Now Reading
उत्तीर्ण

उत्तीर्ण

Menaka Prakashan

राणा हे शेंडेफळ घराण्याचं नाव मोठं करणार, हे ज्योतिष्याचं भविष्य त्याच्या जन्माच्या भविष्याप्रमाणेच राणा खोटं करणार, हे सार्यां ना कळून चुकलं होतं. उलट घराण्याचं नाव बदनाम करतोय का काय, हीच भीती घरच्यांना पडली होती. पण वडलांनी त्यांची अखेरची इच्छा राणाजवळ प्रकट केली होती. त्या इच्छेला मान देऊन राणा मार्च-ऑक्टोबर अशा वार्यार करत होता.

रावसाहेब टोणगे हे फक्त टोणगेवाडीतच प्रसिद्ध नव्हते, तर आजूबाजूच्या पंचक्रोशीत लांडणेवाडी, दगडखुर्द, दगडबुद्रुक, कोळसेवाड, लक्कडवाड या सार्याक वाड्या, गावांत प्रसिद्ध वतनदार, मालदार, सावकार अशी त्यांची ओळख होती. शेती, मळे, दुकानं असे भरपूर व्यापही होते आणि घरातही त्यांनी व्याप वाढवलेलेच होते. रावसाहेबिणीला पाच मुलगे होते. सारा व्याप सांभाळण्यास तेही कमीच पडत होते. गेल्या दोन-तीन पिढ्यांत घरात मालकांना कन्यादानाचं पुण्य काही मिळालं नव्हतं. तशा रावसाहेबांना घराबाहेर दोन कन्यका होत्या, पण त्यांचं जगजाहीर कन्यादान काही करता आलं नव्हतं. पण रावसाहेबबाई जेव्हा सहाव्यांदा देवकी व्हायला निघाल्या, तेव्हा वसुदेव रावसाहेब खडबडून जागे झाले. तीन-चार सोनोग्राफी झाल्या, पण मुलगा की मुलगी हे कळवून घ्यायचीही कायद्यानं बंदी. मग तज्ज्ञ ज्योतिष्यांना पाचारण केलं. ‘‘तुम्ही बिनघोर र्हाीवा. ह्या वक्ताला तुमची बेटी तुमच्यासाठी धनाची पेटी घेऊनच जन्मणार.’’ भरपूर बिदागी धनाच्या थैलीच्या रूपात घेऊन, भरघोस आश्वामसन देत ज्योतिषी प्रस्थान करता झाला. जाताना एवढंही सांगून गेला, ‘‘पंचक्रोशीत हे बाळ लई नाव काढणार बघा. घराण्याचं आणि स्वतःचं.’’

भविष्यावर विसंबून राहण्याखेरीज गत्यंतर नव्हतं. नऊ महिने नऊ दिवस सरून दहावा महिना संपायला आला, तरी रावसाहेबीण खुशाल तशीच. शेवटी एकदाचा टोणगे रावसाहेबिणीला भरवशाच्या म्हशीला खुशालचेंडू, चेंडूसारखा गरगरीत टोणगाच जन्माला आला. टोणगी न जन्मल्यानं सार्यां चाच विरस झाला. रावसाहेबांनी ज्योतिष्याला हुडकायला माणसं पाठवली, पण धनाची थैली घेऊन तो जो गायब झाला त्याचा थांगपत्ता लागेना.

राणा टोणगे लहानपणापासून शेंडेफळ म्हणून लाडाकोडातच वाढला. रावसाहेब आणि राणाचे वरचे पाच भाऊ खंबीर असल्यामुळे राणा खुशालचेंडूच होता. खावं, प्यावं, खेळावं. खोड्या करत वा काढत हिंडावं, हुंदडावं, हाच जन्मसिद्ध हक्क घेऊन तो जन्माला आला होता. घरात टॉम, टॉमी ही अल्सेशियन कुत्र्यांची जोडी पाळलेली. कुणी बाहेरचं आलं, की त्यांच्या साखळ्या, पट्टे सोडून त्यांना त्या पाहुण्यांच्या अंगावर सोडणं आणि त्या माणसांच्या छाताडावर आपले पायांचे पंजे टेकवून ती उभी राहिली, की त्यांची झालेली घबराट बघून हसून हसून स्वतःची करमणूक झाली, की नंतर त्यांना परत बोलावणं. त्यांच्या माना खाजवत वर आणि राणा म्हणे, ‘‘आमची टॉम, टॉमी लई शहाणी हायती. कुणाला सुदिक चावत न्हाईत.’’ तर कधी रस्त्यावर हिंडणार्याी मोकाट गाढवांना दगड मार मारून चौखूर उधळून द्यायचा आणि त्या उधळलेल्या सुसाट धावणार्याय गाढवांपासून रस्त्यावरच्या माणसांची स्वतःच्या बचावासाठी चाललेली त्रेधातिरपीट, घबराट दूर बसून मौजेनं पाहत बसायचा. हे सारं इतकं बिनबोभाट करायचा, की कुठे सापडायचा म्हणून नाही. शाळेतही त्याची नित्यनेमानं हजेरी असे ती केवळ त्याच्यासारख्याच सदा, परशा, भिम्या, जित्या आणि तो स्वतः या पंचकडीसमवेत दंगामस्ती करण्यासाठीच.

शाळेमध्ये सर्व विषयांतली त्याची प्रगती वाखाणण्यासारखीच होती. वर्गाबाहेरची त्याची अरेरावी आणि दंगामस्ती वर्गात चालू नये म्हणून वर्गशिक्षकांनी त्याला मॉनिटर करून टाकलं होतं. त्यामुळे वर्गावर त्याचीच दहशत असल्यानं सारा वर्ग चिडीचूप असायचा. पाठ्यपुस्तकांशी त्याचा परिचय किंवा दुरान्वयेही संबंध येत नसला, तरी कोणत्याही प्रश्नांना तो कधीच डगमगत नसे. प्रत्येक मास्तरांच्या निरनिराळ्या विषयांतल्या निरनिराळ्या प्रश्नांना त्याच्याकडे उत्तर तयार असे. सायन्सच्या शिक्षकांनी, ‘‘रेबीजचा कुठे उपयोग होतो?’’ हा प्रश्न विचारताच त्यानं क्षणात उत्तर दिलं होतं, ‘‘रे बीजचा उपयोग बीजगणित सोडवायला होतो.’’ इतिहासाच्या कानफाटे सरांनी तासाला खिडकीबाहेर बघत बसलेल्या राणाला पाहून म्हटलं, ‘‘राणा, ए राणा, उठून उभा राहा. मी आता काय सांगितलं ते सांग बरं. अफझल खान कोण होता? आणि तो महाराष्ट्रात का आला होता?’’

‘‘मास्तर अफझलखान हा दूरच्या गावात लई लई लांब राहणारा सलमान, आमिर, शाहरूख खानचा भाऊ होता. आनि त्यांच्या वशिल्यानं पिक्चरमधी काय काम सोताला भेटंल म्हनून मुंबईला त्यास्नी भेटाया आला होता.’’ अर्थातच कानफाटे सरांनी त्याच्या कानाखाली सणसणीत लगावली होती. ‘प्लासीची लढाई कोणाकोणात झाली?’ या प्रश्नावर परीक्षेत त्यानं रंगतदार स्टोरी केली होती. ‘प्ला आनि सी ही दोन इंग्रज पोरं होती. त्या दोघांत मास्तरनी लाडकं-दोडकं असा भेदभाव करून त्यांच्यात लढाई जुंपविली.’ या त्याच्या उत्तराचं भर वर्गात सरांनी वाचन केल्यानं सारी मुलं फिदीफिदी हसली. या अपमानाचा बदला राणानं शाळा सुटल्यावर लगेचच घेतला. शाळा सुटल्यावर शाळेतून बाहेर पडणार्याय कानफाटे सरांच्या पायांत चांगला लांबलचक खोटा साप सोडून त्याला आपल्या हातातल्या नायलॉन दोरीनं वळवळत ठेवून सरांची उडालेली घबराट आणि इकडेतिकडे उड्या मारत पळत केलेला नाच बघून सारी मुलं हसू लागली. अर्थातच लांबून सारे खेळ करणारा राणा साप तिथेच सोडून केव्हाच नाहीसा झाला होता. त्या खोट्या सापाला कुणीच वाली नव्हता.

दुसर्या दिवशी वर्गात जो तो सरांची झालेली फजिती हसून हसून एकमेकाला सांगत होता. गणिताच्या परीक्षेत ‘पायथागोरसच्या सिद्धांताचं सूत्र लिहा’ असा प्रश्न आल्यावर राणानं लंबेचौडे संदर्भासह उत्तर लिहिलं. ‘गोरस म्हणजे गायीचे दूध. तवा गोठ्यांत गायीच्या मागच्या पायथ्याशी बसून शिस्तीनं गायीची धार काढणं असा पायथागोरस सांगतोय.’ हा सिद्धांत ऐकून पायथागोरसही राणाच्या पायाशी लोटांगण घालून सपशेल पालथा पडला असता. भूगोलाच्या सरांनी ‘‘शुक्र ग्रह आहे का तारा?’’ असा प्रश्न विचारल्यावर राणानं सरांनाच सुनावलं, ‘‘सर, आम्हाला खुळं बनवताय व्हय! शुक्र ग्रह पन नाई अन ताराबी नाय. शुक्र चांदणी आहे. ‘उगवली शुक्राची चांदणी’ म्हणून सोनालीनं झक्कास डान्स केलाय. शुक्र चांदणीच हाय हा ढळढळीत पुरावा आहे. तो ग्रह नाही आनि ताराही नाही.’’ भूगोलाच्या सरांनी डोक्याला हात लावून आपलं सिनेमाचं अज्ञान प्रकट केलं, तर सायन्समध्ये न्यूटनच्या सिद्धांताचीसुद्धा त्यानं छान स्टोरी केली. ‘न्यूटन म्हंजे आमच्या पलीकडच्या गल्लीतली नूतन हो. लई इब्लीस कार्टी. भूक लागली म्हनून बघती तर काय डबा घरी इसरलेला. मग काय, शेजारच्या घरात शाळंच्या भिंतीवरून उडी ठोकली अन् झाडावरचे पेरू चोरून खाल्ले नं काय! मालकिणीनं बदड बदड बदडलं. तवा भूक मानसाला चोरी कराया लावती हा त्या न्यूटननं सिद्धांत सांगितला.’ हा सिद्धांत वाचून गुंजाटे सरांनी कानापाशी थप्पड लगावून मधमाश्या कसं गुंजन करतात, हे सप्रमाण दाखवून दिलं राणाला. आसमानचे तारे जमिनीवर अवतरून दाखवले त्याला. त्याचा वचपा राणानं लगेचच काढला. दुसर्याा दिवशी गुंजाटे सरांचा तास संपताच मधली सुट्टी झाली. राणाच्या पंचकडीनं सरांना घेराव घातला. ‘‘सर आज लाडू आनलेत. आमच्या संग तुमी बी लाडू खायला पाहिजे.’’ गोडघाशी सरांना साजूक तुपातल्या गूळ घालून केलेल्या चपातीच्या लाडवाचा आग्रह मोडवेना. लाडू चावून खाता खाता त्यातल्या छुप्या च्युइंगम्सनी डाव साधला. तोंडाच्या गुहेतून दोन्ही बचळ्या बाहेर पडून खाली पडल्या आणि त्यांचे दोन तुकडे झाले. पुढे मास्तर महिनाभर तोंडावर रुमाल ठेवून काय शिकवत होते ते कुणालाच कळत नव्हतं.

असा हा राणा. त्याच्या वरच्या पाच भावांनी तर सातवी-आठवीतच शाळा सोडली होती आणि शेती, उद्योगधंदा बघायला लागले होते. निदान राणानं तरी मॅट्रिक परीक्षा पास व्हावी, अशी त्याच्या वडलांची फार इच्छा होती. पण शाळेतली ही राणाची उत्तरोत्तर होणारी प्रगती पाहता कर्मकठीणच होतं. ‘‘कितीही टाइम लागू दे. तितक्यांदा परीक्षेला बसायचं बघ राणा. बोर्डाचं लोक कंटाळून का होईना, एक ना एक दिस तुला पास करनारच बघ. फकस्त नेटानं तीन तास बाकड्यावर बसून लिवायचं काम कर तू. ही माझी फार विच्छा हाय. घरान्यात पहिला मॅट्रिक हो बघ. माझी येवढी विच्छा तू पुरी कर.’’ राणा हे शेंडेफळ घराण्याचं नाव मोठं करणार, हे ज्योतिष्याचं भविष्य त्याच्या जन्माच्या भविष्याप्रमाणेच राणा खोटं करणार, हे सार्यां ना कळून चुकलं होतं. उलट घराण्याचं नाव बदनाम करतोय का काय, हीच भीती घरच्यांना पडली होती. पण वडलांनी त्यांची अखेरची इच्छा राणाजवळ प्रकट केली होती. त्या इच्छेला मान देऊन राणा मार्च-ऑक्टोबर अशा वार्याा करत होता. यश कर्मकठीण होतं, तरी ‘कितीही टाइम लागू दे पण, परीक्षेच्या बाकड्यावर तीन-तीन तास बसून आल्याशिवाय परतायचं नाही’ हे मात्र राणा प्रामाणिकपणे करत होता, केवळ वडलांची इच्छा म्हणून. सतत मार्च-ऑक्टोबरचा वारकरी बनून. सततच्या टी. व्ही. सिरियल्समुळे मराठी, हिंदी तसं काही अवघड जात नव्हतं. पण बाकी सारे विषय अंगावर राक्षसाचं रूप घेऊन धावून येत होते. निबंध या प्रकारात त्याच्या कल्पनेच्या भरार्याव आकाशापेक्षाही उत्तुंग होत्या हे गणित, सायन्स, इतिहास, भूगोलामध्येही तो दाखवत होता. एकंदरीत सर्व अवघडच होतं. पुढील, मागील, आजूबाजूच्या मुलांनाही ढोसून काही फायदा होत नसे, कारण ती मुलंही त्याच्यासारखीच खुशालचेंडू रिपीटरच असत. सतत परीक्षेला बसून निगरगट्ट राणाला नापासच्या शिक्क्याची पक्की सवय झाली होती, पण वडलांची अखेरची इच्छा तो इमानेइतबारे पार पाडत होता. वडलांच्या अखेरच्या इच्छेचा आदर राखत होता.

यंदा मात्र देव पावला. राणाच्या पुढच्या बाकावर अभ्यासात हुशार असलेला, पुस्तकी किडा असलेला पंधरा वर्षांचा कोवळा पोर आला. ‘‘नाव काय रे तुझं?’’ राणानं त्याला दमात घेत विचारलं. ‘कृष्णा.’ ‘‘हे बघ चम्या की सन्या, पहिली एका वाक्यातली उत्तरं, गाळलेले शब्द, जोड्या जुळवा, चूक का बरोबर… असलं सारं काय असंल ते तू मला दावायचंस. नाय म्हनायचंच नाही. नाहीतर हॉलच्या बाहेर आलास, की तुझं काय खरं नाही. सांगून ठेवतो.’’ राणानं जाम दमच भरला. राणापुढे कृष्णा म्हणजे घुंगुरडं; कापायलाच लागला. ‘‘दहावी पास व्हायची माझ्या बापाची इच्छा तू पुरी करायची. लांबलांब पानाभराची उत्तर तू लिहीत बस. मला दावूबी नगंस. मला त्याची पर्वा नाय. इतक्या येळेला परीक्षेला बसतोय, पण काय कॉपी करायची तेच कळलं नाही. चार-पाचदा चानस हुकलाय. पण यंदा तुझ्यासारख्या हुशार बेण्याला धाडलाय देवानं माझ्या म्होरं. तवा मी सांगिटलेलं समद लक्षात असू दे. नाय तर मग मी हाय अन् तू हायस. बघून घीन.’’ कृष्णा घाबरून लटपटू लागला. पण पुरावा असा काहीच नव्हता. कृष्णा मनात म्हणाला, ‘निदान मी केलेलं अभ्यासाचं तरी माझं मला चीज करू दे. मला परीक्षेत सर्व प्रश्नपत्रिका नीट सोडवायला मिळू दे.’ दर पेपराला तो देवाला प्रार्थना करू लागला. सर्व ‘हो’ किंवा ‘नाही’ या सदरातली छोटी उत्तरं जिवाला भीत भीत कृष्णानं राणाला दाखवली आणि कृष्णा, राणाची परीक्षा एकदाची सुरळीत पार पडली. सुटलो एकदाचा असा दोघांनी निःश्वास टाकला. पण कारणं वेगवेगळी होती. राणानं एकदाची परीक्षा संपली म्हणून निःश्वास टाकला, तर कृष्णानं राणाच्या जाचातून एकदाचा सहीसलामत सुटलो म्हणून निःश्वास टाकला.

रिझल्टचा दिवस उजाडला आणि पहाटे पहाटेच राणाचा मोबाईल वाजू लागला. बोर्डाकडून अभिनंदनाचा मेसेज आला. विशेष गुणवत्तेसह राणा पास झाला होता. जे भल्याभल्यांना जमत नाही, कित्येक वर्षांत बोर्डातही असा पराक्रम कुणी केला नव्हता तो एकट्या राणानं केला होता. नव्वद टक्क्यांपासून ते अगदी अठ्ठ्याणव, नव्व्याण्णव टक्क्यांपर्यंत मार्क मिळवणारी बोर्डाच्या यादीत मुलं-मुली होती. पण सर्व विषयांत पस्तीस टक्के मार्क मिळवणारा एकमेवाद्वितीय असा एकटा राणा होता. त्याचं विशेष कौतुक बोर्डाकडून होणार होतं. गणित या एका विषयात मात्र इतर विषयांतले पस्तीस, पस्तीस गुण पाहून चौतीसचे एक गुण जास्त देऊन पस्तीस केले होते. आजपर्यंत असा पराक्रम राणाच्या घराण्यात कुणी केला नव्हता. तो राणानं करून घराण्याचं नाव मोठं केलं होतं. दुसर्याा दिवशी बोर्डाचे लोक येऊन त्याचा विशेष सन्मान करत आहेत, त्याच्या तोंडात पेढे भरवत आहेत, आई, भाऊ सारे एक-एक करत पेढे भरवत असताना सारे फोटो काढत आहेत, मिनटामिनटाला फ्लॅश उडत आहेत, शूटिंग करत आहेत, असा सारा कार्यक्रम दिवसभर मधूनमधून सुरू होता. गावचे सरपंच, सभापती, प्रतिष्ठित मंडळी, साखर कारखान्याचे, दूध संघ, पतपेढ्यांचे संचालक यांचा अभिनंदन करण्याचा आणि राणासमवेत फोटो काढत, पेढे भरवून हार, गुच्छ देत त्याला पाकीट देण्याचा कार्यक्रम दिवसभर सुरू होता. लोक, नेते यांची ऊठबस सुरू होती. माणसं बदलत होती, पण सवय नसल्यानं या उतू जाणार्यार अभिनंदनाच्या गळाभेटीनं राणा बुजून गेला होता. तोपर्यंत वाड्याबाहेर लेझीम, ताशा, ढोल यांची पथकं हजर झाली होती उत्स्फूर्तपणे. ‘वायझेड, मी, हम, यू यू, रंगभरे, मातामराठी’ इत्यादी बरेच चॅनलवाले स्पीकर हाती घेऊन राणाची मुलाखत घ्यायला सरसावले होते. ‘‘विशेष प्रावीण्यासह कसे उत्तीर्ण झालात? हे नेमकं यश कसं संपादन केलंत तुम्ही?’’- चॅनलवाले. ‘संपादन?’ पादन् एवढंच माहीत असलेल्या राणाला, हे मागं सं कुठून लावला चॅनलवाल्यांनी, याचा काही उलगडा होईना. राणाचा चेहरा चक्रावून एकदम प्रश्नांकित झाला. ‘‘हे एवढं मोठं पण कुणालाही सहजासहजी न मिळणारं यश कसं मिळवलंत तुम्ही?’’ ‘‘काही नाही. ही सारी कृष्णदेवाची किरपा’’ राणा म्हणाला. ‘‘म्हणजे देवावर विश्वास आहे तुमचा?’’ – चॅनलवाले. ‘‘का नसावा?’’ राणानं प्रतिप्रश्न विचारला. ‘‘पण प्रत्येक विषयात नेमके पस्तीसच मार्क कसे मिळवलेत?’’ यावर राणानं आकाशाकडे बोट दाखवलं. ‘‘बरं, यासाठी काय विशेष प्रयत्न केलेत?’’ ‘‘काही नाहीच. ही सारी (कृष्णा) किसनदेवाची कृपा.’’ – राणा. घोडा का अडला? भाकरी का करपली? पान का सडलं? या प्रश्नांची उत्तरं जशी एकच होती की ‘न फिरवल्यानं’ तशी इरून फिरून, वळवून वळवून कसे आणि कितीही प्रश्न चॅनेलवाल्यांनी विचारले, तरी राणाचं उत्तर एकच होतं, ‘‘ही सारी किसनदेवाची किरपा.’’ शेवटी मुलाखतीत प्रश्न विचारून विचारून चॅनलवाले कंटाळून गेले, पण ‘ही सारी कृष्णदेवाची कृपा’ यापलीकडे राणाकडून कोणतंच उत्तर येत नव्हतं. दुसरं काही माहीत तर त्याहून नव्हतं. खरंखुरं एकच उत्तर होतं आणि तेच राणा देत होता की ‘ही सारी कृष्णदेवाची कृपा.’

खरेपणानं परीक्षेला बसलेल्या कृष्णाला खरंतर ब्याऐंशी टक्के गुण मिळाले होते. पण बोर्डाच्या यादीत नाव नव्हतं. एवढंच काय गावातही तो पहिला होता, पण त्याच्याएवढेच गुण मिळवणारी आणखीही दोन मुलं होती. त्यामुळे त्याचं कवतिक गावाला, बोर्डाला नव्हतं. ढोल, ताशा, लेझीमच्या गजरात, उघड्या जीपमध्ये बसवून राणाची भव्य मिरवणूक गावातून निघाली. फटाक्यांची माळ फाडफाड फोडत राणावर फुलांची बरसात करत मिरवणुकीची सुरुवात झाली. मिरवणूक कृष्णाच्या घरासमोर आली, तशी मिरवणूक बघत उभ्या असलेल्या कृष्णाला त्यानं बोलावून जीपमध्ये घेतलं आणि आपल्या शेजारी बसवलं. लोकांना कळेना. ‘‘दोस्त आहे माझा’’ म्हणत राणानं वेळ मारून नेली. मिरवणूक ग्रामपंचायतीसमोर आली. सरपंच आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मोहिते, कडबे, पाटील यांच्या हस्ते राणाला थैली भेट दिली गेली आणि मिरवणुकीची सांगता झाली.

राणा कृष्णाला घेऊन घरी आला. त्यानं भेदरलेल्या कृष्णाचा हात हाती घेतला. ‘आता हा राणा मला आणखी कुठल्या नव्या संकटात टाकतोय?’ अशी कृष्णाला भीती वाटली. राणा म्हणाला, ‘‘किसन्या, माझ्या बापाची शेवटची विच्छा तुझ्यामुळं पुरी झाली. त्यांच्या आत्म्याला तू शांती दिलीस बघ. ‘किसन्या होऊ कसा मी उतराई? तुझ्यामुळं मी झालो दहावी.’ मी काय नावापुरतं हाय. हे सार कवतिक खरंतर तुझंच हाय. मला बापाच्या वचनातून, ऋणातून मुक्त कराया तुझी लई मदत झाली हाय. सारा गाव अन् बोर्ड तुला काय बक्षीस देनार नाय. पण मला तुला बक्षीस द्यायचं हाय. या बक्षिसाच्या थैलीवर तुझा अधिकार, हक्क सारं हाय. तवा ही थैली तुला देतो. नाई म्हनू नगस आणि माझी ही मोटरसायकल तुला देतो. शहरात कालेजला जायला तुला उपेगी पडंल. मला ही सरपंचानं बक्षिसाची दिलेली सायकल हाये शेताकडं जायला.’’ राणानं स्वतःच्या मोटरसायकलची किल्ली कृष्णाच्या हाती सोपवत कृतज्ञतेनं त्याचा हात हाती घेऊन थोपटला.

नीला देवल, मिरज
editor@menakaprakashan.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.