात मोठमोठे जनमोर्चे काढतील. त्यातून आपल्या उपस्थितीचे शक्य तेवढे पैसे उकळतील आणि उभरते राजकारणी त्यात हात धुवून मोठे व्हायला बघतील. अरे, स्वप्नात दिलेल्या त्या एका शब्दाखातर बिचार्‍याचं आयुष्यच नासवलं की तुम्ही! किती ही असंवेदनशीलता! आजच्या काळात ही घटना घडली असती तर कितीतरी दिवस मीडिया कव्हरेज मिळून बदनामी झाली असती तुमची. तोंड दाखवायला जागा राहिली नसती. एवढंच काय, पण या कृत्यावर विरोधी पक्ष आणि सरकार यांनी एकजुटीने मिळून बाकं वाजवत ‘शेम… शेम…’ केलं असतं.’’
‘‘अज्ञानी माणसा, माझं युग हे सत्यवचनी, वैराग्यसंपन्न आणि ज्ञानी माणसांचं होतं. त्याची महत्ता कलियुगातील मूढ मानवाला काय कळणार म्हणा!’’
सत्ययुगाच्या संतापाला झेलत कलियुगानं त्याला टोलवत म्हटलं, ‘‘सत्ययुगा, मी म्हणतो असल्या गुणांची गरजच काय आहे मानवाला? मुळात सत्य-असत्य या कल्पनाच आहेत. काळानुरूप त्या बदलत जातात म्हणून ते ठरविण्याचा शहाजोगपणा कोणी का करावा? वैराग्याचं बोलायचं झालं तर चांगलं रसरशीत जीवन दिलंय मानवाला, त्याचा उपभोग घ्यायचा सोडून उगा त्यावर मिथ्थ्या शिक्का मारून वैराग्य घेणं, हेच खरं पाप आहे. आणि ज्ञानी म्हणाल तर मिळालेलं जीवन चांगल्याप्रकारे जगण्याचं ज्ञान हेच उत्तम ज्ञान. ते दिलंय मी माझ्या युगातल्या मानवांना!’’
‘‘खरं आहे. त्या सत्ययुगात काहीच अर्थ नव्हता, माणसांना जगण्यासाठी पराकोटीचं अवघड युग होतं ते.’’
रामदासनं मांडलेल्या निष्कर्षावर सत्ययुग संतापून म्हणालं, ‘‘अधम, अज्ञानी, मूढमती मानवा, तुझ्यावर अज्ञानाचा पडदा पडलाय. सत्ययुगातल्या कोणत्याच गोष्टीचं महत्त्व कळण्याची तुझी योग्यताच नाही.’’
‘‘पाहा, ‘अधम’, ‘अज्ञानी’, ‘मूढमती’ या यांच्या शिव्या सुरू झाल्यात… म्हणजे सगळे पॉइंट्स संपले तर! यांच्याशी बोलण्यात अर्थ नाही. चला पुढे जाऊया.’’ साईड बिझनेसप्रमाणे रोज दोन-चार चॅनलवर जाऊन शत्रुपक्षाशी वाद घालण्यात मुरलेला रामदास म्हणाला.
तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. फोनवर लांजेकरचं नाव झळकलं. ‘‘बोल लांजेकर, काय खबर?’’
‘‘दादा, माफीच्या व्हीडिओचा दबदबा झालाय. पार्टीनं स्वतःहून संपर्क साधलाय. वाटाघाटी चालू आहेत. गोड बातमी आली की कळवतो.’’
‘ठीक आहे’ म्हणत रामदासनं खुशीत मान डोलावली.

घसा खाकरत स्थूल देही त्रेतायुगाने विचारांत गुंतलेल्या रामदासचं लक्ष वेधून घेतलं आणि आनंदी चेहर्‍यानं ते सांगू लागलं, ‘‘आमचा काळ वेगळा होता. यज्ञ-याग, पुण्य-संचय यांना महत्त्व होतं. सुराज्याची फार काळजी आम्ही घेत असू.’’
कलियुगानं न राहवून हटकलं, ‘‘त्रेतायुग, तुमची कथा सुरू करा. प्रस्तावनेत असा वेळ दवडू नका. माझ्या युगात वेळेला फार महत्त्व आहे.’’
‘‘माहितीये. सांगतोच आहे. तर ऐक, धर्मपरायण व दानशूर बळी राजाची कथा. आमच्या तेव्हाच्या प्रथेप्रमाणे तो राजा मोठेमोठे यज्ञ व दानकार्य नेमाने करत होता. सत्कृत्यात वाढ करत पुण्यसंचय करण्याचा त्यानं सपाटाच लावला होता. त्या सपाट्यानं देव भयभीत झाले.’’
‘‘माहिती आहे हीही कथा. इंद्राचं आसन डळमळू लागलं म्हणून त्या बिचार्‍या सत्कर्म करणार्‍या बळीला सगळ्या देवांनी एकत्र येत पाताळात लोटून दिलं. वामन अवतार घेऊन शुद्ध फसवणूक केलीत त्या दानी राजाची.’’
‘‘त्रेतायुगा, रामदास म्हणतो त्यात काही चूक नाही. तुम्ही माझ्या वागण्यावर बोट ठेवता, पण तुमचं हे वर्तन शोभनीय आहे का?’’ कलियुगानं जाब विचारला.
रामदास मधे पडत म्हणाला, ‘‘तो बळीराजा त्रेतायुगातला असल्याने या कपटी लोकांवर त्याने विश्वास ठेवला. तो जर कलियुगातला असता तर उभंही केलं नसतं यांना!’’
‘‘नाही तर काय! माझ्या युगाला संशयी म्हणून हिणवतात ही मंडळी. खरं तर तो तुम्हीच पेरला आहे. तुमच्यासारख्यांमुळेच शहाणे होत लोक आज दानातही सावधानता बाळगतात. दोन रुपयांची देणगी दिली तरी पावती मागून घेतात आणि केलेल्या दोन रुपयांच्या दानाबद्दल दोन हजार लोकांना सांगत सुटतात. तर काही लोक इन्कम टॅक्समध्ये सूट मिळण्याची खात्री झाल्याशिवाय मोठी देणगी देतच नाहीत.’’ कलियुग म्हणालं.

‘‘आमच्या युगातील दाखल्यांचा विपरीत अर्थ काढून या युगाची भलामण करू नका. बळीराजाचं गर्वहरण करणं भाग होतं. आमच्या काळानुसार, कोणत्याही गोष्टीचा अति-अहंकार अयोग्यच. त्याचीच शिकवण आम्हाला द्यायची होती.’’ त्रेतायुगाने स्पष्टीकरण दिलं.
‘‘अयोग्य काय त्यात? त्यापेक्षा बळीराजाच्या चांगल्या गुणांचं मार्केटिंग करून त्याला ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर करायचं होतं. त्याच्या दानशूरपणाचा प्रसार तरी जनसामान्यात झाला असता. मी पाहिलं आहे, इंद्राचं सतत डळमळणारं आसन वाचवण्याच्या नादात एखाद्या पुण्यवानाला संपवायचं, हाच तुमचा अजेंडा असायचा. त्यापेक्षा आमच्याकडच्या निवडणुकांची पद्धत चांगली म्हणायची. दर पाच वर्षांनी जनताच चांगल्या-वाईटाचा फैसला करत एखाद्याला इंद्रपदावर बसवते. तुमच्या युगासारखा एकच इंद्र बुडाला फेव्हिकॉल लावून चिकटून नाही बसत खुर्चीवर!’’ रामदासने सुनावलं.
‘‘दुरात्म्या, मोठे दाखले देत बसला आहेस की कलियुगाचे! तोंडाला लगाम दे पाखंडी, बुद्धिहीना…’’
‘‘नाही आवडलं का? बरं राहिलं. शांत व्हा पाहू. उगा बी.पी. वाढवून घेऊ नका. तुम्हाला काही झालं तर आमच्या कलियुगावर ठपका यायचा. विश्रांती घ्या, तोवर द्वापार युगाचं म्हणणं ऐकू.’’
द्वापाराकडे वळून हात जोडत असतानाच रामदासच्या फोनची रिंग वाजली. फोन उचलताच सफाईदार इंग्रजी त्याच्या कानावर पडलं. त्यानं तो जरा बावचळून गेला पण दुसर्‍याच क्षणी ‘येस, रामदास स्पिकिंग. यू आर फ्रॉम अमेरिका? फ्रॉम द फेमस शो ‘बिग लॉस’??’’ रामदासला पलीकडून ऐकू येणार्‍या प्रत्येक वाक्यागणिक आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. त्याचे स्वप्नाळू डोळे आणि मन तिथं नव्हतंच. परंतु द्वापाराला आपलं म्हणणं मांडायची घाई झाली असल्यानं त्यांनी रामदासला हाक मारून तंद्रीतून जागं केलं.

‘‘रामदासा, आमच्या काळात इतक्या रोचक आणि रंजक कहाण्या घडल्यात की त्यातली कुठली सांगावी…’’
‘‘प्रस्तावना पुरे. कथेला सुरुवात करा.’’ सत्ययुगानं दटावलं.
‘‘तर ऐक, कुरुवंशीय राजा शंतनूची ही कथा. तर पूर्वाश्रमीचा हा स्वर्गप्राप्ती झालेला महाभिषक, राजा इंद्राचा शाप मिळाल्यानं…’’
‘‘मागचे-पुढचे जन्म उकरत बसू नका… मुद्द्याचं बोला.’’ त्रेतायुग कंटाळून म्हणालं.
‘‘त्रेताजी, बोलायला तरी कशाला देता त्यांना? मला माहीत आहे सगळी गोष्ट. प्रेमात पडलेल्या शंतनूची. त्याची प्रेमिका गंगा, त्याला धमकीवजा अट घालते ‘मी कशीही वागले तरी जाब विचारायचा नाही, नाहीतर मी सोडून निघून जाईन.’ आणि नंतर ती अट मान्य झाल्यावरच लग्नाला तयार होते. तीच ना ती कथा?’’
‘‘हो तीच.’’
त्या कथेतला ‘जाब विचारायचा नाही’ हा अटीतला पहिला भाग ठीक आहे. तो आमच्या युगातला अलिखित नियमच आहे. पण अटीतील दुसर्‍या भागातली लग्नाच्या आधीच सोडून द्यायची भाषा केल्यावरच शंतनूला नीट सगळं समजलं पाहिजे होतं. आज ना उद्या ती युती तोडणारच. त्यानुसार लग्नानंतर युती तोडून निघून गेलीच की गंगा! नंतर डायरेक्ट अठरा वर्षांनी ‘देवव्रत’ नावाचा त्यांचा पुत्र शंतनूच्या हवाली करून पुन्हा निघून गेली…
रामदास पुढे काही बोलणार तेवढ्यात त्याच्या खिशातील मोबाईलनं मेसेजची वर्दी दिली. मेसेज पाहून रामदास द्वापारयुगाला म्हणाला, ‘‘जे सांगायचं आहे ते लवकर सांगा. आता मी जास्त वेळ थांबू शकत नाही.’’

‘‘तुला तर सगळं माहीतच आहे ना? पण मला देवव्रतनं केलेला त्याग सांगायचा होता. त्या अठरा वर्षांच्या पुत्राने वडिलांचे सत्यवती या तरुणीवरील प्रेम लक्षात घेऊन त्यांचा तिच्याशी पुनर्विवाह लावून दिला. तिच्या अटीखातर त्या थोर पुत्राने ‘राजगादीचा कधीही स्वीकार न करण्याची आणि आजीवन ब्रह्मचर्य पालन करण्याची’ भीष्म प्रतिज्ञा घेतली. असा त्याग कलियुगातील मुलं करतील का सांग?’’
रामदासच्या चेहर्‍यावर आठ्यांचं जाळं दिसताच कलियुगानं त्याला छेडत विचारले, ‘‘रामदासा, खरं सांग. हे तुला पटतंय का? म्हणजे तरुण मुलाऐवजी बापाने तरुणीच्या प्रेमात पडणं… पुनःपुन्हा लग्न, पुनःपुन्हा अटी मान्य करणे… वगैरे.’’
‘‘हे त्यांच्या युगातले म्हातारचाळे… त्या म्हातारचाळ्यांना उत्तेजन देण्यासारखं मुलाचं त्याग प्रकरण… द्वापारयुगा, काहीही म्हणा पण कलियुगात आई-बाप पोरांवर असला अन्याय करायचे नाहीत… म्हणजे खमके पोरंच तो होऊ द्यायचे नाहीत… पण तुमच्या काळातल्या बापाने पोराच्या आयुष्याची पुरी वाट लावून टाकली. आणि तो देवव्रत खुळाच. काय मिळवलं त्यानं? म्हातार्‍या बापाचं लग्न जुळवण्याच्या नादात प्रतिज्ञा घेऊन बसला आणि त्यापायी आयुष्यभर भरडला गेला. पुढे पार्टी बदलाचा चान्स असून एकनिष्ठतेचा आव आणत मनाविरुद्ध सडत बसला कौरव पक्षात! आम्ही कसं मनाविरुद्ध काही झालं की तत्काळ पक्ष बदलतो… तेही बदनामीला न घाबरता निधड्या छातीनं… उगा दुबळेपणा करायचा आणि निष्ठावान म्हणून स्वतःच्या कमकुवतपणाचं उदात्तीकरण करत मोठेपण घ्यायचं, हा असला तुमच्या युगातला भंपकपणा कलियुगात दिसायचा नाही. काहीही सांगून गप्प बसवाल का राव!’’

‘‘पहिल्या दोन युगांच्या तू केलेल्या मानहानीनंतर मी तुला कथा का सांगत बसलो तेच मला कळत नाहीये. तुझ्यासारख्या कलियुगातील मूढमती मानवाशी संवाद म्हणजे दगडावर डोकं आपटून घेणं.’’ द्वापारयुगाने त्राग्याने म्हटलं.
‘‘ठीक आहे. पटलंय ना तुम्हाला, मग मी निघू का? आता मला जायलाच पाहिजे. तुम्हा रिटायर्ड लोकांना वेळच वेळ असला तरी माझ्याकडे फुकट घालवायला तो नाहीये.’’
‘‘वा वा! असं कसं जाऊ देऊ आम्ही तुला? कलियुगाच्या संगतीने तू आम्हा तिघानांही नावं ठेवत मोडीत काढलंस. आमचं राहू दे. पण तुझं कलियुग कसं श्रेष्ठ ते तर सांग…’’
‘‘त्यात काय सांगायचं आहे? माझंच उदाहरण घेऊ. तुम्ही तर सर्व जाणताच. म्हणजे तुतारी पक्षात क्रिपावंताचा प्रवेश. माझं तिकीट कापलं जाणं. वगैरे…’’
‘‘हो, मग. पुढे काय? तू तर मजेत दिसतो आहेस. पक्षातील लोकांनी, तुझ्या विरोधात केलेल्या कारवायांचा तुझ्यावर काहीच परिणाम झालेला दिसत नाहीये.’’ सत्ययुग म्हणालं.
न राहवून कलियुग म्हणालं, ‘‘तीच तर गंमत आहे. परिस्थितीला शरण जात कुढत आणि रडत बसून त्याच्या करुण कथा युगानुयुगे सांगत बसणं माझ्या कलियुगातील मानवाला मान्य नाही.’’
त्याच्या अभिमान दाटलेल्या चेहर्‍याकडे पाहून रामदासने पुस्ती जोडली, ‘‘बरोबर, उलट या पनौतीला मी मोठी संधी समजलो.’’
‘‘पक्षातून डावललं जाणं या अपमानात कुठली आलीये संधी?’’
‘‘यामुळेच तर मी खडबडून जागा झालो आणि दुहेरी चाल खेळली. अर्थात हे कलियुगानं आम्हा मानवांना दिलेल्या तंत्रज्ञानामुळे शक्य झालं. म्हणूनही मानवासाठी हे युग सगळ्यात ग्रेट आहे. आता तुम्हाला माहीत आहे की माझ्या वाईट कारनाम्याचा व्हीडिओ क्रिपावंत आणि स्वपक्षीय मंडळींनी लोकांत पसरवला होता. त्याची व्हायला पाहिजे तेवढी चर्चा झाली. पण मी त्यांची बदनामी करण्याऐवजी चक्क हात जोडून प्रामाणिक निवेदनासह जनतेची माफी मागणारा व्हीडिओ काढला. त्यात हे कृत्य माझ्या हातून कसं घडलं याचं आश्चर्य दाखवून ‘पक्षानं काढून टाकलं तरी जनसेवेचं व्रत मरेपर्यंत सुरूच ठेवेन’ असं डोळ्यांतून अश्रू काढत म्हटलं.
‘‘..आणि ‘जनसेवेची कळवळ असलेला खरा पारदर्शी नेता! एकदा पहाच त्याची विनम्रता या व्हीडिओत’ या मथळ्याखाली तो व्हीडिओ तू लोटून दिला समाज माध्यमाच्या महासागरात… हो ना?’’ कलियुगाने रामदासचं म्हणणं पूर्ण करत विचारलं.

‘‘येस बॉस… बदनामीमुळे नाव तर झालंच होतं. त्यामुळे लोकांनी भराभर व्हीडिओ पहिला व इकडे-तिकडे पाठवून दिला. लोक किती निर्मळ दृष्टीचे असतात. माझ्या कबुलीला ‘प्रांजळ’, ‘पारदर्शी व्यवहार’ अशी पावतीही त्यांनी दिली. माझ्या अश्रूंनी त्यांच्या हृदयाला हात घातला. वातावरण तयार होताच माझ्या लोकांनी समाजमाध्यमांवर सपोर्ट ग्रुप तयार केला. त्यात लोकांवर परिणाम व्हावा म्हणून आम्हीच नावानिशी कमेंट्ससह डमी लोक भरले. ते पाहून त्यात सामील व्हायला लोकांची गडबडच उडाली. शेवटी काय, आभासावर हे जग चालतं. अगदी बसल्या जागी स्क्रीनला स्पर्श करकरून काही तासांतच माझी ताकद जगाला दिसली. त्यासाठी तुमच्या युगातील मानवाप्रमाणे न मला पराक्रमी असण्याची गरज भासली न हातात भाले-तलवारी घेऊन रक्तपाताची गरज पडली. आता सांगा, काहीच न करता वार्‍याच्या वेगाने लोकांपर्यंत पोचण्याची सोय कोणत्या तरी युगात होती का? तंत्रज्ञान हे सगळ्यात मोठं वरदान आहे या युगाचं. त्याच्या या कृपेनेच मी कुठल्याकुठे पोचलोय.’’
‘‘कुठल्या कुठे म्हणजे?’’ गोंधळलेल्या सत्ययुगाने विचारलं.
‘‘म्हटलं ना, आम्हा मानवांसाठी बसल्या जागीच कुठल्या कुठे पोचायची सोय केलीय आमच्या या लाडक्या कलियुगाने. म्हणजे माझा सपोर्ट ग्रुप वाढतोय म्हटल्यावर सगळेच पक्ष हबकले. क्रिपावंतने सोडलेल्या ढोलकीवाल्या पक्षाने माझ्या माणसांशी संपर्क साधला. तीर निशाण्यावर लागला होता. पण तरी सुरवातीला दोनदा स्पष्ट नकार देऊन मी स्वतःची किंमत वाढवून घेतली. मग काय हात जोडत मंत्रिपद द्यायला ते तत्काळ राजी झाले, जे माझ्या पक्षाने कधीही दिलं नसतं. पण गंमत म्हणजे ह्याची कुणकुण आमच्या पक्षाला लागली आणि ते भानावर आले. चक्क महत्त्वाच्या मंत्रिपदाच्या लालूचासह पायघड्या घातल्यात माझ्यासाठी तुतारी पक्षाने. पण खरी गोची केली ती अनपेक्षितपणे आलेल्या तिसर्‍या पर्यायाने…’’
‘‘धन्य आहे कलियुग! बदनामीच्या नाचक्कीतून आणखी एक पर्याय?’’ त्रेतायुगाने उत्सुकतेने विचारलं.
‘‘हो, खरं आहे. बदनामीतूनच ही ऑफर आली आहे. झालं असं, की माझ्या भानगडीचा क्रिपावंतानं लोकांत सोडलेल्या व्हीडिओनं दोन दिवसांतच ‘बॅड पब्लिसिटी’चा उच्चांक गाठला, आणि तीच माझी योग्यता ठरली, अमेरिकेतल्या सुप्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शोमध्ये निवड होण्याची! ज्यात व्यक्तीनं कुप्रसिद्ध असणं गरजेचं असतं. त्यात प्रवेश म्हणजे डॉलर्समध्ये प्रचंड कमाई आणि विश्वस्तरावर प्रसिद्धी. तुम्ही आमच्या कलियुगाबद्दल तक्रार घेऊन आला आहात, पण मला सांगा, हे तुमच्या कोणाच्याही युगात शक्य झालं होतं का?’’
यावर सत्य, त्रेता आणि द्वापार युगं ‘आ’वासून पाहताच राहिलं.

‘‘तुम्ही या धक्क्यातून सावरेपर्यंत इथे थांबण्यासाठी वेळ नाहीये. निघतो मी. पण कलियुगाच्या कारभाराची काळजी करू नका. तुम्हा सगळ्या युगांपेक्षा आम्ही माणसं याच युगात जास्त सुखात आहोत. दुसर्‍याला नावं ठेवण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. कारण काय आहे, की माणूस हा शेवटी माणूस आहे. त्याच्या हातून चुका होणारच. चुका झाल्या म्हणून त्यांना आयुष्यभरासाठी अद्दल घडवायचे उद्योग केलेत तुम्ही. म्हणूनच मग माणसाला माणूस समजून चांगल्या-वाइटाचा भेदच न ठेवणारे, दोघांनाही सारखीच प्रतिष्ठा व संधी देणारे कलियुग तुम्हा सर्वांमध्ये श्रेष्ठच! नाही का?’’
रामदास तरातरा निघून जाऊ लागला. त्याच्या सोबत दोन पावलं पुढे जात कलियुग अभिमानाने अनिमिष नेत्रानं तो गेला त्या दिशेने पाहत राहिला. आणि इकडे सत्य, त्रेता आणि द्वापारयुगाची धांदल उडाली. कारण कलियुगाची नजर वळायच्या आत त्या तिघांनाही झाडाआड पार्क केलेले रथ गाठायचे होते!

– दीपा मंडलिक

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.