Now Reading
गृहकृत्यदक्ष पुरुषाचे प्रयोग

गृहकृत्यदक्ष पुरुषाचे प्रयोग

Menaka Prakashan

अखंड निरीक्षणातून घरकाम कसं केलं पाहिजे याचा संपूर्ण आराखडा माझ्या मेंदूत तयार झाला. कॉलेज संपेपर्यंत त्या आराखड्याची ब्लूप्रिंट मनात तयार होती. लग्नानंतर मी ताराला त्यातल्या काही टिप्स दिल्या. म्हणजे गॅसवर भाजी ढवळत भांडी कशी घासावी यापासून कणीक मळताना एका हातानं चहा कसा करता येतो इथपर्यंत तिला सांगायचो.

घर सांभाळणं हे एक वायफळ काम आहे अशी माझी लहानपणीच खात्री झालीय. आई-बाबा घराची जबाबदारी माझ्या एकट्यावर कधी सोडून गेले नसले तरी वेळ आल्यास समर्थपणे घर सांभाळू शकतो इतका माझ्यात आत्मविश्वास होता. आईला एखादं काम करताना पाहिलं की ही गोष्ट किती सोप्पी आहे आणि उगाच त्याचा बाऊ केला जातो याची जाणीव व्हायची. मी असं बघितलेलं आईला आवडायचं नाही. ‘काय मेल्या कावळ्यासारखा माझ्या कामावर तुझा डोळा? आधी तुझी आजी बघायची, आता तू बघ’ असं म्हणून मला हाकलून लावी. पण मी मडक्यात खडे टाकणार्याी कावळ्याच्या चिकाटीनं तिला बघत राहायचो.

अखंड निरीक्षणातून घरकाम कसं केलं पाहिजे याचा संपूर्ण आराखडा माझ्या मेंदूत तयार झाला. कॉलेज संपेपर्यंत त्या आराखड्याची ब्लूप्रिंट मनात तयार होती. लग्नानंतर मी ताराला त्यातल्या काही टिप्स दिल्या. म्हणजे गॅसवर भाजी ढवळत भांडी कशी घासावी यापासून कणीक मळताना एका हातानं चहा कसा करता येतो इथपर्यंत तिला सांगायचो. ताराला एकूणच, जुन्या वळणांनी घर चालवण्याचं बाळकडू मिळालेलं असल्यानं हे करून बघायला ती अनुत्सुक असायची. एक-दोनदा वैतागून तिनं ‘असं करायचंय ना? मग तूच कर की’ अशी पळपुटी भूमिका घेतली. कोणतंही काम प्रत्यक्ष करण्यापेक्षा त्याचा सांगोपांग अभ्यास करणं महत्त्वाचं असल्यानं मी तिचं आव्हान कधी स्वीकारलं नाही.

थोडक्यात, बायका घरकामाचं अवडंबर माजवतात असं माझं सूक्ष्म निरीक्षण आहे. हे मत मी एकदा सासरेबुवांनाही बोलून दाखवलं होतं. किचनमध्ये काम करत असलेल्या सासूचा अंदाज घेत त्यांनी होकारार्थी मान डोलावली होती.

मागच्या महिन्यात ताराला ट्रेनिंगसाठी अचानक नागपूरला जावं लागणार असं कळलं. ही बातमी मला सांगताना तिचा सूर जरा काळजीचा वाटला आणि जेव्हा आपण तिघंही नागपूरला जाऊया असं तिनं सुचवलं तेव्हा ती एकटी प्रवास करायला घाबरते याबद्दल माझी खात्रीच पटली. माझी नोकरी आणि बंटीची शाळा सोडून तिच्याबरोबर जाणं अशक्य होतं. मग माझ्या सासूबाईंना घर सांभाळायला बोलवायचं तिच्या डोक्यात आलं. एकदा सासूबाई घरी आल्यावर, ‘तारा, कसं सांभाळतीस गं तू?’ असं काळजीच्या सुरात म्हणाल्या होत्या. (नेमकं हे वाक्य माझ्या आईनं म्हटलं तर त्यात ताराला तिरकसपणा दिसतो, हा भाग वेगळा.) जावयानं इतके काबाडकष्ट करूनही सासूबाईंना जर मुलीचं कौतुकच वाटत असेल तर कशाला पाहिजे होता यांना जावई? असल्या बेकदर स्वभावामुळं मी सासूबाईंना आजवर टाळत आलोय. या वेळीही विरोध केला. इनमिन चार दिवसांसाठी काय ते जायचं, आणि त्यासाठी कशाला पाहिजेत बाहेरची माणसं?

‘‘माझी आई काय बाहेरची आहे का रे? आणि बंटीची काळजी वाटते मला. बाकी काही नाही.’’
‘‘बंटीची कशाला काळजी करतेस? तो स्वतःची काळजी घेण्याइतका मोठा झालाय.’’
‘‘आणि तू? ऑफिसातून दमून घरी येणार आणि बैलासारखा घरकामाला जुंपून घेणार?’’ ताराच्या बोलण्यात नक्की माया होती, काळजी होती की दुसरंच काही होतं हे मला कळलं नाही.
‘‘मग? तू नाही का घरकाम करत? थोडंसं मी केलं म्हणून काय झालं?’’ हे बोलून गेल्यावर मला जरा चुकल्यासारखं वाटलं. घरचं सुपरव्हिजन करणं वेगळं- ते स्पेशल क्वालिफिकेशन आहे; आणि घरगड्यासारखं मळकट कपड्यात काम करणं वेगळं. पण, माझा हा दुर्दम्य आत्मविश्वास पाहून तारा पुढं काहीच बोलली नाही.
रविवारी रात्री ताराची बस होती.
सकाळपासून ताराची गडबड चालू होती. कोणती वस्तू कुठं ठेवलीय हे मी फोन करून विचारेन म्हणून तिनं न सापडणार्याड वस्तूंची यादी करून त्याचा एक तक्ता किचनमध्ये टांगला होता. रात्रीचा स्वयंपाक दुपारीच करून ठेवला होता, तो आम्ही रात्री फक्त गरम करायचा होता. दूध कसं तापवावं याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर तिनं मला व्हॉट्सपवर पाठवली होती. दूध कसं तापवायचं नाही याचं एक पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन ती मला मेलवर पाठवणार होती. जेवणाची सोय डबेवाल्याकडं करावी म्हणजे घरात भांडी पडणार नाहीत असं ताराचं मत होतं. पण रविना, म्हणजे आमची कामवाली बाई, तशीही घरी येत असल्यानं ती भांडी धुवून जाईल; त्यामुळं आम्ही जेवणाची सोय बघू, तू काळजी करू नकोस असं आम्ही तिला निक्षून सांगितलं. हे सगळं चालू असताना, तारा आठवेल तशी बॅग भरत होती आणि आठवेल तसं, नको ते सामान काढून टाकत होती. सोबत, अखंड एकतारी चालू असते तशा अखंड सूचना-
‘‘हे बघ, सकाळी चहाबरोबर.’’
‘‘ते बघितलंय मी. ब्रेकफास्ट सिरीयल्सच्या डब्यात बिस्किटं आहेत, प्लॅस्टिकच्या डब्यात म्यूझली आहेत, आणि फ्रीजमध्ये अंडी आहेत, दुकानात पाव आहे. टी बॅग डावीकडच्या रॅकमध्ये लाकडी बॉक्समध्ये आहेत.
आणि दुपारी बंटी घरी येईल तेव्हा-’’
‘‘तेव्हा मी कपडे बदलून काहीतरी खाईन आणि मग खेळायला जाताना लॉक करून जाईन.’’
‘‘आणि आपलंच घर लॉक करून जा बरं. हे या पोराला सांगावं लागतं. एकदा फ्लोअरवरच्या सगळ्यांच्या दारांना त्यानं बाहेरून कड्या घातल्या होत्या.’’
‘‘उरलेलं सगळं ’’
‘‘फ्रीजमध्ये ठेवायचं नाहीतर टाकून द्यायचं. ’’
‘‘आणि रात्री ’’
‘‘पुरे! आम्ही लहान मुलं नाहीयोत. ’’
‘‘काही नाही रे. तुम्ही दोघं घर नीट सांभाळाल की नाही असं वाटतंय.’’ तारा चिंताक्रांत चेहर्या्नं म्हणाली.

रविवारची दुपार बर्याेपैकी ताराच्या सूचना ऐकण्यात आणि तिची बॅग पॅक करून देण्यात गेली. रात्री ताराला सोडायला गेलो तोवर सूचना ऐकतच होतो. तिला बसमध्ये बसवून परत येताना मी आणि बंटी एक शब्दही बोललो नाही.
ऐकूनऐकून कान थकले होते.

रविवारी रात्री तसं विशेष काही घडलं नाही. मानसिक थकव्यामुळं जेवण गरम करायचा कंटाळा आल्यानं हॉटेलातून काहीतरी मागवावं असा ठराव दोन विरुद्ध शून्य मतांनी संमत झाला. शेजारच्या हॉटेलला फोन करून दोन डीश मागवल्या. टीव्ही बघत जेवलो. घरी जेवण्यातला प्रॉब्लेम म्हणजे, जेवल्यानंतर सगळी भांडी बेसिनजवळ नेऊन ठेवावी लागतात. हे काम मी बंटीला शिकवायचं ठरवलं.

दोन मिनिटांनी बंटी किचनच्या दारातून डोकावून मला विचारू लागला- ‘‘बाबा, हा कुकरपण घासायला टाकायचा? ’’
मला आठवलं की कुकरमध्ये सकाळी केलेला भात आहे.
‘‘अरे नाही, त्यात सकाळचा भात आहे. तो फ्रीजमध्ये ठेवला पाहिजे.’’
‘‘पण बाबा, हा कुकर कसा फ्रीजमध्ये मावणार?’’
शेवटी मला उठून हे प्रकरण स्वतःच्या हातात घ्यावं लागलं. आधी कुकरचं बारकाईनं निरीक्षण करून मी त्याची उंची-रुंदी किती आहे याचा अदमास घेतला. नंतर फ्रीज उघडला. फ्रीजचे बरेचसे कप्पे भरलेले होते. दुधाची तीन-चार लहान-मोठी पातेली, दोन-तीन सायीची भांडी, कालची राहिलेली भाजी, उद्यासाठी म्हणून पूर्वी कधीतरी मळून ठेवलेली कणीक असं बरंच काही होतं. चूळभर दुधासाठी अख्खं एक लिटरचं पातेलं वापरायची बायकांना का हौस असते कोण जाणे? मी निर्दयपणे सगळी दूधं एका पातेल्यात ओतली. सगळ्या सायी एका भांड्यात ओतल्या. एकदमच तीन-चार भांडी आणि पाच-सहा चमचे कमी झाले. मग, फ्रीजचा एक कप्पा काढून त्यात तो कुकर कोंबून बसवला. पाठीमागं कलिंगड असल्यानं कुकर असा जेमतेम बसला होता की, फ्रीजचं दार उघडलं की तो पटकन खाली पडला असता. त्यामुळं फ्रीज उघडू नकोस असं बंटीला बजावून मी दुधा-सायीची भांडी घासायला टाकली. हे सगळं करेपर्यंत मला दमल्यासारखं झालं.

दमल्यानं आता झोपही येऊ लागली होती. आता तारा कुठंवर पोचली असेल असा विचार करत मला झोप लागली. ताराची आठवण आली की (भीतीनं की काय) कुणास ठाऊक पटकन झोप लागते. फोनचा अलार्म वाजला तेव्हा पावणेसहा झाले होते. आणखी पाच मिनिटं झोपावं म्हटलं तर तोवर गप्पकन साडेसहा वाजले होते.
बंटीला उठवून त्याला अंघोळीला पिटाळणं, तो अंघोळ न करता बाथरूममध्ये तसाच पेंगत बसला नाही हे पाहणं, त्याला ब्रश करायला लावणं, कपडे घालणं आणि त्याचा ब्रेकफास्ट करणं अशा कामांचा डोंगर पुढं उभा होता.

उठल्याउठल्या मला आठवलं ते म्हणजे कालच्या गडबडीत आम्ही ब्रेड आणायचं विसरूनच गेलो होतो. तरीही, आम्लेट करावं म्हणून मी फ्रीज उघडला. मी गडबडीत फ्रीज उघडून एगट्रेमधलं अंडं उचलेपर्यंत दाराआड दबा धरून बसलेला दुष्ट कुकर दण्णकन माझ्या पायावर पडला. आवाज ऐकल्यावर बंटी अंघोळ सोडून उत्सुकतेनं तसाच धावत आला. त्याला पुन्हा अंघोळीला पिटाळून मी दुखर्याय पायाकडं बघू लागलो. कुकर पडला त्या धक्क्यानं माझ्या हातातलं अंडं नाईटड्रेसच्या पायजम्यावर पडून फुटलं होतं. आता पायजमा आधी बदलावा की कुकरची आधी वाट लावावी हा प्रश्न होता. झाडाच्या फांद्या छाटण्यापेक्षा खोडावर घाव घातला पाहिजे हे बाजीरावाचं म्हणणं मला आठवलं, आणि मी कुकरचं काय करावं याचा शांतपणे बसून विचार करू लागलो. लहानपणी मी फार हट्ट करू लागलो की बाबा मला उचलून पोटमाळ्यावर ठेवायचे. पुढची अनेक वर्षं मला माळ्याची चांगली धास्ती बसली होती. अगदी, बागेतला माळी पाहिला तरी मी घाबरायचो. त्या विचारांच्या नादात मी कुकर उचलून माळ्यावर ठेवून दिला आणि अंड्यांचं काय झालंय हे पाहण्यासाठी फ्रीज उघडला. एक अंडं माझ्या पायजम्यावर पडून फुटलं होतं. दुसरं अंडं नेमकं फ्रीजमध्ये फुटलं होतं. सगळा पिवळा-पांढरा बलक फ्रीजच्या रॅकमधून गळत होता. बंटीनं हे पाहिलं असतं तर त्यानं सतरा प्रश्न विचारले असते, म्हणून मी घाईघाईनं बेडरूममध्ये गेलो, तिथली एक स्वच्छ बर्म्यूडा घेतली. ती घालणार तितक्यात बंटी बाथरूममधून बाहेर आला. तो किचनमध्ये जाऊ नये म्हणून मी गडबडीनं पायजमा वॉर्डरोबमध्ये कोंबला आणि बर्म्यूडा घालून पळत आलो.

‘‘बाबा, कपडे?’’ शाळेला जाताना बाप आपला नोकर असल्यासारखं बंटी वागतो. शाळेचे कपडे चढवताना तो एखाद्या सरदारासारखा शांतपणे डोळे मिटून उभा असतो आणि आम्ही हुजर्यारसारखे त्याच्या आजूबाजूला धावत त्याला कपडे चढवायचे. मी चरफडत शर्ट-पँट-टाय घालू लागलो. कपडे झाले की लगेच पुढचा प्रश्न आला.
‘‘ब्रेकफास्ट?’’
‘‘बाळा, आज ब्रेकफास्ट करायला वेळ नाही मिळाला मला. तू स्कूलमध्ये काहीतरी खाशील?’’
एखाद्या ध्यानस्थ मुनीसारखा पुढचा प्रश्न आला, ‘‘आणि टिफीन?’’
‘‘तोही स्कूलमध्ये खाशील बेटा?’’
एक लांब सुस्कारा सोडून बंटी म्हणाला, ‘‘आई कधी येणारै?’’
तत्क्षणी कारट्याला दोन ठेवून द्याव्याशा वाटत होत्या. पण मी मनात दहा आकडे मोजले. नंतर उगाच बंटीनं हे ताराला सांगू नये म्हणून त्यानं मागितले त्यापेक्षा जास्त पैसे त्याला दिले.
सातला बंटी शाळेला निघून गेला आणि मग आता आपल्याला अजून बर्याेच महत्त्वाच्या कामांचा ढीग उपसायचाय याची जाणीव झाली. मी पटकन चहा केला, टीव्ही लावला आणि पेपर वाचत बसलो.
सव्वाआठपर्यंत ही सगळी कामं उरकल्यावर आपल्याला आता जरा गडबड केली पाहिजे हे लक्षात आलं. मी थोड्याशा धावपळीतच अंघोळ केली. दाढी करायला वेळ नसल्यानं फक्त ट्रीम केली आणि पटकन सगळं उरकून बाहेर आलो.
ऑफिसचे कपडे बदलत असताना मला का कुणास ठाऊक अचानक हमीदभाईची आठवण आली. हमीदभाईची पोल्ट्री होती. तो आला की नाकाला आधी वर्दी जायची, हमीदभाई नंतर दिसायचा. पुढं पोल्ट्री चालेनाशी झाल्यावर त्यानं कुठंतरी वडापावची टपरी चालवलेली म्हणे. आज अचानक त्याची आठवण का व्हावी या विचारातच मी ऑफिसमध्ये पोचलो.
दिवसभर डोक्यात घरचेच विचार होते. आपण निघताना गॅस बंद केलाय का, लॅच बरोबर लावलीय का, बाल्कनीचं दार बंद केलंय का हेच विचार डोक्यात फिरत राहिले होते. सततच्या विचारांनी मेंदू सुस्त झाला होता. दुपारी ताराचा फोन आला.
‘‘हॅलो, काय करतोयस रे?’’
‘‘माणूस ऑफिसमध्ये काय करत असतो? झोपायला थोडाच जातो? काम करतोय.’’
‘‘वेळेत आवरलं का सगळं?’’
‘‘हो. बंटी गेला शाळेत. मीही आलोय ऑफिसला.’’
‘‘निघताना कपडे भिजत टाकलेस? नाही तर रविना नुसते पिळून टाकते.’’
‘‘हं! नाही. विसरलो.’’
‘‘तुझा आवाज का असा येतोय? कुठं धडपडलास की काय?’’ ताराला काही गोष्टी नेमक्या कळतात. कशा कोण जाणे.
‘‘काही नाही गं. कुकर पायावर पडला सकाळी.’’ इतका वेळ पाय दुखत नव्हता, पण तारानं आठवण काढल्यावर पायात किंचितशी कळ येतेय आणि आपल्याला चालताना थोडं लंगडावं लागतंय हे जाणवलं.
काळजी घे. नंतर फोन करते. आता लेक्चर सुरू होतंय माझं. बाय.

ताराच्या फोननंतर आणखी अस्वस्थ वाटू लागलं. बरोबर साडेपाचच्या ठोक्याला ऑफिसमधून बाहेर पडलो. घरी बंटीनं आणखी काय गोंधळ घालून ठेवला असेल ही धाकधूक मनात होतीच. पण, सुदैवानं बंटीनं काही नवीन घोळ घातलेला नव्हता. घरी आल्यावर आपलं आवरून तो खेळायला निघून गेला होता. पण जाण्यापूर्वी तो सगळ्या घरभर फिरला असावा. सीतेनं अपहरणाच्या वेळी आपले दागिने एकेक करून टाकले होते तसे बंटीनं घरभर फिरल्याचा पुरावा म्हणून एकएक कपडे घरभर टाकले होते. ह्या पोरट्याला या चार दिवसांत शिस्त लावली पाहिजे याची नोंद मी मनाच्या डायरीत केली.

बेडरूममधली उशा-पांघरुणं तशीच बेडवर पसरलेली दिसली. आणखी चार-पाच तासांनी पुन्हा वापरायचीच असल्यानं त्यांच्या घड्या घालून ठेवण्यात काही अर्थ नव्हता. कामवाली रविना उद्या दुपारपर्यंत येणार नसल्यानं आत्ताच कपडे भिजत घालण्याची गरज नव्हती. दुपारी तिनं भांडी घासून ओट्यावर पालथी लावलेली दिसत होती. घराची झाडलोट करावी म्हटलं तर घर तसं बर्याुपैकी स्वच्छ दिसत होतं. अपवाद फक्त, बंटीनं इतस्ततः पसरलेल्या वस्तूंचा. आज बंटीला शिस्त आणि स्वावलंबन या दोन्ही गोष्टींचे धडे द्यायची वेळ आली होती.

ही बरीचशी कामं उरकलेली असल्यामुळं, वेळ घालवण्यासाठी मी थोडा चहा करायचं ठरवलं. माझी चहा करायची पद्धत अनेक वर्षांच्या अनुभवानं अगदी काटेकोरपणे ठरली आहे. बरोब्बर सव्वा कप पाणी घेऊन गॅसवर मंद आचेवर उकळायला ठेवायचं. लगेच दुसरीकडं टी-बॅग काढून कपात तयार ठेवायची. बाहेर जाऊन टीव्ही लावायचा. टीव्हीवर कमर्शियल ब्रेक लागला की नेमकं गॅसवर पाणी उकळत असतं. मग ते पाणी कपात ओतून निवांतपणे चहाचा आस्वाद घ्यायचा.

आज मी नेहमीप्रमाणं पाणी गॅसवर ठेवलं आणि हॉलमध्ये येऊन पाणी उकळायची वाट बघू लागलो. माझं लक्ष सिनेमाकडं असताना बंटी लॅच उघडून घरी आला. मला घरात पाहिल्यावर त्यानं पहिली मागणी केली- ‘‘बाबा, भूक!’’
मला खरं तर त्याचा एकदम राग आला. बाप इकडं कामाच्या ओझ्यानं पिचलेला असताना पोरानं सतत भूक भूक म्हणून किरकिरावं हे पटण्यासारखं नव्हतंच. पण मी शांतपणे म्हणालो, ‘‘बंटी, फ्रीजमध्ये काही खायला असेल. जरा शोधून घे तूच.’’
मान हलवत बंटी किचनमध्ये गेला आणि पाठोपाठ त्याची किंचाळी ऐकू आली- ‘‘बाबाऽऽ आऽऽग.’’

हातातला रिमोट फेकून देऊन मी आत पळत गेलो. अज्जिबात आग वगैरे लागली नव्हती. फक्त गॅसवरच्या भांड्यातलं पाणी उकळून संपल्यानं भांडं आगीच्या ज्वाळांवर नुसतंच पेटून काळं पडलं होतं. मी प्रसंगावधान राखून ते भांडं उचलून सिंकमध्ये टाकलं.

जनरली, टीव्हीवर आठ मिनिटांनी कमर्शियल ब्रेक असतो. पण आज नेमका नो-ब्रेक सिनेमा लागला होता. सिनेमाला ब्रेक नसल्यानं पाणी उकळून उडून गेलं तरी कळलं नव्हतं. मी सर्वप्रथम ते नो-ब्रेकवालं चॅनल लॉक करून टाकलं. चहा प्यायचा मूड गेल्यानं कसल्यातरी बातम्या बघत बसलो.

खाणं शोधायला बंटीनं फ्रीज उघडला तेव्हा त्याला फ्रीजमध्ये फुटलेलं अंडं दिसलं. मला पुन्हा उठून फ्रीजची सफाई करावी लागली. आधी आम्ही दोघांनी चमच्यानं पिवळा बलक गोळा केला. मग किचन अॅरप्रननं आणि टिश्यूपेपरनं राहिलेला भाग टिपून काढला. हे सगळं होत असताना बंटीनं बाकी अंडी फुटू नयेत म्हणून दुसरीकडं ठेवायचा प्रयत्न केला. त्यात आणखी एक अंडं फुटलं. मग दोघांनी मिळून फ्रीजमधलं अंडं जसं साफ केलं होतं तसंच फरशीवरचं अंडंही साफ केलं. यात बराच वेळ गेला असावा. आता किचनमध्ये अंड्याचा वास भरून राहिला होता. तो वास जावा म्हणून मी एक्झॉस्ट फॅन चालू केला. ते पाहिल्यावर काहीतरी सुचल्यानं बंटीनं मला विचारलं- ‘‘बाबा, किचनमध्ये आहे तसा अंड्याचा
वास फ्रीजमध्येही भरून राहिला असणार ना?’’
‘‘हो रे बंटी. पण त्यासाठी काय करायचं?’’
‘‘बाबा, आपण फ्रीजमध्ये ब्लोअर मारूया? त्यानं सगळी हवा बाहेर जाईल.’’ बंटीनं सुचवलं.
‘‘पण ब्लोअर कुठून आणायचा?’’
‘‘आपला हेअरड्रायर आहे ना?’’

पोरगं भलतंच हुशार होतं. सासूबाई बंटी माझ्यावर गेलाय असं का म्हणतात ते मला तेव्हा कळलं. मी लगेच हेअरड्रायर घेऊन आलो. वायर जोडून तो चालू केला. फ्रीजमध्ये हेअरड्रायरनं हवा मारणं हे जरी अवघड काम नसलं तरी आमचा फ्रीज थोडा विचित्र स्वभावाचा आहे. उघडा राहिला की पंधरा सेकंदांनंतर त्याची वॉर्निंग बीपबीप सुरू होते. ती ऐकायला भलतीच त्रासदायक होते, आणि आजच्यासारखा त्रासाचा दिवस गेला असेल तर फारच.

‘‘बाबा आयडिया! बंटी ओरडला, दर पंधरा सेकंदांनी फ्रीजचं दार एक सेकंदासाठी बंद करायचं आणि पुन्हा उघडायचं.’’

‘‘शाब्बास रे पठ्ठ्या! हे तूच करत बस आता.’’ मला जरा दमल्यासारखं वाटत होतं. बंटीला या खेळात मजा येत होती. रात्रीचं जागरण, सकाळपासूनच्या कामांचा अविरत ढीग, एकाच वेळी घरात आई आणि बाबा अशी दुहेरी भूमिका बजावण्याचं ओझं- या सगळ्यांमुळं माझा कधीतरी डोळा लागला असावा.
मला जाग आली ती बंटीच्या उठवण्यामुळं.
‘‘बाबा, जेवण.’’ बंटी म्हणत होता. ऊठसूट खाण्यापिण्याशिवाय ह्या पोराला काही सुचत कसं नाही? मी रागानं त्याला एक कानफटात लगावणार होतो. पण मला बंटीच्या हातात हॉटेलचं पार्सल दिसलं. मी झोपलो असताना त्यानं फोनवरून पार्सल ऑर्डर केलं होतं. पैसे देण्यासाठी मला आता उठवलं होतं. मी निमूटपणे पैसे दिले.

कालपासून दोघांच्या जेवणाची तशी आबाळच झाली होती. त्यामुळं आता भूक लागली होती. माझी झोप अद्याप पुरेशी गेली नसल्यानं ेट लावायची जबाबदारी मी बंटीलाच दिली. दोघं शांतपणे टीव्ही बघत जेवलो. घरात दोघंच असताना किती शांत वाटतंय याचा वेगळा अनुभव दोघांनाही येत होता.

कालचा अनुभव जमेला असल्यानं बंटीनं जेवताच पार्सलमधले उरलेले डबे नेऊन फ्रीजमध्ये ठेवले. बाकीची भांडी सिंकमध्ये ठेवली. मी जरा जागीच शतपावली करत तो काय करतोय यावर लक्ष ठेवून होतो. बंटी बेडरूममध्ये गेला आणि आपले शाळेचे कपडे, स्कूलबॅग गोळा करून आला.

‘‘हे काय रे बंटी?’’
‘‘काही नाही बाबा. सकाळी आवरताना गडबड होते ना, म्हणून आताच सगळं गोळा करून ठेवतोय.’’ त्याचा हा समंजसपणा पाहून मला भरून आलं. बंटी अगदी माझ्यावर गेलाय हे सासूबाई म्हणतात ते खरंच आहे.
‘‘आणि बाबा, उद्या आठवणीनं मला एका कलरचे सॉक्स घाला हं. आज एक ब्राऊन आणि एक ब्लॅक घातला होतात तुम्ही.’’
आता त्याच्याशी वाद न घालता अनावर झालेली झोप पूर्ण करायच्या मार्गी लागलो. कालच्या जागरणामुळं आज जरा लवकरच डोळा लागला. मध्यरात्री एकदा जाग आली तेव्हा उठून मोबाईलवर पाहिलं तर तीन वाजले होते. सहाचा अलार्म आहे याची खात्री करून पुन्हा झोपी गेलो.
यानंतर सकाळी बंटीनं उठवलं तेव्हाच जाग आली.
‘‘बाबा उठा. मला उठवून अंघोळीला नाही का पाठवायचं?’’

मी पटकन घड्याळात पाहिलं. च्यायला! आजही साडेसहाच वाजले होते. कालसारखीच आजही धावपळ होणार होती. मी आज ऑम्लेट करायच्या नादालाच लागलो नाही. बंटीसाठी दूध तापवून तेच त्याला पाजून शाळेत पाठवायचं होतं. मी डोळे चोळत दूध गरम करायला भांडं गॅसवर ठेवलं, आणि बंटीच्या अंघोळीची वाट पाहू लागलो. तारानं मोबाईलवर दूध तापवायची जी प्रोसिजर लिहिली होती त्याप्रमाणं चार ते पाच मिनिटांनी दूध उतू जात असल्यासारखं फुगून वर येतं- असं लिहिलं होतं. पण मी भांड्यात डोकावून पाहिलं तर दूध उतू न जाता धरणीकंपात जमीन फाटावी तशी दुधात उभी भेग पडली आणि हिमनगासारखा एक दुधातला ठोकळा त्यात तरंगू लागला. दुधाचा वासही आता आंबटसर येत होता. मी पटकन गॅस बंद केला. वास जावा म्हणून किचनची खिडकी उघडली. एक्झॉस्ट फॅनच लावणार होतो, पण ऑफिसला जाताना तो बंद करायचा विसरलो तर?

बंटी अंघोळ करून आला. मग त्याला कपडे घातले. आज मात्र कपडे घालताना तो चक्क डोळे उघडून मी काय करतोय ते पाहत होता. बंटीच्यात थोडीतरी सुधारणा झालीय हे बघून मला बरं वाटलं. कपडे झाल्यावर बंटीनं हात पुढं केला. मी प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडं पाहिलं.
‘‘ब्रेकफास्ट आणि टिफीनचे पैसे?’’ मी निमूटपणे त्याच्या हातावर पैसे ठेवले.

बंटी गेल्यावर मी आज एकूणच घरच्या परिस्थितीचा आढावा घ्यायचा ठरवलं होतं. पहिलं म्हणजे दूध. ते संपलं होतं. ब्रेड आणायचा राहिला होता. डझनातली तीन अंडी फुटली होती. दोन दिवस आणलेल्या पार्सलमधल्या उरलेल्या भाज्या फ्रीजमध्ये जमेल तिथं कोंबलेल्या होत्या. हे सगळं एका बाजूनं सुराला लावायचं होतं.

मी दूध-ब्रेड आणायला खाली गेलो. पार्किंगमध्ये आमचा पेपरवाला भेटला. वर यायचे कष्ट वाचले म्हणून त्यानं मला पाहताच आनंदानं पेपर माझ्या हातात दिला. पेपर हातात पडताच मला चहाची अनिवार तलफ आली. दूधवाल्याकडं येताना जाऊ असा विचार करून मी थेट चहावाला गाठला. चहा, त्यानंतर सिगारेट आणि निवांत पेपरवाचन यामुळं मन उल्हसित झालं. याच उल्हासामध्ये घरी येताना एवीतेवी चहा झालाच आहे, तर आत्ता उगाच दूध कशाला आणायचं असा प्रश्न समोर आला. तसंच, बेकरीवाले काल दुपारी भट्टीतून काढलेला ब्रेड आज ताजा म्हणून विकतात, त्यामुळं आज संध्याकाळी ब्रेड विकत घ्यायचा- हेही सुचलं. त्या नादात मी निवांत घरी परतलो. आणि येऊन पाहिलं तर –
बापरे! सव्वाआठ वाजले होते.

आजही गडबडीत आवरून ऑफिसला जावं लागणार होतं. अंघोळ करून ऑफिसची तयारी करत असताना पुन्हा पोल्ट्रीवाल्या हमीदभाईची आठवण होऊ लागली. हमीदचा विचार झटकून टाकला तर ताराची आठवण झाली आणि कुकर पडलेला पाय पुन्हा दुखू लागला.
तसाच लंगडत ऑफिसला गेलो. माझी एकूण अवस्था बघून साहेबांनी मला केबिनमध्ये बोलावून बायकोशी भांडण झालंय का असं विचारलं. लंगडण्यावरून संशय आला असावा म्हणून मग पाय दुखत असतानाही जमेल तितकं सरळ चालू लागलो.

संध्याकाळी पुन्हा घरी. आज बंटीनं बर्याूपैकी कपडे काढून व्यवस्थित ठेवले होते. फक्त टाय वॉशबेसिनमध्ये विसरला होता आणि एक बूट सापडत नव्हता. घरकाम करायचा फारसा विचार न केल्यानं मी घरी गेल्यावर आज काय काम करावं यावर विचार करत थोडा वेळ बसून राहिलो. आजही उशा-चादरी बाहेरच राहिल्या होत्या. घर झाडावसं वाटत होतं, पण सगळ्या घरभर झाडू घेऊन फिरायचा कंटाळा आला होता. व्हॅक्यूम क्लीनर काढून तो फिरवावा तर सगळी जोडाजोड करण्यातच फार वेळ जातो. कपडे भिजत घालायचे आजही राहून गेले होते. सुदैवानं रविनानं ते कसेतरी धुतलेले दिसत होते.

शेवटी घरकामाला आज सुट्टी द्यावी आणि जेवण करून निवांत झोपावं असं आमच्या दोघांचं मत पडलं. जेवण म्हणजे अर्थातच हॉटेलला फोन करणं आलं. आम्ही फोन केल्याबरोबर हॉटेलवाल्यानं बंटीचा आवाज ओळखला असावा. पत्ता माहीत आहे म्हणाला. दहा मिनिटांत पार्सल आलं.

एक कर्तव्य म्हणून दोघं जेवलो. जेवल्यावर बंटी आवरायला गेला. मी सहज म्हणून फ्रीज उघडून पाहिला तर तीन दिवसांच्या भाज्या आणि तीन वेगवेगळे पुलाव- जे दिसायला आणि चवीला एकच होते- फ्रीजमध्ये आमची वाट पाहत होते. किचनमध्ये गेल्यावर कसलातरी आंबूस वास येत असलेला जाणवला. सकाळी दूधाचं पातेलं- ज्यात पनीर बनलं होतं, ते अजून ओट्यावरच पडून होतं. नाकाला अॅणप्रन लावून आम्ही ते सगळं सिंकमध्ये ओतून टाकलं आणि भांडं घासायला टाकलं.

दोन दिवसांच्या झोपेच्या खोबर्याेमुळं मी आज दुसर्याल बेडरूममध्ये झोपायचं ठरवलं. तिथलीच एक चादर घेऊन मी झोपी गेलो. नाईटलँपच्या अंधूक उजेडात गेल्या दोन दिवसांतला घरकामाचा ताण आता जाणवू लागला. जसजसं मी ते आठवू लागलो तसतशी मला हुडहुडी भरतीय असं वाटू लागलं. शेवटी मी दीड वाजता उठून स्वतःचं कपाळ चेक केलं तर ताप भरलेला जाणवू लागला. ह्या तापात बंटीला उद्या आवरून शाळेला पाठवणं काही झालं नसतं. बंटी टीव्हीवर कसलीतरी मॅच बघत हॉलमध्ये झोपला होता. त्याला झोपेतून उठवून, उद्या सुट्टी घ्यायचीय हे सांगून टाकलं. अर्धवट झोपेतच हुर्रा! असं पुटपुटत तो पुन्हा झोपी गेला. मी तापाची गोळी घेऊन झोपलो.

सकाळी सहाच्या ठोक्याला जाग आली. आज काहीच काम करायचं नाही हे माहीत असल्यानं मी तसाच पडून राहिलो. सातला बंटी उठला. स्वतःहून अंघोळ करून आवरून आला. येताना माझ्यासाठी चहाही करून आणला होता. हळूहळू बंटी माझ्या तालमीत तयार होत होता. अजून दोनेक दिवसांत बंटी एकटा घर चालवू शकेल इतका तयार झाला असता.

साडेआठला बंटी खाली जाऊन दूध आणि ब्रेड घेऊन आला. मग मीच त्याला दूध तापवून द्यायचं ठरवलं. ब्रेडला बटर-जॅम-सॉस लावायला त्याला बसवलं आणि मी दूध गरम करू लागलो. दुधाचं एक वैशिष्ठ्य आहे, तुम्ही त्याच्याकडं एकटक नजर लावून बसला असलात तर बेटं दोन तास झाले तरी त्याला उकळी येत नाही, आणि तुम्ही दोन सेकंदांसाठी जरी आपली नजर हटवली की लगेच मारलीच लेकानं भांड्यातून उडी. आत्ताही तेच झालं, मी पेपरवाला आला का हे खिडकीतून बाहेर बघत असताना बंटी किंचाळला. मी जाऊन गॅस बंद करेपर्यंत पाव लिटर वाहून ओट्यावर सांडलं होतं. आता पुन्हा ओटा साफ करणं आलं. बरं, नुसता ओटा साफ करणं ठीकाय हो, पण थोडं दूध गॅसखाली सांडलेलं असतं त्यासाठी गॅस शेगडीखाली पाणी मारून सगळं साफ करावं लागतं.

मला एक आयडिया सुचली. बाथरूममधली पाण्याचा पाईप सिंकच्या नळाला जोडून प्रेशरनं सगळा ओटा साफ करायचा. हे ऐकल्यावर बंटीला भलताच उत्साह आला. लगेच पाईप घेऊन आला. मी नळ चालू केला आणि बंटी पाण्याच्या जेटनं सगळा ओटा धुवू लागला. बंटी किती तन्मयतेनं काम करतोय हे कौतुकानं पाहत मी उभा राहिलो होतो. तोच बंटी ओरडला, ‘‘बाबा, बंद करा नळ.’’

मी बंद करायच्या ऐवजी चुकून पाण्याचा फोर्स वाढवला असावा कारण पाण्याचा एक जोरदार फवारा माझ्यावर पडला. फवारा माझ्यावर पडतोय म्हणून बंटीनं पाईपचं तोंड ओट्याकडं वळवलं तर दुधाच्या पातेल्यात पाणी पडून जे पाव लिटर दूध वाहून गेलं होतं त्याची भरपाई झाली. मी पटकन नळ बंद केला.

क्षणभर दोघं एकमेकांकडं बघत राहिलो. पण, हुशार लोक अशा परिस्थितीत डगमगत नाहीत. मी बंटीला विचारलं, ‘‘बंटी, तुला थोडं पातळ असलेलं दूध चालेल का रे?’’
‘‘नको बाबा,’’ बंटी तोंड मुरडून म्हणाला, ‘‘टाकून देऊया हे दूध.’’
पुन्हा नवीन दूध आणून तापवायची दोघांचीही इच्छा नव्हती. त्यामुळं मी पटकन ओले कपडे बदलायला बेडरूममध्ये गेलो. बेडरूममध्ये जाताच पुन्हा हमीदभाईची आठवण झाली. का कोण जाणे.
मी कपडे बदलायला वॉर्डरोब उघडला तेव्हा परवा वॉर्डरोबमध्ये अंड्यानं माखलेला पायजमा दिसला. हमीदभाईची आठवण ह्या अंड्यांच्या वासामुळं येत होती. पायजमा आणि त्याखालचे दोन-तीन कपडे मी हळूच उचलले आणि वॉशिंग मशिनमध्ये नेऊन टाकले.
माझे बाकीचे घरात घालायचे कपडे कुठंच सापडेनात. मग शेवटी ताराची ट्रॅकपँट मिळाली, तीच घातली. त्यामुळं दिवसभर बंटीची आई असल्याचं फिलिंग येत राहिलं.

सुट्टी घेतली असल्यानं आज हॉटेलचं जेवण न मागवता घरी असलेल्या जेवणावरच भागवावं असं आम्ही ठरवलं. सकाळी भरपूर ब्रेड खाऊनही बर्याेपैकी अजून उरला होता. तोच ब्रेड भाजीबरोबर खायचा आणि नंतर तिन्ही पुलाव एकत्र करून त्याचा एक ग्रँड पुलाव करायचा असा फक्कड बेत आम्ही आखला.

तीन भाज्या, आणि त्याही चार-पाच चमचे एवढ्याच असल्या तरी त्या गरम केल्याशिवाय खाता येणार नव्हत्या. बंटीचं गॅजेटचं ज्ञान पाहता मायक्रोवेव्ह वापरायची मला जरा भीतीच वाटू लागली. म्हणजे, भाज्या आता गॅसवर गरम करणं आलं. बंटीनं एक पातेलं घेऊन त्यात चमच्यानं सगळी भाजी ओतली. ते पाहून मला एक आयडिया सुचली-
‘‘बंटी, तीन-तीन भाज्या गरम करण्यापेक्षा सगळ्या एकत्र करून टाक ना? नाहीतरी हॉटेलवाले सगळ्या भाज्यांना एकच मसाला, एकच ग्रेव्ही वापरतात. चवीत थोडाच बदल असतो?’’
बंटीनं लगेच तिन्ही भांडी एकाच पातेल्यात ओतली. मी ते पातेलं गॅसवर ठेवलं आणि एका चमच्यानं त्याला ढवळू लागलो. लाल, हिरवी आणि तपकिरी अशा तीन रंगांच्या भाज्या एकजीव होत होत त्याला गडद चॉकलेटी रंग येत चालला होता. हे मिश्रण चांगलं खदखदून उकळेपर्यंत मी तिथून हललो नाही. कुणी सांगावं, भाजीपण उतू जात असेल तर?
नंतर पुलाव एकत्र करून त्याचा मिक्स-व्हेज पुलाव बनवायचं काम बंटीनं स्वतःकडं घेतलं. मी ब्रेड आणि भाजी खाऊ लागलो. दर घासाला पनीर, काजू, ढोबळी मिरची, फ्लॉवर, मश्रूम यांपैकी काहीतरी एक लागत होतं. चव बरी होती. बंटीनं पुलाव मिक्स केला आणि भाजीचा रंग पाहून फक्त पुलावावरच हात मारला.

बाकी त्या दिवशी विशेष काही झालं नाही. दुपारनंतर भडभडून उलट्या झाल्यानं मी दिवसभर झोपून होतो. रात्रीही अशक्तपणा आल्यासारखा वाटत होता. म्हणून मी बंटीला बाहेर जाऊन जेवून यायला सांगितलं. जेवणाच्या वासानंही मळमळत होतं.
इच्छा (व गरज) नसतानाही बंटीचा आग्रह म्हणून मी डॉक्टरांकडं जाऊन आलो. सध्या कुठल्याच साथी चालू नसल्यानं डॉक्टर तसे रिकामेच होते.

‘‘बोला, काय झालं?’’
‘‘काल रात्री ताप होता. अंग भरून आल्यासारखं वाटतंय. दुपारी उलट्या झाल्या. पायावर कुकर पडलाय, पाय दुखतोय. झोप अपुरी वाटतेय.’’ मी भडाभडा बोलून गेलो.

माझ्या आजारांची यादी ऐकून डॉक्टर विचारात पडले. कदाचित यापैकी कोणता रोग पहिल्यांदा बरा करावा असा प्रश्न पडला असेल. मग चष्मा डोळ्यांवर चढवून पॅड हातात घेत ते म्हणाले, ‘‘वहिनी घरी नाहीयेत का?’’ डॉक्टरनी हे कसं ओळखलं कुणास ठाऊक? मी काही बोलणार तेवढ्यात ते हसून म्हणाले, ‘‘घाबरू नका. फार काही झालेलं नाहीय. व्हाल दोन दिवसांत बरे. मी औषधं लिहून देतो.’’

डॉक्टरांकडून बाहेर पडताना मी खिन्न होतो. इतके सगळे आजार असूनही डॉक्टर आपल्याला दोन दिवसांत बरं करणार याचंच फार वाईट वाटत होतं. मी निमूटपणे घरी आलो.

तारा परवा सकाळी येणार होती. ती येईपर्यंत बंटीची काळजी घेणं शक्य नसल्यानं आम्ही दोघांनी सुट्टी घ्यावी का यावर गंभीरपणे विचार केला. शेवटी, सकाळी जाग आली तर यावर विचार करू असा निर्णय घेऊन दोघं झोपी गेलो. मला पटकन झोप येईलसं वाटत नसल्यानं मी हॉलमध्ये सोफ्यावर आडवा झालो.

सकाळी आठ वाजता बेलच्या आवाजानं जागा झालो. कसंबसं जाऊन दरवाजा उघडला तर तारा उभी! एक दिवस लवकरच ट्रेनिंग संपल्यानं आम्हाला सरप्राईज द्यावं म्हणून ती न सांगता आली होती.

आल्याबरोबर तिच्याकडं घराचा चार्ज सोपवून मी माझ्या मूळ कामाला लागलो.

संध्याकाळपर्यंत तारा घर आवरत होती. फ्रीज तीनदा पुसून काढला, माळ्यावरचा कुकर उघडल्यावर त्याला बुरशी लागली होती. पाणीमिश्रित दूध टाकून द्यायचं राहून गेलं होतं. चादरी आवरताना बंटीचा बूट मिळाला. वॉशिंग मशिन लावायचं राहून गेलं होतं. स्वच्छ असलेल्या घरातही ताराला धूळ दिसत असल्यानं तिनं सगळी लादी पुसून काढली. या सगळ्यात ताराला मदत करायची माझी फार इच्छा होती पण तापामुळं मी तसाच पडून राहिलो. रात्री तारानं ‘‘मग? माझी आठवण झाली की नाही?’’ असं विचारलं तेव्हा ताप उतरल्याचं लक्षात आलं.

गेले दोन दिवस नाशिकमध्ये होतो. ताराचा कसला तरी सेमिनार होता. म्हटलं त्या निमित्तानं आपलं फिरणंही होईल. बाकी माझं ऑफिस आणि बंटीची शाळा काय कुठं पळून जात नाहीय.

ज्युनियर ब्रह्मे
junior.brahme@gmail.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.