Now Reading
इलाज

इलाज

Menaka Prakashan

त्यानं सखूचा हात सोडला अन् समूरच्या भिंतीला अडकून ठेवलेला कासरा घेतला. हे बघून गंगाक्काच्या तोंडचं पाणीच पळालं अन् काय बोलावं तेच तिला समजंना! सखूनं तर गळाच काढला. तिचं बघून शांतावैनीनंबी रडायला चालू केलं. म्या आपला रस्त्यावर उभा राहून गमत बघत होतो. एवढ्यामधी काई ध्यानात यायच्या आधीच त्यो कासरा घेऊन वाड्याभाईर आला. मंग तर त्या तिघीबी आरडाओरडा करीत भाईर आल्या.

रोजच्यासारखाच केरबा माझ्यापाशी आला. पण आज मातर त्यो तणतणतच होता. म्या बंडलमधली एक बिडी त्याच्यापुढं टाकली आन् सोता एक शिलगवली. परीक त्यानं काई बिडी पेटवली नाही. बाराहाल काईतरी टेन्शनमधीच असणार म्हणून म्या त्याला बिडीचा एक झुरका काढून पुसलं, ‘‘केरबा, काय झालं रं..?’’
परीक त्यो काईच बोलला नाही. निस्तं बसूनच राहिला. मंग जराशानं इकडं-तिकडं बघत म्हणाला, ‘‘गजा, लई वैताग आलाय बघ.. मायला! वरसानू कुठं आड-हीर करावं वाटायलंय…’’

त्याचं ऐकून मला करंट बसल्यावानीच झालं. म्या म्हणलं, ‘‘गड्या, जीवाचा असा सनिताप करून घेऊ नकू… काय झालं ते सपष्ट सांग..’’
पण त्यो काईच बोलला नाई. जराशानं मंग त्यानं तोंड उघडलं. म्हणाला, ‘‘तीच आमचं हमीशाचं.. सखू आलीया घरी आता. काईतरी कलागत झाली म्हणं दोघी सासू-सुनांची..’’ एका दमात त्यो एवढं बोलला अन् गप झाला.

केरबाचा प्रॉब्लेम उल्साक अवघडच होता. त्यानं त्याच्या एकुलत्या एका लेकीचं आपल्या मोठ्या बहिणीच्या पोराशी लगीन लावून दिलं होतं. अन् बहीण गावामधीच होती. निस्ती गावामधीच नाई तर बहिणीचं घर त्याच्या वाड्यापुढीच होतं. नव्या पावण्याली हुडकीण्यापरता त्यानं जुनं नातं नवं केलं होतं. परीक झालं अलगच होतं. सासू-सुनंचं घंटाभरबी जमत नव्हतं. थोडं काई झालं की सखू त्याच्या घरी रडत रडत येत होती. मंग सखू अन् तिची माय केरबाला फाडून खात होत्या. मंग पुन्हा त्यो बहिणीला अन् लेकीला चार गोष्टी सांगून, चार-आठ रोजांनी सखूला आणून सोडीत होता. पुन्हा धा-पाच दिस झालं की त्या दोघीचं काईतरी होई अन् सखू बापाघरी येई! मंग ती आली की त्या दोघी मायलेकी त्याला फाडून खात. अन् ह्याच गोष्टीला केरबा वैतागला होता. म्या त्याचा जिवा-भावाचा मैतर असल्यापायी मला सारं ही ठावं होतं. अन् आजबी असलंच काईतरी झालं होतं. म्हणून म्या पुसलं, ‘‘आज अजूक काय रामायण झालं की म्हणावं..’’

‘‘काय सांगावं आता.. साध्या-साध्या गोष्टीवून कलागत होतीय झालं!’’ त्यो सुस्कारा सोडून म्हणाला.
‘‘परीक काय झाल्तं ते तरी सांग की..’’ म्या इचारलं.
आरं उगं बारीक-सारीक गोष्टी धरून बसत्याता दोघी.. नळाला पाणी आल्तं म्हणून हिनं आंघोळ केली, पाणी भरलं अन् पाणी सुरू होतं म्हणून धुणंबी धुतलं.. तर आक्काला वाटलं, आपलं आपलं करायलीया.. ती काई तरी म्हणाली की सखीबी माघारी बोलली.. झाला सकाळच्या रामपार्‍यात तमाशा मंग.’’ बिडी पेटवीत त्यो म्हणाला अन् माझ्याकडं केविलवाणं बघू लागला.
मंग मला त्याची लई कीव आली. परीक म्या गप झालो. त्येचा इचार करीतच पुन्हा एक बिडी काढली अन् शिलगवली. एक झुरका काढून त्याला म्हणालो, ‘‘केरबा, मायला वरसानू ही चांगलीच घडघड लागली तुझ्यामागं.. परीक हिच्यावर इलाज करावा लागंनच..’’
त्यो मंग काईच न बोलता निस्तं बघत राहिला. अन् अमनधपक्याच माझ्या टकुर्‍यात एक अटकल आली. मंग मीच बोललो, ‘‘केरबा, तुझ्या ह्या दुखण्यावर आवशिद हाय बघ.. एकदम नामी इलाज हाय म्हण की..’’
‘‘कसला?’’ त्यानं पुसलं.
‘‘असलं आवशिद हाय आपल्यापाशी मर्दा, की त्या दोघी पुनाच्याला कवाच भांडणार नाहीता.’’ म्या त्याला म्हणालो.
मंग तर त्यो बी जरा सावरूनच बसला. त्याचे डोळे चमकले. अन् त्यानं इचारलं, ‘‘सांग नं मंग लटकून कसलं आवशिद हाय ती?’’
‘‘आवशिद घेतलंस ना तर कवाच त्या भांडणार नाहीता.. गळ्याच्यान..’’ म्या म्हणालो.
‘‘कोण देतंय आवशिद?’’
म्या गपच बसलो जरासंक अन् मनसोक्त बिडी ओढली. आखरीला थोटूक फेकून देऊन म्हणालो, ‘‘आवशिद घ्यायला तुझी तयारी हाय का.. बोल…’’
‘‘म्हंजी..’’
‘‘म्हंजी काय व्हय रं? आवशिद घेतलं पायजीस?’’ म्या त्याला बजावलं.
‘‘लई वंगळ हाया का आवशिद?’’ घाबरून त्यानं पुसलं.
‘‘छ्या छ्या! तसलं काय बी नाय..’’ म्या त्याला खात्री दिली.
‘‘खरच्या कितीक येतंय परीक?’’
‘‘लई नाई येत.. बोल हैस का तयार?’’ म्या पुसलं.
‘‘हाय तयार.. येऊदी काय शे-पाचशे खर्च यायचाय तो..’’ त्यो म्हणाला.
मंग म्या खूष झालो. हसतच त्याच्याकडं बघत मी इचारलं, ‘‘हां चल बोल किती हाईतं पैशे आता तुझ्यापाशी?’’
तो गडबडून म्हणाला, ‘‘असतेल शंभरखांड..’’
‘‘चल मंग ऊठ आता. लगेच आवशिद घेऊत..’’ म्या पारावरून उठत म्हणालो.
माझं बघून तोबी उठला. म्हणाला, ‘‘कोण देतंय परीक आवशिद?’’
‘‘चल तू फकस्त.. अन् कडू लागलं तरी प्यायचं बरंका आवशिद.. नाय तर नगं म्हणचीन काय?’’
‘‘पेतो बाबा कसलंबी असू.. तुझी शप्पथ..’’ माझ्या गळ्याला हात लावीत त्यो बोलला.
मलाबी हिच पायजी होतं. म्या म्हणालो, ‘‘चल मंग गपचिप..’’
फकस्त पाच-सात मिनटांतंच आमी दोघं गावाकडीच्या झोपडपट्टीला आलो. तिथं काय चालतं ती त्याला ठावं होतं. म्हणून त्यानं एकाएकी माझा हातच धरला अन् म्हणाला, ‘‘गजा, हिकडं कामन आणलंस रं..?’’
त्याला माझा डाऊट आला होता. म्या म्हणालो, ‘‘गप राहा अन् सांगतो ती कर.. बास..’’

मंग मी सम्दा पिलॅन त्याला समजून सांगितला. केरबा माळकरी होता अन् कवाच त्यानं एक घोट घेतलेला नव्हता म्हणून त्यो आधी तोंड वाकडं करून होता. परीक आखरीला त्यो राजी झाला. मंग आमी दोघं गपचिप दारू इकणार्‍या बंक्याच्या खोपटात घुसलोत तर तिथं दोघं-तिघं होतच! अन् त्यांची बडबड चालू होती. मधूनच ते ओरडत होते. आमी बाजूला बसताच बुटका बंक्या काची गिलासं घेऊन पुढी आला. म्या कवा-बवा घोट घेत असल्यापायी माला तितलं सम्दं यवस्तित माहिती व्हतं. आक्षी हातभट्टीचे पिवरचे दोन गिलासं केरबाला दिले. माझं बघून त्यानंबी डोळे झाकून पिले अन् घडीभरानं दोघंबी तिथून भाईर आलो. मोकळी हवा लागल्यावर मंग तर केरबा लईच खुलला. अंगात बळ आल्यावानी करायला लागला. मधीच हसायबी लागला. लगेच आमी दोघं आमच्या गल्लीला आलो. मंग म्या त्याला काय करायचं ती याद करून दिली अन् त्याला सोडलं. दाणदाण पाय आपटतच त्यो सोताच्या वाड्यासमूर गेला अन् वरडला, ‘‘सखे.. आधी भाईर ये बघ…’’

त्याच्या आवाजानं घाबरूनच सखू अन् शांतावैनी भाईर आल्या. त्याला बघून त्या मायलेकी तर गारच झाल्या. त्यानं गपकन सखूचा हातच धरला अन् म्हणाला, ‘‘सखे, चल बरं तुझी सासू कशी तुला घरात येऊ देत नाय ते बघूत..’’
सखू एकदम रडकुंडीलाच आली. परीक त्यानं ध्यान केलं नाहीच वर तिला फरफर वढीतच बहिणीच्या; गंगाक्काच्या दारापुढी आणलं. गंगाक्का कालवणाला दोडका चिरीत भाईरच्या छपरातच होती. केरबाचा अवतार बघून तिला धक्काच बसला. चिडून ती म्हणाली, ‘‘भावड्या, काय तमाशा लावलाय रं? आन् सकाळच्या रामपार्‍यात मुताडा ढोसून आलास काय?’’
परीक त्यो आपल्याच नादात होता. त्यानं तिचं बोलणं ऐकिलं नाही. त्यो एक बार अजूक वरडला, ‘‘त्वा माझी लेक नांदविणारंस का नाई.. एकच सांग.. नाई म्हणच, मंग बघ ह्या कासर्‍यानं फाशी घेतो का नाई..’’

त्यानं सखूचा हात सोडला अन् समूरच्या भिंतीला अडकून ठेवलेला कासरा घेतला. हे बघून गंगाक्काच्या तोंडचं पाणीच पळालं अन् काय बोलावं तेच तिला समजंना! सखूनं तर गळाच काढला. तिचं बघून शांतावैनीनंबी रडायला चालू केलं. म्या आपला रस्त्यावर उभा राहून गमत बघत होतो. एवढ्यामधी काई ध्यानात यायच्या आधीच त्यो कासरा घेऊन वाड्याभाईर आला. मंग तर त्या तिघीबी आरडाओरडा करीत भाईर आल्या. लटकून गंगाक्का पुढी आली. तिनं त्याला गळपाटून धरलं आन् म्हणाली, ‘‘भावड्या, असा जिवाचा इनाकारण सनिताप करून घेऊ नकू बघ… तुला माझी आन हाय.. तिला पुढं काई बोलताबी आलं नाई. टचकन डोळ्यात पाणीच आलं. परीक एवढ्यात त्यानं तिला एक झटका दिला अन् आरडतच रस्त्यानं पळत निघाला. मंग तर ह्या तिघीबी लईच हापकल्या… तर त्याचा ह्यो आरडाओरडा ऐकून सम्दी गल्ली गोळा झाली.

काई कळते पोरं हसाय लागले तर आया-बाया कुचूकुचू करू लागल्या. लहान बाळगोपाळ काई ध्यानात नाई आल्यानं घाबरून निस्ते बघत होते. म्या आपलं लांबून बघत होतो. तर एवढ्यात गडबडीनं शांतावैनी पुढं आली आन् तिनं अमनधपक्याच केरबाला धरलं. त्यानंबी लगूलग तिला एक हिसका दिला. त्याबराबर ती बाजूच्या नालीतच पडली आन् बेंदाडानं माखून गेली. माय पडलेली बघून सखू पुढं आली. तिनं मायला हात देऊन नालीबाहेर काढलं. शांतावैनीनं भरलेलं आंगसद्या बघितलं नाई तर पुन्हा त्याला धरायला धावली. तिच्या मागं सखू अन् गंगाक्का होत्या. आखरीला पटकून सखूनं केरबाला धरलं अन् इवळत म्हणाली, ‘‘अप्पा, गप बसा बरं.. आता आमी कवाच भांडणार नाहीत.. तुमची शप्पथ की वं…’’
तिचं बोलणं ऐकून गंगाक्का पुढी आली अन् त्याचा आलामला घेत विनवणी करीत म्हणाली, ‘‘भावड्या, गच बस बरंका.. तुला माझी आन हाय बघ… जिवाचा सनिताप नकू करून घेऊ.. कवाच भांडायची नाय रं तिला लेकरा.. तुझी शप्पथ..’’
त्यो मातर हिसके देतच होता. ओरडत होता. एवढ्यात चार गडी समूर आले. त्यांनीबी त्याला चार गोष्टी सांगितल्या. तरी त्याचा कालवा सुरूच होता. मंग आमची ‘ही’ पुढी आली आन् मला म्हणाली, ‘‘बघाया काय लागलाव लांब हुभा राहून.. धरा की दोस्ताला..!’’

मंग म्या समूर आलो. त्याच्या हातातला कासरा हिसकावून घेतला. त्याला एका वट्यावर सावलीला बसवलं. मला बघून तर त्यो लईच वरडू लागला. ‘सरक तुला काय करायचंय?’ म्हणू लागला. म्याबी मंग खोटं-खोटं वरडून म्हणालो, ‘‘आरं त्या दोघीबी आता तुझी माफी मागायल्याता की… तरीबी गप होईनास.. आं..?’’
‘‘अप्पा, माफी करा की वं.. आता कवाच भांडणार नाई वं..’’ सखू काकुळतीला येऊन म्हणाली.
तिचं बघून गंगाक्काबी म्हणाली, ‘‘वाघा, थिर हो माय… माझ्या सोन्या…’’
मंग तर त्यानं रडायलाच सुरू केलं. आन् रडत म्हणाला, ‘‘मला सोडा रंय तुमी… मला मरायचंया आता… माझा जगून काई उपेग नाई…’’
एवढ्यात मन्यानं गारढण पाण्याची कळशी आणली आन् त्याच्या डोक्शावर वतली. मंग मातर त्याचं रडणं बंद झालं. त्यानं नशा उतरल्यागत डोळे उघडले. एक बार समद्याली बघितलं आन् वाचा गेल्यागत त्यो गपच झाला.
मंग म्या त्याला म्हणालो, ‘‘चल बरं घर्ला.. झाला तेवढा तमाशा लई झाला..’’
लगेच गंगाक्का बोलली, ‘‘चल वाघा..’’
सखूनंबी त्याला धरलं. पुन्हा म्हणाली, ‘‘अप्पा, चला की’’
मंग माझ्याकडं बघत त्यो उठला अन् त्यांच्यासंगं निघाला. मंग सम्दी गर्दीबी पांगली.
म्या त्याच्याकडं बघत मनातल्या मनात हासत होतो, कारण म्या त्याच्या दुखण्यावर एकदम भारी ‘इलाज’ केला होता!

– उमेश मोहिते

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.