Now Reading
काही प्रवासयोग

काही प्रवासयोग

Menaka Prakashan

पु. ल. देशपांडे अर्थात महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व भाईंनी काही ‘भाडेकरू योग’ लिहिले. संत्रस्त भाडेकरू आणि नशिबवान मालक यांच्यातील नातेसंबंधांवर भाष्य करून वाचकांना रिझवलं. त्याच धर्तीवर काही ‘प्रवासयोग’ याठिकाणी मांडायचे आहेत.

आयुष्य हा एक प्रवास आहे’ हे अनेकांनी अनेक ठिकाणी अनेक वेळेस उच्चारलेलं वाक्य आज मी माझं म्हणून इथे लिहितो आहे. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधला हा प्रवास आपण आयुष्य म्हणून स्वीकारतो, म्हणजे तसा तो स्वीकारावाच लागतो. कारण जन्म आणि मृत्यू दोन्हीही कोणाच्याच हातात नाहीत, म्हणून मग गळ्यात पडलेला हा प्रवास सापासारखा वागवायचा की रत्नहारासारखा हा आपला आपण ठरवायचा. असो. कारण त्याविषयी स्वत:हून कोणी सांगायला येणं अवघड आहे. आयुष्याच्या या भल्यामोठ्या (आणि नव्वदी-शंभरीपर्यंतचे वार्धक्य प्राप्त झाल्याने कमालीच्या लांबलेल्या) प्रवासात अनेक छोटेछोटे उपप्रवासही आपण करीत असतो. त्याला ‘स्थलांतर’ असंही म्हणतात म्हणे! एका ठिकाणाहून दुसर्याे ठिकाणी वाहनाने जाणं अशा उपप्रवासात संभवतं. रस्त्यावरून जाणार्याी सुंदर सुंदर विविध आकाराच्या गाड्या पाहिल्या की मलाच काय पण कोणालाही त्यातून प्रवास करावासा वाटू लागतो. कधी कधी आकाशात उडणारं विमान दिसतं. लक्झरी बसेस दिसतात. रेल्वे स्टेशनवर पॅसेंजर गाडीची वाट बघत बसणार्याड माझ्यासारख्या सामान्य प्रवाशास संपूर्ण एसीचे डबे असलेली श्रीमंती थाटाची गाडी तुच्छतेचा धूर जणू माझ्यावरच उडवते आहे अशा थाटात स्टेशनवर न थांबता पुढे जाताना दिसते. चित्रांमध्ये, टीव्हीमध्ये, सिनेमात आलिशान चार-पाच मजली गलबतं सुंदर-सुंदर प्रवाशांना (त्यातही प्रवासी लललांना) नेतांना मी बघतो. हे सारं बघितलं की मलाही अशा सुखदायी वाहनातून प्रवास करण्याची इच्छा कमालीची दाटून येते, पण ही इच्छा नेहमी फलद्रुप होते, ती फक्त एस.टी.च्या लाल गाडीतून प्रवास करून! असतं एकेकाचं नशीब! बरं, हा प्रवास तरी सुखनैव पद्धतीने व्हावा, पण त्यातही अनेक वेगवेगळे ‘मनस्तापयोग’ माझ्या आणि माझ्यासारख्या असंख्य प्रवाशांच्या कुंडलीत मांडलेले असतात. त्यातले काही योग आज येथे मांडतो.
वाहन गती नियंत्रण योग :
हा योग मला हमखास अनुभवास येतो. बर्यााचदा मी घाईगर्दीने स्टँडवर जातो. गर्दी नेहमीची असते आणि घाई तर पाचवीला पूजलेली. त्यामुळे निघेनिघेपर्यंत धांदल उडत राहते. कालचा स्वच्छ रुमाल मुलाने खिशात हात घालून बाहेर काढून घडी मोडून बोळा करून परत ठेवलेला असतो. एका बुटाची लेस काढून त्याच्या खेळण्यातल्या बसला बांधलेली असते. पत्नीला लवकर जाग न आल्याने डब्याचा बोर्यार वाजलेला असतो. तिची आळोखेपिळोखे देत उठण्याची ‘अदा’ संतापाची अनुभूती प्राप्त करून देते. अशा सार्याा ‘घाईगर्दी’त स्टँडवर पोहचल्यावर एकदम हायसं वाटतं. कारण एकाच वेळी मला हव्या असणार्याल चार-पाच गाड्या रांगेने उभ्या असतात. त्यातली सगळ्यात नवी कोरी दिसणारी, दोन्ही गावांच्या मध्ये छोट्या अक्षरात अतिजलद असं लिहिलेली पाटी लावलेली गाडी पाहून चटकन् मी तीत बसतो. सुदैवाने गाडीही झटपट निघते. मनातल्या मनात इतर गाड्यांना मी वाकुल्या दाखवतो. त्यातल्या त्यात अगदी भंगार वाटणार्यात गाडीकडे तर जणू शत्रुपक्षातलं वाहन अशा नजरेने पाहत नजरेआड करतो. गाडी गती घेते, गावाबाहेर पडेपर्यंत ट्रॅफीकच्या अडचणी आणि विविध आकडी चाकांच्या वाहनातून हळुवारपणे पुढे सरकते. गावाबाहेर पडल्यावर ‘ड्रायव्हर जोरात हाणेल’ असं मनातल्या मनात आपण मांडेही खातो, पण हायरे दैवा! गाडी गावाबाहेर पडली तरी फारसा वेग घेत नाही. दहा मिनिटं होतात, पंधरा मिनिटं होतात, अर्धा तास होतो पण तोच वेग तीच गती आणि तीच घालमेल! ड्रायव्हर गोगलगायीचा भाचा किंवा मामा असावा आणि तिने त्याच्या कानात उगीच धावपळ करू नकोस असा संदेश गुप्तपणे दिला असावा असा संशय मनी दाटून येतो. आपण नैराश्याने डोळे मिटणार तेवढ्यात भर्रभर्र आवाज करीत स्टँडमध्ये सगळ्यात भंगार म्हणून हिणवलेली गाडी शेजारून आपल्याला वाकुल्या दाखवीत पुढे जाते. मग तर डोळे आपोआपच मिटतात. वेग बांधलेला आहे, ड्रायव्हर कंडम आहे, गाडी नुसतीच नवी दिसते, हल्लीची इंजिनं काही कामाची नाही. आमच्या वेळच्या गाड्या म्हणजे…. अशी अनेक कारणं अनेकांच्या तोंडून ऐकू येतात. आपले संताप- नैराश्य- सूड-हतबलता अशा विविध मनोभावांनी गच्च मिटलेले डोळे आपोआप निद्राधीन होतात आणि नियोजित वेळेपेक्षा तासभर उशिरा पोहचलेल्या बसच्या कंडक्टरने उठवल्यावरच ते उघडतात. असा हा योग.
सुंदर तरुणी सहवासनाशक योग-
प्रवासाला निघायचं म्हणजे व्यवस्थित कपडे, घोटीव दाढी, पॉलीश केलेले बूट, कपड्यांवर फवारलेले गुलाबपाणी असा सारा जामाजिमा करून लोक प्रवासाला निघतात. माझ्यासारख्या लोकांना उत्तम गाडी, चांगलं सीट आणि रमणीय सहप्रवासी मिळावा असं नेहमी वाटत असतं. पण बर्यारचदा हा दुर्मीळ योग जुळून येता येता हुकतो.
नेहमीप्रमाणे प्रवासाला निघालं की मी शक्यतो दोन सीट रिकामी असलेली जागा शोधतो आणि तशी जागा मिळाली की दुसर्या सीटवर हँडबॅग ठेवतो. इतर कोणी प्रवाशाने जागेविषयी विचारणा केली की कोणीतरी बसलं आहे असा आविर्भाव चेहर्याकवर आणतो. हेतू हाच की एखादी सुंदर ललना आली तर तिला ही जागा देऊन माझ्या मनात सदैव असणारं स्त्रीदाक्षिण्य दाखवावं. पण या माझ्या मनातल्या भावना व्यक्त करण्यात अनेक अडथळे उभे राहतात. जमवून आणलेला बेत मोडून पडतो. मस्तपैकी शेजारचं सीट मोकळं ठेवून गाडी पुढच्या स्टॉपवर आली की भराभर प्रवासी आत शिरतात. मला हवा तसा मनोरम प्रवासी दिसताच मी हँडबॅग उचलून घेतो आणि जागा रिकामीच आहे, असं सूचित करतो. ती ललना माझ्या सीटपर्यंत येऊन पोहचते, सुहास्य वदनाने विचारते, ‘कोणी बसलंय का?’ मी प्रचंड तातडीने ‘जागा मोकळीच असल्याची’ ग्वाही देतो. मग ती पर्स ठेवते आणि ‘माझ्यासाठी ठेवा हं’ असं आर्जवाने सांगते. आता माझ्यासाठी ते अगदी धर्मकृत्य होऊन बसतं. ती तशीच पुढे जात पुढचं एक सीट काबीज करते आणि परत माझ्यापाशी येते. आता माझ्या शेजारी ती बसेल असे वाटत असतानाच पंचाऐंशी वर्षांचे, तोंडाचं बोळकं झालेले एक म्हातारबुवा हळूहळू काठी टेकवीत तोपर्यंत तेथे अवतीर्ण झालेले असतात. ती पर्स उचलते, आणि ‘आजोबा, बसा इथे’ असं म्हणत त्यांना बसवते. माझ्याकडे पाहून स्मितहास्य करत ‘थॅक्स हं’ म्हणते. मी घशात दाटून आलेला आवंढा मनातल्या संतापासोबत गिळून चेहर्यािवर त्याक्षणी अत्यंत अवघड वाटणारं हास्य आणतो. आजूबाजूंच्या प्रवाशांच्या चेहर्यातवरही वेगळं हास्य फुलल्याचं मला जाणवतं. संपूर्ण प्रवासात आजोबा अनेक प्रकारची माहिती मला देतात आणि विचारतात. अनेकदा डुलकी आल्याने माझा खांदा हक्काची उशी किंवा लोड समजून वापरतात. पायाला कळ आली म्हणून पाय वर घेऊन मांडी घालून माझ्या इस्त्रीच्या पँटला पदस्पर्श करून पावन करतात. प्रवास संपल्यावर घाईने उतरावं म्हणून मला उठायचं असतं पण मागून त्यांची चतुर नात येईपर्यंत तसेच बसून राहतात. गाडी थांबल्यापासून पंधरा-सतरा मिनिटांनंतर गाडीतून उतरणारा सर्वांत शेवटचा प्रवासी मी असतो. असतो एकेकाच्या नशिबी हा योग.
पवित्र पिंक तनुस्नान योग :
हा थोडासा वेगळा योग आहे. आपण बसमधले प्रवासी असो वा नसो आपल्याला हा योग अनुभवता येतो. उत्तम कपडे घालून आपण प्रवासास वा बाहेरच्या कामास तातडीने तयारी करून निघतो. बसमध्ये वा मोटारसायकलवर बसतो. डोक्यात कामाचे विचार असतात. मनोवृत्ती उल्हसित झालेल्या असतात. भरपूर नफा होईल, प्रसिद्धी मिळेल, बॉसची शाबासकी मिळेल, ऑफिसमधली सहकारिणी हसून हस्तांदोलन करेल असे विविध आनंददायी विचार वेगवेगळ्या पद्धतीने आपण करीत असतो. तेवढ्यात आपण बसमध्ये असू तर पुढच्या बाजूने खिडकीतून अचानक काही ओल्या द्रवाचे शिंतोडे आपल्यावर उडाल्याचे आपल्याला जाणवतं. आपण एकदम गांगरतो-थरारतो. ती चिकट भावना जाणवे जाणवेपर्यंत आपल्याला ती तीन प्रकारे लक्षात येते. १) हा द्रवपदार्थ विड्याच्या पानापासून निर्माण झालेल्या मुखरसाचा आहे, २) हा द्रवपदार्थ ‘लाळ-थुंकी’ या मुखकमलातील अलवार तुषारांचा आहे, ३) आणि हा द्रवपदार्थ ‘उलटी’ नामक किळसवाणा पदार्थ आहे. ही जाणीव आपण बसच्या शेजारून मोटारसायकलवर बाजी मारल्याच्या मनोवस्थेत जात असतानाही आपल्याला होऊ शकते. बसमध्ये असलो वा बाहेर असलो तरीही हे मुखतुषार कोणाचे आहेत हे आपल्याला समजत नाही. तुषार काही प्रमाणात असतील तर त्याकडे दुर्लक्ष करता येतं. थोडेसे अधिक प्रमाण असेल तर खिशातल्या नव्या रुमालाने ते पुसणं हा उपाय आपल्या हाती असतो पण त्यापेक्षा अधिक प्रमाण असेल तर कपडे बदलणं हाच एक उपाय हाती उरतो. जो प्रत्येक वेळी शक्य होईलच याची कोणतीही खात्री देता येत नाही. चिडचिड-वैताग आणि किळस या तीन भावावस्था या योगाद्वारे प्राप्त होऊ शकतात.
वाहन बिघाड योग-
हा खरं म्हणजे योग नाही तर ‘योगायोग’ आहे. सुंदर रांगोळीसारखं सगळं उत्तम जुळून आलेलं असतं. गाडी सुपरफास्ट असते. शेजारी उत्तम सहप्रवासिनी येऊन बसलेली असते, वातावरण सुरेख असतं. आपण मनोमन खूष असतो आणि एवढ्यात अचानक षडज् लागलेल्या गाडीचा स्वर मधूनमधून खर्जात जाऊ लागतो आणि मिनिटा – दोन मिनिटांत पूर्णपणे अतिखर्जात जाऊन ती रस्त्याच्या कडेला मौनावस्थेत उभी राहते. घाईगर्दीने चार-सहा उत्साही वीर खाली उतरतात. काही वेळ जातो, मग एकेकजण उतरत उतरत गाडी रिकामी होते. थोड्या वेळाने गाडी बंद पडण्याची काही नेहमीची कारणं कानावर पडू लागतात. रेडिएटर गरम झालं आहे, ऑईल निघालं आहे, चाक पंक्चर झालं, पाटा तुटलाय, वायरिंग जळालं अशी कारणं ऐकत-ऐकत हळूहळू धीर सुटत जातो. इस्त्रीचे कपडे मलूल होतात. मनाला चिडचिडीने ताब्यात घेतलेलं असतं. कंडक्टर-ड्रायव्हर गाडी सुरू करण्याचे प्रयत्न करीत असल्याने त्यांच्यावरही राग काढता येत नाही. बराच वेळ गेल्यावर कोणीतरी ‘कंडक्टर साहेब, आम्हाला दुसर्यां गाडीत बसवून द्या’ असा तोडगा सुचवतात. कंडक्टरला तेच हवं असतं. पस्तीस-चाळीस प्रवाशांचा वैतागलेला लोंढा त्याला घालवायचाच असतो. तो लगेच जाणार्याा-येणार्याप गाड्यांना हात दाखवू लागतो. काही थांबतात, काही वाकुल्या दाखवून पुढे जातात. हळूहळू प्रवाशांची संख्या घटत जाते. आपलीच गाडी ठीक होईल असं वाटणारे माझ्यासारखे काही प्रवासी वाट बघत असतात. पण शेवटी ड्रायव्हरने हात टेकलेले दिसतात आणि मग एखाद्या बसची वाट बघण्यास प्रारंभ करावा लागतो. दोन-तीन बस गेल्यानंतर एक बस थांबते, तिच्यात घाईगर्दीने चढल्यावर बस लगेच निघते. आपण पुढे सरकल्यावर लक्षात येतं या बसमध्ये एकही जागा नाही. संपूर्ण बस कुत्सित नजरेने आपल्याकडेच बघत असते. हा एक मौजेचा अनुभव आहे असं आपल्याला स्वत:ला समजवावं लागतं.
प्रतीक्षा योग –
हा एक सर्वसाधारण योग आहे. आयुष्य ही एक लांबलचक प्रतीक्षा आहे, असं कोणीतरी म्हटलेलं आहे, ते बसस्टँडवर अचानकपणे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात खरं वाटू लागतं. कारण आपण प्रवासाला निघतो आणि आपल्याला जावयाचं गाव सोडून इतर सगळ्या गावांकडे जाणार्याा गाड्या आपल्या समोरून जा-ये करीत असतात. ‘आता येईलच’ हे वाक्य ‘चौकशी’ खिडकीत बसलेल्या माणसाने माझ्यासह अनेकांना तीस-चाळीस वेळेस सांगितलेलं असतं. पण दीड तास झाला तरी आपली गाडी काही येत नाही. खरं तर दुसर्यास अनेक गावांहून येऊन आपल्याला हव्या असणार्याप ठिकाणी जाणार्याय अनेक गाड्या येणार असतात पण आज त्यांनी न येण्याचं जणू ठरवूनच घेतलेलं असावं असं वाटतं. बर्यागच वेळाने आपल्याला हवी असणारी गाडी दिसली की स्वर्गाचं दार दिसल्याचा आनंद होतो. पण असाच आनंद अनेकांना झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. कारण गेले दीड-दोन तास विनागाडी गेलेला वेळ भरपूर प्रवासी गोळा करणारा ठरतो. दीड फूट रुंद असलेल्या दाराजवळ साडेतीन – चार फूट रुंद गर्दीचा लोंढा अक्राळविक्राळपणे वर चढण्यासाठी उभा राहतो. त्यामुळे उतरणार्यास प्रवाशांना उतरता येत नाही आणि त्याशिवाय खालचे प्रवासी वर चढू शकत नाहीत. या ताणाताणीत बराच वेळ जातो. शेवटी वरच्या प्रवाशांना थोडीशी वाट करून दिली जाते. त्या अरुंद वाटेने हिसडे खात वरचे प्रवासी अपशब्द उच्चारीत खाली उतरतात. शेवटच्या दोन – तीन प्रवाशांना प्रचंड संघर्ष करीत खाली उतरावं लागतं. दरम्यान, चतुर प्रवासी आपल्या छोट्या पिशव्या, रुमाल, टोप्या असं काहीबाही सामान सीटवर अगोदरच टाकून देतात. या सर्व हिसकाहिसकीचा धसका घेऊन आपण पाठीमागेच थांबतो. गाडी पाच मिनिटांतच भरते. अर्थात आपल्याला आतमध्ये जागा नसतेच. मग पुढच्या गाडीची वाट बघावी लागते. पण मग एकापाठोपाठ एक गाड्या येत जातात. आपल्याला जागाही मिळते, या योगात ‘वेळेचं खोबरं होणं’ हा एक तोटा असतो.
उर्वरित पैसे विसर योग :
हा योग सगळ्यांच्याच नशिबी नसतो. कमनशिबी लोकांना या योगाचा अनुभव घ्यावा लागतो. रात्रीपर्यंत पैसे सुटे करून घ्यायचं अगदी घोकलेलं असतं. पण वेळेवर विसर पडतो आणि सकाळी लवकर प्रवासाला बाहेर पडावयाचं असतं. गाडीत बसल्यावर पाचशेची नोट आपण बाहेर काढतो, पण कंडक्टरकडे सुट्टे नसतात. तो सुट्टे मागतो आणि आपल्याकडे सुट्टे नसतात. मग त्याचे ‘सकाळी सकाळी सुट्टे कुठून आणायचे, मला अनेकांना तोंड द्यावे लागते, लोकांना समजत नाही’ अशा प्रकारची अनेक मर्मभेदी वाक्यं असणारं स्वगत आपल्याला नाहीच अशी समजूत करून ऐकावं लागतं. शेवटी खूप उपकार केल्यासारखं तो आपली ती नोट स्वीकारतो आणि फक्त तिकीट देतो. ‘उरलेले पैसे उतरताना मागून घ्या’ असा आदेश आपण निमूटपणे स्वीकारतो. त्याच्या बडबडीने झालेला मनस्ताप विसरण्यासाठी आपण डोळे मिटतो परंतु रात्री दीडपर्यंत बघितलेल्या सिनेमामुळे ते मिटलेले डोळे ‘येगं येगं गाई’ जे सहजपणे म्हणतात, ते थेट उतरण्याच्या ठिकाणापूर्वी पाच मिनिटं आधी उघडतात. आपण भोवती पाहिल्यावर घाईगर्दीने बॅग उचलतो आणि धडपडत स्टँड आल्याबरोबर खाली उतरून कामाच्या तंद्रीत चालायला लागतो. तीन-चार तासांनंतर कोणाशी गमतीजमतीत पैशांचं बोलणं होतं आणि लख्खकन् ट्यूब पेटते. पाचशेच्या नोटेतील दोनशे चाळीस रुपये कंडक्टरकडे राहून गेलेले असतात आणि गाडी सहा तास प्रवास करून कुठल्या कुठे पोहचलेली असते. कपाळावर हात आणि तोंडावर बुक्के मारणंही शक्य होत नाही. हा योग केवळ बसमध्येच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणीही येऊ शकतो.
खिसाकर्तन/सामान हरव योग :
हा योग आणि ‘उर्वरित पैसे विसर योग’ थोडेसे सारखेच योग आहेत. दोन्ही योगांमध्ये आपला बावळटपणा आपल्याला भोवतो. गाडीत चढताना उभा असणारा गर्दीचा लोंढा आपल्याला पुढे -पाठीमागे रेटतो, लोटतो आणि आपण खूप प्रयत्नपूर्वक वर चढतो. सामान ठेवतो. जागा मिळवतो. गाडी निघते. कंडक्टर जवळ येतो. आपण पैसे काढण्यासाठी खिशात हात घालतो, तेव्हा पाकीट गेल्याचं आपल्या लक्षात येतं. महत्त्वाची कागदपत्रं पाकिटात असतात. आपल्या डोळ्यासमोर दिवसा काजवे चमकतात. वर चढताना गर्दीतल्या कोणीतरी हे केलेलं असतं. हे झालं नाही तर मग आपल्याला प्रवासात लागलेल्या झोपेचा फायदा शेजारी बसलेल्या प्रवाशाने घेतलेला असतो. एकूण एकच झालेलं असतं. या योगाची दुसरी बाजू अशीच डागण्या देणारी असते. गाडीत गर्दी असते. प्रवास लांबलेला असतो. प्रत्येकाला घाई असते आणि अशा परिस्थितीत तीन-चार बॅगांपैकी एक बॅग गाडीत राहून जाते, एखादी बॅग अदलाबदल होते किंवा एखादी बॅग आपलेपणाने कोणीतरी सहजगत्या घेऊन जातो. तिन्ही शक्यतांचा परिणाम एकच होतो, पश्चात्ताप! अर्थात, तो घटनेच्या पश्चात असल्याने त्याचा फारसा उपयोग होत नाही. पैसे वा सामान यांचं नुकसान या योगामध्ये ठरलेलं असतं. काहींना या योगाचा सामना करावा लागतो.
अतिनिद्रासंचार योग :
रात्रीच्या प्रवासात या योगाचा अनुभव येणं अधिक शक्य असतं. अर्थात दिवसा असा अनुभव येणारच नाही, असं सांगता येत नाही. काही प्रवाशांची झोप सावध असते तर काहींना गाडी सुरू झाल्यावर निद्रादेवी प्रसन्न होते. तिकीट काढून झोपलेला प्रवासी दोन-तीन तास आहे, या भरवंशावर झोपतो आणि तो उतरण्याचं ठिकाण निघून गेल्यावर तासाभराने उठतो. मग आलेल्या ठिकाणी उतरून परत उलटा प्रवास करण्याशिवाय त्याला पर्याय नसतो. काही वेळा परतीच्या प्रवासातही डोळा लागल्याने उलट्याच दिशेने अजून प्रवास होऊन जातो. मग असे दोन-तीन हेलपाटे मारल्यावर त्याला इप्सित ठिकाणी उतरणं शक्य होतं. अशा प्रवाशांची नातेवाइकांत कुचेष्टा होते. घरचे अशा प्रवाशावर विश्वास टाकण्यास तयार नसतात. त्याच्या झोपेवरून नाही नाही ते ऐकून घ्यावं लागतं. मात्र या योगाचे मानकरी कमी असतात.
अपमान योग :
हा अनेक प्रकाराने दुधारी योग आहे. गोड बोलणारा आणि तिखट बोलणारा अशा दोन्ही प्रवाशांना हा योग अनुभवावा लागतो. कंडक्टर आणि सहप्रवासी यांच्याकडूनही याचा अनुभव येऊ शकतो. बसमध्ये येणार्याव वस्तू-विक्रेत्याकडूनही अपमानयोगाचे ग्रह चालून येतात. ड्रायव्हर हा एक महत्त्वाचा घटक या योगाचा कारक आहे. हो योग न आलेला प्रवासी विरळाच म्हणावा लागेल.
प्रवासास प्रारंभ केल्यापासून प्रवास संपेपर्यंत अपमानाचे ढग केव्हा दाटून येतील हे सांगता येत नाही. रिमझिम शिंतोड्यांपासून मुसळधार वर्षावापर्यंत वेगवेगळे अनुभव या योगाद्वारे प्राप्त होतात. शेजारी बसलेल्या प्रवाशाला लागलेला किंचितसा धक्का, कंडक्टरला देण्यासाठी नसलेले सुट्टे पैसे, धान्याचं वाटेत ठेवलेलं पोतं वा कुठल्याही खात्यात न बसणारी अवाढव्य बॅग, गळणारी पाण्याची-दुधाची-तेलाची वा कुठल्याही द्रव पदार्थाची बरणी, वात्रट, अतरंगी मुलगा वा मुलगी, चुकून एखाद्या प्रवाशाच्या पायावर चपलेसह पडलेला पाय अशी असंख्य कारणं अपमान योग ओढून आणतात. ‘साहेब जरा सरकता का?’ एवढ्या साध्या प्रश्नाचं उत्तर ‘मी काही कायमचा इथेच उभा रहायला आलेलो नाही’ असंही येऊ शकतं, याची कल्पनाही आपण केलेली नसते. विनंती थांब्यावर गाडी थांबविण्यासाठी केलेली विनवणी ड्रायव्हर ज्या अर्वाच्चपणे नाकारतो, तो अपमान योग सगळ्यात खडतर म्हणायला हवा.
अपमान योग गिळण्याशिवाय पर्याय नसतो. दिवस खराब असेल तर अपमानयोग अधिक बोचरा वाटतो. या योगाला शिताफीने पाठ दाखविता आल्यास उत्तम!
निसर्गहाक निकड योग :
हा एक अत्यंत नकोसा आणि लाजिरवाणा योग! हा प्रत्येकासाठीच येऊ शकतो पण सुदैवी प्रवाशांना याचा त्रास होत नाही. या योगाला नशिबाने चावट किनार दिलेली आहे. त्यामुळे आपली पंचाईत आणि दुसर्यारसाठी हसं असा काहीतरी विचित्र प्रकार निर्माण होतो. घरून सगळे नैसर्गिक विधी उरकून प्रवासाला निघालं तरी थोडा प्रवास झाला की एक वेगळी भावना शरीरात निर्माण होऊ लागते. ही बोचरी जाणीव प्रारंभीच भीती निर्माण करून ठेवते. गाडी थांबेल का नाही या चिंतनात ही जाणीव अधिकच बोचरी होत जाते. रस्त्यावरच्या खाचखळग्यांनी ‘निसर्गहाक निकड योग’ जास्त जास्त प्रबळ होऊ लागतो. प्रवास थांबवण्याची निकड यातून निर्माण होते. भर प्रवासात गाडी थांबविण्याची पाळी येणं हे तर अगदीच लाजायला लावतं. असा प्रवासी दाराजवळच उभा राहतो. अनमोल उपकार केल्याच्या आविर्भावात ड्रायव्हरदादांनी गाडी थांबवली की हा उभा प्रवासी पळतच सुटतो. तो गेल्याची खात्री पटली की ‘खरं तर गरज नाही पण आता थांबलीच आहे गाडी, तर जाऊन यावं’ असा साळसूद चेहरा करीत बरेच प्रवासी खाली उतरतात. काही पाय मोकळे करण्याच्या बहाण्याने साठलेला द्रवपदार्थ मोकळा करतात.
‘निसर्ग हाक निकड योग’ शत्रूवरही येऊ नये असं हा योग आला की वाटू लागतं. गाडी थांबणं, जागा उपलब्ध होणं, कमी वेळात कारभार उरकण्याची चपळाई दाखवणं, कपडे खराब होऊ न देणं अशी अनेक व्यवधानं या योगाने सांभाळण्याची जबाबदारी आपोआपच येतेे.
एकंदरीत थोडासा नाजूक, थोडासा लाजिरवाणा, थोडासा अवघड, थोडासा विचित्र पण प्रचंड गरज निर्माण करणारा हा योग सार्याा प्रवासी योगांचा राजा म्हणावा लागेल.
एकंदरीत असे दहा प्रवासी योग आपल्या आयुष्यात प्रवासाच्या दरम्यान येत असतात. या योगांना कसं सामोरं जायचं आणि सन्मानाने यांना कसं परतवायचं, हा ज्याच्या त्याच्या कसब आणि वकूबाचा भाग आहे, यात संदेह नाही.

डॉ. विनोद गोरवाडकर, नाशिक
nagaraweekly@gmail.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.