Now Reading
एक व्हिसा कसाबसा…

एक व्हिसा कसाबसा…

Menaka Prakashan

‘दुपारी १ ते ४ झोपण्यायोग्य शहर’ म्हणून लोक उगाचच त्याची चेष्टा करायचे. जगात खर्यापचा न्याय नाही हेच खरं! पण एवढं झोपूनही सहज पहिला नंबर येतो म्हटल्यावर पुण्याला एकदम जाग आली, आणि तिथल्या लोकांनी बाहेरच्यांसाठी पुण्यात राहायला येताना सरळ व्हिसाच सुरू केला. पुण्यानं एकच व्हिसा लावला आणि नाव दिलं ‘कसं B काय B व्हिसा!’

नव्या कॅलेंडरवर नव्या वर्षाची पहिली तारीख झळकली. १ जानेवारी २०२५. सकाळी उठल्यावर डोळे चोळत चोळत बाहेरच्या खोलीमध्ये आलेल्या टेम्बा रबाडानं ती पाहिली आणि तो एकदम आपल्या आईला म्हणजे सेरेना रबाडाला म्हणाला, ‘‘न्यू इयर ग्रेट. आई, मी यंदा नक्की पुण्याला शिकायला जाणार म्हणजे जाणारच हं.’’
‘‘तू ठीक जाशील रे टेम्बा, पण व्हिसा मिळायला हवा ना त्या मेल्या पुण्याचा.’’
‘‘मिळेल.’’
‘‘कसा? आपोआप?’’
‘‘नाही नाही. मी मेहनत घेईन त्यासाठी. जिवाचं रान करेन. आणि हे बघ, थबंगला पुण्याचा व्हिसा मिळाला मागच्या वर्षी, कागिसोला मिळाला, एन्सोबेलापण मिळाला… मग मलाच का मिळणार नाही?’’ टेम्बा हिरिरीनं म्हणाला. तो होता हरारेचा. थबंग होता प्रिटोरियामधला. कागिसो केपटाऊनचा. एन्सोबे बोट्स्वानाचा. आणि हे सगळे होते दक्षिण आफ्रिकेत वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे मित्र!

झालं काय होतं की, २०१८ साली इंडियामधलं पुणं हे शहर जगातलं पहिल्या क्रमांकाचं राहण्यायोग्य शहर म्हणून जाहीर झालं होतं. त्याआधी ‘दुपारी १ ते ४ झोपण्यायोग्य शहर’ म्हणून लोक उगाचच त्याची चेष्टा करायचे. जगात खर्यांचा न्याय नाही हेच खरं! पण एवढं झोपूनही सहज पहिला नंबर येतो म्हटल्यावर पुण्याला एकदम जाग आली आणि तिथल्या लोकांनी बाहेरच्यांसाठी पुण्यात राहायला येताना सरळ व्हिसाच सुरू केला. पूर्वी अमेरिका कशी, बी १, एचवन बी वगैरे व्हिसे लावून प्रवाशांचे खिसे मोकळे करायची. त्यापेक्षा पुण्यानं एकच व्हिसा लावला आणि नाव दिलं ‘कसं इ काय इ व्हिसा!’ कोणतीही गोष्ट सोपी आणि सुटसुटीत करावी तर ती पुण्यानंच! अमेरिकेसारखे चावट देश एवढी वर्षं उगाचच एका व्हिसाची नाना नावं आणि रूपं प्रचलित करून लोकांना ‘कासाव्हिसा’ करत आले होते. काय तर म्हणे, वर्क परमिट, डिपेण्डण्ट व्हिसा, ग्रीन कार्ड, ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (ज. ख. उ.) कार्ड, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन (झ. ख. ज.) कार्ड… माणसा-माणसांत भेदभाव करण्याची किती वाईट सवय होती ती! पुण्याला याची कशाची गरजच वाटली नाही. सगळा मामला कसा खुल्लम् खुल्ला!
‘‘वर्क परमिट हवं कशाला? इथे कोण लेकाचा मान मोडून कामं करणारे?’’ या एका वाक्यात वर्क परमिटचा प्रश्नर मिटला.

‘‘ग्रीन कार्डाचा हिरवटपणा आम्हास नका सांगू! इकडे सगळं पुणं ग्रीनच ग्रीन (होतं!). त्या चतकोरभर कार्डासाठी झुरायला आम्ही काय वाळवंटात राहणारे लोक आहोत?’’ या शेर्या मध्ये ग्रीन कार्डावर बोळा फिरला. कशावरही हातोहात बोळा फिरवण्यातलं या गावचं कसब असं ठिकठिकाणी दिसून आलं. ‘डिपेण्डण्ट व्हिसा’ या कल्पनेवर तर सगळे खो खो हसले. पुण्यात राहायचं आणि कोणावर तरी अवलंबून? माणसांसाठी, नियमांसाठी, कायद्यांसाठी, कोणाचंही- कोणावरही- काहीही- कधीही- जराही- चुकूनही- अवलंबून नसतं या तत्त्वावर तर वाटचाल केली या शहरानं! ‘वाट लावली’ असं म्हणण्याची चाल काहींनी उगाचंच आणली होती. पण तो पहिला नंबर आला आणि चक १२ चा तोरा एकदमच वाढला. वाढला… वाढला म्हणजे किती? तर तो थेट आफ्रिकेपर्यंत पोचला. विशेषतः दक्षिण आफ्रिकेत! इतकी वर्षं तिथले लोक प्राणी मारून मांस भाजून तरी खायचे, नाहीतर क्रिकेट तरी खेळायचे. त्यांच्याकडे शिक्षणाच्या सोयी तशा कमीच. येल कॉर्नेल, इंडियाना, मॅसॅच्युसेट्स वगैरे युनिव्हर्सिट्यांची नावं त्यांना माहीत असत. अगदीच नाही असं नाही, पण त्या विद्यापीठांचे नियम फार कडक असत. अभ्यासक्रमच काय नेमून देतील, मुलांवर वर्गात बसण्याची सक्तीच काय करतील, पास-नापासचे शिक्केच काय मारतील… नापासांना खालीच काय ठेवतील… पुण्यात दिवसेंदिवस हा मागासलेपणा कमी होत चालला होता. खूप खासगी शिक्षणसंस्था होत्या. प्रचंड फिया घेऊन डिग्या वाटत होत्या. एकदा भरघोस फी घेतली की ‘खाल्ल्या अन्नाला जागलो’ या धोरणानुसार प्रत्येकाला पासच करत होत्या. काही शिक्षणसंस्था तर विद्यार्थ्यांच्या कलाकलानंच चालत होत्या. आपल्याला काय अभ्यास झेपेल, कधी करता येईल, मास्तर कोण हवेत, हवेत की नकोतच, हजेरी भरवावी की नाही, सगळं विद्यार्थ्यांवर सोडायच्या. उगाच त्यांच्या भावना दुखवायला नकोत. काही काही विद्यार्थ्यांना तर अॅीडमिशन दिल्यावर पाच-सात वर्षांनी प्रिन्सिपॉलच घरी जाऊन पदवीची गुंडाळी द्यायचे. इतके विद्यार्थी त्यांना गुंडाळू शकायचे.

तर अशा या ‘विद्यार्थीस्नेही’ म्हणजे स्टुडंट फ्रेंडली आणि शिस्तद्वेष्ट्या म्हणजे अँटिडिसिप्लीन शहरामध्ये एक ना एक दिवस आपण जाणारच अशा हट्टाला टेम्बा पेटला. तेव्हा त्याची आई सेरेना, नाही म्हटलं तरी, काळजीत पडली. आफ्रिकन असली तरी ती आईच होती, सतत मुलाची फिकीर करणारी आणि आफ्रिकन असला तरी तो मुलगाच होता, आईबाबत बेफिकीर!

‘‘अरे टेम्बा, नको रे भलतीकडे पुण्याबिण्याला जाऊस. तिथे ते पुणेरी जेवण तुला जेववेल का रे? खाण्यापिण्याचे हाल होतील तुझे.’’
‘‘तो प्रश्नलच नाही गं आई. आता पुण्यात पुणेरी जेवण मुळी मिळतच नाही. मी इंटरनेटवर सर्च मारत असतो ना सारखी. एफ. सी. रोड म्हणजे ‘फूडक्रेझी रस्ता’ म्हण किंवा जे. एम. रोड म्हणजे ‘जेवा मरेपर्यंत’ रस्ता म्हण… तिथे जगभरातलं फूड मिळतं आई.’’
‘‘असेल… पण आपलं… आपल्यासारखं…’’
‘‘मागच्याच आठवड्यात मी तुला फोटो नाही का दाखवला? आपला एन्सोबे त्या जे. एम. रोडवर बोटं चाटत चाटत बोट्स्वाना थाळी संपवत असतानाचा? पुण्याची व्हिजन फार विशाल आहे आई… निदान खाण्याबाबत…’’

(हे सगळं ते दोघं साहजिकच आफ्रिकी भाषेतच बोलत होते, पण वाचकांना ती कळणार नाही म्हणून मला नाइलाजानं मराठीत लिहावं लागतंय याची नोंद घ्यावी. ज्यांना मराठीच कळत नसेल त्यांनी दुभाष्या ठेवून याचा सुलभ आफ्रिकी अनुवाद करून घेण्याचं करावं ही वि. अशा अनुवादाच्या सोयीसाठी भेटा- लँगलोब ऊर्फ ग्लोबल लँग्वेज सेंटर. आमचे इथे हृदयाची भाषा सोडून जगातल्या कुठल्याही भाषेचं अन्य कोणत्याही भाषेमध्ये केव्हाही, काहीही करून मिळेल. आमचा पत्ता ः लँग्लोब, सिस्टीन चॅपेल, फुटक्या बुरुजाजवळ, चणे आळी, पुणे. आमची कोठेही शाखा नाही.)

गेली काही वर्षं पुण्यामधल्या इमारतींची, हॉटेलांची नावं अशीच इंटरकॉण्टिनेण्टल असत. टॉवर, हाईट, प्लाझा, एडिफिस, बुलेव्हार्ड तर झालंच, पण सेण्टोसा सेरेनाड काय, सिस्टीन चॅपेल काय, व्हाऊट हाऊस काय… चमत्कारिक नावं ठेवण्याची हौस वाढतच चालली होती. ईशकृपा आणि मातृस्मृती छाप नावाची घरं स्मृतीतूनही घालवायला निघाले होते सगळे! पुण्याला जुनं काही नको होतं आणि जगाला पुण्याखेरीज काही नको होतं असा सगळा प्रकार.
म्हणून तर टेम्बा इरेला पेटलेला. मनात पक्कं धरून पुण्याचा व्हिसा मिळवणारच. पुण्यात शिकायला जाणारच. त्याच्या मनात होतं तिथे ए. बी. युनिव्हर्सिटीमध्ये शिकायचं. ही ‘ऑल द बेस्ट युनिव्हर्सिटी’ सध्या चांगलीच चर्चेत होती. खरी ती सुरू केली होती आटपाटी बुद्रुकच्या काही धडपड्या लोकांनी. ती ए. बी. ही गावाची आद्याक्षरं त्यांनी ‘ऑल द बेस्ट’मध्ये वळवून घेतली होती. कॉलेजं काढायला डोंगरचे डोंगर विकत घेत ती मंडळी. डोंगराएवढं शिक्षण काय आणि डोंगरावरून शिक्षण काय, त्यांना सगळं सारखंच वाटे. मजबूत मार्केटिंग केलं की झालं! घोषवाक्यही सोपंच. ‘टिकेल तो शिकेल’. जो पुण्यात, आमच्या संस्थेसारख्या संस्थेत टिकेल तो सगळं आपोआपच शिकेल आणि ऑफर कशाची? तर ‘जेवढ्या जास्त वर्षांच्या फिया प्रवेशाच्या वेळी भराल, तेवढ्या संख्येनं आम्ही तुम्हाला संस्था सोडताना पदव्या देऊ.’ जसे, तीन वर्षांची फी एकदम भरणार्यायस किमान तीन पदव्यांची हमी! तेव्हा आता फक्त पुण्याचा व्हिसा मिळवून तिथे पोचण्याचीच हमी होती.

म्हणून मग टेम्बा हात न धुताच पुण्याच्या व्हिसाच्या मागे लागला. जुन्या अडाणी काळात तरुण मित्रमंडळी नेहमी एका ना एका गेटवर भेटत. आता ती नेटवर भेटायची. तसा टेम्बा वरचेवर कागिसोला, एन्सोबेला आणि थबंगला नेटवर भेटायला लागला. किती झालं तरी ते अनुभवी होते. पुण्याचा व्हिसा कोणी दोन, कोणी चार-पाच प्रयत्नांमध्ये का होईना, मिळवला होता. पुण्याचा व्हिसा एकदा मिळवल्यावर चंद्राचा वेगळा व्हिसा काढावा लागत नाही ही फार मोठी सोयही पदरात पाडून घेतली होती.
‘‘आता एवढा युनिव्हर्सल व्हिसा आहे म्हणजे फी फार जास्त असणार रे. आपल्याला परवडेल का ती?’’ टेम्बाच्या आईनं जरासं भेदरूनच विचारलं, तर टेम्बा हसायला लागलं. आईनं गोंधळून विचारलं, ‘‘हसतोय का टम्बुड्या?’’
‘‘अगं आई, तुझ्या अज्ञानाला हसू नको तर काय करू? पुण्यात राहायला मिळणं हे अमूल्य नाही का गं? त्याला उगाच पाच-सात हजार फी लावून पुण्याचं अवमूल्यन करायला तयार होतील का तिथले लोक?’’
‘‘असं असतं होय? फारच बाई जगावेगळं.’’
‘‘पुणं म्हणजे जगावेगळेपण गृहीत आहे आई. मुळात पुणेकरांसाठी पुणं हेच जग, विश्वा असतं. या भक्कम आधारावर इंग्लंड, अमेरिका यांसारख्या छोट्या छोट्या देशांना फाट्यावर मारणं त्यांना हातचा मळ वाटतो.’’
‘‘मग व्हिसा इंटरव्ह्यू फार कठीण ठेवला असेल.’’
‘‘छ्या! त्यांनी दोन-चार टेस्ट्स ठेवल्या आहेत असं ऐकलं. सगळे देश व्हिसाचे लांबच लांब अर्ज भरून घेतात ना? मग आम्ही अर्ज गाळू. थोड्या अडथळ्याच्या स्पर्धा घेऊ असं काहीतरी आहे म्हणे.’’
‘‘बघ बाबा! काहीही करून तिकडे जायचंच म्हणतो आहेस… तर…’’
‘‘एकदा तिथे गेलो, राहिलो की मी जगात कुठेही राहायला फिट होईन आई. या दृष्टीनं बघायचं त्या अनुभवाकडे.’’
‘‘हो का? असेल बाबा. मला मेलीला काय कळतंय? पण एकेकदा वाटतं, तुझे मित्र तरी उपरेच तिथे. आत्ता आत्ता गेलेले. जुने पिढीजात पुणेकर कोणी भेटले असते तर तुला…’’
‘‘आता तेवढ्यासाठी अमेरिकेला कुठे जाऊ आई?’’
‘‘म्हणजे काय?’’
‘‘अगंऽ एन्सोबे म्हणत होता, खरे अस्सल पुणेकर आता फक्त न्यू जर्सीला नाहीतर ओटावाला राहतात.’’
‘‘आणि तिथे राहून करतात काय?’’
‘‘वर्षभर एन्जॉय करतात. वर्षातून दोनदा काहीतरी रडकी-क्वीअर साँग्ज म्हणतात… सागरा प्राण तळमळला… समथिंग समथिंग…’’
‘‘रिपब्लिक डेला. तेव्हा त्यांना त्यांची कंट्री फार आठवते ना… म्हणून…’’
टेम्बा रबाडानं इंडियाबद्दल, पुण्याबद्दल बराच रिसर्च केलेला स्पष्टच दिसत होता. याचा एक शतांश अभ्यास त्यानं त्याच्या गावच्या शाळा-कॉलेजात केला असता तर एवढी वर्षं प्रत्येक परीक्षेत त्याचा ‘हरारे’ झाला नसता. पण मुलांनी आपल्या घरी असताना अभ्यास सोडावा आणि गाव सोडला की एकदम अभ्यासाचा नाद धरावा हे जुनं वळण अजून टिकून होतं, त्याला बिचारी सेरेना तरी काय करणार?’’
तिकडे टेम्बाचे मित्र त्याच्या मनावर सारखं बिंबवत होते. एकदा पुण्याला येऊन धडक. पुढे फार काही केलं नाहीस तरी वेळ छान जाईल. कुठेतरी पी. जी. अकोमोडेशन मिळवायचं. मग अमरपट्टा मिळालाच म्हणून समजायचा. ना तो घरमालक काही करू शकणार, ना त्याचे सोसायटीवाले, ना पोलिस, ना म्युनिसिपालटी, ना क्राईम बँचवाले! रात्र-रात्र धुडगूस घालायचा. रस्त्यांवर टोळक्यानं फिरायचं. कंपनी द्यायला कोणी कोणी पोरी मिळतात. स्वतःहून मिळाल्या नाहीत तर धमकावून मिळवता येतात. मध्येच कोणाला फारच सांस्कृतिक पुळका आला तर त्यांच्यापैकीच दोघी-चौघींसमोर चेहरे पाडून बसून राख्या बांधून घ्यायच्या, ओवाळून घ्यायचं. तिकडे आरतीचे दिवे विझले की इकडे आपण दिवे लावायला मोकळे! हातावर राखी पाहिली की बेडी ठोकायला पोलिसही पटकन तयार होत नाही. अशी चौफेर सोय. पुणे तिथे सोयीत काय उणे? फक्त तिथे जाणं व्हायला हवं! तेही यंदाच. उगाच पुण्याचा महापौर बदलला, त्यानं उगाच इमिग्रेशनचे नियम बदलले तर काय करा? मागे एकदा मेट्रो सुरू करताना ते सारखे नियम बदलायचे. एक नियम लोकांना कळेकळेपर्यंत दुसरा जारी झालेला असे. लोक बेजार व्हायचे. पण ते सगळे पक्के पुणेकर होते. त्यांना गैरसोयींची सवय झालेली होती. टेम्बा जात्या जंगली वातावरणातला! त्याला शिस्तीची सवय. पुण्याची सवय लावण्यासाठी शिस्तीची सवय काढून टाकणं त्याला जास्त गरजेचं होतं. त्या दृष्टीनं तो तयारीला लागला.
सहसा कोणत्याही विदेशी दूतावासामधली माणसं खूप खडूस असतात. अमेरिकन दूतावासातली तर स्वच्छतागृहं स्वच्छ करणारी माणसंही ‘मी आहे म्हणून तुम्ही पोट साफ करू शकताय, विसरू नका’ असा एक आविर्भाव घेऊन फिरत असतात. तुसडेपणा, तुच्छता, हिडीसफिडीस करणं, रुबाब दाखवणं, याचं ‘प्रॉपर ट्रेनिंग’ घेऊनच या नोकर्यात देत असावेत असं वाटतं. पुण्याचा व्हिसा मिळवताना असं काही होईल का असा प्रश्नग टेम्बाला पडला होता, पण तो मित्रांनी लगेच सोडवला.
‘‘नाय रे… नाय… त्याची काळजी करू नकोस.’’
‘‘म्हणजे गोड बोलून व्हिसा देतात?’’
‘‘छ्या छ्या! तिथे भरपूर हड् हड् करतातच, पण होतं काय, की पुण्याला प्रत्यक्ष गेल्यावर जी वागणूक मिळते, तिच्यापुढे सगळंच गोड वाटतं.’’
‘‘जी… म्हणजे कशी?’’
‘‘ती अनुभवण्याची गोष्ट आहे. समोरचा माणूस हा हाडामासाचा माणूस नसून तो पोस्टाची पेटी आहे किंवा पाईपलाईनमधून फुटका म्हणून वगळलेला सिमेंटचा पाईप आहे असं मानण्यातून येतं सगळं.’’
‘‘हे कोणाला येतं?’’
‘‘तिथल्या बहुतेकांना येतं. ‘आम्ही इथे पत्ता सांगायला बसलो नाही’ किंवा ‘इथे सायकल लावलीत तर हवा सोडू’, ‘प्लेटमध्ये हात धुतल्यास आख्खं हॉटेल खराट्यानं धुवायला लावू’ अशा पाट्या यातूनच येतात.’’
मित्र टेम्बाची मानसिक तयारी करून घेत राहिले. आईचं आपलं स्त्रीसुलभ काळजी करणं सुरूच होतं. ‘इथून जाताना तुला मुंग्यांचं लोणचं सोबत देऊ का किंवा सापानं टाकलेल्या कातेमध्ये गुंडाळलेल्या कातरवड्या देऊ का वगैरे वगैरे!’

पुण्याचा व्हिसासाठी करायचा अर्ज तसा छोटा आणि सोपा होता. नाव, पत्ता, पुण्याला का जायचंय इतपतच माहिती मागणारा. उगाच तुमचं गेल्या पाच वर्षांचं उत्पन्न दाखवा, पुण्यात आल्यावर तुम्हाला गिळायला कोण घालणार हे सांगा वगैरे उचापती नाहीत. ‘धमक असेल तर या आणि राहा हवं तेवढं’ असा एकूण आविर्भाव. त्यामुळे टेम्बाला अर्ज भरायला काहीच अडचण आली नाही. प्रश्नव होता तो व्हिसासाठी असलेली चाचणी परीक्षा पास होण्याचा. जगापेक्षा आपलं वेगळेपण (पुन्हा एकदा) सिद्ध करण्यासाठी पुण्यानं एक व्हिसा टेस्ट बेतली होती. ती पार करणं महत्त्वाचं होतं. विशेष म्हणजे त्या टेस्टचा, चाचणीचा एकच एक ढाचा होता. व्हिसा ऑफिसच्या परिसरामध्ये आठ-दहा प्रकारच्या टास्क्स म्हणजे कसोट्या घेण्याची सोय केलेली असे म्हणे. त्या त्या वेळी ड्युटीवर असलेला ऑफिसर त्यातली एखादी टास्क पूर्ण करायला लावे. त्याचं समाधान झालं की व्हिसा मिळे. जिथल्या तिथे निर्णय कळे. एक घाव दोन तुकडे हे जुनं ब्रीद पुण्यानं इथेही पाळलं होतं.

टेम्बाला काळजी होती ती त्या चाचणी प्रकाराचीच. मित्र म्हणत होते, ते व्हिसावाले त्यांच्या ऑफिसच्या मागच्या भल्या मोठ्या पटांगणात वेगवेगळे सेट्स उभारून वेगवेगळ्या टास्कस करवून घेतात आणि आपल्या मर्जीप्रमाणे! एक चाचणी, एक नियम अशी भानगड नाही. जो तो आपल्या मनचा राजा! त्यामुळे तिथे काही खास पूर्वतयारी वगैरे करून जाता येत नाही म्हणे. आपण आणि आपलं नशीब. शेवटी तांबड्या जोगेश्व रीच्या मनात असेल तसं होणार!

कागिसोला टेस्ट आली होती ती बुवा कॉम्प्युटरवर सर्च मारून शंकरशेट रोडवर चायनीज खादाडीच्या किती गाड्या आहेत याचा आकडा सांग. त्यानं सांगितला. तो चुकला. कारण त्यानं कॉम्प्युटर बंद करून उत्तर देईपर्यंत दोन गाड्या वाढल्या होत्या. थबंगला विचारलं होतं की पुण्यात एका दुचाकीवर जास्तीत जास्त किती माणसं बसू शकतात ते सांग. त्यानं जिवाचा धडा करून सहा हा आकडा सांगितला, तर त्याला सात माणसं, एक कुत्रा आणि एक गॅस सिलेंडर असं घेऊन निघालेल्या बाईचा फोटोच दाखवला गेला. आता आपल्या वाट्याला कोणता प्रश्न येणार या चिंतेत टेम्बा चाचणीला जायला लागला. निघताना त्याच्या आईनं त्याच्या हातावर गेंडिणीच्या दुधाचं दही घातलं. एकूणच भारताच्या, पुण्याच्या संदर्भात गेंडा, गेंड्याची कातडी असे शब्द तिनं खूपदा ऐकले होते. तिनं आपली तिच्या पातळीवर दह्यापासून माफक सुरुवात केली.

व्हिसा अर्ज सादर केल्यावर मुलाखतीतून जाताना टेम्बा बर्यातपैकी नर्व्हस झाला होता. त्यांच्या देशाच्या क्रिकेट टीममध्ये सामावावा एवढा तो चांगला खेळाडू नव्हता आणि उरलेलं आयुष्य कुठे शिकारी करत, प्राण्यांचं मांस खात घालावावं एवढा तो मागासलेलाही नव्हता. यंदा पुण्याचा व्हिसा मिळाला नाही की त्याला पुन्हा झगडावं लागणार होतं. पुण्याची चैन खुणावत असल्यानं तो मनात बेचैन होता. त्या मानानं त्याचा व्हिसा ऑफिसर निवांत होता. पहिल्यांदाच थेट म्हणाला,

‘‘हे बघ बाबा, तुला तीन चान्सेस देतो. त्यातली एक तरी टास्क पूर्ण कर. मग मी तुझं पुणं प्रकरण संपवतो.’’
‘‘टास्क पहिली, शुद्ध मराठीत दहा वाक्यं बोलून दाखव.’’
त्यानं शुद्ध इंग्रजीत म्हटलं, पण टेम्बा गडबडला. तो थोडं थोडं मराठी शिकला होता. पुण्याला राहायला जायचा विचार असल्यानं, ‘तुझं अगदी बरोबर’, ‘तू ग्रेट आहेस’, ‘तुझ्यासारखं आणि तुझ्या गावासारखं या जगात दुसरं काहीही नाही’ ही तीन वाक्यं त्यानं व्यवस्थित घोटून ठेवली होती, पण ती तीनच होती. इथे दहा वाक्यांची टास्क होती. ती ऐकून त्याचा चेहरा पडला. पहिल्यांदाच नकारघंटा? कसं जमणार पुढे?
‘‘मला नाही जमणार.’’ तो पुटपुटला.
‘‘जमव रे. दहाच तर वाक्यं…’’
‘‘कबूल आहे. पण ते शुद्ध मराठीचं लफडं आहे ना…’’
‘‘आमच्याकडचं ‘शुद्ध’ रे. फक्त वाक्यातला शब्द आणि शेवटचं क्रियापद मराठी असलं की झालं. मध्ये मध्ये काहीही चालतं.’’
‘‘नको बाबा… मला दॅट मच सेल्फ कॉन्फिडन्स फील होत नाहीये.’’
‘‘बघ, हेच वाक्य बघ. ‘मला’नं वाक्याची सुरुवात झाली. ‘होत नाहीये’ नं शेवट. झालं मराठी वाक्य. सिंपल. अशी टेन सेण्टेन्सेस जिफीमध्ये क्रिएट कर ना भौ.’’
‘‘सॉरी… मला नाही वाटत… मला… एवढं…’’
टेम्बा भांबावून म्हणत राहिला. मग त्या ऑफिसरनं त्याचा नाद तेवढ्यापुरता सोडला. तसाही तोंडाचा दुर्बळ माणूस पुण्यात पाठवण्यात अर्थ नव्हता. समोरच्याचा शब्द खाली पडू न देणं, एकाला दहा वाक्यं बोलणं हवं होतं. मग तो टेम्बाला दुसर्याि एका कक्षात घेऊन गेला आणि म्हणाला,
‘‘इथे तुला दुसरी टास्क सांगतो बघ.’’
‘‘सोप्पी सांग हं.’’
‘‘एकदम सोप्पी सांगतो. तू इथेच थांबायचंस. मी बाहेर उभा राहीन. इथे या खोलीत थोडा वेळ आवाज होतील.’’
‘‘कोण करेल?’’
‘‘रेकॉर्डिंग रे? पुण्याच्या रस्त्यांवर गर्दीच्या वेळेला असणारे आवाज ऐकवू आम्ही. तू फक्त त्याच्यावर आवाजाची पट्टी चढवून मला हाक मारायचीस. बाहेर मला ऐकू आली पाहिजे. ओके?’’
‘‘ह्यॅत्तिच्या! हाकच मारायचीये ना? एक सोडून दहा मारेन.’’
‘‘मला बाहेर स्पष्ट ऐकू आली पाहिजे.’’
‘‘कानठळ्या बसवीन.’’ टेम्बा खुशीनं म्हणाला. जंगलात पूर्वी कमी का कोकलला असेल तो?’’

टेम्बा त्या कक्षात गेल्यावर दरवाजा बंद झाला आणि गोंगाट सुरू झाला. प्रचंड वेगानं जाणार्याा नाना वाहनांचे आवाज… हॉर्नचे आवाज… त्यात कोणा दिवट्यानं बाईकचा सायलेन्सर काढल्यानं तिचा गोंगाट… मध्येच मोबाईल फोनांचे नाना रिंगटोन… फेरीवाल्यांच्या हाळ्या… रस्त्यावरच्या मांडवातलं ‘चिमणी उडाली भुर्रर्र…’ आणि ‘आवाज वाढव डीजे तुझ्या…’ हे एकमेकांवर आदळत असलेलं… कुत्र्यांचं केकाटणं… गाईंचं हंबरणं… माकडवाल्याच्या खेळासाठी वाजवलेली डुगडुगी… देवळातलं ‘श्रीपाद वल्लभ दिगंबरा’… त्यातच एक अॅंम्ब्युलन्स ‘ह्याँ… ऊं… ह्याँ… ऊं…’ करत चाललेली. प्रत्येकाची सर्वांत वरच्या पट्टीशी झटापट चाललेली.. टेम्बाला काही सुचेचना. कानाचे पडदे फाटतील… मेंदूला आरपार भोकं पडतील… छाती धडधड धडधड करत धाडकन् बंद पडेल… तो कानावर हात दाबून धरत त्या कल्लोळ कक्षातून बाहेर यायची धडपड करायला लागला…

‘‘ओरडा… हाका मारा… लाऊटर… अजून मोठ्यांदा… एकदाच…’’ बाहेरून खाणाखुणा व्हायला लागल्या. टेम्बाला स्वतःच्या हृदयाची टिर्काटकसुद्धा ऐकू येईना… त्याला वाटलं, आपण चाललो. पाण्यात बुडणार्यां्ना जलसमाधी मिळते तशी ही ‘कोलाहल समाधी’… तो कसाबसा जीव वाचवत बाहेर येऊन त्या व्हिसावाल्याजवळ उभा राहिला.
‘‘हे काय? तुम्ही मला इथे ऐकू येईल अशा आवाजामध्ये ओरडणार होतात ना?’’
‘‘मी… माझ्या घशातून… आवाज… नो वे…’’ टेम्बा कसंबसं म्हणाला. समोरून पुष्कळ उपदेश येत होता, ‘अहो, आमच्या पुण्यात रस्त्यांमध्ये सारखे एवढेच आवाज असतात. गाजतं वाजतं शहर आहे आमचं. तुम्ही पाच मिनिटांमध्ये हरलात? आम्ही रोज दोन-दोन तास एवढा आवाज कापत कामावर जात असतो. छे छे! तुम्ही अगदीच बुवा पुचाट! कसं जाणार तुम्ही पुण्यात राहायला?’’
‘‘असं म्हणू नका हो. अजून एक लास्ट चान्य द्या मला. प्लीजऽऽ मी ती टेस्ट नक्की पुरी करेन… अगदी कान मिटून पुरी करेन…’’
टेम्बानं फारच गयावया केलं तेव्हा त्याला तिसरी, शेवटची, फायनल टास्क दिली गेली. ऑफिसच्या मागच्या अंगणात स्कूटर पार्क करून दाखवणं! नुसतं ऐकून टेम्बाला हसूच आलं.
‘‘स्कूटर पार्क करणं ही काय टास्क आहे?’’
‘‘पुण्यात असू शकते.’’
‘‘मी ट्रकनंसुद्धा इंग्रजी आठचा आकडा काढून दाखवू शकतो, माहितीये?’’
‘‘चांगलंच. पण तसे १ ते १०० आकडे काढता आले ना एखाद्याला, तरी पुण्यात पार्किंग करता येईल याची खात्री नाही. त्याला दैवी शक्ती लागते.’’
‘‘तुम्ही अतिशयोक्ती करताय.’’
‘‘ट्राय युवर लक.’’
‘‘लक कसलं? स्किल म्हणा. कौशल्य.’’
‘‘ते तर ते. पण तुमच्या अगोदर रस्त्यावर आलेल्यांनी रस्ता कसा वापरलाय यावर असेल ना ते?’’
‘‘म्हणजे काय? रस्ता म्हणजे रस्ता, नाही का?’’
‘‘नाही. असा संकुचित दृष्टिकोन आमच्याकडे चालत नाही. आमच्याकडे रस्ता हे घर असतं, अंगण असतं, कार्यालय असतं, क्रिकेट ग्राऊंड असतं, सार्वजनिक स्वच्छतागृह असतं, मंडई असते, प्रदर्शनाची गॅलरी असते, कपडे वाळत घालण्याची दोरी असते, गायरान असतं, गोट्या खेळण्यासाठी गल असते, सायकलींचं कोंडाळं करून उभं राहण्याचा नाका असतो, कचरापेटी असते, पिकदाणी- तस्त असतं, झालंच तर…’’
‘‘अहो, मग तो रस्ता कधी असतो?’’
‘‘एवढ्या सगळ्या कामांमधून जर कुठे मोकळीक मिळाली तर तो रस्ता असतो. बघा आता तुम्हीच. तुमच्यासाठी समोर पुण्याचा रोड क्रिएट केलाय. त्यावर ही स्कूटर नीट पार्क करून दाखवा. मात्र कुठेही आदळआपट, धक्का लागणं नकोय.’’

टेम्बानं आव्हान स्वीकारलं. मुळात ते फुस्कच वाटलं होतं त्याला. काय, तर म्हणे, स्कूटर पार्क करा! त्यानं मनातल्या मनात नाक मुरडलं. तेवढीच वेळ आली असती तर तो आख्खी स्कूटर उचलून खांद्यावर घ्यायलाही मागेपुढे पाहणार नव्हता. आडदांड आफ्रिकन होता तो!

रुबाबात स्कूटरवर मांड टाकून त्यानं त्या रस्त्याच्या सेटवर नजर टाकली. दोन रस्ते मिळण्याची जागा होती ती. समोरासमोरून येणारे दोन उभे रस्ते. मध्यम आकाराचे. एकाच्या डावीकडे मोठ्ठा मांडव. मध्ये आडवा वाहता रस्ता, की विरुद्ध बाजूच्या उभ्या रस्त्यावर उजवीकडे मांडव. दोन्ही मांडवांभोवती माणसांचे घोळके फिरणारे. त्यांची आपापली वाहनं. आपापल्या सोयीनं आणि इतरांच्या सोयीचा विचार न करता लावलेली. इकडचा रस्ता खणलेला. तिकडच्यावर नुकतंच डांबर ओतलेलं. डांबराची रिकामी पिंपं शोभेसाठी इकडेतिकडे मांडून ठेवलेली. मध्येच रोडरोलर फतकल मारून बसलेला. त्यावर शिळोप्याच्या गप्पा मारत कामगार बसलेले. अलीकडे भाजीविक्याची गाडी. पलीकडे चहाची टपरी. तिच्यामागे एक टायरचं पंक्चर काढण्याची काढण्याची शेड. त्या पंक्चरवाल्याचा कुत्रा आसपास गस्त घालणारा. तिथेच त्याला बिस्किटं चारणारे भूतदयावादी. मागे अनंत काळ बुरखा पांघरून बसलेली एक जुनी-पुराणी चारचाकी. इकडच्या बाजूनं एक उंटवाला. उंटावरून मुलांना हाकून चार पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात. अशा चौफेर गदारोळात स्कूटर पुढे नेऊन योग्य प्रकारे पार्क करायची होती.

टेम्बानं दीर्घ श्वा स घेतला. वातावरणाचा अंदाज घेतला. ‘आज नाही तर कधीही नाही’ हे स्वतःला बजावलं आणि त्या ट्रॅफिक सागरात आपल्या व्हिसाची नौका सोडून दिली. मुळात आपल्या स्कूटरला ब्रेक आहे ही कल्पनाच सोडून दिली. आपण पुढे पुढे जातच राहायचं. इतरांना जिवाचं भय असेल ते थांबतील. रिकामी जागा दिसली की थांबायचं. टेम्बानं वेगानं गाडी पळवली. पण ती एकटी पुढे जायला तयार नव्हती. तिनं डावीकडच्या मांडवाचा एक दोर चाकाला गुंडाळून घेतला. त्याला हिसका बसल्यानं मांडवाची एक बाजू खाली कोसळली. तिच्यावर मागून येणार्याग उंटाचा पाय पडल्यानं तो लडबडला. मांडवाखालून उंट जाणार तेवढ्यात टेम्बाच्या स्कूटरखाली येता येता वाचलेलं कुत्रं जिवाच्या आकांतानं केकाटलं. टेम्बानं त्याच्याशी हुतूतू खेळत मधला रस्ता पार केला. जरा दूर अंतरावर एक पार्किंग योग्य जागा दिसल्यासारखी वाटली, तेव्हा त्यानं वेग घेतला, पण मांडवाच्या चाकात अडकलेला दोर काही तेवढा लांब नव्हता. मग तो दोर मांडवाचं थोरं कापडही रस्त्यावरून फरपटत न्यायला लागला. तेव्हा भाजीची गाडी नेणार्या.ला वाटलं, आपलं भाजीवरचं फडकंच हा घेऊन चाललाय. त्यानं मध्येच आपली भाजीची गाडी आडवी लावून फडकी चाचपायला घेतली. त्याबरोबर त्याची गाडीची जागा आपल्याला पार्किंगसाठी मोकळी झाली असं वाटून अनेक लोक तिथली संगीतखुर्ची पकडायला धावले. शेवटी जिथे पार्किंगला जागा आहे, तिथे आपण नाही, आणि जिथे आपण आहोत तिथे जागा नाही अशी गोंधळात सगळे सापडले. करता करता चाकात अडकलेला दोर आणि चाकानं घेतलेली फडक्याची ओढणी जिथे संपली, तिथे टेम्बानं स्कूटरची सगळी हाताची, पायाची बटणं जीव खाऊन दाबली. स्कूटरला राग आला. तिनं जागीच थयथयाट करून शेवटी एक गिरकी घेऊन नाचाचा तोडा कम्प्लीट केला. तिच्या तांडवामुळे चहाच्या टपरीच्या रस्त्याकडेचा उभा बांबू आडवा झाला आणि त्याच्यावरून जाण्याइतकी स्कूटरची चाकाची उंची नसल्यानं ती होती तिथेच पण ७० अंशाच्या कोनात आणि बराचसा रस्ता अडवून, तीन स्कूटरींची जागा खाऊन म्हशीसारखी फतकल मारून बसली. समोर ‘नो पार्किंग’चा बोर्ड होता. मागे नाला होता. चालणार्यांसना वाट मोकळी नव्हती. स्कूटरचं एक चाक खड्ड्यानं गिळलं होतं आणि दुसरं जमिनीवर जागा शोधत होतं. ती त्याला कधी सापडेल हे लोक भयभीत होऊन बघत होते. इथे टेम्बानं एकूण परिस्थितीचा अंदाज घेतला आणि त्याला एक आणि एकमेव मार्ग दिसला. इथून तोंड काळं करायचं! त्याच्या वंशामुळे आणि वर्णामुळे काळं करायला वेगळं फार काही करायला लागणार नव्हतं. ‘कसं इ काय इ’ व्हिसा तर मिळणं शक्यच नव्हतं. तिसरीही टास्क करता आली नसल्यानं टेम्बा पुरता हरला होता. ‘हरारे’वरची निष्ठा दाखवण्याची संधी अशी सहसासहजी सुटणारी नव्हती.

टेम्बा करकरीत कोर्याह चेहर्याीनं, घटनास्थळाकडे पाठ करून त्या व्हिसा ऑफिसच्या बाहेर पडायला निघाला. मान ताठ होती कारण स्कूटरच्या कथ्थकमध्ये ती मुरगळल्यानं त्याला ती इकडेतिकडे हलवता येतच नव्हती. ताठ मानेनं, कोर्याे चेहर्या नं, रिकाम्या हातानं आणि आपण त्या गावचेच नसल्याचा आविर्भाव करत टेम्बा ऑफिसकडून मुख्य रस्त्याकडे लागणार तर मागून हाका आल्या,

‘‘सर… सर… तुमचा व्हिसा घेऊन जाता ना?’’
‘‘कोण?… मी..?’’
‘‘हो सर.. अर्धा तास थांबलात तर प्रोसिजर पूर्ण करून सरळ देऊनच टाकतो तुमचे डॉक्युमेंट.’’
‘‘अहो, पण मी… मी अगदीच फेल गेलोय हो त्या टास्कमध्ये. आय डोंट थिंक आय डिझर्व्ह युअर व्हिसा.’’
‘‘डिझर्व्हच्या फंदात पडू नका हो. आम्ही आफ्टर ऑल पडलो ‘फिलॉसॉफी पीपल.’ शेवटी नशिबात असेल तेच मिळतं ना हो माणसाला?’’
‘‘पण मी सगळे नियम मोडले की तुमचे पार्किंगचे. नो पार्किंग समोर लावली, बांबू पाडला, जागा अडवली, एक चाक खुशाल अधांतरी ठेवलं, एक गाळात घातलं…’’
‘‘जाऊ द्या हो. रथचक्रसुद्धा उद्धरणारे लोक आहोत आम्ही. एका स्कूटरच्या चाकाचं काय एवढं घेऊन बसायचं?’’
‘‘एवढं करून मी साधं ‘सॉरी’ ही न म्हणता स्ट्रेट फेसनं जायला निघालो.’’
‘‘ते तर सर्वांत आवडतं आम्हाला. आमच्या गावात ‘सॉरी बिरी’ नसतंच म्हणायचं! कितीही काहीही उत्पात घडवला आपण, तरी बाणेदारपणे त्याकडे पाठ करून, आपण त्या गावचेच नसल्यासारखं सटकणं म्हणजे खरं पुणेकर होणं. गेट इट?’’

‘‘गॉट इट!’’ टेम्बा बावरल्यासारखा म्हणाला. आपण व्हिसाच्या प्रत्येक टास्कमध्ये फेल होतो काय आणि तरीही व्हिसा मिळवून घरी जातो काय… त्याला काही कळेचना. एवढा हाताशी आलेला व्हिसा न घेता जाणं शक्यच नव्हतं. तो गोंधळून तिथेच थांबला. व्हिसा घेऊन घरी गेला तेव्हा सेरेनानं त्याला ओवाळलं.
लवकरच तो पुण्याला पोचलाही. एक व्हिसा कसाबसा मिळवला असला, तरी पुण्याला आल्याबरोबर त्याचं भाषिक कसब बहराला आलं. तो पुण्याला णझअ म्हणजे ‘युनायटेड पेट्स ऑफ आमचंचैका’ म्हणायला लागला. आपण त्या कामात ‘अंतिम तज्ज्ञ’ आहोत असं त्याला आपोआप वाटायला लागलं. पुण्यामध्ये पार्किंग मिळवणं त्याला कधीच जमलं नाही, पण व्हिसा मार्गदर्शन केंद्र मात्र त्यानं हातोहात काढून आणि इंटरनेटद्वारे आभासी दुनियेत चालवूनही दाखवलं. त्याच्या केंद्राची कुठेही शाखाही नाही.

मंगला गोडबोले, पुणे
mangalagodbole@gmail.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.